ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, September 30, 2010

४६. पण

खर तर खूप काही लिहिण्यासारख आहे.
मी नव्या गावात आहे.
नव्या वातावरणात आहे.
नवीन माणस भेटताहेत.

जुन्या गोष्टी मागे पड़ल्यात.
जुन्या भावना, जुनी स्वप्ने परकी होऊन गेली आहेत.
कालचे आज काही उरत नाही हा अनुभव पुन्हा एकदा येतो आहे.

पण त्याचबरोबर नव्या जगाचे कुतुहलही आहे.
अजून फारशी स्वप्ने नाहीत ... पण ती काय कधीही सुरु होऊ शकतात! ते सांगायचे आहे...
पण...

एक मोठा पण आडवा येत आहे.

आजवर नेहमी मी बरहा इमे वापरता होते. सवय त्याचीच झालेली. आता संगणक दुस-याचा , तेथे नेहमीचा सवयीचा फॉण्ट नाही. दोन तीन इ -मित्रानी माझी मदत केली आहे आवश्यक माहिती तातडीने मला देउन. पण....

आपल्या सवयी बदलणे किती अवघड असते याचा मला प्रत्यंतर येतो आहे.
एखादा शब्द टाइप करायला जमला की आनंदही होतो आहे.
केले की जमते, करायची इच्छा मात्र हवी हेही समजते आहे.
नव्या पद्धतीने काही शब्द टाइप करायला अवघड जाते आहे..
पर्यायी सोपे शब्द शोधण्याची प्रक्रिया मनात लगेच सुरु होते आहे.
त्या नादात जे काही सांगायचे त्यापेक्षा दुसरेच काही व्यक्त होत आहे.
आपल्याला प्रश्नात अडकून राहणे आवडत नाही .. वाट शोधणे चालू राहते आतल्या आत हे लक्षात येउन बरेही वाटते आहे.

एक नवा अनुभव .. एका अर्थी पाहिले तर बाहेरच्या जगात बदल..
पण त्याच्या सोबत जगताना. त्याकडे नीट पाहताना आपण आतही किती बदलत आहोत, बदललो आहोत ते जाणवते.

अशी बदलत बदलत मी कधीतरी मूळ पदावर तर जाउन पोचणार नाही ना? अशी भीती नाही वाटत... पण कोठे जाउन पोचणार त्याचा अंदाज बांधता येत नाही.
आयुष्यात अशी अनिश्चितता असावी त्यातच खरी मजा असते

परिस्थितीला शरण जाणे आणि परिस्थितीला सामोरे जाणे या दोन बाबी एकसारख्या नाहीत असे मी मला सांगते आहे.
यात समंजसपणा किती आणि अपरिहार्यता किती?
माहिती नाही.

असे मला बदलायचे होते का पण?
माहिती नाही.
पण हा बदल मी स्वीकारला आहे .. तो मीच जाणीवपूर्वक आणला आहे.
आता मराठी पोस्ट लिहायला अवघड जाणार थोड़े इतके सोडले तर बाकी काही 'पण' नाही.

Thursday, September 23, 2010

४५. संवाद

माणसं एकमेकांशी कशासाठी बोलतात?

मन मोकळं करण्यासाठी?
वेळ घालवण्यासाठी?
ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी?
की सवय म्हणून?

अनेकदा मला हे प्रश्न पडतात, विशेषत: मी स्वत: आवश्यकतेपेक्षा जास्त बोलत असते तेंव्हा तर मला हमखास हे प्रश्न पडतात.

आणि गंमत म्हणजे दरवेळी या प्रश्नांची वेगळीच उत्तरे मला मिळतात.
व्यक्तीनुसार, परिस्थितीनुसार आणि खरे सांगायचे तर माझ्या मनस्थितीनुसार या प्रश्नांची उत्तरे बदलतात असे मला आढळले.

मजा वाटली मला. पण मनातला गोंधळ अधिकच वाढला.

मी मूळची गणिताची विद्यार्थिनी असल्याने (आता आलिकडे मला गणित काहीच येत नाही हा भाग वेगळा!) एखादा प्रश्न सोडवण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग असतात हे मला माहिती आहे - माझी तशी श्रद्धाच आहे म्हणा ना!

पर्याय म्हणून मी या प्रश्नांकडे दुस-या बाजूने पहायचे ठरवले. मी विचार करायला लागले.
माणसं का ऐकतात?

प्रश्न बदलला तरी उत्तरं मात्र तीच येऊ लागली. म्हणजे:
माणसं वेळ घालवण्यासाठी ऐकतात.
माणसं ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी ऐकतात.
माणसं सवय म्हणून ऐकतात.

विचार करताना दोन गोष्टी नव्याने लक्षात आल्या. म्हणजे आहेत तशा त्या जुन्याच, अनेकदा कानांवर पडलेल्या - पण साक्षात्काराचा ठसा काही वेगळाच असतो.
एक म्हणजे - माणसं नाईलाजाने, पर्यायच नसतो म्हणून ऐकतात.
त्याहून अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे खरं तर माणसं ऐकतच नसतात! आणि बोलणा-याला (बोलणारीला) तरी कोठे फिकीर असते समोरचा ऐकतोय (ऐकतेय) की नाही ते! आपण आपले आपल्याच बोलण्यावर (- लिहिण्यावरही) खूष असतो!

हे असं चित्र समोर आल्यावर काही काळ माझी अवस्था फार वाईट झाली. म्हणजे मला कोणाशी काही बोलावसं वाटेना, कोणाचं काही ऐकावं वाटेना. संवादाची प्रक्रिया म्हणजे मला एक शुद्ध फसवणूक वाटायला लागली. बोलून मन मोकळं करण्याजोगं आपण काही अनुभवलं तरी आहे का, याच आश्चर्य वाटायला लागलं!

हे सगळे विचार मनात येत होते तेव्हा माझा मुक्काम पॉंडिचेरीत होता. पॉल ब्रन्टनच्या पुस्तकात रमण महर्षींच्या मौनाबद्दल वाचलं होतं. पॉंडिचेरीपासून रमणाश्रम काही तासांच्या अंतरावर! मग मी तिकडे गेले.

रमणाश्रम शांत होता. पण ती गंभीर स्मशानशांतता नव्हती. रमण महर्षींच्या प्रतिमेसमोर बसल्यावर वाटलं: या माणसाला समजेल आपण काय म्हणतो आहोत ते. (मेलेल्या माणसाला कसं समजेल? - असा एरवी सहज सुचणारा विचार तेथे माझ्या मनात आला नाही हेही नवलच!) - जणू ते आधीच समजल्यागत त्यांच ते गूढ स्मितहास्य!

पण मला काही बोलावसं वाटेना. दुस-यांशी बोलायचं नसतं तेंव्हा अनेकदा मला स्वत:शी बोलायला आवडतं. पण तेथे स्वत:शीही बोलावसं वाटेना. ऐकायची तयारी होती माझी - पण माझ्याशी रमण महर्षी कसे बोलणार? तेथे ते नव्हते, त्यांचा फक्त फोटो होता. तो फोटो जिवंत वाटत होता, पण अखेर तो फोटोच होता. मी नुसती बसून राहिले शांतपणे. काहीच मनात नव्हतं. आपल्या मनात काही नाही याची जाणीवही नव्हती.

परतीच्या प्रवासात लक्षात आलं, की आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपल्यालाच नीट माहिती नसतं. चाचपडत असतो आपण, म्हणून भारंभार बोलत राहतो. त्यातून कधीतरी नेमकेपणाने अभिव्यक्त होऊ – या एकमेव आशेवर आपण बोलत राहतो (लिहित राहतो!) आपण जसे आपल्या गोंधळात असतो, तसेच समोरचा(ची)ही बहुतेक तशाच गोंधळात असतो - असते. गोंधळलेल्यांचे ऐकण्यात फायदा नसतो हे अनुभवाने आपण सगळे जाणतो - म्हणून ’ न ऐकण्याची’ प्रवृत्ती एका अर्थी स्वाभाविकच!

’काय बोलायचे’ हे ज्यांना समजले, ती रमण महर्षींसारखी ऋषितुल्य माणसे त्यांच्या जिवंतपणीही फार काही बोलली नाहीत .. आणि त्यांचे ’ऐकायला’ जगभरातून माणसं धडपडत तिथवर येतात – रमणांच्या मृत्युनंतरही येतात.

संवादाचे सार अखेर कळण्यात आहे - बोलणे अथवा लिहिणे ही केवळ साधनेच आहेत.
या साधनांविनाही संवाद होतो यातच त्याचे सारे रहस्य दडलेले आहे काय?

Thursday, September 16, 2010

४४. उणीव

एखादी गोष्ट आपल्याला चांगली जमत नसेल तर त्याबद्दल वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याची जास्त खंत करत बसण्यात पण काही अर्थ नसतो. बरेचदा ती गोष्ट आपल्याला जमत नाही याचा आपण स्वीकार केला की फार गंमतीशीर चित्र समोर येतं! आपल्या बलस्थांनामुळेच केवळ जगणं चांगलं होतं अशातला भाग नाही; अनेकदा आपल्यातल्या कमतरतांमुळेही आपल जगणं साधं, सोप, सरळ आणि सुरळीत होत जातं - आपल्याही नकळत!

माझचं बघा ना. माझी स्मरणशक्ती जेमतेम आहे. शाळेत असताना ’तुमच्या जीवनातील संस्मरणीय क्षण’ , किंवा ’पावसाळयातील एक दिवस’ असल्या छापाचे निबंध लिहिणं मला फार त्रासदायक वाटायचं. ’अमुक तारखेला घडयाळात इतके वाजले असताना’ झालेल्या घटनांची वर्णनं कोणी करायला लागलं तर मला आश्चर्य वाटतं. क्वचित अपवाद वगळता मला जुनं काही फारस कधी आठवत नाही. एक म्हणजे ’सध्या’ आजुबाजूला इतक काही घडत असतं नेहमी, की भूतकाळाचा विचार करायला फारसा अवधी नसतो. दुसरं म्हणजे अनेक वर्षांपासून मी ब-यापैकी नियमितपणे रोजनिशी लिहीत आले आहे. एकदा माझे विचार, माझ्या भावना कागदावर (हल्ली स्क्रीनवर!) उतरवल्या - सुखाच्या असोत, दु:खाच्या असोत, गोंधळाच्या असोत – की मी ते सोयिस्करपणे विसरून जाते. एकदा व्यक्त झालेल्या भावना- विचारांना माझ्या आयुष्यात पुन्हा म्हणून येण्याचा हक्क नाही अशा थाटात मी ते सारं काही विसरून जाते.

अर्थात स्वत:च्या भावना-विचार शब्दबद्ध करण्यात एक मोठा धोका नेहमी असतो. तो म्हणजे एकदा जगून झालेले क्षण, निसटून गेलेले क्षण शब्दांच्या आधारे पुन्हा जगण्याचा, भूतकाळाला पकडून ठेवण्याचा वेडा प्रयत्न मन करत राहू शकते. माझ्या सुदैवाने अजून तरी माझ्या बाबतीत तसे फारसे घडत नाही.

मी जवळजवळ एक तपाहून अधिक काळ सेवाभावी संस्थांचे ’पूर्ण वेळ’ काम केले. त्या काळात मला माझे खासगीपण जपायची संधी फार कमी मिळायची. सदैव लोकांच्या सानिध्यात राहणे हा त्या कार्यशैलीचा अविभाज्य हिस्सा होता. २४ तास, वर्षातले ३६५ दिवस असे लोकांसोबत जगणे, स्वत:साठी काही वेगळी जागा न ठेवता जगणे हे खरोखर अवघड असते. (तेव्हा मला ते जमून गेले, आज कदाचित अजिबात जमणार नाही!). त्याआधी महाविद्यालयीन काळात होस्टेलला राहिल्याने खासगीपणा नसण्याची तशी थोडीफार सवय झाली होती म्हणा! कोणी जरा ’वेगळेपणा’ जपायचा प्रयत्न केला तर समवयस्क मंडळी त्याचा /तिचा नक्षा कसा उतरवता त्याचा अनुभव आपण सर्वांनी कधी ना कधी नक्की घेतला असेल.

सदैव लोकांमध्ये राहत असण्याच्या काळातही मला रोजनिशी लिहायची सवय जडली. किंबहुना विचार, भावना, मत, राग, वैताग, कंटाळा .. असल्या गोष्टी सेवाभावी संस्थेच्या ’पूर्ण वेळ’ कार्यकर्त्यांनी व्यक्त करणे अपेक्षित नसते - त्यामुळे त्या काळात रोजनिशी लिहिणे आवश्यक होऊन बसले होते. पण खासगीपणा नसल्यामुळे आपण लिहिलेले कोणाच्या हातात कधी पडेल याचा नेम नसायचा. लिहिलेले जपून ठेवायला वेगळी जागा नसायची. शिवाय एरवी अगदी प्रगल्भ असणा-या लोकांनासुद्धा दुस-यांची रोजनिशी हातात पडली तर ती वाचायचा मोह होतो.

म्हणून मी एक युक्ती केली. रोजनिशी लिहिताना गावांची, व्यक्तींची खरी नावे लिहायची नाहीत, त्यांना काही सांकेतिक नावे अथवा टोपणनावे द्यायची अशी मी स्वत:ला शिस्त लावून घेतली. जगण्याच्या एका टप्प्यात तीच तीच माणसे अनेकदा भेटतात. त्यामुळे एका व्यक्तीला एक सांकेतिक नाव द्यायचे आणि त्यात सातत्य ठेवायचे असे मी सुरू केले. चुकून कोणी मी लिहिलेले वाचले (जे त्यांनी न वाचणे अपेक्षित होते!) तर त्यांना नेमके कोठे, काय आणि कोणाच्या बाबतीत हे (मी लिहिलेले) घडले असावे त्याचा थांगपत्ता लागू नये इतक्या सफाईने मी रोजनिशी लिहित गेले. अनेक वर्षे मी असे केले. त्याचा उपयोग झाला. त्यामुळे मी सांकेतिक, प्रतिकात्मक लिहित राहिले. तशी मला सवय लागली. मी पूर्ण वेळ काम करणे थांबवले, तरीही सवय तशीच राहिली. पुढे माझे स्वत:चे घर झाले तरी ती सवय तशीच राहिली. चोरांचा अपवाद वगळता माझ्या आमंत्रणाशिवाय या घरात कोणी येत नाही - आणि न आवडणा-या माणसांना घरी येण्याचे आमंत्रण देण्याचा दांभिकपणा मी करत नाही - तरीही ती सांकेतिक लिहिण्याची सवय राहिली ती राहिलीच! आजही मी ख-या नावांनिशी, गावांनिशी काही लिहीत नाही. फक्त स्वत:साठी मी जे लिहिते, तेव्हाही लिहित नाही.

 यामुळे एक अनपेक्षित गंमत झाली. एकदा एखादी घटना, एखादी व्यक्ती विस्मरणात गेली, की दोन चार वर्षांनी रोजनिशीची जुनी पाने वाचताना मलाही काही आठवेनासे झाले. म्हणजे एखाद्याला मी ’उदय’ असे नाव दिले असेल, तर त्या उदयचा उल्लेख वाचून मला काहीच आठवेनासे झाले. एखाद्या सांकेतिक लिपीची किल्ली हरवल्यावर सारे लेखन अनोळखी होऊन बसावे तसे माझे झाले. ’त्या वेळी मला उदयच्या म्हणण्याचा त्रास झाल्याचा’ उल्लेख असेल तर हा नेमका कसला त्रास होता हेच मला आठवेना! किंवा ’स्वातीशी (हे पुन्हा एक असेच नाव..) गप्पा मारताना मजा आली” याही वाक्याचा अर्थ लागेनासा झाला. मला त्या त्या क्षणी वाटलेले सुख, दु:ख, गंमत, आनंद.. नेमके कशामुळे होते हेच मला सापडेनासे झाले. माझ्या रोजनिशीची मी भरभरून लिहिलेली जुनी पाने वाचताना मला स्वत:चे जगणे परक्यासारखे वाटले. त्यातल्या कोणत्याच प्रसंगांत मी जणू नव्हते. मी जणू काही दुस-याच कोणाची रोजनिशी वाचत होते - ती मी वाचणे अपेक्षित नसल्याने मला ते वाचून काहीच कळत नव्हते.

असे पहिल्यांदा झाले तेव्हा मी चक्रावलेच. स्मरणशक्ती चांगली नाही वगैरे ठीक आहे - पण पानेच्या पाने भरून आपणच जे लिहिले त्यातले काहीच आठवू नये म्हणजे अतीच झाले. मी संवेदनशील आहे, काही वेळा नको इतकी संवेदनशील (hypersensitive) असते. त्यामुळे काही माणसे मला फार सहज दुखावतात, तर काहींशी माझे मन पटकन जोडले जाते. अशा माणसांत, नात्यांत गुंतून जाण्याची, तुटण्याची प्रक्रिया माझ्याबाबत वेगाने घडते. या सगळ्या उत्कट जगण्याच्या खाणाखुणा पानोपानी पसरलेल्या असताना, ते माझेच जगणॆ असताना - मला कालांतराने ते काही आठवू नये हे अजब होते. स्वत:ला परके होण्याची ती एक धारदार भावना होती.

पण एकदा अशाच एका भावावेगात "हे तुला अजून पाच वर्षांनी आठवेल तरी का?” असा प्रश्न माझा मला मी विचारला.
अनुभवाने या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर “नाही” असे आहे हे मला माहिती होते.
ते मग माझ्या आयुष्यातले एक मजेदार वळण ठरले.

आता "हे तुला अजून पाच वर्षांनी आठवेल तरी का?” हा प्रश्न माझ्यासाठी “लिटमस टेस्ट” आहे.

कोणत्याही भावनिक प्रसंगाला सामोरे जाताना मी या प्रश्नाची ढाल वापरते. जुने काही फारसे मला आठवत नाही या न्यायाने आजचे काही मला उद्या आठवणार नाही हे मला नीट समजले आहे. अर्थात काही गोष्टींचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो - पण त्या इतक्या आतल्या होतात की त्या मुद्दाम आठवाव्या लागत नाहीत! त्या आपल्या अस्तित्त्वाचा एक भाग बनतात, आपल्यापासून त्यांना वेगळे करता येत नाही.

या प्रश्नाचा परिणाम म्हणून परिस्थितीला सामोरे जाण्याची माझी शैली बदलली आहे. एखादी गोष्ट पाच वर्षांनीही मला महत्त्वाची वाटेल असे अगदी आतून वाटले तरच मी त्याकडे जरा गांभीर्याने बघते. अन्यथा ’आला क्षण गेला क्षण’ अशी एक काहीशी विरक्त अवस्था मी अनुभवते. या सगळ्या विचारांमुळे मी एक वेगळीच व्यक्ती बनून गेली आहे - चांगली नाही, वेगळीच! कधी कधी मला वाटते की इतके अलिप्तपण बरे नाही. कशात तरी मन गुंतायला हवे, कशाने तरी सुखावायला हवे, कशाने तरी दुखावायलाही हवे. उत्कटता असेल तरच जगण्यात मजा. नाहीतर हे वरवरचे जगणे काय कामाचे? मी अशी बदलले नसते तर बरे होते असेही मला वाटते.

पण तरीही मी सुखी आहे. भावनांच्या तालावर नाचणे थांबले आहे असे वाटते (ते पुन्हा कधी ताबा घेईल सांगता येत नाही). स्वत:त रमण्याचे पुष्कळ क्षण येतात, त्यामुळे इतर कोणावर काही अवलंबून राहिले नाही. कोणी भेटले आपल्यासारखे तर बरे वाटते, पण ते तुटले तर मन उदास होत नाही. एक जागा सोडून दुस-या जागी जायचे तर भांबावल्यासारखे वाटत नाही आता. हे सगळे आपलेच आहे आणि तरीही यातले काहीच आपले नाही अशा दोन्ही तीरांना पाणी एका वेळी स्पर्श करत राहते.....

एका अर्थी ही शांतता, ही स्तब्धता हे सारे माझी स्मरणशक्ती चांगली नसल्याचाच परिणाम.

उणीवांनीही जगणे असे बनते तर! आपल्या नकळत.
**

Friday, September 10, 2010

४३. शब्दांचे अर्थ

“कसं झालं लग्न?” मी घरात पाऊल टाकल्या टाकल्या सुधीरच्या आजीने विचारले.
मी जरा चकितच झाले. कारण ज्यांच लग्न झालं त्यांनाच काय मलाही सुधीरची आजी फार ओळखत नव्हती.

सुधीर माझ्या मैत्रिणीचा - निमाचा - नवरा. एका अटळ (म्हणजे मला उपस्थिती टाळता येण्याची शक्यता नसलेल्या) लग्नानिमित्त मी औरंगाबादला आले होते आणि पोटभर गप्पा मारण्यासाठी निमाकडे येऊन राहिले होते.

“छान झालं लग्न", मी हसत आजींना म्हटले आणि तत्काळ विषय बदलला. आजींना आणखी काहीतरी विचारायचे होते, पण तेवढयात सुधीर आला. “हं! काय, कस काय झालं लग्न?” सुधीरने मला विचारले. सुधीर आणि मी फार कमी वेळा प्रत्यक्ष भेटलो होतो. आमची एकमेकांशी ऒळख निमाच्या द्वारेच जास्त होती. त्यामुळे मी काहीशा कुतुहलाने त्याच्याकडे पाहिले. मला फालतू, निरर्थक पद्धतीने माणसं जपायचा कंटाळा येतो. म्हणून त्याच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करत मी म्हटले, “बापरे! सुधीर, ही नव्या घोटाळयाची बातमी पाहिलीस का?” (हाही तितकाच निरर्थक प्रश्न!)

सुधीर समंजसपणे हसला आणि आरामखुर्ची माझ्यापुढे सरकावत "झकास कॉफी करतो, बस तू निवांत" म्हणत स्वयंपाकघरात गेला. आम्ही कॉफी घेत होतो, तेवढयात निमा आली आणि आश्चर्य म्हणजे तिनेही तोच प्रश्न विचारला: “कसं झालं लग्न?”

“अगं निमा, लग्नासारखं लग्न! नवरा नवरीने एकमेकांना हार घातले, भटजींनी आणि काही उत्साही आजीबाईंनी मंगलाष्टका म्हटल्या, माणसं घाईघाईने जेवली, व्हिडीओ कॅसेट काढली वगैरे वगैरे. कोणत्याही लग्नात तपशिलातले फरक सोडले, तर कमी अधिक प्रमाणात याच गोष्टी नसतात का? आणि लग्नपत्रिका पाहून एका नजरेत कळतोच की त्या लग्नाचा प्रकार!” माझ्या स्वरांतला कंटाळा निमाला जाणवला.

क्षणभर गप्प बसून निमा म्हणाली, “फक्त तितकचं नसतं, त्यापलिकडच्याही पुष्कळ गोष्टी असतात. आता बघ, तू असल्या कार्यक्रमांना कंटाळतेस हे मला माहिती आहे. तरीही तू जातेस कारण तुला माणसांची मन जपायला आवडतं. अशा प्रसंगी ओळखीचे इतरही अनेक जण भेटतात. त्यामुळे माझ्या प्रश्नाचा खरा अर्थ होता की, तुझी इतर मित्रमंडळी तुला भेटली की नाही तेथे? तुझा वेळ बरा गेला का? ज्याअर्थी तू माझ्या प्रश्नावर एवढी वैतागलीस त्याअर्थी तुझा वेळ वाईट गेला असावा.”

मी कृतज्ञतेने निमाकडे पाहिले. तिचं हे वैशिष्टयच आहे. मला समजेल अशा भाषेत ती नेहमीच बोलते.

सुधीरकडे वळून मी म्हटले, “सॉरी सुधीर! तुला नेमके काय म्हणायचे होते?”
सुधीर म्हणाला, “ एक तर तुझा वेळ कसा गेला याबाबत आस्था होतीच. शिवाय लग्नातला देण्या-घेण्याचा बाजारूपणा, उधळपट्टी आणि निरर्थक कर्मकांड याबाबत आपली मतं जुळतात. त्याबद्दल तू काहीतरी बोलशील, बोलावेस अशी माझी इच्छा होती.”

“आणि आजी?” मी जरा खजील होत सुधीरला विचारले.
“अगं, आजी जुन्या जमान्यातली. त्यामुळे दागिने किती घातले, जेवायला काय होते, आग्रह कितपत झाला असेच प्रश्न तिच्या मनात असणार...” सुधीर शांतपणे म्हणाला.

“पण मग आपण नेमके प्रश्न विचारण्याऐवजी अशी सरधोपट भाषा का वापरतो?” मी स्वत:ला विचारायचा प्रश्न नाटकातल्या स्वगतांसारखा मोठयाने बोलले.

सुधीर हसला. म्हणाला, “ भाषा कशी बदलणार? आणि खूप नेमके प्रश्न कधीकधी फार उघडेनागडे आणि म्हणून दाहक वाटतात. त्यापेक्षा समोरचा माणूस, त्याच आपल्याशी असणारं नातं या बाबी लक्षात घेऊन सरधोपट भाषेचा खरा अर्थ लावण्याचे आव्हान तू का घेत नाहीस? सगळी माणसं व्यवहारात असचं करतात, त्यात एक गंमत आहे.....”

शब्द तेच, पण अर्थाच्या छटा वेगळ्या, भाव वेगळे, हेतू वेगळे, अपेक्षा वेगळ्या.
हा एक रंजक खेळच आहे तर!
*

Friday, September 3, 2010

४२. काही कविता: १३: लगाम

लगाम आवरून धरत
दुस-या हाताने
एकमेकांत अस्ताव्यस्त गुंतलेली
सारी मुळे
नीट केली मी,
आणि वळून पाहत
जणू प्रथमच तुझ्याकडे
मी म्हटले:
हं! आता बोल.


पण तू
काहीच म्हटले नाहीस
आजतागायत.


आता हे देखील
नेटाने
आवरून धरणे
क्रमप्राप्त आहेच तर!

नाशिक ३० सप्टेंबर २००६ ०१.२०