ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, July 28, 2011

८२. घाई


कालचीच गोष्ट. 
आमच एक प्रशिक्षण चालू होत. चार पाच वेगवेगळ्या राज्यांतली मंडळी होती. फारशी ओळख झाली नव्हती सगळ्यांशी कारण संख्या बरीच जास्त होती. त्यामुळे समोर आलेला प्रत्येक माणूस आपल्याच प्रशिक्षणातला असेल अस मी गृहीत धरून चालत होते.

जेवताना ओरिसातले एक गृहस्थ शेजारी होते. थोड बोलल्यावर लक्षात आल की ते आमच्या प्रशिक्षणातले  नव्हते. पण गप्पा मारायला त्यामुळे काही अडचण असायचं कारण नव्हत. मी ऐकते आहे अस लक्षात आल्यावर ते गृहस्थ उत्साहाने जे बोलायला लागले ते थांबतच नव्हते. मला जरा गंमत वाटत होती आणि वेळही होता थोडा मोकळा. पंधरा वीस मिनिटांत माझ्या लक्षात आल की या गृहस्थांची प्रत्येक विषयावर अगदी ठाम मत होती - आणि मुख्य म्हणजे कोणताही विषय घेतला तरी त्यावर त्यांच मत (अर्थातच ठाम!) असायचच! म्हणजे सरकारी अधिकारी, सरकारी योजना, आदिवासी लोक, रस्ते, पाउस, सचिन तेंडुलकर,  भ्रष्टाचार  .... कोणताही विषय त्यांना वर्ज्य नव्हता.सगळ त्यांच्या मते अगदी वाईट होत, कशावरच त्यांचा विश्वास उरलेला नव्हता.  त्यांची सगळी मत गृहितकावर आधारलेली होती ... आणि आपल्याला  सगळ काही माहिती आहे हे त्यांच मुख्य गृहितक  होत! 

मला आपली नेहमी दुसरी बाजू पहायची सवय लागलीय. अनेकदा माझा तोटा झालाय या सवयीमुळे - पण तरी त्याचे फायदेही अनेक असतात म्हणून मी फारशी ती सवय बदलायच्या फंदात नाही पडले अजून तरी. त्यामुळे मी त्याना उगाच ती दुसरी बाजू सांगायला बघत होते - त्यामुळे ते अर्थातच अधिक उत्साहाने टीका करत होते. अशा गप्पांना काही शेवट नसतो, त्यामुळे काही निष्कर्ष न काढताच आमच बोलण संपल. 

पण या प्रसंगामुळे मला माझा एक जुना मित्र आठवला. ऐन उमेदीतली पाच सहा वर्ष आम्ही बरोबर काम केल होत. त्यामुळे वाद-विवाद- चर्चा आमच्यात भरपूर व्हायच्या. तो लिहायचा चांगल - आणि मला लिहायची हौस होती . म्हणून लिखाणाची बरीच काम आम्ही मिळून केली. हल्ली तो ब-यापैकी लेखक म्हणून ओळखला जातो. 

तर त्यादिवशी असेच एका समारंभात आम्ही अचानक भेटलो. तोवर 'मैत्री' या संकल्पनेबद्दलच माझ भाबडेपण बरच कमी झाल होत. 'सारे प्रवासी घडीचे' असा पुरेसा  अनुभव आलेला होता. त्यामुळे मी त्याच्याशी फार  न गुंतता आणि फार अलिप्तपणे पण नाही असा संवाद करत होते. तेवढ्यात त्याचा कॉलेजात शिकणारा मुलगा समोर आला - त्याला मी पाळण्यात पाहिलं होत आणि त्यावर आजच. त्यामुळे मित्राने त्याला माझी 'ही मावशी पण चांगल लिहायची' अशी ओळख करून दिली. मी आपली नुसती हसले आणि त्या मुलाशी गप्पा मारायला लागले. 

पण माझा मित्र अचानक एकदम लेखकाच्या भूमिकेत शिरला. त्यान मला विचारल, "तू काही लिहितेस की नाही? की सोडलस सगळ आणि फक्त पैसे कमावतेस आता? सरस्वतीची उपासना करावी, लक्ष्मीची  करू नये हे विसरलीस  वाटत?"

आम्ही इतक्या वर्षानी भेटत होतो, की तो मला अनोळखीच वाटत होता. त्यामुळे मी आपल 'कधीतरी लिहिते क्वचित ..' अस थातुरमातुर उत्तर दिल. पण ती त्याला पर्वणीच मिळाली. "फक्त पोटासाठी लिहू नये माणसान' "तू उगीच लिहायचं सोडलस, बरी लिहित होतीस तेव्हा', 'लेखन म्हणजे कसा बुद्धीचा सर्वात योग्य वापर आहे' असा उपदेशाचा भडीमार तो माझ्यावर करत राहिला. त्याला तोडून टाकून त्याच्या मुलासमोर मला त्याचा अपमान करायचा नव्हता, म्हणून मी सगळ ऐकून घेतलं मुकाट्याने. पण तेव्हाही मला जाणवलं की माझ्याबद्दल काही गोष्टी गृहीत धरून त्याने एक ठाम मत बनविल होत .. आणि त्याला खात्री होती की तो बरोबर आहे! 

मध्यंतरी अशीच एक ओळखीची भेटली. मी पुण्यात ब-याच महिन्यांनी गेले होते त्यामुळे सगळे मला त्यांच्या घरी राहायला बोलावत होते - तसच तिनेही आग्रह केला. पण मी त्या रात्री रणजीत आणि आरतीच्या घरी राहणार होते. रणजीत तिला माहिती होता, पण आरतीची आणि तिची ओळख नव्हती. "कस चाललाय ग रणजीतच आणि त्याच्या बायकोच?" तिने विचारल. "चांगल चाललाय .. आता सविस्तर बोलूच आम्ही रात्री" मी म्हटल. 

त्यावर अधिक साशंक होत ती म्हणाली, "नाही ग, तिच्याबद्दल काही फार चांगल ऐकल नाही मी".
मी प्रश्नार्थक नजरेन तिच्याकड पाहिलं आणि त्याचा खुलासा म्हणून ती चांगली अर्धा तास मला सांगोवांगीच्या गोष्टी सांगत राहिली. त्यातल्या काही इतक्या भयानक होत्या की मी आरतीला ओळखत नसते तर माझ्या मनात नक्की तिच्याबद्दल संशय निर्माण झाला असता. 

इतक ठाम मत आरतीबद्दल  कशाच्या आधारावर? तर पुन्हा एकदा काही गोष्टी गृहीत धरून, कशाचीच शहानिशा न करता.

मला आणखी एक गंमत वाटते. बहुसंख्य लोक  वाईट ठाम मत नुसत्या गृहितकाच्या आधारे करतात आणि कशाबद्दल, कोणाबद्दल चांगल मत होण्यापूर्वी हजारवेळा चौकशा करतात, खात्री करून घेतात, अनुभव घेऊन पाहतात. 

वाईट मत बनवायचीच काय एवढी घाई असते आपल्याला? 

Thursday, July 21, 2011

८१.तळदेव


या नावाच एक गाव आहे हे देखील मला इतकी वर्ष माहिती नव्हत. एका रविवारी मात्र मला या गावात जायची संधी मिळाली. माझ्या एका मित्राने त्या परिसरात काही काम सुरु केलं होत. त्याचाच एक भाग म्हणून काही स्वयंसाहाय्यता गट (सोप्या भाषेत बोलायचं तर बचत गट) चालू केले होते. या गटांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यान मला बोलावलं होत. आता मार्गदर्शन वगैरे काही करण्याच्या मी फंदात पडत नाही पण मला वेगवेगळ्या लोकांशी बोलायला आवडत. शिवाय या भागात मी कधी आलेले नव्हते आजवर म्हणून मग मी तळदेव गावात होते.

महाबळेश्वरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरच हे गाव. मी महाबळेश्वरला फार वेळा गेलेले नाही पण वाईमध्ये माझी एक मैत्रीण राहायची, तिच्याकडे मात्र बरेचदा गेले होते. किमान दोन अडीच तासांचा प्रवास होता तो. पण आता मात्र आम्ही दीड तासातच तिथ पोचलो. रस्ते किती सुधारले आहेत हे तपासून पहायचं असेल तर पूर्वी केलेल्या रस्त्यांवरून पुन्हा एकदा प्रवास करावा म्हणजे अंदाज येतो. दरम्यान प्रवासाची साधनही बदलतात म्हणा. म्हणजे पूर्वी मी वाईला आपल्या लाल डब्याने म्हणजे एस टी बसने जात असे आज मात्र मी कारने आले होते त्यामुळेही प्रवासाचा वेळ वाचला असेल. गाव तसं छोटसंच जेमतेम १८० घर आणि हजार एक लोकसंख्या. शेजारच्या एका ३०० लोकसंख्येच्या गावाची आणि तळदेवची ग्रामपंचायात एक आहे म्हणजे यांच्यासोबत आणखी पन्नास घर जोडलेली आहेत.

तळदेव नावाच्या गावात देव ‘तळात’ असणार याचा मला अंदाज होता. या गावात महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. परंपरा सांगते की पांडवानी हे मंदिर बांधले. बांधकाम अर्थातच इतके जुने नाही – पण तरी या मंदिराला काही शतकांचा इतिहास नक्कीच असेल. मंदिराच बांधकाम मला आवडल. दगडी बांधकामामुळे असेल पण एक मस्त थंडावा होता गाभा-यात. आणि शांतता तर इतकी की मी नुकतीच मंदिराच्या परिसरात असलेल्या सुमारे अडीचशे तीनशे माणसांच्या समूहाला सोडून आत आले - तर जग पूर्ण सोडून आल्यागत वाटल मला त्या क्षणी!
गाभा-या नेहमीप्रमाणे शिवलिंगाकडे तोंड करून उभा असलेला नंदी होता. गाभा-यात एक दिवा मंद  तेवत होता – त्याच्या प्रकाशाने अंधार उजळून निघाल्यागत वाटलं मला – अंधार आणि प्रकाश यांनी एकाच वेळी वेधून टाकण्याचा अनुभव खूप काळाने घेतला तिथ! मी एकटीच होते त्या क्षणी त्या गाभा-यात. मला खूप शांत वाटलं!! या जगात सगळ काही आलबेल आहे अस कळल्यावर जे एक सुख आणि समाधान वाटेल – तसच काहीस मला वाटलं! विश्वाच्या लयाची, विनाशाची जबाबदारी ज्या देवाकडे आहे अस मानल जात (आणि मी अनेकदा ऐकलेल आहे) त्याच्या मूर्तीच्या समोर मला सगळ ‘ठीक आहे’ अस वाटाव हा एक विरोधाभास होता. त्या क्षणी मृत्युचा स्पर्श झाल्यागत, स्वत:चा शेवट समजल्यागत वाटलं मला. त्या गाभा-यात असण हा एका अर्थी गर्भावस्थेत असण्याचा अनुभव वाटला मला. मरण, विनाश, शेवट, काही संपण .. यातही शांतता असू शकते, यातही समाधान असू शकत हे आतून जाणवलं मला. म्हणजे तसा भास तरी नक्कीच झाला. हे सगळ वाटंणच, त्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही – पण ते खूप तीव्रतेने आणि उत्कटतेने वाटल्यामुळे लक्षात राहिलं इतकच!

बाहेरच्या जगात येऊन लोकांशी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली आणि या गावाबद्दल काही चांगली माहिती कळली. गावच्या सरपंच ताई ‘बिनविरोध’ निवडून आल्या होत्या. मग उपसरपंचांच्या घरी आग्रहाचा चहा घेताना मी हा ‘बिनविरोध’ निवडणुकीचा विषय काढला. त्यांनी मला सांगितलं की या गावात आजवर ग्रामपंचायतीची  निवडणूक अशी झालेली नाही. निवडणूक जेव्हा जाहीर होते, तेव्हा गावकरी एकत्र बसतात आणि सर्वसहमतीने कोणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करायचं ते ठरवतात. मग हे सगळे सात सदस्य मिळून पंचायात समितीच्या कार्यालयात जातात आणि अर्ज भरतात. अनुभवी सदस्य नव्या सदस्यांना अर्ज भरायला मदत करतात. अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यामुळे नाकारला जाणे इथे घडतच नाही.

अनेकदा सर्वसहमतीच्या  नावे काही ठराविकांची सत्ता चालू राहते असेही घडते. या गावातली ही सर्वसहमतीची प्रक्रिया  किती पारदर्शी असते हे मला  नाही सांगता येणार. जे मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव होतात, तिथेही कोणी असायचे हे गाव ठरवते. या ठरवण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग फारसा नसणार हे उघड आहे. म्हणजे स्त्रियांच्या सबलीकरणासाठी आरक्षण व्यवस्था असताना प्रत्यक्षात मात्र घडते ते वेगळेच.

पण तरीही ही काही वेगळेच मी ऐकत होते यात शंकाच नाही. बाहेरच्या जगात एवढी जीवघेणी स्पर्धा चालू असताना, या गावात इतकी एकी, इतके सहकार्य कसे? मग चर्चा करताना आणखीही काही गोष्टी गावातल्या लोकांनी सांगितल्या. एक तर या गावातले जवळजवळ घरटी एक माणूस मुंबईत कामाला आहे. त्यामुळे गावात मुंबईतला पैसा येतो. शिवाय इथली माणसं मुंबईत एकमेकांना धरून राहतात, मदत करतात. इथे गावात काही भांडण झाली तर त्याचा परिणाम त्यांना मुंबईत भोगावा लागेल हे त्यांना कळते. म्हणून गावात शांतता आणि सलोखा राहावा असा ते प्रयत्न करतात. दुसरे म्हणजे गावात वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सोयी आहेत. शाळा आहे, पोस्ट ऑफिस आहे, ग्रामपंचायत आहे, टेलिफोन आहे. एका छोट्या गावाच्या मानाने ब-याच गोष्टी इथे उपलब्ध आहेत. आता गावात काही नव्याने बांधायचे नाही सार्वजनिक कामासाठी. त्यामुळे फारसे असमाधान नाही लोकांच्या मनात असे दिसते. तिसरी गोष्ट – जी खर तर लोकशाहीला मारक आहे काहीशी – गावात एकाच राजकीय पक्षाचा प्रभाव आहे. तालुका, जिल्हा, राज्य .. सगळ्या ठिकाणी हा पक्ष सत्तेत आहे ; त्यामुळे इतर राजकीय पक्षांना इथे पाय रोवायला फारशी संधी मिळालेली नाही. कधीकधी वादावादी होते, भांडण होतात .. अशा वेळी गावची जुनी जाणती मंडळी सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात.

हे सगळ ऐकताना मला बर वाटलं. लोकशाही म्हणजे काही फक्त निवडणुका आणि मतदान नाही. त्याशिवायही लोकशाही पद्धतीने काम चालत असेल तर त्याच कौतुक करायला हव. यात लोकांचा बराच वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि ताणही कमी राहतो.

ही अर्थात चित्राची एक बाजू झाली, दुसरेही काही असेलच. पण कधी नाही ते मी फार खोलात गेले नाही. इतरांना काही विचारलं नाही. एक तर मला वेळ नव्हता आणि दुसर म्हणजे मी पाहुणी म्हणून तिथ गेले होते. आता पुन्हा कधीतरी जाईन तेव्हा बघेन वेगळ्या दृष्टीकोनातून. पण तोवर तळदेवची गाभा-यातली शांतता आणि तळदेवची लोकशाही मला आठवत राहिल हे खरच!
**

Wednesday, July 13, 2011

८०. आमंत्रण

मी आधी ज्या ऑफिसात काम करायचे, ते तसं मोठं होतं. म्हणजे बारा तेरा राज्यांत पसरलेलं काम आणि सुमारे ३००० माणसं!  त्यातले काही लोक ३० ते ३५ वर्ष याच संस्थेत काम करणारे तर काही नुकतेच आलेले. वेगवेगळ्या राज्यातले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळी पार्श्वभूमी असणारे, वेगवेगळे शिक्षण असणारे, वेगवेगळे स्वभाव असणारे, वेगवेगळ्या आवडीनिवडी  आणि वेगवेगळे काम करणारे असे हे ३००० लोक म्हणजे मोठा जनसमुदाय होता. 
मला दहा वर्ष काम करूनही सगळे लोक माहिती नव्हते इथले. काही लोकांबरोबर मी अगदी जवळून काम केले; काहीना मी क्वचित प्रसंगानिमित्त भेटले;  काहीबरोबर मला बोलण्यासारखे काही नसे - त्यांनाही नसे अर्थातच माझ्याशी बोलण्यात रस! काहीना मी ओळखत असे पण ते मला ओळखत नसत आणि काही मला चांगले ओळखत असून मला मात्र त्यांचे नावही माहित नसे. पण त्याने फार काही बिघडत नव्हते. आपल्या ओळखीचे लोक खूप कमी असतात तेव्हाही आपले काम व्यवस्थित चालले असेल तर जगणे छान चालू राहते. 
त्या दिवशी मी अशीच संगणकात डोकं खुपसून बसले होते - एका प्रकल्पाची रूपरेखा लिहिण्याच काम चाललं होतं माझं. तेवढ्यात मला मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज आले. "हं ! तिथेच, उजवीकडे बघा, बसलेल्या आहेतच त्या तिथं' अस माझा एक सहकारी कोणाला तरी सांगत होता. अशी कोणाला तरी शोधत माणसं नेहेमी यायची त्यामुळे या संवादात लक्ष वेधून घेण्यासारख काही विशेष नव्हतं. मी पुन्हा कामावर लक्ष केंद्रित केलं. 
दोनच मिनिटांत माझ्या केबिनच्या दारात कोणीतरी घुटमळत आहे अशी मला जाणीव झाली. मान वर करून पाहिलं तर गांधी टोपी घातलेले एक पन्नाशीचे गृहस्थ दिसले. त्या टोपीमुळे आधी मी त्यांना एकदम ओळखलं नाही. मग त्यांच नाव आठवलं मला. एक दोनदा बोललो होतो आम्ही एकमेकांशी दहा वर्षांत! त्यावरून तुम्हाला आमच्या ऑफिसच्या वातावरणाची कल्पना यावी! ते दुस-या ऑफिसात असतात हे खरं पण इथंही यायचे ते नेहमी म्हणून मला ते माहिती होते. 
मी उभी राहिले आणि त्यांना विचारल, "कोणाला भेटायचं सर?"

मी काम थांबवून त्यांच्याशी बोलले म्हणून त्यांना बरं वाटलं! 
ते म्हणाले, "मला ............... यांना भेटायचं आहे."
त्यांनी जे नाव घेतलं ते माझंच होतं. 


ते जिला शोधताहेत ती व्यक्ती मीच होते हे त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नव्हतं. 
हे पण आमच्या ऑफिसात नेहमी व्हायचं. 
मी हसले. म्हणाले, "मीच ती. सांगा सर, काय काम आहे ते.
आपण या बाईना ओळ्खलं नाही हे लक्षात येऊन त्यांना कानकोंडं वाटलं. 

चेह-यावरचा घाम पुसत ते  म्हणाले, "माझा नेहमीच घोटाळा होतो त्या ................  आणि तुमच्यात."
आता खरं तर आम्हा दोघींत आम्ही 'बाई' आहोत ही एक गोष्ट सोडली तर काहीही साम्य नव्हतं. 
पण ठीक आहे, त्यामुळे माझं काही बिघडत नव्हतं. 
आम्ही काही एकमेकाना फार ओळखत नव्हतो त्यामुळे त्यांनी माझा चेहरा विसरणं स्वाभाविक होत! 
मी पुन्हा शांतपणे बोलले,  "होतं असं सर. असू द्या. पण काम काय आहे तुमचं माझ्याकडं?" 
मग त्यांनी आपली बॅग उघडून त्यातून माझं नाव लिहिलेली एक आमंत्रण पत्रिका काढली. त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका होती ती.  पुढच्या आठवड्यात असलेल्या लग्नाचं आमंत्रण मला द्यायला ते आले होते. मी त्यांच्या मुलीचं अभिनंदन केलं. होणारा जावई काय करतो, लग्नानंतर मुलगी कोणत्या शहरात जाणार अशी चौकशी केली. 
खरं तर औपचारिकता साधारणपणे इथं संपते. पण निघताना ते गृहस्थ मला 'न विसरता या बरं का' असं पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगत राहिले.
ते गृहस्थ निघून गेल्यावर मी काम करायची थांबलेच एकदम.
ज्या माणसाला माझं नावही नीट माहिती नाही, ज्याना माझ्याबद्दल काहीही माहिती नाही, जे मागच्या दहा वर्षांत माझ्याशी क्वचित फक्त दोन चार वाक्य बोलले असतील ... ते नेमकं कशासाठी मला त्यांचा 'खासगी' आनंदात सहभागी व्हायला सांगत होते?
आमची ओळख नसताना त्यांच्या आनंदात मी उत्साहाने सामील होईन अस त्यांना का वाटलं असेल? असलं औपचारिक आमंत्रण मला आवडेल अस त्यांनी का गृहित धरलं असेल? 
माणसानी लग्न करावं की नाही, कोणाशी करावं, कधी आणि कस करावं - हे व्यक्तिगत निर्णय असतात. त्याच्याबद्दल म्हणून माझ काही मत नसतं. 
त्यांच्या मुलीला पुढचं -म्हणजे वैवाहिक - आयुष्य सुखाचं जावो अशी माझी शुभेच्छा आहेच. 
पण ....
असली आमंत्रणं म्हणजे एक औपचारिकता असते हे मला माहिती आहे. 
रूढी, परंपरा, 'लोक काय म्हणतील' अशा धाकाने आपण अनेक गोष्टी करतो, त्यात जीव न ओतताच करतो. 
स्वत:ला काय हवं आहे हे अनेकदा आपल्याला कळत नाही आणि कळलं तरी तसं वागायची हिमंत नसते - जनरीत असं गोंडस नाव आपण त्याला देतो. 
समाज म्हणून एकत्र जगायचं तर काही नियम, काही रीतीरिवाज हवेत हे बरोबर आहे. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अंदाधुंद जगणं तोवरच चालावं जोवर त्याचे दुष्परिणाम इतरांना भोगावे लागणार नाहीत - हे मलाही मान्य आहे. 
पण यामुळे  अनेकदा जगण्यात कृत्रिमता येते, दांभिकता येते, त्याचंही ओझं होतं. 
किंमत अशीही मोजायची आणि तशीही - तर मग निदान किंमत मोजून आपल्या मर्जीचं आपण का जगू नये? कुठवर लोकांची भीती बाळगत जगायचं? 
अशी वरवरची आमंत्रणं देऊन जमवलेल्या गर्दीपेक्षा एकटेपणा काय वाईट? 
पण तसं होत नाही.

आमंत्रण देऊन उगीच  माणसं गोळा करणं, आणि त्या  माणसांच्या गर्दीत एकट असणं -  ही देखील आपली परंपरा आहे!! 
**

Thursday, July 7, 2011

७९. त्रिपुरामय: भाग २

त्रिपुरामधल्या आठवडाभराच्या वास्तव्यात ‘सीमारेषा’ हा विषय आमच्या बोलण्यात वारंवार यायचा. कदाचित या विषयात मला फार जास्त रस आहे हे माझ्या भोवतालच्या माणसांनी जाणल होत आणि केवळ म्हणून ते उत्साहाने त्यावर माझ्याशी बोलत होते. अन्यथा त्यांच्यासाठी बांगला देशाचा शेजार, तिथे असलेली सीमारेषा हे एक वास्तव आहे – ज्यासोबत ते शांतपणे जगायला शिकले आहेत असा माझा समज झाला. अर्थात मला १९७१च युद्ध अनुभवलेले, त्याच्या आठवणी असलेले कोणी भेटले नाही, नाहीतर कदाचित वेगळे मत झाले असते माझे. बांगला देशातून येणारे निर्वासित अशी एकदा चर्चा चालू असताना एकजण म्हणाला, ‘त्रिपुरा राज्यापेक्षा एकट्या मुंबई शहरात असलेली बांगला निर्वासितांची संख्या कैक पटींनी जास्त असेल ....” त्याला बहुतेक अस म्हणायचं होत की या चर्चेच इथ किंवा आता काही प्रयोजन नाही. थोड्या काळात, थोड्या लोकांशी बोलून या विषयावर ठाम मत बनवण अयोग्य आहे याची मला जाणीव आहे. पण सीमारेषेचा हा सगळा अनुभव मला अंतर्मुख करून टाकणारा होता.

‘शीव’ म्हणजे दोन गावांची हद्द किंवा सीमारेषा. याचा माझा पहिला अनुभव मला आठवतो तसा खूप लहानपणीचा आहे. मी पाच-सहा वर्षांची असताना बैलगाडीतून शेजारच्या गावी जत्रेसाठी चालले होते – ही माझी प्रवासाची पहिली आठवण. मी तेव्हा फार उत्सुकतेने दोन गावांची हद्द सांगणारे काही ठळक चिन्ह असेल अशा आशेने पहात होते. पण माझा अगदी भ्रमनिरास झाला. त्या दोन गावांना वेगळी करणारी काहीच खूण मला दिसली नाही. जमीन तशीच होती, माणसं एकसारखीच होती, प्राण्यांमध्ये आणि झाडांमध्ये काही फरक नव्हता! माझी घोर निराशा झाली होती तेव्हा ‘शीव’ संकल्पनेबद्दल. तो क्षण मला अजूनही आठवतो.

पुढे आणखी प्रवास केल्यावर जिल्ह्यांच्या, राज्याच्या सीमारेषा भूगोलाच्या पुस्तकात दाखवतात तशा नसतात हे लक्षात आलं. विदेश प्रवासात ‘सीमेचा’ अनुभव मी घेतला नाही अस म्हणाव लागेल. ते देश दूरचे होते, तिथे वेगळ काही पहायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती – त्यामुळे सगळ काही वेगळ असूनही मला तिथ सीमा ओलांडल्याचा अनुभव आला नाही. त्रिपुरात मात्र मी जणू तो लहानपणीचा अनुभव पुन्हा एकदा जगले. एका अर्थी तो आणखी एक भ्रमनिरास होता तर एका अर्थी ते वास्तवाला भिडण होत!

पहिल्या दिवशी BSNL ची रेंज नव्हती. BSNLच हे एक नेहमीच गूढ आहे. म्हणजे द-याखो-यात, दुर्गम भागात BSNL चे सेलफोन चालतात, पण मोठया शहरांत मात्र हमखास ते चालत नाहीत. शहरात BSNL ला स्पर्धा आहे, दुर्गम भागात ती नाही असं म्हणता येईल. BSNL ला शहरी स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करता येत नाही किंवा आपल्या स्पर्धकांना पाय रोवायची संधी देण्याचे BSNL चे धोरण आहे असे वाटते. असो.

जेवणाच्या सुट्टीत स्वाभाविकच ‘फोनला रेंज नाही’ यावर बोलण झालं. काही लोकांना एक दोन तास SMS आले नाहीत किंवा करता आले नाहीत तर जगबुडी आल्याची भावना होते. मला काही इतकं जाणवत नाही फोन बंद असल्याचं. मग स्थानिक एकजण म्हणाला, “बांगला देशाची बॉर्डर इथून अर्ध्या किलोमीटरवर आहे, म्हणून इथ रेंज नाही फोनची.”
“इतक्या जवळ आहे?” मला खरच आश्चर्य वाटलं.
“तुम्ही या इमारतीच्या गच्चीत गेलात तर तुम्हाला बांगला देश दिसेल”, आणखी एकाने पुस्ती जोडली.

वेळ मिळाला की गच्चीवर जायचं अस मी ठरवलंही – पण नंतर एकदा मीटिंग सुरु झाल्यावर ते विसरून गेले. बॉर्डरचा आपल्यावर प्रत्यक्ष परिणाम होत नाही तोवर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आणखी दुस-याच गोष्टीत गुंतलो असलो की ती आपल लक्ष वेधून घेत नाही हेच खर!

एका संध्याकाळी आम्ही कश्बा गावातल्या कमला सुंदरी मंदिरात गेलो. आगरताळ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावरच हे ठिकाण. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द वनराई होती – ते दृश्य विलक्षण सुंदर होत! काहीस केरळची आठवण करून देणार – पाण्याचे प्रवाह वगळता. हे एका टेकडीवरचे काली मंदिर आहे आणि त्याच्या पायथ्याशी ‘कमला सागर’ हा तलाव आहे. १५व्या शतकाच्या अखेरीस महाराज धन्य माणिक्य बहादूर यांनी हा तलाव खोदला. मंदिरात गर्दी अजिबात नव्हती आणि मावळत्या सूर्याबरोबर एक अद्भूत शांती पसरली होती. (मागच्या पोस्टमधला तिसरा फोटो पहा). एक रेल्वे जाताना दिसली – ती बांगला देशात जाते आहे असं मला सांगितलं गेलं. तिथे कोणत्या गावात जाते – ते मात्र मी विसरले! मला त्या ट्रेनची गंमत वाटली. तेवढ्यात मंदिरात आरती सुरु झाली. मी तलावाच्या काठी भटकत होते, आरतीला काही मी मंदिरात गेले नाही. त्याच सुमारास पलीकडच्या बाजूने ‘अजान’ ऐकू आलं. आरती आणि अजान – एकाच वेळी, एकाच भूमीवर – पण त्यातले एक बॉर्डरने विभागलेल्या भारतातलं आणि दुसर बांगला देशातलं! मला प्रथमदर्शनी ती बॉर्डर कृत्रिम वाटली .. आणि जितक्या वेळा मी ती पाहिली तितक्या वेळा ही भावना प्रबळ होत गेली.

हेझामाराला जाताना माझ्या गाडीच्या चालकाने मला ‘बॉर्डर’ दाखवली. जमिनीला विभागत काटेरी तारांच उंच कुंपण नजर पोचेल तिथवर पसरलं होत. बांगला देशाच्या बाजूला शेतं दिसत होती, भारताच्या बाजूला अगदी जवळून रस्ता जात होता – त्यामुळे दुकान, बाजार सगळ एखाद्या नेहमीच्या गावासारख वातावरण होत. तिथ काही संगीनधारी सैनिक मला दिसले नाहीत. ‘बॉर्डर ओलांडून जाण्याचा कोणी प्रयत्न करत का?’ या माझ्या प्रश्नावर चालक हसला. म्हणाला, “काय फरक? इकड तिकड सारखच तर आहे सगळ!!”

खोवईतून आगरताळयात संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास परतताना मोबाईल वाजला. पाहिलं तर SMS होता – “एअरटेल बांगला देशात आपल स्वागत करत आहे. इथल आपल वास्तव्य सुखाच होवो. बांगला देशाविषयी काही माहिती हवी असल्यास किंवा काही मदत हवी असल्यास ७८६ क्रमांकावर संपर्क करा.....” मी तर काही बांगला देशात प्रवेश केला नव्हता. मग हा SMS यायचं कारण काय? जमिनीच्या सीमा आणि आकाशाच्या सीमा वेगवेगळया आहेत की काय? बॉर्डर अदृश्यपणे चारी बाजूंनी आपल्याला वेढून आहे अस मग मला सारख वाटत राहिलं!

आणखी एका संध्याकाळी काम आटोपून आगरताळयात परतताना सूर्य अस्तास जाताना दिसला तो कुंपणाच्याही पल्याड! या गावात सूर्य कधी मावळत नाही ... या गावासाठी सूर्य नेहमीच बांगला देशात अस्तास जातो!! पर्यटकांना आकर्षित करायला हे वाक्य उपयोगी पडेल असा विनोदी विचार माझ्या मनात आला!
बॉर्डर ही माणसांनी निर्माण केलेली गोष्ट आहे यात शंकाच नाही (इथे ‘man-made’ शब्दप्रयोग करायचा मला मोह होतो आहे!!) ६४ वर्षांपूर्वी या दोन वेगळ्या भूमि नव्हत्या. आता एका कृत्रिम रेषेने, कुंपणाने माणसं, जमीन, पाणी, आकाश, झाड, इतकच नाही तर माणसांच्या भावना आणि त्यांची आयुष्य विभागून टाकली आहेत. कुंपणाच्या या बाजूला तुम्ही भारतीय असण अभिमानाची बाब आहे, त्या बाजूला मात्र तुम्ही भारतीय म्हणवून घेतलत स्वत:ला तर देशद्रोही ठरणार! कुंपणाच्या या बाजूला एक प्रकारचा कायदा, दुस-या बाजूला दुसरा कायदा, दुसरे नियम – आणि हे सगळ पीकपाणी, अन्न, जमीन, संस्कृती, एकाच प्रकारचे असताना! (कश्बातल्या काली मंदिरात बांगला देशातूनही भक्त येतात!) तिथ उभ राहताना मला खूप आतून वाटलं की, असल्या सगळ्या कृत्रिम सीमारेषा खर तर या जगातून नाहीशा व्हायला हव्यात. माणसांना विभागणा-या भिंती जितक्या कमी असतील तितक चांगल!

पण बॉर्डरवर असे अनेक क्षण घालवल्यावर मला एका गोष्टीच बर वाटलं – ते म्हणजे मी लोकांना उत्तरदायी नाही, लोकांच्या वतीने निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. ज्या नेत्यांना फाळणीच्या काळात किंवा अगदी १९७१ च्या युद्धात निर्णय घावे लागले त्यांचं काम किती अवघड होत हे मी समजू शकते, त्यांच्या हृदयावर किती ओझ असेल याचा मला अंदाज येतो. माझ्यासारख्या स्वप्नाळू माणसांना उदार विचार करण परवडत कारण मला काही कराव लागत नाही. पण ज्यांच्यावर हजारो-लाखो लोकांच्या आयुष्याची, त्यांच्या भवितव्याची जबाबदारी असते, त्यांना स्वपाळू राहण्याची चूक करता येत नाही. मी माझ (माझ्या देशाच) रक्षण करू शकत नसेन तर दुसर कोणीतरी माझ्या देशावर आक्रमण करणार – त्याला तोंड देण्याची सदैव तयारी ठेवावी लागते. देशाचे नेतृत्व माझ्यासारखा विचार करणार असत (नकोत या सीमारेषा वगैरे ..) तर आज आपण त्यांना जितके दोषी समजतो त्यापेक्षा कैक पटींनी ते दोषी मानले गेले असते. ‘त्यांनी काय करायला हव होत’ यावर आपण अनंत काळ चर्चा करू शकतो. पण त्यानी काहीही केलं असत तरी ही चर्चा अशीच होत राहिली असती हेही मला त्या क्षणी समजलं.

फाळणीचा उपयोग झाला का? लोकांच जीवन त्यामुळे अधिक सुखी झालं का? त्यांना आता सुरक्षित वाटत का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. मी ज्या लोकांना भेटले त्यांना या सगळ्या प्रश्नांशी काही देण- घेण नव्हत (किंवा माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीशी त्यांना बोलायच नव्हत ..) – बॉर्डर ही त्यांच्यासाठी एक वस्तुस्थिती आहे आणि ती त्यांनी स्वीकारली आहे.

अर्थात दुसरे अनुभव, दुसरी मते, दुसरे दृष्टिकोन असणारे अनेक लोक असतील तिथे – पण दुर्दैवाने त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली नाही. त्यामुळे बॉर्डरबाबतचा माझा दृष्टीकोण परिपूर्ण आणि योग्य आहे असे म्हणता येणार नाही. माझे पूर्वग्रह आहेतच आणि शिवाय सगळ्या प्रकारच्या लोकांना न भेटल्यामुळे अनुभवही सीमित आहे!

बॉर्डरचा विचार करताना जाणवलं की वेगवेगळ्या स्वरुपात ती आहेच आपल्या भोवताली. बांगला देशाची बॉर्डर हे एक दृश्य स्वरूप आहे त्याच. पण आपल्याच देशात, आपल्याच समाजात किती विविध प्रकारची कुंपण आहेत, किती विविध भिंती आहेत...

साध जातीच उदाहरण घ्या. त्रिपुरासारख्या छोट्या राज्यात शासकीय घोषणेनुसार ३४ प्रकारच्या अनुसूचित जाती आहेत (http://socialjustice.nic.in/sectorsc239.php) आणि १९ प्रकारच्या अनुसूचित जमाती आहेत. (http://tribal.nic.in/writereaddata/mainlinkFile/File1067.pdf)! ३६-३७ लाखांचा समुदाय इतक्या वेगवेगळ्या प्रकारे का विभागाला गेला आहे? ही पण एक प्रकारची बॉर्डरच नाही का?

दुसर उदाहरण घ्या स्त्रियांच. स्त्रिया वाहतुक पोलिस, पेट्रोल पम्प अशा ठिकाणी सुटसुटीत पोशाखात काम करताना दिसल्या, अगदी रात्री नऊ वाजताही दिसल्या – ते पाहताना बर वाटलं. पण एक दिवस चौदा पंधरा वर्षाची एक मुलगी मला साडीत दिसली. मला वाटल असेल काहीतरी समारंभ शाळेत अथवा गावात. पण पुढे अशा अनेक मुली दिसल्यावर चौकशी केली तेव्हा कळलं की, सरकारी शाळांत (आणि अनेक खासगी शाळांतही) नवव्या इयत्तेच्या पुढच्या मुलीना साडी सक्तीची आहे. एकविसाव्या आणि विसाव्या शतकातली ही बॉर्डर वेदनादायी होती. लोकांनी काय कपडे घालावेत याच स्वातंत्र्य लोकांना का नाही अजून? छोट्या मुलींवर अशा प्रकारच नियंत्रण ठेवण्यातून सरकार नेमक काय साधत?

मला दोन स्त्रिया भेटल्या. त्या संघटित क्षेत्रात काम करतात आणि त्यांचा महिन्याचा पगार आहे फक्त १७०० रुपये! मला ते ऐकताना स्वत:ची लाज वाटली कारण माझी कमाई त्यांच्यापेक्षा (आणि माझ्या गरजेपेक्षा) खूपच जास्त आहे. आम्ही तिघीही दिवसातले आठ ते दहा तास काम करतो. श्रमजीवी समाज आणि बुद्धीजीवी समाज यांच्यातली पण ही एक बॉर्डरच नाही का? शोषण करणारी बॉर्डर?

अशा असंख्य बॉर्डर मला दिसतात. या सीमारेषा, या हद्दी, या भिंती सगळ्या आपणच निर्माण केलेल्या आहेत – जवळजवळ सगळ्याच! आपण त्यांचा एरवी परंपरा, रुढी म्हणून आदर करतो, प्रशंसा करतो, त्यांना डोक्यावर बसवतो. या सीमा पाळायाच्या असतात, त्यातच भलं असत असं आपण मानतो. कोणी या सीमा ओलांडायचा प्रयत्न केला, सुधारणेचा विचार मांडला की समाजाची पहिली प्रतिक्रिया असते अशा व्यक्तीला देशद्रोही, समाजद्रोही ठरवण्याची!

ही वृती आपण बदलू शकत नाही का? ती आपण बदलायला नको का?

समाजातल्या, राज्यांतल्या, देशातल्या अशा सगळ्या भिंती जर आपण नष्ट करू शकलो तर मग आंतरराष्ट्रीय बॉर्डर राहणार नाही, त्या नामशेष होतील. किमान त्या भीतीदायक उरणार नाहीत, त्या वेदना देणार नाहीत, देशभक्तीच्या नावाखाली त्या माणसांना आणखी हिंसक बनवणार नाहीत – कदाचित त्या फक्त एक व्यावहरिक सोय म्हणून राहतील.

मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्रिपुरामय होण्याची प्रक्रिया माझ्यासाठी नुकतीच सुरु झाली आहे. पण त्रिपुरामय होण्यासाठी मी प्रत्यक्ष त्रिपुरात असायला हव अशी गरज नाही. डोळे मिटले की मला तिथली सुंदर दृश्य आठवतात, पाउस आठवतो, शांतता आठवते, नारळाची आणि सुपारीची झाड आठवतात, लोक आठवतात ... आणि मी त्या क्षणी त्रिपुरात असते!

माझ्यासाठी त्रिपुरामय होण हे त्रिपुरात असण्याहून अधिक काही आहे. ते आहे – एक नवी खिडकी उघडण, एक नव जग दिसण, नव्या दृष्टीकोनासह वास्तवाकडे पाहण, आपल्या दोषांचा, उणीवांचा साक्षात्कार होण, चांगल आणि वाईट; योग्य आणि अयोग्य यातला फरक लक्षात घेऊन वाटचाल करण ... आणि बदल घडवून आणण्यासाठी निमित्तमात्र राहण्याच साहस निश्चयाने अबाधित राखण!