एखादा कवी किंवा एखादी कविता आपल्याला नेमकी का आवडते? या प्रश्नाचं उत्तर काही आजतागायत मला मिळालेलं नाही. कोणत्या परिस्थितीत, कोणत्या मनःस्थितीत आपण त्या कवितेला सामोरे जातो यावर बरंच काही अवलंबून असतं असं मला वाटतं. "कविता कळणे" या संकल्पनेवर माझा फारसा विश्वास नाही - हे मत योग्य की अयोग्य यावर बरीच चर्चा होऊ शकते, तुमचं मत वेगळं असू शकतं, हे मला मान्य आहे. पण माझ्या दृष्टीने "कविता भावणे" जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच एखादी कविता का आवडली हे आपल्याला प्रत्येक वेळी सांगता येतंच असं नाही.
कुसुमाग्रजांची ही मला अतिशय आवडणारी एक कविता.
एक आठवण पण.
"कुसुमाग्रज प्रतिष्ठान"ने १९९६ मध्ये "साहित्यभूषण" परीक्षा घेतली. मी स्पर्धा, पुरस्कार असल्या भानगडींपासून साधारणपणे चार हात दूर राहते. पण कुसुमाग्रजांचं नाव जोडलेलं असल्यान मला या परीक्षेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. योगायोगाचा भाग असा की मी त्या परीक्षेत पहिली आले. पुरस्कार वितरणाचा सोहळा नाशिकमध्ये होता, त्याचं मला आमंत्रण आलं. मी त्यावेळी एका संघटनेचं पूर्ण वेळ काम करत होते. त्यामुळे व्यक्तिगत असं माझं काहीच नव्हतं - पैसेही नव्हते. पण संघटनेतील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी त्याच दिवशी एक बैठक नाशिकमध्ये ठेवली. मला त्यांची हुशारी कळली. पण कुसुमाग्रजांना भेटता येईल या आनंदात मी त्याच्याकडे डोळेझाक केली.
समारंभाच्या जागी पोचल्यावर "कुसुमाग्रजांना भेटता येईल ना मला?" असा संयोजकांना माझा पहिला प्रश्न होता.
"त्यांची प्रकृती बरी नाही, त्यामुळे कार्यक्रमाला येणार नाहीत ते", हे उत्तर ऐकून माझा चेहरा उतरला. "पण त्यांनी तुमच्या उत्तरपत्रिका वाचलेल्या आहेत आणि त्यांना त्या आवडल्या आहेत", संयोजकांनी माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. मी गप्पच झाले. आत्ता या क्षणी येथून निघून जावं असं मला प्रकर्षाने वाटलं. संयोजकांना बहुधा माझी दया आली. एकजण हळूच म्हणाले, "तसा तुमचा आग्रहच असेल तर भेटतील तात्यासाहेब तुम्हाला, पण त्यांना खरंच बरं नाही हो."
ते स्पष्टीकरण ऐकून जणू मी एकदम जागी झाले. "त्यांना त्रास होणार असेल तर मग नको भेटायला" असे म्हणून मी तो विषय संपवला.
मी केलं ते योग्य की अयोग्य?
मला असं वाटतं की कविता महत्त्वाची असते - तिच्यापुढे कवी थोडासा दुय्यमच ठरतो. कवी नाही भेटले तरी त्याच्या कवितेला आपल्याला भेटता येतं - अर्थात त्यालाही जरा जोरदार नशीब लागतच :-)
आणि जेव्हा ती जीवनदृष्टी मांडणारी अशी एखादी अनोखी कविता असते, तेव्हा सर्वार्थाने ती कवीचीच भेट असते.
विजयासाठी माझी कविता
कधीच नव्हती
म्हणून तिजला भीती नव्हती
पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा
नव्हती बसली
म्हणून नाही भीती तिजला
मरणाची.
surekh
ReplyDeleteतुम्हाला आवडल ते वाचून बर वाटल.
ReplyDeleteपटले तुमचे विचार. कवितेतून भेटणारा कवी प्रत्यक्षात भेटला तर ठीकच, अन्यथा त्याचं काव्य त्याचं अंतरंग रसिकापुढे उघड करतंच ना!
ReplyDeleteमाझ मत तुम्हाला पटल हे वाचून बर वाटल.
ReplyDelete