ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, May 15, 2017

२४९. पोलीस चौकीत दीड तास


रेल्वे स्थानकात एक तास, राणीच्या बागेत एक तास छापाचे निबंध आपल्याला लहानपणी अनेकदा लिहावे लागायचे. आता काही माझ्यावर तशी सक्ती नाही, पण तरी मागच्या महिन्यातल्या या अनुभवाला हेच शीर्षक सुचलं. 😊
तर झालं असं की आठवड्यातून किमान एक तरी प्रवास स्थानिक बसने करायचा असं एक ठरवलेलं आहे, त्यानुसार त्या शनिवारी बसने प्रवास केला. गरजेपुरते सुट्टे पैसे कुर्त्याच्या खिशात ठेवले होते ते पुरले. चार ठिकाणची कामं उरकून उगाच अर्धा तास डेक्कन बस स्थानकावर रेंगाळले आणि घरी परत आले. थोडा वेळ झोपले. मग मुंबईच्या एका मैत्रिणीचा फोन आल्यावर तिच्याशी तासभर गप्पा मारल्या. रात्री नऊ वाजता दूध आणायला म्हणून पैशांचं पाकिट सॅकमधून काढायला गेले. तेव्हा लक्षात आलं की पाकिट मारलं गेलं आहे.
पाकिटात पॅन कार्ड, दोन बँकांची डेबिट कार्ड्स, वाहन चालवण्याचा परवाना आणि चारेक हजार रूपये होते. सुदैवाने पासपोर्ट आणि मोबाईल सॅकच्या वेगळ्या कप्प्यात असल्याने ते वाचले. ज्या चार ठिकाणी दिवसभरात गेले होते, तिथं चौकशी केली. पाकिट कुठंही राहिलं नव्हतं. दिवसभरात चार वेळा बसने गेले होते, त्यातल्या नेमक्या कोणत्या बसमध्ये पाकिट मारलं गेलं हे सांगता येत नव्हतं. दोन्ही बँकांच्या हॉटलाईनला फोन करून डेबिट कार्ड बंद करण्याचं काम केलं. एका बँकेत जुनं डेबिट कार्ड हरवलं असल्यास पोलिसांकडं केलेल्या तक्रारीची प्रत जोडणं आवश्यक असतं. शिवाय पॅन कार्डही चोरीला गेलं होतं. त्यामुळे पोलीस चौकीत जाणं गरजेचं होतं. पण तोवर दहा वाजले होते. आता यावेळी पोलिसांना त्रास देण्याइतपत काही महत्त्वाचं नव्हतं. शेजा-यांनी खर्चासाठी लगेच रोख हजार रूपये आणून दिले. पुण्यात गोतावळा असल्याने रोख रक्कम मिळायची मला काही अडचण नव्हती. चोरांच्या हातसफाईला, त्यांच्या कौशल्याला दाद देत मग मी निवांत बसले.
दुस-या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी मी आमच्या परिसरातल्या पोलीस चौकीत गेले. चौकीत जाण्याची वेळ दहा वर्षांनी आल्याने थोडी शोधाशोध करावी लागली. पण दुकानदारांनी व्यवस्थित खूण सांगितल्याने मी चौकीत पोचले.
सकाळचे दहा वाजले होते. चौकी उघडी होती (चोवीस तास उघडी असते का ते माहिती नाही!) आणि बाहेरच्या बाकड्यांवर एकही माणूस नव्हता. तक्रार नोंदवायचं काम लगेच होईल म्हणून मी खूष झाले. पण माझा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण चौकीत कुणीच नव्हतं. मी दारावर टकटक केली, कुणी आहे का चौकीत असं मोठ्याने विचारलं... पण चौकीत कुणी नव्हतंच तर मला उत्तर देणार कोण?
पोलीस चौकीचं नाव मी खोडलं आहे.

चहा प्यायला पोलीस जवळच कुठंतरी गेले असतील म्हणून मी बाकड्यावर बसले. चौकीच्या आजुबाजूने लोक येत-जात होते, पण चौकीत पोलीस नसण्याचं दृश्य त्यांचं लक्ष काही वेधून घेत नव्हतं. कदाचित हे रोजचं असेल, किंवा पोलीस चौकीकडं जास्त पाहायचं नाही अशी लोकांनी स्वत:ला सवय लावून घेतली असेल.
तेवढ्यात मोटरसायकलवर एक मुलगा आणि एक बाई आल्या. ते दोघं आपापसात तेलुगु भाषेत बोलत होते. मग मुलगा निघून गेला आणि त्या बाई माझ्याशेजारी येऊन बसल्या. आधी मी हिंदीत बोलायला लागले पण त्या बाईंनी मराठीत संवादाला सुरूवात केली. कितीतरी पिढ्या आधीपासून त्यांचं कुटुंब नगर जिल्ह्यात राहतं आहे. आंध्रात ना गाव, ना शेती, ना नातलग – फक्त भाषा तेवढी टिकवून ठेवली आहे असं त्या म्हणाल्या.
त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये विद्यार्थी भाडेकरू आहेत आणि ते रात्री-बेरात्री कसा दंगा करतात, मुलींच्या ओरडण्याचे आवाज कसे येतात असं त्या सांगत होत्या. घरमालकाबद्दल तक्रार नोंदवायला त्या चौकीत आल्या होत्या. मी कशासाठी चौकीत आले आहे ते मीही त्यांना सांगितलं. मग आमचा पुण्याची बसव्यवस्था यावर एक छोटा परिसंवाद झाला.
मला चौकीत येऊन एव्हाना अर्धा तास झाला होता. पोलिसांचा काहीही पत्ता नव्हता. मी मोबाईलवर चौकीचा फोटो काढला. तेवढ्यात त्या बाईंचा मुलगा काम झालं असेल असं समजून त्यांना घ्यायला आला. पोलीस नाहीत म्हणून तोही वैतागला. मी फोटो काढलाय असं समजल्यावर मला म्हणाला, टाका तो फोटो फेसबुकवर. समजू द्या सगळ्यांना पोलिसांचा गैरकारभार. मुलाच्या आईने त्याला दटावलं आणि ती मला म्हणाली, पहिलं तुमचं काम होऊ द्या. मग काय फोटो टाकायचाय तो टाका. उगं फोटोमुळं तुम्हाला पोलिसांनी लटकवून ठेवायला नको. मी हसले.
एव्हाना मला प्रश्न पडला होता की एखाद्या गंभीर परिस्थितीत (खून, दरोडा, दंगल... इत्यादी) इथं चौकीत कुणीच नसेल तर जागरूक नागरिकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? कदाचित चौकीत न येता, शंभर नंबरवर फोन करून माहिती द्यावी हीच अपेक्षा असेल. तातडी नसलेल्या कामांसाठीच माझ्यासारखे लोक चौकीत येत असतील.
मग मला आठवलं की माझ्याकडं पोलीस स्थानकाचा नंबर आहे. पोलीस चौकी आणि पोलीस स्थानक फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत. मग मी स्थानकाला फोन लावला. अहो, डोंगरे साहेब तिकडंच यायला निघालेत, येतील बघा दोन मिनिटांत असं उत्तर एका पोलिसमामांकडून मिळालं.
मग मी तक्रार नोंदवायला आलेल्या बाईंशी आणखी पंधरा मिनिटं गप्पा मारल्या आणि डोंगरे साहेब आले नाहीत हे सांगायला परत एकदा स्थानकात फोन लावला. आता तिथल्या एका मावशींनी फोन घेतला. मी त्यांना परत एकदा आम्ही कसे मागचा तासभर वाट पाहतोय आणि चौकीत कुणीही नाही ते सांगितलं. आले नाहीत का डोंगरे साहेब अजून? पाठवते हं मी त्यांना, असं त्या म्हणाल्या. म्हणजे डोंगरे साहेब कुठं आहेत याचा शोध घेत होती तर मंडळी अजूनही.
दहा मिनिटांनी एक मोटरसायकल दारात थांबली. चौकटीचा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेली दोन माणसं उतरली. मला वाटलं आले डोंगरे साहेब. पण त्यातल्या एकाने मला हातानेच बसायची खूण केली, साहेब येताहेत पाच मिनिटांत असं सांगितलं.
दहा मिनिटांनी एकदाचे डोंगरे साहेब अवतरले. ते जागेवर बसताच मी चौकीच्या दारात जाऊन उभी राहिले. आज पूजा कुणी केली आहे का?” असं साहेबांनी विचारलं. त्यावर एकाने मी पूजा करूनच चहा प्यायला बाहेर पडलो, असं सांगितलं. डोंगरे साहेबांचं समाधान झालं. मग त्यांनी मला मानेनेच आत येण्याची खूण केली.
शनि शिंगणापूरला घरांना कुलूप नसतं असं ऐकलं आहे मी, तुमच्या चौकीने आज तो अनुभव दिलाया माझ्या पहिल्या वाक्यावर डोंगरे साहेबांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मलाही अर्थात शनि शिंगणापूरबद्दल बोलायचं नव्हतं. काय तक्रार आहे या त्यांच्या प्रश्नावर मी बसच्या प्रवासात माझं पाकिट मारलं गेलं (पोलिसांना हरवलं शब्द हवा असतो, मारलं गेलं किंवा चोरीला गेलं हे शब्द नको असतात) असं सांगितलं. त्यावर त्यांचा पहिला पोलिसी खाक्या दाखवणारा प्रश्न होता ते डेक्कनला हरवलं असेल तर आम्ही कसा काय तपास करणार?’
मीही तितक्याच शांतपणे त्यांना म्हटलं, कागदपत्रं पुन्हा मिळवायची (डुप्लिकेट) तर संबंधित कार्यालयांना पोलिसांकडं तक्रार केल्याचा पुरावा मला द्यावा लागेल. म्हणून माझी तक्रार तेवढी लिहून घ्या आणि मला त्याची प्रत द्या. बाकी तुम्ही तपास करावा अशी माझी अपेक्षा नाही. मग साहेबांनी समोरच्या पोलिसाला खूण केली. मी हरवलेल्या कागदपत्रांचे नंबर्स लिहून नेले होते, त्यामुळे आमच्यात फारसा संवाद होण्याची गरज नव्हती.
मग मी तेलुगु बोलणा-या मराठी बाई आणि डोंगरे साहेबांचा संवाद ऐकत होते. साहेबांनी इमारतीचं नाव विचारलं, मालकाचं नाव विचारलं आणि एका पोलिसाला त्यात लक्ष घालायला सांगितलं. त्या पोलिसाने परत एकदा तीच माहिती विचारली आणि मी मालकाला फोन करतो म्हणाला. लेखी तक्रार वगैरे काही नाही. या बाईंनी तक्रार केल्याचा कसलाही पुरावा नाही.
मग एक आजोबा, एक आजी आणि त्यांची नात आली. या आजोबांना पोलीस चौकीचा पूर्वानुभव असणार. कारण ते दोन पानी अर्ज घेऊन आले होते. त्यांचीही तक्रार शेजारच्या घरात राहणा-या भाडेकरू मुलांच्या दंग्याबद्दलच होती.
एक पानी निवेदन लिहून झाल्यावर त्या पोलिसाने मला डोंगरे साहेबांची सही घेण्याची खूण केली. डोंगरे साहेब माझ्या अर्जावर सही करत असताना पंचविशीतली एक मुलगी-स्त्री दारात उभी राहिली. माझा अर्ज लिहून मोकळं झालेल्या पोलिसाने काय?’ असं तिला विचारलं. ती म्हणाली, मिसिंगची तक्रार नोंदवायची आहे.’ ‘काय मिसिंग आहे?’ पोलिसाने विचारलं. ती मुलगी म्हणाली, नवरा.
आणि मग काहीच झालं नाही. डोंगरे साहेब त्या आजोबांचा अर्ज वाचत होते. माझा अर्ज लिहून देणारा पोलीस काहीतरी लिहित होता. तेलुगु बोलणा-या बाईंची तक्रार पाहतो म्हणणारा पोलीस आणि आणखी एक पोलीस मोबाईलवर काहीतरी करत होते. एखाद्या चित्रपटातला प्रसंग पदड्यावर थांबून राहावा, कुणीतरी पॉझचं बटन दाबलेलं असावं असं मला वाटलं. मी आळीपाळीने त्या सगळ्यांकडं पाहिलं. कुणाच्याही चेह-यावर काहीही भाव नव्हते.
दारात चप्पल घालताना (हो, चप्पल बाहेर काढून चौकीत जावं लागतं, तशी सूचना तिथं लिहिलेली आहे) मी त्या मुलीला म्हटलं, जा तुम्ही आत, खुर्ची आहे एक मोकळी. त्यावर ती म्हणाली, नको, त्यांनी बोलावल्याशिवाय आत गेलं तर ते चिडतात.
मी गोंधळले. नेमकं काय झालंय हे तिला विचारलं. मला समजलं ते असं :तिचा प्रेमविवाह नव-याच्या बहिणींना मान्य नाही. काल सकाळी नवरा बहिणीकडं जातो असं सांगून घराबाहेर पडला तो रात्री घरी आलाच नाही. ही आज सकाळी नव-याच्या बहिणीकडं गेली तर तो इकडं आलाच नाही असं त्या बहिणीने सांगितलं.
तुझ्या सोबत कुणी नाहीये का? घरचे, मित्र-मैत्रिणी वगैरे कुणी असं मी विचारलं. तिने सांगितलं की प्रेमविवाह केल्याने घरचे म्हणतात की आता तुझं तू काय ते निस्तर. आम्ही काही पोलिसांकडं येणार नाही.
मला काय करावं ते कळेना. ती पुढं आणखी म्हणाली की, मागच्या आठवड्यात माझ्या     नव-याने मी त्याला मारहाण करते अशी पोलिसांत तक्रार केली आहे. आता त्याच्या जीवाला काही झालं तर ठपका माझ्यावरच येईल. हे ती इतक्या भावशून्यतेने सांगत होती की ती तिची परिस्थिती नसून एखाद्या कथा-कादंबरीतला प्रसंग असावा असं मला वाटलं.
नव-याने तक्रार कुठं केली होती?’ हा प्रश्न विचारतानाच त्याचं उत्तर मला कळलं – ती तक्रार याच चौकीत केली होती. म्हणजे या मुलीची या चौकीत येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. कदाचित तिच्या आणि पोलिसांच्याही शांतपणामागे ते एक कारण असावं.
मी त्या मुलीला स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आणि पोलिसांशी संपर्क असणा-या एका कार्यकर्तीचा फोन नंबर दिला. काही अडचण आल्यास या संघटनेला फोन कर, त्या तुला मदत करतील असं मी तिला सांगितलं. मी तिथून निघाले. पण अडचणीत सापडलेल्या त्या मुलीला आपण काही मदत केली नाही याची रुखरुख मला वाटत राहिली.
दुस-या दिवशी त्या संघटनेच्या कार्यकर्तीकडं असा काही फोन आला होता का मदतीसाठी याची चौकशी केली असता नकारात्मक उत्तर मिळालं. त्या मुलीने का नसेल फोन केला? तिला मदतीची गरज होती का नव्हती ? आपणच तिथून थेट फोन लावून त्या मुलीचा आणि कार्यकर्तीचा संपर्क घडवून आणायला हवा होता का? पण त्या मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या निर्णयात ढवळाढवळ करण्याचा मला काही अधिकार नव्हता. आणि त्या मुलीची पोलिसांकडून अधिक तत्पर सेवा मिळवण्याची धडपड नसताना मी तिच्या वतीने पोलिसांशी भांडण्याचाही मला काही अधिकार नव्हता.
नंतर एका मित्राला ही सगळी घटना सांगितली असता तो म्हणाला, त्या दोघांचेही वकील त्यांना पुरावा तयार करायला सांगत असतील, त्यामुळे ती मुलगी कदाचित अनेकदा पोलीस चौकीत आली असेल. त्या मुलीची आणि पोलिसांची(ही) प्रतिक्रिया पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.
सव्वा तास उघड्या पण पोलीस नसलेल्या चौकीतल्या बाकड्यावर बसून राहणं, माझ्यासमोर पोलीस चौकीत तक्रारी घेऊन आलेले ते दोन अर्जदार, लेखी तक्रार न घेता पोलिसांनी बोळवण केलेल्या त्या तेलुगु बोलणा-या मराठी बाई, दीडेक तास पोलीस चौकी उघडी ठेवून गैरहजर असणारे पोलीस आणि त्याबद्दल काहीही करू न शकण्याची आपली हतबलता, पोलिसांचा मख्खपणाचा खाक्या, तक्रार अर्जांची यांत्रिकता, चौकीत पूजा करणारे पोलीस, ...........
पोलीससेवा, सामाजिक वास्तव, लोकांची मानसिकता, आपला आदर्शवादी भाबडेपणा .... याबद्दल बरंच काही कळून गेलं त्या दीड तासात.