ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, September 27, 2014

२११. दिसली समद्यांना

आयने हाक मारली, लगीच उटले आज.
शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने.

साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली.
परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले.
गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले.
पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले.

अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी.

गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय. आज तिला कविता म्हणायला सांगू.”
म्या पुडं आले, कविता बराबर बोल्ली.
जाग्यावर जाऊन बसली.

मंग रडू यायलं.
गुर्जींना काई समजना.

मंग खाल मानेनं म्या हळू माज्या रिबनीचं फूल ओडलं.
“ओ गुर्जी, आन्जीची नवी रिबन बगा, कसली लाल हाय...” राज्या म्हन्ला.
समदे आले भवती.

कवाधरनं ती दावत व्हते!
दिसली आता समद्यांना!  
* शतशब्दकथा 

Saturday, September 13, 2014

२१०. मोझाम्बिकची निवडणूक: १

१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे. 

मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल.

मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली. नाही, म्हणजे चालत किंवा रस्ता शोधत नव्हतं यायचं मला; पण तरी निदान पृथ्वीच्या कोणत्या तुकड्यावर आपण असणार हे जाणून घ्यायचं कुतूहल होतं मला.

मग दक्षिणेला दक्षिण आफ्रिका (उत्तर आफ्रिका थोडीच असणार दक्षिणेला!) आणि स्वाझीलँड, पश्चिमेला झिम्बाब्वे,  झांबिया, वायव्येला टांझानिया, मलावी, आणि पूर्वेला अथांग हिंदी महासागर (इंडिअन ओशन) (आणि त्यात मादागस्कार) असलेला देश नकाशावर सापडला. फार माहिती गोळा करत बसायला वेळ नव्हता पण तरी साधारण भौगोलिक आणि राजकीय माहिती गोळा करायचा प्रयत्न केला पण त्याला फारसं यश आलं नाही. ज्या बातम्या हाती आल्या त्या काही पुरेशा वाटल्या नाहीत.

मापुटोला पोचल्यावर दुस-या दिवशी स्थानिक वर्तमानपत्र उघडलं आणि कळलं की मोझाम्बिकमध्ये १५ ऑक्टोबरला निवडणूक आहे. भारतातला लोकसभा निवडणुकीचा रागरंग यावेळी कधी नाही इतका रस घेऊन पाहिला होता, अनुभवला होता; प्रचारमोहिमेत काही अंशी सामीलही झाले होते. त्यात मी समर्थन करत असलेल्या (‘आप’ल्या) पक्षाचा साफ धुव्वा उडाला असला तरी निवडणूक हे लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग आहे याची जाणीव मला झाली होती. पक्ष हा आणि तो या वादात न पडताही लोकांच्या आकांक्षा संयतपणे व्यक्त होण्याचं ‘निवडणूक’ हे तुलनेनं एक चांगलं माध्यम आहे हे नव्याने लक्षात आलं होतं.

या ताज्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मोझाम्बिकच्या निवडणुकीबद्दलही मला रस वाटणं स्वाभाविक होतं. अर्थात माहितीचा अभाव, भाषेची अडचण, परकीय लोकांनी स्थानिक राजकीय परिस्थितीत रस घेण्यात असलेले धोके, स्थानिक संघर्षाची परिस्थिती, निवडणुकीत एकूणच वातावरण तापलेलं असणं, स्थानिक संस्कृतीशी ओळख नसणं, स्थानिक लोकांशी अत्यंत कमी ओळखी असणं – अशा अनेक कारणांमुळे ही माहिती परिपूर्ण अजिबात नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती.

पार्श्वभूमी

मोझाम्बिक ही एक ‘तरुण लोकशाही’ आहे असं म्हणता येईल. या देशाचा इतिहास (आणि काही अर्थी वर्तमानही) गुंतागुंतीचा आहे.

८,०१,५९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणा-या या देशात २००७ च्या जनगणनेनुसार २,१३,९७,००० लोक होते. २०१४ मध्ये २,६०,००,००० लोकसंख्या असावी असा अंदाज आहे. मोझाम्बिकची विभागणी दहा प्रॉविन्सेसमध्ये  आहे आणि ‘मापुटो’ ही राजधानी असल्याने त्याला ‘विशेष शहर’ असा खास दर्जा आहे.

१९७५ मध्ये प्रदीर्घ लढाईनंतर पोर्तुगीज राजवटीतून हा देश मुक्त झाला. २५ जून १९७५ हा मोझाम्बिकचा स्वातंत्र्यदिन. पण तरी पुढची काही वर्ष आपापसातील संघर्षात गेली (ज्याची चिन्हं अजूनही आहेत वातावरणात!) आणि पहिली निवडणूक १९९४ मध्ये झाली. इथं संसदेला National Assembly म्हणतात आणि त्यात २५० सभासद निवडून दिले जातात. बहुपक्षीय व्यवस्था असली तरी सत्ताधारी ‘फ्रेलिमो’च्या (Liberation Front of Mozambique/ Frente de Libertação de Moçambique) तुलनेत ‘रेनामो’ (Mozambique National Resistance/ Resistência Nacional Moçambicana) आणि ‘एमडीएम’ (Democratic Movement of Mozambique/ Movimento Democrático de Moçambique ) वगळता अन्य पक्षांना नगण्य स्थान आहे असे माझे प्रथमदर्शनी मत झाले आहे – जे अनुभवाने बदलू शकते! १५ -१६ वेगवेगळे राजकीय पक्ष असले’ अगदी या निवडणुकीसाठीही तीस राजकीय पक्षांनी नोंद केली  आहे -  तरीही ही व्यवस्था बहुपक्षीय न वाटता द्विपक्षीय अथवा तीन-पक्षीय वाटते आहे..  राष्ट्राध्यक्ष आणि National Assembly यांच्यासाठी एकाच वेळी मतदान केले जाते. National Election Commission ही स्वतंत्र यंत्रणा निवडणूक घेते आणि प्रचार, मतदान यावर देखरेख करते. ‘तटस्थ निरीक्षक’ म्हणून अनेक युरोपीय देशांचे प्रतिनिधी यावेळच्या निवडणुकीचं निरीक्षण करणार आहेत.

घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष देशाचे, सरकारचे आणि सैन्याचे प्रमुख आहेत.  (Head of State, Head of Government, Commander in Chief). पंतप्रधानाची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करतात.  इथे राष्ट्राध्यक्ष थेट मतदारांकडून निवडले जातात; त्यांची मुदत पाच वर्षांची असते. ५०% पेक्षा जास्त मत मिळवणारा उमेदवारच राष्ट्राध्यक्ष बनू शकतो. त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास; पहिल्या फेरीत क्रमवारीनुसार पहिल्या आणि दुस-या असणा-या उमेदवारांपैकी एक निवडण्यासाठी फेरमतदान घेतले जाते.

राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांनी मतदानाच्या तारखेपूर्वी साठ दिवस आधी Constitutional Council कडे उमेदवारी अर्ज भरावा लागतो. उमेदवारीच्या समर्थनार्थ अर्जावर किमान १०००० मतदार नागरिकांच्या सह्या हव्यात असे बंधन आहे. मतदानाच्या ४५ दिवस आधी प्रचार सुरु होतो – तो १ सप्टेंबरला सुरु झालाय; आणि मतदानाच्या ४८ तास आधी तो संपतो. १८ वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. अर्थात ओळखपत्र वगैरे दाखवून त्याना ‘मतदाता’ म्हणून नोंदणी करावी लागते. इथेही आपल्यासारखा ‘मतदार यादीतून नावं गायब होण्याचा’ प्रकार घडतो का याबद्दल माझ्या मनात कुतूहल आहे; थोड्या दिवसांत याचं उत्तर मिळेलच म्हणा!

इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोक ‘उमेदवाराला’ मत न देता ‘पक्षाला’ मत देतात. पक्षाला जितकी मते मिळतात त्या प्रमाणानुसार National Assembly मध्ये त्या पक्षाला जागा दिल्या जातात. अर्थात पक्ष उमेदवार आधी जाहीर करतात की कोणते सदस्य National Assembly मध्ये जाणार याबाबत पक्ष निकाल जाहीर झाल्यावर निर्णय घेतो हे मला अजून नीट समजलेलं नाही (भाषेची अडचण!) – मला समजलं की त्याबद्दल इथं लिहीन.
२००९ चं चित्र असं आहे:
फ्रेलिमो – मिळालेली मते – ७४.६६%  जागा – १९१
रेनामो - मिळालेली मते – १७.६८%  जागा – ५१
एमडीएम - मिळालेली मते – ३.९३%  जागा – ८

सध्याचे राष्ट्राध्यक्ष अर्मांडो गुएब्झा (Armando Guebuza – पोर्तुगीज उच्चार अजून मला नीट जमत नाहीत – त्यामुळे देवनागरी शब्द चुकीचा असल्यास कृपया दुरुस्ती करावी) ‘फ्रेलिमो’ पक्षाचे असून ते २ फेब्रुवारी २००५ पासून राष्ट्राध्यक्ष आहेत. घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष केवळ दोन टर्म्स काम करू शकतात, तिस-या वेळी निवडणूक लढवण्यास त्यांना परवानगी नाही. 

यावेळी ‘फ्रेलिमो’ने फिलीप नूसी (Filipe Nyussi) यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे.

'रेनामो'चे उमेदवार आहेत अफोन्जे दाकामा (Afonso Dhlakama) 
आणि एमडीएमचे आहेत दिवीस सिमंगो (Daviz Simango).
५ सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष अर्मांडो गुएब्झा आणि रेनामोचे अफोन्जे दाकामा यांच्यात एका मोठ्या समारंभात ‘शांती करारावर’ सह्या झाल्या. हा करार का झाला? त्याचं काय महत्त्व? त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, प्रचार कसा चालतो, प्रचाराचे मुख्य मुद्दे काय आहेत  ..... अशा काही प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात.

या लेखासाठी पुढील संदर्भांचा उपयोग केला आहे:
http://www.indexmundi.com/mozambique/government_profile.html

Saturday, September 6, 2014

२०९. क्षणचित्रे: नैरोबी

नैरोबीत मला अचानक चोवीस तास रहायला लागलं ते एक विमान उशिरा सुटल्याने पुढचं चुकलं म्हणून. ट्रान्झिट विसा, हॉटेल, वाहन अशा सगळ्या व्यवस्था विमान कंपनी करते अशा वेळी; तशा त्या केल्या गेल्या होत्या; मला त्यासाठी काही इकडेतिकडे हिंडत बसावं लागलं नव्हतं. आणि त्यामुळे नैरोबी मी ‘पाहिलं’ असं खर तर म्हणता येणार नाही. नैरोबीबद्दल मला काही माहितीही नाही. मी काढलेली काही प्रकाशचित्रं तुमच्यापर्यंत पोचवताना उगाच खरडलेल्या या चार ओळी म्हणा ना!
नैरोबी जवळ आल्यावर आकाशातून दिसणारं हे चित्र बोलकं वाटलं मला.
किती प्रतिकूल परिस्थितीत माणूस वस्ती करतो, आणि निसर्गाशी लढाई करत करतच मानवी संस्कृतीचा विकास झाला आहे हे पुन्हा एकदा लक्षात आलं माझ्या. 

हा हिरवा पट्टा आणि त्याच्या सोबत तो निळा पट्टा – दोन विरोधी विचारसरणी दाखवणा-या. पण अवस्था अशी आहे की त्या निळ्याविना जगता येईल का माणसांना? आता पुढे आलेले मागं कसे जाणार आपण? जायची गरज आहे का नक्की?
आणि मग औद्योगिक संस्कृतीची चिन्हं. नैरोबी शहर नॅशनल पार्कच्या मध्यात आहे असं मला एका केनियन मुलीने सांगितलं.
खूप उशिरा उठायचं असं ठरवून आदल्या रात्री झोपले होते खरी, पण भल्या पहाटे पक्षांच्या किलबिलाटाने जागी झाले. तर बाहेर पाऊस पडत होता, हवेत विलक्षण गारवा होता आणि दोन आफ्रिकन पाईड वॅगटेल (धोबी) लपाछपी खेळत बसले होते. त्यांच्याकडे पाहताना ‘बॅगेतलं वजन कमी करायचं’ म्हणून अखेरच्या क्षणी काढून ठेवलेली दुर्बीण आठवून हळहळले!
हॉटेलच्या खिडकीतून दिसणारं हे आणखी एक दृश्य. अफाट वाळवंटात काही उभं केलंय याची की हे उभं करण्यासाठी वाळवंट निर्माण केलं आहे, हे जाणून घेतलं पाहिजे कधीतरी सवडीने!
हॉटेलमध्ये असताना एक गुजराती चॅनेल पाहायला मिळालं. 
नाही, याची श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान असण्याशी काही संबंध नसावा; केनियात अनेक भारतीय आहेत, आणि त्यातले बरेच  गुजराती भाषिक आहेत.
आणि ही केनया एअरवेज.
पुढच्या प्रवासाला निघताना फोटो, बोटांचे ठसे असे सगळे सोपस्कार चालू होते. तेव्हा समोरची स्त्री ‘अंगुठा” म्हणाली. आधी मला कळलं नाही, मग लक्षात आलं की ती हिंदी बोलायचा प्रयत्न करतेय. 
इथं परत यायला पाहिजे एकदा हेच खरं!