ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, June 28, 2012

१३०. इंद्रधनुष्य

जून महिना संपत आला तरी पाऊस अद्याप हुलकावणी देतो आहेच. पण अशा वेळी मला हमखास आठवतं ते माझं एक स्वप्न! तीनेक वर्षांपूर्वी अशाच एका पावसाची वाट पाहणा-या जूनच्या अखेरच्या दिवसांत मला पडलेलं ते स्वप्न ...

त्या दिवशी मी स्वतःशीच हसत उठले. अशी जाग येणं म्हणजे मला एखादं मस्त स्वप्न पडलेलं असण्याचं (आणि अर्थात आयुष्य सुखी असण्याचं) लक्षण आहे. काय स्वप्न पडलं होत मला त्या दिवशी? तर माझ्या हातांत इंद्रधनुष्य होतं - त्याला मी स्पर्श करत होते, ते माझ्या हातात असण्याची मला स्वच्छ आणि स्पष्ट जाणीव होती, त्याचा स्पर्श मला जाणवत होता आणि मी त्याच्याशी बोलत होते. स्वाभाविकच मी एकदम मजेत होते, मी हसत होते, मी आनंदात होते आणि मला एकदम सगळं काही 'भरून पावलं आहे' असं वाटत होतं...

माझी बहुतेक स्वप्नं मायावी असतात आणि त्यात वास्तवापेक्षा कल्पनाशक्तीची भरारी असते. पण हे स्वप्न मात्र वास्तवाच्या बरंचसं जवळचं होतं असं मी म्हणू शकते. कारण त्यावेळी नुकतीच मी हातभर अंतरावरून इंद्रधनुष्य पाहून आलेली होते!!

तसा तो नेहमीचाच एक दिवस होता - असं निदान दिवसाच्या सुरुवातीला तरी मला वाटलं होत. सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या एका दुर्गम खेडयात मी माझ्या सहका-यांसह कार्यालयीन कामासाठी गेले होते. काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं आणि मग आम्ही एका धरणावर गेलो. आकाश ढगाळ होतं त्यामुळे पावसाची आशा होती सगळ्यांना. पण खर तर जूनचा शेवटचा आठवडा आला तरी पाऊस अद्याप इकडे फिरकलाच नव्हता. सगळेजण अगदी डोळ्यांत प्राण आणून पावसाची वाट पहात होते.

पाऊस नाहीच आला त्या दिवशी. धरणात पाणीही अगदीच कमी होतं. पण धरणाच्या परिसरात भटकताना मला अगदी हाताच्या अंतरावर हे असं इंद्रधनुष्य दिसलं

आयुष्यात अशक्यप्राय वाटणा-या गोष्टी घडण्याची शक्यता नेहमीच असते. मला सगळ्यात मजा याची वाटते की अशा गोष्टी जेंव्हा कधी घडतात तेंव्हा त्यात (ती घटना घडण्यात) माझी भूमिका अगदी नगण्य असते. अशा अशक्यप्राय घटना म्हणजे मला मिळालेली एक देणगी असते - त्यात परतफेडीची काही अपेक्षा नसते, परतफेडीची सक्ती नसते.. निसर्गासमवेत असताना मी देणार कोणं - घेणार कोण, द्यायचं किती - घ्यायचं किती - असे सगळे हिशोब नकळत पार विसरून जातेच. एका अर्थी निसर्ग मला अहंकाराच्या ओझ्यापासून काही क्षण का होईना मुक्त करतो. मी जशी आहे तसं असायची मोकळीक मला निसर्ग देतो आणि मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकारण्यातला आनंद पण मला तो शिकवतो - कारण निसर्ग माझ्याकडून कशाचीच अपेक्षा करत नाही. मी कशीही असले (आणि खरं म्हणजे असले किंवा नसले) तरी त्याला काही फरक पडत नाही. ते इंद्रधनुष्य मी असण्यानं काही अधिक सुंदर दिसत नाही, आणि मी नसण्यानं त्याच काहीही बिघडत नाही. निसर्गाशी असणार नातं म्हणून आपल्याला मुक्त करणारं असतं!

त्याउलट माणसांच्या नात्यांत देवघेव, अपेक्षा जास्त. ही अपेक्षा फक्त पैशांची किंवा भेटवस्तूंची नसते - ती असते  प्रेमाची, आदराची, कौतुकाची.. जे जे काही आपल्याला मिळत ते कोणत्या ना कोणत्या रूपांत परत करावं लागतं. तुम्ही घेणं नाकारलं तर 'आढयताखोर' असा शिक्का बसतो, आणि देण नाकारलं तर तुम्ही 'कृतघ्न' ठरता. अगदी खास वाटणारी, जवळची नाती याला अपवाद असतात असं मानायचं कारण नाही, कारण खास जवळीकीच्या नात्यांतल्या अपेक्षाही तितक्याच आवेगाच्या असतात असा अनुभव तुम्हा-आम्हा सर्वांनाच आहे. जितकं नात उत्कट, तितकी मोजावी लागणारी किंमत अधिक, तितकी त्यातली सुखाची आणि दु:खाचीही अनुभूती तीव्र!!

निसर्ग मात्र माझ्यासाठी काही केल्याचा दावा कधी करत नाही - पण तरी तो मला अपार आनंद आणि समाधान देतो. माझ्या क्रिया-प्रतिक्रियांची त्याला चिंता नसते - दखलही नसते. मी कसं जगायचं याचे निर्णय त्याने माझ्यावर सोपवलेले असतात - माझं स्वातंत्र्य अशा रीतीने अबाधित राहत. सूर्य उगवतो आणि मावळतो - माझ्या अस्तित्वाची त्याला पर्वा नाही. माझ्या जन्मापूर्वीही तो उगवत होता, आणि मी मेल्यानंतरही तो उगवत राहील. मी त्याच्याकडे पाहते आहे की नाही, मला आनंद होतो आहे की नाही अशा गोष्टी त्याच्या खिजगणतीत नसतात. पाऊस त्याला पाहिजे तेंव्हा येतो आणि त्याच्या मर्जीने गायब होतो. मी त्याला काहीही हुकूम देऊ शकत नाही.

पण हे दोन्ही बाजूंनी आहे. तेही कोणी मला काही हुकूम देत नाहीत. आम्ही एकमेकांकडून अपेक्षाही ठेवत नाही - पावसाने आलं पाहिजे अशी मी त्याची कधी वाट पहात नाही पण तो आला की मला आनंद होतो. आम्ही फक्त एकमेकांसमवेत  - जेंव्हा कधी असतो तेंव्हा - जगतो इतकंच! मी निसर्गाची - पाऊस, सूर्य, वारा, आकाश, झाडं .. यांची - सोबत न घेता जगायचं ठरवलं तर त्याला ते कुणीच आक्षेप घेत नाहीत. ते मला कोणत्याही त-हेचं भावनिक आवाहन करत नाहीत की ते मला 'आमच्याशिवाय कशी जगशील ते पाहतोच' अशा थाटाच्या धमक्या देत नाहीत. आम्ही एका 'काल-मिती'त एका वेळी आहोत. सृष्टीमधली कोणतीही गोष्ट माझ्यावर अवलंबून नाही यात एक फार मोठी मोकळीक आहे माझ्यासाठी. त्यातून मला क्षणभर का होईना माझ्या अहंकाराची झूल उतरवून ठेवण्याची संधी मिळते. त्यातून मला विस्तारण्याची संधी मिळते. निमिषमात्र मला जणू सभोवतालाशी एकरूप होता येत ते निसर्गाच्या या तटस्थ वृत्तीमुळेच!

असं जून महिन्यातलं पावसाची वाट पाहण्याच्या काळातलं अनपेक्षित भेटणार इंद्रधनुष्य पहायला मिळणं हा एका अर्थी नशीबाचा भाग आहे हे मला मान्य आहे. अशा वेळी जे आहे त्या सगळ्याबद्दल कृतज्ञता वाटते आणि जे नाही त्याची उणीव पुसून टाकली जाते.

आणि कधीकधी तर मला हे सगळ जगणंच स्वप्नवत वाटायला लागतं......
जणू फक्त स्वतःच्या 'असण्यासाठी' असलेलं ..
इतरांच्या साद-प्रतिसादाची वाट कधीही न पाहणारं ..
इंद्रधनुष्यासारखं रंगीबेरंगी...
ऐन दुष्काळातही उमलणारं ...
अशक्यप्राय शक्यता असलेलं ........

**

Friday, June 15, 2012

१२९. चिंता

असाच आणखी एक प्रवास. 

रस्त्यावरचं गाव. 
नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आहे. 
माझं काम कधी वेळेत संपत नाही -  कारण चर्चेत एकातून एक मुद्दे निघत राहतात. 
ते तितकेच महत्त्वाचे असतात. 
त्यावर बोलत राहतो आम्ही. 

पण आत्ता या उशीराबद्दल मला फार चिंता नाही. 
इथं काही मीटिंग वगैरे नाही. 
तर दोन तीन घरांत आम्ही जाणार आहोत. 
नुकतीच एक माहिती गोळा केली आहे आमच्या टीमने. 
ती काही घरांत जाऊन, तिथल्या लोकांशी बोलून आणि नंतर (आमच्या हाती असलेल्या) त्या घराच्या माहितीशी पडताळून पहायची आहे. 
म्हटलं तर एकदम सोपं काम - म्हटलं तर अवघड.  

पुढची मोटरसायकल थांबते. आमची गाडीही थांबते. 
आणखी दोघंजण आमची वाट पहात उभे आहेत. 
नमस्कार- चमत्कार होतात. 
मी त्यांच्या मागे चालायला लागते. 
वाटेत उन्हातान्हात निवांत बसलेले लोक आमच्याकडे पाहताहेत. 
पोरं मागोमाग येतात आमच्या. 
बाया आपापसात बोलायला लागतात. 
एक घर दिसतं.
वाकून आत प्रवेश करावा लागणार इतका बुटका दरवाजा. 
"मॅडम, हे विधवा कुटुंबप्रमुख स्त्रीचं घर आहे." - माझा सहकारी सांगतो. 

माहिती गोळा करताना स्त्रियांची माहिती काळजीपूर्वक गोळा केली गेली आहे ना, स्त्रियांना काही अडचण आलेली नाही ना, पुढच्या प्रक्रियेत त्यांनी सहभागी होण्याचं महत्त्त्व - असं काहीबाही मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यामुळं  स्त्रियांचे बचत गट आणि व्यक्तिशः स्त्रियांशी बोलणं हा माझा एक मुद्दा आहे या प्रवासातला. 

आम्ही आत शिरतो. 
एक सतरंजी अंथरलेली आहे. 
लाल रंगांची ती सतरंजी बहुतेक नवी असावी इतकी स्वच्छ आहे. 
"आम्हाला उशीर झाला का? तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागली का?" मी बोलायला सुरुवात करते. 
"नाही, नाही. या ना. तुमची वाट बघत होतो. ही सतरंजी तुमच्यासाठीच अंथरली आहे." - अगदी डावीकडे बसलेली स्त्री सांगते. 

ती स्त्री असेल जेमतेम पंचेचाळीशीची. 
तिच्या डाव्या बगलेत एक पोरगी लाजत बसली आहे. ती असेल दोन एक वर्षांची. 
उजवीकडे त्यापेक्षा लहान एक पोर. 
त्या पोराचा हात पकडून बसलेली एक तरुण स्त्री. 
त्या तरुणीच्या पाठीवर हात ठेवून बसलेली आणखी एक स्त्री. तीही पन्नाशीच्या आसपासची. 

घर एका खोलीचं. पक्क्या - की कच्च्या? -  विटांवर सिमेंटचा गिलावा आहे. वरती पत्रा आहे. 
त्या एकाच खोलीला थोडा आडोसा आहे - त्याच्या पल्याड बहुतेक स्वैपाक होत असणार. 
घरात काही सामान दिसत नाही फारसं. अगदी गरीब कुटुंब असावं - असा मी मनाशी अंदाज बांधते.
क्षणार्धात मी परत त्या स्त्रियांकडे वळते. 

त्या तिघींचेही चेहरे दमलेले आहेत. 
नीट पाहिल्यावर कळतं की ती दमणूक नाही तर दु:खाची खूण आहे. 
ती मधली तरुण स्त्री एकदम ओक्साबोक्शी रडायला लागते. 
तिच्या दोन्ही बाजूला बसलेल्या स्त्रिया तिच्या पाठीवरुन हात फिरवतात. 
मी चमकते - कारण तोवर मला जाणवलं आहे की माझ्यासमोर बसलेल्या तिन्ही स्त्रिया विधवा आहेत. 

बोलणं होतं 
या तरूण स्त्रीचा नवरा दहा दिवसांपूर्वी अपघातात जागच्या जागी मरण पावला आहे. 
मोटरसायकलची धडक. 
कोणी दिली
माहिती नाही. 
यांना बातमी कळॅपर्यंत जीव गेलेला होता. 
पोलीसांत तक्रार नोंदवली का?
नाही. 
कुठं काम करत होता?
असाच कुठंतरी - यांना कुणालाच माहिती नाही. 

ही तरुण मुलगी पंचवीस एक वर्षांची असेल. 
शाळेत ती कधीच गेली नाही - कारण तिचे वडील तिच्या लहानपणीच वारले आणि आई खडी फोडून (रस्त्यावर टाकली जाणारी खडी फोडणं) पोटाला  कमावून आणत असे. धाकट्या भावाला सांभाळायचे काम ती करत असे. 

तो धाकटा भाऊ अगदीच लहान आहे - दहा एक वर्षांचा. तो शाळेत जातो आहे सध्या. 
तो पण न हसता बसला आहे. 
या तरूणं स्त्रीला दोन लेकरं आहेत वर मी उल्लेख केलेली ती दोन - एक मुलगी आणि दुसरा मुलगा. 

डावीकडे बसलेली त्या तरूण स्त्रीची सासू आहे. तीही विधवा आहे. 
तिच्या शेजारी आणखी एक दहा-बारा वर्षांचा मुलगा दरम्यान येऊन बसला आहे. 
तो तिच्या मुलीचा मुलगा आहे. 
त्या मुलाचे आई-वडील - म्हणजे सासूची मुलगी आणि जावई दोघंही मरणं पावले आहेत. 
या घरात आता तीन निरक्षर असलेल्या विधवा स्त्रिया आहेत; दोन पाचवीत शिकणारे मुलगे आहेत; एक दोन वर्षांची मुलगी आहे आणि एक दहा महिन्यांच बाळ आहे. 

शेती आहे
हो. 
किती?
माहिती नाही. 
अर्धा एक एकर असेल. 
पाण्याची काही सोय?
नाही. पाऊस येईल तितकीच सोय.
शेती कोण करायचं
तो अपघातात नुकताच गेलेला मुलगा. 
काय होत त्या जमिनीत?
पोटापुरतं काहीसं.

बाकी उत्पन्नाचं साधन?
काही नाही. 
काही कागदपत्रं आहेत का घरात
काही नाही. 
रेशन कार्ड
नाही. 
मृत्यूचा दाखला?
नाही. 
काही शिवणकाम वगैरे येत?
नाही.

तरुणीची आई अजून खडी फोडायला जाते आणि तिच्या आणि तिच्या मुलाच्या पोटासाठी कमावते. 
तिच्याकडे काही कागदपत्र
नाही. 
आधार कार्डाची काहीतरी प्रक्रिया झालेली आहे - पण हातात काहीच नाही. 
दारिद्र्यरेषेचं कार्ड नाही का
होतं - पण ते रद्द झालं.
कधी रद्द झालं
माहिती नाही. 
का रद्द झालं
माहिती नाही. 
दोघी-तिघींपैकी कुणी बचत गटात आहे का
नाही. 

इथं जवळपास कुणी इतर नातेवाईक, भावकीतले लोक आहेत का
नाही. 
होते ते पोराच्या मरणानंतर भेटायला आले होते, पण गेले ते लगेच. 
त्यांनाही पोट आहे त्यांच! 

मला काही सुचत नाही काय बोलायचं ते. 
सोबतच्या एका सरकारी कर्मचा-याला मी विधवा पेन्शन योजनेत काय करता येईल ते पाहायला सांगते. 
तो नाव लिहून घेतो त्या तरूण स्त्रीचं आणि तिच्या सासूचं.
पण़ पुढे काही होईल का
मला उगीच त्या कुटुंबाला खोटी आशा दाखवायची नाही. 
सांत्वन तरी काय करायचं?

हे आता काय खाणार?
हे कसे जगणार?
यांच्या घरात फक्त शिकणारी ही दोन मुलं.
ती कधी मोठी होणार
कधी कमावणार?
त्यांना आपल्या सध्याच्या शाळेत शिकता येईल का
तोवर हे सगळे काय करणार?
यांच्यासाठी काय करता येईल
काही करता येईल की नाही

आम्ही उठतो. 

ती तरूण स्त्री म्हणते, "ताई, आणखी एक नाव लिहायचं आहे यादीत."
मी तिच्याकडे चमकून पाहते. 
ती सांगते, "पोटात पोर आहे माझ्या. त्याचं नाव आत्ताच लिहिता येईल का?" 

तिची चिंता संपणारी नाही.. ती अशीच धगधगत राहणार ...
*

Friday, June 8, 2012

१२८. भारतीपुर

शिवपालगंजमधून निघाले ती मी पोचले थेट 'भारतीपुर'मध्ये. आधी उत्तरेतलं गाव पाहिलं होतं - एका अनुभवावरुन मत बनवायची घाई करायची नाही हा शिरस्ता पाळायचा म्हणून मग दक्षिणेतलं हे गाव. कसं आहे हे गाव? 

भारतीपुरचं पहिलं दर्शन काही विशेष वाटत नाही. देशाच्या कानाकोप-यात अशी खेडी पुन्हापुन्हा पाहिलेली आहेत. रस्त्याच्या कडेला उतारावर दाटीवाटीने उभा ठाकलेला बाजार; त्या सगळ्याला व्यापून असणारी ती चिरंतन दुर्गंधी; छोटया गल्ल्यांची गर्दी; त्या गल्ल्यांमध्ये कायम येणारा माणसांच्या लघवीचा वास; भिंतींवरच्या जाहिराती आणि अमक्याला मत द्या अशी आज्ञावजा विनंती करणा-या घोषणा; बाजारात इतस्ततः फिरणारी खेडयातली माणसं;  आई- वडिलांना न परवडणा-या खेळण्याचा किंवा खाऊचा हटट करणारी लहान मुलं.....रस्त्यावर एक शाळा आणि एक होस्टेल.. त्या शाळेच्या मैदानात खेळणारी मुलं ..., धूळ उडवत येणारी बस आणि बसमधून येणा-या परगावच्या भक्तांना पकडून त्यांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था करुन आपलं पोट भरणारी गावातली मंडळी आणि लांबूनही दिसणारे मंजुनाथच्या मंदिराचे शिखर! 

भारतीपुरच्या केंद्रस्थानी आहे 'मंजुनाथ'. याचा महिमा मोठा आहे. साक्षात परशुरामाने मंजुनाथाची स्थापना केली असं परंपरा सांगते. पित्याच्या आज्ञेवरुन परशुरामाने आपल्या मातेची हत्या तर केली (आणि वडिलांकडून वर मागून आईला परत जिवंतही केले) पण त्याच्या परशुवरचे रक्ताचे डाग पुसले जाईनात.  ते अखेर धुतले इथल्या नदीने - इतकं तिचं पावित्र्य. मंजुनाथाचा प्रभाव एवढा मोठा आहे की साक्षात देशाचे राष्ट्रपती इथं भेट देउन गेले आहेत नुकतेच. एकटे गांधीजीच होते जे मंजुनाथाच दर्शन न घेता गावच्या हरिजन वस्तीत जाऊन आले फक्त. बाकी मंजुनाथाला टाळण्याची कुणाची हिंमत नाही - कुणाच्या मनात तसा विचारही येत नाही. कुणी मंदिरात जायचं आणि कुणी जायचं नाही याचे कडक नियम आहेत; ते सगळे विनातक्रार पाळत आले आहेत. या मंजुनाथाच्या जोडीला डोंगरावरचा भूतनाथही आहे. मंजुनाथ आणि भूतनाथ यांची कथा म्हणजे प्राचीन काळी एका समाजगटाने दुस-यावर कशी मात केली याचा इतिहास आहे असं जोयिसच मत आहे.म्हणायला मंजुनाथ मोठा आहे भूतनाथापेक्षा. पण नाव मंजुनाथचं पण पूजा भूतनाथाची, त्याचा कोप होऊ नये याचीच काळजी सगळ्यांना अशी परिस्थिती आहे असाही एक तर्क आहे जोयिसचा. 

इंग्लंडमध्ये पाच वर्ष राहून जगन्नाथ परत आलाय भारतीपुरमध्ये. रस्त्यावरुन जाणा-या जगन्नाथला आदराने उठून नमस्कार करतात बाजारातले लोक ते त्याच्या इंग्लंड वारीमुळे नाही. जगन्नाथचे वडील इथले जमीनदार होते मोठे. जगन्नाथ लहान असताना मंजुनाथाच्या कृपेने जीवघेण्या आजारातून वाचला, म्हणून त्याच्या आईने मंजुनाथाला दिला आहे सोन्याचा मुकुट. मुलांचा रक्षणकर्ता अशी मंजुनाथची प्रतिमा अधोरेखित झाली ती जगन्नाथचे प्राण वाचण्यातून. तो मुकुट आता ठिकठिकाणी पूजा केल्या जाणा-या मंजुनाथच्या प्रतिमेचा अविभाज्य भाग आहे. या मंदिरातली प्रचंड घंटाही जगन्नाथच्या पूर्वजांनी दिलेली देणगी आहे. मंजुनाथ आणि जगन्नाथ यांच असं एक इतिहासातून आलेलं नात आहे - जे पंचक्रोशी जाणते. 

जगन्नाथ विचारांत आहे. त्याला वाटत की हा मंजुनाथ गावाला बदलू देत नाही, गावाच्या गळ्याला लागलेला हा जणू एक फास आहे; जोवर गावाची त्याच्या विळख्यातून सुटका होणार नाही, तोवर इथं काहीही होणार नाही. तसंच राहील हे गाव. इथं काहीतरी नवं घडवून आणायला पाहिजे अशी ऊर्मी जगन्नाथच्या मनात दाटते आहे. शतकानुशतके चालत आलेलं हे चक्र आहे इथल्या व्यवस्थेच, त्यात उलथापालथ घडवून आणायला हवी हे जगन्नाथला आतून जाणवत. 

इंग्लंडमध्ये असताना जगन्नाथने अनेक वैचारिक चर्चा केल्या आहेत. आपण बुद्धीजीवी आहोत फक्त, आपल्यात कृती करुन दाखवायची धमक नाही याचे त्याला वैषम्य आहे. त्याच्या आणि मार्गारेटच्या नात्याचा प्रवासही त्याला हेच सत्य सांगतो आहे. आपल्या नोकर-चाकरांमध्ये मिसळायचा, त्यांच जीवन जाणून घ्यायचा जगन्नाथ प्रयत्न करतो; पण त्यातून त्याच्या पदरी निराशाच येते. माणसांच्या जीवनाचे जे पैलू त्याला दिसतात त्यातून तो त्यांच्यापासून लांबच जात राहतो. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्याशी त्याच नात सांधलं जाऊच शकत नाही. तो अस्वस्थ आहे. 

जगन्नाथच्या मनात एक क्रांतिकारी कल्पना येते. गावच्या मातंगांना मंजुनाथच्या मंदिरात जायला परवानगी नाही- पण येत्या अमावस्येला मेळ्याच्या दिवशी, जेव्हा जत्रा असते आणि हजारो लोक इथं येतात तेंव्हा गावातल्या मातंगांनी मंजुनाथच्या मंदिरात प्रवेश केला तर? मग मंजुनाथाच महत्त्व कमी होऊन जाईल त्याच्या सत्तेला आव्हान मिळाल्याने, मग इतिहास नव्याने घडेल या गावात. जगन्नाथ उत्साहाने बंगळूरच्या वृत्तपत्रांत हा कार्यक्रम जाहीर करतो. 

जगन्नाथच्या विचारांच्या आंदोलनाला अनेक पदर आहेत - ते अतिशय सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे आहेत. एक पकडायला जावं तर जीव दुस-याच कशात तरी गुंतलेला आहे याची जशी जगन्नाथला जाणीव होते, तशीच ती आपल्यालाही होते.आपल्या लोकांच्या विरोधात तर उभं राहायचं, पण त्यांना ज्यांच्यासाठी दुखवायचं त्या मातंगांची या बदलाची तयारी किती - हा प्रश्न जगन्नाथला वारंवार सतावतो. आपण केवळ आपल्या अहंकारासाठी बदल घडवायचा प्रयत्न करतोय, आपल्याला मातंगांबद्दल मनापासून प्रेम वाटत नाही हेही त्याला कळते आहे आणि त्यातून त्याचा आंतरिक संघर्ष अधिक गहिरा होत जातो. घरातला पूजेचा शाळिग्राम मातंगांच्या हाती देताना जगन्नाथ मावशीला दुखावतो - ज्या मावशीने आईच्या मृत्यूनंतर त्याला मायेने जपले आहे त्या मावशीशी दावा घेतल्यासारखा जगन्नाथ वागतो. पण मातंगांचीही इच्छा नाहीच शाळिग्राम हाती घेण्याची, मंदिरात प्रवेश करण्याची - त्यामुळे काहीतरी विपरीत घडणार असा त्यांचा विश्वास आहे. मग 'ना घरका, ना घाटका' बनत तो हे सगळे प्रयत्न नेमके कुणासाठी करतो आहे, यातून नेमके काय साधले जाणार आहे?   इतिहासाशी नाळ तोडून तुम्ही नवं काही निर्माण करत नाही तेव्हा प्रवासाला काही अर्थ असतो का? 

कादंबरीत इतर पात्रांच जगणं आणि त्याची कहाणी येते - श्रीपतिराय, अडिग, पुराणिक, सत्यप्रकाश, गणेश, पिल्ल, जोयिस. त्यांचे धागे जगन्नाथच्या कहाणीत मिसळत राहतात. 

मातंग अखेर मंजुनाथाच्या मंदिरात प्रवेश करतात का? भारतीपुरवर या घटनेचा परिणाम काय होतो? जगन्नाथला समाधान मिळते का? - या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी 'भारतीपुर' वाचायला हवं. 

यू. आर. अनंतमूर्ती यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाने लिहिलेली ही कादंबरी. देव, पाखंडी, भांडवलदार सगळे कसे मिळून मिसळून रहात असतात आणि सद्यस्थितीत काही बदल करायचा म्हटले की ते सगळे कसे 'एक' होतात हे सांगणारी ही एक अतिशय वास्तवदर्शी कहाणी. 'जात नाही ती जात' हे आपण म्हणतोच - पण ते नेमकं कसं असत, कसं दिसत, त्याचे कुणाला काय परिणाम भोगावे लागतात - हे 'भारतीपुर' वाचताना स्पष्ट होत जातं. सामाजिक बदल करताना व्यक्तिगत बदल कोणत्या पातळीवर होतात, समाजाचे नियम बदलायचे तर कशा प्रकारचे आरोप माणसांवर होतात - हेही वाचण्यासारखं आहे. 

जातीव्यवस्थेवर भाष्य करणारं हे एक चांगलं पुस्तक आहे. कथेचा प्रवाह थोडा गोंधळात टाकणारा आहे आणि कथेचे तुकडे काही ठिकाणी इतक्या वेगाने एकमेकांत मिसळतात की त्याचा अर्थ समजणं अवघड होतं काही प्रसंगी. लेखकाला जे सांगायचं आहे ते थेट आहे की अप्रत्यक्ष आहे ही शंका सतत मनात येत राहते. त्यामुळे जे सांगितलं आहे त्याच्या पल्याड काही शोधायची खटपट करताना जे सरळ सांगितलं आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त आहे. विशेषतः अनंतमूर्ती मी पहिल्यांदाच वाचत असल्याने माझी जरा अशी ये-जा झाली. म्हणजे जातीव्यवस्थेप्रमाणे ही कादंबरी धर्मव्यवस्थेवर पण भाष्य करते का? - असा प्रश्न माझ्या मनात आला आणि त्याच उत्तर पहिल्या वाचनात तरी मला मिळालेलं नाही. 

कदाचित पुढच्या वाचनात नवा अर्थ समजेल मला या कादंबरीचा. 



भारतीपुर (हिंदी अनुवाद) 
यू. आर. अनंतमूर्ती
राधाकृष्ण पेपरबैक्स,  नई दिल्ली
२०११
किंमतः रुपये १५०/- 
('भारतीपुर' या १९७३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कन्नड कादंबरीचा हा हिंदी अनुवाद भालचन्द्र जयशेटटी आणि तिप्पेस्वामी 'पुनीत' यांनी केला आहे.) 

Friday, June 1, 2012

१२७. संदर्भ

दिल्लीत आल्यापासून तीन वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये माझं जाणं-येणं असतं. त्यातलं तिसरं ठिकाण हे कधीकधी म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळी जाण्याचं; उरलेली दोन मात्र नेहमीची. पण शहरात मी नवीन असून आणि दिशांच माझं ज्ञान अगाध असूनही मला जाण्या-येण्यात अडचण आली नाही कधी. याच मुख्य कारण म्हणजे ही दोन्ही कार्यालयं दोन लागोपाठच्या मेट्रो स्थानकांच्या जवळ आहेत अगदी. पटेल चौक मेट्रो स्टेशन आणि केंद्रिय सचिवालय मेट्रो स्टेशन एकमेकांचे शेजारी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सुरुवातीला एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात जाताना मी मेट्रोने जायचे. मला ते सगळ्यात जास्त सोपं जायचं, वेळ वाचायचा आणि मेट्रोचा प्रवास अर्थातच सुरक्षित आहे. 

पण एकच स्टेशन पुढे जायचं असं म्हणलं तरी प्रत्यक्षात मला दोन्ही स्थानकांत बरचं चालावं लागायचं. म्हणजे आधी पटेल चौक मेट्रो स्थानकात एक जिना उतरा (हे भुयारी स्थानक आहे), मग सुरक्षा तपासणी करून आणखी एक जिना उतरायचा. मेट्रो स्थानकातला एक जिना म्हणजे किमान सत्तर पाय-या. वरती चढण्यासाठी सरकते जिने आहेत, पण उतरायचं ते आपण आपल्या पायांनी! स्त्रियांसाठीचा डबा फलाटाच्या एकदम पुढच्या टोकाला असतो, तिथंवर चालायला किमान दोन मिनिटे तरी लागतातच. हे सगळ - सुरक्षा तपासणीचा अपवाद वगळता - परत एकदा केंद्रिय सचिवालय स्थानकात करायचं - इथं फक्त उतरायच्या ऐवजी चढायचं. स्थानकातून बाहेर पडलं की पाच-सात मिनिटांच्या चालण्यात मी कार्यालयात पोचते. म्हणजे मेट्रोने प्रवास करुनही या दोन कार्यालयात जाता-येता मला किमान दहा ते बारा मिनिटं चालावं लागत. पण चालण्याबद्दल माझी सहसा तक्रार नसते. शिवाय आणखी काही पर्याय मला माहिती नव्हते त्यामुळे मी बराच काळ या दोन कार्यालयांच्या दरम्यान मेट्रोने प्रवास करत राहिले.  

नोव्हेंबरमध्ये कधीतरी अशीच मी एका ठिकाणाहून दुसरीकडे निघाले असता माझ्या एका सहका-याने 'इथून तिथंवर तू कशी जातेस?' असं आपलं मला सहज विचारलं. मी सांगितलं; त्यावर तिथं आमच बोलणं ऐकत असलेले सगळे दिल्लीकर हसले. मी विचारलं "का हसता आहात" म्हणून. मग मला कळलं की ज्या दोन कार्यालयात मी नियमित मेट्रोने येत-जात होते, त्यांच्यात चालत गेलं तर फक्त दहा मिनिटांच अंतर आहे! "तू सरळ चालत का नाही जात?" असं त्या सगळ्यांनी मग मला विचारलं. दहा मिनिटं मेट्रो स्थानकात चालायचं, शिवाय सुरक्षा तपासणी, शिवाय पैसे घालवायचे -त्यापेक्षा तेवढया वेळात, तेवढयाच चालण्यात आणि पैसे खर्च न करता मी जाऊ शकते हे त्या सगळ्यांनी मग मला समजावून सांगितलं. 

त्यातला पैसे वाचवायचा मुद्दा बाजूला ठेवला तरी इतक्या जवळच्या अंतरासाठी थेट चालत जाण्याऐवजी आपण इतका सारा खटाटोप करतो हे लक्षात आल्यावर मला त्यातला विनोद कळला. मग एका सहका-याकडून मी नकाशा काढून घेतला. त्याच्या मदतीने मी अक्षरशः दहा मिनिटांत एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात पोचले. मग पुढचे अनेक महिने तो माझा शिरस्ताच झाला. ते चालणं म्हणजे घराच्या अंगणात फेरफटका मारावा तितकं सहज झालं माझ्यासाठी. हिवाळयात तर ते चालणं सुखाच वाटायला लागलं. त्यानिमित्ताने सूर्यकिरणांचा स्पर्श व्हायचा, पाय मोकळे व्हायचे. रस्त्यावरच्या इतर इमारती, वाटेतल्या बस थांब्यावर उभे असणारे लोक.. हे सगळं पाहताना मजा यायची. दुपारी दोन वाजता या रस्त्यावरुन चालत जाणं हा माझा जणू एक प्रकारे छंद झाला त्या काही महिन्यांत. 

असेच काही महिने गेले. 
पुन्हा एकदा कधीतरी मी एका कार्यालयातून दुसरीकडे जायला निघाले तेव्हा माझ्या त्याच सहका-याने "कशी जाणार आहेस?" असं सहज विचारलं. 
"नेहमीसारखी. चालत. आणखी काय?" मीही सहज सांगितलं. 

याहीवेळी आमचं बोलणं ऐकत असलेले भोवतालचे सगळेजण हसले. त्यात हसण्यासारखं काय होत, ते मला कळेना. कधीकधी मला वाटतं की माझी विनोदबुद्धी जरा मर्यादितच आहे! मी विचारलं "का हसताय" असं त्यांना. त्यावर कोणीतरी म्हणालं, "वेडी आहेस की काय तू? भर दुपारी दोन वाजता तू चालत जाणार? बाहेर तापमान किती आहे, माहिती आहे का? ही दिल्ली आहे बाईसाहेब, गृहित धरू नकोस तिला, महागात पडेल." (हे अशा थाटांत की जणू बाकीची गावं, शहर यांना गृहित धरलं तर काही अडचण नाही!!)

ऐन एप्रिल-मे-जूनमधल्या दिल्ल्लीच्या उन्हाळ्यात दुपारी दोन वाजता दहा मिनिटं चालत जाण्याइतपत सुदैवाने मी धडधाकट आहे. मला उन्हातान्हात चालण्याचा दांडगा अनुभव आहे आणि हौसही आहे. मी अर्थात हे भाषण तिथं देत बसले नाही. त्याऐवजी मी म्हटलं, "फक्त दहाच मिनिटांच तर अंतर आहे आणि ते सोयीचही आहे मेट्रो स्थानकात चालण्यात वेळ घालवण्यापेक्षा."

"छे! छे! तू आपली मेट्रोने जा कशी. उगाच पैसे वाचवायला बघू नकोस. आजारी पडशील त्यापेक्षा हे बरं.." असा सल्ल्याचा वर्षाव माझ्यावर चारी दिशांनी झाला. 

मग मी त्यादिवशी आणि पुढचे काही महिने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मेट्रोने जात राहिले. 

मी जेव्हा चालत होते, त्यावेळी 'चालत जाणं कसं योग्य आहे" याबाबतचा युक्तिवाद होता माझ्याकडे (किंवा लोकांकडे). आता परत चालण्याऐवजी मी तेच अंतर मेट्रोने जायला लागले तर 'मेट्रोने जाणं कसं योग्य आहे' याबाबतचा युक्तिवाद तयार होता माझ्याकडे (किंवा लोकांकडे!) 

हे लक्षात आल्यावर मला हसू आलं. 

माझ्या इच्छा, माझ्या कृती कशा संदर्भानुसार बदलत जातात! कार्यालयांच्या जागा बदलत नाहीत - पण कधी ते अंतर मी चालत जाते तर कधी तेच अंतर मेट्रोने पार करते. वरवर विरोधाभासी वाटणा-या या निर्णयांच आणि कृतींच समर्थन मी तितक्याच ठामपणे करु शकते. 

कृती हेच ध्येय मानून मी माझ्या व्यवहाराला चिकटून राहिले तर प्रश्न निर्माण होतात. दिल्लीच्या उन्हाळ्यात भर दुपारी दोन वाजता चालणं - हे काही माझं ध्येय नाही, उद्दिष्ट नाही. मला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी कमीत कमी त्रासात आणि कमीत कमी वेळेत पोचायचं आहे. हे पोचणं तर साधावं आणि त्रासही कमीत कमी व्हावा यासाठी परिस्थितीनुसार माझ्या कृती, माझे व्यवहार, माझं आचरण मला बदलावं लागणारंच! एका परिस्थितीत जे सर्वोत्तम असतं ते दुस-या परिस्थितीत पूर्ण निरर्थक, इतकंच नाही तर उद्दिष्ट गाठण्यात बाधा आणणारं ठरू शकतं. 

अर्थात ध्येय, उद्दिष्ट नेहमी तेच राहील असंही नाही, तेही बदलत जाण्याची शक्यता आहेच. कदाचित उद्या 'दिल्लीच्या उन्हाळ्यात दुपारी दोन वाजता चालण्याची क्षमता आपली शाबूत आहे की नाही' हे तपासून पाहणं हेच उद्दिष्ट असलं तर? मग चालावं लागेल कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी, कितीही त्रास होणार असला तरीही. ध्येय जर जगावेगळं असेल; तर त्याच्यापर्यंत जाण्याचे मार्गही जगावेगळे राहणार! अर्थात सध्या माझं असं काहीही चित्रविचित्र ध्येय नाही - मी त्याबतीत आधीच लक्ष्मणरेषा ओलांडलेली आहे, नाही का?  

उद्दिष्ट हा संदर्भ आहे. ध्येय हा संदर्भ आहे. 
परिस्थिती हा संदर्भ आहे. माझ्या क्षमता, माझी कुवत हा संदर्भ आहे. 
माझा साधनांबाबतचा निर्णय हा संदर्भ आहे. 
मला हवं ते साधण्यासाठी मी काय पर्याय निवडते तो संदर्भ आहे.

पण म्हणजे मी म्हणतेय तसं संदर्भ सारखा बदलत असतो का? हे माझं गृहितक बरोबर आहे का? 

थोडक्यात सांगायचं तर माझ्या सगळ्या वाटचालीला एक आणि एकच संदर्भ आहे.
त्याला 'जगण्याची प्रेरणा' म्हणा; त्याला 'आनंदी असण्याची ऊर्मी' म्हणा. त्याला नाव काहीही द्या. 
पण अगदी खरं सांगायचं तर 'स्व-केंद्रितता', 'स्वार्थ' हाच माझ्या जगण्याचा आणि माझ्या प्रवासाचा एकमेव संदर्भ आहे. 

**