दिल्लीत आल्यापासून तीन वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये माझं जाणं-येणं असतं. त्यातलं तिसरं ठिकाण हे कधीकधी म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळी जाण्याचं; उरलेली दोन मात्र नेहमीची. पण शहरात मी नवीन असून आणि दिशांच माझं ज्ञान अगाध असूनही मला जाण्या-येण्यात अडचण आली नाही कधी. याच मुख्य कारण म्हणजे ही दोन्ही कार्यालयं दोन लागोपाठच्या मेट्रो स्थानकांच्या जवळ आहेत अगदी. पटेल चौक मेट्रो स्टेशन आणि केंद्रिय सचिवालय मेट्रो स्टेशन एकमेकांचे शेजारी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सुरुवातीला एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात जाताना मी मेट्रोने जायचे. मला ते सगळ्यात जास्त सोपं जायचं, वेळ वाचायचा आणि मेट्रोचा प्रवास अर्थातच सुरक्षित आहे.
पण एकच स्टेशन पुढे जायचं असं म्हणलं तरी प्रत्यक्षात मला दोन्ही स्थानकांत बरचं चालावं लागायचं. म्हणजे आधी पटेल चौक मेट्रो स्थानकात एक जिना उतरा (हे भुयारी स्थानक आहे), मग सुरक्षा तपासणी करून आणखी एक जिना उतरायचा. मेट्रो स्थानकातला एक जिना म्हणजे किमान सत्तर पाय-या. वरती चढण्यासाठी सरकते जिने आहेत, पण उतरायचं ते आपण आपल्या पायांनी! स्त्रियांसाठीचा डबा फलाटाच्या एकदम पुढच्या टोकाला असतो, तिथंवर चालायला किमान दोन मिनिटे तरी लागतातच. हे सगळ - सुरक्षा तपासणीचा अपवाद वगळता - परत एकदा केंद्रिय सचिवालय स्थानकात करायचं - इथं फक्त उतरायच्या ऐवजी चढायचं. स्थानकातून बाहेर पडलं की पाच-सात मिनिटांच्या चालण्यात मी कार्यालयात पोचते. म्हणजे मेट्रोने प्रवास करुनही या दोन कार्यालयात जाता-येता मला किमान दहा ते बारा मिनिटं चालावं लागत. पण चालण्याबद्दल माझी सहसा तक्रार नसते. शिवाय आणखी काही पर्याय मला माहिती नव्हते त्यामुळे मी बराच काळ या दोन कार्यालयांच्या दरम्यान मेट्रोने प्रवास करत राहिले.
नोव्हेंबरमध्ये कधीतरी अशीच मी एका ठिकाणाहून दुसरीकडे निघाले असता माझ्या एका सहका-याने 'इथून तिथंवर तू कशी जातेस?' असं आपलं मला सहज विचारलं. मी सांगितलं; त्यावर तिथं आमच बोलणं ऐकत असलेले सगळे दिल्लीकर हसले. मी विचारलं "का हसता आहात" म्हणून. मग मला कळलं की ज्या दोन कार्यालयात मी नियमित मेट्रोने येत-जात होते, त्यांच्यात चालत गेलं तर फक्त दहा मिनिटांच अंतर आहे! "तू सरळ चालत का नाही जात?" असं त्या सगळ्यांनी मग मला विचारलं. दहा मिनिटं मेट्रो स्थानकात चालायचं, शिवाय सुरक्षा तपासणी, शिवाय पैसे घालवायचे -त्यापेक्षा तेवढया वेळात, तेवढयाच चालण्यात आणि पैसे खर्च न करता मी जाऊ शकते हे त्या सगळ्यांनी मग मला समजावून सांगितलं.
त्यातला पैसे वाचवायचा मुद्दा बाजूला ठेवला तरी इतक्या जवळच्या अंतरासाठी थेट चालत जाण्याऐवजी आपण इतका सारा खटाटोप करतो हे लक्षात आल्यावर मला त्यातला विनोद कळला. मग एका सहका-याकडून मी नकाशा काढून घेतला. त्याच्या मदतीने मी अक्षरशः दहा मिनिटांत एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात पोचले. मग पुढचे अनेक महिने तो माझा शिरस्ताच झाला. ते चालणं म्हणजे घराच्या अंगणात फेरफटका मारावा तितकं सहज झालं माझ्यासाठी. हिवाळयात तर ते चालणं सुखाच वाटायला लागलं. त्यानिमित्ताने सूर्यकिरणांचा स्पर्श व्हायचा, पाय मोकळे व्हायचे. रस्त्यावरच्या इतर इमारती, वाटेतल्या बस थांब्यावर उभे असणारे लोक.. हे सगळं पाहताना मजा यायची. दुपारी दोन वाजता या रस्त्यावरुन चालत जाणं हा माझा जणू एक प्रकारे छंद झाला त्या काही महिन्यांत.
असेच काही महिने गेले.
पुन्हा एकदा कधीतरी मी एका कार्यालयातून दुसरीकडे जायला निघाले तेव्हा माझ्या त्याच सहका-याने "कशी जाणार आहेस?" असं सहज विचारलं.
"नेहमीसारखी. चालत. आणखी काय?" मीही सहज सांगितलं.
याहीवेळी आमचं बोलणं ऐकत असलेले भोवतालचे सगळेजण हसले. त्यात हसण्यासारखं काय होत, ते मला कळेना. कधीकधी मला वाटतं की माझी विनोदबुद्धी जरा मर्यादितच आहे! मी विचारलं "का हसताय" असं त्यांना. त्यावर कोणीतरी म्हणालं, "वेडी आहेस की काय तू? भर दुपारी दोन वाजता तू चालत जाणार? बाहेर तापमान किती आहे, माहिती आहे का? ही दिल्ली आहे बाईसाहेब, गृहित धरू नकोस तिला, महागात पडेल." (हे अशा थाटांत की जणू बाकीची गावं, शहर यांना गृहित धरलं तर काही अडचण नाही!!)
ऐन एप्रिल-मे-जूनमधल्या दिल्ल्लीच्या उन्हाळ्यात दुपारी दोन वाजता दहा मिनिटं चालत जाण्याइतपत सुदैवाने मी धडधाकट आहे. मला उन्हातान्हात चालण्याचा दांडगा अनुभव आहे आणि हौसही आहे. मी अर्थात हे भाषण तिथं देत बसले नाही. त्याऐवजी मी म्हटलं, "फक्त दहाच मिनिटांच तर अंतर आहे आणि ते सोयीचही आहे मेट्रो स्थानकात चालण्यात वेळ घालवण्यापेक्षा."
"छे! छे! तू आपली मेट्रोने जा कशी. उगाच पैसे वाचवायला बघू नकोस. आजारी पडशील त्यापेक्षा हे बरं.." असा सल्ल्याचा वर्षाव माझ्यावर चारी दिशांनी झाला.
मग मी त्यादिवशी आणि पुढचे काही महिने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मेट्रोने जात राहिले.
मी जेव्हा चालत होते, त्यावेळी 'चालत जाणं कसं योग्य आहे" याबाबतचा युक्तिवाद होता माझ्याकडे (किंवा लोकांकडे). आता परत चालण्याऐवजी मी तेच अंतर मेट्रोने जायला लागले तर 'मेट्रोने जाणं कसं योग्य आहे' याबाबतचा युक्तिवाद तयार होता माझ्याकडे (किंवा लोकांकडे!)
हे लक्षात आल्यावर मला हसू आलं.
माझ्या इच्छा, माझ्या कृती कशा संदर्भानुसार बदलत जातात! कार्यालयांच्या जागा बदलत नाहीत - पण कधी ते अंतर मी चालत जाते तर कधी तेच अंतर मेट्रोने पार करते. वरवर विरोधाभासी वाटणा-या या निर्णयांच आणि कृतींच समर्थन मी तितक्याच ठामपणे करु शकते.
कृती हेच ध्येय मानून मी माझ्या व्यवहाराला चिकटून राहिले तर प्रश्न निर्माण होतात. दिल्लीच्या उन्हाळ्यात भर दुपारी दोन वाजता चालणं - हे काही माझं ध्येय नाही, उद्दिष्ट नाही. मला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी कमीत कमी त्रासात आणि कमीत कमी वेळेत पोचायचं आहे. हे पोचणं तर साधावं आणि त्रासही कमीत कमी व्हावा यासाठी परिस्थितीनुसार माझ्या कृती, माझे व्यवहार, माझं आचरण मला बदलावं लागणारंच! एका परिस्थितीत जे सर्वोत्तम असतं ते दुस-या परिस्थितीत पूर्ण निरर्थक, इतकंच नाही तर उद्दिष्ट गाठण्यात बाधा आणणारं ठरू शकतं.
अर्थात ध्येय, उद्दिष्ट नेहमी तेच राहील असंही नाही, तेही बदलत जाण्याची शक्यता आहेच. कदाचित उद्या 'दिल्लीच्या उन्हाळ्यात दुपारी दोन वाजता चालण्याची क्षमता आपली शाबूत आहे की नाही' हे तपासून पाहणं हेच उद्दिष्ट असलं तर? मग चालावं लागेल कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी, कितीही त्रास होणार असला तरीही. ध्येय जर जगावेगळं असेल; तर त्याच्यापर्यंत जाण्याचे मार्गही जगावेगळे राहणार! अर्थात सध्या माझं असं काहीही चित्रविचित्र ध्येय नाही - मी त्याबतीत आधीच लक्ष्मणरेषा ओलांडलेली आहे, नाही का?
उद्दिष्ट हा संदर्भ आहे. ध्येय हा संदर्भ आहे.
परिस्थिती हा संदर्भ आहे. माझ्या क्षमता, माझी कुवत हा संदर्भ आहे.
माझा साधनांबाबतचा निर्णय हा संदर्भ आहे.
मला हवं ते साधण्यासाठी मी काय पर्याय निवडते तो संदर्भ आहे.
पण म्हणजे मी म्हणतेय तसं संदर्भ सारखा बदलत असतो का? हे माझं गृहितक बरोबर आहे का?
थोडक्यात सांगायचं तर माझ्या सगळ्या वाटचालीला एक आणि एकच संदर्भ आहे.
त्याला 'जगण्याची प्रेरणा' म्हणा; त्याला 'आनंदी असण्याची ऊर्मी' म्हणा. त्याला नाव काहीही द्या.
पण अगदी खरं सांगायचं तर 'स्व-केंद्रितता', 'स्वार्थ' हाच माझ्या जगण्याचा आणि माझ्या प्रवासाचा एकमेव संदर्भ आहे.
**
अरे वा, नव्या महिन्याच्या पहिल्या लेखाचं पहिलं वाचन माझ्या भाग्यात.
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच, सहज लिहिलं आहेस. सध्या वेळ मिळेल तसं तुझ्या ब्लॉगचं उलटं वाचन चालू आहे. अनुभव, विचार आणि लेखणी प्रसन्न आहेत तुला..
तू नोंदवलेली कृतीमधली लवचीकता आणि हेतूचा ठामपणा या दोन्ही जोड्यांची नेमकी उलटापालट झालेली दिसते आणि म्हणून मग विसंगत वाटायला लागतं एखाद्याचं वागणं.
आणि स्वार्थ हा तर मूळ धर्म आहे, अगदी परोपकारी माणसाचा सुद्धा, नाही का?
Simple and deep. Liked it.
ReplyDeleteसुंदर पोस्ट... हलकी फुलकी सुरूवात करून एकदम खोल घेऊन जाणारं लेखन.
ReplyDeleteलोकांनी दोन्ही बाजूंनी बोलावं यावरून ती गाढवावरून जाणार्या नवराबायकोची गोष्ट आठवली.
योगिनी, 'कृती'ही 'हेतू' बनत गेली की विसंगती निर्माण होणं स्वाभाविक आहे.
ReplyDeleteअनामिक/का, आभार.
बिपिनजी, गाढवाच्या गोष्टीपेक्षा इथं थोडा वेगळा अनुभव आहे. इथं परिस्थिती बदलली त्यामुळे कृती बदलणं आवश्यक ठरत. या ठिकाणी 'लोक काय म्हणतात' हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा नाही तर जे काय साधायचं आहे त्यासाठी योग्य पर्याय बदलत जातात असा अनुभव आहे.
व्वा नेहमीप्रमाणे छानच पोस्ट! संदर्भ किती महत्वाचे आहेत नाही? (शाळेत 'संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा' हे उगाच घोटवून घेत नाहीत तर :-)
ReplyDeleteप्रीति, संदर्भांसह स्पष्टीकरण .. हं ..किती स्पष्टीकरणं देतो आपण लहान वयातच .. शाळेत जीवनोपयोगी शिक्षण मिळत म्हणायचं!!
ReplyDeleteमस्त! आवडलं नेहमीप्रमाणे. साध्याश्या प्रसंगातून टप्प्याटप्प्याने गुंतागुंतीच्या गोष्टींपर्यंत सहजतेनं पोचवणं ही तुझी हातोटी आहे:)
ReplyDeleteदैनदिन जीवनातील घडामोडींचा अचूक संधर्भ लावल्या गेला आहे.
ReplyDeleteजगण्याची आदिम आंतरिक ओढ आणि त्यासाठी चिरंतर चालू असलेली आपली धडपड,संघर्ष ह्या सर्वांचा उत्तम लेखाजोगा मांडला आहे.
बाकी दिल्लीकरांना क्या दोष द्यायचा.
हिवाळ्यात व उन्हाळ्यात मुंबईत सी एस टी स्टेशन ते काळाघोडा पर्यंत
पायी जावे असा सल्ला देणारे मुंबईकर पर्यटकांना पावसाळ्यात मात्र हेच अंतर टेक्सी ने गाठा नाहीतर गाठ मान्सून शी आहे असा व्यवहारी सल्ला देतात
क्षिप्रा, स्वागत आणि आभार .. आळसावर मात करून प्रतिसाद नोंदवल्याबद्दल :-)
ReplyDeleteनिनादजी, बरोबर, यात दिल्लीकरांचा दोष नाही - दोष नसतोच कुणाचा - परिस्थिती बदलते तशा आपल्या कृती बदलायला हव्यात हे भान ठेवायला लागत जगताना हे या अनुभवातून मी पुन्हा एकदा शिकले इतकंच!
ReplyDeleteहम्म्म...आहे खरं विचार करायला लावणारं....खरं तर आपण जितके लोकांचे सल्ले ऐकु त्यातनं तितकेच पर्याय आणि कारणं निघत जातात हा एक वैयक्तिक अनुभव....शेवटी करावे मनाचे...कसें....:)
ReplyDeleteअपर्णा, लोक नेहमी चुकीचच सांगतात असं मला वाटत नाही. कधी कधी ते बरोबर असतं .. आपला दुराग्रह आपल्याला बाजूला ठेवावा लागतो ..आणि ते अनेकदा इष्टही असत...:-)
ReplyDelete