ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, December 29, 2014

२१७. भीतीच्या भिंती: भाग ३: इस्लामिक रिपब्लिक

भाग  
 
 (नोंद: स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चा, विकिपीडिया आणि तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे.)
 मी काबूलमध्ये शनिवारी पोचले होते. रविवार निवांत असायला हवा आजवरच्या अनुभवानुसार. पण नाही! रविवार हा कामाचा दिवस. ‘साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार’ ही इस्लामिक राजवटीची प्रमुख खूण. ज्यांना आठवड्यात पाच दिवस काम असतं त्यांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टीचे. सरकारी कार्यालयं गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस बंद असतात. पण हे केवळ केंद्रीय कार्यालयांसाठी. प्रादेशिक कार्यालयं आठवड्यातले सहा दिवस काम करतात. एकूण केंद्र स्तरावरच्या लोकांचे जास्त लाड होण्याची पद्धत इथंही दिसतेय. युएन कार्यालयं मात्र शुक्रवार आणि शनिवारी बंद.
कामासाठी National Action Plan for the Women of Afghanistan (2007 to 2017) पाहत होते; तेव्हा त्यात सुरुवातीच्या पानांवर ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’ आणि In the name of Allah, the Merciful, the Compassionate’ हे स्पष्ट दिसलं. ‘इस्लामिक रिपब्लिक’ बद्दल कुतूहल आणखी जागं झालं. अफगाणिस्तान ‘रिपब्लिक’ नेमकं कधी झालं? आणि ‘इस्लामिक रिपब्लिक’ हा शब्दप्रयोग नक्की काय सांगतो आहे?
ज्या देशातले ९९% लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत तो देश ‘इस्लामिक रिपब्लिक’ असणं ही काही फार आश्चर्याची बाब नाही खरं तर. पण या देशाचा भूगोल आणि इतिहास हे दोन्ही लक्षात घेतलं, तर आजची गुंतागुंत नेमकी काय आहे याची काही अंशी उकल होते.
पुढचं विवेचन करण्यापूर्वी मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते. एक, मी इस्लाम धर्माची अभ्यासक नाही. दुसरं म्हणजे ‘एक धर्म दुस-या धर्मापेक्षा श्रेष्ठ की कनिष्ठ’ या वादात मला रस नाही. मी हिंदू घरात जन्माला आले आणि वाढले ही एक वस्तुस्थिती आहे - त्याचा मला ना न्यूनगंड आहे ना त्यामुळे माझ्यात श्रेष्ठत्वाची भावना आहे! लोक वेगवेगळ्या धर्मांच्या घरांत जन्म घेतात आणि वाढतात. तिसरा मुद्दा असा, की कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षण... अशा अनेक मानवनिर्मित व्यवस्थांसारखी धर्म हीदेखील एक मानवनिर्मित व्यवस्था आहे असं मी(ही) मानते. कुठल्याही व्यवस्थेची असतात तशी प्रत्येक धर्माची बलस्थानं आहेत आणि त्यात सुधारणेला वाव आहे – तो कमी-जास्त असेल; पण सर्वांत आहे. ज्ञानाच्या कक्षा आणि मानवी हक्कांच्या जाणिवा विस्तारताना ‘धर्माची’ आपली समज आणि अभिव्यक्ती या दोन्हीत बदल होणं अपरिहार्य आहे. धर्मात मला रस आहे तो सामाजिक दृष्ट्या! धर्म मानवी समूहांच्या आचार-विचारांना आकार देतो. काही चांगले पर्याय त्यातून पुढे येतात आणि अनेक सामाजिक प्रश्नांचे मूळही त्यातच असते; म्हणून ‘धर्म’ मी पाहते, आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न करते. अफगाणिस्तानमधल्या इस्लामचा विचारही मी याच मर्यादित अर्थाने करते आहे.
पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, तजिकीस्तान, चीन (आणि सातवा भारत) हे देश सध्याचा अफगाणिस्तानच्या सीमांना स्पर्श करतात. 

 (नकाशा आंतरजालावरून साभार)
(‘पाकव्याप्त काश्मीर ही वास्तवात भारतीय भूमी आहे’ या भूमिकेतून भारत सरकार अफगाणिस्तानला सीमा-शेजारी मानते, पण बाकी जग तसं मानत नाही.) ६४७,५०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आणि सुमारे अडीच ते तीन कोटी लोक असलेला हा देश ३४ प्रांतांत विभागला आहे. काबूल ही देशाची राजधानी आहे आणि तो एक प्रांतही आहे. काबूलमधली वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळ्या जिल्ह्यांत आहेत हे कळल्यावर गंमत वाटली होती. भौगोलिकदृष्ट्या अफगाणिस्तानची संपर्क आणि दळणवळणाची स्थिती आजही बिकट आहे. त्यात भर पडते तिथल्या हवामानाची. स्वाभाविकरीत्या इतिहासात अफगाणिस्तान टोळ्यांमध्ये – पारंपरिक/स्थानिक समूह हा शब्दप्रयोग जास्त योग्य आहे - विभागला गेला आणि आजही आपापल्या पारंपरिक समूहाशी निष्ठा फार महत्त्वाची आहे. सरकार नागरिकांना जे ओळखपत्र देते, त्यावर त्याच्या/तिच्या पारंपरिक समूहाची नोंद असावी की नसावी हा २०१३ च्या डिसेंबरमध्ये मोठा वादाचा विषय झाला होता. यावर काय निर्णय झाला ते अदयाप माझ्या नजरेस आलं नाही, पुढे हा विषय पुन्हा येईल तेव्हा सांगते.
पश्तुन (Pashtun) हा सगळयात मोठा गट – सुमारे ४५% ते ६०% लोक. हे ‘पाश्तो’ भाषा बोलतात. भारतरत्न खान अब्दुल गफारखान उर्फ सरहद्द गांधी हे आपल्या माहितीत असलेले उत्तुंग पश्तुन व्यक्तिमत्व! ‘हमीद करझाई’ जे २००४ ते २०१४ अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते, तेही पश्तुन आहेत. एक अपवाद वगळता इथले सर्व राजे पश्तुन होते. २०१४ च्या राष्ट्राध्यक्ष  निवडणुकीत सर्वच्या सर्व ११ उमेदवार पश्तुन होते, असं वाचल्याचं आठवतं. दुसरा गट आहे ताजिक (Tajik). हे ‘दरी’ (अफगाणिस्तानी पर्शियन) भाषा बोलतात. तालिबानला यशस्वी विरोध करणा-या Northern Alliance मध्ये मुख्यत्वे ताजिक होते. ताजिक आणि पश्तुन यांचे  संबंध म्हणजे ‘तुझं नि माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असे आहेत. कटटर विरोधी राजकीय भूमिका – पण भागीदारीत व्यवसाय करतात आणि विवाहाद्वारा एकमेकांशी नातेसंबंधही जोडतात. हझारा (Hazara) किंवा हजारा हा ‘दरी’ बोलणारा आणखी एक समूह. बहुतांश अफगाण ‘सुन्नी’ आहेत तर हझारा ‘शिया’ – इतकं पुरेसं आहे त्यांची स्थिती समजायला! उझबेक (Uzbek), ऐमाक (Aimaq), तुर्कमेन (Turkmen), बलोच (Baloch), नूरिस्तानी (Nuristani) हे तुलनेने कमी लोकसंख्येचे पण आपापल्या परिसरात प्रभाव असणारे गट. शिवाय आणखीही अधिक छोटे गट आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रगीतात १४ पारंपरिक समूहांचा उल्लेख आहे. 
एखादा देश अथवा समाज लोकशाही मूल्यांकडे वळतावळता धर्माचा अंकित कसा होऊ शकतो, हे समजून घ्यायचं असेल तर अफगाणिस्तानचा इतिहास उद्बोधक आहे.
बौद्ध, हिंदू, पारसी अशा विविध धर्मांचा प्रसार या प्रदेशात इस्लामच्या आगमनापूर्वी आठ-नऊ शतकं इतका आधी झाला होता. शिवाय समूहांच्या पारंपरिक समजूती होत्या. त्याबद्दल एक वेगळा लेख लिहावा लागेल इतका मोठा विषय आहे तो हे धर्म सत्ता परिवर्तनातून आले हे खरं; पण या धर्मांचे स्वरूप पाहता त्यांचा प्रसार शांततामय असावा असा. कयास करता येतो.
सातव्या शतकात अरब इथे आले आणि ‘इस्लाम’ही. नवव्या शतकात ‘कुराणा’चा पर्शियन अनुवाद उपलब्ध झाला. बाराव्या शतकात हेरात (Herat) इथं अफगाणिस्तानमधली पहिली मशीद बांधण्यात आली. पण इस्लामचा प्रभाव वाढत असला तरी ‘पश्तुनवाली’ ही गावपातळीवरची न्यायव्यवस्थाच दैनंदिन जीवनातले निर्णय करत होती. ही व्यवस्था १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत  चांगली कार्यरत होती. १७४७ मध्ये अहमदशाह दुराणी याने ‘अफगाण राज्य’ स्थापन केले  तेव्हाही  म्हणजे इस्लाम येऊन हजार वर्ष झाल्यावरही ‘फतवा’ आणि ‘जिहाद’ फारसे प्रचलित नव्हते.
अब्दुर रहमान खान (१८८० ते १८९१) याने सत्तेच्या केंद्रीकरणासाठी ‘शरिया’ कायदे स्वीकारुन त्यांच्या अंमलबजावणीसाठी उलेमांची नेमणूक केली. यामुळे एका बाजूने इस्लामचं, धार्मिक नेत्यांचं स्थान बळकट झालं हे खरं! पण या लोकांना प्रशासकीय रचनेत सामावून घेतल्याने, व्यवस्थेची पुनर्रचना केल्याने राजसत्तेचा वरचष्मा कायम राहिला. इस्लाम नैतिक अधिष्ठान होते पण राजकीय अधिष्ठान नव्हते. जेव्हा जेव्हा अस्तित्व धोक्यात आले त्या त्या वेळी उठाव करून राजसत्ता बदलण्याचे प्रयत्न झाले, पण धार्मिक नेतृत्वाने सत्ताग्रहण मात्र केले नाही. या काळात राज्यकर्त्यांनी इस्लाम आणि आधुनिकता यांची सांगड घालण्याचे प्रयत्न केले.
या देशाचा इतिहास दुर्दैवाने आक्रमणांचा म्हणून युद्धाचा आहे आणि आपापसातील यादवीचाही आहे . लोकशाहीचा इथला प्रवास साधासरळ नाही तर वळणा वळणाचा आणि खाचखळग्यांचा आहे – अगदी एकोणिसाव्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातही! १८३७ मध्ये ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले. रशिया आणि ग्रेट ब्रिटनच्या ‘ग्रेट गेम’ च्या डावपेचात अफगाणिस्तानचं प्यादं होऊन बसलं. स्थानिक समूहांमधल्या विश्वासाला आणखी तडे गेले ते याच कालावधीत. Peter Hopkirk याचं Great Game हे पुस्तक अफगाणिस्तान समजून घेण्यात मोलाची मदत करतं. अखेर १९१९ मध्ये अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळालं.
अमानुल्ला खान (१९१९ ते १९२९) यांची दशकभराची कारकीर्द हा अफगाणिस्तानमधला महत्वाचा सुधारणावादी कालखंड म्हणावा लागेल. ‘लोया जिरगा’ (याबद्दल अधिक माहिती नंतर घेऊ.) या महासभेने १९२१ मध्ये पहिली राज्यघटना मंजूर केली होती (१९२३ मध्ये दुसरा मसुदा आला); त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे (आणि मोफत) झाले; मुलांच्या आणि मुलींच्या एकत्र शिक्षणाचा - सहशिक्षणाचा कार्यक्रम आखण्यात आला; स्त्रियांनी बुरखा किंवा हिजाब वापरायचा की नाही हा त्या स्त्रीचा व्यक्तिगत निर्णय असेल –तिच्यावर याबाबतीत कोणीही सक्ती करू शकणार नाही – असे अतिशय मूलगामी निर्णय अमानुल्ला खान याने घेतले. अमानुल्ला खान आणि राणी सरय्या यांच्या नेतृत्वाखाली. स्त्रियांना माणूस या नात्याने जगता येईल असे वातावरण तयार झाले. धर्मसत्तेला पडती बाजू घ्यावी लागली  - पण थोडासाच काळ. धार्मिक लोकांना या सा-या सुधारणा म्हणजे स्वधर्मावर आघात आणि परधर्माचे आक्रमण वाटू  लागले (तसे ते आजही वाटते हे विशेष!) १९२९ मध्ये अमानुल्ला खानला देश सोडून जावे लागले आणि परक्या भूमीत तो मृत्यूला सामोरा गेला. (श्रीमती प्रतिभा रानडे लिखित ‘अफगाण डायरी’ मध्ये याबाबतीत सविस्तर माहिती आहे.)
मोहम्मद नदिर खान याने १९२९ मध्ये सत्ता हाती घेतल्यावर सगळ्यात आधी सुधारणांची गती कमी केली. १९३१ मध्ये त्याने नवी राज्यघटना (तिसरी) आणली. हनाफी शरिया (सुन्नीपंथीय) अधिकृतरीत्या धर्म म्हणून स्वीकारला गेला. १९३३ मध्ये काबूलमधल्या एका विद्यार्थ्याने मोहम्मद नदिर खान याची हत्या केली. खानचा मुलगा झहीर शाह वयाच्या १९ व्या वर्षी सत्तेवर आला. १९४६ मध्ये पंतप्रधान शाह महमूद याने मुक्त निवडणूक, मुक्त प्रसारमाध्यम, संसद या सुधारणा जाहीर केल्या. १९६४ मध्ये आणखी एकदा नवी राज्यघटना (चौथी) जाहीर झाली. झहीर शाहने त्या अनुषंगाने राज्यव्यवस्थेत काही बदल केले. संसद द्विस्तरिय केली; त्यात १/३ प्रतिनिधी लोक थेट निवडून देणार; १/३ प्रतिनिधी प्रांतीय मंडळे पाठवणार आणि बाकी १/३ प्रतिनिधी राजा नियुक्त करणार अशी व्यवस्था होती. हे बदल एका अर्थी ‘प्रायोगिक लोकशाहीच्या’ दिशेने टाकलेले पाऊल होते. या प्रक्रियेतून उदयास आलेल्या राजकीय पक्षांनी पुढे अफगाणिस्तानच्या भवितव्याला बरा-वाईट आकार दिला.
१७ जुलै १९७३ रोजी तत्कालीन पंतप्रधान मोहम्मद सरदार दाऊद खान यांनी झहीर शाहविरुद्ध उठाव करून सत्ता हस्तगत केली. हा सत्तापालट रक्तपाताविना झाला. पण आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर ही राजवट पूर्ण अपयशी ठरली. १९७७ ची नवी राज्यघटना (पाचवी) राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकासाला चालना देण्यास कुचकामी ठरल्या. यावेळी राजेशाही संपली होती आणि हा  देश आता होता ‘रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’.
२७ एप्रिल १९७८ रोजी नूर मोहम्मद तराकी, बब्रक करमल आणि अमीन ताहा यांनी संगनमताने दाऊद खानची हत्या केली. यांच्या पक्षाचं नाव: People's Democratic Party of Afghanistan (PDPA). १ मे रोजी तराकी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि पक्षाचा महासचिव झाला. यावेळी हा देश झाला ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’. हे टिकलं एप्रिल १९९२ पर्यंत. दरम्यान सप्टेंबर १९७९ मध्ये तराकीला मारून  हफीझुल्ला अमीन राष्ट्राध्यक्ष झाला.
१९७८ ते १९९२ या काळात रशियाशी आणि पर्यायाने कम्युनिस्ट विचारांशी जवळीक राखणा-या PDPA ने अनेक ‘सुधारणा’ केल्या. स्त्रियांना मतदानाचा अधिकार; त्याचा राजकारणात सहभाग वाढावा यासाठी योग्य ते वातावरण; बळजबरीने केल्या जाणा-या लग्नावर बंदी असे अनेक स्त्री-हिताचे निर्णय कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावातून घेण्यात आले. पण स्त्री-पुरुष समतेचा हा ‘डोस’ धर्मसत्तेच्या पचनी पडणार नव्हताच.
कोणत्याही समाजात फार कमी लोक सुधारणेस उत्सुक असतात; कुणालातरी सुधारणेचे मुद्दे रेटून न्यावे लागतातच. सुधारणा म्हणजे प्रस्थापित हितसंबंधांना धक्का. आपल्या समाजातल्याही कित्येक महनीय व्यक्तींचं जीवन आणि कार्य आपल्याला हेच सांगते. शिवाय कालपरत्वे कोणत्याही समाजाचा सुधारणांचा प्राधान्यक्रम आणि त्या पचवायची ताकद लक्षात घ्यावी लागते.
PDPA ने रशियाकडून अनेक क्षेत्रांत मदत घेतली. राजकीय आणि सामाजिक स्थैर्य तर नव्हतेच. विरोधकांना, विचारवंताना, धार्मिक नेत्यांना, पारंपारिक टोळी प्रमुखांना (ज्यांचा मान मोठा असतो)  कारण नसताना तुरुंगात टाकणे; मारून टाकणे नित्याचे होते. किती लोक त्या काळात उध्वस्त झाले त्याची गणती नाही. आणि हे सारे घडत होते ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ च्या नावे! रशियन तिथं असल्याने बाकी जग निवांत होत! उत्साहाच्या भरात PDPA ने मुस्लिम पुरुषांनी दाढी वाढवायची नाही, स्त्रियांनी ‘चादोर’ घ्यायची नाही अशाही सुधारणांची सक्ती केली. विखुरलेल्या अफगाण समाजाला हजारो वर्ष बांधून ठेवणारी एक गोष्ट होती ती म्हणजे ‘इस्लाम’. अफगाण मातीत आणि परंपरेत रुजलेला आणि फुललेला इस्लाम. कम्युनिस्ट त्याच्यावर आघात करायला लागले. स्वत;च्या प्रजेवर परकीयांच्या मदतीने अनन्वित अत्याचार करणारी राजवट एक ना एक दिवस संपणं अपरिहार्य होत! कम्युनिस्ट विद्यार्थी  संघटनेला  पर्याय म्हणून काबूल विद्यापीठात ‘मुस्लीम युथ ऑर्गनायझेशन’ उदयाला आली. (भविष्यातले मुजाहिद्दीन इथलेच!) इस्लाम आता अफगाणला जोडणारा एकमात्र दुवा राहिला होता. १९७९ मध्ये रशिया मदतीच्या नावाखाली देश गिळंकृत करून बसला. उंटाच्या मानेवरचा तो शेवटचा खडा ठरला.
मग मुजाहिद्दीन आले; ‘इस्लाम खतरे मे है’ ही भावना आली; ‘जिहाद’ ची हाक आली. पाठोपाठ परक्या भूमितून मुस्लीम मदतीला आले आणि अफगाणेतर कडव्या मुस्लिमांच्या हाती नेतृत्व गेलं.
१९८९ मध्ये रशियाने सैन्य माघारी घेतलं पण तोवर या भूमीत शस्त्रात्र ओतली गेली होती. मुजाहिद्दीनना अमेरिकन समर्थन होतं, पण रशियन माघारीनंतर अमेरिकेनेही दुर्लक्ष केलं. पर्यायी राजकीय व्यवस्था निर्माण करण्यात मुजाहिद्दीन पूर्ण अपयशी ठरले. १९९२ मध्ये निर्माण झालं ‘इस्लामिक स्टेट ऑफ अफगाणिस्तान’. पैसा आणि शस्त्र हे नेतृत्वाचे मुख्य निकष ठरू लागले. परकीय मदतीचा ओघ आटला. मग अपहरण, खंडणी, दरोडे, स्त्रियांवर अत्याचार हे रोजचे झाले. अफू उत्पादन  वाढलं; रस्तेही असुरक्षित झाले. वारलॉर्ड आपापसात लढायला लागले.
देशाला पोखरून टाकणारी वारलॉर्ड नावाची कीड समूळ उखडून टाकण्याची घोषणा करत ‘तालिबान’ समोर आले ते ११९४ मध्ये. ‘शरिया’नुसार ‘पवित्र इस्लामिक राज्य’ स्थापन करण्याच्या त्यांच्या घोषणेला पाकिस्तानमधून समर्थन मिळाले. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेले अफगाणी निर्वासित नव्या दमाने सीमारेषा पार करू लागले. हे युवक आणि प्रौढ मुख्यत्वे पश्तुन होते. १९९६ मध्ये तालिबानने काबूल ताब्यात घेतले. यादवी युद्ध संपवून ‘तालिबान’ सत्ताधीश झाले. सुरुवातीला शांतता प्रस्थापित झाल्यासारखं वाटलं. मग इस्लामिक कायदे लागू झाले. अफू लागवड बंद केली. संगीत बंद, चोरी केल्यास हात छाटणार, रेडीओवर स्त्रियांच्या आवाजावर बंदी, त्यांनी शिकायचं नाही, अर्थार्जन करायचं नाही .....
अफगाणी जनतेला इस्लामचं हे भयंकर रूप नवं होतं. व्यक्ती, कुटुंब आणि टोळी यांचा सन्मान त्यांनी आजवर महत्त्वाचा मानला होता. आजवर त्यांचे मुल्ला-मौलवी त्यांच्यातलेच होते आणि ते मुख्यत्वे नैतिक शिक्षणाला जबाबदार होते. राजकीय सत्ता धार्मिक नेत्यांच्या हाती जाऊन काही शतकं मागे जावं लागणं क्लेशदायक होत.
तालिबानसोबत ‘अल-कायदा’ आले. मग अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर हल्ला झाला. अमेरिका लादेनच्या मागे लागली. नोव्हेंबर २००१ मध्ये अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी अफगाणिस्तानवर हल्ला केला. तालिबानचा पराभव झाला. २००१ मध्ये ‘प्रासंगिक सरकार’ अस्तित्वात आलं. २००४ मध्ये नवी राज्यघटना.
आता अफगाणिस्तान आहे ‘इस्लामिक रिपब्लिक’.
रशिया-ब्रिटन ग्रेट गेम; रशिया-अमेरिका शीतयुद्ध; रशियाने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणाची बाकी जगाने घेतलेली “दखल”; आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकट झालेला अरब जगातील इस्लाम; भूक आणि गरीबीला न जुमानणारी यादवी; धर्माला अफू समजून त्याला संपवू पाहणारा कम्युनिस्ट धर्म; सर्वमान्य अशा स्थानिक नेतृत्वाचा अभाव; स्थानिकांमध्ये दूरदृष्टीचा अभाव, किडे-मुंग्यांच्या जीवनापेक्षा स्वस्त झालेलं मानवी जीवन... आता नवं सरकार इस्लाम विरोधी आहे अशी शंकाही निर्माण होता कामा नये. ...... . अफगाणिस्तान ‘इस्लामिक  रिपब्लिक’ च्या अपरिहार्य टोकावर (point of no return) येऊन पोचला.
 क्रमशः

Friday, December 26, 2014

२१६. सपान

साळंला सुट्टी पडली की दादा येतो.
न्हायतर तो तिकडं शेरात पोरांच्या संगट -हातोय.
आई, अण्णा, आज्जी त्याच्याच मागं असत्येत.
लाड करायला.

दादाची माज्यावर लई माया.
माजं तो आईकणार म्हन्जे धापैकी धा.

आज्जी म्हन्ली, ‘’उठा आन्जाक्का”.
" दादा कुठंय?” म्या इचारलं.
“अण्णा गेलेत त्याला आणायला,” आज्जीबाई म्हन्ली.
“ कायबी बोलू नग. राती दादाच्याच कुशीत झोपली व्हती,” म्या बोल्ली.

" दादा, दादू, दाद्या...” म्या बोलावलं. यीना तो.
आई आली. “रडू नकोस. दादा येतोय संध्याकाळी.”
"काल आला की” म्या पुन्ना बोल्ले.
“ स्वप्न पडलं तुला दादा आल्याचं. खोटं असतं ते”, आई म्हन्ली.

खोटं?
मंग हेच सपान.

हेला कसं घालवायचं असतंय?
पुन्यांदा उलिसं झोपून?

* शतशब्दकथा

Friday, December 12, 2014

२१५.भीतीच्या भिंती: भाग २: जिवंत असण्याचा पुरावा

 (नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)
भाग १

‘काबूलला जायचं’ असं ठरल्यावर सगळ्यात आधी खरेदी केली ती दोन पुस्तकांची. एक श्रीमती प्रतिभा रानडे यांचं ‘अफगाण डायरी’ (पूर्वी वाचलं होतं आणि आवडल्यामुळे लक्षात होतं) आणि दुसरं श्री. निळू दामले यांचं ‘अवघड अफगाणिस्तान’. दोन्ही पुस्तकं वाचल्यावर आपण काबूलला चाललोय म्हणजे रम्यनगरीत नाही जात आहोत याची पुनश्च प्रकर्षाने जाणीव झाली होती. या पुस्तकांचा परिणाम म्हणून की काय पण मी एक भली मोठी प्रश्नावली माझ्या ऑफिसला पाठवून दिली होती. राहण्याची व्यवस्था काय; सुरक्षितता कशी असते; रोज ऑफिसला जायला वाहनाची व्यवस्था असणार का; इंटरनेट उपलब्ध आहे का; सेलफोन चालतात का; संवादाची भाषा काय; ड्रेस कोड काही आहे का; सर्वसाधारणपणे अफगाण लोक भारतीयांना स्वीकारतात का; – असे असंख्य प्रश्न मी विचारले होते. ‘तुमच्यापैकी कुणाला तालिबानी हल्ल्याचा दुर्दैवी अनुभव आला आहे का’ असा एक आगाऊ प्रश्नही मी विचारला होता.  

इथं आल्या आल्या लगेच मला एका बंदूकधारी सैनिकाच्या दहशतीची झलक मिळाली आणि त्यात भर पडली जॉर्जसोबत घालवलेल्या तासाभराची. जॉर्ज माझ्या ऑफिसचा मुख्य सुरक्षा अधिकारी. हा निवृत्त सैनिक; युरोपियन देशातला. मी गाडीत बसताक्षणी.  त्याने अगदी शांतपणे मला एकेक सूचना द्यायला सुरुवात केली. 

पहिल्यांदा हातात दिला तो सेलफोन. त्यात आवश्यक ते सगळे नंबर आधीच घालून ठेवले होते. त्यात पुरेसे पैसे होते फोन करायला.

दुसरी वस्तू आली हातात ती थोडी अपेक्षित होती – पण काळजी वाढवणारी होती. 


हा आहे Very High Frequency Radio. मराठीत "वॉकी-टॉकी"! त्याच्या सोबत एक जादा बॅटरी. एक बॅटरी नेहमी चार्जड असायला हवी पूर्णपणे. अनेकदा सेलफोनला रेंज नसते, अशा वेळी संपर्कासाठी हा फोन हमखास उपयोगी पडतो म्हणे. तो कसा वापरायचा याचं प्रशिक्षण मला उद्या दिल जाईल असंही जॉर्ज म्हणाला. ती बॅटरी जड वाटली मला आणि तसं मी बोलूनही दाखवलं. त्यावर ‘ही कायम सोबत घेऊन हिंडायचं’ असा आदेश देऊन  जॉर्जने  माझ्या हाती आणखी एक चीज सोपवली. 

ते होतं बुलेटप्रुफ जाकीट. अत्यंत जड. एका हाताने मला ते पेलता येत नव्हतं. ‘हे जाकीट सदैव, अगदी चोवीस तास हाताशी ठेवायचं’ जॉर्जचा आणखी एक हुकूम. गोळीबार झाला तर या जाकिटामुळे जीव वाचण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ऑफिसात, घरात, प्रवासात सदैव हे जाकीट जवळ पाहिजे. माझा चेहरा पाहून जॉर्ज म्हणाला, “ मी तुला ऑफिसात वापरायला (!)वेगळं जाकीट देतो, पण मीटिंगसाठी इकडून तिकडे जाताना ते तू घेऊन जायचं.” मी फक्त मान डोलावली, काय करणार दुसरं?  त्यानंतर त्याने आणखी एक गोष्ट मला दिली – हेल्मेट.

”झालं? की अजून काही?” मी किंचित धास्तावत विचारलं.

”पासपोर्ट, युएनचं ओळखपत्र आणि एक आंतरराष्ट्रीय तिकीट स्वत: काढता येईल एवढे डॉलर्स सतत जवळ बाळगायचे. तिकिटाचे पैसे यासाठी की कधी आम्ही कुणी सोबत नसू आणि तुला देशाबाहेर पडायला लागलं तर असावेत पैसे जवळ. लक्षात ठेव, कोणत्याही क्षणी बॉम्बहल्ला होऊ शकतो, अशा वेळी किमान या तीन गोष्टी सोबत घेऊनच पळ काढायचा. म्हणून या गोष्टी सतत हाताशी हव्यात. जेवायला तर चाललेय असं म्हणत ऑफिसात पासपोर्ट ठेवून बाहेर पडायचं नाही. आणि हो, अत्यावश्यक वस्तूंनी (कपडे, औषधं वगैरे) भरलेली एक छोटी प्रवासी बॅग सतत जवळ बाळगायची, रोज ऑफिसात पण घेऊन यायची ती ” असं म्हणून त्याने मला त्याची बॅग दाखवली. हा गृहस्थ त्यावेळी फक्त मला घ्यायला विमानतळावर आला होता आणि मला राहण्याच्या जागी सोडून त्याच्या घरी परत जाणार होता. एक ते दीड तासाचा काय तो प्रश्न. पण नाही, शिस्त म्हणजे शिस्त.

“ही कशासाठी?” मी गोधळले होते. 
   
“परिस्थिती अचानक गंभीर होऊ शकते कधीही, तुला सामान आणायला तुझ्या राहत्या जागेत परत जाता येईलच असं नाही. काही वेळा इवॅक्युएशन (स्टाफला देशाबाहेर हलवणं) तातडीने करायला लागतं. तुम्ही जिथं असाल तिथून तुम्हाला उचललं जाईल – म्हणून ही बॅग सोबत ठेवायची.”

जॉर्ज अतिशय शांतपणे मला हे सगळं सांगत होता.   

बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यांचा इशारा मिळाला की त्या क्षणी हे जाकीट चढवायचं, हेल्मेट घालायचं, व्हीएचएफ, सेलफोन आणि कागदपत्र घ्यायची सोबत आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा; हे सगळं करायला वेळ मिळणार तो जास्तीत जास्त तीन मिनिटांचा! ‘आपण युद्धभूमीवर आलो आहोत’ याची एव्हाना मला खात्री पटली होती. 

मग त्याने माझ्या हातात काही कागद सोपवले. सुरक्षाविषयक अनेक सूचना होत्या त्यात – ‘ते सावकाश वाच रात्री, मग उद्या बोलू त्यावर’ असं तो म्हणाला.   

मी जरा हुश्श करून खिडकीतून इकडेतिकडे पाहायला लागले. “ते हिरवं कापड पाहिलंस?” एका इमारतीकडे बोट दाखवून त्याने विचारलं. असं कापड बांधकाम अथवा दुरुस्ती चालू असलेल्या इमारतीभोवती नेहमी दिसतं.  “त्याला छिद्र दिसताहेत ना, ती बंदुकीच्या मा-याने पडलेली आहेत.” जॉर्ज एकामागून एक धक्के देत होता मला. 

कसलीही पाटी नसलेल्या एका पोलादी दरवाजासमोर आमची गाडी थांबली. मग गाडीची शिस्तशीर तपासणी झाली; ओळखपत्रं पाहिली गेली. माझ्याकडे ओळखपत्र नव्हतं, पण माझ्या नावाचं ऑफिसने दिलेलं पत्र जॉर्ज सोबत घेऊन आला होता. मग तसाच दुसरा दरवाजा, पुन्हा सगळी तपासणी. रिसेप्शनवर नोंद केली. मी खोलीत गेले. ‘उद्या सकाळी आठ वाजता तुला घ्यायला गाडी येईल, तयार रहा’ असं सांगून जॉर्ज निघून गेला. 
        
हॉटेल ठीकठाक आहे. मुख्य म्हणजे स्वच्छ आहे. बाहेरचं दृश्य तर एकदम मस्त आहे.



आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वायफाय कनेक्शन आहे. त्यामुळे संपर्क ठेवणं सोपं जाईल. खोलीत टीव्ही आहे – एरवी मी तो फारसा पाहत नाही (माझ्या घरी टीव्ही नाही) – पण आता इथं बातम्या पाहाव्यात आणि जमल्यास काही चित्रपटही. हॉटेलचा माणूस वायफायचा  पासवर्ड द्यायला आला होता   - एकदम म्हणाला 'बारिश..' त्यावेळी बाहेर पाऊस पडायला लागला होता. दुस-या एकाकडून पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडून घ्यायला मला हातवारे करावे लागले - भाषा उपयोगी नाहीच पडली. आता ‘दरी’ शिकायला हवी. 

मी सहज खोलीच्या बाहेर नजर टाकली आणि मला हे दृश्य दिसलं. 


माझ्या समोर दहा फूट अंतरावर संरक्षणाची ही अशी जय्यत तयारी. २४ x ७.

जाताना जॉर्ज मला गृहपाठ देऊन गेला होता. त्या गृहपाठातला एक भाग होता ‘प्रुफ ऑफ लाईफ क्वेश्चन्स’. युद्धक्षेत्रात, संवेदनशील क्षेत्रांत काम करणा-या लोकांसाठी हे प्रश्न वापरले जातात. त्यामागची कल्पना अशी आहे:

समजा ‘क्ष’ या व्यक्तीचं  अपहरण झालं आणि अपहरणकर्ते खंडणी मागताहेत. अशा वेळी तुमच्या ऑफिसला दोन गोष्टींची खात्री करून घ्यायची असते. एक म्हणजे अपहरण ‘क्ष’ या व्यक्तीचंच झालं आहे – अपहरणकर्ते खोटं सांगून, दुस-याच कोणा व्यक्तीला ताब्यात घेऊन ‘क्ष’चं  नाव सांगत  नाहीत ना याची खातरजमा करणे. आणि दुसरं म्हणजे ‘क्ष’ जिवंत आहे, त्याची/तिची हत्त्या झालेली नाही याचीही खात्री करणे. टेलिफोन संवादावरून आवाजाची खात्री करता येईल असं नाही. व्हिडीओ क्लिप्सवर विश्वास ठेवता येत नाही; कारण व्हिडीओ आधीच कधीतरी चित्रित केला असेल आणि त्यानंतर ‘क्ष’ची हत्त्या झाली नसेल असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. मग खात्री कशी करणार? तर या ‘प्रुफ ऑफ लाईफ’ प्रश्नांवरून!

“प्रुफ ऑफ लाईफ” प्रश्न फक्त लिहून देणा-या व्यक्तीलाच माहिती असतात, थोडक्यात तुमचा पासवर्ड व्हेरीफिकेशन म्हणा ना! हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याने/तिने ते दुस-या कुणाला सांगू नयेत अशी अपेक्षा असते, कारण या माहितीचा कोण कधी दुरुपयोग करेल याचा भरवसा नसतो. हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे साधारण सार्वजनिक जीवनात माहिती असलेल्या गोष्टींबाबत असू नयेत असं मार्गदर्शक तत्त्व सांगते. म्हणजे उदाहरणार्थ मी प्रश्न लिहिताना “मी काबूलला कोणत्या वर्षी आले?” किंवा “मी कोणत्या वर्षी पहिली नोकरी स्वीकारली?” किंवा “माझं घर कोणत्या शहरात आहे?”, “माझ्या मुलाचे नाव काय आहे?”  असले प्रश्न लिहायचे नसतात कारण या घटना किंवा परिस्थिती इतर अनेकांना माहिती असू शकते. ही माहिती इतर माध्यमांतून काढता येते. अपहरण ज्या व्यक्तीचे होते, तिचा पुरेपूर अभ्यास अपहरणकर्त्यांनी केलेला असतो हे वारंवार दिसून आले आहे. 

हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं शक्यतो आनंददायक घटनांची असावीत. कारण प्रत्यक्ष जेव्हा अपहरण होते तेव्हा अपहृत व्यक्ती आधीच प्रचंड तणावाखाली असते. अशा वेळी दु:खद प्रसंगाच्या आठवणी शक्यतो काढू नयेत, येऊ नयेत; त्यामुळे मृत्यू, अपघात, नोकरी सुटणे, घटस्फोट अशा मुद्द्यांचा उल्लेख या प्रश्नावलीत करायचा नसतो. प्रतिकूल परिस्थितीत ज्या आठवणी आशा जागी ठेवतील, आनंद देतील, चेह-यावर हसू आणतील, उमेद जागवतील असेच प्रश्न द्यावेत अशी अपेक्षा असते; आणि ज्या परिस्थितीत ही प्रश्नोत्तरं होतील तिचा विचार करता हा सल्ला योग्यच म्हणावा लागेल. 

हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहून देताना मला बराच विचार करावा लागला. एक म्हणजे आपल्या आयुष्यातले अनेक महत्त्वाचे टप्पे सार्वजनिक असतात; ते अनेकांना माहिती असतात. 

दुसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक संदर्भ. म्हणजे उदाहरणार्थ मी “आवडता संगीतकार”  असा प्रश्न आणि त्याचं उत्तर सहजतेने देऊ शकते. पण आनंद मोडक, श्रीधर फडके, ओ पी नय्यर, सचिनदा (बर्मन) अशी काही नावं मी लिहिली; तर माझ्या युरोपियन किंवा अमेरिकन किंवा ब्रिटीश सुरक्षा अधिका-याला (जे अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करतील) ही नावं बरोबर कळतील का? त्यामुळे केवळ माझा सांस्कृतिक संदर्भ लक्षात न घेता समोरच्या माणसात आणि माझ्यात कोणते समान धागे आहेत त्याचा विचार मला करायला लागला. बिकट परिस्थितीत, इथले लोक माझे उच्चार समजू शकतील का, आणि मी त्यांचे उच्चार समजू शकेन का – असा प्रश्न मनात आला. आपल्याकडच्या जागांची नावं, आपल्या लोकांची नावं, आपले सांस्कृतिक संदर्भ आपल्याला जितके सहज वाटतात तितके इतरांना वाटणार नाहीत हे लक्षात घेऊन काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं बदलावी लागली. 

तिसरं म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीत; जगण्या-मरण्याच्या सीमारेषेवर आपल्याला खरंच काय आठवेल याचाही विचार करावा लागला. ज्या गोष्टी आत्ता महत्त्वाच्या वाटतात त्या नेहमी तितक्याच महत्त्वाच्या रहात नाहीत हे लक्षात ठेवून ‘खरोखरचं आनंदाचे क्षण’ लिहावे लागले. तसे खूप क्षण आपल्या आयुष्यात आहेत हे कळून बरं वाटलं. उच्चांरांमध्ये गडबड होऊ नये, उत्तर चुकीचं दिलं असं वाटू नये म्हणून मी सगळं कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिलं.

दुस-या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास जाग आली ती पक्षांच्या किलबिलाटाने. इतक्या विध्वंसातही हा ऐकू येतो आहे याचा त्या क्षणी फार दिलासा वाटला. आणि उत्साहाने मी उठले. 

ऑफिसात पोचल्यावर मी लिहून दिलेला कागद न पाहताच जॉर्जने सीलबंद केला आणि त्याच्या कपाटात ठेवून दिला. मग हसून मला म्हणाला, “ही आपत्कालीन परिस्थितीसाठीची एक व्यवस्था आहे. आजवर मला एकदाही अशा कागदाचा उपयोग करावा लागला नाही अफगाणिस्तानमध्ये. त्यामुळे काळजी करू नकोस उगाच, मात्र काळजी घे! ” 

जॉर्जच्या स्वरांतली भावना ओळखून मी हसले. अखेर आपल्या जिवंत असण्याचा पुरावा फक्त कागदांवर थोडाच असतो? तो तर जगण्यात असतो. आता इथं जे काही असेल ते उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने पाहून घेतलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे असं म्हणत मी पुढच्या कामाला लागले.


क्रमश:

Friday, December 5, 2014

२१४. भीतीच्या भिंती: १

(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. सुरक्षेच्या कारणांमुळे नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत.)

१. एक तास जास्तीचा 

“विमानतळातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला वळायचं, पाच मिनिटं चाललं की ‘पार्किंग बी’ अशी पाटी दिसेल, मी तिथं उभा असेन तू पोचशील तेव्हा” असं जॉर्जने मला लिहीलं होतं. आत्तापर्यंतचे सोपस्कार त्याने सांगितल्यानुसार पार पडले होते – आधी दोन फोटो देऊन आणि पासपोर्ट दाखवून नोंदणी करण्याचा सोपस्कार अपेक्षेपेक्षा फार सहजतेने पार पडला होता. माझा पासपोर्ट पाहून त्या दोनपैकी एका युवकाने “इंडिया?” असं विचारलं होतं. बहुधा ‘एअर इंडिया’च्या विमानाने मी आल्यामुळे हा प्रश्न ‘प्रश्न’ नव्हताच खरं तर!  मी होकारार्थी मान हलवताच त्यानं माझ्याशी थेट हिंदीत बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यातून मी सावरत होते; तोवर माझं सामान अचूक ओळखून सरकत्या बेल्टवरून ते माझ्या ताब्यात दुस-याने दिलं होतं. याला आपलं सामान कसं काय ओळखू आलं – हाही प्रश्न मनात होता माझ्या. कस्टमच्या अधिका-याने माझ्याकडे न पाहताच पासपोर्टवर शिक्का मारून दिला होता. आणि मी बाहेर आले होते. 

मी डावीकडे वळणार तितक्यात एक बंदूकधारी सैनिक समोर दिसला. त्याने समोरच्या बसमध्ये चढण्याची मला खूण केली. पण मला बसने जायचं नव्हतंच! पाच मिनिटं चालत जायला बस कशाला हवी? मी त्याला शांतपणे “पार्किंग बी” असं सांगितलं. त्यावर ठसक्यात “बस” असं तो म्हणाला. ते म्हणताना त्याची नजर इतकी शांत होती की मी घाबरले. मी आणखी काही बोलायच्या आधी तो पुन्हा म्हणाला, “नो डिस्कशन”. आमचा हा प्रेमळ संवाद ऐकत असणारा बसचा चालक समोर आला आणि मला म्हणाला, “चलिये,” आणि मी काही म्हणायच्या आत त्याने माझं सामान बसमध्ये चढवलं देखील. मलाही त्या बसमध्ये चढण्याविना पर्याय नव्हता. 

ही बस नेमकी कुठं घेऊन जाणार मला या विचारात मी पडले.
मग मी चालकाला विचारलं “मुझे तो ‘पार्किंग बी’ जाना था, क्यों नही जाने दिया?”
तो म्हणाला, ”व्हीआयपी है कोई आज! आप चिंता मत करो, मै आपको पार्किंग बी छोड दूंगा”. 

दिल्लीत काही काळ राहून “व्हीआयपी” ही काय चीज आहे हे मला माहिती होतं. मी विचार करायचं सोडून दिलं. 

पाचेक मिनिटांत ईप्सित स्थळी आमची बस पोचली होती. चालकाने सामान काढून दिलं. दुसरा कोणीतरी समोर आला – त्याला सांगितलं, “पार्किंग बी छोड दो इन्हे.” त्याने ट्रॉलीवर माझं सामान तोवर उतरवून घेतलं होतंच. 

“पैसा,” चालक म्हणाला.
बक्षीसी मागतोय तो, हे मला कळलं.
माझ्याकडे डॉलर्स नव्हते. दिल्ली विमानतळावर गडबडीत रुपयांचे डॉलर्स करून घ्यायचे राहिलेच होते. “डॉलर्स नही है मेरे पास” मी स्पष्टीकरण दिलं. हो, उगाच अपेक्षाभंग नको त्याचा व्हायला. 

“इंडियन रुपी चलेगा, चलता है वो यहाँ ”, तो शांतपणे म्हणाला. 
एक नोट त्याच्या हातात ठेवून मी निघाले. खरं तर पैसे देण्याइतकं काही काम त्याने केलं नव्हतं. पण परक्या देशात कंजूसपणा करून मित्रांचे शत्रू करण्याचं मी टाळायला हवं – निदान जॉर्ज भेटेपर्यंत तरी – हे मला कळत होतं. 

‘पार्किंग बी’ मध्ये सामसूम होती. जॉर्ज ‘वाटेल’ असा कुणी माणूस दिसत नव्हता. किंबहुना कुणी माणसं नव्हतीच. दुपारची तीनची वेळ होती – तरी एक क्षण मला भीती वाटली. अनोळखी प्रदेश; दहशतवाद्यांचा प्रदेश; युद्धाचा प्रदेश. “तिथं जायचं काही अडलंय का? एवढा अटटहास का? दुसरी ठिकाणं नाहीत का जगात जायला तुला?” या तिरकस प्रश्नाचा सामना करण्यात मागचे दोन तीन महिने गेले होते माझे.  “या प्रश्नाला काहीही अर्थ नाही कारण सगळं जग आता दहशतवादाचा सामना करतंय” असा माझा त्यावरचा युक्तिवाद एक क्षणभर का होईन डळमळीत झाला. 

पण आपल्या प्रतिक्रिया फार “क्षणिक” असतात, त्या बदलतात हे मला माहिती होतं आजवरच्या अनुभवाने. इथं काम करायला येण्याचा माझा निर्णय भावनिक नव्हता, पर्याय नसण्याच्या अगतिकतेतून नव्हता किंवा कसल्या उद्वेगातूनही नव्हता. ‘एक नवं जग पाहण्याची संधी’ म्हणून मी इथं आले होते. मग या जगाचे ताणेबाणे समजून न घेताच निष्कर्ष काढण्याची घाई कशाला करत होते मी ? मी स्वत:शीच हसले. 

तेवढ्यात मला माझ्या ऑफिसची गाडी दिसली. पण त्या गाडीत कुणीच नव्हतं. पण गाडीच्या मागच्या बाजूला एक माणूस फोनवर बोलताना दिसला. मी त्याला “जॉर्ज?” असं विचारल्यावर गडबडीने त्याने तो फोन बंद केला, दुस-या कुणाला तरी फोन केला, आणि सामान गाडीच्या मागच्या भागात ठेवायला सुरुवात केली. जॉर्ज मला शोधत तिकडे प्रवेशद्वाराशी उभा असणार. म्हणजे हा गाडीचा चालक होता तर! 

ट्रॉलीवर माझं  सामान आणणारा माणूस माझ्याकडे अपेक्षेने पहात होता. त्याच्या हाती पुन्हा एकदा काही पैसे देऊन मी सुटकेचा निश्वास टाकला. 

डोळे मिटले तर नुकताच पाहिलेला बर्फाच्छादित शिखरांचा हिंदुकुश दिसला. अखेर मी इथे पोचले आहे तर! आता हे माझं गाव असणार आहे आणि इथले रस्ते माझे होऊन जाणार आहेत – काही काळ तरी. 

कारण हे आहे काबूल!
**
काबूल!
चार महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी इतकीच मला त्याची ओळख होती.

एक दिवस उगाच ‘काबूलमध्ये अमुक एक काम आहे’ अशी जाहिरात वाचली. अर्ज ऑनलाईन करायचा होता तो केला आणि गंमतीचा अनुभव घेऊन हसत ती विसरून गेले. पुढे यथावकाश मुलाखतीचं आमंत्रण आलं. या आंतरराष्ट्रीय मुलाखतींचं  एक चांगलं असतं. आपल्याकडे किती माहिती आहे यापेक्षा आपलं ज्ञान काय आहे आणि मुख्य म्हणजे दृष्टिकोन काय आहे हे तपासतात ते. त्यामुळे मुलाखत देणं हा दडपणाचा मुद्दा न ठरता आत्मपरीक्षणाची संधी ठरते. मजा आली मला ती मुलाखत देताना. मुलाखत झाल्यावर लोक ‘आपली निवड होणार का नाही’ याचा आडाखा कसा बांधतात याबद्दल मला कुतूहल वाटतं – कारण आपण इतर उमदेवार पाहिलेले नसतात. मी आपली पुढच्या कामांना लागले. 

दोन-तीन आठवडे निवांत गेले. गडबड सुरु झाली ती ‘तुमची निवड झाली आहे’ हे पत्र आल्यावर. एखादी संधी आपल्यासमोर आली तर त्याला काहीतरी अर्थ असतो – त्यामुळे ती विनाकारण नाकारू नये हे माझं मत. शिवाय संस्था युनायटेड नेशन्सच्या संस्थांपैकी एक. त्याच संस्थेच्या दिल्ली ऑफिसबरोबर मी अडीच वर्ष काम करत होते – त्यामुळे संस्थेची विश्वासार्हता हा प्रश्न नव्हता. “सौदीत पासपोर्ट कंपनीला द्यावा लागतो” या बातमीचा बराच पगडा आपल्या लोकांच्या मनावर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मी “युएनमध्ये असं काही नसतं; माझा पासपोर्ट माझ्याकडेच राहील; मला पाहिजे तेव्हा मी परत येऊ शकते” म्हणत होते. हे वाक्य मी पुढच्या दोन महिन्यांत किमान शंभर वेळा उच्चारणार आहे याचा मला अंदाज आलाच. 

‘ही संधी घ्यावी असं वाटतंय’ हे कळल्यावर मी जरा गंभीरपणे माहिती काढायला सुरुवात केली. इंटरनेटवरच्या सगळ्या बातम्या भयावह होत्या – एकही सकारात्मक बातमी नाही. तालिबानी हल्ले, बॉम्बस्फोट, अपहरण आणि मृतांची संख्या. त्यात भर पडली ती अमेरिका २०१४ पर्यंत अफगाणमधून सैन्य माघारी घेणार आणि एप्रिल २०१४ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक असणार या बातम्यांची. २०१४ नंतर देश पुन्हा तालिबानच्या ताब्यात जाणार की काय, अंतर्गत यादवी होणार की काय... अशाच बातम्या.

मग मी एक काम केलं. प्रत्यक्ष काबूलमध्ये कामासाठी एक वर्ष राहून आलेल्या दोन तीन लोकांशी बोलायचं ठरवलं. पत्रकार निळू दामले यांचा नंबर मिळाला, त्यांच्याशी बोलले. “बिनधास्त जा” असं त्यांनी सांगितलं तरी मी काही पत्रकार नाही; त्यामुळे त्यांचा सल्ला जसाच्या तसा स्वीकारण्यात अर्थ नव्हता. शिवाय ‘स्त्रियांसाठी कितपत धोकादायक आहे तिथं’ हे एखादी स्त्रीच जास्त चांगलं सांगू शकेल. म्हणून मग इंडियन इकॉनॉमिक सर्विसच्या अधिकारी मंजुळा यांच्याशी बोलले. त्या २००८ मध्ये एक वर्ष तिथं काम करत होत्या. त्यांनीही “चांगला अनुभव आहे, तुला खूप काही नवं पहायला मिळेल, शिकायला मिळेल” असं प्रोत्साहन दिलं. सध्या अमेरिकेत असलेल्या रेणू यांच्याशी स्काईपवर बोलणं झालं तेव्हा काबूलमधल्या राहायच्या व्यवस्था कोणत्या आहेत, त्यापैकी मी कोणत्या व्यवस्थेचा आग्रह धरावा याबद्दल त्यांनी आवर्जून सांगितलं. सुचिथ या श्रीलंकेच्या गृहस्थांशी एकीने जोड घालून दिली होती; तोही तासभर माझ्याशी बोलला. यातल्या कुणाशीच माझी काहीही ओळख नव्हती – पण ज्या आपुलकीने त्यांनी माझ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली, त्यातून माझ्या लक्षात आलं की काबूलला मी जाण्यापूर्वीच त्या धाग्याने ते माझ्या मदतीस तयार होते. यातला ‘सुचिथ’ तर प्रत्यक्ष काबूलमध्ये होता आणि मी ज्या संस्थेत जाणार तिथं काम करत होता. त्याची पुढे मला खूप मदत झाली. 

पण दरम्यान मी माझ्या मनातले सगळे प्रश्न – विशेषत: सुरक्षेविषयीचे प्रश्न – लिहून पाठवले; आणि संस्थेच्या लोकांकडून त्याचं सविस्तर उत्तरही आलं. कामाबाबत मला काळजी नव्हती, ते आव्हानात्मक असेल तितकं चांगलंच असतं. माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली होती. मग ‘नको जाऊ’ असा आग्रह धरणा-या जवळच्या लोकांचं मतपरिवर्तन करण्याचं कामही पार पडलं. 

मग विसा मिळण्यात ज्या यायच्या त्या अडचणी आल्या. अफगाणमध्ये नोकरीसाठी यायचं तर इथल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक क्रमांक आपल्या देशातील अफगाण दुतावासाला कळवला जातो. तिकीट ऑफिस काढणार असल्याने विसा मिळाला नाही म्हणून प्रवास पुढे ढकलला गेला, तर त्यात माझं आर्थिक नुकसान काहीच नव्हतं म्हणून मी निवांत होते. नउ एप्रिलला मला तो नंबर मिळाला, दहा एप्रिलला मी मुंबईत. तिथल्या एका मराठी स्त्रीच्या (कर्मचारी) सहकार्यामुळे त्याच संध्याकाळी विसा मिळाला.

१३ एप्रिल. दिल्ली विमानातळ. अफगाण स्त्रिया आधुनिक पेहरावात होत्या पण डोकं झाकलेलं होतं त्याचं. पुरुष सूट-टाय-कोट या वेशात होते. म्हणजे अफगाणी लोक काही मागच्या शतकात राहत नाहीत असा दिलासा मिळाला. ते आपापसात बोलत होते; हळू आवाजात, त्यामुळे फार काही ऐकू येत नव्हतं आणि कळतही नव्हतं. बरेच विदेशी लोकही दिसत होते सोबत प्रवास करणारे. विमानतळावर वर्तमानपत्राच्या  कागदात बांधून आणलेले काहीतरी सगळे अफगाण स्त्री-पुरुष आनंदाने खात होते – काय असावं ते? 
काबूलमध्ये प्रवेश करताना हिंदुकुश पर्वताच्या रांगा दिसल्या - त्यावर अजून थोडं बर्फ शिल्लक होतं - हिवाळ्यात काय दृश्य दिसते असेल ना ते! काबूल खूप मोठ शहर दिसतंय  - घर मातीची दिसताहेत - आणि बहुमजली इमारती जवळजवळ नाहीतच. 


एरवी उजाड दिसणारा भाग एकदम हिरव्या तुकड्यांचा दिसला. काय लावतात हे आत्ता उन्हाळ्यात? पाणी कुठून येतं?
प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. यथावकाश या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. 

त्या दिवशी पुणे दिल्ली आणि मग दिल्ली काबूल असा प्रवास करत मी इथं पोचले. इथलं घड्याळ भारतापेक्षा  एक तास मागं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आयुष्यात एक तास जास्तीचा मिळालाय.

क्रमश: