ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, September 7, 2017

२५१. यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग २

पहिला भाग एवढ्या उत्साहाने लिहिल्यानंतर प्रत्यक्ष भाषणाबद्दल सांगण्याजोगं विशेष काही नाही. एका शब्दात सांगायचं तर अपेक्षित .

I mean, come on!  भारताचे पंतप्रधान म्यानमामध्ये येऊन इथल्या भारतीय (आणि भारतीय वंशाच्या) नागरिकांशी जाहीर संवाद साधणार असतील तर अर्थातच ते काय बोलणार याचा एक साचा असतो. थोडा इतिहास, थोडी संस्कृती, थोडा भविष्यवेध, काही सद्भावना, काही नव्या सोयी, काही स्वप्नं आणि काही अपेक्षापूर्तींचे आकडे. अडचणींचा उल्लेख अशा जाहीर सभांमध्ये करायचा नसतो. कारण सभेचा उद्देश एकंदरित सकारात्मक भावना निर्माण करणं असा असतो आणि इतर मुद्दे अनुल्लेखाने मारणं स्वाभाविक असतं. अनेक लोकांनी पंतप्रधान रोहिंज्या (Rohingya) प्रश्नाबद्दल बोलतील किंवा पंतप्रधान दहशतवादाबद्दल बोलतील का असं मला म्हटल्यावर आश्चर्यच वाटलं होतं. एक तर असं म्हणणारे लोक फारच भाबडे असावेत किंवा आंतरराष्ट्रीय संकेतांबद्दल त्यांच्या मनात वेगळी प्रतिमा असावी.

यांगोंच्या सभेत श्री. मोदी म्यानमाविषयी कोणतंही नवं धोरण जाहीर करणार नाहीत, कोणत्याही संवेदनशील प्रश्नाविषयी ते काहीही भूमिका मांडणार नाहीत हे उघड होतं. ती त्यांच्या पदाची जबाबदारी असल्याने त्यांनी काही वेगळं केलं असतं तरच मला नवल वाटलं असतं. धोरणविषयक चर्चा आदल्या दिवशी त्यांनी म्यानमा सरकारशी केली होती. त्यातल्या ज्या गोष्टी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आल्या होत्या, त्याच श्री. मोदी यांनी सांगितल्या. लोकांना जे आधीच माहिती आहे तेच पुरेशा आकर्षकपणे आणि ठामपणे सांगणं हेच या सभेत अपेक्षित होतं. साक्षात पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं याचा लोकांना आनंद असतो. मोदींना दीर्घकालीन प्रशासकीय अनुभव असल्याने सरकारशी बोलायचे मुद्दे आणि जनतेशी बोलायचे मुद्दे यात त्यांनी सरमिसळ केली नाही.

हं, मग काहीच झालं नाही का? तसं नाही, इतर भरपूर गोष्टी घडल्या. नवी माणसं भेटली, नव्या गप्पा झाल्या, आम्ही मिळून वैतागलो, मिळून हसलो. राष्ट्रगीत गाताना आणि वंदे मातरम् घोषणा देताना आम्ही सगळे काहीसे भावूकही झालो. ओळखदेख नसतानाही आम्ही एकमेकांसोबत साडेपाच-सहा तास मजेत होतो. त्या आघाडीवर बरंच काही घडलं. श्री. मोदी पाऊण तास बोलले, त्यांच्या भाषणातले मुद्देही सागंते नंतर.

तर आमंत्रणपत्रिकेतला बारा हजार हा आकडा वाचून मोठी रांग असेल या अपेक्षेने चार –सव्वाचारच्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोचले. प्रवेश करतानाचं हे दृश्य.


पण रांग वगैरे काही नव्हती. सुरक्षा तपासणी झाली पण एकंदर परिसरात काहीच सुरक्षा व्यवस्था नव्हती. रस्त्यात मला नेहमीपेक्षा एकही जास्त पोलीस दिसला नाही – हे नाही म्हटलं तरी जरा विचित्र वाटलं.

स्टेडियमची आसनक्षमताही मी आधीच्या भागात लिहिलं तशी बत्तीस हजार नव्हती तर आठ हजार होती. कार्यक्रमाला पाचेक हजार माणसं आली असतील. म्हणजे बारा हजार, वीस हजार असले क्रमांक आमंत्रणपत्रिकेवर छापणं ही संयोजकांची एक युक्ती होती तर – कारण काही का असेना, पण युक्तीच. चालायचंच.

मोदींबरोबर सेल्फी काढायची लोकांना हौस असणार हे जाणून संयोजकांनी मोदींचे लाईफ साईज कटआउट्स ठेवले होते. लोकांची तिथं गर्दी होती.



तरूण (मुलं-मुली) उत्साहाने स्वयंसेवकाचं काम करत होते. भगवा टी शर्ट, मागच्या बाजूला मोदींचा फोटो अशा वेशात ही मंडळी वावरत होती. काही हिंदी बोलत होते, तर काही फक्त म्यानमा. माझ्या बर्मी भाषेची परीक्षाच घेतली गेली म्हणा ना.

गर्दी असलेल्या कार्यक्रमात स्त्रियांनी एकटं जाणं हा एक अनुभवच असतो. पण माझ्या सुदैवाने माझ्या डावीकडं आणि उजवीकडं दोन स्त्रिया त्यांच्या कुटुंबियांसोबत येऊन बसल्या. मग त्या दोन्ही कुटुंबाशी गप्पा सुरू झाल्या. एकजण फार्मा कंपनीत वितरण विभागात काम करतात आणि गेली दहा वर्ष यांगोंमध्ये राहतात. हे कुटुंब दिल्लीतून इथं आलंय. मग दिल्ली मेट्रो, दिल्ली की सर्दी (आणि गर्मी), केजरीवाल, दिल्लीमध्ये स्त्रियांना येणारे अनुभव अशा आमच्या गप्पा होत राहिल्या. हे कुटुंब वर्ष-दोन वर्षातून एकदा भारतात जातं.

दुसऱ्या ताई आणि त्यांचे पती मूळ गुजरातचे. इथं व्यवसायानिमित्त आले. ताई लग्न होऊन इथं आल्या ते वीस वर्षांपूर्वी. काका इथंच जन्मले आणि वाढले. त्यांचं भारतात कुणी नाही. माझ्या मागे मंडलेहून आलेला एक पुरूषांचा ग्रुप बसला होता. ते हिंदीत बोलत होते. माझ्या पुढच्या रांगेत तामिळ बोलणारं पण म्यानमा नागरिक असलेलं भारतीय वंशाचं कुटुंब बसलं होतं. मी तामिळ आणि गुजराती बोलायची थोडी हौस भागवून घेतली. थोडं पल्याड एक पंजाबी कुटुंब होतं – मुलं आणि आई यांचा संवाद पंजाबीत चालला होता. एकूण मिनी इंडिया समोर होतं.

खालच्या मजल्यावर व्हीआयपी आणि वरच्या मजल्यावर अन्य नागरिक अशी व्यवस्था होती. आत व्यासपीठ होतं आणि बाजूला दोन मोठे स्क्रीन्स होते.


त्या दोन्ही स्क्रीन्सवर मोदी सरकारची तीन वर्षांची कामगिरी ही व्हिडिओ क्लिप दाखवत होते. यात कदम कदम बढाये जा या गीताच्या ओळींवर केलेलं संस्करण काही मला आवडलं नाही. पहिल्या पाच-दहा वेळा लोकांनी जरा नीट पाहिली ती क्लिप. पण नंतर मात्र थट्टामस्करी सुरू झाली. व्हिडिओतल्या एटीएममध्ये दिसणाऱ्या नोटा पाहून अरे, इस एटीएममें पैसा है असं कुणीतरी म्हणालं आणि आम्ही सगळे नकळत हसलो. जीएसटी, स्वच्छ भारत, काळा पैसा, वेगवेगळ्या सरकारी योजना .... असे अनेक विषय. जाऊ द्या. आपल्या सरकारची आणि पर्यायाने आपल्याच देशाची थट्टा ऐकणंं काही सुखद नसतं.

लोकांचं मोदींवर प्रेम आहे, लोकांच्या मोदी सरकारकडून अपेक्षा आहेत हे खरं आहे. पण म्हणून आधी जणू काही अंधारयुग होतं आणि सगळं काही चांगलं फक्त मे २०१४ नंतर घडलं आहे या मोदी सरकारच्या (आणि खासकरून त्यांच्या समर्थकांच्या) बोलण्याला लोक वैतागलेही आहेत. माझ्या शेजारचे काका म्हणालेच, इनको तो अभी लोगोंका प्यार मालूम है, लोगोंका अंगार देखेंगे तो पता चलेगा’.  तिथं जमलेले कुणीच मोदी-विरोधक, डावे, नक्षलवादी, समाजवादी वगैरे नव्हते – सगळे 'भारतीय' किंवा 'भारताचे हितचिंतक' होते. खरं तर त्यांच्या सतत किंचाळणाऱ्या समर्थकांच्या गराड्यातून बाहेर पडून मोदी सरकारने टीकाकारांचेही आवाज ऐकले पाहिजेत. सरकारच्या धोरणावर टीका म्हणजे देशद्रोह या बालिश मानसिकतेतून मोदी सरकार जितक्या लवकर बाहेर पडेल तितकं भलं होईल. ते एक असोच.

तर आमच्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. जुनं यांगों कसं होतं याच्या मस्त आठवणी लोकांनी मला सांगितल्या. जगभरात अनेक जागा मरत चालल्या आहेत, त्यात यांगोंचा नंबर पहिल्या पन्नासात नाही, पण शंभरात नक्कीच लागेल. भारताच्या दूतावासाबद्दल (म्हणजे मुख्यत्वे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल), भारतीय नागरिक संघटनेतल्या राजकारणाबद्दल अनेक गोष्टी कळल्या. गॉसिप अनेकदा प्राथमिक माहिती मिळवण्याचा चांगला स्रोत असतो, ही माहिती अर्थातच वेगळ्या पद्धतीने तपासून घेतल्याविना त्यावर विश्वास ठेवता येत नाही.

पुढचे तीन तास दूतावासाच्या बौध्दिक दिवाळखोरीचं दर्शन झालं. चार-पाच हजार माणसं तीन-साडेतीन तास आपल्यासमोर आहेत. केवढा सदुपयोग करता आला असता त्या वेळेचा. पण तो सगळा वेळ गेला वेगवेगळ्या भाषांमधल्या गाण्यांवरचे नाच पाहण्यात आणि डॉल्बी ऐकण्यात. छोट्या मुला-मुलींची नृत्यं चांगली होती आणि त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा कार्यक्रमांत त्यांचं सादरीकरण आवश्यकही असतं. सुफी गायनही मला आवडलं. पण प्रोफेशनल नर्तकांचा ग्रुप आणून, त्यांच्या चकाकत्या कपड्यांवर झगझगते दिवे सोडून, त्यांचे बॉलीवुड चित्रपटांतले रिमिक्स आणि बीभत्स नाच पाहणं ही शिक्षाच होती. गणेशोत्सवाच्या काळात मी पुण्यात नव्हते – त्याची कसर त्या तीन तासांत भरून निघाली. मी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या, नृत्य-संगीताच्या विरोधात नाही – मी कोणत्याही प्रकारच्या सक्तीच्या आणि अतिरेकाच्या विरोधात आहे. आणखी एक असो.

दोन निवेदक सूत्रसंचालन करत होते, ते बर्मी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये होतं. मध्येच पुरूष निवेदकाला लोकांना जागं करायची हुक्की आली. ‘What will we do when Modiji arrives?’ – त्याने विचारलं. त्यावर भयाण शांतता पसरली. मग तोच गृहस्थ म्हणाला, ‘We will welcome him by chanting Mo… di,  Mo …di’. दोन चार लोक त्याच्यापाठीमागं ओरडले पण एकूण त्याचा शाळकरी मुलांना शिस्त लावण्याचा अविर्भाव लोकांना आवडला नव्हता हे उघड होतं. आम्ही मग नव्या नाचाकडं वळलो. :-)

पंतप्रधान साडेसहाच्या सुमारास येतील अशी अपेक्षा होती. पण पावणेसात वाजले तरी नाचगाणी चालूच होती म्हणून मी इंटरनेट पाहिलं तर पाच वाजून वीस मिनिटं या वेळात पंतप्रधान बगानच्या आनंदमंदिरात होते अशी माहिती मिळाली. पंतप्रधान आठ वाजेपर्यंत काही येत नाहीत, आल्यावर ते एक तासभर तरी बोलणारच आणि बाहेर पडायला साडेनऊ होणारच हे लक्षात आलं. पिण्याचं पाणी आत आणायची परवानगी नव्हती. पण जागा सोडायचीही परवानगी नव्हती. त्यामुळे वैताग वाढला होता.

अखेर साडेसातला नाच थांबले. मग पंधरा एक मिनिटं एकजण स्टेज झाडून काढत होता, त्यावरही विनोद झाले. 'पंतप्रधान आल्यावर मोबाईल बंद करायला' सांगितलं गेलं. पण पुढं पंतप्रधान आल्यावर व्हीआयपी कक्षातल्या अनेकांचे मोबाईल झगमगले आणि मग सामान्य नागरिकांनीही मोबाईलवर भरपूर फोटो काढले.



पंतप्रधान काय बोलले ते एव्हाना तुम्ही वाचलं असेल. पण दोन गोष्टी – पंतप्रधानाच्या चाळीस-पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणात ते जेमतेम दहा वाक्यं इंग्रजीत बोलले असतील, बाकी हिंदी भाषेत. यांगो रिजनचे मुख्यंमंत्री स्क्रीनवर दिसत होते – त्यांना काय समजलं असेल देव जाणे. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश अशा अ-हिंदी पट्ट्यातले नागरिक मोठ्या संख्येने म्यानमात आहेत. त्यांनाही कितपत काय समजलं असेल देव जाणे. बाकी नाच-गाण्यांवर इतका खर्च केला त्याऐवजी थोडा खर्च अनुवादावर केला असता तर?

पंतप्रधान त्यांच्या चिरपरिचित शैलीत बोलले. राजकीय नेत्यांना लोकांची नाडी अचूक माहिती असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. उदाहरणार्थ म्यानमामें भारत के एक राजदूत है, लेकिन आप सबके रूप में अनेकों राष्ट्रदूत है (आशय हा, शब्द कदाचित माझ्याकडून बदलले गेले असतील) म्हटल्यावर लोकांनी जाम खूष होऊन जोरदार टाळ्या वाजवल्या. ते सगळे लोक भले राष्ट्रहित साधत असतील किंवा नसतील, पण साक्षात पंतप्रधानांनी असा गौरव केलेला कुणाला नको असेल? इरावती, भगवान गौतम बुद्ध, विपश्यना, गोयंका गुरूजी... हे सगळे नस पकडणारे अचूक उल्लेख योग्य वेळी झाले. मिलबाँटकर खाते है तो आनंद दुगुना होता है’  आणि मदद करते समय हम पासपोर्टका रंग नहीं देखते है ही वाक्यं खरंच चांगली होती. सुषमा स्वराज यांचं त्यांनी कौतुक केलं,  त्यालाही टाळ्या मिळाल्या. दूतावास तुमच्यासाठी चोवीस तास खुला आहे हे ऐकल्यावर मात्र लोक खवट हसले. लोकांचा इथल्या दूतावासाचा अनुभव फारच वाईट दिसतो आहे.

अशा रीतीने सभा संपली. ठीकठाक होती सभा. बाहेर पाणी आणि खाद्यपदार्थ मिळवताना लोकांनी त्यांचं भारतीय मूळ कायम असल्याचं सिद्ध केलं – इतकी गर्दी केली होती आणि धक्काबुक्की चालू होती, की विचारता सोय नाही. बाहेर पडताना पाण्याच्या बाटल्या परिसरात फेकून देत लोक पुढं जात होते. तेही असोच.

मस्त पाऊस कोसळत होता. मी शहराच्या अनोळखी भागात गर्दीत एकटी होते. मग एका म्यानमा पोलिसाच्या मदतीने मी योग्य रस्त्याला लागले. नंतर यांगोंमध्ये रहात असलेल्या एका मुंबईच्या मुलीने दिलेल्या लिफ्टमुळे मी निदान रात्री अकरा वाजता तरी घरी पोचू शकले.

अवांतर - यांगोंमध्ये भारतीय पंतप्रधानांची भारतीय नागरिकांसाठी सभा होते यांचं आपल्याला कौतुक वाटतं. याच सहजतेने बिहारचे मुख्यमंत्री मुंबईतल्या बिहारी नागरिकांसाठी किंवा केरळचे मुख्यमंत्री कलकत्त्यातल्या केरळी नागरिकांसाठी सभा घेऊ शकतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बंगळुरमधल्या मराठी नागरिकांसाठी सभा घेऊ शकतील .... तर भारतीय लोकशाही योग्य दिशेने चालली आहे असं म्हणता येईल. .... 

समाप्त

Tuesday, September 5, 2017

२५०. यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग १

जून २०१६ मध्ये मी यांगोंला आले. तेव्हापासून दोन वेळा इथल्या भारतीय दूतावासात जाणं झालं. २०१६ चा स्वातंत्र्यदिन समारंभ आणि २०१७ चा प्रजासत्ताक दिन समारंभ या निमित्ताने जाणं झालं होतं. बाकी तसा माझा दूतावासाशी काही संबंध येत नाही. दूतावासाला फेसबुकवर लाईक केलं होतं, त्यामुळे घडामोडी कळत राहतात.

ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात कधीतरी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्यानमा भेटीवर येत आहेत आणि यांगोंमध्ये ते जनतेशी संवाद साधतील असं फेसबुकवर कळलं. अधिक माहितीसाठी  दूतावासाशी संपर्क साधावा असंही एक आवाहन जाहीर झालं. मग मी दूतावासाशी संपर्क साधला.

ऑगस्टच्या अखेरीस पंतप्रधानांच्या भेटीची तारीख जाहीर झाली. ६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांगोंमधल्या Thuwunna Indoor Stadium (तुवन्ना स्टेडियम) मध्ये जनतेशी संवाद साधतील असं जाहीर झालं. या स्टेडियमची आसनक्षमता बत्तीस हजार आहे (Economic Times च्या पाच सप्टेंबरमधल्या बातमीनुसार मात्र ही क्षमता आठ हजार आहे.) आणि एरवी या स्टेडियममध्येयुवा क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालतं. इथं फुटबॉलचे सामने होतात, ऍथलेटिक्सच्या स्पर्धा होतात. २०१३ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेतले फुटबॉल सामने इथं झाले होते. स्टेडियम अद्ययावत आहे असं ऐकून होते. म्यानमामध्ये फुटबॉल सामन्यांना स्त्रिया हजेरी लावत नाहीत, त्यामुळे माझंही तिथं अद्याप जाणं झालं नव्हतं.

१ सप्टेंबर रोजी दूतावासाकडून आमंत्रण पत्रिका आली. 


प्रत्येक व्यक्तीला एक आमंत्रण क्रमांक दिला होता. गंमतीची गोष्ट अशी की दूतावासाकडं माझे दोन इमेल पत्ते होते – पर्यायी पत्ता त्यांनीच मागितला होता, त्यामुळे दोन पत्ते होते. मला या दोन्ही पत्त्यांवर आमंत्रणं आली आणि दोन्ही ठिकाणी वेगळे आमंत्रण क्रमांक होते. एक क्रमांक होता १२००० + तर दुसरा होता २३,००० +. इतके लोक भाषण ऐकायला खरंच येणार होते की नंबर दहा हजारपासून द्यायला सुरूवात केली आहे – असा एक प्रश्न मनात आला. पण गर्दी असण्याची शक्यता भरपूर आहे कारण यांगोंमध्ये भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे म्यानमा नागरिक मोठ्या संख्येने आहेत.

पंतप्रधानांचं भाषण मी अलीकडं फारसं ऐकत नाही. शिवाय या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचं मी समर्थन करत नाही. वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला मी इमेल करून माझी विरोधी मतं कळवलेली आहेत. (त्या विरोधी मतांना पंतप्रधान कार्यालय काही दाद देत नाही हा भाग वेगळा!) हे ज्यांना माहिती आहे त्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी पंतप्रधानांचं भाषण ऐकायला चालले आहे याबद्दल आश्चर्य वाटत होतं. माझी भूमिका स्पष्ट आहे (होती आणि राहिलही). मी सध्या यांगोंमध्ये राहते आहे. भारतीय पंतप्रधानांचा यांगोंमध्ये जाहीर कार्यक्रम आहे. मी त्याला जात आहे कारण ते आपल्या देशाचे लोकनियुक्त पंतप्रधान आहेत. अन्य कोणत्याही पक्षाचे पंतप्रधान असते आणि त्यांच्या निर्णयांना माझा कितीही विरोध असला असता तरीसुद्धा मी भाषण ऐकायला गेलेच असते आणि जाईनही. आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण एक आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे.

अरे वा, मोदी साहेबांना मानलं पाहिजे. चीनचा धोका लक्षात घेऊन म्यानमाला भेट देण्याची दूरदृष्टी दाखवणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ना ते असे गौरवोद्गार दोन-तीन लोकांनी काढल्यावर मी चकित झाले. मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना हे पहिल्यांदाच घडतं आहे असं वाटतं. (सोशल मीडिया झिंदाबाद किंवा जनतेची विस्मरणशक्ती झिंदाबाद!) पण भारत आणि म्यानमा यांच्यात गेली अनेक वर्ष सातत्याने स्टेट विजिट्स होत आहेत. 

विद्यमान पंतप्रधानांची ही काही पहिली म्यानमा भेट नाही, स्टेट विजिट मात्र पहिली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये आसिआन (ASEAN- Association of South-East Nations)  आणि अन्य बैठकांच्या (ASEAN Summit and Related Summits) निमित्ताने श्री. मोदी म्यानमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नेपिटॉ (Nay Pyi Taw) या राजधानीच्या शहरात सुमारे तीनशे भारतीय नागरिकांशी संवादही साधला होता. किंबहुना म्यानमाला भेट देणारे मोदी काही पहिले भारतीय पंतप्रधान नाहीत, ते पाचवे पंतप्रधान आहेत. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी म्यानमाला भेट दिली होती. मे २०१२ मध्येही डॉ. सिंह म्यानमात आले होते. उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी २००९ मध्ये आले होते तर राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्च २००६ मध्ये तीन दिवसांच्या म्यानमा दौऱ्यावर आले होते.

श्री. राजीव गांधी १९९८७ मध्ये बर्मात (बर्माचं म्यानमा असं नामांतरण १९८९ मध्ये झालं.) येऊन गेले. तत्पूर्वी श्रीमती इंदिरा गांधी जून १९६८ आणि मार्च १९६९ अशा दोनवेळा बर्मामध्ये येऊन गेल्या आहेत. त्याच्याही आधी श्री. लालबहादुर शास्त्री १९६५ मध्ये आले होते तर श्री. नेहरू १९५४ मध्ये आले होते.

फेब्रुवारी २०१३ मध्ये लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाने म्यानमाला भेट दिली होती. श्रीमती सुषमा स्वराज २०१७ मध्ये आल्या होत्या तर श्री अजित डोवल २०१५ मध्ये आले होते. श्रीमती निर्मला सीतारामनही येऊन गेल्या आहेत. अशा भेटींची मोठी यादी देता येईल.

म्यानमा (बर्मा) नेत्यांच्याही अनेक भारतभेटी झाल्या आहेत. जुलै २०१७ मध्ये म्यानमाचे लष्करप्रमुख मी आँग लाय (Min Aung Hlaing) आठ दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. म्यानमाच्या परराष्ट्रमंत्री आणि स्टेट कौन्सेलर आँग सान सू ची (Aung San Suu Kyi) ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. ऑगस्ट २०१६ मध्ये म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष ठिन च्यो (Htin Kyaw) भारतात येऊन गेले. लष्करप्रमुख तान् श्वे (Than Shwe) (तान हा शब्द चुकीचा आहे खरं तर – Tha चा उच्चार देवनागरीत कसा करायचा ते मला माहिती नाही) हे २००४ मध्ये आणि जुलै २०१० मध्ये भारतात आले होते. ऑक्टोबर २०११ आणि डिसेंबर २०१२ मध्ये म्यानमा राष्ट्राध्यक्ष तै सै (Thein Sein) भारतभेटीवर आले होते. १९८० मध्ये ने विन भारतात येऊन गेले.

साधारणपणे प्रत्येक स्टेट विजिटमध्ये दोन-तीन करार होतात असं दिसतं. उदाहरणार्थ डॉ. सिंह यांच्या २०१२ च्या भेटीत बारा द्विपक्षीय करारांनर सह्या झाल्या. म्यानमा आणि भारत यांच्यात आजवर किती करार झाले हे शोधायला लागेल.

१९८७ ते २०१२ या कालखंडात फारशा भेटी झाल्या नाहीत हे खरं, पण त्याला ऐतिहासिक कारणं आहेत. म्यानमामध्ये १९६२ मध्ये लष्करी उठाव झाला होता आणि त्यानंतर थेट २०१६ मध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं (निवडणूक नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली) हे आपल्याला माहिती असेलच. लोकशाही मार्गाने निवडून न आलेल्या सरकारशी जवळीक निर्माण न करण्याचं भारत सरकारचं धोरण त्या काळात होतं असं वाटतं. लष्करी दडपशाहीमुळे जगाने या काळात बर्मा-म्यानमाला वाळीत टाकलं होतं हे विसरता कामा नये. याचा पुरेपूर फायदा चीनने घेतला. आणि हे लक्षात घेऊन की काय पण १९९० मध्ये भारताच्या धोरणात बदल होऊन म्यानमामधल्या लष्करी सरकारशी भारत सरकारने संपर्क वाढवला.

भारत-म्यानमा संबंधांवर काही लिहिण्याचा मोह टाळून मी परत पंतप्रधानांच्या भाषणाकडं येते. J
पंतप्रधानांचा म्यानमा दौरा अडीच दिवसांचा आहे. त्यात नेपिटॉमध्ये म्यानमा सरकारबरोबर अधिकृत बैठका, बगान परिसरात आनंद मंदिराला भेट (२०१६ च्या भूकंपानंतर या मंदिराच्या पुनरूज्जीवनाचं काम Archeological Survey of India करत आहे) आणि मग यांगोला आगमन. यांगो शहरात श्वेडगो पगोडा, बोज्या आँग सान म्युझियम आणि संध्याकाळी नागरिकांशी संवाद असा कार्यक्रम आहे.

दरम्यान दूतावासाकडू उद्याच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर सूचना आल्या आहेत. त्यानुसार दुपारी साडेतीनला प्रवेशद्वार उघडेल, खाण्या-पिण्याचे पदार्थ, कॅमेरा वगैरे गोष्टी आणायला परवानगी नाही (पाणीही नाही), ओळखपत्र आणि दूतावासाचं आमंत्रणपत्र सोबत आणावं .. वगैरे अकरा सूचना आहेत. साडेसहाला नागरिकांना प्रवेश बंद केला जाईल आणि सात वाजता पंतप्रधानांचं भाषण सुरू होईल असं दिसतं आहे.

दूतावासाकडून आमंत्रण आलेल्या सर्व व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाकडून इमेल पाठवण्यात आली. हे पत्र मात्र मला एकाच इमेल पत्त्यावर आलं J
From:   
Narendra Modi <newsletter@narendramodi.in> | Add to Address book |This is not spam
  
To:   -------------------
...........
Subject:   Namaste from Narendra Modi!
Date:   Mon, 04 Sep 2017 17:07:23 IST


           Note:   To help protect your privacy, images from this message have been blocked.View images | What is this?



Dear Savita .......Ji,
 It is with great delight and enthusiasm that I begin my Myanmar visit from 5th September 2017. This two-day visit is my first bilateral visit to Myanmar, a valued neighbour and a close friend of India’s.
My visit to Myanmar includes programmes in the historic city of Bagan and Yangon.
On the evening 6th September, I will be addressing the Indian community in Yangon, where I look forward to seeing you.
We take immense pride in our diaspora, which has made India proud on the global stage. The Indian diaspora in Myanmar has brought India and Myanmar a lot closer in the past decades.
 Do write to me on a specially created open forum on the Narendra Modi Mobile App with your thoughts and ideas. I would refer to some of the ideas received during my speech at the community programme.
 See you in Yangon on the 6th!
 Yours,
 Narendra Modi

मी नरेंद्र मोदी अॅपवर भारतात शिकणा-या म्यानमा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने विशेष शिष्यवृत्ती जाहीर कराव्यात असं सुचवलं. यातून दोन देशातल्या नव्या पिढ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील असं मला वाटतं. अशी योजना अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे मला माहिती आहे आणि त्यातून अफगाण-भारत संबंध स्थिरावायला मदत होते असं मला अफगाणिस्तानमध्ये आलेल्या अनुभवांवरून वाटतं.

Sir, we need to declare special scholarships for Myanmar students studying in India. It will help to build bridges between the young generations of both the countries. In addition to this Myanmar needs a good pool of trained Civil Servants, which will help strengthening democracy. (via NMApp)


माझ्याकडून तयारी सगळी झाली आहे. आता सहा सप्टेंबरची वाट पाहते आहे. :-)

Monday, May 15, 2017

२४९. पोलीस चौकीत दीड तास


रेल्वे स्थानकात एक तास, राणीच्या बागेत एक तास छापाचे निबंध आपल्याला लहानपणी अनेकदा लिहावे लागायचे. आता काही माझ्यावर तशी सक्ती नाही, पण तरी मागच्या महिन्यातल्या या अनुभवाला हेच शीर्षक सुचलं. 😊
तर झालं असं की आठवड्यातून किमान एक तरी प्रवास स्थानिक बसने करायचा असं एक ठरवलेलं आहे, त्यानुसार त्या शनिवारी बसने प्रवास केला. गरजेपुरते सुट्टे पैसे कुर्त्याच्या खिशात ठेवले होते ते पुरले. चार ठिकाणची कामं उरकून उगाच अर्धा तास डेक्कन बस स्थानकावर रेंगाळले आणि घरी परत आले. थोडा वेळ झोपले. मग मुंबईच्या एका मैत्रिणीचा फोन आल्यावर तिच्याशी तासभर गप्पा मारल्या. रात्री नऊ वाजता दूध आणायला म्हणून पैशांचं पाकिट सॅकमधून काढायला गेले. तेव्हा लक्षात आलं की पाकिट मारलं गेलं आहे.
पाकिटात पॅन कार्ड, दोन बँकांची डेबिट कार्ड्स, वाहन चालवण्याचा परवाना आणि चारेक हजार रूपये होते. सुदैवाने पासपोर्ट आणि मोबाईल सॅकच्या वेगळ्या कप्प्यात असल्याने ते वाचले. ज्या चार ठिकाणी दिवसभरात गेले होते, तिथं चौकशी केली. पाकिट कुठंही राहिलं नव्हतं. दिवसभरात चार वेळा बसने गेले होते, त्यातल्या नेमक्या कोणत्या बसमध्ये पाकिट मारलं गेलं हे सांगता येत नव्हतं. दोन्ही बँकांच्या हॉटलाईनला फोन करून डेबिट कार्ड बंद करण्याचं काम केलं. एका बँकेत जुनं डेबिट कार्ड हरवलं असल्यास पोलिसांकडं केलेल्या तक्रारीची प्रत जोडणं आवश्यक असतं. शिवाय पॅन कार्डही चोरीला गेलं होतं. त्यामुळे पोलीस चौकीत जाणं गरजेचं होतं. पण तोवर दहा वाजले होते. आता यावेळी पोलिसांना त्रास देण्याइतपत काही महत्त्वाचं नव्हतं. शेजा-यांनी खर्चासाठी लगेच रोख हजार रूपये आणून दिले. पुण्यात गोतावळा असल्याने रोख रक्कम मिळायची मला काही अडचण नव्हती. चोरांच्या हातसफाईला, त्यांच्या कौशल्याला दाद देत मग मी निवांत बसले.
दुस-या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी मी आमच्या परिसरातल्या पोलीस चौकीत गेले. चौकीत जाण्याची वेळ दहा वर्षांनी आल्याने थोडी शोधाशोध करावी लागली. पण दुकानदारांनी व्यवस्थित खूण सांगितल्याने मी चौकीत पोचले.
सकाळचे दहा वाजले होते. चौकी उघडी होती (चोवीस तास उघडी असते का ते माहिती नाही!) आणि बाहेरच्या बाकड्यांवर एकही माणूस नव्हता. तक्रार नोंदवायचं काम लगेच होईल म्हणून मी खूष झाले. पण माझा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण चौकीत कुणीच नव्हतं. मी दारावर टकटक केली, कुणी आहे का चौकीत असं मोठ्याने विचारलं... पण चौकीत कुणी नव्हतंच तर मला उत्तर देणार कोण?
पोलीस चौकीचं नाव मी खोडलं आहे.

चहा प्यायला पोलीस जवळच कुठंतरी गेले असतील म्हणून मी बाकड्यावर बसले. चौकीच्या आजुबाजूने लोक येत-जात होते, पण चौकीत पोलीस नसण्याचं दृश्य त्यांचं लक्ष काही वेधून घेत नव्हतं. कदाचित हे रोजचं असेल, किंवा पोलीस चौकीकडं जास्त पाहायचं नाही अशी लोकांनी स्वत:ला सवय लावून घेतली असेल.
तेवढ्यात मोटरसायकलवर एक मुलगा आणि एक बाई आल्या. ते दोघं आपापसात तेलुगु भाषेत बोलत होते. मग मुलगा निघून गेला आणि त्या बाई माझ्याशेजारी येऊन बसल्या. आधी मी हिंदीत बोलायला लागले पण त्या बाईंनी मराठीत संवादाला सुरूवात केली. कितीतरी पिढ्या आधीपासून त्यांचं कुटुंब नगर जिल्ह्यात राहतं आहे. आंध्रात ना गाव, ना शेती, ना नातलग – फक्त भाषा तेवढी टिकवून ठेवली आहे असं त्या म्हणाल्या.
त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये विद्यार्थी भाडेकरू आहेत आणि ते रात्री-बेरात्री कसा दंगा करतात, मुलींच्या ओरडण्याचे आवाज कसे येतात असं त्या सांगत होत्या. घरमालकाबद्दल तक्रार नोंदवायला त्या चौकीत आल्या होत्या. मी कशासाठी चौकीत आले आहे ते मीही त्यांना सांगितलं. मग आमचा पुण्याची बसव्यवस्था यावर एक छोटा परिसंवाद झाला.
मला चौकीत येऊन एव्हाना अर्धा तास झाला होता. पोलिसांचा काहीही पत्ता नव्हता. मी मोबाईलवर चौकीचा फोटो काढला. तेवढ्यात त्या बाईंचा मुलगा काम झालं असेल असं समजून त्यांना घ्यायला आला. पोलीस नाहीत म्हणून तोही वैतागला. मी फोटो काढलाय असं समजल्यावर मला म्हणाला, टाका तो फोटो फेसबुकवर. समजू द्या सगळ्यांना पोलिसांचा गैरकारभार. मुलाच्या आईने त्याला दटावलं आणि ती मला म्हणाली, पहिलं तुमचं काम होऊ द्या. मग काय फोटो टाकायचाय तो टाका. उगं फोटोमुळं तुम्हाला पोलिसांनी लटकवून ठेवायला नको. मी हसले.
एव्हाना मला प्रश्न पडला होता की एखाद्या गंभीर परिस्थितीत (खून, दरोडा, दंगल... इत्यादी) इथं चौकीत कुणीच नसेल तर जागरूक नागरिकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? कदाचित चौकीत न येता, शंभर नंबरवर फोन करून माहिती द्यावी हीच अपेक्षा असेल. तातडी नसलेल्या कामांसाठीच माझ्यासारखे लोक चौकीत येत असतील.
मग मला आठवलं की माझ्याकडं पोलीस स्थानकाचा नंबर आहे. पोलीस चौकी आणि पोलीस स्थानक फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत. मग मी स्थानकाला फोन लावला. अहो, डोंगरे साहेब तिकडंच यायला निघालेत, येतील बघा दोन मिनिटांत असं उत्तर एका पोलिसमामांकडून मिळालं.
मग मी तक्रार नोंदवायला आलेल्या बाईंशी आणखी पंधरा मिनिटं गप्पा मारल्या आणि डोंगरे साहेब आले नाहीत हे सांगायला परत एकदा स्थानकात फोन लावला. आता तिथल्या एका मावशींनी फोन घेतला. मी त्यांना परत एकदा आम्ही कसे मागचा तासभर वाट पाहतोय आणि चौकीत कुणीही नाही ते सांगितलं. आले नाहीत का डोंगरे साहेब अजून? पाठवते हं मी त्यांना, असं त्या म्हणाल्या. म्हणजे डोंगरे साहेब कुठं आहेत याचा शोध घेत होती तर मंडळी अजूनही.
दहा मिनिटांनी एक मोटरसायकल दारात थांबली. चौकटीचा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेली दोन माणसं उतरली. मला वाटलं आले डोंगरे साहेब. पण त्यातल्या एकाने मला हातानेच बसायची खूण केली, साहेब येताहेत पाच मिनिटांत असं सांगितलं.
दहा मिनिटांनी एकदाचे डोंगरे साहेब अवतरले. ते जागेवर बसताच मी चौकीच्या दारात जाऊन उभी राहिले. आज पूजा कुणी केली आहे का?” असं साहेबांनी विचारलं. त्यावर एकाने मी पूजा करूनच चहा प्यायला बाहेर पडलो, असं सांगितलं. डोंगरे साहेबांचं समाधान झालं. मग त्यांनी मला मानेनेच आत येण्याची खूण केली.
शनि शिंगणापूरला घरांना कुलूप नसतं असं ऐकलं आहे मी, तुमच्या चौकीने आज तो अनुभव दिलाया माझ्या पहिल्या वाक्यावर डोंगरे साहेबांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मलाही अर्थात शनि शिंगणापूरबद्दल बोलायचं नव्हतं. काय तक्रार आहे या त्यांच्या प्रश्नावर मी बसच्या प्रवासात माझं पाकिट मारलं गेलं (पोलिसांना हरवलं शब्द हवा असतो, मारलं गेलं किंवा चोरीला गेलं हे शब्द नको असतात) असं सांगितलं. त्यावर त्यांचा पहिला पोलिसी खाक्या दाखवणारा प्रश्न होता ते डेक्कनला हरवलं असेल तर आम्ही कसा काय तपास करणार?’
मीही तितक्याच शांतपणे त्यांना म्हटलं, कागदपत्रं पुन्हा मिळवायची (डुप्लिकेट) तर संबंधित कार्यालयांना पोलिसांकडं तक्रार केल्याचा पुरावा मला द्यावा लागेल. म्हणून माझी तक्रार तेवढी लिहून घ्या आणि मला त्याची प्रत द्या. बाकी तुम्ही तपास करावा अशी माझी अपेक्षा नाही. मग साहेबांनी समोरच्या पोलिसाला खूण केली. मी हरवलेल्या कागदपत्रांचे नंबर्स लिहून नेले होते, त्यामुळे आमच्यात फारसा संवाद होण्याची गरज नव्हती.
मग मी तेलुगु बोलणा-या मराठी बाई आणि डोंगरे साहेबांचा संवाद ऐकत होते. साहेबांनी इमारतीचं नाव विचारलं, मालकाचं नाव विचारलं आणि एका पोलिसाला त्यात लक्ष घालायला सांगितलं. त्या पोलिसाने परत एकदा तीच माहिती विचारली आणि मी मालकाला फोन करतो म्हणाला. लेखी तक्रार वगैरे काही नाही. या बाईंनी तक्रार केल्याचा कसलाही पुरावा नाही.
मग एक आजोबा, एक आजी आणि त्यांची नात आली. या आजोबांना पोलीस चौकीचा पूर्वानुभव असणार. कारण ते दोन पानी अर्ज घेऊन आले होते. त्यांचीही तक्रार शेजारच्या घरात राहणा-या भाडेकरू मुलांच्या दंग्याबद्दलच होती.
एक पानी निवेदन लिहून झाल्यावर त्या पोलिसाने मला डोंगरे साहेबांची सही घेण्याची खूण केली. डोंगरे साहेब माझ्या अर्जावर सही करत असताना पंचविशीतली एक मुलगी-स्त्री दारात उभी राहिली. माझा अर्ज लिहून मोकळं झालेल्या पोलिसाने काय?’ असं तिला विचारलं. ती म्हणाली, मिसिंगची तक्रार नोंदवायची आहे.’ ‘काय मिसिंग आहे?’ पोलिसाने विचारलं. ती मुलगी म्हणाली, नवरा.
आणि मग काहीच झालं नाही. डोंगरे साहेब त्या आजोबांचा अर्ज वाचत होते. माझा अर्ज लिहून देणारा पोलीस काहीतरी लिहित होता. तेलुगु बोलणा-या बाईंची तक्रार पाहतो म्हणणारा पोलीस आणि आणखी एक पोलीस मोबाईलवर काहीतरी करत होते. एखाद्या चित्रपटातला प्रसंग पदड्यावर थांबून राहावा, कुणीतरी पॉझचं बटन दाबलेलं असावं असं मला वाटलं. मी आळीपाळीने त्या सगळ्यांकडं पाहिलं. कुणाच्याही चेह-यावर काहीही भाव नव्हते.
दारात चप्पल घालताना (हो, चप्पल बाहेर काढून चौकीत जावं लागतं, तशी सूचना तिथं लिहिलेली आहे) मी त्या मुलीला म्हटलं, जा तुम्ही आत, खुर्ची आहे एक मोकळी. त्यावर ती म्हणाली, नको, त्यांनी बोलावल्याशिवाय आत गेलं तर ते चिडतात.
मी गोंधळले. नेमकं काय झालंय हे तिला विचारलं. मला समजलं ते असं :तिचा प्रेमविवाह नव-याच्या बहिणींना मान्य नाही. काल सकाळी नवरा बहिणीकडं जातो असं सांगून घराबाहेर पडला तो रात्री घरी आलाच नाही. ही आज सकाळी नव-याच्या बहिणीकडं गेली तर तो इकडं आलाच नाही असं त्या बहिणीने सांगितलं.
तुझ्या सोबत कुणी नाहीये का? घरचे, मित्र-मैत्रिणी वगैरे कुणी असं मी विचारलं. तिने सांगितलं की प्रेमविवाह केल्याने घरचे म्हणतात की आता तुझं तू काय ते निस्तर. आम्ही काही पोलिसांकडं येणार नाही.
मला काय करावं ते कळेना. ती पुढं आणखी म्हणाली की, मागच्या आठवड्यात माझ्या     नव-याने मी त्याला मारहाण करते अशी पोलिसांत तक्रार केली आहे. आता त्याच्या जीवाला काही झालं तर ठपका माझ्यावरच येईल. हे ती इतक्या भावशून्यतेने सांगत होती की ती तिची परिस्थिती नसून एखाद्या कथा-कादंबरीतला प्रसंग असावा असं मला वाटलं.
नव-याने तक्रार कुठं केली होती?’ हा प्रश्न विचारतानाच त्याचं उत्तर मला कळलं – ती तक्रार याच चौकीत केली होती. म्हणजे या मुलीची या चौकीत येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. कदाचित तिच्या आणि पोलिसांच्याही शांतपणामागे ते एक कारण असावं.
मी त्या मुलीला स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आणि पोलिसांशी संपर्क असणा-या एका कार्यकर्तीचा फोन नंबर दिला. काही अडचण आल्यास या संघटनेला फोन कर, त्या तुला मदत करतील असं मी तिला सांगितलं. मी तिथून निघाले. पण अडचणीत सापडलेल्या त्या मुलीला आपण काही मदत केली नाही याची रुखरुख मला वाटत राहिली.
दुस-या दिवशी त्या संघटनेच्या कार्यकर्तीकडं असा काही फोन आला होता का मदतीसाठी याची चौकशी केली असता नकारात्मक उत्तर मिळालं. त्या मुलीने का नसेल फोन केला? तिला मदतीची गरज होती का नव्हती ? आपणच तिथून थेट फोन लावून त्या मुलीचा आणि कार्यकर्तीचा संपर्क घडवून आणायला हवा होता का? पण त्या मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या निर्णयात ढवळाढवळ करण्याचा मला काही अधिकार नव्हता. आणि त्या मुलीची पोलिसांकडून अधिक तत्पर सेवा मिळवण्याची धडपड नसताना मी तिच्या वतीने पोलिसांशी भांडण्याचाही मला काही अधिकार नव्हता.
नंतर एका मित्राला ही सगळी घटना सांगितली असता तो म्हणाला, त्या दोघांचेही वकील त्यांना पुरावा तयार करायला सांगत असतील, त्यामुळे ती मुलगी कदाचित अनेकदा पोलीस चौकीत आली असेल. त्या मुलीची आणि पोलिसांची(ही) प्रतिक्रिया पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.
सव्वा तास उघड्या पण पोलीस नसलेल्या चौकीतल्या बाकड्यावर बसून राहणं, माझ्यासमोर पोलीस चौकीत तक्रारी घेऊन आलेले ते दोन अर्जदार, लेखी तक्रार न घेता पोलिसांनी बोळवण केलेल्या त्या तेलुगु बोलणा-या मराठी बाई, दीडेक तास पोलीस चौकी उघडी ठेवून गैरहजर असणारे पोलीस आणि त्याबद्दल काहीही करू न शकण्याची आपली हतबलता, पोलिसांचा मख्खपणाचा खाक्या, तक्रार अर्जांची यांत्रिकता, चौकीत पूजा करणारे पोलीस, ...........
पोलीससेवा, सामाजिक वास्तव, लोकांची मानसिकता, आपला आदर्शवादी भाबडेपणा .... याबद्दल बरंच काही कळून गेलं त्या दीड तासात.