ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, September 12, 2016

२४२. ‘धागे अरब जगाचे’: गुंतागुंतीच्या जगाची ओळख (पुस्तक परिचय)


मी अफगाणिस्तानमध्ये असताना शिया-सुन्नी, वहाबी-सलाफी, इराण-सौदी अरेबिया ही द्वन्दवं जगात आहेत याचा जाणीव ठळक झाली होती. त्यानंतर इस्लाम आणि अरब जगाबद्दल कुतूहल वाढलं होतं. बरेच प्रश्नही पडत होते. अरब जगाबद्दल मला दोनच गोष्टी माहिती होत्या – इथलं तेल आणि इथला कडवा इस्लाम.

अरब जगातल्या बहुसंख्य देशांनी अफगाणिस्तानमधल्या तालिबान राजवटीला मान्यता दिली नव्हती हे मला आश्चर्यजनक वाटलं होतं. यामागे नेमकं काय कारण असेल? शिया आणि सुन्नी हे दोन्ही इस्लामचे पंथ आहेत, मग त्यांच्यात भांडणाचा मुद्दा तरी काय आहे? इस्त्रायलला आपण (भारत) पाठिंबा देतो खरा, पण ते सारखे हल्ले का करतात पॅलेस्टाईन जनतेवर? अरब देशांचे आणि अमेरिकेचे संबंध कसे आहेत? त्यांचा नेमका काय इतिहास आहे? तेल सापडायच्या आधी कसं होतं जगणं अरब देशांचं? या देशांमध्ये राजेशाही कशी काय टिकली इतकी वर्ष? ट्युनिशियामध्ये, इजिप्तमध्ये क्रांतीनंतर इतक्या लवकर का भ्रमनिरास झाला तिथल्या जनतेचा?

अरब जगाबद्दल हे असे कितीतरी प्रश्न. या प्रश्नांची उत्तर शोधायची तर भरपूर वाचायला हवं. त्यासाठी मुळात आधी काय वाचायचं ते समजायला हवं. सगळी नुसती गुंतागुंत होती.

विशाखा पाटील यांनी लिहिलेलं धागे अरब जगाचे हे पुस्तक वाचलं आणि वरच्या ब-याचशा प्रश्नांची प्राथमिक उत्तरं मिळाली. काही नवे प्रश्नही पडले – हे त्या पुस्तकाचं यश म्हणता येईल. पुस्तक साध्या-सोप्या भाषेत आपल्याला माहिती देतं आणि पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे.

पुस्तकाचा प्रारंभ होतो २००८ मधल्या दमास्कस (सिरिया) इथल्या अरब संघाच्या बैठकीच्या वर्णनाने.  वेगवेगळे अरब देश; त्यांचे नेते; त्यांचे घडोघडी बदलणारे परस्परसंबंध; अमेरिका-ब्रिटन-रशिया-संयुक्त राष्ट्रसंघ आणि मुख्य म्हणजे इस्रायल – अशी अनेक वळणं घेत निवेदन पुढं जातं. विचारांचा गुंता वाढत जातो. सध्याची तिथली परिस्थिती समजते आहे असं वाटायला लागतं. सतरा अरब देश आणि त्यांचे आपापसात तितकेच गुंतागुंतीचे व्यवहार. एका क्षणी गळ्यात गळे घालणारे कधी एकमेकांचं तोंड पाहायचं नाकारतील, इतकंच नाही तर एकमेकांविरूद्ध उभे ठाकतील याचा भरवसा नाही. आणि पुन्हा कधी एकत्र येतील तेही सांगता येत नाही.

ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांचा इतिहास एकमेकांशी जोडलेला आहे. अब्राहम हा या तिघांचाही पुराणपुरूष. पण पुढं रस्ते बदलले. या बदलाचा फटका अरब जगाने आधी इतरांना दिला पण त्याची झळ त्यांनाही भोगावी लागली. ज्यू आणि इस्लाम धर्मांच्या इतिहासाची रंजक माहिती या पुस्तकात मला वाचायला मिळाली. त्यामुळे शिया-सुन्नी यांच्यातला संघर्ष, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष कळायला बरीच मदत झाली. इस्रायलच्या राष्ट्रवादाबद्दल एके काळी मला असलेला आदरयुक्त दरारा संपत आलाच होता. या पुस्तकामुळे इस्रायलची युद्धखोर बाजूही मला चांगलीच कळली (तो लेखिकेचा हेतू आहे असं मी म्हणणार नाही). ज्यू समाजाला जे भोगावं लागलं त्याबद्दल सहानुभूती नक्की आहे, पण इस्रायलच्या सर्व कृत्यांचं आंधळं समर्थन मात्र नाही. असो. हे विषयांतर झालं, त्यामुळे थांबते.

अरब देशांचं भौगोलिक स्थान आणि अर्थातचं तेलामुळे आलेलं महत्त्व यांचा सविस्तर ऊहापोह पुस्तकात आहे.

पुस्तकाचा पट इतका मोठा आहे की मला आणखी एकदा हे पुस्तक वाचावं लागणार हे नक्की.

पुस्तकात अनेकदा भूतकाळ- वर्तमानकाळ – भविष्यकाळ यांचा सांधा जोडला गेलाय, त्यामुळे माझा गोंधळ झाला. उदाहरणार्थ पान ३०-३१ वर इसवी सन ६८० मधल्या करबला लढाईचा इतिहास चालू असताना मध्येच पान ३१ वर एका परिच्छेदात १९७९ मध्ये इराणमध्ये क्रांती घडवून आणलेल्या अयातुल्ला खोमैनींचा उल्लेख मला नीटसा समजला नाही.

पुस्तकाच्या अखेरीस शब्दकोष दिला आहे तसाच नामकोष पण असता तर मदत झाली असती. पुस्तकात अनेक नावं असल्याने कुणाचा कोण, शत्रू की मित्र, ज्यू की मुस्लिम, शिया की सुन्नी हे चटकन लक्षात येत नाही. मला काही नावांसाठी मागची पानं पाहावी लागली. पुढच्या आवृत्तीत नावांचा कोष अल्प माहितीसह जरूर द्यावा.

अरब देशातल्या या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतावर काय झाला, होतो आणि होईल याविषयी या पुस्तकाने उत्सुकता जागी केली आहे. धागे अरब जगाचे हे पुस्तक एकदा तरी वाचावं आणि  संग्रही ठेवावं असं आहे इतकं नक्की.


धागे अरब जगाचे: विशाखा पाटील

राजहंस प्रकाशन

किंमत:  रूपये ४००/-मुखपृष्ठ प्रकाशचित्र राजहंस प्रकाशनच्या संकेतस्थळावरून साभार


Wednesday, June 29, 2016

२४१. बँकॉक:धावती भेट ४: सुवर्णमयी वट

साधारण अर्ध्या तासाचा प्रवास झाल्यावर मी महाराज धक्क्यावर उतरले. इकडेतिकडे पाहतापाहता अचानक मुख्य रस्त्यावर आले. इथं प्रश्न आला – डावीकडे वळावं का उजवीकडेएका टूरिस्ट वाटणा-या गटाच्या मागे चालायला लागले. दहा मिनिटं चालल्यावर एका दुकानात मला ग्रॅन्ड पॅलेसला  जायचं आहे असं सांगितल्यावर एका थाई आजींनी माझ्या पाठीवर हात फिरवून, मला उलट्या दिशेला वळायला लावून बरोबर रस्ता दाखवला. दहा मिनिटं चालल्यावर मला ग्रॅन्ड पॅलेसचं पहिलं दर्शन झालं. 

सुरक्षा अधिका-यांनी तपासणी करून आत सोडलं. प्रवेश करताना दिसलेली दृश्यं मग एका ठिकाणी ५०० Baht  प्रवेशशुल्क दिलं आणि पुढं सरकले. 

हा राजवाडा १७८२ मध्ये बांधला गेला आणि सुमारे १५० वर्ष या जागेतून राज्यकारभार झाला. तिथं खरं तर टूर गाईडचीही सशुल्क सोय आहे. पण इंग्रजी गाईडसाठी मला दोनेक तास थांबावं लागलं असतं. म्हणून मग मी एकटीच भटकले. अशा ऐतिहासिक ठिकाणी काहीही माहिती नसताना भटकणं निरर्थक असतं हे पुन्हा एकदा लक्षात आलं. गौतम बुद्धाचं जीवन आणि तत्त्वज्ञान याविषयी थोडी माहिती आहे. पण बौद्ध धर्मातल्या लोककथांचा अभ्यास नसताना काहीही समजणं शक्य नव्हतं. मी फक्त अचंबित होऊन गोष्टी पहात राहिले. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधान काही होत नव्हतं.

इथली काही प्रकाशचित्रं. कंबोडियातल्या अंकोरवटया प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती इथं आहे.


ज्या अनामिक कलाकारांनी हे निर्माण केलं असेल, त्यांचं कौतुक करायला माझ्याकडं शब्द नाहीत. पण त्याचबरोबर सर्वसंगपरित्याग करणा-या गौतम बुद्धाला इथं इतकं सोन्याने झळाळून टाकलंय की काही विचारायची सोय नाही.  

बाहेर पडल्यावर मागे वळून पाहताना दिसलेलं हे दृश्य. 

            

मी प्रवेश केला होता तो मुख्य प्रवेशद्वारातून, पण बाहेर पडले ते दुस-याच प्रवेशद्वारातून. मग रस्ता चुकून अर्धा एक तास भटकत राहिले. इंग्रजी बोलणारा एक टुकटुक चालक भेटला आणि मग मी पोचले ती वट फो मध्ये. इथं आराम करणा-या, कुशीवर पहुडलेल्या बुद्धाची भव्य मूर्ती आहे. भव्य म्हणजे किती भव्य४६ मीटर लांबीची, सोन्याच्या मुलाम्याने झळकणारी बुद्धमूर्ती अतिशय देखणी आहे. प्रसन्न वाटलं ती पाहताना. बुद्धाचे कुरळे केस पाठीमागून असे दिसतात.आपण मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालतो, त्याच पद्धतीने इथं लोक बुद्धमूर्तीला प्रदक्षिणा घालत होते. भिंतीलगत हारीने मांडलेली पात्रं होती.

काही लोक या प्रत्येक पात्रात नाणं टाकत होते. त्यामागेही काही श्रद्धा असतील, पण मला माहिती नाहीत.

या मंदिराच्या परिसरातली अन्य प्रकाशचित्रं.

या देशात पाहण्याजोगं इतकं काही आहे, की कदाचित एक महिनाही अपुरा ठरेल. मी फारशा गोष्टी पाहिल्या नाहीत, मोजून चार ठिकाणं पाहिली. पण त्यातून थाईलँडच्या समृद्ध इतिहासाची झलक दिसली. (शोषितांच्या इतिहासाची झलक कधीच राजरोसपणे समोर येत नाही, ती मुद्दाम शोधावी लागते - पण असो. हे विषयांतर झालं.)

आता मुख्य म्हणजे थाईलँंडबद्दल भरपूर वाचलं पाहिजे. कदाचित अशीच अचानक पुन्हा संधी मिळाली इकडं यायची, तर त्यावेळी थाईलँड समजून घेण्यासाठी मी अधिक लायक असेन याची मी तयारी करत राहिलं पाहिेजे अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे.

समाप्त

Friday, June 24, 2016

२४०. बँकॉक:धावती भेट ३: जलयात्रा

एखाद्या ठिकाणी -मग ते अगदी आपल्या देशात का असेना – एक दोन दिवस फिरायचं तर फारसं काही कळत नाही. दिसतात अनेक गोष्टी, पण त्यांचा अर्थ कसा लावायचा ते समजत नाही. गोंधळ वाढतो.


बँकॉकमध्ये एक दिवस भटकल्यावर मी काहीशी गोंधळले होते. सभोवताली सगळं शिस्तीत आणि शांततेत चाललं होतं. मॉल्समधल्या गर्दीत अनेक स्थानिक लोकही दिसत होते. रस्त्यांवरच्या छोट्या दुकानांतही भरपूर गर्दी होती. स्काय ट्रेनमध्ये गर्दी असूनही धक्काबुक्की नव्हती. सुरक्षा रक्षक अनेक ठिकाणी लक्ष ठेऊन होते, पण ते आक्रमक नव्हते. या अशा सामान्य वातावरणामुळे माझा गोंधळ आणखीच वाढला होता.

कारण वरवर शांत दिसणा-या या देशात प्रत्यक्षात लष्कराचं राज्य चालू आहे. या देशासाठी लष्करी सत्ता तशी नवी नाही. १९३२ पासून बारा वेळा लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. मे २०१४ पासून लष्कर देश चालवतोय. लष्कराच्या विरोधात काही बोलायला अर्थातच बंदी आहे. फेसबुकवर लष्करी राजवटीवर टीका केली म्हणून अगदी अलीकडे म्हणजे एप्रिल २०१६ मध्ये १० नागरिकांना अटक झाली होती. राजकीय कार्यक्रम करायला बंदी आहे.
भवताली जणू सगळं काही आलबेल आहे असं दाखवत जगण्याचा सामान्य माणसांना किती त्रास होत असेल याची कल्पना आहे. सुंदर थाईलँडच्या चेह-यामागची परिस्थिती माझ्यासारख्या टूरिस्ट लोकांना कळण अवघड आहे हेच खरं.
सकाळी बाहेर पडताना हॉटेलच्या दोन कर्मचा-यांमध्ये मी कोणता मार्ग घ्यावा यावर भरपूर चर्चा झाली. एकाच्या मते मी जमिनीखालचा रेल्वेमार्ग आणि मग टुकटुक असा प्रवास करावा. तर दुस-याचा सल्ला होता स्काय ट्रेन आणि जलमार्ग असा. मी अर्थातच दुसरा मार्ग स्वीकारला. 
सयाम स्थानकात मार्ग बदलून मी दुसरी स्काय ट्रेन घेतली आणि सफान तास्किन (Saphan Taskin) या स्थानकावर उतरले. स्थानकाच्या नावाचा नेमका अर्थ काय आहे माहिती नाही. स्थानकाच्या बाहेर येताच जेटी आणि प्रवाशांची गर्दी दिसली.

Chao Phraya   ही इथली नदी. इथून बससारख्या नियमित बोटी सुटतात. एका दिवसाचं तिकीट १५० Baht - तुम्ही दिवसभर हव्या तेवढ्या फे-या मारू शकता.  २१ किलोमीटरच्या मार्गावर ३४ ठिकाणी बोट थांबते.

तिकीट काढून बोटीत बसले.  मला फक्ता दोन ठिकाणी जायचं असल्याने ४०  Baht मोजून मी एकमार्गी तिकिट घेतलं.  सवयीने कॅमेरा बाहेर काढला तेंव्हा लक्षात आलं की काल रात्री कॅमे-याची बॅटरी चार्ज करायला ठेवली होती, ती तशीच खोलीत राहिली आहे. दिवसभरात मग मोबाईलवर फोटो काढले - पण एकंदर फोटो कमीच काढले गेले.

नदीच्या तीरावरच्या या जुन्या आणि नव्या इमारती.

नदीच्या एका तीरावरून दुस-या तीरावर बोटीने जाता येते. बँकॉक शहरात या नदीवर तेरा पूल आहेत. पुलांना राम ३, राम ६, राम ८ अशी नावं आहेत. इथल्या चक्री वंशाच्या राजघराण्याने राम हे नाव घेतले होते. सध्याचे थाईलँडचे राजे सुमारे ७० वर्षांचे असून ते राम IX आहेत.


मला दिसलेला हा कुठलातरी एक राम पूल.


बोटस्थानक जवळ आल्यावर बोटीत स्थानकाच्या नावाची उद्घोषणा होत होती. प्रत्येक बोट स्थानकाच्या जवळ पाहण्याजोगं काय आहे त्याची माहिती सांगितली जात होती. थाई, इंग्रजी आणि अन्य एका भाषेत (मला ती भाषा ओळखू आली नाही) ही माहिती सांगितली जाती होती. जाणा-या आणि परत येणा-या बोटींसाठी वेगवेगळी अशा दोन जेटी प्रत्येक बोट स्थानकात होत्या.


बोटींचा वेग विलक्षण होता. नदीतून बोटी आडव्याही जात होत्या - एका तीरावरून दुस-या तीरावर जाणा-या. अशा बोटींत मुख्यत्वे स्थानिक लोक असतात.

मालवाहू बोटीही मोठ्या संख्येने दिसल्या.


एकंदर जलवाहतूक हा या शहरातला एक चांगला कार्यक्षम पर्याय आहे तर.  मजा आली.

पुढं कधी संधी मिळाली, तर बँकॉकमधल्या नदीबाजाराला भेट द्यायला मला आवडेल हे या निमित्ताने माझ्या लक्षात आलं.

क्रमश:

Friday, June 17, 2016

२३९. बँकॉक: धावती भेट: २.: पारंपरिक थाई घर

आता मी चालले होते ती एक 'पारंपरिक थाई घर' पाहायला. एखादी पारंपरिक गोष्ट मुद्दाम जतन करून ठेवावी लागते म्हणजे तिचं अस्तित्व त्या विशिष्ट समाजातून नाहीसं झालं आहे असा एक सरळ निष्कर्ष निघतो – जो नेहमीच खरा असतो असं नाही. ही पारंपारिक गोष्ट (मूल्य असेल, कर्मकांड असेल, उत्सव असेल...) तिची उपयुक्तता नाहीशी झाल्याने नष्ट झाली? की आर्थिक-सामाजिक-राजकीय रेट्यामुळे नष्ट झाली याचा अंदाज घेण्यातही एक वेगळी मजा असते हे मात्र खरं. 
कोणत्याही ठिकाणच्या पारंपरिक ठिकाणांना भेट देताना माझ्या मनात अनेकदा एक द्वन्द्व असतं. परंपरा चांगल्या आणि वाईट दोन्ही असतात हे मान्य केलं तरी त्या परंपरा न पाळणा-या माणसांना त्यांचं चांगलं-वाइटपण ठरवता येतं का हा एक प्रश्न उरतो. माणसाचं शोषण करणा-या परंपरा, रूढी, कर्मकांड वाईट असतात याविषयी सर्वसाधारणपणे दुमत नसावं. दुस-या समाजाच्या – देशाच्या परंपरा कौतुकाने पाहायला जाताना त्या आपल्याला नेमक्या समजतील का याचा विचार करावा लागतो. ही परंपरा स्थानिक माणसानं जतन करण्याऐवजी त्या देशात आलेल्या विदेशी व्यक्तीने जतन केली असेल तर गोंधळ आणखीच वाढतो.
असो. तर मी येऊन पोचले Jim Thompson House Museum ला.


 इथं १५० Baht (थाई चलन) प्रवेशशुल्क होतं. (शंभर भारतीय रूपये म्हणजे ५२ किंवा ५३ Baht ). प्रवेशद्वारात एक छोटं मंदिर दिसलं.


बहुसंख्या थाई घरांमध्ये आणि व्यावसायिक इमारतींमध्ये पुढच्या अंगणात असं मंदिर असतं. मी सवयीने मंदिर असा शब्द वापरला असला तरी प्रत्यक्षात हे Spirit House  आहे. नऊ प्रकारचे Guardian spirit असतात आणि ते घराचं रक्षण करतात अशी लोकांची श्रद्धा आहे. 

इथल्या बहुसंख्य कर्मचारी स्त्रिया होत्या आणि त्या उत्तम इंग्रजी बोलत होत्या. प्रवेश घेताना मार्गदर्शक (टूर गाईड) भाषा निवडायला स्थानिक भाषा, आंग्ल, फ्रेंच, जर्मन असे बरेच पर्याय उपलब्ध होते. प्रवेश घेणा-या प्रत्येक व्यक्तीला निवडलेल्या भाषेनुसार गटवार वेळ दिला जात होता. एका गटात साधारण आठ-दहा लोक होते. घरात काहीही नेण्याची अगदी कॅमेरा आणि मोबाईलही नेण्याची परवानगी नव्हती. सामान ठेवण्यासाठी कुलुपबंद कप्प्यांची (लॉकर्स) उत्तम व्यवस्था होती. अर्धा तास घराच्या अंतर्भागात फिरून आल्यावर परिसराचे फोटो काढायला परवानगी होती. एकंदर अनुभव व्यावसायिक कार्यक्षमतेचा होता.

Jim Thompson हे अमेरिकन वास्तुरचनाकार (architect). दुस-या महायुद्धात त्यांचा सहभाग होता. महायुद्ध संपल्यावर ते बँकॉकला आले आणि थाईलँडच्या प्रेमात पडले. पुढं २५ वर्ष ते बँकॉकमध्येच राहिले. त्यांचा सिल्कचा मोठा व्यवसाय होता. थाईलँडमधल्या सिल्क व्यवसायाला आणि एकंदरच उद्योगजगताला उर्जितावस्था आणण्यात जिम यांचे योगदान मोलाचे होते. १९६७ मध्ये ते मलेशियातून गूढ रीत्या नाहीसे झाले, त्यांचा मृतदेहदेखील सापडला नाही.

हे गृह संग्रहालय म्हणजे खरं तर सहा वेगवेगळी घरं आहेत. देशातल्या सहा वेगवेगळ्या ठिकाणची घरं जिम यांनी विकत घेतली. ही घरं सागवानी लाकडाची आहेत. ती त्या त्या जागेवर सुटी केली आणि बँकॉकमध्ये आणून पुन्हा उभी केली. त्यामुळे एकाच जागी सहा स्थापत्य परंपरांचा संगम इथं पाहायला मिळतो.

बँकॉकमध्ये पावसाळ्यात हमखास पूर येतो. त्यामुळे घरं थेट जमिनीवर न बांधता लाकडी खांबांच्या आधारावर बांधायची पद्धत होती. छपरं लाल कौलाची होती. घराच्या भिंतींना बाहेरून लाल (की गेरू) रंग द्यायची पद्धत होती. घरांची पुनर्बांधणी करताना पारंपरिक पूजा वगैरे केल्या गेल्या होत्या.

घरात प्रवेश करताना चपला बाहेर काढून ठेवायला सांगितलं गेलं. आणि घरात देशोदेशीच्या मूल्यवान वस्तू आहेत. स्वयंपाकगृह, झोपण्याची खोली अशा वेगवेगळ्या खोल्या आहेत. घरात भरपूर दारं आणि खिडक्या आहेत. समोरच्या खिडकीला काच आहे असं वाटत असताना आमची मार्गदर्शिका ते ओलांडून गेली आणि मी चकित झाले. मग आम्ही सगळेच त्या खिडकीतून गेलो. पण तो दृष्टिभ्रम कसा काय निर्माण केला गेला हे मात्र समजलं नाही.

या घराच्या परिसरातली ही काही प्रकाशचित्रं.
जोडलेली घरं
सजावट

घराचे रक्षक - हे अनेक प्रकारचे दिसले.
 दारावरंचं कोरीवकाम

अशा अनेक मूर्ती आहेत
आणखी एका प्रवेशद्वाराकडं जाताना

घराची  बाहेरून दिसणारी शैली

मार्गदर्शिका माहिती सांगते आहे
हे झाड मला फार आवडलं...

एक गोष्ट मात्र मजेदार आहे. या देशात बुद्ध या शब्दाचा उच्चार बूढा असा करतात – म्हणजे निदान मला तरी तो तसाच ऐकू आला. आणि प्रत्येक वेळी तो शब्द ऐकताना विचित्र वाटायचं. तसंच खाखूनखाSS’ असं बोलण्यात दर दोन-चार मिनिटांनी येतंच. विचारल्यावर कळलं की खाखूनखाSS’ म्हणजे आभारी आहे, धन्यवाद.

बँकॉकच्या गगनचुंबी इमारती पाहताना हे 'पारंपरिक घर संग्रहालय' म्हणजे लयाला गेलेल्या इतिहासाची एक खूण आहे हे मात्र जाणवत राहिलं. 

येताना वाटेत आणखी काही मॉल्स दिसले. एका मॉलच्या बाहेर असे अनेकजण उभे होते

बरेच लोक त्यांच्यासोबत हौसेने फोटो काढत होते.
रस्त्याने येताजाता जाणवलेली एक गोष्ट म्हणजे बँकॉक शहरात अगदी पावलोपावली 'मनी एक्स्चेंज ' आहेत. जगभरातून सतत लोक (टूरिस्ट) इथं येत असताता म्हणून जागोजागी चलन बदलण्याची अशी सोय असावी.
दिवसभरात सुमारे सात किलोमीटर चालले होते मी. उद्या कुठं जावं याचा विचार करत हॉटेलमध्ये परतले. 
क्रमश:

Friday, June 10, 2016

२३८. बँकॉक: धावती भेट: १ 'कला आणि संस्कृती केंद्र'


माझ्या भेट द्यायच्या यादीत बँकॉक हे शहर खरं तर नव्हतं. पण एका कामासाठी अचानक इथं आले. मी पोचले ती गुरूवारी रात्री. थाई-लँडच्या बँकॉक विमानतळावर उतरले तेव्हा सुवर्णभूमी हे विमानतळाचं नाव पाहून गंमत वाटली होती. बाहेर पडल्यावर दिसले ते रस्ते रूंद आणि चकाकक होते. माझ्या सुदैवाने वाहतूक कोंडी नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गगनचुंबी इमारती दिसत होत्या. हॉटेलमध्ये स्वागतकक्षात दोन्ही हात जोडून स्वागत झाल होतं. दुस-या दिवशी कळलं की असं स्वागत मी भारतीय असल्याने नाही तर स्थानिक पद्धत म्हणून होतं.
शुक्रवारी इथलं काम आटोपून शनिवारी पुढच्या मुक्कामाला जायचं असा बेत होता. पण शुक्रवारी काही काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे शनिवार-रविवार असे दोन दिवस आयते मोकळे हातात पडले. दिवसभर भयंकर उकडत होतं, पावसाची चिन्हं नव्हती. त्यामुळे उन्हातान्हात फार धावपळ न करता आणि फार पैसे खर्च न करता काय पाहता येईल यावर एकीचं मार्गदर्शन घेतलं आणि शनिवारी सकाळी बाहेर पडले. शहरातले आतले रस्ते मात्र असे छोटे होते.

पहिल्या दिवशी दोन जी दोन ठिकाणं मी ठरवली होती, त्यासाठी स्काय ट्रेन सोयीची होती. बँकॉकमध्ये मी सुखमवित (Sukhumvit) नावाच्या भागात रहात होते. तिथं असोक’ (Asok) हे स्काय ट्रेन स्थानक जवळ होतं.

स्थानकात प्रवेश केल्यावर एका खिडकीत नोटांच्या बदल्यात नाणी मिळत होती. स्वयंचलित यंत्रांत नाणी टाकून हव्या त्या स्थानकाचं तिकीट मिळण्याची चांगली सोय होती. स्थानकांवर आणि मेट्रोत नकाशे होते.

स्थानकाच्या नावाच्या उद्घोषणाही होत्या. नाना नावाचंही एक स्काय ट्रेन स्थानक आहे. गर्दी भरपूर असली तरी धक्काबुक्की अजिबात नव्हती..दिल्ली मेट्रोने मी बराच प्रवास केला आहे. दिल्ली मेट्रोत आणि बँकॉक स्काय ट्रेनमध्ये काही महत्त्वाचे फरक जाणवले. एक तर दिल्ली मेट्रोत आहे तसा स्त्रियांसाठी वेगळा डबा इथं नाही. दुसरं म्हणजे मेट्रोच्या सरकत्या दरवाजांसोबत फलाटावर काचेचे सरकते दरवाजे आहेत.  

तिसरं म्हणजे इथं प्रवाशांना सुरक्षाद्वारातून प्रवेश करावा लागतो पण त्यांची पुन्हा वेगळी व्यक्तिगत सुरक्षा तपासणी होत नाही. आणि चौथं म्हणजे बौद्ध भिक्षुंना इथं किती मान आहे हे स्पष्ट करणारा हा सूचनाफलक. 

तिकिटावर स्काय ट्रेनचा मार्ग सविस्तर छापला असल्याने सयाम स्थानकावर जाण्यात मला काही अडचण आली नाही. तिथं बाहेर पडल्यावर मात्र उजवीकडं वळायचं की डावीकडं हे न समजल्याने मी गोंधळले. तेवढ्यात प्रवासी मार्गदर्शन केंद्र दिसलं. मग तिथल्या बाईंनी सांगितलेल्या खुणांचा मागोवा घेत पाच मिनिटांत मी बँकॉक आर्ट ऍन्ड कल्चर सेंटरला  पोचले. या सेंटरमध्ये प्रवेशशुल्क नाही. 


हे सेंटर म्हणजे एक संग्रहालय असेल असा माझा अंदाज होता – तो काही अंशी खरा ठरला. या नऊ मजली इमारतीत चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, डिझाईन अशा अनेक विषयांवर सादरीकरण आणि शैक्षणिक उपक्रम होत असतात. इथं पुस्तकांची दुकानं आहेत, कलाविषयक संदर्भ ग्रंथालय आहे आणि चित्र प्रदर्शनाची अनेक दालनं आहेत. सिरॅमिक वस्तू, लाकडातून निर्माण केलेली कला असं बरंच काही आहे. कॉफी पीत चर्चा करत बसायला जागा आहे. कलेच्या संदर्भात मी निरक्षरच आहे म्हणा ना, तरीही जवळजवळ चार तास या सेंटरमध्ये होते. तिथल्या या आणखी काही कलाकृती.                                    

प्रत्येक कलाकृतीसोबत कलाकाराची माहिती दिली होती.या सेंटरमध्ये मी एक नवीच गोष्ट अनुभवली. काही प्रकाशचित्रं भिंतीवर लावली होती. त्या प्रत्येक चित्राला एक क्रमांक दिला होता. प्रदर्शन पाहायला येणा-या व्यक्तीच्या हातात मोबाईल हॅन्डसेटसारखं असं एक यंत्र किंवा साधन दिलं जात होतं. 

चित्राचा क्रमांक या यंत्रावर टंकायचा, हिरवं बटण दाबायचं आणि यंत्र कानाला लाऊन ध्वनिलहरी ऐकायच्या. वेगवेगळ्या प्रकाशचित्रांच्या वेगवेगळ्या लहरी मला ऐकू आल्या, पण त्यातलं विज्ञान काही मला नीट कळलं नाही. याविषयी अधिक माहिती खालच्या प्रकाशचित्रात आहे. 

तिथं कला म्हणून एका हिंदी चित्रपटाची भिंतभर लावलेली जाहिरात पाहून मजा वाटली. हा चित्रपट आपल्याकडं प्रदर्शित होऊन गेला आहे काय?

तीन तास चालून दमले होते, पण पुढं जायचं होतं. पुढच्या ठिकाणाची चौकशी करता ते अगदी जवळ असल्याचं कळलं आणि नव्या दमाने मी बाहेर पडले.
क्रमश: