ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, September 21, 2023

२६४. वारसा जलव्यवस्थांचा: भाग १

(भवताल, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसांच्या पर्यावरण-अभ्यास सहलीत मी सामील झाले होते. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आम्ही पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या निवडक ऐतिहासिक जलव्यवस्थांना भेट दिली. या दोन दिवसांत मला जे दिसलं, समजलं, भावलं – त्याची ही नोंद. या लेखात काही तथ्यात्मक चूक असेल तर ती माझी चूक आहे. योग्य माहिती आपण दिलीत तर चूक दुरूस्त करेन.)

चार दिवसांपूर्वी मला जर कुणी विचारलं असतं की रांझे-कुसगाव-जेजुरी-लोणी भापकर-सुपे-मोगराळे-लिंब या गावांमध्ये काय साधर्म्य आहे; तर कदाचित ही सर्व गावं आहेत, तिथली अर्थव्यवस्था शेतीप्रधान असणार, शिक्षण-आरोग्य-रोजगाराचे प्रश्न.... असे काही मुद्दे मला सुचले असते. पण १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवसभवतालच्या चमुसोबत या परिसरात भटकायची संधी मिळाली आणि वर उल्लेख केलेल्या गावांना जोडणारा आणखी एक दुवा स्पष्ट झाला. तो आहे ऐतिहासिक जलव्यवस्था’- पाणी साठवण्याच्या, वितरणाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण इतिहासकालीन जागा. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधली ही गावं आहेत.

प्रवासाच्या दोन दिवस आधी आमची एक ऑनलाईन मीटिंग झाली होती. तेव्हा आमचा गट फार मोठा नाही हे लक्षात येऊन मला बरं वाटलं होतं. अभिजीत घोरपडे आणि वनिता पंडित हे भवतालचे मार्गदर्शक धरून आम्ही चौदा लोक होतो. त्यात शेतकरी होते, शिक्षक होते, वास्तुरचनाकार होते, इंजिनिअर होते, आणि विद्यार्थी होते.  बारामती, सांगली, मुंबई अशा विविध ठिकांणाहून लोक या पर्यावरण-अभ्यास सहलीत सामील झाले होते. माझा ना इतिहासाचा अभ्यास आहे, ना पाण्याचा. पण आपल्या परिसरात आहे तरी नेमकं काय या उत्सुकतेने मी या सहलीत सामील झाले. भवतालबरोबर मी पहिल्यांदाच जात होते, त्यामुळे कार्यक्रमातून काही शिकायला मिळेल का नाही, याबाबत मनात सुरूवातीला थोडी शंका होती, ती अर्थातच अनुभवाअंती दूर झाली.  

सकाळी सात वाजता पुण्यातून निघून, वाटेत चहा-नाश्ता करून आम्ही भोर तालुक्यातल्या रांझे गावी पोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलांना केलेल्या शिक्षेची कथा आपल्याला आठवत असेलच, तेच हे रांझे. काही ठिकाणी गावाचं नाव रांजे असं लिहिलेलं दिसलं. गाव लहान दिसतंय, तीनेकशे कुटुंबं आहेत. लोकसंख्या अंदाजे पंधराशे ते अठराशे असेल. गंमत म्हणजे या गावाहून तालुक्याचं ठिकाण (भोर) ३५ किलोमीटर दूर आहे, तर जिल्ह्याचं ठिकाण (पुणे) ३० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यात लोकांना कामासाठी तीसेक किलोमीटर सहज हिंडावं लागत असेल, तो भाग वेगळा.

अंगणवाडी केंद्र बंद होतं. पण इमारत सुबक होती आणि बाहेरून तरी छान सजवलेली दिसली. 

गावात वीज आहे, पण ती अर्थातच अनेकदा नसते. गावात प्राथमिक शाळा आहे, पुढच्या शिक्षणासाठी मात्र गावाबाहेर जावं लागतं. या परिस्थितीतही २०११च्या जनगणनेनुसार गावातले ७५ टक्के लोक साक्षर आहेत. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र नाही. रस्ते तसे ठीकठाक वाटले, ऐन पावसात ते कसे असतात याची कल्पना नाही. गावात बँक, पोस्ट ऑफिस, एटीएम या सोयी नाहीत. जवळचा पेट्रोल पंप चार किलोमीटर अंतरावर आहे.  हे सगळं वर्णन पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाचं आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून प्रामुख्याने ऊस आणि फळभाज्या घेतल्या जातात. विहिरी आणि कूपनलिका यांच्या साहाय्याने शेतीला पाणीपुरवठा होतो.

इथल्या रांझेश्वर मंदिरात प्रवेश करताच एक मोठं वडाचं झाडं दिसलं. झाडाच्या खोडावर बांधलेले दोरे सांगत होते की वटपौर्णिमा नुकतीच होऊन गेली आहे. वडाभोवतीचा मजबूत दगडी पार स्वच्छ होता. डाव्या बाजूच्या कमानीही लक्ष वेधून घेत होत्या. मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामपंचायतीमधले कर्मचारी श्री. बाबासाहेब भणगे आम्हाला माहिती द्यायला हजर होते. परस्पर ओळखींचे एक छोटे सत्र पार पडल्यावर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो.

हे मंदिर शिवपूर्वकालीन आहे, दादोजी कोंडदेव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असा ऐतिहासिक पुरावा आहे. म्हणजे हे मंदिर चारशे वर्ष किंवा  त्याहूनही जुनं असावं. पायऱ्या उतरून आम्ही मुख्य मंदिराजवळ आलो तेव्हा समोर नंदी दिसले. शिवलिंगासमोर नंदी असणं काही नवं नाही, पण इथं एक सोडून तीन नंदी आहेत. या तिन्ही नंदींचे आकार वेगवेगळे आहेत. त्यामागे काय कथा आहे हे काही कळलं नाही. शिवलिंगाभोवती सापाचं वेटोळं स्पष्ट दिसतं. मंदिर परिसर बराच मोठा आहे आणि स्वाभाविकपणे त्याची पडझडही झाली आहे. खूप मोठं मंदिर असावं हे स्पष्ट होण्याइतके अवशेष टिकून आहेत.

इथं आमच्या भेटीचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे तीन कुंडं पाहणं. वरवर पाहता अगदी साधी व्यवस्था आहे असं दिसतं. इथं तीन कुंडांची साखळी आहे - एकाला एक जोडून अशी तीन कुंडं आहेत. त्यांची खोली अनुक्रमे २.०, १.४ आणि १.२ फूट अशी आहे. फोटो पाहून कुंडांच्या लांबी-रूंदीची तुम्हाला कल्पना येईल. पहिल्या कुंडाला देवकुंड असं म्हटलं जातं. इथं झऱ्याचं पाणी थेट कुंडात येतं. या कुंडातलं पाणी देवाच्या पूजेसाठी आणि पिण्यासाठी वापरलं जातं. या कुंडातल्या पाण्याचा स्तर वाढला की पाणी दुसऱ्या  कुंडात जाईल अशी व्यवस्था आहे. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अशा रीतीने केली आहे की दुसऱ्या कुंडातलं पाणी कधीही पहिल्या कुंडात परत येणार नाही (आणि तिसऱ्या कुंडातलं पाणी कधीही दुसऱ्या कुंडात परत येणार नाही.) पाणी वाहून जाण्यासाठी असलेली छिद्रं पहिल्या कुंडात स्पष्टपणे दिसतात, पाणी वाहण्यासाठी काही कलाकारीची गरज नसते. पण जे काम करायचं ते सौंदर्यपूर्ण, नेटकं, आकर्षक करायचं हे तत्कालीन कारागिरांचं वैशिष्ट्य दुसऱ्या कुंडातलं गोमुख पाहून लक्षात येतं. यातलं पाणी आंघोळीसाठी वापरलं जातं. दुसऱ्या कुंडातून पाणी तिसऱ्या कुंडात येतं तेव्हा कपडे धुणे, भांडी धुणे अशा कामासांठी ते वापरलं जातं. आता गावात नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावकरी या कुंडांचा क्वचितच वापर करतात. केवळ देवळाचे पुजारी कुंडात आंघोळ करताना दिसले.


एका कुंडातून दुसऱ्या कुंडात पाणी वाहतं ठेवणं ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अभिनवच होती - आहे. पण तत्कालीन नेतृत्व तिथंच थांबलं नाही. तिसऱ्या कुंडातलं पाणी वापरून झालं की जमिनीत जिरून जात नाही. जमिनीखाली दगडी पाट बांधून त्याद्वारे हे पाणी मंदिराबाहेर वळवण्यात आलं आहे आणि तिथून ते शेतीसाठी वितरित होतं. हा दगडी पाट – दगडी भुयार-पाट म्हणायला पाहिजे खरं तर – अगदी प्रशस्त आहे. त्यातून आजही पाणी वाहतंय. आमच्या गटातले काही सहकारी या पाटातून (किंचित वाकून) चालत गेले आणि मंदिराबाहेर आले. त्यांच्या चाहुलीने आतली शेकडो वटवाघळं उडून बाहेर आली. ती पाहून मग मी भुयार-पाटात चालत जाण्याचा बेत रद्द केला.

पाणी अजिबात वाया न जाऊ देता पाण्याचा वापर जास्तीत जास्त लोकांना कसा करता येईल आणि पाण्याचा परिणामकारक पुनर्वापर कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवणारी ही व्यवस्था आहे. आता काळ बदलला, सोयी झाल्या, नवं तंत्रज्ञान आलं, लोकांच्या गरजा बदलल्या म्हणून ही व्यवस्था वापरली जात नाही. पण ती व्यवस्था अजूनही चांगल्या स्थितीत आहे, ती बंद पडलेली नाही हे फार महत्त्वाचं आहे. ही व्यवस्था टिकली म्हणून आपल्यार्यंत पोचली. सस्टेनेबल डेवलपमेंट (शाश्वत विकास किंवा चिरंजीवी विकास) बाबत विचार करताना असं भूतकाळातूनही शिकायला मिळतं हे नक्की.

मंदिर परिसरातली शांतता, दगडी बांधकामाने त्या वातावरणात असलेली एक स्थिरता, पडझड झालेल्या भिंतीतून दिसणारं निसर्गरम्य दृश्य .... हे सगळं सोबत घेऊन आम्ही पुढं निघालो ते कुसगावकडं.

आम्ही गावात न जाता मुख्य रस्ता सोडून आत गेलो. साधारण दहाएक मिनिटं चालल्यावर खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकू यायला लागला. रांझे आणि कुसगाव यांच्या हद्दीवर असलेलं हे छोटेखानी धरण (किंवा आजच्या भाषेत मोठा बंधारा) अजूनही मजबूत आहे. जिजाऊंच्या आज्ञेनुसार शिवगंगा नदीवर हा बंधारा बांधला गेला आहे. (पुण्यात राहण्याची सोय होण्यापूर्वी जिजाऊ लहानग्या शिवरायासह खेड शिवापूरमध्ये काही काळ राहिल्या होत्या.) चारशे वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या बंधाऱ्यात पाणी साठलेलं दिसलं. बंधाऱ्याची उंची दहा फुटांपेक्षा जास्त असावी. किती लांबीचा बंधारा आहे हे मला माहिती नाही,


पण नदीच पात्रं बऱ्यापैकी रुंद आहे. भिंतीची रुंदी (जाडी) पाच ते  सहा फूट असावी असा माझा अंदाज आहे. पाणी बंधाऱ्यातून पुढं वाहण्यासाठी जो भाग केला आहे, त्याच्या दोन्हीबाजूंना बुरूजासारखी रचना आहे.

पाण्याच्या प्रवाहाने बंधारा वाहून जाऊ नये म्हणून ही व्यवस्था असते का असा प्रश्न पडला. नदीचं पात्र फार खोल नसावं (बहुधा गाळ साठला असावा), कारण आमच्यापासून थोड्या अंतरावर बंधाऱ्याने अडलेल्या पाण्यात एक माणूस मासे पकडत होता आणि मध्येच तो चालत नदी ओलांडून गेला.

या परिसरात पाऊस भरपूर होत असला, तरी दिवाळी उलटली की पाण्याची कमतरता भासत असणार. लोकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने अतिशय दूरदृष्टी दाखवून जिजाऊंनी शिवगंगा नदीवर बंधारे बांधले. त्यांनी तीन बंधारे बांधले आहेत, आम्ही त्यापैकी फक्त हा एक पाहिला. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दीर्घकाळ टिकणारं काम कसं उभं करावं याचा हा एक आदर्श आहे. जिजाऊंनी केलेल्या या कामाची मला फारशी कल्पना नव्हती हे सखेद नमूद करते. आता या विषयावर आणखी वाचलं पाहिजे हे लक्षात आलं.

(क्रमश:)

भाग २


36 comments:

  1. खूपच छान.

    ReplyDelete
  2. चांगल्याप्रकारे शब्दबद्ध केलं आहे. पुढच्या भागाची उत्सुकता आहे. धन्यवाद।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, अभिजित सर.

      Delete
  3. अरे वा! मलाही जिजाऊंनी बांधलेलं धरण वगैरे माहिती नवी आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हं. असं अनेकांचं असणार. का या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या - हे कळत नाही.

      Delete
  4. अनुज्ञाSeptember 21, 2023 at 4:54 PM

    खूप मस्त लेख! भोरमधे तळ ठोकला आहे तोवर जमेल तसं पाहून घेतल्या पाहिजेत या जागा...

    ReplyDelete
    Replies
    1. होय, भोर परिसरात अनेक गोष्टी आहेत असं मलाही आत्ताच लक्षात येतंय.

      Delete
  5. जोरदार भटकंती सुरू आहे तर. पुढचे भागही वाचायला आवडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. लिहिण्याचा इरादा तर आहे ...

      Delete
  6. 👌🏻👌🏻👌🏻

    काही वर्षांपूर्वी आम्ही मुद्दाम बारा मोटेची विहीर पहायला लिंब ला गेलो होतो.
    त्याचीही विस्तृत माहिती येईलच पुढे. वाट बघते आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वा! तुम्ही काही लिहिलं होतं का त्याबद्दल? वाचायला आवडेल.

      Delete
  7. अप्रतिम लेख!!! पुढचे लेख ही वाचायला आवडेल
    नूतन

    ReplyDelete
  8. खूप सुंदर वर्णन, पुन्हा एकदा सफर ची मजा आली, दुसऱ्या भागाची उस्तुकता.

    ReplyDelete
  9. Thanks a lot Savita Tai for sharing such a wonderful informative important article. Eager to learn more about the same. 👌👍🤝😊

    ReplyDelete
  10. नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण!

    ReplyDelete
  11. सगळा अनुभव खूप छान शब्दबध्द केलायत सविता ताई. परत एकदा छान सफर झाली. पुढच्या भागाची वाट पहातेय!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, संगीताताई.

      Delete
  12. सुंदर लिहिलंय. मलाही आवडेल असं काही पाहायला.

    ReplyDelete
    Replies
    1. 'भवताल'ची लिंक दिली आहे सुरूवातीला. त्यावर त्यांचे आगामी कार्यक्रम कळत राहतील तुम्हाला.

      Delete
  13. फार उत्तम लिखाण पद्धतीने डोळ्यासमोर सगळं चित्र उभं केलं आहे. पाण्याच्या स्त्रोतांची रचना आणि कार्यकारणभाव फार चांगल्या प्रकारे मांडलं आहे. तुमचे आभार.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, कौस्तुभभाऊ.

      Delete
  14. भवताल समजवणारे वर्णन

    ReplyDelete
  15. आत्ता हा भाग वाचला...अशा गोष्टींचा watershed मध्ये काम करणाऱ्यांना नक्कीच उपयोगी पडतील...ऐतिहासिक दृष्टिकोन आत्ताच्या काळात सुद्धा उपयोगी होतील असे वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या वॉटरशेड टीमची अभ्यास सहल आयोजित करण्याजोग्या जागा आहेत या सगळ्या.

      Delete
  16. खूप छान वर्णन केलंत.

    ReplyDelete
  17. फार छान माहिती आणि लेखन. आपल्या इतक्या जवळ असलेली ही महत्वाची ठिकाणं आपल्याला माहीत नसतात किंवा आपण दुर्लक्ष करतो याचा खेद वाटला. आता आवर्जून पाहीन. अशा उपक्रमात सहभागी व्हायला मलाही आवडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय. मलाही हे सगळं नव्यानेच कळतंय.

      Delete