ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label तंत्रज्ञान. Show all posts

Thursday, February 17, 2011

६३. 'नाहीसं करण्याचं' व्रत

जगताना फक्त नव्या गोष्टी निर्माण करणं  पुरेसं नसतं, तर अनेक गोष्टी नाहीशाही करत जाव्या लागतात. जे आज हवं वाटतं, त्याचं उद्या ओझं होतं, किंवा जे आज नको वाटतं, त्याचा उद्या मोह पडतो .. त्यामुळे काय टिकवायचं आणि काय नाहीसं करायचं याचा निर्णय आपल्याला नेहमी करावा लागतो. हे लक्षात आल कागदांची आवराआवर करताना.

साफसफाई घराची असो, की ऑफिसची कागदांची विल्हेवाट हे एक मोठंच काम होऊन बसलंय गेल्या अनेक वर्षांत! मी ज्या ऑफिसात दहा वर्ष काम केलं, ते सोडताना तर हे प्रकर्षाने जाणवलं! म्हणजे मी आपली कित्येक दिवस निष्ठेने, चिकाटीने कागद फाडत बसले होते; पण त्यांचा ढीग काही कमी होत नव्हता. पेपरलेस ऑफिसच्या जमान्यात मी इतके कागद कसे जमा करते याचं माझं मलाच नवल वाटायला लागलं! पण ते काही फार मोठं रहस्य नाही.

माझ्या आधीच्या ऑफिसात ‘संगणक विभाग’ म्हणजे एक मजेदार प्रकरण होतं! संगणकाचं कमीत कमी ज्ञान हीच जणू त्या विभागात काम करण्याची सर्वोच्च पात्रता होती. त्यामुळे Local Area Network (LAN) असल तरी ते नेहमी चालू राहील याची आम्हाला कोणाला खात्री नसायची. म्हणून केलेलं प्रत्येक document संगणकाच्या hard disk वर ठेवायची सवय आम्ही स्वत:ला लावून घेतली होती. आम्ही थोडेसे परंपरावादी आणि बरेचसे कंजूष असल्यामुळे इंटरनेट असलं तरी anti virus प्राचीन काळचा असायचा. त्यामुळे आपण संगणकात साठवलेलं काम टिकणार का याची नेहमी शंका रहायची.

मग निमुटपणे त्या त्या दिवशीच काम Pen Drive वर घ्यायचं! पण Pen Drive तर virus साठीचा खुला दरवाजा. म्हणून मग महत्त्वाचं काम सीडीवर घ्यायचं. आता आपण जे काम करत असतो त्याबाबत बाकी कुणाचं काहीही मत असो, आपल्याला तर ते काम महत्त्वाचं वाटतंच! त्यामुळे दिवसभराचं काम शेवटच्या पंधरा वीस मिनिटात कॉपी करायचं हा एक उद्योग असायचा.

आमच्या ऑफिसात वेगवेगळ्या काळात घेतलेले संगणक होते. त्यामुळे सगळ्या संगणकांना Pen Drive अथवा सीडी जोडायची सोय नव्हती. कार्यक्षेत्रात तर अनेकदा संगणक नसायचे. मग मिळेल त्या सायबर कॅफेत जाऊन काम करावं लागायचं. तिथं Pen Drive अथवा सीडी उघडलंच नाही तर भानगड नको, म्हणून ती सगळी documents स्वत:ला ईमेलने पाठवून द्यायची. Rediff किंवा Gmail कधी कधी उघडलं जात नाही. म्हणूण दूरदृष्टी दाखवत स्वत:ला एकाऐवजी दोन पत्त्यांवर ईमेल पाठवायची. वेळ पडलीच तर मग ईमेलवरून ते document वापरता यायचं.

हे सगळ होऊनही शांतता नसायची. विजेचा लपंडाव सगळीकडे सारखा चालू असतो. त्यामुळे महत्त्वाच्या document चे Printout जवळ ठेवावं लागे. कामानिमित्त मी अनेकदा पुण्याबाहेर असायचे. त्या काळात ऑफिसातला माझा संगणक इतरही कोणी वापरायचं. त्यांच्या उद्योगात एक दोनवेळा माझे काम गायब झालं, ते परत करावं लागलं. त्यावेळपासून ऑफिसातलं सगळं  काम घरच्या संगणकावर मी ठेवायला लागले. रविवारी, सुट्टीच्या दिवशी अनेकदा reports, documents, presentations पूर्ण करावे लागत. काहीवेळा ऑफिसात दिवसच्या दिवस निरर्थक मीटिंगमध्ये जात. मग रात्री घरात काम करणं भाग पडायचं. म्हणून घरच्या संगणकात ऑफिसचं काम भरलेलं असायचं.

आता मागे वळून पाहताना मला हे सगळ विनोदी वाटत! किरकोळच गोष्टी असायच्या खर तर त्या – कोणत्यातरी बैठकीचा वृत्तांत, प्रशिक्षणासाठीचे presentation, त्या वर्षीचे बजेट, प्रकल्पांची रूपरेखा .. हे सगळं त्या काळापुरतं महत्त्वाचं होतं .. आता ते दिवस गेले . पण त्या काळात मी SCP (Save, Copy, Print) या रोगाची शिकार बनले.

पण अर्थात माझ्या टेबलावर येणा-या कागदांना मी (म्हणजे माझा SCP रोग) एकटी सर्वार्थाने जबाबदार नव्हते. मला माझे बरेच सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी मंडळी वाचण्यासाठी कागद पाठवायचे. Endosulfan ते Microfinance आणि गांधी ते Ecotourism असे कोणतेही विषय माझ्याकडे यायचे. स्वत:ला नको असलेले कागद सभ्यपणे पुढे ढकलायचे असतील तर त्या कागदावर ‘Please, discuss’ किंवा ‘This might be of your interest’ असं लिहायचं असतं हे मला कळेपर्यंत अनेक वर्षे उलटली. मला वाचायला, विचार करायला कोणताच विषय वर्ज्य नाही; त्यामुळे आलेला प्रत्येक कागद मी मनापासून वाचायचे. आमच्या कार्यक्रमात त्यातले काय घेता येईल, काय टाळावे यावे एक टिपण तयार करून संबधित लोकांना पाठवून द्यायचे - असं काम मी अनेक वर्ष केलं..

अनेकदा ज्यांनी माझ्याकडे कागद पाठवला ते त्याबाबत सोयीस्करपणे विसरून जात. चर्चेची आठवण मी करून दिली तरी त्यावर बोलायला त्यांना वेळ नसे - मलाही नसे. आपल्या टेबलावरचा पसारा कमी करायला लोक माझ्याकडे कागद पाठवतात हे लक्षात आल्यावर माझाही चर्चेचा उत्साह कमी झाला. पण तोवर माझ्या टेबलावर, आणखी एका डेस्कवर कागदांचा ढीग साठला होता. अजूनही लोक माझ्याकडे कागद पाठवतात आणि मी तो न वाचता पुढं कुणाला देत नाही. मला वाचायला मिळणारा वेळ आणि माझ्याकडे येणारे कागद यांचं प्रमाण व्यस्त आहे. कामातून (म्हणजे संगणकातून) थोडी उसंत मिळाली की मी कागद वाचते. पण माझ्या टेबलावर ‘अजून वाचायच्या’ कागदांचा गठ्ठा मोठा आहे!

संवादाची साधनं वाढल्याने, तंत्रज्ञान सोपां आणि स्वस्त झाल्याने गुंतागुंत कमी होईल असं वाटत होतं. पण माणसांच्या सवयी बदलणं कठीण! एक संदेश द्यायला वेगवेगळी माध्यमं आहेत – पण माणसं त्या वेगवेगळ्या माध्यमांतून एकच संदेश देतात. आमच्या ऑफिसचे लोक याबाबत जास्तच आटापिटा करायचं. म्हणजे कोणीतरी तुम्हाला ईमेल पाठवणार. ती अर्थातच दोन्ही-तीनही Inbox मध्ये येऊन पडणार. मग ‘तुम्हाला ईमेल पाठवली आहे ती बघा’ असा SMS करणार (आम्ही काही सारखे online नसायचो). काही वेळा मीटिंगमध्ये असू तेव्हा SMS कडे लक्ष देत नाही म्हणून फोन करून तेच सांगणार. आणि याउपरही धोका नको म्हणून ती महत्त्वाची एक दोन पाने fax करणार माहितीचा भडिमार म्हणजे त्याच त्याच माहितीचा भडिमार!

माझा स्वभावही या सगळ्या समस्येत भर टाकतो. कोणताही कागद कच-याच्या टोपलीत फेकायला मी कचरते. अनेकदा आज फाडून टाकलेला कागद नेमका उद्या लागतो हा अनुभव तुम्हालाही असेलच! कागदाचा ढीग समोर घेऊन बसल्यावर त्यातले अनेक कागद ‘अजून लागेल कदाचित् पुन्हा’ असं म्हणून मी एका स्वच्छ कोप-यात ठेवते. पहिल्या फेरीत अनेक कागदांना असे जीवदान मिळते. पाहता पाहता त्या स्वच्छ जागेत जुन्या कागदांचा नव्याने ढीग लागतो.

कागद साठवण्यामागं माझं एक ‘तत्त्व’ही आहे. पाठकोरे कागद वापरून बिनमहत्त्वाचे प्रिंटिंग करायचं असा माझा प्रयत्न असतो. ही पोस्ट मी घरात बसून पाठको-या कागदावर लिहिते आहे – पण हाताने लिहिण्याचे प्रसंग आता कमीच! माझ्या ऑफिसात common printer’ होता. मी Print command देऊन प्रिंटरजवळ जाईपर्यंत नव्या को-या A 4 कागदांवर माझे document तयार असायचे. माझ्यानंतर रांगेत असणा-या सहका-याला नेहमी महत्त्वाचं छापायाचं असायचं आणि पाठकोरे कागद चालायचे नाहीत. ‘पाठकोरे कागद’ वापरण्याच्या अटटाहासापायी माझ्या टेबलावर नेहेमी कागद साठलेले असतात.

थोडक्यात काय तर मी सारखं काहीतरी नाहीसं करत असते.

- ऑफिसातल्या संगणकातलं काम
- घरच्या संगणकातलं काम
- Pen drive मधलं काम
- एक दोन तीन Inbox
- मोबाईल मधले SMS

अनेकदा हे करत असताना काल जे महत्त्वाचं होतं ते आज बिनमहत्त्वाचं झालं आहे हे जाणवून ‘आज’बद्दल विरक्ती येते. तुम्हाला हवे असोत की नको, कागद, ईमेल, SMS येत राहणार .. आणि तुम्हाला ते नाहीसे करत राहावे लागणार. एका अर्थी वर्षाचे ३६५ दिवस चालणारे ‘नाहीसं करण्याचं’ हे एक व्रतच आहे म्हणा ना! न उतता, न मातता ते चालवावं लागणार. ते न केलं तर धडगत नाही. काय टिकवायचं आणि काय नाहीसं करायचं याचा निर्णय तारतम्याने करावा लागणार .. तो चुकला तर सगळंच संपलं! संगणकाची system restore करता येते .. आयुष्यात मात्र ते असं चुटकीसरशी करता येत नाही हे भान ठेवून नाहीसं करत राहावं लागणार  .. !
**

Tuesday, November 23, 2010

५४. नवा निश्चय!

कोणे एके काळी आपण हाताने - म्हणजे अर्थातच पेन/ पेन्सिल आणि कागद - यांच्या साहाय्याने लिहित होतो हे जणू मी आता विसरुनच गेले आहे. भूर्जपत्रावर लिहिण्याच्या कलेइतकीच हाताने लिहिण्याची कला प्राचीन वाटू लागली आहे मला ..... हे चांगल की वाईट असा प्रश्नही मला पडत नाही.

खर तर संगणकाची आणि माझी ओळख तशी फार जुनी नाही. तसा कॉलेजमध्ये शिकत असताना 'संगणक' हा एक विषय होता आम्हाला. तेव्हा काही प्रोग्रामसुदधा लिहिले होते मी. आम्ही कागदावर लिहून तो कागद विद्यापीठात नेउन द्यायचो. तिथे एका मोठया खोलीत संगणक असायचा. विद्यापीठातल्या फक्त वरिष्ठ प्राध्यापकांना (आणि शिपायांना) त्या खोलीत जायची परवानगी होती. थोडं आत जायचं डेस्कपर्यंत तरी देवळात गेल्यासारख चपला बाहेर काढून जाव लागायच! एक गूढ़ वातावरण होत त्या संगणकाच्या भोवती! पण संगणकापेक्षा इतर गोष्टीतला रस वाढला आणि संगणक मागे पडला

मग काही वर्षांनी ओळखीच्या काही लोकांच्या घरी संगणक आला. तो कोणाकडून तरी - बहुतेक वेळा त्यांच्या मुला -मुलीकडून उघडून घ्यायचा आणि एखादा 'गेम' खेळायाचा इतकेही मला पुरेसे आव्हानात्मक वाटायचे - ते माझ्यासाठी तसे असायाचेही.

२००० मध्ये मी माझा इ-मेल अकाउंट उघडला. माझ्या एका मैत्रीणीच्या विद्यार्थ्याने पदवी मिळाल्यावर 'सायबर कॅफे ' उघडला होता. तिथे एकदा मैत्रीणीचे काम होते. ते होईपर्यंत नुसतीच बसून होते मी. तो विद्यार्थी म्हणाला, ' मैडम, तुम्हाला चेक करायची असेल मेल तर करा तोवर.' माझे इ-मेल अकाउंट नाही असे मी त्याला सांगितल्यावर त्याने मान डोलावली. त्याचा अर्थ काय होता कोणास ठाऊक! त्याने तत्परतेने मला अकाउंट उघडून दिले.

अकाउंट उघडल खर, पण मेल कोणाला पाठवायची? त्यावर तो बिचारा म्हणाला, "मला पाठवा." पहिली मेल मी माझ्या समोर बसून मला इन्टरनेटची शिकवणी देणाऱ्या मुलाला /माणसाला पाठवली. पुढे दोन तीन महिने नियमितपणे त्याच्याकडे जाउन मी इन्टरनेट शिकले! त्याला मजा यायची 'टीचर' च्या मैत्रीणीला शिकवताना!

पुढे २००० मध्ये मी एका सामाजिक संस्थेत नोकरी करायला लागले. संस्थेच कार्यालय भल मोठ असल तरी पाहिले काही महिने मला ना बसायला जागा होती ना संगणक होता! कोणी सहकारी कामानिमित्त प्रवासाला जाणार अस कळल, की मला आनंद व्हायचा. त्यांच्या जागेवर मला ते परत येइपर्यंत बसता यायचा आणि त्यांचा संगणक वापरता यायचा. संगणक वापरायची भीती वाटायची. काही बिघडले तर, असे सतत वाटत राहायचे. तेव्हा मला Microsoft ऑफिस वगैरे काही माहिती नव्हते.Word Document कसे लिहायचे, कसे save करायचे हा सगळा अनुभव माझ्यासाठी मजेदार होता. मग मी एक्स्सल शिकले, पॉवर पॉइंट शिकले. Laptop वर मीटिंग्सचा धावता अहवाल करण्यात मी वाकबगार झाले.

बघता बघता संगणक मला चांगला वापरता यायला लागला. मी इतरांना मदतही करायला लागले. मग सुरु झाले 'मेल' पर्व. मेल चेक करणे ही आवश्यक बाब न राहता ते जणू एक व्यसन झाले. कामाच्या दोन चार मेल रोज असायाच्याच. उरलेल्या काही आणीबाणीच्या मेल नसतात; आठ दिवस काय महिनाभर उत्तर नाही दिले तरी चालेल हे माहिती असायचे. तरीही संगणक दिसला कोठेही की 'इन्टरनेट कनेक्शन आहे का?' असे हमखास विचारले जायचे आणि मेल चेक केली जायची. ते एक प्रतिष्ठेचेही लक्षण होते असे आता मागे वळून पाहताना जाणवते.

माझे एक चांगले आहे. कोणतीही नवी गोष्ट मी अतिशय उत्साहाने करते - त्यात जीव ओतून करते, त्याच्या आरपार जाते. त्यात कितीही कष्ट पडले तरी मला त्याची तमा नसते. स्वत:ला झोकून देण्यात मला मजा वाटते. भान विसरुन मी नव्या नव्या गोष्टी करत राहते.

पण माझे एक वाईट आहे. कोणत्याही गोष्टीचा एकदा अंदाज आला की मला त्याचा कंटाळा येतो. मग मी नवे काहीतरी शोधते. त्याचा कंटाळा आला की आणखी नवे काही शोधते. काय शोधायचे आहे मला नेमके हे मी त्या नादात विसरूनही जाते.

इ-मेल च्या व्यसनाच्या नादात मधल्या काळात घरात संगणक आला होता. त्यामुले ऑफिस आणि घर यांच्यातल्या सीमारेषा पुसट होत गेल्या. रात्री एक वाजता एखाद्या Workshop चा रिपोर्ट पूर्ण करण ही माझ्यासाठी नित्याची बाब झाली.

कधीतरी असाच ब्लॉग विश्वाशी संबंध आला. मी उत्साहाने ब्लॉग सुरु केला. माझ्या ओळखीतल तेव्हा कोणीही ब्लॉग वाचतही नव्हत .. ब्लॉग लिहिण्याची तर गोष्ट लांबच! त्यामुळे मला एक नवे आव्हान मिळाले. त्यात अनेक चुका मी केल्या ... त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया आनंददायी राहिली. थोडा एकटेपणा वाटायचा ... कारण ब्लॉग या विषयावर बोलायला कोणीच नव्हत माझ्याभोवती. त्यातला आनंद, त्यातला ताण, त्यातले समाधान, त्यातले यश, त्यातली फजिती ... एकटीने उपभोगताना मजा आली. आधी माझा ब्लॉग फक्त आमंत्रितासाठी होता नियमित लिहिणे जमते आहे याचा अंदाज आल्यावर मी तो सर्वांसाठी खुला केला.

मग मी एका ब्लॉग नेटवर्कमध्ये सामील झाले. कोणतीही अडचण आली, की नेटवर्कवर प्रश्न टाकायचा. त्यातले अनुभवी लोक उत्तर द्यायचे. त्यातून खूप शिकायला तर मिळालेच आणि अनेक ओळखीही झाल्या. इ-मैत्री ही एक नवी गोष्ट माझ्या आयुष्यात आली  आणि तिचा पुरेपूर आनंद मी घेतला -- सध्याही घेते आहे.

माझा पहिला ब्लॉग इंग्रजी भाषेत होता. तो व्यवस्थित चालायला लागल्यावर मी मराठी ब्लॉग सुरु केला. मराठी टाइपिंग हे आव्हान मोठे होते - कारण त्यात फॉण्टनुसार की बोर्ड बदलायचा. मग बरहा, ओपन ऑफिस यांचा आधार घेत घेत लिहित राहिले. या अडचणींमुळे मराठी ब्लॉग लिहिण्यात नियमितपणा नव्हता, प्रयत्नपूर्वक लिहावे लागायचे.

दोन ब्लॉग , वाढते काम यामुळे घरातला संगणक अव्याहत चालू राहू लागला. कोणताही ब्लॉगर जातो त्या हिट्स, कमेंट्स या चक्रातून मी गेले, त्यातून बाहेरही पडले.

या काळात हाताने लिहिण्याची कला मी जवळ जवळ विसरून गेले आहे म्हणा ना! आता दिल्लीत मी येताना Laptop घ्यायचा नाही विकत सध्या तरी- अस ठरवल! संगणकाच्या व्यसनातून बाहेर पडायची वेळ झालेली आहे असे माझे मला जाणवले. इथे मी एक सोडून तीन ऑफिसमध्ये जाते - प्रत्येक ठिकाणी रजेवर असलेल्या कोणीतरी सहकारी असतोच - मग त्या जागेवर बसते, तिथला संगणक वापरते – माझ्या लिहिण्यावर अनेक भौतिक मर्यादा येत आहेत हे सतत जाणवते.

पण एका दृष्टीने हेही बरेच आहे. संगणकावर थेट लिहिण्याचे अनेक फायदे आहेत - पण तोटेही अनेक आहेत. मुख्य म्हणजे संगणकावर undo ची सोय आहे - जी प्रत्यक्ष आयुष्यात नसते. ती आहे असा एक भ्रम संगणकाच्या अति वापरामुळे निर्माण होतो - निदान माझ्या बाबतीत तरी तसे झाले. लेखन पाहिजे तसे कट, पेस्ट करता येते त्यामुले विचार विस्कळीत राहतात - काहीतरी कसेतरी करायचे आणि मग शेवटी करू एडिट असे वाटत राहते. delete ची तर फार मोठी सोय आहे! त्यामुळे लिहिताना विचारात जी स्पष्टता आवश्यक असते तिचा अभाव माझा मलाच जास्त जाणवायला लागला आहे. हाताने लिहिताना जे खरोखर सांगणे गरजेचे आहे तितकेच लिहिले जाते - संगणकावर अवास्तव लिहिले जाते. आणि अति लिहिले की त्यात गुणवत्ता राहण्याची शक्यता कमीच!

कामासाठी संगणक वापरावा लागणार - आणि तो मला आवडतोही वापरायला. पण जे व्यक्तिगत आनंदासाठी लिहायचे ते आधी हाताने लिहायचे असे मी ठरवते आहे. त्यातून लिहिण्याची गती स्वाभाविकच कमी होइल, पण त्याने बिघडणार काहीच नाही.

कदाचित एकदा हा अनुभव पुरेसा घेउन झाला की मी परत भारंभार लिहायला लागेन. माझी गाडी परत मूळ पदावर येईल..


मी हे तुम्हाला इतकं सविस्तर का सांगते आहे? कारण ही पोस्टही मी थेट संगणकावर लिहिते आहे! :-)

नव्या निश्चयाची सुरुवात अजून बाकी आहे. :-)

Thursday, September 30, 2010

४६. पण

खर तर खूप काही लिहिण्यासारख आहे.
मी नव्या गावात आहे.
नव्या वातावरणात आहे.
नवीन माणस भेटताहेत.

जुन्या गोष्टी मागे पड़ल्यात.
जुन्या भावना, जुनी स्वप्ने परकी होऊन गेली आहेत.
कालचे आज काही उरत नाही हा अनुभव पुन्हा एकदा येतो आहे.

पण त्याचबरोबर नव्या जगाचे कुतुहलही आहे.
अजून फारशी स्वप्ने नाहीत ... पण ती काय कधीही सुरु होऊ शकतात! ते सांगायचे आहे...
पण...

एक मोठा पण आडवा येत आहे.

आजवर नेहमी मी बरहा इमे वापरता होते. सवय त्याचीच झालेली. आता संगणक दुस-याचा , तेथे नेहमीचा सवयीचा फॉण्ट नाही. दोन तीन इ -मित्रानी माझी मदत केली आहे आवश्यक माहिती तातडीने मला देउन. पण....

आपल्या सवयी बदलणे किती अवघड असते याचा मला प्रत्यंतर येतो आहे.
एखादा शब्द टाइप करायला जमला की आनंदही होतो आहे.
केले की जमते, करायची इच्छा मात्र हवी हेही समजते आहे.
नव्या पद्धतीने काही शब्द टाइप करायला अवघड जाते आहे..
पर्यायी सोपे शब्द शोधण्याची प्रक्रिया मनात लगेच सुरु होते आहे.
त्या नादात जे काही सांगायचे त्यापेक्षा दुसरेच काही व्यक्त होत आहे.
आपल्याला प्रश्नात अडकून राहणे आवडत नाही .. वाट शोधणे चालू राहते आतल्या आत हे लक्षात येउन बरेही वाटते आहे.

एक नवा अनुभव .. एका अर्थी पाहिले तर बाहेरच्या जगात बदल..
पण त्याच्या सोबत जगताना. त्याकडे नीट पाहताना आपण आतही किती बदलत आहोत, बदललो आहोत ते जाणवते.

अशी बदलत बदलत मी कधीतरी मूळ पदावर तर जाउन पोचणार नाही ना? अशी भीती नाही वाटत... पण कोठे जाउन पोचणार त्याचा अंदाज बांधता येत नाही.
आयुष्यात अशी अनिश्चितता असावी त्यातच खरी मजा असते

परिस्थितीला शरण जाणे आणि परिस्थितीला सामोरे जाणे या दोन बाबी एकसारख्या नाहीत असे मी मला सांगते आहे.
यात समंजसपणा किती आणि अपरिहार्यता किती?
माहिती नाही.

असे मला बदलायचे होते का पण?
माहिती नाही.
पण हा बदल मी स्वीकारला आहे .. तो मीच जाणीवपूर्वक आणला आहे.
आता मराठी पोस्ट लिहायला अवघड जाणार थोड़े इतके सोडले तर बाकी काही 'पण' नाही.

Friday, March 19, 2010

२५. पण आपल्या दृष्टीचं काय?

भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपापल्या परीने, पध्दतीने काम करणा-या कार्यकर्त्यांची ती बैठक होती. स्त्री प्रश्नांबाबत, कामांबाबत, त्यामध्ये येणा-या अडचणींबाबत आणि विकासाच्या वाटचालीबाबत या सर्व कार्यकर्त्यांची आपापसात चर्चा घडवून आणावी असा संयोजकांचा हेतू होता. सुखद आश्चर्याची बाब अशी की, स्त्री प्रश्नांबाबत संवेदनशील असणारे मोजके का होईना, पण पुरुष कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते.


विविध राज्यांमधली स्त्रियांची परिस्थिती ऐकली, की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यातही विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरांत जगण्याची संधी आपल्याला मिळाली, हे स्वतःचं परमभाग्यच वाटायला लागतं! कारण अशाच कोणत्यातरी निरूपद्रवी चर्चेत ’एखाद्या दिवशी घरातल्या पुरुषाने चहा केला तर काही बिघडत नाही’ या माझ्या साध्या वाक्यावर त्या बैठकीतील अनेक स्त्रियांनी माझ्याकडे दचकून पाहिलं होतं!

एकंदर त्या ठिकाणी नवीन काहीच नव्हतं! स्त्रियाच प्रेमळ असतात, स्त्रीची सहनशीलता आणि त्यागच कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला तारू शकतात........ वगैरे गोष्टींचा प्रतिवाद करायचाही मला कंटाळा आला होता. तेवढयात आंध्र प्रदेशातील एका बाईंनी उठून गर्भजलचिकित्सा आणि तिचे दुष्परिणाम यावर बोलायला सुरुवात केली.

विषय गंभीर होता. त्या बाई स्वतः ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करत होत्या आणि मुख्य म्हणजे त्या अतिशय पोटतिडिकेने बोलत होत्या. त्यांच्याकडे आकडेवारी होती, जिवंत अनुभवही होते. त्या झुंज देत होत्या. अशा प्रकारच्या संघर्षात वाटयाला येणारा एकाकीपणा, अस्वस्थता अशा सा-या छटा त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होत्या. श्रोत्यांसमोर अनेक प्रश्नचिन्हे उभी करून त्या बाईंनी आपले बोलणे संपवले.

त्यानंतर बोलायला पंचाहत्तरीच्या डॉ. जानकी उठल्या. त्याही अनेक वर्षे ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय केलेल्या, जुन्या-जाणत्या प्रख्यात कार्यकर्त्या! गर्भजलचिकित्सेची समस्या अतिशय गंभीर असल्याचे मान्य करून त्या म्हणाल्या, “पण त्यामुळे एवढे हतबल होण्याचे कारण नाही. यावर आपल्या प्राचीन शास्त्रांत एक हमखास उपाय आहे.....”

सर्वचजणी जरा नीट सावरून बसल्या. कारण गर्भजलचिकित्सेची भीषणता, दाहकता, स्त्रीला जन्मच नाकारण्याचे क्रौर्य, याबाबतची अस्वस्थता आमच्या सर्वांच्या मनात खदखदत होती. डॉ. जानकी पुढे म्हणाल्या, “ जन्माआधीच मुलीची हत्या करणे ही क्रूरता आहे. पण काय करणार? आपल्या समाजाला तर मुलं -’मुलगे’ - च हवे असतात. मुलीची गर्भावस्थेतील हत्या टाळायची असेल तर ज्यांना मुलगा हवा आहे, त्यांना मुलगाच कसा होईल हे आपण पाहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये ’पुंसवन’ नामक एक विधी सांगितला आहे.......”

आम्ही काहीजणी अक्षरशः हैराण, अवाक! तर काहीजणी ते शास्त्र ऐकायला उत्सुक! त्याचाही मनाला प्रचंड धक्का! जानकीबाई त्या विषयावर विस्ताराने बोलू लागल्या, तशी आमची चलबिचल आणखी वाढली. पण त्यांना थोपवायचे कसे? आरडाओरडा करून त्यांना गप्प बसवणे आमच्या मनातील सभ्यतेच्या कल्पनेला पटत नव्हते. शिवाय झुंडशाहीने एखाद्याला गप्प बसवणे हे दुधारी शस्त्र आहे, ते आपल्यावरही उलटू शकते याची आम्हाला जाणीव होती.

हळूहळू आपापसातल्या निषेधाची कुजबूज तीव्र झाली. आमच्यातली एकजण जोरात ओरडली, “ आम्हाला मुली हव्या आहेत या जगात!” तिला पाठिंबा देत कोणीतरी कोप-यातून सौम्यपणे म्हणाली, “ वेळ खूप जातो आहे. आता पुढच्या कार्यकर्तीला बोलू द्या...” त्यावर वेगवेगळ्या समूहातून निषेधाचे सूर जोर पकडू लागले. श्रोत्यांमधून येणा-या प्रतिक्रिया क्षणोक्षणी वाढू लागल्या. मग अध्यक्ष – त्याही पंचाहत्तरीच्या - जानकीबाईंना काहीतरी म्हणाल्या आणि जानकीबाई काही न बोलता स्मितहास्य करत त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या.

वातावरण निवळावे, मोकळे व्हावे म्हणून संयोजकांनी लगेच चहापानाची सुट्टी जाहीर केली. सर्वजणी तावातावाने त्या विषयावर बोलू लागल्या. एक बाई रागावून मला म्हणाल्या, “ ऐकून घ्यायला तुमचं काय जात होतं? आजकालच्या पिढीला नाहीतरी आपल्या प्राचीन शास्त्रांचा अभिमानच नाही!” त्यांना टाळून मी पुढे गेले. एक जराशी प्रसिद्ध लेखिका दुसरीला म्हणत होती, “ पण जगात सगळे मुलगेच झाले तर त्यांना लग्नाला मुली कोठून मिळणार? ” (जणू मुलग्यांच्या - म्हणजे पुरुषांच्या - लग्नाची सोय म्हणूनच मुली जन्माला येतात!)

अर्थशास्त्र शिकवणा-या एक बाई म्हणत होत्या, “कधी कधी मला असं वाटतं की, असचं होत राहावं! (म्हणजे जन्माआधीच मुली मरून जाव्यात??) बायकांची संख्या तुलनेने कमी झाली की त्यांची ’किंमत’ वाढेल! ” (यांना फक्त मागणी-पुरवठा-किंमत हेच माहीत! स्त्रीसन्मान वाढवण्याचा काय पण अघोरी उपाय! आणि तो ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला? )

“स्त्रीच स्त्रीची शत्रू असते असं म्हणतात, हे आता पटलं मला! या बायका इतक्या निर्दयीपणे या विषयावर बोलू तरी कशा शकतात? यासुद्धा पुरुषप्रधान मानसिकतेच्या बळी.. खरी जागृती यांच्यातच घडवायला हवी...” एक तडफदार प्रतिक्रिया! “जागृती कसली करता? गोळ्या घालायला हव्यात असल्या लोकांना....” एक दाहक स्वर!

गर्दीतून हिंडताना प्रतिक्रियांचे तुकडे- तुकडे समोर येत होते. प्रश्न एक पण त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन अनेक! काही विकृत, काही विवेकी! काही पारंपरिक, काही चिकित्सक! काही संवेदनशील, काही निर्दयी! काही तटस्थ, काही आव्हानात्मक, काही हताश तर काही स्फोटक! माणसांच्या मनाचा जणू एक असीम कॅलिडोस्कोपच माझ्यासमोर.....

तेवढयात जानकीबाईंना गप्प बसवणा-या अध्यक्ष मला दिसल्या. मी त्यांना म्हटलं, “तुम्ही जानकीबाईंना थांबवलतं याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सुशिक्षितांनी असं बोलावं हे खूप धक्कादायक.......”

“हो ना!” माझं बोलणं अर्धवट तोडत त्या म्हणाल्या, “ जानकीबाईंना मी तेच म्हटलं! समोर अजून लग्न न झालेल्या काही मुली आहेत.. काही पुरुषसुद्धा आहेत! त्यांच्यासमोर बायकांच्या विषयाची चर्चा करू नये हे कसं लक्षात आलं नाही त्यांच्या? बायकांचे असले विषय फक्त बायकांसाठीच असतात....!”

मी अध्यक्षांच्या चेह-याकडे पाहतच राहिले. या समाजात ’स्त्री प्रश्न’ नावाच्या कॅलिडोस्कोपमध्ये जखम करणा-या धारदार काचांचाच भरणा जास्त आहे हे सत्य जाणवून मला त्या क्षणी फार निराश, हताश, अगतिक वाटलं!

कदाचित हा जुना कॅलिडोस्कोप तोडून फोडून हवा तसा नवीन बनवताही येईल प्रयत्नांती ….

पण आपल्या दृष्टीचं काय?
*
पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता, ९ आक्टोबर १९९९