ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, December 29, 2009

१५. काही कविता: ७ प्रवाही

तशी ही वर्षाअखेरची कविता वाटावी असेच तिचे शब्द आहेत. ती कदाचित जीवनाअखेरची कविता असेल असं म्हणायला मी धजत नाही, कारण मी नेहमी कविता लिहीन याची मला कधीच खात्री वाटत नाही. प्रत्येक कविता लिहून झाल्यावर 'अरे वा! आपण अजूनही कविता लिहू शकतो’ हे जसं समाधान असतं, तशीच 'ही कदाचित शेवटचीच कविता असणार नाही ना’ अशी एक भयावह शंका पण मनात असते.

कधी वरवर पाहता सगळं काही संपून गेलं आहे असं वाटत असतानाच 'अजून शब्द आहेत जागे आत’ याची अचानक सुखद जाणीव होते. उजाड भासणा-या जमिनीत पावसाच्या एका सरीने लाखो अंकुर तरारून यावेत त्याच धर्तीचा हा चमत्कार असतो. निसर्गाचं आणि मनाचं मला अद्याप न उलगडलेलं हे एक कोडंच! नाहीतर ऐन मे महिन्यात मला अशी जगण्याच्या निरंतर सुरेल प्रवाहाची जाणीव का बरं व्हावी?

जाउ द्या! मी आपली समीक्षकाच्या भूमिकेत शिरायला लागले तर नकळत!


पानगळीचा
रेटा सोसून
काही मागे
उभेच आहे;

पाचोळ्यातून
हलके हलके
जीवनरसही
वहात आहे;

जे झाले , ते गेले
आता, मागे
वळून पाहता
काही नाही;

तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!


९ मे २००८ प्रवासात

Monday, December 7, 2009

१४. तुझे माझे धागे

जगताना अनेक अनुभव येतात. खरं तर ते सगळ्यांनाच येतात या दुनियेत. पण फक्त कवीच अशा अनुभवांना नेमक्या शब्दांत पकडतात. यातून दोन प्रकारच्या प्रक्रिया घडतात असं मला वाटतं. 

एक म्हणजे अत्यंत व्यक्तिगत असा अनुभव (तो नेमका कवीचा स्वतःचाच असायला पाहिजे अशी गरज अर्थातच नाही) सार्वजनीन बनून जातो. म्हणजे जी जी व्यक्ती या विशिष्ट प्रकारच्या अनुभवातून गेली असेल, तिला तिचा अनुभव शब्दबद्ध केला आहे असं वाटतं. 

दुसरं म्हणजे कविता वाचताना दुस-या कोणाचातरी अनुभव नकळत आपला होऊन जातो. तो आपल्याला आला नसला तरी त्या अनुभवाबद्दल एक जागा मनात निर्माण होते.

कदाचित या दोन्ही प्रक्रिया वाचकाच्या मनात एकाच वेळी घडतात, त्यात श्रेणीबद्धता असतेच असं नाही. हो. आणि आणखी एक. हे फक्त दुःखाच्या भावनेबाबत घडतं असं नाही, ते सुखाच्या बाबतही घडतं. 

वासंती मुझुमदारांची ही कविता वाचताना मला असाच काहीसा अनुभव येतो. हातातून निसटलेले कितीतरी क्षण आठवतात. काही नकळत निसटले तर काही कळत असतानाही काही करता आलं नाही. गंमत म्हणजे अशा निसटलेल्या क्षणांचे दुःखही कालांतराने नाहीसं होतं. जे चिरंतन आहे असं वाटत असतं ते सर्व क्षणजीवी ठरतं. काही बदलेलं नाही तरी हळूहळू सारं काही बदलत जातं जगण्याच्या प्रवाहात! मग अट्टाहास मागे पडतो. समांतर रेषांच्या वाढत जाणा-या अंतराचा स्वीकार होतो स्वतःसमवेत. 

तुझे माझे धागे 
कधी नाही वाटे जुळायचे;

नाही अमा-पॊर्णिमेने 
रंग माझे पुसायचे. 

चाललेल्या मुकेपणी 
रेषा दोन समांतर ;

श्वास रोधियेला तरी 
राही वाढत अंतर. 

 वासंती मुझुमदार ’सहेला रे’ काव्यसंग्रहातून

Monday, November 23, 2009

१३. काही कविता: ६ ग्वाही

कविता लिहिणं -  ही ज्यावर आपलं कसलंही नियंत्रण नसतं अशी कृती आहे. किंबहुना ती एक स्वतंत्र अशी प्रक्रिया असते, ती एक पूर्ण घटना असते. कधीकधी त्याचं मर्म हाताशी येतं, तर कधी ते निसटून जातं. आणि मागे उरते ती फक्त एक गुदमरवणारी अस्वस्थता. 

लिहिणं आणि न लिहिणं यापैकी कोणताही पर्याय निवडला तरी - तो परिस्थितीनुसार निवडावाही लागतो अपवादात्मक वेळी - त्याचा परिणाम एकच असतो. तो म्हणजे काहीतरी मिळवल्याची आणि ते गमावल्याची क्षणिक का असेना पण तीव्र भावना.

सगळयाच कवींना अस वाटत असेल असा माझा अजिबात दावा नाही.
कदाचित याच्या पूर्ण विरोधी असाही मुद्दा मी कधीतरी लिहिन.
कवितेचा आणि तर्काचा logic चा संबंध क्वचितच असतो म्हणून कदाचित मनासारख्या गोष्टीवर आपण असंख्य ओळी लिहू शकतो आणि तरी ते ओळखीचं होतंच नाही बेटं!

श्वास अर्ध्यातच
थांबतो कधीकधी,
हे नको, तेही नको
म्हणतॊ, शोध पर्याय काही....


लटपटते मन, शरीर
यांची साक्ष अटळ
आणि दुनियादारीत
फक्त दुःखाचीच ग्वाही....

पुणे, ३० नोव्हेंबर २००८

Tuesday, November 17, 2009

१२. कंजूष

काही माणसं स्वभावतःच कंजूष असतात. पैसे वाचविण्याच्या आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्‍या विविध युक्‍त्या त्यांना सुचत असतात. "वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा' असला भक्कम सुविचार कोणातरी कंजूष माणसाला सुचला असणार, असं आपलं मला नेहमी वाटत आलंय. सहजतेनं खर्च करणाऱ्या व्यक्तीला असला विचार सुचणं प्रथमदर्शनी अशक्‍य वाटतं; पण कोणास ठाऊक, कायमच कंजूष माणसासोबत राहताना कोणालातरी हे समजलं असेल.

तुम्हा आम्हा सर्वांच्याच वाट्याला अशी एक तरी कंजूष व्यक्ती आलेली असतेच. कॉलेजच्या जीवनात आपल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात एखादा कंजूष नमुना हमखास असतो. कधी त्याची/ तिची परिस्थिती बिकट असते म्हणून किंवा कधी त्याच्या/ तिच्यामुळे मनोरंजन होतं म्हणून; कधी नाईलाजानं, तर कधी खुशीनं त्याला/ तिला सामावून घेतलं जातं. त्यात देण्याघेण्याचा हिशोब नसतो.

केवळ परिस्थिती नसते म्हणून माणसं पैसे खर्च करत नाहीत, असा माझा बराच काळ समज होता. पदवी हातात पडल्यावर मी एका सेवाभावी संस्थेत पूर्ण वेळ काम करायला लागले. त्या काळात मागेपुढे न पाहता इतरांसाठी भरपूर खर्च करणारी असंख्य माणसं मी पाहिली. स्वतःकडे जे काही असेल, त्यातलं सर्वोत्तम दुसऱ्यांसाठी देणारी अशी माणसं पाहताना मी बरीच वर्षे "कंजूष' हा शब्दही विसरून गेले होते. त्या काळात लोकांनी मला लाडावून ठेवलं, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आपण स्वतः पैसे कमावत नाही, असा कमीपणा मला तेव्हा कधीही वाटला नाही.

पैसे मिळवायची गरज कधी भासली नाही. जवळ असलेले सगळे पैसे एका क्षणात इतरांसाठी खर्च करताना भविष्याची काळजी मला आजही वाटत नाही. गरज लागेल तेव्हा दुसरं कोणीतरी आपल्याला पैशांची उणीव भासू देणार नाही, अशी मला नेहमी खात्री वाटते - कोणाकडे काही मागण्याचा माझा स्वभाव नाही, तरीही मला असं वाटतं हे विशेष!

तोवरचं माझं काम एका ध्येयानं बांधल्या गेलेल्या गटासोबत, लोकांसोबत होतं. आपापसांत कितीही वैचारिक किंवा रोजच्या कामासंबंधी मतभेद असले, तरी एकमेकांची काळजी आम्ही सहजतेनं घ्यायचो. एक तीळ सात जणांत वाटून घ्यायचा, इतकंच नाही, तर वेळप्रसंगी आपण उपाशी राहून उरलेल्या दहांना तो तीळ आनंदानं खाऊ घालायचा, अशा वातावरणात मी अनेक वर्षं जगलेच वाढले.

यथावकाश मी पैसे मिळवायच्या फंदात पडले आणि एक पूर्णतः नवं अनुभवविश्‍व सामोरं आलं.

एकदा मुंबई सेंट्रल स्थानकावरून अहमदाबादला जाणारी गाडी पकडायची होती. आम्ही पाच-सहा जण होतो. पुण्यातून निघून आम्ही साडेअकराच्या सुमारास मुंबई सेंट्रलला पोचलो. आमच्या पुढच्या गाडीला अजून दोन तासांचा वेळ होता. मॅकडोनाल्डमध्ये खाण्यापेक्षा बाहेर उडुपी हॉटेलात यायला आम्ही बाहेर पडलो- आमचं सामान भूक नसणारा एक सहकारी सांभाळत बसला. आम्ही पाच जणांनी पाच वेगळे पदार्थ खाल्ले. वेटरने विचारायच्या आधीच मी "एकत्रच बिल कर' असं त्याला सांगितलं. त्या समूहात मी एकटीच स्त्री होते म्हणून असेल कदाचित; पण वेटरनं माझ्या पुरुष सहकाऱ्यांच्या हातात बिल दिलं. बिल तसं काही जास्त नव्हतं. शिवाय माझे ते सहकारी अधिकारानं वरिष्ठ होते. त्यांना पगारही भरपूर होता. आणि मुख्य म्हणजे बिल कोणीही दिलं तरी कार्यालयीन कामासाठी आम्ही जात असल्यामुळे शेवटी तो "अधिकृत' खर्च होता. या सर्व गोष्टींमुळे मी पैसे देण्याची फार पराकाष्ठा नाही केली.

हॉटेलपासून स्टेशन केवळ सात मिनिटांच्या अंतरावर. चौकात सिग्नलला आम्ही थांबलो, तेव्हा माझे सहकारी मला म्हणाले, ""सविता, तुमचं सतरा रुपये बिल झालं.'' त्यांनी इतरांनाही अशाच रकमा सांगितल्या. मी इतकी चकित झाले होते, की मला काही सुचेना. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. त्यामुळे "स्टेशनवर पोचल्यावर दिले तर चालतील ना? की आत्ता लगेचच देऊ?'' एवढंच मी विचारू शकले.

मग मला अशी माणसं भेटण्याची सवय झाली. म्हणजे कोणी आपल्याला पेरू खायला दिला आणि तासाभरानं त्या पेरूचा एक रुपया मागितला, तर मला आश्‍चर्य वाटेनासं झालं. खाताना भरपूर गप्पा मारणारा माणूस नेमका बिल द्यायच्या वेळी मोबाईलवर बोलत बसणार, हे मी स्वीकारलं. फळं आपण आपल्या पैशांनी घ्यायची आणि कोणीतरी दुसरं कोणा तिसऱ्याला "ही तुमच्यासाठी भेट' म्हणून देणार आणि फुकटचं औदार्य मिरवणार, याचा राग येण्याऐवजी गंमत वाटू लागली. घरातून आणलेले पदार्थ गुपचूप हॉटेलच्या खोलीत एकट्यानं खाऊन मग वर "अहो, प्रवासात मला फारशी भूक लागत नाही' असं म्हणणाऱ्यांची कीव येऊ लागली. सामूहिक प्रवासात "मला हिशोब ठेवणं चांगलं जमत नाही, तू कर आता खर्च, नंतर देईन मी,' अशा युक्‍त्यांची नवलाई मागे पडली. एकदा तर पाच हजारांची रक्कम मी खर्च केली. त्याची पावती परस्पर दुसऱ्यानंच क्‍लेम केली. "मी विसरलेच होते, तू दिलेस पैसे ते' - अशी नंतरची सारवासारव हास्यास्पद होती.

आपण पैसे खर्च करू शकत नसलो, तर कमावण्याला तरी काय अर्थ- असं म्हणत बिल कार्यालयीन खर्चात पडणार असो की नसो, मी पैसे देत राहते. आपल्यासोबत असणाऱ्या सर्व माणसांसाठी खर्च करण्याची जबाबदारी माझी आहे, असं मला वाटतं- भले, मग माझ्याजवळ उद्यासाठी पैसे असोत वा नसोत!

परवा बाहेरगावी असेच एक गृहस्थ भेटले. दोन-तीन वर्षं आम्ही एकत्र काम केल्यामुळे त्यांचा कंजूष स्वभाव मला माहिती होता. सकाळी आम्ही हॉटेलच्या स्वागतकक्षापाशी भेटलो, तेव्हाच मी त्यांना "संध्याकाळी एकत्र जेऊ' असं आमंत्रण दिलं. त्यांनी त्या शहरात एका घरगुती खानावळीचा शोध लावला होता, तिकडे जाऊ जेवायला असं त्यांनी सुचवल्यावर आम्ही तिकडे गेलो. जेवताना त्यांच्या नव्या नोकरीबाबत बोलणं झालं. त्यांना तिथं भरपूर जास्त पगार होता. काम कमी होतं आणि पुरेसे अधिकार होते. त्यामुळे गृहस्थ एकंदर खुशीत होते. मला बरं वाटलं ते मजेत आहेत ते पाहून.

जेवण झालं. मी काउंटरवर जाऊन दोघांचेही पैसे द्यायला लागले. या गृहस्थांच्या कंजुषीची इतकी ख्याती आहे, की "गेल्या पंचवीस वर्षांत यानं आम्हाला एकदाही चहा पाजलेला नाही," असं त्यांचे मित्र सांगतात. अशा माणसाला तरीही मित्र असतात, याहून नवलाची आणखी काय गोष्ट असू शकते? असो. त्यामुळे या गृहस्थांनी माझ्या जेवणाचे पैसे द्यावेत वगैरे काही विचार माझ्या मनात नव्हते.

"नाही, मॅडम, तुम्ही नका पैसे देऊ,'' असं ते गृहस्थ म्हणाल्यावर  'अच्छा, म्हणजे माणसांचे स्वभाव बदलतात तर...' असं मला वाटलं; पण जुना अनुभव गाठीशी असल्यामुळे केवळ औपचारिकपणानं ते असं म्हणत असावेत, असा मी अंदाज बांधला. "अहो, तुम्ही पैसे देणार हे आधी माहिती असतं, तर जरा महागड्या हॉटेलात नसतो का गेलो आपण,'' अशी पुस्ती त्यांनी जोडली, तेव्हा यांचा आज पैसे खर्च करण्याचा निश्‍चय दिसतो आहे, असं मला वाटू लागलं.

हे काहीतरी वेगळं घडत होतं तर नेहमीपेक्षा! पण कदाचित मला भास होत असेल, असं वाटून मी शंभरच्या दोन नोटा काउंटरवरच्या माणसाकडे सरकवल्या. हॉटेलमधल्या माणसांची- वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत- एक गंमत असते. पुरुष सोबत असल्यावर स्त्रीनं पैसे देणं किंवा खरं तर स्त्रीकडून पैसे घेणं यांना अत्यंत अपमानाचं वाटतं. एकदा अशाच एका प्रसंगी एका वेटरनं तर मला भारतीय संस्कृतीवर एक लंबंचौडं भाषण दिलं होतं. गार्गी, मैत्रेयी अन्य ऋषिगणांबरोबर जलपानासाठी जात असतील, तेव्हाही ऋषिगणांपैकी पुरुषांनीच आवश्‍यक त्या सुवर्णमुद्रा देण्याचा आश्रमांचा, गुरुकुलांचा नियम होता, असं या वेटरचं भाषण ऐकल्यावर बराच काळ मला वाटत होतं. अभ्यासकांनी यावर जरूर संशोधन केलं पाहिजे.

तर इथंही त्या काउंटरवरच्या माणसानं मला रोखलं. "ताई, साहेब असताना तुमच्याकडून पैसे घेणं प्रशस्त नाही वाटत. देताहेत ना साहेब पैसे.'' ही आता आणखी एक गंमत. अशा कोणत्याही प्रसंगात मी 'ताई' असते आणि माझ्याबरोबरचा पुरुष असतो 'साहेब'! त्या हॉटेलवाल्याला त्याचं बिल मिळण्याशी मतलब; कोणी का देईना, त्याला काय करायचं? पण एक तर ही घरगुती खानावळ होती. दुसरं म्हणजे त्या वेळी जेवणाऱ्यांची फारशी गर्दी नव्हती. तिसरं म्हणजे तिथं जेवायला आलेली मी बहुतेक अपवादात्मक बाईमाणूस होते; कारण त्या अर्ध्या-पाऊण तासात तिथं जेवायला आलेल्या प्रत्येक इसमानं आश्‍चर्यानं माझ्याकडे पाहिल्याचं माझ्या लक्षात आलं होतं.

"मॅडमकडून घेऊ नका हो पैसे,'' गृहस्थांचा खरंच बिल द्यायचा विचार होता तर! नव्या वातावरणात नवीन काही शिकलेले दिसताहेत ते. मी या माणसासाठी इतक्‍या वेळा आजवर पैसे खर्च केले होते, की एखाद्या वेळी त्यांनी पैसे दिल्यानं फार काही बिघडत नव्हतं. मी स्वस्थ उभी राहिले.

त्या गृहस्थांनी पैसे दिले. "साहेब, अजून वीस रुपये.'' काउंटरवरचा माणूस म्हणाला. आपले हे महाशय हसून शांतपणे म्हणाले, "तुम्हीच उलट मला चाळीस रुपये परत द्या. मॅडमचे पैसे मॅडम देतील.''

काउंटरवरच्या त्या माणसाचा चेहरा अगदी तोंडात मारल्यासारखा झाला. मी मुकाट्यानं पैसे दिले, तेव्हा त्यानं माझ्याकडे पाहिलंही नाही. कोपऱ्यात उभी राहून इतका वेळ शांतपणे सगळं बोलणं ऐकत असलेली एक स्त्री पदराआड तोंड लपवून हसत होती. मी तिच्याकडे पाहून स्वच्छ, साधी हसले आणि ती एकदम जोरजोरात हसायला लागली. काउंटरवरच्या माणसानं जरा काळजीनं आधी तिच्याकडे मग माझ्याकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तोही मोठ्यानं हसला आणि एकदम गप्प झाला.

आम्ही बाहेर पडलो. हे गृहस्थ म्हणाले, "जरा विचित्रच वाटले ते नवरा-बायको. काही कारण नसताना असं हसायचं म्हणजे...''

त्यावर मी पण मोठ्यानं हसले. म्हटलं, ""झाली असेल काहीतरी गंमत. तुम्हाला नसेल कळली कदाचित.''

मी त्या गृहस्थांना ओळखणाऱ्या एकांना हा किस्सा सांगितल्यावर ते म्हणाले, ""म्हणजे आता इतक्‍या वर्षांनंतर हा बाबा स्वतःचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला तरी शिकलाय. या आयुष्यात ही फारच मोठी झेप झाली त्याची.''

आणि खदाखदा हसत हे "शुभ वर्तमान' इतर मित्रांना सांगण्यासाठी त्यांनी मोबाईल हातात घेतला.

पू्र्वप्रसिद्धी : सकाळ, सप्तरंग, Sunday, November 15, 2009
*

Wednesday, November 11, 2009

११. काही शोधायाचे नाही

’चैत्रपुनव’ या १९७० साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहातील ही कविता. कवी आहेत अर्थातच बा.भ. बोरकर. 

 ही कविता वाचताना माझाही सारा शोध अलगद संपून जातो. जणू सगळं विश्व कवेत असल्याची निर्लिप्त अन तरीही अतीव समाधानाची भावना ओसंडून वाहण्याचा अनुभव या शब्दांच्या सोबतीने मी घेते! 

काही शोधायाचे नाही:
सारे इथेच येणार 
काही मागायाचे नाही: 
माझा हातच देणार.

दिठी उलटली आत 
प्राणा लागले पाझर 
आता घागरीत भरे 
सारा रूपाचा सागर 

नाही बोलायचे काही: 
मौन निळाईत गाते
दळी चांदण्याचे पीठ
हातावीण माझे जाते

Monday, November 2, 2009

१०. काही कविता: ५

एखादी व्यक्ती एखादं काम अनेक वर्षांपासून करत असेल आणि त्या व्यक्तीला त्या कामाबद्दल विचारल्यावर धड काही सांगता येत नसेल, तर तुम्ही तिला काय म्हणाल?

मी या प्रसंगात दुस-या बाजूला आहे, कारण अशी एक गोष्ट आहे की जी अनेक वर्षे करूनही मला तिच्याबद्दल काही नीटपणे सांगता येणार नाही. मी अर्थातच कविता लिहिण्याच्या प्रक्रियेबाबत बोलते आहे. 

कवितेचा अर्थ 'कवी’च्या जीवनात शोधण्याचा प्रयत्न केवळ समीक्षक करतात असं नाही, तर सर्वसामान्यपणे बहुतेक माणसं करतात. त्याला कंटाळून मी कविता इतरांना वाचायला देणं अनेक वर्षे बंद केलं होतं. मला ओळ्खणा-या असंख्य माणसांना मी कविता लिहिते हे माहितीही नाही. 

आता त्यादिवशीचे उदाहरण घ्या. माझ्यासाठी तो अगदी एक सर्वसामान्य दिवस होता. दिवसभरात काहीही विशेष घडलं नाही. कार्यालयातून आल्यावर घरातल्या घरातच मी अर्धा तास चालते. माझ्या त्या फे-या चालू होत्या. अचानक माझा श्वास थांबला. मी टेबलावरचा कागद पेन घेतला आणि काही ओळी लिहिल्या. पाच मिनिटांत मी पूर्ववत माझं चालणं सुरू केलंही होतं. 

हे शब्द आले कुठून? ते का आले? ते येणार हे मला आधी माहिती होतं का? मी नेमकं असंच का लिहिलं? येणारे शब्द कागदावर न उतरवण्याचं स्वातंत्र्य मला आहे का? मी शब्दांना 'या’ असं आवाहन करू शकते का? 

यातील एकाही प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही. आणि मी तीस वर्षांपूर्वी पहिली कविता लिहिली होती. आहे ना गूढ गंमत? 

आता मी प्रसिद्ध कवी नाही म्हणून ठीक! नाहीतर या कवितेचा कुणी काय काय अर्थ लावला असता हे पाहणं मनोरंजक ठरलं असतं. असो.

 तर ही कविता. 

दुःख सरण्याचे नाही, 
दुःख हरण्याचे नाही, 
कळ धुम्मस मनात,
दुःख विरण्याचे नाही. 

दुःख मातले थोडेसे, 
दुःख आतले थोडेसे, 
वसा विरक्तीचा घेता, 
दुःख बेतले थोडेसे. 

काही उणे, बाकी दुणे, 
जगण्याचे ताणेबाणे, 
थेंब पावसाचा नाही, 
आणि पीक सोळा आणे. 

भग्न काळोखली रात, 
जन्म पारखले सात, 
घाव झेलून पडता, 
मंद थरथरे हात. 

दाही दिशा सुप्त शब्द, 
मालक हा मुक्त शब्द, 
देह मनाला सांधतो, 
ताणलेला तृप्त शब्द! 

 पुणे २७  ऑक्टोबर २००९ २०.००

Monday, October 26, 2009

९. भेट कवीचीः कवितेद्वारा

एखादा कवी किंवा एखादी कविता आपल्याला नेमकी का आवडते?  या प्रश्नाचं उत्तर काही आजतागायत मला मिळालेलं नाही. कोणत्या परिस्थितीत, कोणत्या मनःस्थितीत आपण त्या कवितेला सामोरे जातो यावर बरंच काही अवलंबून असतं असं मला वाटतं. "कविता कळणे" या संकल्पनेवर माझा फारसा विश्वास नाही - हे मत योग्य की अयोग्य यावर बरीच चर्चा होऊ शकते, तुमचं मत वेगळं असू शकतं, हे मला मान्य आहे. पण माझ्या दृष्टीने "कविता भावणे" जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच एखादी कविता का आवडली हे आपल्याला प्रत्येक वेळी सांगता येतंच असं नाही.

कुसुमाग्रजांची ही मला अतिशय आवडणारी एक कविता.
एक आठवण पण.

"कुसुमाग्रज प्रतिष्ठान"ने १९९६ मध्ये "साहित्यभूषण" परीक्षा घेतली. मी स्पर्धा, पुरस्कार असल्या भानगडींपासून साधारणपणे चार हात दूर राहते. पण कुसुमाग्रजांचं नाव जोडलेलं असल्यान मला या परीक्षेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. योगायोगाचा भाग असा की मी त्या परीक्षेत पहिली आले. पुरस्कार वितरणाचा सोहळा नाशिकमध्ये होता, त्याचं मला आमंत्रण आलं. मी त्यावेळी एका संघटनेचं पूर्ण वेळ काम करत होते. त्यामुळे व्यक्तिगत असं माझं काहीच नव्हतं - पैसेही नव्हते. पण संघटनेतील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी त्याच दिवशी एक बैठक नाशिकमध्ये ठेवली. मला त्यांची हुशारी कळली. पण कुसुमाग्रजांना भेटता येईल या आनंदात मी त्याच्याकडे डोळेझाक केली.

समारंभाच्या जागी पोचल्यावर "कुसुमाग्रजांना भेटता येईल ना मला?" असा संयोजकांना माझा पहिला प्रश्न होता.
"त्यांची प्रकृती बरी नाही, त्यामुळे कार्यक्रमाला येणार नाहीत ते", हे उत्तर ऐकून माझा चेहरा उतरला. "पण त्यांनी तुमच्या उत्तरपत्रिका वाचलेल्या आहेत आणि त्यांना त्या आवडल्या आहेत", संयोजकांनी माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. मी गप्पच झाले. आत्ता या क्षणी येथून निघून जावं असं मला प्रकर्षाने वाटलं. संयोजकांना बहुधा माझी दया आली. एकजण हळूच म्हणाले, "तसा तुमचा आग्रहच असेल तर भेटतील तात्यासाहेब तुम्हाला, पण त्यांना खरंच बरं नाही हो."

ते स्पष्टीकरण ऐकून जणू मी एकदम जागी झाले. "त्यांना त्रास होणार असेल तर मग नको भेटायला" असे म्हणून मी तो विषय संपवला.

मी केलं ते योग्य की अयोग्य?

मला असं वाटतं की कविता महत्त्वाची असते - तिच्यापुढे कवी थोडासा दुय्यमच ठरतो. कवी नाही भेटले तरी त्याच्या कवितेला आपल्याला भेटता येतं - अर्थात त्यालाही जरा जोरदार नशीब लागतच :-) 

आणि जेव्हा ती जीवनदृष्टी मांडणारी अशी एखादी अनोखी कविता असते, तेव्हा सर्वार्थाने ती कवीचीच भेट असते.

विजयासाठी माझी कविता
कधीच नव्हती
म्हणून तिजला भीती नव्हती
पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा
नव्हती बसली
म्हणून नाही भीती तिजला
मरणाची.

Friday, October 16, 2009

८. काही कविता: ४

थोडे अल्लड, थोडे हुकुमी

नव्हती कधीच कसली ग्वाही;

येता-जाता हसले किंचित

संपून गेले अलगद काही.


आता फुटकळ लागेबांधे

वाहून जरी हे जगणे नेणे;

परिणामांची सीमा लांघून

उरले अविरत - ते माझे गाणे!

१६ आक्टोबर २००९, पुणे, १५.१३

Tuesday, October 6, 2009

७. काही कविता: ३

ही तटबंदी
भक्कमशी
तू उभारली आहेस?
की आहेत
गूढ भास
माझ्याच मनाने रचलेले?

काल - परवाचा
शब्दांविनाही
अविरत संवाद
आणि आता अचानक
तुझ्यापर्यंत नेणारे
सारे पूल खचलेले...

खांद्यांवरचे भूत
जोजवत स्वप्नाळूपणाने
विराण, दिशाहीन
भटकताना अस्थिर
पाउल नकळत अलगद
तुझ्या तालावर नाचलेले....

आता पुन्हा एकदा
नव्याने इतिहास लिहिताना
दिसते बाष्कळ बरेच काहीबाही,
पण त्यातही अवचित एखादा
निर्लेप चिरा, पणती
भयाण विध्वंसक तांडवातून
थोडे आहे तर माझ्यापुरते वाचलेले!

पुणे, १४ मार्च २००९ २२.४५

Thursday, July 9, 2009

६. दरवेशी

"पण आपण चालावे. दरवेशी नसलो तरी.
 सोबत घेऊन आपली सावली. 
शोधावा नवा रस्ता. 
पायांना जर फुटल्याच आहेत दिशा 
आणि जर आहेतच गावे प्रत्येक रस्त्यावर, 
तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले. 
नाही तर आहेच रस्ता रस्त्यांना मिळणारा 
आणि ते रस्ते दुसरया रस्त्यांना मिळत जाणारे" 

 प्रभा गणोरकर यांची ही कविता गेली २५ वर्षे माझी अखंड सोबत करत आहे. ती मला नेमकी कोठे आणि कधी भेटली ते अजिबात आठवत नाही. पण त्याने काय फरक पडतो? तेव्हापासून ती माझ्या जगण्याचा अविभाज्य हिस्सा आहे. 

भटकंतीचे, शोधाचे अनेक प्रकार असतात. हेतू-विरहित भटकंतीलाही काही वेळा अर्थ असतो. या कवितेमुळे भटकंतीबाबत एक सखोल जाण माझ्यात निर्माण व्हायला मदत झाली. शोधाची अपरिहार्यता, त्यातली वेदना, त्यात असलेली अनिश्चितता, त्यातील अर्थहीनता ... आणि तरीही एक अथांग आशावाद फार ताकदीने हे शब्द आपल्यापर्यंत पोचवतात. आपणच आपल्याला आधार द्यायचा असतो हेही अटळ सत्य या शब्दांनी मला दिले. 

रस्ते असतातच; ते आपण शोधायचे असतात; ते मिळतात; हे लक्षात येऊन माझा जगण्यावरचा विश्वास बळावतो. दुसरा रस्ता शोधण्याची ऊर्मी ही कविता माझ्यात जागी करते!

Saturday, May 23, 2009

५. अनिलांचा ’पाऊस’

काल परवा पुण्यात आमच्या भागात वीज आणि ढग यांच्या दंगामस्तीसह पाऊस आला. अशा वेळी मला हमखास अनिलांची "पेर्ते व्हा" या संग्रहातली ही कविता आठवते. 

येत हा पाऊस येत पाऊस 
मातीचा सुटला मस्त सुवास

 झंझावात वाहे उठे वादळ 
आभाळास मिळे पृथ्वीची धूळ 

 मेघांनी भरून आकाश वाके
 भूमीस आपल्या छायेत झाके 

अवचित लवे वीज साजिरी 
होतसे मीलन अश्रूंच्या सरी 

गरजे बरसे आसुसलेला 
पहिला पाऊस उल्हासलेला

आला हा पाऊस आला पाऊस 
मातीचा भरला उन्मत्त वास.

Monday, April 13, 2009

४. काही कविता २

खेळ मांडलेला तेव्हा
त्याचे खुळखुळे झाले,

ललाटीच्या भग्न रेषा
पायतळी ठसे ओले,

इथे तिथे व्यर्थ व्यर्थ
सारे सारे क्षुद्र झाले,

नाही सुटले काहीही
त्याने भलतेच केले,

खोळ काही काळ पुन्हा
मी टाकते गहाण,

आता त्याच्या पुण्याईला
उरे त्याचेच आव्हान

२७ फेब्रुवारी २००९ पहाटे ००.३० पुणे

Friday, March 13, 2009

३. भटकत फिरलो......

कवीला शब्दांमधून नेमकं काय सांगायचं असतं हा एक संशोधनाचा विषय... कवी सांगतात एक आणि आपण कदाचित त्याचा वेगळाच अर्थ लावतो... कवीने ते आपल्याला सांगितलेलं असतं का? ... एक अनुत्तरित प्रश्न...

"भटकत फिरलो भणंग आणिक
मिळेल तेथे पाणी प्यालो
जुळेल तेथे खूण जुळविली
परि होतो हा तसाच उरलो"

मर्ढेकरांनी १९५०च्या सुमारास लिहिलेल्या एका कवितेच्या या पहिल्या चार ओळी.....थेट मनाला भिडतात.... ठाण मांडून बसतात...

प्रत्येक वेळी या चार ओळी मला तितक्याच नव्या वाटतात. आपल्या देशात, संस्कृतीत विरक्तीचं, संन्यासाचं कौतुक आहे ... पण तो स्वेच्छेने असतो असं मानलं जातं म्हणून! भणंगपणा मात्र वाटयाला येतो... न मागताच... भटकंतीनंतरही तो उरतोच....तहान जागी ठेवून उरतो.

पहिल्या वाचनात या ओळी माझ्या अंगावर आल्या होत्या, त्यातली भीषणता, दाहकता मनाला चटका लावून गेली होती... कवितेची पुढ्ची तीन कडवी न वाचताच मी पान मिटून बसले होते..... आता अलिकडे मात्र या ओळी मला उदास करत नाहीत. "अखेर तसंच उरणार आहे" याची आठवण येऊन, या खटाटोपाची व्यर्थता जाणवून हसायला येतं ...

आपल्या भटकंतीचा शेवट आपल्या हातात आहे अशी मला आलेली आश्वस्तता किती खरी आणि किती खोटी हे काळच ठरवेल.... तेव्हा मला या ओळी आजच्यासारख्या वेढून टाकतील का?

Sunday, March 1, 2009

२. काही कविता: १

'अब्द शब्द'ची कल्पना आणि ही कविता यातलं कोण माझ्या मनात आधी आलं हे सांगणं अवघड आहे.....
म्हणून ही कविता या ठिकाणी....

चाल चालले मी
श्वास राहिला पेटता
पाणी उसळले किती
गूढ डोहाने जपता

जाणत्याला सारे भय
तण माजताना रानी
मस्तवाल झाले मी
त्याने तुला काय हानी?

वाया गेले एक तप
पुढे चालू राही धंदा
तुला नाही सुख दु:ख
तू रे पल्याड गोविंदा!

२६ फेब्रुवारी २००९ पुणे सकाळी ७.४०

Saturday, February 28, 2009

१. अब्द शब्द

आपली शब्दांशी जवळीक स्वाभाविक असते.... काहींच्या बाबतीत ती केवळ नेणीवेत राहते तर काहींच्या आयुष्यात ती खुलेपणाने प्रकट होते. सुदैवाने शब्दांची मला नेहमीचा सोबत राहिली.  

कविता हे शब्दांचं एक अनोखं रूप .... 'अब्द शब्द'मध्ये  मला आवडलेल्या कविता तुम्हाला वाचायला मिळतील ... ... काही माझ्या कविता असतील.... तुमची तयारी असेल तर तुमच्याही शब्दांना येथे जागा असेल .... 

शब्दांसाठी ही एक वेगळी जागा.