जन्माला येताना बहुतेक मी परमेश्वराला ‘मला भरपूर जग दाखवणार असशील तरच जन्म घेईन’ अशी काहीतरी अट घातली असणार. कारण मी खूप प्रवास करते. माझ्या या प्रवासाची इतरांना चिंता वाटत राहते. उगाच त्यांना बरंं वाटावं म्हणून दरवर्षी मी ‘यंदा प्रवास कमी करायचा’ असा संकल्प करते खरी – पण तो कधीच साध्य होत नाही. कारण मी त्यासाठी कधी प्रयत्न करत नाही. मला प्रवास करायला आवडतं. सकाळी जाग आल्यावर ‘आज आपण नेमके कोणत्या गावात आहोत’ असा प्रश्न मला पडला की तो दिवस माझ्यासाठी चांगला जातो. म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी असते. शिवाय एका ठिकाणी फार काळ राहिलंं की मला कंटाळा यायला लागतो. माझ्यासाठी स्थिरता जणू शाप आहे. मी अस्थिर असले की जास्त जागीं असते आणि सगळ्या सभोवतालाशी जोडलेली राहते. म्हणून मला भटकत राहायला आवडतं!
अशा ब-याच प्रवासांमध्ये मी बहुतेक एकटीच स्त्री असते – बाकी सगळे सहकारी पुरुष असतात. तीनपेक्षा जास्त लोक एकत्र प्रवास करत असू तर चारचाकी घेऊन जायची अन्यथा सार्वजनिक वाहतूकं व्यवस्थेचा वापर करायचा अशी माझ्या आधीच्या ऑफिसमधली पद्धत होती. माझे सगळे सहकारी नेहमी चांगले होते. त्यांच्याबरोबर एकटीने प्रवास करताना मला कधी माझ्या सुरक्षिततेची काळजी करावी लागली नाही; कारण ते सगळे माझी खूप काळजी घ्यायचे – कधी कधी वैताग यावा इतकी काळजी घ्यायचे!
समाजात वावरताना कोणी कोणाशी कसं वागायचं याचे फार पारंपरिक दृष्टिकोन आहेत हे नेहमी अनुभवाला येतं. मी या ठिकाणी दोन फायदा देणा-या भूमिकेत असायचे – एक तर आधी म्हटल्याप्रमाणे पुरुष सहका-यांत मी एकटी स्त्री असायचे आणि मी नेहमीच संस्थेच्या मुख्यालयातून आलेली असायचे. आपल्याकडे ज्याचा/जिचा अधिकार (म्हणजे पद) मोठं, त्या व्यक्तीला सर्वात चांगल्या सुखसोयी मिळतात – म्हणजे बसायला सगळ्यात चांगली खुर्ची , रहायला सगळयात चांगली खोली , सगळ्यात चांगल्या कपात चहा – बहुधा तो अधिक चांगलाही असतो! साहेबाला पाण्याचा पहिला ग्लास मिळतो आणि कोणत्याही चर्चेत अंतिम शब्द त्यांचाच असतो! मी जिथं काम करायचे तिथं साहेब आले की सगळ्यांनी उठून उभं राहायचं अशी प्रथा होती. असं कोणी उभं राहत असलं की त्याला तिला आपल्याबद्दल आदर असतो असं माणसं का समजतात देव जाणे!
आमच्याकडे माणसाचा अधिकार, त्याचे/तिचे पद दाखवण्याची आणखी एक पद्धत अशी होती की चारचाकीत सगळ्यात वरिष्ठ अधिका-याने पुढे बसायच. मला ते सगळच विनोदी वाटायच. पण कोणाही अधिकारी माणसाला हे बदलायला सांगितलं की त्यांना राग येतो. माझ्या एका वरिष्ठ सहका-याला मी “मी आलो की तुम्ही उभ राहायची गरज नाही अस का सांगत नाही” अस म्हटल्यावर त्याने मला इतकचं म्हटलं की, “तू उभी रहात नाहीस म्हणून मी कधी तक्रार केली आहे का?” - खर म्हणजे सौम्य शब्दांत ती तक्रारच होती माझ्याबद्दल. लोकांना सहसा आपले अधिकार सोडायचे नसतात असा निष्कर्ष काढून मी गप्प बसत असे.
पण माझ्यापुरत्या असल्या प्रथा मी कधी पाळत नसे. लोकाना जे काही सांगायच ते आपल्या कृतीतून दिसायला पाहिजे नुसत्या समतेच्या आणि माणुसकीच्या मोठमोठ्या गोष्टी बोलून काय उपयोग? त्यामुळे चारचाकीतून प्रवास करताना मी नेहमीच एकदम मागे जाऊन बसत असे आणि माझ्या सगळ्यात नव्या सहका-याला पुढे बसायची विनंती करत असे. माझ्या परीने अधिकार असे मोडून काढण्याचा माझा प्रयत्न असे. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात त्यांचे काम असते त्यामुळे त्याचा आदर करायला पाहिजे अशीही त्यामागे भावना होती. (म्हणजे एका अर्थी मी ज्याचा अधिकार जास्त त्याला पुढची जागा या संकल्पनेची बळी होतेच म्हणा!) माझ्या नव्या सहका-यांना ते तितकस पटायचं नाही – “ताई. तुम्ही पुढे बसा” असा मला ते आग्रह करायचे. पण माझ्यापुढ त्यांच काही चालायच नाही – हाही एका अर्थी अधिकाराचा गैरवापरच होता! अस सगळ सुरळीत चालू होत.
पण एक प्रसंग मात्र असा आला, की आम्हाला बदलाव लागल आमच्या मनाविरुद्ध!
आम्ही एका आदिवासी पाड्यावर गेलो होतो कामासाठी. तिथ स्त्रियांचा आणि पुरुषांचा एक मोठा गट आमची वाट पहात होता. जिथं त्यांनी बैठक आयोजित केली होती, तिथ आम्ही गेलो. मी त्या बैठकीतली मुख्य वक्ता होते (खर तर एकमेव वक्ता होते अस म्हणायला पाहिजे!) मी अर्थात मोठ भाषण फारस कधी देत नाही. आम्ही अनेक विषयांबर गप्पा मारल्या. तिथल्या लोकांच जगण, त्यांच रोजच काम, आरोग्याचे प्रश्न, रोजगाराची संधी, मुलीचं शिक्षण, सामाजिक प्रश्न, बाजार, लाकूडफाटा, रेशनच दुकान, दारू .. अशा अनेक मुद्द्यांवर आम्ही तीन एक तास बोललो. सगळ्या प्रश्नांना एकदम हात घालण्यात अर्थ नाही यावर सहमती झाल्यावर आम्ही पुढच्या काळासाठी काही प्रश्न प्राधान्याने निवडले. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपल् जगण अधिक चांगल कस करायचं यावर आम्ही भर दिला. निवडलेल्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काय उपाय करावेत, कोणी काय जबाबदारी घ्यायची अशीही आमची चर्चा झाली. पुढच्या तीन महिन्यांची सविस्तर योजना सर्वांनी मिळून ठरवली. मग आम्ही काही घरांत गेलो. आधी सुरु झालेल्या कार्यक्रमांची काय स्थिती आहे त्याची पाहणी आणि समीक्षा झाली. एकूण बैठक आणि भेट समाधानकारक झाली.
मग आम्ही खास आदिवासी जेवणाचा आस्वाद घेतला. दुपार झाली होती, भूकही लागली होती, काम चांगल झाल होते आणि लोक प्रेमाने आणि आग्रहाने खायला घालत होते. त्यामुळे मी नेहमीसारखी जास्तच जेवले. मग आमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. प्रत्येक स्त्री पुरुषाने पुढे येऊन हात हातात घेतला – हल्ली ‘नमस्कारा’ ऐवजी आदिवासींची पण handshake ला पसंती असते.
आम्ही जेव्हा आमच्या चारचाकीच्या जवळ पोचले, आणि मी सवयीने मागच्या सीटकडे वळले, तेव्हा एका स्त्रीने विचारल, “ताई, तू पुढ नाही बसणार?”
त्यावर मी काही उत्तर देण्याच्या आत दुसरी स्त्री म्हणाली, “ताई कशी पुढ बसलं इतके भाऊ (पुरुष) सोबत असताना? कितीही हुषार असली आणि कामाची असली तरी बाईची जागा नेहमी मागच असते!”
त्या उद्गारांनी मी थक्क झाले. बिचारे माझे सहकारी! त्यांची काहीही चूक नसताना त्यांच्यावर असा आरोप होत होता. एकदा मला वाटलं की त्या स्त्रीला स्पष्टीकरण द्याव मी का माग बसते याच – पण तिच्या चेह-याकडे पाहून मी माझा विचार बदलला. माझ्या सहका-यांचे चेहरेही भलतेच गंभीर झाले होते. मी त्या सगळ्यांकडे हसत पाहून म्हटल, “अग, हातातली bag माग ठेवून निवांत पुढ बसणार आहे! हे सगळे भाऊ आहेत ना आपले ते काही बायांची जागा मागच आहे अस मानत नाहीत – उगीच का बिचा-यांवर असा आरोप करतेस तू?”
माझ्या या बोलण्यावर वातावरण एकदम निवळलं, सगळे हसले आणि आम्ही पुढे निघालो.
मला अस लक्षात आलं की माझ बोलण आणि माझ वागण यातून एकदम विरोधाभासी संदेश स्त्रियांना मिळत होता. बैठकीत मी ‘स्त्रियांनी पुढ आलं पाहिजे’, ‘पुरुषांनी स्त्रियांना समान वागणूक दिली पाहिजे’ असल्या गोष्टी बोलत होते आणि आमची कृती मात्र नेमकी त्याच्या विपरीत घडत होती. स्त्रियांच्या सबलीकरणाबद्दल बोलणारी मी प्रत्यक्षात त्यांच्यासमोर ‘निर्बल’ स्त्रीच चित्र सादर करत होते – जरी त्यामागे आमची वेगळी भूमिका असली तरी त्या स्त्रियांना अथवा पुरुषांना ती माहिती असण्याच काही कारण नव्हत!
आपण जे बोलतो, त्यानुसार कृती करण सार्वजनिक जीवनात फार महत्त्वाच असता. आपल्या बोलण्याला एक संदर्भ असेल आणि वागण्याला दुसरा तर लोक गोंधळतात – काही गोष्टी फक्त बोलायच्या असतात, तस वागायची काही गरज नसते अस समजून चालतात. मी जे बोलते तशी माझी प्रतिमा निर्माण करण – अर्थात खोटी नाही तर प्रामाणिक – ही माझी जबाबदारी होती – ज्याचा मला आजवर विसर पडला होता. जरी काही गोष्टी माझ्या संदर्भात कृत्रिम ठरत असल्या तरी लोकांच्या संदर्भात त्याच महत्त्व होत – आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ते माझ्या वागण्याचा अर्थ लावणार हे विसरून चालणार नव्हत!
त्या दिवसापासून मी आणि माझ्या सहका-यांनी एक नियम केला. एखाद्या गावात प्रवेश करताना कमी लोक हजर असतात – त्यामुळे तेव्हा मी मागे बसून जायला हरकत नाही. पण गावातून निघताना बरेच जण पोचवायला येतात – तेव्हा मात्र मी पुढच बसायच. मला वाटत म्हणून नाही – तर स्त्रीही पुढे बसू शकते, पुरुषही संवेदनशील असतात – असा स्पष्ट संदेश देण्यासाठी. मला आणि माझ्या सहका-यांना याची गरज नव्हती पण आमच्या कामाच्या दृष्टीने याची गरज होती. मी चारचाकीत पुढे बसताना गावातल्या स्त्रिया ज्या कौतुकाने हसतात – ते माझ कौतुक नसत, ते त्यांच्या भविष्याच एक स्वप्न असत. ते स्वप्न खर होऊ शकत हे त्यांना पुन्हापुन्हा सांगण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी मला न आवडणा-या काही गोष्टी मला करायला लागल्या तरी माझी हरकत नाही. गावातल्या स्त्रियांच्या इच्छा आणि आकांक्षा माझ्या आवडी-निवडीपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत – कारण त्यांनी न बोलावताच मी त्यांच्या आयुष्यात आले आहे. म्हणून त्यांच्या भावनांची कदर करण आवश्यक आहे. माझ्या जगात मी जे पाहिजे ते करू शकते, त्यांच्या जगात त्यांच्या स्वप्नांना धक्का बसेल अस मी काही करू नये. माझ्यात आणि माझ्या सहका-यांत जोवर संवाद आणि सामंजस्य आहे तोवर अशा प्रतिमा निर्मितीतून आमचेही काहीच बिघडत नाही!
**
You mean one can be different in different spheres - public and private?
ReplyDeleteWonderful!
ReplyDeleteRavindra Desai
छान अनुभव. मांडणी पण सुरेख.
ReplyDeleteविचार आणि कृतीमधे एकवाक्यता किती महत्वाची असते... विशेषत: अशा ठिकाणी. अनुभवानेच शिकत जातो आपण अनेक गोष्टी. :)
ReplyDeleteएकच घटना विभिन्न दृष्टिकोनांतून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न.. नेहमीप्रमाणेच !! अप्रतिम लेखन..
ReplyDelete>>कितीही हुषार असली आणि कामाची असली तरी बाईची जागा नेहमी मागच असते!”
ReplyDeleteहे वाक्य कसलं डोक्यात जातं..आणि साधारण हे बोलणारी व्यक्ती खुपदा बाईच असते...एक निरीक्षण..
बाकी तुमचे अनुभव सगळे एकदम ultimate आहेत...:)
सविता नेहेमीप्रमाणेच लेख पटला, आवडला... "प्रतिमा निर्मीती " ही एक अत्यंत महत्त्वाची बाजू असते नाही एकूणच आयूष्यात.... त्यातही ही आपल्यासाठी नसून बाकि कोणासाठी असेल तेव्हा तो प्रयत्न जास्त भावतो... एक वेगळंच समाधान देणारा!!!
ReplyDeleteबऱ्याच दिवसांनी ब्लॉग्स वाचतेय... तुमच्या सगळ्या पोस्ट एक एक करून वाचायच्या आहेत आता....
Anonymous, honestly speaking, are not we?
ReplyDeleteThanks Ravindra Desai Sir.
ReplyDeleteसाधकजी, आभार.
ReplyDeleteभाग्यश्री, फक्त अडचण अशी की एकदा शिकून संपत नाही .. कधी कधी नेमक त्याच्या एकदम उलटही शिकावं लागत :-) म्हणजे परिस्थिती आणि माणस शिकवतात आपल्याला.
ReplyDeleteहेरंब, मी कधीतरी म्हटल होत तसं दोन्ही बाजू पाहण्याचे तोटे भरपूर असतात ..पण फायदेही असतात!
ReplyDeleteअपर्णा, 'जिच जळत तिलाच कळत' अशी बहुधा स्थिती असावी स्त्रियांची याबाबतीत!
ReplyDeleteतन्वी, ब-याच काळाने तुम्ही फिरकलात इकड! मेलही मिळाली - लिहिते नंतर सवडीने.
ReplyDeleteखरच ग कधी कधी करावी लागते अशी प्रतिमा निर्मिती कोणाच्या तरी समाधानासाठी ...मस्तच लेख ... :)
ReplyDeleteदेवेन, हो असे प्रसंग येतात खरे!
ReplyDelete