(१)
"श्रीरंग.."
कोणीतरी कोणालातरी मोठया आवाजात हाका मारत होतं. बराच वेळ झाला तरी त्या चालूच होत्या.
‘बहुतेक तो श्रीरंग का कोणी तरी कुंभकर्णासारखा
झोपलेला दिसतोय’
असं
त्याच्या मनात आलं. त्या हाका इतक्या जवळून ऐकू येत होत्या की डोळे मिटून पडून राहणं
त्याला अशक्य झालं. माझ्याच घरात येऊन कोण
हे कोणत्या श्रीरंगला हाका मारताहेत आणि तो बेटा कुठे गायब झाला आहे असा प्रश्न मनात
येऊन त्याच्या कपाळावर नकळत एक आठी चढली.
त्याने
डोळे उघडून पाहिलं आणि तो दचकलाच. एक तर तो घरात नव्हता. भोवताली एक नजर टाकल्यावर
तो हॉस्पिटलमध्ये आहे हे लक्षात आलंच त्याच्या. त्याच्या पलंगाभोवती गर्दी होती - त्यातले
फक्त
डॉक्टरांचे
चेहरे अनोळखी होते. बायकोचा, मुलीचा आणि मित्राचा चेहरा पाहून त्याला क्षणभर काही सुचलं
नाही. त्याला काय झालं होतं?
तो
इथं का होता? काय झालं होतं त्याला?
"श्रीरंग.."
तो दचकलाच पुन्हा. रेवा,
त्याची बायको, त्याला 'श्रीरंग' का म्हणत होती?
"रंग्या,
नशीब आमचं .. काय रे घाबरवलंस आम्हाला ...." हा त्याचा दोस्त नीतिन. नीतिन तसा भावूकच, पण यावेळी त्याचे डोळे पाणावले होते
म्हणजे परिस्थिती गंभीर होती तर! पण 'रंग्या' कोण?
"बाबा..." त्याचं पिल्लू धावत त्याला बिलगायला
आलं. लेकीचा तो एरवी
आधार
शोधणारा पण या
क्षणी
आधार देणारा निरागस स्पर्श त्याला नेहमीप्रमाणे हळवा करून गेला. त्याचे डोळे त्याच्याही नकळत भरून आले.
हे
स्वप्न नव्हतं तर! मग ही 'श्रीरंग'ची भानगड काय होती? 'नीट काही खुलासा होईपर्यंत गप्प बसायचं'
असं स्वतःला सांगत सगळ्यांकडे पाहून तो हलकेच हसला आणि लेकीचा - वेदिकाचा -
हात गच्च पकडत पुन्हा त्याने डोळे मिटून घेतले.
"आता
त्यांना त्रास देऊ नका. औषधांमुळे झोप येणार त्यांना सारखी. पण त्यांनी ओळखलं तुम्हाला
सगळ्यांना म्हणजे चिंतेचं
काही
कारण नाही. बोलायला थोडा वेळ जाऊ द्या, अशक्तपणा आहे भरपूर. ..." डॉक्टरांचे दिलासा देत आहेत असे वाटणारे
शब्द
त्याला
आणखीच गोंधळात टाकून गेले.
*****
(२)
"काय
आहे प्रतिसाद WXK००३०९१००११४०४२०१२
चा?" त्याने विचारलं. "विचारलं" हा शब्द चुकीचाच. कारण तो काही बोललाच
नाही. त्याच्या मनातले विचार शब्दांविना इतरांच्या मनापर्यंत पोचले होते. त्याला ‘विचारांची लाट’ म्हणता येईल कदाचित.
"काही
प्रतिसादच नाहीये." दुसरा म्हणाला - म्हणजे परत मनातल्या मनात त्याने असा विचार
केला.
खोलीत
जमिनीपासून चार फूट अंतरावर कशाचाही आधार नसताना WXK००३०९१००११४०४२०१२ तरंगत होती. ती एक
स्त्री होती असा अंदाज करता येईल आपल्याला - इतरांनी तिचा जो उल्लेख केला त्यावरून. खोलीत
असलेल्या पाच लोकांपेक्षा ती थोडी वेगळी दिसत होती. तिचा वर्ण इतरांपेक्षा थोडा रापलेला
दिसत होता, कपडेही रंगीबेरंगी आणि वेगळेच होते. तिच्या चेहरा इतरांपेक्षा काहीसा वेगळा
दिसत होता, आणि
म्हणून
ते सारे गोंधळून गेले होते.
"आपला
प्रयोग आपल्यावरच तर नाही ना उलटला?" आणखी एकाने शंका व्यक्त केली.
"छे!
असं कसं होईल? सगळी तयारी तर नीट केली होती आपण. ज्याच्यावर प्रयोग करायचा तो WXK००३ वासी नीट पारखून
घेतला होता आपण. आणि WXK००३०९१००११४०४२०१२
च्या क्षमतांबाबत तर काही प्रश्नच नाही. हे काही तिचं पहिलं मिशन नाही, अनेक यशस्वी मिशनचा दांडगा अनुभव आहे तिला,"
आणखी एकाने उत्तर दिलं.
जिच्याबद्दल
ही चर्चा चालू होती ती WXK००३०९१००११४०४२०१२
जागी झाली;
तरी
तिने एकदम डोळे उघडले नाहीत. आपण काहीतरी वेगळ्या ठिकाणी आहोत हे एव्हाना तिच्या लक्षात
आलं
होतं. गेला काही काळ तिच्या सवयीचे, रोजच्या
जगण्याचा भाग झालेले वास, आवाज, सोबत नव्हते आज. वा-याची झुळूक नव्हती; वाहनांचे आवाज
नव्हते; खालच्या घरातून येणारे फोडणीचे वास नव्हते; पक्षांचा किलबिलाट नव्हता....
तिने
त्या सगळ्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला, पण तो तिला काही लागेना. ती पोचली होती का योग्य ठिकाणी? की नाही अजून?
नाईलाजाने
तिने डोळे उघडले. आपण अधांतरी आहोत हे पाहून ती किंचाळली - तिच्या त्या आवाजाने ते
भोवती उभे असलेले सगळे त्यांच्या स्वतःच्या
लक्षात येण्यापूर्वीच दचकले. या खोलीतच काय, या त्यांच्या विश्वात आजवर असं कोणी किंचाळलं नव्हतं. त्यातल्या एकाने तीक्ष्ण नजरेनं तिच्याकडं पाहिलं; आणि ती भानावर आली. 'आपण खाली पडणार' ही भीती निराधार आहे हे तिच्या लक्षात आलं.
काय
बोलावं
हे
न सुचल्याने ती गप्प बसली. तिच्याभोवती काहीतरी खुसफूस झाली, पण तिला काही कळलं नाही. "आपलं मिशन संपवून आपण परत
आलो आहोत, पण मिशनचं
काय
झालं? बाबूमोशायचं काय झालं? आपली भेट झाली का? का त्यापूर्वीच आपण
इथं परत आलो?" हे प्रश्न तिच्या मनात फणा काढून उभे राहिले. समोरचे लोक ओळखीचे
असूनही तिला आत्ता अनोळखी वाटत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात शहाणपणा आहे का
नाही याचा अंदाज येईपर्यंत गप्प बसणं
हितावह
आहे हे समजून तिने पुन्हा डोळे मिटून घेतले.
"तुमच्या
एक लक्षात आलं का, आपलं बोलणं तिच्यापर्यंत पोचत नाहीये. तिला अर्थच लागत नाहीये आपल्या
संवादाचा - म्हणून ती गोंधळलेली दिसतेय." आणखी एक जण 'बोलला'.
"तिचा
चेहरा असा वेगळा का दिसतो आहे आपल्या सगळयांपेक्षा?" एकाने न राहवून विचारलंच अखेर.
"हं!
पाहिलं मी ते माहितीकोषात.
हे जे दिसतं आहे त्याला त्या WXK००३०९१
च्या भाषेत 'समाधान' आणि 'आनंद' अशी नावं दिली आहेत. पण म्हणजे काय ते कुणास ठावूक! जरा लाईव्ह डेमो काही मिळतोय
का ते बघतो...." दुस-याचं स्पष्टीकरण.
"
या WXK००३०९१ च्या लोकांना
सगळ्या गोष्टींना नावं द्यायची सवय दिसते आहे. हे विशेष - कारण त्यांच नंबरांचं ज्ञान आपल्यापेक्षा कैक पटींनी प्रगत आहे
खरं
तर
.." स्वतःशीच कोणीतरी बोलला. त्यावर सहमतीच्या विचारांचे तरंग खोलीभर पसरले.
"पण
अशी भाषा विसरते? आपल्या सवयीची? आपण प्रशिक्षण घेतलेली? आपली मास्टरी असलेली? आणि तेही इतक्या कमी वेळात? विचित्र आहे हे..."
तिस-याची चिंता.
"अरे,
वेळ सापेक्ष असतो हे विसरू नकोस. आपण
तिला एकदम उचलून आणलं ना
WXK००३०९१ वरून. जे ठरलं होतं त्यापलिकडे
जायला लागल्या गोष्टी - मग घाई करावीच लागली. तिथं इतका काळ होती ती; स्पेस लॅग टिकणार थोडा वेळ. होईल ती पूर्ववत." बोलणारा बहुधा त्यांचा वरिष्ठ
असावा.
"ठीक
आहे. WXK००३०९१ वासीयांसारखं
बोलून बघू!
काही
उपयोग होतोय का
ते पाहू." त्याच वरिष्ठाचा
आदेश.
"
WXK००३०९१००११४०४२०१२,
तुला ऐकू येतंय ना मी काय बोलतोय ते? तू
सुखरूप घरी
परत
आली आहेस. काळजी करु नकोस. मिशन रिपोर्ट नंतर घेईन. पण थोडक्यात (समरी) सांग."
वरिष्ठाने आदेश दिला.
तिने
शांतपणे डोळे उघडले. तिला मिशन रिपोर्ट, काळजी, घर, समरी हे शब्द कळले. पण हे WXK००३०९१००११४०४२०१२ काय
होतं?
"माझं नाव आत्मजा आहे आणि हे माझं घर नाही," तिच्या या शब्दांवर खोलीत भीषण
शांतता पसरली.
“आपण
तिला काय नाव दिलं होतं? काहीतरी WXK००३०९१ टाईपचं होतं, पण आत्मजा
नक्कीच नव्हतं .. जरा बघ रे रेकॉर्ड! आणि हे सगळं घडत असताना काय करत होता रे तुम्ही? तिचं फक्त नाव बदललं
असेल तर ठीक. पासवर्ड पण बदलला असला तर आपल्या मिशनची काही धडगत नाही."-
बॉसच्या मनातली चिंता सगळ्यांचा थरकाप उडवणारी होती.
***
(३)
तो
हॉस्पिटलमधून घरी आला. अजून काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितली होती डॉक्टरांनी.
रेवाला त्याने आग्रह करून
ऑफिसला जायला लावलं होतं मागच्या दोन दिवसांपासून. रेवा जायची नऊ वाजता आणि एक वाजेपर्यंत वेदिका
यायची शाळेतून परत. मधल्या काळात कामाच्या मावशी असायच्या. एकटा नसायचा तो. तसा त्याला
काही त्रासही होत नव्हता म्हणा आता. सगळे त्याला 'श्रीरंग' म्हणत होते हे त्याने मान्य
केलं होतं. पण त्याला भीती वाटत
होती की, कोणी विचारलं "तुमचं
नाव
काय?" तर त्याला त्याचं खरं नाव सांगावं लागेल. तो श्रीरंग नव्हताच मुळी. तो तर
होता बाबूमोशाय. आता बंगाली नसताना त्याचं हे नाव कोणी ठेवलं, तो सोडून कोणालाच
हे नाव का माहिती नाही, आपल्याला काही स्मरणशक्तीचा विकार जडलाय का.. या विचारांनी
त्याच डोकं पिंजून गेलं होतं!
त्याला काही बंगाली कादंब-या वाचायची हौस नव्हती. मग हा बाबूमोशाय शब्द आला होता कुठून?
आणि सगळ्या गोष्टींवर पाणी फिरवून तो त्याच्या मेंदूत इतका स्पष्ट कधी कोरला गेला होता?
कोणाचं
होतं हे काम? काय असेल त्यांचा
हेतू? त्याला खूप भीती वाटली आतून. पण आपण श्रीरंग नाही, आपण बाबूमोशाय आहोत याचीही
त्याला तितकीच खात्री होती - त्या भीतीपेक्षाही ठसठसशीत.
तुकडयातुकडयांनी
त्याला कळलं होतं काय झालं होतं ते. एका रिसर्च
टीममध्ये सोशल सायंटिस्ट होता तो आणि सातपुडा परिसरात काम चालू होतं त्यांचं मागच्या
दोन वर्षांपासून. नेहमीप्रमाणे तो धडगावला
जायला निघाला होता. ते हल्ली त्याचं
दुसरं घर होतं! दर महिन्याची त्याची कामाची खेप. त्यात नवं कुणालाच काही नव्हतं. लोकांशी बोलायला गावात जायचं हेही सवयीचं. त्या दिवशी मात्र
तो अक्कलकुव्याकडून मोलगीकडे जाणा-या रस्त्यावर एकटा पडला होता. एका बाईकवाल्याची नजर
पडली, त्याने पोलिसांना कळवलं, त्याच्या संघटनेचे लोक होतेच तिकडे ... असं करत तो हॉस्पिटलमध्ये
पोचला होता तर. पण तो नेमका कसा
पडला ते त्याला आठवत नव्हतं.
काहीतरी
चाळा हवा डोक्याला दुसरा म्हणून त्याने लॅपटॉप उघडला. येस, जीमेल अकाउंट तर काही बाबूमोशाय नावाने
नव्हतं. - 'श्रीरंग जाधव' असं त्याला डॉक्टर म्हणाले होते
- त्याच नावाने खातं
होतं जीमेलचं. पासवर्ड होताच तिकडे स्वतःचा लॅपटॉप
असल्याने. त्याने मेलबॉक्स उघडला. मागच्या आठवडाभरातले सगळे निरोप 'लवकर बरा हो' या
थाटाचे. ती सगळी नावं ओळखीची होती. त्यांना तो नावानिशी, चेह-यानिशी ओळखत होता.
मागे
मागे जात राहिला तो आणि एकदम थबकला. मेल होती आत्मजाची. ही त्याची नवी मैत्रीण. कुठल्यातरी
मराठी संस्थळावर एकमेकांचे लेख वाचून लिहिलेले प्रतिसाद, त्यातून आधी व्यक्तिगत निरोप
आणि मग जीमेलवर गप्पा. फोनही झाले होते एक दोनदा. आत्मजाशी त्याच्या असलेल्या मैत्रीत
जगापासून लपवण्यासारखं काहीच नव्हतं.
त्याने रेवालाही एकदा सांगितलं
होतं
आत्मजाचा
एक लेख वाचायला.
आणि
मग त्याला एकदम आठवलं, ‘बाबूमोशाय’ हे आत्मजाने त्याला दिलेलं एक संबोधन. त्याला अजिबात
आवडलं नव्हतं
ते
आधी. कोण कुठली अनोळखी बाई,
लाडाने
काहीतरी नाव देतेय आपल्याला हेच त्याला विचित्र वाटलं होतं आधी. आभासी जगात तो
काही नवा नव्हता त्यामुळे कशापासून किती जपून राहायचं आणि कशात किती गुंतायचं याचे
त्याचे आडाखे होते आणि आजवर तो कधी चुकला नव्हता. पण कसं काय कुणास ठावूक, आत्मजाला
विरोध करणं त्याला काही जमलं नव्हतं. कदाचित ‘सातपुडा’ दोघांच्याही जिव्हाळयाचा विषय म्हणाल्यावर बाकी मुद्दे मागं
पडत गेले. आधी नाईलाजाने मान्य केलेलं ते नाव त्याला कधी आणि कसं आवडायला
लागलं हे मात्र त्याला अजिबात आठवेना.
मग
पुढची मेल वाचून त्याला आठवलं की त्या दिवशी आत्मजाही काही कामानिमित्त मोलगीत असणार
होती. तिला भेटायचं म्हणून तर तो तिकडे चालला होता. पण मधेच काहीतरी गडबड झाली होती.
तो आजारी पडला होता. पण मग आत्मजाचं काय झालं होतं? ती कुठे होती? त्याने परत एकदा स्क्रोल
केलं - त्याच्या आजारपणाच्या दिवसापासून तिची एकही मेल नव्हती. रागावली असणार ती. त्याने घाईघाईने तिचा नंबर लावला
"यह नंबर मौजूद नही हैं, कृपया नंबर चेक कीजिये.." हेच त्याला वारंवार ऐकू
येत होतं. त्याच्या लक्षात आलं,
की आत्मजाला ओळखणारी दुसरी कोणतीही व्यक्ती त्याला माहिती नाही. जिथं ते दोघं भेटले होते, त्या मराठी
संस्थळावर तो डोकावला- पण तिथंही गेला आठवडाभर आत्मजाच्या वावराच्या काही खुणा नव्हत्या.
त्याला
अपघात किंवा अचानक कसलातरी आजार होणं; त्या दिवसापासून आत्मजाचं गायब होणं; त्याला स्वतःच्या
नावाचा पूर्ण विसर पडून आत्मजाने गंमतीने दिलेलं नाव त्याच्या मनावर स्वार होणं
... काय चाललं आहे हे सगळ? श्रीरंगला काही सुचेनासं झालं. रेवाला फोन करावा असं त्याला
वाटलं - पण नको. त्याच्या मूर्खपणाची शिक्षा तिला कशाला?
'आत्मजा' हा एक विनोद होता कोणीतरी त्याच्याशी केलेला, तो विसरून जाण्यात शहाणपण आहे हे त्याच्या
लक्षात आलं. ‘बाबूमोशाय’ नाही, ‘श्रीरंग जाधव’ - त्याने स्वत:ला ठणकावून सांगितलं.
****
(४)
"ठीक
आहे. WXK००३०९१००११४०४२०१२ नॉर्मल होईपर्यंत 'निरीक्षक टीम'ने प्रयोगाबद्दलचे
आपले निष्कर्ष मांडावेत." बॉसने आदेश दिला.
"अगदी
प्राथमिक निष्कर्ष आहेत. WXK००३०९१००११४०४२०१२
शी बोलल्यावर आणि परिस्थितीचा अधिक सखोल अभ्यास केल्यावर यात काही बदल होऊ शकतात," एकाने प्रस्तावना केली. पुढे तो म्हणाला:
१.
WXK००३ ग्रहावरच्या आणि
त्यातही विशेषत: ०९१ या प्रदेशातल्या लोकांचं आपल्या नावावर विशेष प्रेम असतं असं दिसून
येतं. हे नाव आयडेंटिटी नंबरपेक्षा जास्त
काहीतरी आहे हे नक्की. आजवर स्त्री समजल्या
जाणा-या व्यक्तींना नावाबद्द्लचं हे प्रेम जास्त असत असं मानलं जात होतं; पण आपल्या प्रयोगावरुन असं
दिसतंय की पुरुष समजले जाणारे व्यक्तीही याला अपवाद नसतात. यावर अधिक संशोधन करण्याची
गरज या प्रयोगाने पुढे आणली आहे.
२.
एक स्त्री पुरुषाच्या भावविश्वात नव्या ओळखीने, नव्या नावाने खळबळ माजवू शकते असा प्राथमिक
निष्कर्ष आहे. पण आता इथं WXK००३०९१००११४०४२०१२
ची स्थिती पाहता हा निष्कर्ष दोन्ही बाजूंनी खरा आहे की काय हे अधिक तपासून पहायला
पाहिजे.
३.
WXK००३ ग्रहावरचे आणि त्यातही विशेषतः ०९१ या प्रदेशातले लोक एका नव्या ओळखीच्या शोधात
आहेत का? त्यांच्या परंपरेशी या नव्या ऊर्मीचे नाते काय? ०९१ सोडून इतर प्रदेशात अशी
ऊर्मी आढळते की नाही? नसल्यास तो फरक नेमका कशामुळे होतो, असा एक व्यापक विषय समोर
येतो आहे.
४.
व्यक्तीची नवी ओळख होण्यात माहिती-तंत्रज्ञानाची भूमिका फार मोठी ठरू शकते असे स्पष्ट
संकेत मिळत आहेत.
५.
‘आभासी जग’ आणि ‘वास्तव जग’ असे दोन शब्द WXK००३
ग्रहावर वापरले जातात. या शब्दांचे नेमके अर्थ काय हे पहावे लागेल. फक्त आभासी जगात
वावरणारे लोक आणि फक्त वास्तव जगात वावरणारे लोक असा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल.
त्याचा सॅंपल साईज ठरवण्यासाठी एक उच्च पातळीवरची समिती नेमावी अशी आमची शिफारस आहे.
"एक
मिनिट" बॉसने निरीक्षक टीमला मधेच रोखले. "त्या ठिकाणचे, जिथं हे दोघं आपला
प्लान नसतानाही भेटणार होते - त्याचे कोऑर्डिनेट्स सांग जरा. काय म्हणतात WXK००३०९१ चे लोक त्याला? तिथं काहीतरी सापडेल." बॉस म्हणाला.
"21°59′N 74°52′E आहेत कोऑर्डिनेट्स आणि 'सातपुडा' म्हणतात त्या परिसराला," - एकाचे उत्तर
तयारच होते.
"या सगळ्या प्रकरणात त्या 'सातपुडा' नामक (पुन्हा
आणखी एक नाव!) जागेचा काहीतरी संबंध दिसतो आहे. मला वाटतं आपल्या प्रयोगाची आधीची दिशाच
साफ चुकलेली आहे." बॉसच्या बोलण्यावर सगळे शांत झाले. बॉस पुढची काही मिनिटं विचार करत राहिला. “हं! इंटरेस्टिंग! ग्रेट!
WXK००३०९१००११४०४२०१२ ची कमाल आहे! मिशन फसलं नाही हे! एका नव्या आयामाकडे जातोय
आपण आता. क्रेडीट गोज टू WXK००३०९१००११४०४२०१२,” बॉस बोलत होता.
"मग
आता? काय करायचं?"
कोणीतरी धीर करून विचारलं.
"पुन्हा
नव्याने सुरुवात. नव्या
प्रोजेक्टची सुरुवात. लागा कामाला. मागच्या
चुका पुन्हा करू नका. हे WXK००३
वरचे आणि विशेषतः ०९१ प्रदेशातले लोक दिसतात तसे नसतात. त्यांची मनं आपल्यापेक्षा वेगळी
चालतात याचं भान ठेवा. आणि हो, या प्रोजेक्टची लीडर असेल WXK००३०९१००११४०४२०१२.
तिचा नंबर बदलू नका आता, तोच ठेवा." थोडया वेळात मौलिक विचार करणं हे या बॉसचं वैशिष्ट्यच होतं!
“नाव काय देऊयात या प्रोजेक्टला?” बॉसने
WXK००३०९१००११४०४२०१२ कडे वळून विचारलं.
WXK००३०९१००११४०४२०१२ म्हणाली, “सातपुडा कॉलिंग”.
मग ती स्वतःशीच हसली. 'सातपुड्याची
हाक' इथंवर पोचली होती तर!