ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label वाचननोंद. Show all posts
Showing posts with label वाचननोंद. Show all posts

Wednesday, February 15, 2017

२४७. ‘लेटर्स फ्रॉम बर्मा’ (पुस्तक परिचय)


   १९९५ च्या नोव्हेंबर महिन्यात ऑंग सान सू ची (Aung San Suu Kyi) यांनी जपानच्या एका वृत्तपत्रात दर आठवड्याला एक पत्र लिहायला सुरूवात केली. ही पत्रमालिका एक वर्षभर चालू राहिली. ही पत्रं ‘पेंग्विन’ने पुढं पुस्तकरूपात प्रकाशित केली. तेच हे पुस्तक - ‘लेटर्स फ्रॉम बर्मा’. प्रत्येक आठवड्याचं एक अशी ५२ पत्रं या पुस्तकात आहेत.
    ऑंग सान सू ची यांचा परिचय नव्याने करून द्यायची गरज नाही. १९९१ मध्ये ‘शांतता नोबेल पुरस्कार’ मिळालेल्या सू ची यांनी बर्मा उर्फ म्यानमार देशात लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी १९८८ ते २०१५ अशी सत्तावीस वर्ष अविरत लढा दिला. त्यातला सुमारे पंधरा वर्षांचा काळ त्या यांगों (Yangon – पूर्वीचं ‘रंगून’) मधल्या घरात स्थानबद्धतेत होत्या. नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सू ची यांच्या ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ (National League for Democracy – एनएलडी) या पक्षाला बहुमत मिळालं. २००८ च्या राज्यघटनेनुसार सू ची राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. परंतु एनएलडीने त्यांच्यासाठी ‘स्टेट कौन्सेलर’ हे नवं पद निर्माण केलं. एप्रिल २०१६ पासून सू ची परराष्ट्र मंत्री आणि ‘स्टेट कौन्सेलर’ अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतात.

पण १९९५ मध्ये मात्र चित्र खूप वेगळं होतं. देशात लष्करी सत्ता होती. लोक दबलेले होते. सू ची यांची नुकतीच म्हणजे जुलै महिन्यात सहा वर्षांच्या स्थानबद्धतेतून सुटका झाली होती, पण सगळ्या हालचालींवर लष्कराची कडक नजर होती. देशात सातत्याने मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जात होतं आणि लष्करी सरकार आंतरराष्ट्रीय दबावाला भीक घालत नव्हतं. सू ची यांचे सहकारी विनाकारण तुरूंगात डांबले जात होते. लोकांना बदल हवा होता.

सू ची यांनी लिहिलेल्या पत्रांत एनएलडीचे विविध कार्यक्रम, एनएलडीमधले त्यांचे सहकारी आणि तत्कालीन लष्करी सरकारच्या दडपशाहीचा यांच्याबाबत अनेक उल्लेख असले तरी हा पत्रसंग्रह फक्त राजकीय विषयावर नाही. बर्माचं सास्कृतिक वातावरण, इथले सण आणि उत्सव, इथला निसर्ग, इथले खाद्यपदार्थ, इथले मठ, अशा अनेक नोंदी पत्रांत आहेत. त्यामुळे या पत्रातून केवळ राजकीय लढ्याची नव्हे तर देशातल्या लोकांचीही ओळख होते. निवांत बसून कुणीतरी आपल्याला त्यांच्या देशाबद्दल सांगावं अशी पत्रांची शैली आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जगतानाही सू ची यांना इतकं अभिनिवेशरहित कसं काय लिहिता आलं असेल याचं नवल वाटत राहतं.

सर्व पत्रं अत्यंत रसाळ शैलीत लिहिली आहेत. बावन्न पत्रांमधून एक किंवा दोन पत्रांतला एखादाच परिच्छेद निवडणं हे महाकठीण काम आहे. त्यामुळे नमुन्यादाखल इथं फक्त दोन परिच्छेद देते.

पान १७ वर सू ची लिहितात (पत्र क्रमांक चार) : Some have questioned the appropriateness of talking about such matters as metta ( loving-kindness) and thissa (truth) in the political context. But politics is about people and what we had seen in Thamanya proved that love and truth can move people more strongly than any form of coercion. (Thamanya इथल्या मठाने अनेक लोकोपयोगी कामं लोकसहभागातून केली. याबद्दल सविस्तर माहिती पुस्तकात आहे.)

पान क्रमांक ६५ वर (पत्र क्रमांक १६) ‘युनियन डे’च्या निमित्ताने सू ची लिहितात: Unity in diversity has to be the principle of those who genuinely wish to build our country into a strong nation that allows a variety of races, languages, beliefs and cultures to flourish in peaceful and happy co-existence. Only a government that tolerates opinions and attitudes different from its own will be able to create an environment where people of diverse traditions and aspirations can breathe freely in an atmosphere of mutual understanding and trust.

म्यानमामध्ये येऊन चार महिने उलटून गेल्यावर मी ‘लेटर्स फ्रॉम बर्मा’ वाचायला घेतलं हे एका अर्थी ठीकच झालं. हे पुस्तक म्यानमामध्ये येण्यापूर्वी किंवा आल्यावर लगेच वाचलं असतं तर कदाचित मला ते तितकं भावलं नसतं. सू ची यांच्या घराकडं जाणारा रस्ता, त्यापल्याड असलेला इन्या लेक, बगोकडं जाणारा रस्ता हे परिसर आता पायाखालून घातले असल्याने सू ची यांनी केलेल्या वर्णनाची मला नेमकी कल्पना आली.

गेले काही महिने मी सू ची यांच्या देशोदेशीच्या दौ-यांबद्दलची माहिती वाचते आहे, त्यांच्या भाषणांचे अहवाल वाचते आहे, त्यांच्या सरकारने घेतलेल्या (आणि न घेतलेल्या) विविध निर्णयांबद्दल टीकाटिप्पणी वाचते आहे. ‘एनएलडी’अंतर्गत एकवटलेल्या सत्तेबाबत वाचते आहे. एथनिक गट कसे नाराज आहेत याबद्दल वाचते आहे. मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत सू ची कशा मौन राखून आहेत याबद्दल वाचते आहे. सू ची यांच्याकडं पाहताना मला त्या एक कर्तव्यकठोर राजकीय नेत्या वाटतात. त्यांचं एक राजकीय उद्दिष्ट आहे आणि त्यापल्याड काही नाही अशी शंका येण्याजोगा त्यांचा वावर (आणि त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया) मला वाटतो.

‘लेटर्स फ्रॉम बर्मा’ वाचल्यानंतर सू ची एक आहेत का दोन आहेत असा प्रश्न मला पडला. सध्याच्या सू ची यांच्यात मला न दिसणारा (कदाचित त्यांच्या राजकीय पदाची ती मागणी असेलही) एक भावनिक ओलावा या पत्रांमध्ये मला दिसला. त्यांची नर्मविनोदी शैली आणि इतकं सोसूनही कडवटपणाचा लवलेश नसणं हे मला फार भावलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माणूस किती आशावादी असू शकतो हे या लेखनावरून कळतं. ही पत्रं मी वाचली नसती तरीही कदाचित मला म्यानमा देश आणि इथले लोक थोडेफार समजले असते. पण ही पत्रं मी वाचली नसती तर मी सू ची यांना समजून घेण्यात चूक केली असती हे मात्र नक्की.  

१९९५-९६ साली लिहिलेल्या या पत्रांनंतर एरावडी (इरावती) नदीतून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळेच या पत्रांचं ऐतिहासिक मूल्य अधिकच अधोरेखित होतं. पुस्तक एकदा तरी वाचावं इतकं नक्कीच महत्त्वाचं आहे.  
*****

संबंधित पोस्ट : राजबंदिनी

Wednesday, February 10, 2016

२३५. राजबंदिनी (पुस्तक परिचय)

हे पुस्तक बरेच महिने टेबलवर पडून होतं पण काही केल्या वाचायला मुहूर्त लागत नव्हता याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चरित्रनायिकेचं नाव स्पष्ट लिहिलं आहे आणि तिचं प्रकाशचित्रही आहे. या राजबंदिनीच्या आयुष्याबद्दल फार सविस्तर माहिती मला नसली तरी एकंदर तिचं आयुष्य संघर्षाचं आहे हे माहिती होतं. पण नुकतंच वाचलेल्या ‘मीना’चे ठसे अद्याप ताजे होते, तोवर आणखी एक तसंचं संघर्षमय आयुष्य वाचायची मनाची तयारी होत नव्हती आणि त्यामुळे पुस्तक माझी वाट पहात होतं.
पुस्तकाची – म्हणजे कथानायिकेच्या जीवनाची – सुरूवात तरी चांगली होती. तिचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि देशात त्यांना खूप मान होता. अवघं ३२ वय असताना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असणा-या तिच्या वडिलांची हत्त्या झाली-  ते वर्ष होतं १९४७ आणि तेंव्हा आपली कथानायिका होती अवघी दोन वर्षांची. वडिलांचा फारसा न आठवणारा सहवास तिला मिळाला तो अगदी थोडासाच, पण त्यांचा वारसा मात्र तिने चालवला – अर्थात त्यासाठी थोडीथोडकी नव्हे तर चाळीस वर्ष मध्ये जावी लागणार होती.
जानेवारी १९४८ मध्ये देश ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाला. नव्या सत्ताधीशांनी राष्ट्रपित्याच्या कुटुंबाला योग्य तो सन्मान दिला. चरित्रनायिकेची आई १९६० मध्ये भारतात राजदूत म्हणून आली त्यामुळे दोन वर्ष आपल्या कथानायिकेचं शालेय शिक्षण दिल्लीत झालं, तिने पदवीपर्यंतचं शिक्षणही दिल्लीत घेतलं. महात्मा गांधींच्या विचारांची ओळख या वास्तव्यात तिला झाली. पुढचं शिक्षण घेण्यासाठी ती ऑक्सफर्डमध्ये गेली. परक्या देशात वावरताना, तिथली संस्कृती समजून घेताना तिची स्व-विषयक जाणीव अधिक स्पष्ट होत गेली. इतरांना अभिनिवेशाविना मदत करण्याचा तिचा सहजस्वभावही तिथं प्रकट होत राहिला.
. कथानायिका ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. पण रोजचा बसचा प्रवास झेपेना म्हणून तिने ‘संयुक्त राष्ट्रसंघ’मध्ये एका विभागात साहाय्यक सचिवाची नोकरी स्वीकारली. दरम्यान आधुनिक इतिहासाचा अभ्यासक मायकेल कथानायिकेच्या प्रेमात पडला. पण कथानायिकेच्या नकाराचं होकारात रूपांतर होण्यात काही काळ गेला. एका ब्रिटीश माणसाशी लग्न करायचं यात पुष्कळ अडचणी होत्या. ज्या ब्रिटीश सत्तेविरूद्ध आपले वडील लढले, त्याच्या नागरिकाशी लग्न केलं तर कदाचित तिचे स्वदेशी परतण्याचे दरवाजे कायमचे बंद झाले असते. पण देशाला तिची गरज कधी लागली तर? तिच्या वडिलांचा देशकार्याचा वारसा असा तिला सोडून देता येणार नव्हता. तीन वर्ष या विचारांच्या आंदोलनात गेल्यावर आईच्या विरोधाला न जुमानता १९७२ मध्ये तिने मायकेलशी लग्न केलं आणि ती संसारात रमली. दोन मुलांचं संगोपन करता करता तिने स्वत:च्या वडिलांचं संक्षिप्त चरित्र १९८४ मध्ये लिहिलं.  हे चरित्रलेखन तिच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण ठरलं असं मागे वळून पाहताना दिसतं. कारण या संक्षिप्त चरित्रातून वडिलांचं जगणं पुरेसं व्यक्त झालं नाही असं वाटून सविस्तर चरित्र लिहिण्यासाठी मायदेशाबद्दल अधिकाधिक माहिती गोळा करायला लागली.
चरित्र लिहिताने तिने जे वाचन केलं त्यातून देशाचा इतिहास, इंग्रजी राजवट आणि देशवासीयांचा स्वातंत्र्यलढा, देशातले विविध वांशिक समूह याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी तिला मिळाली. ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ नीतिचे परिणाम तिचा देश स्वातंत्र्यानंतरही भोगत होता. स्वातंत्र्य मिळतानाच तिच्या मायदेशाला यादवीने ग्रासलं होतं. लष्कराकडून ही यादवी मोडून काढण्याचे प्रयत्न झाले होते. सप्टेंबर १९५८ मध्ये देशातली पहिली लष्करी राजवट सुरू झाली. एप्रिल १९६० ते मार्च १९६२ या काळात लोकनियुक्त सरकार देशात होतं, पण पुन्हा एकदा लष्कराने देशाची सूत्र हाती घेतली. देशात लष्कराची सत्ता पुढं थेट २०११ पर्यंत होती.
या लष्करी राजवटीने आपण कल्पना करू शकणार नाही इतके अत्त्याचार केले – तेही स्वकीयांवर.  ते वाचताना कथानायिका उदास झाली. आपल्या वडिलांनी देश स्वतंत्र होण्यासाठी जे कष्ट सोसले होते त्यावर लष्करी राजवटीने पाणी फिरवलं आहे हे पाहून कथानायिका उद्विग्न झाली.
१९८८ मध्ये आईच्या आजारपणामुळे कथानायिका मायदेशात परतली. लष्कराच्या विरोधात चालू असलेल्या जनतेच्या लढ्यात ती सामील होईल अशी लोकांची अपेक्षा होती. तिने त्या अपेक्षांना स्वत:चं कर्तव्य मानलं. देश सोडून जाण्याचं स्वातंत्र्य लष्करशाहीने तिला नेहमी दिलं. एकदा का ती देशाबाहेर पडली की तिला देशात परत प्रवेश न देणं - हा लष्करशाहीच्या मते सगळ्यात सोपा उपाय होता. पण तिला देशात लोकशाही आणायची होती – तीही पूर्णपणे अहिंसक मार्गाने. देशाची हालहवाल वाचताना ती उद्विग्न झाली होती खरी, पण देशाचा नवा इतिहास निर्माण करण्याची जबाबदारी जणू नियती तिच्यावर टाकत होती. ती न घेण्याचा पर्याय तिच्या मनातही कधी आला नाही, त्यातून सुरू झालं एक नवं संघर्षपर्व.
  ती मायदेशात राहिली. ती मायदेशातून बाहेर पडली नाही. मायकेल – तिचा पती – मरणशय्येवर होता तरी त्याला भेटण्यासाठीही तिने देश सोडला नाही. ज्वालामुखीच्या तोंडावर उभ्या असलेल्या देशाचा विध्वंस फार सहज होऊ शकला असता – ते तिला टाळायचं होतं. लोक तिच्या भोवती जमत गेले. एका राजकीय पक्षाची स्थापना झाली. १९९० मधल्या निवडणुकीत तिच्या पक्षाला ८० टक्के मतं मिळाली खरी, पण हुकुमशाही सत्तेवरून पायउतार झालीच नाही.
हिंसेच्या वातावरणात अहिंसेचं पालन करणा-यांचा कस लागतो, तसा तो तिचाही लागला. १९८८ ते २००९ या २१ वर्षांच्या कालावधीतली १५ वर्ष तिने ‘गृहकैदेत’ काढली.
या काळात जागतिक समुदायाने वेळोवेळी लष्करशाहीला ‘लोकशाहीची पुनर्प्रस्थापना करा’ असं आवाहन केलं. पण लष्करशाहीने या आवाहनांकडे साफ दुर्लक्ष केलं. १९९१चा ‘शांतता नोबेल पुरस्कार’ मिळाल्यावर जगाला तिच्या देशातल्या जनतेच्या हालअपेष्टांची माहिती मिळाली. त्यानंतर तिला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले – पण ती होती स्थानबद्धतेतच.
(चीनने सत्ताधारी हुकुमशाहीला मदत केली म्हणून (चीनला लांब ठेवण्यासाठी) भारतानेही या लष्करशाहीला आर्थिक मदत दिली हे वाचताना हळहळ वाटली.)
तिचा मायदेश आहे म्यानमार (ब्रह्मदेश).
आणि कथानायिका आहे ऑंग सान स्यू ची.
खरं तर हे पुस्तक वाचताना आपल्या शेजारी देशाबद्दल मला किती कमी माहिती आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. प्रभा नवांगुळ यांनी लिहिलेलं हे चरित्र ‘राजहंस प्रकाशन, पुणे’ यांनी २०११ मध्ये प्रसिद्ध केलं आहे – २०१० नंतरच्या घटनांचा त्यात स्वाभाविकच उल्लेख नाही. सद्यस्थितीवर पुस्तक लिहिणं हे नेहमी अवघड असतं. कारण पुस्तकाचा पहिला मसुदा तयार होईपर्यंत त्या देशात अनेक नवीन महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग घडून गेलेले असतात.
या पुस्तकामुळे मराठीत शेजारी देशाचा इतिहास उपलब्ध झाला आहे ही चांगली गोष्ट आहे. या चरित्रात सुमारे साठ वर्षांचा इतिहास असल्याने बरीच नावं आणि प्रसंग आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या अखेरीस घटनाक्रम दिला असता तर वाचकांची अधिक सोय झाली असती. शिवाय पुस्तक वाचून ऑंग सान स्यू ची यांच्या तात्त्विक भूमिकेचं पुरेसं आकलन मला झालं नाही. म्हणचे चरित्र लिहिताना फक्त त्यांच्या गुणांची ओळख होते परंतु मर्यादांचा उल्लेख येत नाही.
ऑंग सान स्यू ची यांच्या विचारांचा आढावा या पुस्तकात नाही. म्यानमारमध्ये २०१३च्या बौद्ध-मुस्लिम संघर्षात, २०१५ च्या रोहिंग्या (Rohingya)  यांच्यावरच्या अत्त्याचारांमध्ये राजकीय फायद्यांसाठी ऑंग सान स्यू ची यांनी मौन पाळल्याची टीका झाली आहे. या घटना पुस्तक लिहून झाल्यानंतर घडल्या आहेत, त्यामुळे त्यांचा उल्लेख पुस्तकात नसणार हे समजतं. पण वांशिक वैविध्य, धर्म, शिक्षण, प्रशासनव्यवस्था, अर्थविचार, स्त्रियांची स्थिती .. अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर ऑंग सान स्यू ची यांची नेमकी काय भूमिका आहे याबद्दल पुस्तक वाचून काही कळत नाही. प्रभा नवांगुळ यांनी पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत अशी भर घालावी अशी अपेक्षा आहे.
पुस्तक अवश्य वाचावं असं सुचवेन.
                      

लेखिका – प्रभा नवांगुळ
प्रकाशक – राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत – रूपये २५०/ -


Tuesday, July 1, 2014

२०४. आत्ममंथन!

तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!)

ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली?

आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे.

‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे. खरं सांगायचं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्या दिसण्यातला फरक नाहीसा झाला आहे आता.

दुकानांत दिव्यांचा झगमगाट आहे, रस्त्यांवर आता माणसांना नाही तर वाहनांना प्राधान्य आहे असा नवा नियम झाला आहे. संगीतकार असण्यासाठी तुम्हाला संगीत कळायला पाहिजे अशी सक्ती नाही, खांद्यावर हस्तिदंत घेऊन संगीतकार असल्याचा आविर्भाव असला तरी पुरे. असे बदललेले हजारो नियम ज्यात कालचं ओळखीचं शहर नष्ट झालंय.

समुद्रमंथनातून तर विष निघालं होतं म्हणतात; मग या शहरमंथनातून काय बाहेर पडेल?

ज्या शहरात भारत राहतो, तिथं नेमकं काय घडतंय? कोणते बदल होताहेत? या बदलांचा शहरातल्या लोकांवर काय परिणाम होतो आहे? या सगळ्याबद्दल बोलायचा, रडायचा त्याला अधिकार का नाही? त्याच्यावर शांत बसण्याची सक्ती का केली जातेय?

पहिल्या एक दोन पानांतच कादंबरी मनाची पकड घेते. ही कादंबरी थोडी जॉर्ज ऑर्वेलच्या “१९८४” ची आठवण करून देतेय का? का यात त्याच्याच “अ‍ॅनिमल फार्म”चे पण धागे आहेत? मनात प्रश्न येत राहतात.

या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत. जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन..

हे शहर ‘आपल्या’ शहरासारखंच आहे – गरीब आणि श्रीमंत यांच्यासाठी वेगवेगळं; दुभंगलेलं! इथं मुखवटे विकले जाताहेत; लोक ते धारण करताहेत त्यामुळे माणसा-माणसांतील फरक नाहीसा होतोय; सगळे अनोळखी वाटताहेत. मुखवटे माणसांच्या फक्त चेह-याचा नाही तर विचारांचा ताबा घेताहेत; मुखवटा पुरवणा-यांचा तोच उद्देश आहे. एकदा मुखवटा चढला की जबाबदारी आपली वाटायला लागते, मुखवटा विकणा-या गटाने फसवलं तरी लक्षात येत नाही; कल्पना आणि वास्तव यातल्या सीमारेषा पुसट होत जातात.

लेखकाला काही प्रश्न पडतात आणि हे प्रश्न जाऊन इतरांना विचारायची जबाबदारी त्याचा शेजारी घेतो. हा शेजारी सावलीसारखा सतत लेखकाच्या सोबत आहे. पण त्याला नाव नाही. हा सतत लेखकाला वास्तवाची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतो, लेखकाला जपायचा प्रयत्न करतो आणि तरीही लेखकाचे प्रश्न बाहेर जाऊन विचारायला तयार होतो. 

तर प्रश्न असे आहेत: तुम्ही स्वत:च्या जवळ आहात की स्वत:पासून दूर? तुम्ही कुटुंबाच्या जवळ आहात की कुटुंबापासून दूर? तुम्ही शेजा-यांच्या जवळ आहात की दूर? तुम्ही रस्त्यांच्या, झाडांच्या, गल्लीच्या, भिंतीच्या, विटांच्या जवळ आहात की त्यांच्यापासून दूर आहात? जर तुम्ही जवळ असाल तर त्याने (तुम्ही स्वत:, कुटुंब, रस्ता, झाड ...) तुमच्यासाठी काय केलंय? तुम्ही त्याच्यासाठी काय केलंय?

या प्रश्नांचा शोध घेताना शेजा-याला विविध अनुभव येतात. एक स्त्री सांगते, “ मी स्वत:पासून फार दूर आहे. मी माझ्यातला दुसरा भाग कधी माझ्यातल्या पहिल्या भागाशी जोडू शकले नाही. माझ्यातल्या एका भागाला या जगाचा आणि जगण्याचा प्रचंड कंटाळा आला आहे पण दुसरा भाग मात्र जगण्याची लालसा राखून आहे. ..... इतका दुभंग घेऊन मी कशाच्या जवळ असणार आहे?”

हे वाचताना सार्त्र, काम्यू असं काहीबाही मला आठवलं असतं एरवी (आत्ता लिहिताना ते आठवले), पण वाचताना स्वत:च्या आरपार कट्यार घुसल्यागत वेदना झाली. ती क्षणिकच होती, पण खरी होती. असे प्रश्न, अशी वेदना निर्माण करणं हे या कादंबरीचं वैशिष्ट्य. वाचकाला स्वत:कडे पाहायला ही कादंबरी भाग पाडते हे या कादंबरीचं वैशिष्ट्य! यातलं काहीही अवास्तव वाटत नाही; उलट हे आपल्याभोवती घडतंय आणि आपल्याला त्याची जाणीवही नाही याचं भान ही कादंबरी जागं करते – हेही तिचं वैशिष्ट्य! ही कादंबरी आत्ममंथन करायला उद्युक्त करते – आपल्याही नकळत.

मग ती कादंबरी फक्त ६३ पानांची आहे याचं महत्त्व राहत नाही.
ती मूळ डोगरी भाषेत आहे; ही भाषा जम्मू परिसरात (आणि लगतच्या पाकिस्तानमध्ये) बोलली जाते, तिथे कुठे असलं शहरीकरण झालंय असा तार्किक प्रश्न महत्त्वाचा राहत नाही.
या कादंबरीला १९७९ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे यात नवल वाटत नाही. 

“नग्न रुख” – श्री ओ. पी. शर्मा ‘सारथि’.
इंग्लीश अनुवाद श्री शिवनाथ यांनी केला आहे: ‘चर्निंग ऑफ द सिटी’ या नावाने.
प्रकाशक आहे साहित्य अकादमी, दिल्ली.
किंमत? १९९१ मध्ये मी विकत घेतलेल्या प्रतीची किंमत फक्त दहा रुपये आहे.


(१९९१ नंतर आजच मी ही कादंबरी पुन्हा वाचली.)

Saturday, March 1, 2014

१९१. वाचननोंदी: २


फेब्रुवारी २०१४ 

५. टीचर: सिल्व्हिया अ‍ॅश्टन वॉर्नर; अनुवाद: अरुण ठाकूर (पानं १८३ )

प्रचलित शिक्षणपद्धती हा अनेकांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. आपल्यासारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशात ‘शिक्षणाचं माध्यम’ या विषयावर बरीच चर्चा आणि काही प्रसंगी वादविवाद होत असतात. भाषिक राज्यं निर्माण झाल्यावर ‘मातृभाषेचा’ प्रश्न सुटेल अशी अशा होती. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात ४७  प्रकारचे आदिवासी राहतात आणि मराठी त्यांची मातृभाषा नाही हे कळल्यावर प्रश्न आपण समजतो त्याहून अधिक गंभीर आहे हे लक्षात आलं होतं.

सिल्व्हियाचं ‘टीचर’  हे पुस्तक न्युझीलंडमधील ‘मावरी’ मुलांसोबत पूर्व प्राथमिक शिक्षणात तिने केलेल्या विविध प्रयोगांची तिची धडपड सांगते. हा प्रयोग पुरेसा जुना आहे – इंग्लिशमधलं पुस्तक १९६३ मध्ये प्रसिद्ध झालं आहे.
काय आहेत हे प्रयोग? एक दोन उदाहरणं सांगते इथं.

सिल्व्हिया ‘सहज शब्दावली’ पद्धत वापरते – ते तिने विकसित केली आहे. काय आहे ही पद्धत? प्रौढ शिक्षण तज्ज्ञांनी तयार केलेली शब्दावली मावरी मुलांना परकी वाटते हे लक्षात आल्यावर सिल्व्हियाने एक नवी पद्धत अमलात आणली. ती एकेका मुलाला त्याला/तिला कोणता शब्द हवा आहे ते विचारते. मुलं त्यांच्या रोजच्या जगण्यातले शब्द सांगतात – जेट, घर, भूत, भांडण, बॉम्ब, नवी आई, भावंडे, मारतात ... असे शब्द मुलं सांगतात. ज्याने जो शब्द सांगितला तो शब्द सिल्व्हिया त्याला/तिला लिहून देते. हा शब्द मुलं फार सहजतेने वाचायला आणि लिहायला शिकतात – कारण शब्द त्यांच्या जगण्यातून येतात, त्यांच्या संस्कृतीचा गंधही नसलेल्या प्रौढ लोकांकडून येत नाहीत ते!

मुलांवर सिल्व्हिया लेखन लादत नाही, तर त्यांना लिहायला प्रेरित करते. एखादे मुल म्हणते, “मला लिहायचे नाही”; त्यावर सिल्व्हिया त्याला रागवत नाही. “बरं, तेच लिही मग” म्हणते. “तुला का लिहावसं नाही वाटत?” अस हळूच विचारते आणि मुलाने सांगितल्यावर तीच कारणं ‘लिहायला’ ती मुलाला प्रोत्साहित करते. लिहायला सुरवातीस तयार नसणारं मुल त्याच्याही नकळत लिहायला लागतं – आणि ते शिक्षेच्या धाकाविना वा कसल्याही आमिषाविना.
निसर्गाकडून शिकणे, मुलांना स्व-शिक्षणास मदत करणे, नृत्य-संगीत-खेळ  यांचा मुक्तहस्ते वापर करणे .. अशा अनेक गोष्टींबाबत सिल्व्हिया तिचे अनुभव सविस्तर सांगते.

नेहमी तार्किक पद्धतीने  लिहिलेली पुस्तक वाचायची सवय असल्याने सुरुवातीला मला हे पुस्तक फार विस्कळीत वाटत राहिलं. पण त्या विस्कळीतपणामागचे तत्त्व एकदा लक्षात आल्यावर मी पुस्तकात रंगून गेले. अनेक ठिकाणी आपल्याकडची (काहीशी समांतर) परिस्थिती आठवत गेली आणि पुस्तक थांबून थांबून वाचलं.

पुस्तकाला श्री पु. ग. वैद्य यांची सविस्तर प्रस्तावना आहे. वैद्य सरांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल मला आदर असला तरी प्रस्तावनेत स्वत:च्या कामाबद्दल वेळोवेळी सांगण्याचा मोह त्याना आवरला नाही त्यामुळे त्यांची विस्तृत प्रस्तावना कंटाळवाणी झाली आहे. मी प्रस्तावना अर्ध्यात सोडली, पुस्तक वाचलं पूर्ण आणि मग नंतर  कधीतरी प्रस्तावना वाचली.

२००७ ते २०१३ या काळात या पुस्तकाच्या तेरा आवृत्त्या निघाल्या – याचा अर्थ मराठी वाचकांनी या पुस्तकाला चांगला प्रतिसाद दिला आहे – ही समाधानाची बाब आहे. “अवश्य वाचावं “ असं पुस्तक आहे हे!

६. प्रिय बाई: बर्बियानाची शाळा (पानं १३६ )

परत एकदा वाचलं हे पुस्तक. बर्बियानाच्या शाळेतल्या आठ मुलांनी मिळून लिहिलेलं पत्ररुपी पुस्तक. या पुस्तकाविषयी अनेकांनी आधीही लिहिलं आहे – म्हणून सविस्तर लिहीत नाही. पण थोडक्यात महत्त्वाचं सांगायचं तर:

पुस्तकाची भाषा अगदी सोपी आहे. मुलांनी स्वानुभवातून लिहिल्यामुळे इथं फक्त सिद्धांत नाहीत तर शिक्षणविषयक सिद्धांतांचा मुलांवर कसा विपरीत परिणाम होतो याचं विदारक चित्र रंगवलं आहे.

स्वत:ची मतं मांडताना पूरक आकडेवारी दिली आहे. शाळेत प्रवेश घेतलेली मुलं पुढे कशी गळतात आणि ही गळणारी मुलं कोणत्या वर्गातली असतात (आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातली!) याची आकडेवारी  विलक्षण आहे. आपण सध्याच्या शिक्षणव्यवस्थेतून मुलांना शिकायला प्रोत्साहित करतो का त्याना शाळेतून बाहेर पडायला भाग पाडतो याचं स्पष्ट उत्तर देणारे आकडे आहेत हे.

या पुस्तकातली ‘बिना सुट्टीच्या शाळेची” मुलांची मागणी वेगळी वाटते. “सक्तीच्या शाळांनी विद्यार्थ्याना नापास करता कामा नये” ही मागणी अवास्तव वाटली सुरुवातीला तरी मुलांचा युक्तिवाद (खरं तर अनुभव) वाचल्यावर ही मागणी पटते. शिक्षकांची भूमिका काय असावी, त्यांची जबाबदारी काय असावी याबद्दलच्या मुलांच्या अपेक्षा डोळ्यांत अंजन घालणा-या आहेत. ही सगळी कष्टकरी वर्गातली, डोंगराळ भागातली मुलं आहेत; ते शिकायला उत्सुक आहे, पण सध्याची शाळा त्यांना सामावून घेत नाही अशी त्यांची रास्त तक्रार आहे.

इटलीमध्ये या पुस्तकातल्या शिफारसींच पुढं काय झालं असेल हे जाणून घायची इच्छा आहे.

७. Visibility and Effectevity: report by Alochana (पानं १६५ )

आलोचना संस्थेने २००० ते २००३ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांसाठी ‘पंचायत राज सक्षमीकरणा’साठी एक प्रकल्प राबवला होता; त्याचा हा अंतिम अहवाल. संदर्भांसाठी अनेकदा वापरला होता मी सुटासुटा; संपूर्ण आत्ताच वाचला. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर स्त्रियांना ‘पंचायत राज’ची दारं खुली झाली खरी, पण अनुभव नसल्याने अनेक अडचणी येत होत्या (आजही येतात.) तिथे कार्यक्षमतेने काम करण्यासाठी अनेक स्त्रिया स्वयंसेवी संस्थांच्या सक्रिय मदतीची अपेक्षा करतात; पण स्वयंसेवी संस्थांना तरी ‘पंचायत राज’ची पुरेशी माहिती तेव्हा कुठे होती. म्हणून मग प्रशिक्षणाचा हा खटाटोप.

प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, त्यात आलेल्या अडचणी, ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध सहभागी संस्थांनी राबवलेले उपक्रम; त्यातले यशापयश, नेट्वर्किंगमधून मिळालेले बळ, सहभागी कार्यकर्त्यांच्या क्षमतांचा विकास – असे अनेक मुद्दे सविस्तर लिहिले आहेत या अहवालात. एका प्रक्रियेचा  उत्तम दस्तावेज आहे हा.

या परिसरात पुन्हा एकदा जाऊन या प्रशिक्षणाचे काय परिणाम टिकले आहेत, आणखी काय बदल झाला आहे, नवी काय आव्हाने आहेत – हे पाहण्याचा विचार मनात आहे. बघू कसं जमतंय ते!

८. मुसाफिर: अच्युत गोडबोले (पानं ४७२)

मी वाचली ती या पुस्तकाची सव्विसावी आवृती. एक वर्षाच्या आत इतक्या आवृत्त्या निघाव्यात याचा अर्थ पुस्तक भलतंच गाजलेलं आहे. पहिल्या पानावर श्री. गोडबोले यांची ओळख दडपून टाकणारी आणि पुस्तकाबद्दल ब-याच अपेक्षा निर्माण करणारी. सुरुवात ठीक. जसजशी मी पुढे वाचत जाते, तसतसा अपेक्षाभंग होतो.

गोडबोले बोर्डात आले; गोडबोले आयआयटीत होते; गोडबोले संगीतप्रेमी आहेत, गोडबोलेनी शहाद्यात आदिवासी लोकांसाठी एक वर्ष काम केलं; इन्फोटेकमध्ये गोडबोले यांचं नाव आहे; गोडबोले ब-याच नामांकिंत पुस्तकाचे लेखक आहेत – हे सगळं लक्षात घेता या पुस्तकाने घोर निराशा केली.

स्वत:च्या आयुष्यातल्या घटना सांगताना उगाच सिद्धांत मांडत बसायची लेखकाची हौस काही काळाने कंटाळवाणी होत जाते. उदाहरणार्थ गोडबोले दहा दिवस धुळ्याच्या तुरुंगात राहिले (आदिवासी चळवळीत गोडबोले सक्रीय होते). आता शहरातला मध्यमवर्गीय मुलगा, आयआयटीचा पदवीधारक पहिल्यांदा तुरुंगाचा अनुभव घेताना त्याची मन:स्थिती कशी असेल? (या अनुभवानंतर ते काम सोडून मुंबईत परतले.) गोडबोले मात्र आपण जणू काही अध्ययनासाठी तुरुंगात गेलो होतो अशा थाटात त्याबद्दल बावीस पानं मजकूर लिहितात. तिथं उगाच क्वालीन विल्सन, विजय तेंडुलकर, जिअम जेन .. अशी नावं. माहितीचा भडीमार करण्याचा गोडबोलेंचा सोस हास्यास्पद होऊन जातो.

याच ठिकाणी अनेक गुन्हेगारांना भेटल्याची वर्णनं. तुरुंगात इतर कैद्यांशी बोलणं इतकं सोपं असतं का? आणि बोलायची संधी मिळाली तरी कैदी लगेच आपली रामकहाणी सांगत बसतील काय? ते तुरुंगात असताना एकाही कैद्याला फाशी झाली नव्हती – तरीही त्याचं वर्णन. एकंदर या माणसाने ख-या आणि कल्पित गोष्टी सरमिसळ करून लिहिल्या आहेत की काय अशी मला शंका यायला लागली.

पुस्तकात फक्त स्वत:चे फोटो; जवळच्या व्यक्तींपेक्षा जगभरातल्या थोर लोकांबद्दल जास्त लिहिणं, सारखा शहाद्याचा उल्लेख करत स्वत:च्या संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणं... हा माणूस नेमका कसा आहे, याची जीवनविषयक दृष्टी नेमकी कशी आहे, याची मूल्यं कोणती आहेत, याला ‘स्व’ सोडून आणखी कुणाबद्दल प्रेम आहे – याचा काही पत्ता लागला नाही मला पूर्ण पुस्तक वाचूनही.

पुस्तक मी विकत घेतलं नाही – याचा आनंद झाला. अशी पुस्तकं मराठीत इतकी लोकप्रिय होतात याची चिंता वाटली. पण असो.  

Monday, February 24, 2014

१९०. ६१७४

त्या दिवशी ‘Our Scientists’ हे पुस्तक  वाचत होते. नॅशनल बुक ट्रस्टचं १९८६ मधलं प्रकाशन आहे ते. ब-याच काळापासून मागं पडलेलं पुस्तक आहे; म्हणून त्या दिवशी जरा नेटाने वाचत होते. ‘नेटाने’ कारण पुस्तकाची शैली. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची त्यातली ओळख इतकी संक्षिप्त आहे; की कंटाळा यायला लागला मला (म्हणून हे पुस्तक दरवेळी मागे पडत गेलंय माझ्यासाठी!) हे पुस्तक शाळकरी मुलांसाठी आहे हे तर मला आणखी विशेष वाटलं; कारण या पुस्तकात मुलं रमतील असं काहीच नाही दिसलं मला.

एका लेखात ‘स्थिरांक’ आढळला. काय आहे हा स्थिरांक?

१. एक चार अंकी  नंबर घ्या. त्यात किमान दोन वेगळे अंक असले पाहिजेत. म्हणजे ११११, २२२२ हे आकडे       चालणार नाहीत. (मी  लिहीलं: ४६३२)
२. हे चार अंक आता उतरत्या क्रमाने लिहा (६४३२)
३. आता तेच आकडे उलट्या क्रमाने लिहा (२३४६) इथं खर तर ते चार अंक चढत्या क्रमाने लिहा अशी एक सूचना देऊन काम भागलं असतं असं लगेच वाटलं. पण  या दोन्ही आकड्यांचा आपण उपयोग करणार आहोत, त्यामुळे दुसरी पायरी मोडीत काढायची घाई करू नका.
४. आता पहिल्या पायरीतल्या आकड्यातून तिस-या पायरीताला आकडा वजा करा. (४६३२ -२३४६= २२८६)

आता या क्रमांकाला दोन ते चार या प्रक्रियेतून न्या.
बघू काय होतेय ते.

उतरत्या क्रमाने लिहिले अंक: ८६२२
ते उलट्या क्रमाने लिहिले: २२६८
आता वजाबाकी :  ८६२२ -२२६८  = ६३५४

प्रक्रिया पुढे चालू.

उतरत्या क्रमाने लिहीले अंक: ६५४३
चढत्या क्रमाने ते होतात: ३४५६
आता वजाबाकी: ६५४३-३४५६= ३०८७

काही होत नाहीये असं वाटतंय का? थोडा धीर धरा; पुढे करा प्रक्रिया.

उतरत्या क्रमाने: ८७३०
क्रम उलट करून: ०३७८
वजाबाकी: ८७३० -०३७८= ८३५२

पुढे:
उतरत्या क्रमाने: ८५३२
उलटा क्रम: २३५८
वजाबाकी: ८५३२-२३५८ = ६१७४

हं! शीर्षक हे दिलंय – पण याचा अर्थ काय? कळेल, पुढे चालू ठेवा गणिती प्रक्रिया.

उतरत्या क्रमाने: ७६४१
क्रम उलटा: १४६७
वजाबाकी: ७६४१-१४६७= ६१७४
तोच आकडा आला पुन्हा. ६१७४. आता अनंत वेळा (!) हे गणित करत बसलो आपण तरीही नंबर तोच येत राहणार.

दुसरा एखादा प्रयोग करू.
९४२३
९४३२
२३४९
९४३२-२३४९= ७०८३

पुढे बघू काय होतंय ते.
८७३०
०३७८
८७३०-०३७८= ८३५२

काही कळत नाही – पण करत राहू.
८५३२
२३५८
८५३२-२३५८= ६१७४

अरेच्चा! आला की हा ६१७४ परत. काय भानगड आहे ही?

तिसरं उदाहरण घेऊन बघू.

८४१७
८७४१
१४७८
८७४१-१४७८= ७२६३
ठीक आहे; पुढे.

७६३२
२३६७
७६३२-२३६७ = ५२६५

परत एकदा
६५५२
२५५६
६५५२-२५५६= ३९९६

पुढे;
९९६३
३६९९
९९६३-३६९९= ६२६४

आता नाही येत तो ६१७४?
एक मिनिट.

७६४१
१४६७
७६४१-१४६७ = ६१७४

६१७४ हा नंबर ‘काप्रेकर स्थिरांक’ म्हणून ओळखला जातो.

या स्थिरांकाचा उपयोग नेमका कुठे केला जातो यासंबधी मला काहीही माहिती नाही; पण असा नंबर येतो हे पाहणं ही एक गंमत आहे. आणि हा स्थिरांक शोधून काढला आहे दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर (की कापरेकर?) या आपल्या मराठी माणसाने! विकीवरच्या माहितीनुसार त्यांचा जीवनकाल १९०५ ते १९८६ असा आहे. त्यांचं माध्यमिक शिक्षण ठाण्यात तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. नाशिकमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. त्यांनी ‘गणितानंद’ या टोपण नावाने लेखन केलं असा उल्लेखही आहे आणि त्यांनी शोधून काढलेल्या इतर गणिती नंबरांची माहितीही या ‘विकी’ पानावर आहे . नॅशनल बुक ट्रस्टने  ‘Our Scientist’ या  पुस्तकात कै. काप्रेकर यांची दखल घेतली, पण मला मात्र या माणसाबद्दल आणि त्याच्या कामाबद्दल काहीच माहिती नाही हे लक्षात आलं.

‘Our Scientist’ या पुस्तकातली माहिती संक्षिप्त आहे. कुणाला त्यांच्याबद्दल, त्यांच्या गणितातल्या कामाबद्दल अधिक काही माहिती आहे का? अधिक माहिती कुठे मिळेल याविषयी कुणी सांगू शकेल का?

गणितात आनंद शोधणारी आणि तो मिळवणारी माणसं असतात याचा आनंद होतोय.
आता तरी मला परत गणिताकडे वळायची प्रेरणा मिळतेय का ते पाहते!
**