त्रिपुरामधल्या आठवडाभराच्या वास्तव्यात ‘सीमारेषा’ हा विषय आमच्या बोलण्यात वारंवार यायचा. कदाचित या विषयात मला फार जास्त रस आहे हे माझ्या भोवतालच्या माणसांनी जाणल होत आणि केवळ म्हणून ते उत्साहाने त्यावर माझ्याशी बोलत होते. अन्यथा त्यांच्यासाठी बांगला देशाचा शेजार, तिथे असलेली सीमारेषा हे एक वास्तव आहे – ज्यासोबत ते शांतपणे जगायला शिकले आहेत असा माझा समज झाला. अर्थात मला १९७१च युद्ध अनुभवलेले, त्याच्या आठवणी असलेले कोणी भेटले नाही, नाहीतर कदाचित वेगळे मत झाले असते माझे. बांगला देशातून येणारे निर्वासित अशी एकदा चर्चा चालू असताना एकजण म्हणाला, ‘त्रिपुरा राज्यापेक्षा एकट्या मुंबई शहरात असलेली बांगला निर्वासितांची संख्या कैक पटींनी जास्त असेल ....” त्याला बहुतेक अस म्हणायचं होत की या चर्चेच इथ किंवा आता काही प्रयोजन नाही. थोड्या काळात, थोड्या लोकांशी बोलून या विषयावर ठाम मत बनवण अयोग्य आहे याची मला जाणीव आहे. पण सीमारेषेचा हा सगळा अनुभव मला अंतर्मुख करून टाकणारा होता.
‘शीव’ म्हणजे दोन गावांची हद्द किंवा सीमारेषा. याचा माझा पहिला अनुभव मला आठवतो तसा खूप लहानपणीचा आहे. मी पाच-सहा वर्षांची असताना बैलगाडीतून शेजारच्या गावी जत्रेसाठी चालले होते – ही माझी प्रवासाची पहिली आठवण. मी तेव्हा फार उत्सुकतेने दोन गावांची हद्द सांगणारे काही ठळक चिन्ह असेल अशा आशेने पहात होते. पण माझा अगदी भ्रमनिरास झाला. त्या दोन गावांना वेगळी करणारी काहीच खूण मला दिसली नाही. जमीन तशीच होती, माणसं एकसारखीच होती, प्राण्यांमध्ये आणि झाडांमध्ये काही फरक नव्हता! माझी घोर निराशा झाली होती तेव्हा ‘शीव’ संकल्पनेबद्दल. तो क्षण मला अजूनही आठवतो.
पुढे आणखी प्रवास केल्यावर जिल्ह्यांच्या, राज्याच्या सीमारेषा भूगोलाच्या पुस्तकात दाखवतात तशा नसतात हे लक्षात आलं. विदेश प्रवासात ‘सीमेचा’ अनुभव मी घेतला नाही अस म्हणाव लागेल. ते देश दूरचे होते, तिथे वेगळ काही पहायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती – त्यामुळे सगळ काही वेगळ असूनही मला तिथ सीमा ओलांडल्याचा अनुभव आला नाही. त्रिपुरात मात्र मी जणू तो लहानपणीचा अनुभव पुन्हा एकदा जगले. एका अर्थी तो आणखी एक भ्रमनिरास होता तर एका अर्थी ते वास्तवाला भिडण होत!
पहिल्या दिवशी BSNL ची रेंज नव्हती. BSNLच हे एक नेहमीच गूढ आहे. म्हणजे द-याखो-यात, दुर्गम भागात BSNL चे सेलफोन चालतात, पण मोठया शहरांत मात्र हमखास ते चालत नाहीत. शहरात BSNL ला स्पर्धा आहे, दुर्गम भागात ती नाही असं म्हणता येईल. BSNL ला शहरी स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करता येत नाही किंवा आपल्या स्पर्धकांना पाय रोवायची संधी देण्याचे BSNL चे धोरण आहे असे वाटते. असो.
जेवणाच्या सुट्टीत स्वाभाविकच ‘फोनला रेंज नाही’ यावर बोलण झालं. काही लोकांना एक दोन तास SMS आले नाहीत किंवा करता आले नाहीत तर जगबुडी आल्याची भावना होते. मला काही इतकं जाणवत नाही फोन बंद असल्याचं. मग स्थानिक एकजण म्हणाला, “बांगला देशाची बॉर्डर इथून अर्ध्या किलोमीटरवर आहे, म्हणून इथ रेंज नाही फोनची.”
“इतक्या जवळ आहे?” मला खरच आश्चर्य वाटलं.
“तुम्ही या इमारतीच्या गच्चीत गेलात तर तुम्हाला बांगला देश दिसेल”, आणखी एकाने पुस्ती जोडली.
वेळ मिळाला की गच्चीवर जायचं अस मी ठरवलंही – पण नंतर एकदा मीटिंग सुरु झाल्यावर ते विसरून गेले. बॉर्डरचा आपल्यावर प्रत्यक्ष परिणाम होत नाही तोवर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आणखी दुस-याच गोष्टीत गुंतलो असलो की ती आपल लक्ष वेधून घेत नाही हेच खर!
एका संध्याकाळी आम्ही कश्बा गावातल्या कमला सुंदरी मंदिरात गेलो. आगरताळ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावरच हे ठिकाण. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द वनराई होती – ते दृश्य विलक्षण सुंदर होत! काहीस केरळची आठवण करून देणार – पाण्याचे प्रवाह वगळता. हे एका टेकडीवरचे काली मंदिर आहे आणि त्याच्या पायथ्याशी ‘कमला सागर’ हा तलाव आहे. १५व्या शतकाच्या अखेरीस महाराज धन्य माणिक्य बहादूर यांनी हा तलाव खोदला. मंदिरात गर्दी अजिबात नव्हती आणि मावळत्या सूर्याबरोबर एक अद्भूत शांती पसरली होती. (मागच्या पोस्टमधला तिसरा फोटो पहा). एक रेल्वे जाताना दिसली – ती बांगला देशात जाते आहे असं मला सांगितलं गेलं. तिथे कोणत्या गावात जाते – ते मात्र मी विसरले! मला त्या ट्रेनची गंमत वाटली. तेवढ्यात मंदिरात आरती सुरु झाली. मी तलावाच्या काठी भटकत होते, आरतीला काही मी मंदिरात गेले नाही. त्याच सुमारास पलीकडच्या बाजूने ‘अजान’ ऐकू आलं. आरती आणि अजान – एकाच वेळी, एकाच भूमीवर – पण त्यातले एक बॉर्डरने विभागलेल्या भारतातलं आणि दुसर बांगला देशातलं! मला प्रथमदर्शनी ती बॉर्डर कृत्रिम वाटली .. आणि जितक्या वेळा मी ती पाहिली तितक्या वेळा ही भावना प्रबळ होत गेली.
हेझामाराला जाताना माझ्या गाडीच्या चालकाने मला ‘बॉर्डर’ दाखवली. जमिनीला विभागत काटेरी तारांच उंच कुंपण नजर पोचेल तिथवर पसरलं होत. बांगला देशाच्या बाजूला शेतं दिसत होती, भारताच्या बाजूला अगदी जवळून रस्ता जात होता – त्यामुळे दुकान, बाजार सगळ एखाद्या नेहमीच्या गावासारख वातावरण होत. तिथ काही संगीनधारी सैनिक मला दिसले नाहीत. ‘बॉर्डर ओलांडून जाण्याचा कोणी प्रयत्न करत का?’ या माझ्या प्रश्नावर चालक हसला. म्हणाला, “काय फरक? इकड तिकड सारखच तर आहे सगळ!!”
खोवईतून आगरताळयात संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास परतताना मोबाईल वाजला. पाहिलं तर SMS होता – “एअरटेल बांगला देशात आपल स्वागत करत आहे. इथल आपल वास्तव्य सुखाच होवो. बांगला देशाविषयी काही माहिती हवी असल्यास किंवा काही मदत हवी असल्यास ७८६ क्रमांकावर संपर्क करा.....” मी तर काही बांगला देशात प्रवेश केला नव्हता. मग हा SMS यायचं कारण काय? जमिनीच्या सीमा आणि आकाशाच्या सीमा वेगवेगळया आहेत की काय? बॉर्डर अदृश्यपणे चारी बाजूंनी आपल्याला वेढून आहे अस मग मला सारख वाटत राहिलं!
आणखी एका संध्याकाळी काम आटोपून आगरताळयात परतताना सूर्य अस्तास जाताना दिसला तो कुंपणाच्याही पल्याड! या गावात सूर्य कधी मावळत नाही ... या गावासाठी सूर्य नेहमीच बांगला देशात अस्तास जातो!! पर्यटकांना आकर्षित करायला हे वाक्य उपयोगी पडेल असा विनोदी विचार माझ्या मनात आला!
बॉर्डर ही माणसांनी निर्माण केलेली गोष्ट आहे यात शंकाच नाही (इथे ‘man-made’ शब्दप्रयोग करायचा मला मोह होतो आहे!!) ६४ वर्षांपूर्वी या दोन वेगळ्या भूमि नव्हत्या. आता एका कृत्रिम रेषेने, कुंपणाने माणसं, जमीन, पाणी, आकाश, झाड, इतकच नाही तर माणसांच्या भावना आणि त्यांची आयुष्य विभागून टाकली आहेत. कुंपणाच्या या बाजूला तुम्ही भारतीय असण अभिमानाची बाब आहे, त्या बाजूला मात्र तुम्ही भारतीय म्हणवून घेतलत स्वत:ला तर देशद्रोही ठरणार! कुंपणाच्या या बाजूला एक प्रकारचा कायदा, दुस-या बाजूला दुसरा कायदा, दुसरे नियम – आणि हे सगळ पीकपाणी, अन्न, जमीन, संस्कृती, एकाच प्रकारचे असताना! (कश्बातल्या काली मंदिरात बांगला देशातूनही भक्त येतात!) तिथ उभ राहताना मला खूप आतून वाटलं की, असल्या सगळ्या कृत्रिम सीमारेषा खर तर या जगातून नाहीशा व्हायला हव्यात. माणसांना विभागणा-या भिंती जितक्या कमी असतील तितक चांगल!
पण बॉर्डरवर असे अनेक क्षण घालवल्यावर मला एका गोष्टीच बर वाटलं – ते म्हणजे मी लोकांना उत्तरदायी नाही, लोकांच्या वतीने निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. ज्या नेत्यांना फाळणीच्या काळात किंवा अगदी १९७१ च्या युद्धात निर्णय घावे लागले त्यांचं काम किती अवघड होत हे मी समजू शकते, त्यांच्या हृदयावर किती ओझ असेल याचा मला अंदाज येतो. माझ्यासारख्या स्वप्नाळू माणसांना उदार विचार करण परवडत कारण मला काही कराव लागत नाही. पण ज्यांच्यावर हजारो-लाखो लोकांच्या आयुष्याची, त्यांच्या भवितव्याची जबाबदारी असते, त्यांना स्वपाळू राहण्याची चूक करता येत नाही. मी माझ (माझ्या देशाच) रक्षण करू शकत नसेन तर दुसर कोणीतरी माझ्या देशावर आक्रमण करणार – त्याला तोंड देण्याची सदैव तयारी ठेवावी लागते. देशाचे नेतृत्व माझ्यासारखा विचार करणार असत (नकोत या सीमारेषा वगैरे ..) तर आज आपण त्यांना जितके दोषी समजतो त्यापेक्षा कैक पटींनी ते दोषी मानले गेले असते. ‘त्यांनी काय करायला हव होत’ यावर आपण अनंत काळ चर्चा करू शकतो. पण त्यानी काहीही केलं असत तरी ही चर्चा अशीच होत राहिली असती हेही मला त्या क्षणी समजलं.
फाळणीचा उपयोग झाला का? लोकांच जीवन त्यामुळे अधिक सुखी झालं का? त्यांना आता सुरक्षित वाटत का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. मी ज्या लोकांना भेटले त्यांना या सगळ्या प्रश्नांशी काही देण- घेण नव्हत (किंवा माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीशी त्यांना बोलायच नव्हत ..) – बॉर्डर ही त्यांच्यासाठी एक वस्तुस्थिती आहे आणि ती त्यांनी स्वीकारली आहे.
अर्थात दुसरे अनुभव, दुसरी मते, दुसरे दृष्टिकोन असणारे अनेक लोक असतील तिथे – पण दुर्दैवाने त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली नाही. त्यामुळे बॉर्डरबाबतचा माझा दृष्टीकोण परिपूर्ण आणि योग्य आहे असे म्हणता येणार नाही. माझे पूर्वग्रह आहेतच आणि शिवाय सगळ्या प्रकारच्या लोकांना न भेटल्यामुळे अनुभवही सीमित आहे!
बॉर्डरचा विचार करताना जाणवलं की वेगवेगळ्या स्वरुपात ती आहेच आपल्या भोवताली. बांगला देशाची बॉर्डर हे एक दृश्य स्वरूप आहे त्याच. पण आपल्याच देशात, आपल्याच समाजात किती विविध प्रकारची कुंपण आहेत, किती विविध भिंती आहेत...
दुसर उदाहरण घ्या स्त्रियांच. स्त्रिया वाहतुक पोलिस, पेट्रोल पम्प अशा ठिकाणी सुटसुटीत पोशाखात काम करताना दिसल्या, अगदी रात्री नऊ वाजताही दिसल्या – ते पाहताना बर वाटलं. पण एक दिवस चौदा पंधरा वर्षाची एक मुलगी मला साडीत दिसली. मला वाटल असेल काहीतरी समारंभ शाळेत अथवा गावात. पण पुढे अशा अनेक मुली दिसल्यावर चौकशी केली तेव्हा कळलं की, सरकारी शाळांत (आणि अनेक खासगी शाळांतही) नवव्या इयत्तेच्या पुढच्या मुलीना साडी सक्तीची आहे. एकविसाव्या आणि विसाव्या शतकातली ही बॉर्डर वेदनादायी होती. लोकांनी काय कपडे घालावेत याच स्वातंत्र्य लोकांना का नाही अजून? छोट्या मुलींवर अशा प्रकारच नियंत्रण ठेवण्यातून सरकार नेमक काय साधत?
मला दोन स्त्रिया भेटल्या. त्या संघटित क्षेत्रात काम करतात आणि त्यांचा महिन्याचा पगार आहे फक्त १७०० रुपये! मला ते ऐकताना स्वत:ची लाज वाटली कारण माझी कमाई त्यांच्यापेक्षा (आणि माझ्या गरजेपेक्षा) खूपच जास्त आहे. आम्ही तिघीही दिवसातले आठ ते दहा तास काम करतो. श्रमजीवी समाज आणि बुद्धीजीवी समाज यांच्यातली पण ही एक बॉर्डरच नाही का? शोषण करणारी बॉर्डर?
अशा असंख्य बॉर्डर मला दिसतात. या सीमारेषा, या हद्दी, या भिंती सगळ्या आपणच निर्माण केलेल्या आहेत – जवळजवळ सगळ्याच! आपण त्यांचा एरवी परंपरा, रुढी म्हणून आदर करतो, प्रशंसा करतो, त्यांना डोक्यावर बसवतो. या सीमा पाळायाच्या असतात, त्यातच भलं असत असं आपण मानतो. कोणी या सीमा ओलांडायचा प्रयत्न केला, सुधारणेचा विचार मांडला की समाजाची पहिली प्रतिक्रिया असते अशा व्यक्तीला देशद्रोही, समाजद्रोही ठरवण्याची!
ही वृती आपण बदलू शकत नाही का? ती आपण बदलायला नको का?
समाजातल्या, राज्यांतल्या, देशातल्या अशा सगळ्या भिंती जर आपण नष्ट करू शकलो तर मग आंतरराष्ट्रीय बॉर्डर राहणार नाही, त्या नामशेष होतील. किमान त्या भीतीदायक उरणार नाहीत, त्या वेदना देणार नाहीत, देशभक्तीच्या नावाखाली त्या माणसांना आणखी हिंसक बनवणार नाहीत – कदाचित त्या फक्त एक व्यावहरिक सोय म्हणून राहतील.
मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्रिपुरामय होण्याची प्रक्रिया माझ्यासाठी नुकतीच सुरु झाली आहे. पण त्रिपुरामय होण्यासाठी मी प्रत्यक्ष त्रिपुरात असायला हव अशी गरज नाही. डोळे मिटले की मला तिथली सुंदर दृश्य आठवतात, पाउस आठवतो, शांतता आठवते, नारळाची आणि सुपारीची झाड आठवतात, लोक आठवतात ... आणि मी त्या क्षणी त्रिपुरात असते!
माझ्यासाठी त्रिपुरामय होण हे त्रिपुरात असण्याहून अधिक काही आहे. ते आहे – एक नवी खिडकी उघडण, एक नव जग दिसण, नव्या दृष्टीकोनासह वास्तवाकडे पाहण, आपल्या दोषांचा, उणीवांचा साक्षात्कार होण, चांगल आणि वाईट; योग्य आणि अयोग्य यातला फरक लक्षात घेऊन वाटचाल करण ... आणि बदल घडवून आणण्यासाठी निमित्तमात्र राहण्याच साहस निश्चयाने अबाधित राखण!