(For English readers, this post is here too!)
त्या दिवशी मला
एक जाणवलं की गेली कित्येक वर्ष 'आनंदाचे
क्षण' ही माझ्यासाठी
एक पूर्वनियोजित बाब झाली आहे. कामधंदा करत असताना सुट्टी खूप आधी ठरवून घ्यावी
लागते. आपण सुट्टीवर जाऊ तेव्हा आलेलं काम कोण करेल हे बरंच आधी ठरवावं लागतं. मग जाण्या-येण्याची
तिकिटं, राहायची व्यवस्था, बॅग भरणं,
घरातली आवराआवरी... सगळं व्यवस्थित करावं लागतं. ‘अचानक गायबं
होऊन जाणं’ ही शक्यता आता माझ्यासाठी उरलेली नाही. (एके काळी
ते मला सहज जमत असे!) गेल्या अनेक वर्षांत हीच माझी
जीवनशैली झाली आहे. अर्थात, अशा पूर्वनियोजित गोष्टींमध्येही काही
अनपेक्षित आनंदाचे क्षण मिळत असतात.
त्या संध्याकाळी
परिसरातल्या एका संस्थेत एक हिंदी नाटक होतं. फेसबुकवर मी त्याची पोस्ट वाचली.
नाटकाचं नाव होतं ‘कोर्ट मार्शल’. मी इंटरनेटवर त्याची माहिती शोधली आणि मला ते
नाटक रंजक वाटलं. Indian Express मध्ये या नाटकाविषयी लिहिलं आहे – “कोर्ट मार्शल हे
नाटक एका अतिशय आज्ञाधारक सैनिकाबद्दल आहे, जो एका गुन्ह्यात
अडकलेला असतो. त्याचं वागणं संपूर्ण रेजिमेंटला हादरवून टाकतं आणि त्याच्या
वर्तनाची चौकशी करण्यासाठी सैन्य कोर्ट मार्शलची कारवाई करते.”
योगायोगाने, त्याच दिवशी सकाळी यामिनीचा फोन आला. तीही त्या
परिसरात दुसऱ्या कार्यक्रमासाठी येणार होती. आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता
भेटायचं ठरवलं.
मी नाटकाच्या
ठिकाणी पोहोचले, तेव्हा तिथं बरीच
गर्दी होती. मी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ‘नाटक नेमकं कुठं
होणार आहे’ हे विचारलं. कारण तिथे दोन-तीन सभागृहं आहेत, त्यामुळे आधीच विचारलेलं बरं असतं. ते दोन कर्मचारी
त्यांच्या मोबाईलमध्ये एका व्हिडिओ पहात होते. माझ्याकडं न पाहताच त्यांनी मला तळमजल्यावरच्या
सभागृहाकडं जायची खूण केली. मी त्या सभागृहात जाऊन तिसऱ्या रांगेत बसले. काही तरुण
मुली पारंपरिक नृत्याच्या पोशाखात दिसल्या. मी थोडी गोंधळले. पण वाटलं, नाटक सुरू होण्यापूर्वी कदाचित काही छोट्या मुलींच्या नृत्याचा कार्यक्रम
असावा.
माझ्या मागे
बसलेल्या एका वयस्क बाईंनी मला विचारलं, “तुमच्या मुलीचा किंवा नातीचा पण नाच आहे का? कोणता
आहे?” तेव्हा लक्षात आलं की मी चुकीच्या सभागृहात बसले आहे!
मी पुन्हा बाहेर
आले आणि त्याच कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा नाटकाबद्दल
विचारलं. यावेळी त्यांचा व्हिडिओ पाहून झालेला होता, त्यामुळे बहुधा त्यांनी माझा प्रश्न नीट ऐकला. एकजण म्हणाला, “अहो, कालच झालं ते नाटक.!” दुसरा म्हणाला, “थोडं कर्कश
होतं ते नाटक, पण चांगलं होतं.” मी संस्थेच्या ज्या पदाधिकारीच्या
पोस्ट वाचते, त्यांनी नजरचुकीने फेसबुकवर चुकीची तारीख टाकलेली होती असं लक्षात
आलं.
आता माझ्यासमोर
चार पर्याय होते: घरी परत जायचं आणि तासाभराने परत यामिनीला भेटायला याच भागात
यायचं. ते जरा अवघडच होतं. दुसरा पर्याय म्हणजे यामिनीला न भेटता थेट घरी जाणं. पण
मला तिला भेटायचं होतं, बऱ्याच दिवसांत
भेटलोच नव्हतो आम्ही. तिसरा पर्याय म्हणजे बाहेर झाडाखाली ७.३० पर्यंत बसून राहायचं. पण मी सोबत एकही पुस्तक
घेऊन आले नव्हते. आणि चौथा पर्याय होता – समोर जो काही कार्यक्रम होत होता,
तो बघणं.
चौथा पर्याय जरा
गंमतशीर होता. ना आयोजकांपैकी (आणि त्यात सहभागी होणाऱ्यांपैकी) कोणाला मी ओळखत होते,
ना मला नृत्यामध्ये फारसं गम्य होतं. ना आमंत्रण, ना ओळखदेख – तरीही मी त्यांच्या कार्यक्रमात आले होते. हॉलमध्ये खुर्च्या रिकाम्या
दिसत होत्या. मी शेवटच्या रांगेत बसले, म्हणजे त्यांच्या
पाहुण्यांना जागा लागली तर मी कार्यक्रमात व्यत्यय निर्माण न करता तिथून बाहेर पडू
शकत होते.
तो कार्यक्रम
एका नृत्यशाळेचा होता. भरतनाट्यम शिकवणारी नृत्यशाळा. (नृत्यशाळेचं नाव आणि
कार्यक्रमाचे फोटो मी जाणीवपूर्वक इथं देत नाही. कारण ते योग्य ठरणार नाही.) कार्यक्रमाचं
सूत्रसंचालन करणाऱ्या ताई दोन्ही भाषा – मराठी आणि इंग्रजी – सहजतेने बोलक होत्या.
त्यांचं सूत्रसंचलन काव्यात्मक होतं, पण पाल्हाळ नव्हतं. सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक
नृत्याची त्यांनी थोडक्यात ओळख करून दिली. त्या अभ्यास करून आल्या होत्या हे
स्पष्ट जाणवत होतं. खूप दिवसांनी इतकं प्रभावी सूत्रसंचालन ऐकलं. त्या ताईंचं मनापासून
कौतुक वाटलं.
भरतनाट्यम ही
दक्षिण भारतातील – तमिळनाडू राज्यातील – एक पारंपरिक नृत्यशैली आहे. त्याबाबत काहीही
वाचलं नसतानाही कार्यक्रमाच्या सुरूवातीचं संगीत ऐकूनच मला त्याचं तामिळनाडूशी
नातं ओळखता आलं. त्या सूरांनी मला चाळीस वर्षांपूर्वीच्या कन्याकुमारीला नेलं.
तिथे मी एम.एस. सुब्बुलक्ष्मींची भजनं पहाटे ऐकत असे. त्यासोबत समुद्राचा आवाज, थंड हवा, शांतता, मनात दाटून येणारा आनंद – हे सगळं क्षणात
आठवलं. एखादा अनुभव मनाला कुठल्या कुठं घेऊन जातो हे पाहून गंमत वाटली.
विविध
वयोगटांतील मुलींनी एकत्र नृत्य सादर केलं. त्यांचं देहबोलीद्वारे भाव व्यक्त करणं, समन्वय, एकत्र हालचाली करताना
एकमेकांना समजून घेणं – फार सुरेख होतं. मला त्या गाण्यांचे शब्द समजले नाहीत,
पण नृत्य करणाऱ्यांच्या हालचाली आणि चेहरे भाव मला अर्थपूर्ण वाटले.
मला त्यांचा थोडासा हेवाही वाटला. कारण मी एक ‘कलाशून्य’ व्यक्ती आहे आणि याची खंत
मला अधूनमधून वाटत असते. 😊
हे कलाकार नेहमी
स्वतःच्या शरीराशी इतकं एकरूप असतात का? शब्दांशिवाय संवाद शक्य आहे का त्यांच्यासाठी? नृत्य
आणि दैनंदिन जीवन यांच्यातला पूल ते कसा बांधतात?
नृत्य करणाऱ्या काही
मुली लहान होत्या. तर काही प्रौढ स्त्रिया – त्या नृत्यशिक्षिका होत्या. पण नृत्य
सादर होत असताना त्यांचा कुठेही ‘शिक्षिका’ असल्याचा आव नाही. सादरीकरणात
सगळ्याचजणी गुंगून गेल्या होत्या. एखाददुसरा अपवाद वगळता सादरीकरण सामूहिक होतं.
त्या प्रत्येक नृत्यामागे किती तयारी आणि सराव असेल!
नृत्यं शिव, नटराज, पार्वती, अष्टलक्ष्मी यांच्याशी संबंधित होती. पुष्पांजली, अलारिप्पू,
जातिस्वरम्, देवी कीर्तनम् यासारखी नवी नावं
ऐकायला मिळाली. राग आणि ताल यांचं थोडक्यात वर्णनही ऐकलं.
साधारण दीड तास
मी आनंदाने हे सगळं पाहत होते. तेव्हा मनात वेगवेगळे विचारही आले.
पहिला प्रश्न –
मी आपल्या लोककथांपासून कधी दूर गेले? पूर्वी ह्या कथा – जसं की शिव नाचतोय, रामसेतू
बांधला जातोय – यांचं आणि म्हणून सण-उत्सवांचंही आकर्षण वाटायचं. पण हल्ली सण-उत्सवांमधला
निरागसपणा लोप पावतो आहे. माझ्याभोवती, माझ्या परिसरात, माझ्या जगात आता सण उत्सव
म्हणजे निव्वळ कर्मकांड झालं आहे. त्यात भर पडली आहे ती ‘धर्माचा
अभिमान’ या बाबीची. आणि “ते आणि आम्ही” असं सातत्याने कर्कश आवाजात सांगणाऱ्या द्वेषाची. मला ते पचनी पडत
नाही. पण या कार्यक्रमामुळे ‘लोककथा परत एकदा वाचायला हव्यात’
असं वाटतंय.
दुसरं असं वाटलं
की आनंद वाटायला आपण एखाद्या समूहाचा सदस्य असण्याची, लोक आपल्या ओळखीचे असण्याची
काही गरज नाही. अनोळखी लोकांसोबतही आपण
आनंद अनुभवू शकतो. आपल्याला हसायला, बोलायला, आनंदी व्हायला काहीही निमित्त होऊ शकतं.
मला नेहमी असं
वाटतं की मी या जगात योगायोगानेच आले आहे – (जशी मी या कार्यक्रमाला आले तशीच). या
जगात येताना माझ्या कुणीही ओळखीचं नव्हतं. इथं मी काही मर्यादित काळासाठी असणार
आहे, आणि इथून मला काही घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे म्हटलं तर एक प्रकारचं
उपरेपण आहे. पण त्याचवेळी असंख्य लोकांशी निर्माण झालेले स्नेहबंध आहेत, जागांच्या
रमणीय आठवणी आहेत. हे लोक, या जागा, या आठवणी आता माझाच समृद्ध हिस्सा आहेत. एके
काळी अनोळखी असलेली माणसं, जागा ... आज आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत. आज मी जी
काही आहे, ती या सर्वांमुळे आहे. उपरेपण आणि आपलेपण हे दोन विरूद्ध प्रवाह माझ्यात
एकत्रित रहात आले आहेत. काही आनंद तात्कालिक असतात, काही दीर्घकाळ सोबत राहतात.
आनंदी राहावं असे प्रसंग, घटना वारंवार होत राहतात. म्हणून “to be or not to
be” या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे – “be and be not”.
साडेसात झाले.
यामिनीला फोन करायची वेळ झाली होती. मी शांतपणे निघाले – कुणालाही न सांगता, निरोप न घेता. कुणाला माझं येणं लक्षात आलं नव्हतं,
आणि जाणंही नाही. एकदम परफेक्ट! ती दीड तासांची भेट जणू माझ्या
आयुष्याचंच सार वाटलं – एखादा सुंदर क्षण अनुभवायचा, आणि
शांतपणे निघून जायचं. प्रत्यक्ष आयुष्यात कधी कधी मीही काहीतरी सादर करते म्हणा –
अर्थातच भरतनाट्यम् नक्कीच नाही 😊
आणखी एक. नियोजन महत्त्वाचं आहे. पण काही गोष्टी अशा न ठरवता, अचानक करणंही आनंददायी अनुभव असू शकतो. नवीन शक्यता, नवीन माणसं, नवीन अनुभव यांच्यासाठी आपलं मन खुलं असायला हवं. चुकीच्या हॉलमध्ये जाऊन त्या संध्याकाळी मला निखळ आनंद मिळाला; आणि स्वतःशी संवाद साधण्याची एक संधीही! कोण जाणे पुढच्या क्षणी, पुढच्या वळणावर असा एखादा अनपेक्षित आनंदाचा अनुभव आपल्यासाठीही असेल.
No comments:
Post a Comment
पोस्टवरती प्रतिसाद नोंदवण्यात अडचण येत असल्याचे काही वाचकांनी कळवले आहे. तांत्रिक बाबी तपासून पहात आहे. प्रतिसाद येथे प्रकाशित होत नसल्यास मला इमेलवर तो पाठवावा ही विनंती. धन्यवाद.