ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label मुंबई. Show all posts
Showing posts with label मुंबई. Show all posts

Saturday, December 7, 2013

१८१. शोध स्वत्वाचा ....

१९६७ ची गोष्ट.
एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार.
मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत.
लग्न होतं.

पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा  तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं.
पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी.
कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही.
कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ...

तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.
तोवर मुलीच्या गर्भात बाळ रुजतं; ते जन्माला येतं.
आपल्या विधवा आईला अजून दोन लहान बहिणींची लग्न करायची आहेत; त्यांची आयुष्यं आपल्यामुळे बिघडायला नकोत म्हणून ही मुंबईला परत येते.

मुलगी विचारांत पडते. मुलगी दैवाला दोष देते. वेदनांना मुरड घालायचा प्रयत्न करते. संसार सुखाचा असल्याची बतावणी पुरेपूर निभावते.

पण मुलगी गोंधळलेली आहे. मारहाण झाली की नव-याचा “प्रेमाचा अंक” चालू होते.
आणखी दोन मुली जन्माला येतात.

घरात कधी खाण्याची चंगळ तर कधी उपासमार. हिच्या हातात पैसा नाही, या शहरात तिला कुणी मैत्रिणी नाहीत. नातेवाईक आहेत काही, पण घराची लाज कुठे उघडी करायची त्यांच्यासमोर?

मुलगी सोसत राहते. तिच्या शरीराला जखमा होतच आहेत, मन मोडून गेलंय तिचं. ती जीव संपवत नाही फक्त मुलांकरता.

घर सोडून जायचं आणि परत यायचं – असं अनेकदा घडतं. कधी मुलांसह घर सोडायचं तर कधी मुलांविना.
अशा परिस्थितीत सुरु होतो एक शोध – स्वत्वाचा शोध ....

*****
२०१३ ...
या आहेत  फ्लेविया अ‍ग्नेस.
‘मजलिस’च्या संथापिका आणि संचालिका.

काय आहे 'मजलिस'?
शब्दश: बघितलं तर  “एकत्र येणं” – सल्लामसलतीसाठी एकत्र येणं.

ही आहे स्त्रियांच्या हक्कासाठी कार्यरत असणारी एक संस्था. स्त्रीविषयक कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणणं, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित स्त्रियांना कायद्याची लढाई लढून त्यांचे अधिकार मिळवून देण्यात मदत करणं, कायदेविषयक साक्षरता वाढवणं..... अशी अनेक कामं! 'मजलिस'कडे वकिलांची एक फौज आहे – आणि या सर्व वकील स्त्रिया कोर्टात पीडित स्त्रियांच्या अधिकाराची लढाई त्यांच्या वतीने लढत आहेत.

‘मजलिस’चं कार्यालय मुंबईत असलं तरी पूर्ण महाराष्ट्रात त्यांच नेटवर्क आहे. जिल्हा न्यायालयांत स्त्रियांच्या बाजूने लढणा-या वकिलांना – ज्यात स्त्रिया जास्त असतात; पण पुरुषही असतात – प्रशिक्षण तर दिलं जातंच; पण त्यातल्या निवडक १५ लोकांना (प्रामुख्याने स्त्रिया) वर्षभराची फेलोशिपही दिली जाते. हा कार्यक्रम २००३ पासून चालू आहे. अशा संवेदनशील आणि जाणकार स्त्रिया वकील जिल्ह्याच्या स्तरावर असण्याचा पीडित स्त्रियांना फायदा होतो. जात –धर्म- वय- शिक्षण  अशा भेदांचा विचार न करता स्त्रियांना मदत केली जाते.

 “कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण  कायदा २००५” च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य शासनासोबत “मोहीम” (Monitoring of  Himsa (PWDV Act) in Maharashtra) चालवली जात आहे. लैगिक छळ/शोषण अशा घटनांनी ग्रस्त असणा-या स्त्रियांसाठी सामाजिक आणि कायद्याच्या मदतीचा “राहत” कार्यक्रम “महिला आणि बालक विकास” मंत्रालयाच्या सोबतीने चालू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई शहरात हा कार्यक्रम सुरु झाला आहे.

१९८० च्या आसपास फ्लेविया अ‍ग्नेस ही एक “पीडित महिला” होती. आज फ्लेविया अ‍ॅग्नेस स्त्रियांचे हक्क जपणारी कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यक्षेत्रातलं एक सर्वार्थाने मोठं नाव आहे. अकरावीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न झालं होतं फ्लेवियाचं. प्रतिकूल परिस्थितीत, कष्टाने, जिद्दीने त्यांनी कायद्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे आणि एम. फिल. देखील केलं आहे.

१९८५ मध्ये फ्लेविया अ‍ग्नेस यांचं छोटेखानी आत्मकथन प्रसिद्ध झालं ते इंग्रजी भाषेत. १९८५ मध्येच श्री प्रकाश बुराटे यांनी त्याचा “अंधारातून प्रकाशाकडे” या नावाने केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. आठ अन्य भाषांतही हे पुस्तक आता उपलब्ध आहे.



“ हे खरंय की या पुस्तकामुळं कौटुंबिक हिंसेमुळे होरपळणा-या स्त्रियांचा संघर्ष कमी तीव्र किंवा कमी वेदनादायक होत नाही. प्रत्येक महिलेला आयुष्याच्या संघर्षाचे परिणाम स्वत:च भोगावे लागतात, स्वत:च वेदनेची ओझी वाहावी लागतात. परंतु या पुस्तकामुळं त्यांना नवीन जीवन उभारणं शक्य कोटीतलं वाटतं, त्यांची जिद्द जिवंत राहते आणि आशेचा किरण दिसत राहतो ..."  हे फ्लेविया यांचे प्रस्तावनेतले उद्गार हे आत्मकथनाचा संदर्भ आजही किती महत्त्वाचा आहे हेच सांगून जातात.

*****

मी अनेक वर्षापासून फ्लेविया अ‍ग्नेस यांचं नाव ऐकत आले आहे; त्यांचे लेख वाचले आहेत अनेकदा. त्यांची पुस्तकं सगळी नाही; पण दोन वाचली आहेत. स्त्रियांचे अधिकार आणि स्त्रीविषयक कायदे या क्षेत्रातलं त्यांच योगदान नावाजलेलं आणि महत्त्वाचं आहे ते केवळ त्या पीडित स्त्री आहेत म्हणून नाहीत तर पीडित स्त्रियांबाबत त्यांनी केलेल्या कामामुळे.  ‘मजलिस’च्या  एका कार्यक्रमात सामील झाल्यामुळे मला त्यांची आणि त्यांच्या कामाचीही जवळून ओळख झाली.

‘मजलिस’चे काही मुद्दे मला “अनपेक्षित” होते. उदाहरणार्थ “समान नागरी कायद्या”ला असणारा त्यांचा विरोध. त्यामागची त्यांची भूमिका “भावनिक” नसणार हे माहिती असल्याने मी त्यांचा “विचार” समजून घेण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. माझे अनेक विचार मी बदलायची गरज कदाचित असेलही!

एका व्यक्तीचा 'स्वत्वाचा शोध' किती अनेकांना  उपयोगी पडतो याचा अनुभव  फ्लेविया यांना भेटल्यावर मला आला असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

Friday, August 3, 2012

१३३. ऑन डयूटी

(सगळ्यात आधी या इंग्रजी शीर्षकाबद्दल माफी मागते. पण या अनुभवाला समर्पक मराठी शब्द मला सुचले नाहीत; कोणी ते सुचवल्यास त्याचा जरुर उपयोग करेन.)

त्यादिवशी मी आणखी एका प्रवासाला निघाले होते. गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावरुन सुटणार होती आणि त्यासाठी मी तिथं वेळेच्या बरीच आधी पोचले होते. खरं सांगायचं तर या गाडीने प्रवास करताना मी नेहमीच वेळेच्या आधी पोचते. पुण्यातून मुंबईला पोचणा-या रेल्वे गाडीच्या वेळात आणि या गाडीच्या वेळात तब्बल दोन एक तासांच अंतर आहे. डेक्कन क्वीन किंवा प्रगती एक्स्प्रेसने आलं की मी साधारण साडेअकराच्या सुमारास इथं पोचते. मग मी तिथं काहीतरी खाते, पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत बसते. हे काही करायचं नसलं तर स्थानकावरच्या असंख्य प्रवाशांकडे पहात बसते - त्यांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने! 

मला जी गाडी पकडायची होती ती होती कर्णावती एक्स्प्रेस. ती भल्या पहाटे अहमदाबादहून निघून इथंवर येते. इथं अर्धा तास थांबून परतीची वाट घेते. सगळा दिवस प्रवासात गेला तरी मला हीच गाडी सोयीची वाटते. माझे इतर सहकारी दुसरे काही प्रयोग करत असतात - म्हणजे पुणे-मुंबई बसचा प्रवास, किंवा पुणे-अहमदाबाद अहिंसा एक्स्प्रेस, किवा पुण्यातून सुरत अथवा वडोद-याला बसने जाणे वगैरे. पण मी मात्र डेक्कन/प्रगती - कर्णावती हेच सूत्र पकडून आहे. अगदी पर्यायच नसेल तेव्हाच मी लांबचा प्रवास बसने करते. 

कर्णावती एक्प्रेस फलाटावर आल्याची घोषणा झाली तरी अर्धा तास थांबून रहावं लागतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे ही सकाळी निघालेली गाडी असते आणि हा शेवटचा थांबा असतो - त्यामुळे गाडीत प्रचंड कचरा साठलेला असतो. लोक रेल्वेचे डबे किती घाण करतात हे पाहून नवल वाटतं. रेल्वेचे सफाई कर्मचारी गाडी आली की डब्यात चढतात आणि साफसफाई करायला लागतात. 

एकदा सफाई झाली, डब्यातला एसी सुरु झाला की मी आत चढते. आता दहा मिनिटांत कशाची अपेक्षा करायची ते मला अनुभवाने माहिती आहे - मग मी त्याची वाट पहायला लागते. बरोबर दहा मिनिटांत फिकट बदामी रंगाची मऊशार त्वचा असणारा एक सुंदर कुत्रा त्या डब्यात प्रवेश करतो. त्याच्या गळ्यातल्या साखळीची सूत्रं वरवर पाहता पोलिसाच्या हातात आहेत असं दिसतं. पण तो पोलिस आणि तो कुत्रा यांच्यात एकमेकांना त्रास न देण्याचा एक शब्दविरहित करार आहे असं मला त्यांच्याकडे पाहताना नेहमी जाणवतं. त्यांच्या नात्यात कसलाही ताण आणि कसलाही अभिनिवेश दिसत नाही. 

आता हे थोडंसं गंमतीदार आहे. रेल्वे पोलिसांबद्दल पूर्ण आदर राखूनही मला या प्रसंगात नेहमी हसू येतं. कर्णावती गाडीची तपासणी बॉम्ब ओळखता येणा-या कुत्र्याकडून केली जाणं - यात काय विनोदी आहे असा प्रश्न ज्यांनी त्या गाडीने नियमित प्रवास केला नाही त्यांना नक्कीच पडेल. पण मला तो पडतो. रोज घडयाळाच्या काटयाचे पालन करत या गाडीची तपासणी होते. कोण दहशतवादी इतके मूर्ख असतील की ते बॉम्ब सोबतच्या सामानात घेऊन या डब्यात कुत्रा येण्यापूर्वी चढतील? ते अर्थातच बोरिवली स्थानकात - जिथं अशी तपासणी होत नाही - या गाडीच चढू शकतात, ते वापी, वलसाड किंवा वडोदरा स्थानकात गाडीत चढू शकतात आणि घातपात घडवून आणू शकतात. अगदी मुंबई सेंट्रल स्थानकातही कुत्रा डब्यातून बाहेर पडल्यावर चांगली दहा मिनिटं असतात - तेव्हाही ते आरामात डब्यात चढू शकतात.  

त्यामुळे रेल्वेने तपासणीची जागा, वेळ, क्रम .. हे बदलतं ठेवायला हवं. पण आपल्याकडे शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम असतो - तो काटेकोरपणे पाळला जातो. अगदी यांत्रिकपणे पाळला जातो. 

मी दोन -तीन महिन्यातून किमान एकदा हा प्रवास करते. त्यामुळे या कुत्र्याला मी अनेकदा पाहिलं आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. माणसांनी बॉम्ब निर्माण करायचे आणि ते शोधून काढत कुत्र्यांनी माणसांचे प्राण माणसांपासून वाचवायचे - हा कसला न्याय आहे हे काही मला कळलेलं नाही आजवर! हा कुत्रा अतिशय शांतपणे आपलं काम करतो. तो अतिशय स्वच्छ दिसतो नेहमीच. हा कुत्रा माझ्याजवळून जातो तेव्हा त्याच्या पाठीवरुन मायेने हात फिरवावा अशी इच्छा माझ्या मनात येते - पण मी ते करत नाही. उगाच पोलिसाचं लक्ष मला माझ्याकडे वेधून घ्यायचं नाही आणि तो कुत्रा माझ्या वागण्यावर तितका प्रेमळ प्रतिसाद देईल याचीही मला खात्री नाही - अजिबातच नाही. 

जोपर्यंत कुत्रा डब्यात असतो, तोवर सगळे प्रवासी आपापले बोलणे थांबवून शांत बसतात. कुत्रा जसा पुढे जातो, तशी प्रवाशांची नजरही त्याच्याबरोबर फिरत जाते. वातावरणात 'आता इथं काही सापडेल कां?' असा एक प्रकारचा तणाव असतो. एकदा का तो कुत्रा डब्याच्या बाहेर पडला की सगळ्यांचे रोखून धरलेले श्वास पूर्ववत गतीने चालायला लागतात आणि माणसं निवांतपणे परत आपापल्या उद्योगांना लागतात. हेही सगळे नेहमीचे - अगदी अपेक्षित. 

त्यादिवशी मात्र एक अघटित घडलं. एक पांढ-या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगांची अगदी कडक इस्त्री केलेली पॅन्ट घातलेला एक माणूस एकदम त्या कुत्र्याशी बोलायला लागला. तो माणूस कोणालातरी गाडीत पोचवायला आला होता असं वाटलं कारण तो उभा राहून कोणाशीतरी बोलण्यात अगदी मग्न होता. जेव्हा तो कुत्रा त्यांच्या जवळून जायला लागला तेव्हा त्या माणसाचे लक्ष तिकडं गेलं. गप्पा थांबवून तो कुत्र्याशी बोलायला लागला - ते बोलणं जणू काही त्या दोघांची खास ओळख असावी अशा थाटाचं होतं. आश्चर्य म्हणजे तो पोलिसही थबकला आणि त्या माणसाने कुत्र्याशी बोलण्यावर त्याने काही आक्षेप घेतला नाही. 

लक्षात यावं न यावं इतक्या काळासाठी कुत्राही थबकला. तो जणू त्या माणसाचं बोलणं ऐकत होता - पण त्याने प्रतिसाद काहीच दिला नाही. कुत्र्याची ना शेपटी हलली, ना त्याने त्या माणसाकडे मान उचलून पाहिलं. त्या सफेद कपडे घातलेल्या माणसाचा हात कुत्र्याच्या पाठीकडे येताना मात्र कुत्र्याने नजर वर केली. त्या नजरेत काय होतं मला माहिती नाही पण त्या माणसाचा हात आपोआप मागे गेला. 

"टायगर माझी ओळख विसरला की काय पार?" त्या माणसाने पोलिसाला तक्रारवजा सुरात विचारलं.

पोलिसाचं नम्र उत्तर मला चकित करणारं होतं. पोलिस म्हणाला, "माफ करा साहेब. रागावू नका. पण टायगर डयूटीवर असताना कोणाला ओळख दाखवत नाही. त्याचं पहिल्यापासून असंच आहे. ..." पोलिसाच्या स्वरांत नकळत एक अभिमान डोकावून गेला यात शंका नाही. 

तो कुत्रा आणि तो पोलिस दोघेही जणू काही घडलंच नाही अशा थाटात पुढे गेले. 

तो पांढ-या कपडयांतला माणूस स्वतःशीच हसला. माझ्या प्रश्नार्थक नजरेचा त्याच्यावर ताण आला असणार. कारण मी काहीही विचारलं नाही तरी तो म्हणाला, "मॅडम, आजकाल कुत्रीसुद्धा हुशार झालीत बघा. मी या टायगरचा प्रशिक्षक होतो - मी त्याला अनेक गोष्टी शिकवल्यात आणि पठ्ठा मलाच ओळख दाखवत नाही. कां, तर म्हणे ऑन डयूटी आहे! काय माणसाची दशा झाली आहे पहा. डयूटीवरचा कुत्रासुद्धा तुमची काही ओळख ठेवत नाही, माझी लाजच काढली म्हणा की टायगरने!"

परत तो माणूस हसला - काहीसं स्वतःशी, काहीसं माझ्याकडं पाहून.   

टायगरच्या वर्तणुकीबद्दल त्याच्या प्रशिक्षकाला समाधान वाटलं की दु:ख - हे मात्र मला सांगता नाही येणार!! 
**

Saturday, November 12, 2011

९९. बोच


मुंबईत मी राहायला आले, ती थेट दादरमधेच. तस पाहायला गेलं तर गर्दी, धावपळ मला मानवत नाही. माझ्या स्वभावात एक प्रकारचा ’निवांतपणा’ आहे . त्यामुळे मुंबईत किंबहुना कुठल्याच मोठ्या शहरात जाण्याची महत्त्वाकांक्षा मला कधीच नव्हती. पण हाती घेतलेल्या कामाने मला मुंबईत आणलं.आपण या अफाट गर्दीत हरवून जाऊ अशी भीती एका बाजूने वाटत होती. तर दुस-या बाजूने मुंबई म्हणजे स्वत:च जगणं; स्वत:ची मूल्य तपासून पाहण्याची एक आव्हानात्मक  संधीही वाटत होती
.
पहिल्या दिवशी मी प्रशांतला विचारलं, “दादर स्टेशन किती लांब आहे इथून?” त्याने प्रश्नार्थक नजरेन माझ्याकडं पाहिल,  म्हणाला, “आज इथच काम आहेत सगळी. बाहेर नाही जायचय.” घाईने मी स्पष्टीकरण दिलं, “काम नाही म्हणूनच तर सहज चक्कर मारून येते तिथवर. जरा मुंबईची ओळख करून घेते. पाहू आमच दोघींच जमतय का ते!”

प्रशांतने मग मला नकाशा काढून दिला. गडकरी चौक, शिवसेना भवन, प्लाझा (थिएटर), आयडियल (पुस्तकांचे दुकान) अशा ठळक खुणांच्या मदतीने माझ दैनंदिन जाणं –येणं सुरु झालं. जरा आत्मविश्वास बळावल्यावर टिळक पुलावरचा जिना उतरून आयडियलच्या गल्लीत उतरणं, प्लाझाच्या बाजूने बादल-बिजलीच्या (ही आणखी दोन चित्रपटगृहे!) दिशेने आत शिरून कार्यालयात परत येणं असे उद्योग मी सुरु केले. आता गंमत वाटते, पण तेव्हा मला ते नवे रस्ते शोधण्याचे काम फार सर्जक वाटायचे. ठरलेल्या ठिकाणी पोचायला अनेक मार्ग उपलब्ध असले की मला बरं वाटतं! कंटाळा टाळण्यासाठी असले छोटे ’शोध’ फारच उपयुक्त ठरतात!

हळूहळू माझ मुंबईत बस्तान बसलं. घडयाळाच्या काटयावर मी देखील स्वत:चं जगणं आखायला शिकले. कार्यालयातून दादर रेल्वे स्थानकापर्यंत जायला बरोबर चौदा मिनिटं लागतात – असाही हिशेब मनात पक्का झाला. अंगावर येणारी गर्दी चुकवत, स्वत:ची गती अबाधित ठेवून चालण्याचं मुंबईतलं म्हणून एक खास तंत्र आहे – तेही मी ब-यापैकी आत्मसात केलं.

पण का कोणास ठावूक; मुंबईत मी ब-यापैकी स्थिरावल्यावर मात्र माझ हे चौदा मिनिटांचं गणित चुकायला लागलं! ठाण्याला, बोरिवलीला जायच असेल, तर ही चूक महागात पडायची नाही. कारण एक गाडी चुकली तरी पाठोपाठ दुसरी गाडी असायचीच. पण चार दिवसांच्या अंतराने माझ्या कर्जत आणि कसारा गाडया चुकल्या तेव्हा मात्र घोटाळा झाला बराच. दोन्ही ठिकाणी मला पोचायला दीड-दोन तासांचा उशीर झाला आणि कार्यक्रमाची गडबड झाली होती.

कसा-यात झालेला गोंधळ निस्तरून परत येताना मी विचार करत होते नेमक काय चुकत होत याचा. वेळ का चुकत होते मी गाडीची? माझ घडयाळ माग पडलं होत का? का माझी चाल मंदावली होती? की आणखी काही? ….कार्यालयातून निघाल्यापासूनच्या घटनांचा मी आढावा घेत होते.

आज दादर स्थानकात येता येता वाटेत दोन-तीन लोक भेटले होते. “मी घाईत आहे, नंतर वोलू” असे म्हणण्यातही दोन मिनिटं तर गेलीच होती. परवाही तर असच झालं होतं. माझ्या एकदम लक्षात आलं, की मुंबईत येऊन आता मला बरेच दिवस झाल्याने ओळखी वाढल्या होत्या. रस्त्यावर सारखे कोणी ना कोणी भेटत होते. त्यांच्याशी जुजबी एखादे वाक्य बोलतानाही वेळॆचं आणि अंतराचं माझ गणित चुकत होत!!

पाहता पाहता ओळखी अधिकच वाढल्या. नाती अधिक पक्की झाली. चौदा मिनिटांचं ते अंतर कापायला मला तीस  आणि कधी कधी तर चाळीस मिनिटांचा वेळ सहज लागायला लागला. घाईने कधी मी माणसांना चुकवून पुढे जाऊ लागले.

कालांतराने मी मुंबई सोडली.

परवा ब-याच वर्षांनी दादरला उतरले. हाताशी थोडा मोकळा वेळ होता म्हणून गडकरी चौकापर्यंत चालत गेले. चालायला सुरुवात करताना नकळत मोबाईलवर नजर टाकली होती – किती वाजलेत ते पाहायला. गडकरी चौकात पोचल्यावर परत एकदा घडयाळ पाहिलं  - मोजून चौदा मिनिट लागली होती मला!! अचूकतेचा आग्रह धरणारं मन सुखावलं!

पण त्याचबरोबर मन दुखावलही गेलं!! हे अंतर चालायला तीस मिनिटांचा वेळ लागेल अस कुठतरी गृहित धरल होत मी जुन्या सवयीने ! पण या रस्त्यावर आता कुणीही ओळखीच भेटल नाही! वर्षानुवर्ष जिच्याशी मैत्री होती त्या जागेला आपण परकं होऊन बसलो आहोत हे स्वीकारणं त्या क्षणी अवघड गेल मला!

नवे रस्ते चालायचे तर जुने सोडावे लागतात हे कळत मला.

पण ते कळूनही  कसलीतरी बोच राहते मागे … निदान काही काळ तरी ….

Friday, July 23, 2010

३६. समुद्रभेट

अखेर एकदाचा पाऊस आला.
पण येताना साथीला चक्रीवादळही घेऊन आला.
चालायचेच! पावसालाही सोबत हवीशी वाटणारच!

मुंबईच्या रस्त्यांवर झेपावत आलेल्या समुद्राच्या लाटांची प्रकाशचित्रे जिकडेतिकडे झळकली. ती पाहताना मला एक खूप जुनी गोष्ट आठवली.

किती बरे वर्षे झाली असतील त्याला आता? निदान दोन दशके तरी नक्कीच उलटून गेलीत.

आम्ही काही जणांनी मिळून एक युवक शिबिर घेतले होते. शिबिर तीन महिने रोज संध्याकाळी दोन तास चालायचे. साधारण दुस-या महिन्याच्या शेवटी आम्ही या मुला-मुलींना सहलीला नेले. सहलीत आम्ही एका सामाजिक प्रकल्पाला भेट दिली. सर्वेक्षण केले. शिबिरार्थी सहलीवर एकदम खूष होते.


काही दिवसांनी ते म्हणाले, “चांगली झाली ती सहल. पण ही तर तुमची सहल झाली. ती तुम्ही आयोजित केलेली सहल होती, तुमच्या कल्पनांची. पण आता आम्ही तुम्हा कार्यकर्त्यांना सहलीला नेणार. पहा आम्हालाही सहल आयोजित करणे नीट जमते का नाही ते!”

शिबिरार्थींच्या उत्साहाला मोडता घालायचे काही कारण नव्हते. सर्वांची सोय पाहून, वेळ पाहून निघालो.

याही वेळी एका सेवा प्रकल्पाला भेट. तेथील कार्यकर्त्यांशी बातचीत. गरमागरम चर्चा.
शेवटचा कार्यक्रम होता समुद्रभेट.

आता समुद्राने वेढलेल्या मुंबईकरांना समुद्राचे काय अप्रूप? पण तरीही काहींच्या उत्साही आग्रहास्तव गेलो. दुपारची चार साडेचारची वेळ होती.

किनारा अगदी ओस होता.
वाळूवर खूप दूरवर नजर टाकली तरीही पाणी दिसूच नये इतका समुद्र लांब खेळायला गेला होता.
बहुतेकांनी ’ओहोटी!’ असा उद्गार काढून पर्यायच नसल्याप्रमाणे रस्त्यावरच्या झाडाखाली बैठक मारली. त्यांच्या गाण्यांच्या भेंडया सुरूही झाल्या. (गाण्यांच्या भेडयांना तोवर ’अन्ताक्षरी’ म्हणत नसत – त्या काळची ही गोष्ट आहे!)

आम्ही तिघे चौघे समुद्रवेडे मात्र चुळबुळत होतो.
पाण्यात पाऊल भिजवल्याशिवाय समुद्राच्या सहवासाची खरी मजा येत नाही.
आम्ही पाण्याच्या दिशेने चालायला लागलो.
खूप वेळ चाललो, पण पाणी काही जवळ येत नव्हते.
डावी उजवीकडे पाहावे तर पाणी होते. पण तोंड वळवून ती दिशा धरावी तर आमच्यात तितकेच अंतर उरत होते. समुद्र जणू हट्टाला पेटला होता आणि त्या हट्टाची लागण आम्हालाही झाली होती.

किती वेळ गेला कोण जाणे!
पण आता लाटांचा आवाज अगदी जवळून येऊ लागला.
समुद्राच्या भिनत जाणा-या वासाने माझे मन टवटवीत होऊ लागले होते.
आता पाण्यात आणि आमच्यात जेमतेम काही फुटांचे अंतर उरले होते.
पाण्यात पाय घालायला आम्ही अगदी अधीर झालो होतो.

मागून काहींच्या ओरडण्याचा आवाज आला पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. दुस-या एखाद्या गटाची काहीतरी गंमत चालली असावी असेच मला वाटले. पण अचानक त्या हाकांची तीव्रता वाढली. माझे नाव ऐकून मी मागे वळून पाहिले आणि माझ्या डोळयांवर माझा विश्वासच बसेना! गेला अर्धा तास आम्ही जी वाळू चालून आलो होतो, तिचे नामोनिशाणही आता शिल्लक नव्हते! आमच्या चारी बाजूंना फक्त पाणी होते आणि ते पाणी आमच्या पावलांना स्पर्श करत होते.

आमचा एक मित्र दोन तीन कोळ्यांच्या पोरांसह आमच्या मागे धावत येत होता.
“भरती! भरती! लवकर मागे फिरा" असा त्याचा आक्रोश चालू होता.
आम्ही सर्वजण सुसाट धावत सुटलो.
पण ओल्या वाळूत पळणेही अवघड!
अर्ध्या पाऊण तासाचे अंतर समोर होते आणि समुद्राचे पाणी क्षणाक्षणाला वाढत होते.

ज्या समुद्राची त्या क्षणापर्यंत आस होती, त्याच्यापासून पळ काढण्यासाठी आम्ही आता धडपडत होतो.

आणखी काहीजण मदतीला धावून आले.
आम्ही किनारा गाठला तेव्हा केवळ आमचा नव्हे तर सर्वांचाच जीव भांडयात पडला.

आज दर वेळी समुद्र पाहताना मला तो क्षण आठवतो.
इतक्या अनुभवानंतरही मनात आज पाऊल लाटांमध्ये भिजवण्याची आस उरलेलीच असावी याची गंमत वाटते.
कुतुहलापायी, आसक्तीपायी, मनाच्या वेडेपणापायी पळ काढण्याचे असे प्रसंग पुन:पुन्हा येतच राहिले.

आपण आपले किना-यावर बसून राहावे, भरतीची लाट कधी ना कधी तिथवर पोचतेच – हा सिद्धान्त मनाला कळतो - पण वळत मात्र नाही. दर वेळी गुंतणे आणि जीवावर बेतल्यावर पळ काढणे हे चक्र चालू राहते.

ज्याचे त्याचे मन! दुसरे काय?

आता इतक्या वर्षांनंतर मला त्या दिवशीचे पळणे हास्यास्पद वाटते हे मात्र खरे!
पण हे वाटणेही अलिकडचेच!

पूर्वप्रसिध्दी: मुंबई तरूण भारत २४ जुलै १९९६