ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, March 26, 2014

१९४. निवडणूक २०१४. अनुभव ३. मुंबईत केजरीवाल (२)


लोकसभा मतदारसंघ ‘मोठे’ असतात हे माहिती आहे, पण ते किती मोठे असतात हे प्रत्यक्ष त्या मतदारसंघाविषयी माहिती घेतली की कळतं. ईशान्य मुंबई मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ते आहेत शिवाजीनगर (मानखुर्द), मुलुंड, घाटकोपर पूर्व,  घाटकोपर पश्चिम, विक्रोळी आणि भांडूप. २००९ मध्ये या मतदारसंघात सुमारे १६ लाख मतदार होते – गेल्या पाच वर्षांत यात अजून चार लाख मतदारांची भर पडली आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. सहा उपनगरांत विखुरलेल्या वीस  लाख मतदारांशी संवाद साधण्याचं उद्दिष्ट ‘रोड शो’ मधून साध्य होत नाही हे उघड आहे. अर्थात इथले सगळे मतदार ‘आप’चे किंवा मेधाताईंचे समर्थक आहेत असं नाही – असं कुठेच नसतं म्हणा. त्यामुळे जिथं समर्थन आहे, किंबहुना ज्या भागात मेधाताईंच काम आहे अशा भागात केजरीवाल जात आहेत हे स्पष्ट होतं आणि ते योग्यही होतं.

केजरीवाल यांचा कार्यक्रम तसा आखीव होता.  पाच वाजून चाळीस मिनिटांनी आण्णाभाऊ साठे नगर, तिथून शिवाजीनगर मार्गे घाटकोपरचं रमाबाई नगर; तिथून विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये जाहीर सभा. निवडणूक आचारसंहितेनुसार रात्री दहा वाजता प्रचार बंद व्हायला हवा. थोडक्यात काय तर तीन विधानसभा मतदारसंघांना केजरीवाल भेट देणार होते – किंवा खरं तर तीन विधानसभा मतदारसंघांना केजरीवाल दर्शन देणार होते. दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई अशा दोन लोकसभा मतदारसंघांत केजरीवाल दुपारी दोन ते साडेचार असे अडीच तास होते. पण ईशान्य मुंबई मतदारसंघात ते संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ असे चार तास असणार होते – म्हणजे ईशान्य मुंबईत विजयाची संधी जास्त आहे असा निष्कर्ष ‘आप’मधल्या जबाबदार लोकांनी काढला आहे का? जरा कुतूहल वाटत राहिलं मला या नियोजनाबद्दल.

मानखुर्दच्या रस्त्यावर वळताना बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलीसांनाच पत्ता विचारल्यामुळे आमचं काम सोपं झालं. रस्त्यावर डावीकडे खूप गर्दी दिसली आणि अर्थातच अनेक टोप्या दिसल्या तिथं आम्ही थांबलो. या ठिकाणी सुमारे पाचेकशे लोक असतील. उपस्थितांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. तरुण, प्रौढ, मध्यमवयीन, वृद्ध – असे वेगवेगळ्या गटातले स्त्री-पुरुष दिसत होते. मुस्लिम स्त्रियांची उपस्थिती त्यांच्या बुरख्यामुळे आणि त्यांनी परिधान केलेल्या ‘आप’च्या टोप्यांमुळे लक्ष वेधून घेत होती.

लोकांशी बोलताना कळलं की हा ‘मंडाला’ नावाचा भाग होता. अनेक वर्ष मुंबईत राहूनही मी इथं कधी आले नव्हते. किंबहुना संध्याकाळचा माझा प्रवास मला मी आजवर न पाहिलेल्या, एरवी माझ्यासाठी अदृश्य असणा-या  मुंबईची झलक  दाखवणारा होता.

डिसेंबर २००४ मध्ये मंडालातल्या आणि परिसरातल्या  ८५००० घरांवर संक्रात आली होती. इथं घरटी सहा ते सात माणसं आहेत असा अंदाज धरला तर सुमारे साडेपाच ते सहा लाख लोक रस्त्यावर आले होते – त्यांची घरं उठवण्यात आली म्हणून. ‘झोपडपट्टी हटाव’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाने इथल्या रहिवाशांचा हक्क मान्य केला आणि डागडुजी करून लोक राहायला लागले होते इथं; तोवर २००५ मध्ये पुन्हा बुलडोझर आले. सोबत होते लाठीचार्ज आणि आग!

मानखुर्दचा हा सगळा भाग म्हणजे मुंबईतल्या गरीबांची वस्ती. मुख्य शहरात राहणं यांच्या आवाक्याबाहेर असतं. गरीबीसोबत येणारे निरक्षरता, आरोग्याचे प्रश्न, बालमृत्यू ... अशा अनेक गोष्टी इथं आहेत. २००४- २००५ मध्ये इथं ‘घर बचाओ, घर बनाओ आंदोलन’ जन्माला आलं आणि इथल्या कार्यकर्त्यांनी मेधाताईंशी संपर्क साधला. तेव्हापासून मेधाताई इथल्या लोकांशी जोडल्या गेल्या आहेत. घराचा हक्क, घरासाठी जमिनीचा हक्क आणि त्यासाठी इथल्या लोकांची चालू असलेली लढाई – हा एक वेगळाच विषय आहे. पण मंडालातल्या काही लोकांशी प्रत्यक्ष बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की मेधाताईंच्या शहरातल्या गरीबांबरोबर असणा-या कामाविषयी मला तितकीशी माहिती नाही. ‘नर्मदेचा परिसर सोडून मुंबईत काय मेधाताई निवडणूक लढवताहेत’ असा एक प्रश्न मला पडला होता – त्याचं उत्तर मिळायला सुरुवात झाली ती मंडालामध्ये!

इथं केजरीवाल, मेधाताई वगैरे मंडळी आली, त्याचं जोरदार स्वागत झालं, ते सोडून आम्ही पुढे निघालो.

आण्णाभाऊ साठे नगरात पुन्हा तशीच गर्दी. पुतळ्याजवळ उभं राहून एक तरुण मोठमोठ्याने सामाजिक गीतं म्हणत होता. वातावरण उत्साहाने भारलेलं होतं. “चार वाजल्यापासून आम्ही इथं उभे आहोत” असं एकाने मला सांगितलं. हातावर पोट असणारी ही माणसं; आज अर्धा दिवस काम सोडून आली असणार. त्यातल्या एक-दोघाशी मी बोलले. मेधाताई उमेदवार आहेत; त्या ‘आप’कडून उभ्या आहेत; ‘आप’चं निवडणूक चिन्ह ‘झाडू’ आहे;  आज केजरीवाल येणार आहेत – अशा गोष्टी त्यांना बरोबर माहिती होत्या. इथंही ‘घर बचाओ, घर बनाओ आंदोलन’ सक्रीय आहे. इथं सुमारे साडेतीन हजार झोपड्या आहेत. सहा वर्ष आंदोलन सक्रिय असताना इथं मे २०१० मध्ये ४०० झोपड्या तोडल्या गेल्या, १०० झोपड्या जाळून खाक झाल्या. इथल्या लोकांनी त्याच्या विरोधात, राहण्याचा हक्क मिळवण्यासाठी  आठवडाभर  धरणं धरलं होतं आणि नंतर श्रमदानाने घरांची पुन्हा उभारणी केली होती. या काळात मेधाताई आण्णाभाऊ साठे नगरातल्या रहिवाशांसोबत होत्या. खेड्यात जगायची सोय नाही, म्हणून माणसं शहरात ढकलली जातात आणि शहरही त्यांना बाहेर ढकलायला पाहतात तेव्हा त्यांनी जायचं कुठं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही संख्या थोडीथोडकी नाही हे आज पुन्हा जाणवलं.

या रस्त्यावर अशी झोपड्यांची मोठी संख्या असलेली अनेक नगरं आहेत – रफिक नगर, संजय नगर, इंदिरा नगर अशा १९ वसाहती या परिसरात आहेत. ‘घर बचाओ घर बनाओ आंदोलन’ हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे, त्यामुळे त्याबद्दल जास्त लिहित नाही. मेधाताईंच्या बरोबर गेली दहा वर्ष काम कलेले अनेक लोक इथं आहेत आणि या भागाच्या प्रश्नांची मेधाताईंना माहिती आहे हे कळणं मला दिलासा देणारं होतं.

इथं केजरीवाल आणि मेधाताई यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घातला. पण केजरीवाल लोकांशी बोलले मात्र नाहीत काही.

इथून आता रॅलीत सामील होणं अवघड व्हायला लागलं. एक तर रॅलीत वाहनांची संख्या मर्यादित असते, त्यामुळे वाहनातून जाणं शक्य नव्हतं. चालत जायचं म्हटलं तर अंतरं जास्त होती. दुपारी चार साडेचार किलोमीटर चालले होते आधी तरी चालायला माझी काही हरकत नव्हती. पण केजरीवाल जर काही बोलणार नसतील लोकांशी तर उगीच त्यांच्या पाठी फिरण्यात काही अर्थ नव्हता. मी लोकांशी बोलत होते तोवर केजरीवाल आणि त्यांची रॅली दूर निघूनही गेली होती. मी आणि एक मित्र चालत थोडे पुढे आलो तर रॅली दिसली.

पण गंमत म्हणजे इथं ‘टोप्या’ दिसत नव्हता ‘आप’ च्या. थोडं जवळ आल्यावर घोषणा ज्या ऐकू आल्या त्या  आश्चर्यजनक होत्या. कारण लोक ‘केजरीवाल हाय हाय’, ‘केजरीवाल वापस जाओ’ अशा घोषणा देत होते.  


मित्राने डोक्यावरची टोपी घाईने काढून खिशात टाकली – आम्ही आणखी जवळ गेलो. साधारण ७० ते ८० लोक होते केजरीवाल यांच्या विरोधात घोषणा देणारे. त्यांच्या हातांत काळे झेंडेही होते. पुरेसे पोलीस त्यांच्या आगेमागे होते आणि केजरीवाल दिसतही नव्हते इतके पुढे गेले होते. रस्त्यावरच्या एका माणसाने सांगितलं की ‘कॉंग्रेस समर्थक आहेत’ पण पुढे एका पोलिसाने ‘समाजवादी पक्षाचे लोक आहेत’ असं सांगितलं. कदाचित दोघेही असतील. या मोर्चाबद्दल मी नंतर एका ‘आप’ कार्यकर्त्याला सांगत होते तर तो म्हणाला, “दीदी, पाच दस लोग चिल्ला रहे थे’. पण मीच सत्तर ऐशी लोक पहिले होते. विरोधाला खिजगणतीत घ्यायचं नाही याबाबत ‘आप’चे लोक तयार झालेले दिसताहेत इतर प्रस्थापित पक्षांसारखेच! आणि ते मला पुरेसं चिंताजनक वाटलं.

दुपारी झाला होता तसा ट्रॅफिक जाम इकडे नव्हता – फार तर दहा मिनिटं उशीर होत असेल लोकांना.  रस्ते पुरेसे रुंद आहेत आणि स्थानिक लोकांची वाहने नाहीत यामुळे जाम झाला नसावा. शिवाय रॅलीत फारसे लोक नसावेत असाही त्याचा एक अर्थ होतो. आम्ही अर्धा तास असेच चालत राहिलो. कशी दिसली मला मुंबई?


फुटपाथवरचे पॉटहोल्स; रस्त्यावर तुंबलेली गटारं;  त्याच्या कडेला असलेली दुकानं; फुटपाथवर मानवी विष्ठेचे अंश विखुरलेले; तिथंच मुत्रविसर्जन करणारी मुले-पुरुष; भंगाराचे साठलेले ढीग; त्यातून वाट  काढणारी माणसं. हे शहर आहे? ही आहे मुंबई? सामान्य सोयीही नाहीत इथल्या रहिवाशांसाठी. लाखो लोकांच्या वस्तीत शौचालयं नसतील तर लोक रस्त्यावरच आपली सोय पाहणार ना? त्यांच्या वागण्याचं समर्थन नाही – पण नागरी सुविधा, शहरांची वाढ, शहरांचा विकास – हा राजकीय निर्णयप्रक्रियेचा भाग झाला पाहिजे. देशातली ४५% जनता आता शहरांत राहते हे वास्तव लक्षात घेऊन आपले शहरी नियोजन झाले पाहिजे. शहरी विकासाबद्दल राजकीय पक्ष जाहीरनाम्यांत काय म्हणतात त्यावर जरा लक्ष ठेवायला हवं अशी मी मनात नोंद करून ठेवली.  

रिक्षात बसून आम्ही कन्नमवारनगरला आलो. रिक्षावाल्याच्या मते ‘कदाचित कॉंग्रेसच बाजी मारेल अखेर’. तो गोरखपूरचा आहे, पण आता गेली वीस वर्ष मुंबईत आहे. ‘मतदान कुठे आहे तुमचं’ या माझ्या प्रश्नावर तो मोघम काहीतरी उत्तरला. ‘मतदान कुणाला करायचं ते अजून ठरवलं नाही’ म्हणाला. ‘काय पाहून मतदान करणार’ या प्रश्नावर त्याच्या  मते ‘महागाई कमी करा’ एवढा एकच महत्त्वाचा मुद्दा होता. ‘कॉंग्रेसने वाट लावली देशाची’ असं म्हणून ‘मुलायमजी भी कुछ कम नही है हमारे’ असंही म्हणाला. ‘इतक्या आधी लोक ठरवत नाहीत हो मत कुणाला द्यायचं ते’ असंही त्याने मला सांगून टाकलं.  “केजरीवाल उम्मीद जगा तो रहे है, पर जितायेंगे उनको तो जिम्मेदारी निभायेंगे क्या?” या त्याच्या प्रश्नावर निरुत्तर होण्याची वेळ माझ्यावर आली.

आम्ही सभास्थानी  पोचलो तोवर सभा सुरु झाली होती. लोक खुर्चीत शिस्तीत बसले होते. दोन्ही बाजूंना असंख्य लोक उभे होते. ‘आप’चे राज्यातले इतर उमेदवारही आले होते. ठाण्याहून संजीव साने, नाशिकचे विजय पांढरे, बीडचे नंदू माधव इत्यादी.

मेधाताईंचं भाषण चांगलं झालं; मला आवडलं आणि श्रोत्यांचाही प्रतिसाद चांगला होता. मयंक गांधी “प्रत्येकाला दोन बाथरूम असलेलं ४५० चौरस फुट घर देऊ” असलं काहीतरी विनोदी बोलले. केजरीवाल साहेबांचं भाषणं प्रसारमाध्यमांत तुम्ही वाचलं-ऐकलं असेलच – म्हणून त्याबद्दल लिहित नाही काही. पण एकंदर त्यांच्या भाषणाचा सूर अत्यंत ‘आत्मकेंद्रित’ वाटला मला. दिल्लीतल्या ४९ दिवसांच्या त्यांच्या सरकारच्या कामाबद्दल ते बोलले (चांगलं), मोदींबद्दल अर्थातच बोलले (वाईट), अंबानींबद्दल बोलले (वाईट). एकूण नवं काही नव्हतं. आपण ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलोय त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेत इतकं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही. मेधाताईंचा उल्लेख त्यांनी एकदाच केला तोही ‘मेधा  पाटेकर’ असा. आपल्या उमेदवाराचं नावही नीट माहिती नसणारा हा कसला नेता? शिवाय मेधाताई काही ‘अनोळखी’ नाहीत.  एकंदर दिवसभर मला केजरीवालांचा ‘डिसकनेक्ट’ जाणवत राहिला.

विक्रोळी सभेला किती लोक होते? 


एका आडव्या रांगेत वीस  खुर्च्या होत्या. अशा किमान शंभर रांगा असाव्यात. म्हणजे  साधारण दोन हजार लोक झाले. रांगा जास्त असतील तर जास्तीत जास्त तीन हजार. पाचेकशे लोक जमिनीवर बसले होते. हजार लोक इकडेतिकडे उभे होते. असा सगळा हिशोब धरला तरी सहा हजारांवर संख्या जात नाही. यातले निम्मे अधिक ‘आप’चे पक्के लोक होते – काही कुतूहल म्हणून आले असतील, काही पत्रकार असतील, काही साध्या वेशातले पोलीस असतील.  शिवाय इतर गावांतून आलेले आमच्यासारखे लोक असतील. शंभर जागांवर आम्ही निवडून येऊ असं केजरीवाल कितीही म्हणोत, मुंबईत मेधाताई वगळता उरलेल्या दोन उमेदवारांची विजयाची शक्यता नाही हे त्यांना कळायला पाहिजे. मेधाताईंचाही विजय होईलच असं मी गृहित धरत नाही आत्ता, त्यासाठी मला अधिक फिरायला लागेल त्यांच्या मतदारसंघात. पण एक नक्की  त्यांचं मतदारसंघात काम आहे; निवडणूकीच्या आधीपासून काम आहे; लोकाशी त्यांचं नातं आहे. हे मतांत रुपांतरीत कसं करायचं हे आव्हान आहे त्यांच्यापुढे!

सभा संपली. व्यासपीठावर नेत्यांना भेटायला गर्दी जमली. ‘ज्यांची ओळख आहे त्यांनी नका भेटू आत्ता ताईंना, नव्या लोकांना भेटू द्या त्यांना’ असं त्यांचे कार्यकर्ते सांगत होते, जे योग्य वाटलं मला. मग आम्ही काहीजण मेधाताईंच्या घरी गेलो. तिथं रात्री अकरा ते बारा-सव्वाबारा बोलणं  झालं, जेवण झालं, उद्याच्या कामाची रूपरेषा ठरली आणि रात्री साडेबारा वाजता आम्ही बाहेर पडलो.

मुंबई केजरीवाल यांच्या पाठीशी उभी आहे का? मुंबईने केजरीवाल यांना स्वीकारले आहे का? केजरीवाल यांच्याकडून मुंबई काय अपेक्षा करते आहे? मुंबईचा कौल काय आहे? अशा अनेक प्रश्नांची पूर्ण उत्तरं नाही मिळाली दिवसभरात पण काही संकेत जरूर मिळाले. या संकेतातून ‘आप’ ने काही घेतलं आहे का – याचं उत्तर कालांतराने मिळेल. ‘आप’साठी बरेच मुद्दे आहेत; पण ‘आप’ची शिकायची तयारी मात्र पाहिजे! वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले  ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.  पाहू मुंबई काय कौल देतेय ते! 

Friday, March 21, 2014

१९३. निवडणूक २०१४ अनुभव: २. मुंबईत केजरीवाल (१)

‘रोड शो’ ही संकल्पना मला स्वत:ला फारशी आवडत नाही. शहरांत रस्त्यावर आधीच कितीतरी वाहनं असतात, प्रदूषण असतं, वेळ लागतो.  एखाद्या राजकीय नेत्याचा ‘रोड शो’ म्हटला की सामान्य प्रवाशांचे हाल वाढतात. काय ज्या यात्रा वगैरे करायच्या आहेत त्या चालत कराव्यात, अगदी फार फार तर सायकल वापरावी असं माझं मत. अर्थात माझ्या मताला कोण विचारतंय म्हणा!

तरीही ‘आप’चे श्री. अरविंद केजरीवाल यांचा मुंबईत ‘रोड शो’ आहे म्हटल्यावर मी १२ मार्चला मुंबईत जायचं ठरवलं. अरविंद केजरीवाल यांना पाहायचं किंवा ऐकायचं असा माझा हेतू नव्हता. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या आंदोलन काळात केजरीवाल यांना ‘जंतर मंतर’ आणि ‘रामलीला मैदान’ या दोन्ही ठिकाणी मी अनेकदा ऐकलं आणि पाहिलं होतं. ‘मेणबत्ती संप्रदाय’ अशी प्रसारमाध्यमांनी त्या आंदोलनाची कितीही हेटाळणी केली तरी त्या आंदोलनाच्या माझ्या आठवणी; विशेषत: त्यातल्या सामान्य लोकांच्या सहभागाच्या आठवणी प्रेरणादायी होत्या, आजही आहेत. ‘आप’ची स्थापना, दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधीही ‘आप’मध्ये होणा-या चर्चा अशा गोष्टींचा मागोवा घेत असले तरी ‘केजरीवाल करतात ते सगळं योग्य’ अशी (टोकाची) भूमिका मी कधी घेत नाही. सुदैवाने व्यक्तीपूजा (आणि म्हणून व्यक्तीद्वेष) मला जमत नाही.

केजरीवाल या व्यक्तीचं ‘दर्शन’ घ्यायला मी काही मुंबईला जात नव्हते. सामान्य माणसांच्या अपेक्षा काय आहेत, मतदारांचा कल काय आहे; त्यांचा ‘आप’ला प्रतिसाद कसा आहे. गेल्या चार महिन्यांतील घडामोडींचा सामान्य माणसांनी कसा अर्थ लावला आहे – हे मला जाणून घ्यायचं होतं. कुठल्याही माध्यमाच्या चष्म्याविना हे जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी होती.  शिवाय मेधाताई पाटकर ईशान्य मुंबईतल्या ‘आप’च्या उमेदवार आहेत; त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आहे हेही पाहायचं होतं.  

केजरीवाल (आता प्रत्येक वेळी श्रीयुत लिहित बसत नाही) यांचा मुंबईचा कार्यक्रम कळला. त्यानुसार सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर उतरणार होते. रिक्षाने अंधेरी स्थानकावर येऊन लोकलने चर्चगेटला येणार होते. मला त्यांचा हा बेत थोडा ‘नाटकी’ वाटला – तो जसा राहुल गांधी यांचा वाटला होता किंवा अन्य कोणत्याही नेत्याचा वाटेल तसा आणि तितपत नाटकी होता हा बेत. ‘बाकी इतके दिवस मुंबईत प्रवाशांचे हाल होतात; मग दोन तास आमच्यामुळे झाले तर काय बिघडलं?’ या प्रकारचा युक्तिवाद मला हास्यास्पद वाटतो. जो प्रश्न सर्वाना माहिती आहे, त्याचा आपण व्यक्तिश: अनुभव घ्यायची गरज नसते हे एक; आणि दुसरे म्हणजे एखादा प्रश्न आपण कमी करू शकत नसू, तर त्यात निदान आपल्यामुळे भर पडू नये याची आपण काळजी घेऊ शकतो; घ्यायला हवी. इतर  राजकीय पक्ष जो खेळ खेळतात तोच केजरीवाल यांनी खेळावा याचं मला वैषम्य वाटलं . पण असो.

दुपारी दोन वाजता ऑगस्ट क्रांती मैदानातून रॅलीची (रॅली आणि रोड शो हे शब्दप्रयोग पर्यायी म्हणून वापरले आहेत मी इथं!) सुरुवात होणार होती, त्यामुळे आम्ही (तीन मित्र होते सोबत) थेट मुंबई सेन्ट्रल स्थानकावर पोचलो. तिथं एका मैत्रिणीने ठरवलेली टॅक्सी होती, त्यात बसलो. चालकाला विचारलं, “केजरीवालांचा रोड शो सुरु झालाय का”? त्यावर त्याने सांगितलं की चर्चगेटला दंगल झालीय. मला ती बातमी चिंताजनक वाटली. पण खोलात गेल्यावर कळलं की चर्चगेट स्थानकावर गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथले सुरक्षा दरवाजे कोसळले. हेही पुरेसं चिंताजनक आहे मुंबईचा विचार करता. पण ते दरवाजे तसेही तकलादू आहेत. शिवाय मुंबई सेन्ट्रल स्थानकावर अनेकदा प्रवाशांना या सुरक्षा दरवाजांच्या बाजूने प्रवेश करताना (त्याच्या आतून नाही!) पाहिल्याने हे दरवाजे कोसळणं दंगलीच्या तुलनेत किरकोळ वाटलं. गर्दीच्या व्यवहाराचं हे समर्थन अर्थातच नाही. पण ‘आप’ समर्थकांनी मुद्दाम हे घडवून आणल्याचं प्रसारमाध्यमांनी रंगवलेलं चित्र काही पूर्ण खरं होतं अशातला भाग नाही.

दोन वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर केजरीवाल दहा मिनिटे प्रसारमाध्यमांशी आणि लोकाशी बोलणार असा कार्यक्रम होता. पण आम्ही दोन वाजून दहा मिनिटांच्या आसपास मैदानाजवळ पोचलो तोवर रॅली निघाली होती तिथून. त्यामुळे केजरीवाल प्रसारमाध्यमांशी काय बोलले, बोलले की नाही हे काही कळलं नाही. दुस-या दिवशी ते काही शोधायचा मी प्रयत्नही केला नाही.

नागपाडा जंक्शन ते खिलाफत हाऊस असा रॅलीचा मार्ग होता. आम्ही  सामान टॅक्सीत ठेवून, चालकाला खिलाफत हाऊसला यायला सांगून नाना चौकात उतरलो. जाम झालेल्या ट्रॅफिकवरुन रॅली कोणत्या दिशेने गेली असेल याचा अंदाज येत होताच; तरीही वाटेत लोकांना विचारत गेलो. थोड्या अंतरावर ‘आप’च्या टोप्या दिसायला लागल्या आणि साधारण पंधरा मिनिटांत आम्ही रॅलीत सामील झालो.दोन्ही बाजूंनी पोलीस दोरी धरून चालत होते आणि त्या दो-यांच्या मधून आप समर्थकांनी चालावं अशी अपेक्षा होती. गर्दी नियंत्रणाची पोलिसांची ही नेहमीची पद्धत आहे. पण थोडं वाकून दोरीखालून आत प्रवेश करणं आणि बाहेर जाणं शक्य होतं आणि अनेक लोक ते करत होते. हिरव्या रंगाच्या उघड्या जीपमध्ये केजरीवाल दिसत होते. 


त्यांच्या सोबत मेधा पाटकर, मीरा संन्याल आणि  मयंक गांधी हे मुंबईतले ‘आप’चे उमेदवार उभे होते. गाडीभोवती गर्दी होती. काही लोक केजरीवाल आणि उमेदवारांच्या हातात हात मिळवत होते, काही घोषणा देत होते तर काही कापडी फलक घेऊन चालत होते. मोटरसायकलवर अनेक समर्थक होते. इकडेतिकडे 'आप'च्या टोप्या घातलेले लोक थांबून चहापान करत होते, विश्रांती घेत होते आणि थोड्या वेळाने परत रॅलीत सामील होत होते. 

मुंबईत एरवी जेवढं उकडतं, तेवढा उकाडा आज नव्हता. रस्त्यावर अनेक लोक उभे होते. ‘आप’चे कार्यकर्ते त्याना पत्रकं वाटत होते. त्यातले बरेच लोक दुकानांतून बाहेर आले होते, तर काहीजण रस्ता ओलांडून जाता येत नाही म्हणून थांबले होते बहुधा. एक ‘आप’ कार्यकर्ता सगळ्यांना टोप्या पुरवत होता, त्याने मलाही एक दिली, पण मी काही ती घातली नाही. काहीजण हातात झाडू घेऊन चालत होते.

पोलीस बंदोबस्त तगडा होता. महिला पोलिसांची संख्याही लक्षणीय होती. मला अशा पद्धतीने पोलीस वेठीला धरले जातात याचा नेहमी राग येतो; पण इलाज नाही. मागच्या टोकापासून केजरीवाल यांच्या वाहनापर्यंत साधारण साडेतीनशे चारशे लोक असावेत. मला वाटलं की कदाचित त्यांच्या वाहनाच्या पुढेही तितकेच लोक असतील; म्हणून पुढे येऊन पाहिलं तर पुढे फक्त  निवेदन करणारं वाहन होतं. सगळा परिसर पाहता मुस्लीमबहुल परिसरातून मिरवणूक जात होती हे लक्षात आलं. हे नियोजन असेल तर मग हीदेखील इतर राजकीय पक्षांसारखीच (आणखी) एक खेळी झाली. तेच नियम पाळून, त्याच चौकटींना बळ देऊन कसा काय बदल घडवून आणणार आहे ‘आप’ – हा प्रश्न मनात येत राहिलाच दिवसभर.

घरांच्या बाल्कनीतून लोक पाहत होते. रॅलीतला एकजण मला म्हणाला, “मोदी को गुजरात जाकर, उनके घर जाकर ललकारा है अरविंदजीने, इसलिये मुस्लीम लोग सपोर्ट करेंगे ‘आप’को!” मी त्यावर हसले आणि पुढे गेले. लोक मयत पाहायला आणि लग्न पाहायला आणि गणपती पाहायला पण असेच उभे असतात, हे त्याला माहिती नसेल कदाचित, पण मला माहिती आहे. रस्त्यात वाहनं थांबवून ठेवली होती पोलिसांनी – त्यामुळे ते लोक वैतागलेले स्पष्ट दिसत होतं – स्वाभाविक आहे ते. मधेच लोक एकदम थांबले, मी तोवर पुढे आले होते. मग कोणीतरी म्हणालं, “केजरीवाल भाषण देताहेत मागे”. पण दुस-या दिवसेही वर्तमानपत्रात बातमी होती की कॉंग्रेस आणि आपच्या कार्यकर्ते यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. खरं काय ते मला माहिती नाही.

अर्ध्या तासात मला अंदाज आला.  समर्थक होते, जोशात होते!  पण बघेही भरपूर होते आणि त्यांना फक्त ‘कौन है ये बंदा’ असं कुतूहल होतं. त्यांच्या  तिथं असण्यावरून काही अंदाज बांधता येत नव्हता कारण अनेकांचे चेहरे काही बोलत नव्हते – म्हणजे मला ते कळत नव्हतं.


‘खिलाफत हाऊस’ला आम्ही आलो, तर बाहेर ही गर्दी आणि प्रवेशद्वार बंद. तिथं केजरीवाल लोकांशी बोलतील असा माझा समज होता (तो का होता, माहिती नाही). पण प्रत्यक्षात आत कुणाला सोडत नव्हते. फक्त वीस लोकांना आत सोडलंय अस कुणीतरी म्हणालं! चार किलोमीटर चालून लोक दमले होते – तिथं ‘आप’चे कार्यकर्ते पाण्याची व्यवस्था पाहत होते.


आपली लोकशाही किती जमीनदारी प्रवृत्तीची आहे हे  अशा रॅलीत भाग घेतला की कळतं. एक तर लोकांना नेत्यांना ‘पाहायचं’ असतं याची मला गंमत वाटते. दूरदर्शनच्या जमान्याआधी हे ठीक होतं – पण आता इतक्या वेळी ‘दर्शन’ होतं असतं लोकांचं, की कामधाम सोडून त्यांना पाहायला कोण येणार असा मला प्रश्न पडतो – तरी लोक येतातच म्हणा! दुसरं म्हणजे अशा प्रसंगी नेत्यांचा ना कार्यकर्त्यांशी संवाद होतो ना लोकांशी. पूर्वी  राजे महाराजे पालखीत बसून जायचे आणि लोक त्यांना पहायला जमायचे – त्याची ही  आधुनिक आवृत्ती म्हणायची – नेत्यांचीही आणि जनतेचीही! खरं तर ‘आप’ने अशी रॅली आयोजित करून नेमकं काय साधलं हे निदान मला तरी कळलं नाही.

इतस्तत: विखुरलेला आमचा गट इथं भेटला, टॅक्सीवालाही मागून येऊन भायखळा पोलीस ठाण्याच्या समोर थांबला होता. मग आम्ही निघालो ईशान्य मुंबईकडे – मेधा पाटकर यांच्या मतदारसंघात. साडेपाचपासून केजरीवाल तिकडे असणार होते. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या मतदारसंघात लोकांच्या प्रतिसादात काही फरक आहे का हे पाहायला मग आम्हीही तिकडे निघालो. 

क्रमश: 

Monday, March 17, 2014

१९२. निवडणूक २०१४: भाग १: नावनोंदणी

भारतात सार्वत्रिक  निवडणूक घ्यायची हे एक आव्हानात्मक काम आहे याची मला कल्पना आहे. निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक प्रक्रिया नीट व्हावी म्हणून राबणा-या इतर यंत्रणांचही  त्यासाठी कौतुक करायला पाहिजे. दर वेळी या निवडणूक प्रक्रियेतून आपल्यासारख्या सामान्य लोकांना बरंच काही शिकायला मिळतं.

मला आठवतं – मी जेव्हा मतदान करायला ‘पात्र’ झाले त्यावेळी ‘पवित्र राष्ट्रीय कर्तव्य’ पार पाडण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होते. पण बरीच वर्ष मी आणि  मतदान यांचा पाठशिवणीचा खेळ चालला. दरवेळी मी नाव नोंदवायला गेले की आधी एक तर कागदपत्रांची अडचण यायची. मी रहिवासी असल्याचा कसलाही पुरावा माझ्याकडे नसायचा. त्यावर मात करून एक दोनदा नाव नोंदवलं; पण प्रत्यक्षात मतदानाची तारीख येईतोवर मी गाव बदलेलं असे किंवा त्याच गावात असले तरी राहण्याची जागा बदललेली असे. या सगळ्यातून मार्ग काढत अखेर २००४ मध्ये पहिल्यांदा मी मतदान करू शकले आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका अशा विविध निवडणुकांत मतदान करायचा अनुभव माझ्या गाठीशी जमा झाला.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्यामुळे मतदार यादीत माझं नाव असेल याची मला खात्री होती आणि सुदैवाने या मधल्या काळात माझा पत्ता बदलला नव्हता. सध्याच्या माझ्या सोयीच्या “ऑनलाईन” तत्त्वानुसार मी या पानाला भेट दिली.  https://ceo.maharashtra.gov.in/marathi/FrmMainPage.aspx

Chief Electoral Officer, Maharashtra
Electoral Roll Search (मतदार यादीत नाव शोधणे)
 Prepared By : Chief Electoral Officer, Maharashtra

  Search In English     मराठीत शोधा
                       Id Wise        Name Wise        
                                                                        Go 


                                 YOU ARE VISITER NUMBER :
3140262

तिथं काही माझं नाव मिळालं नाही.

मग दुसरा पर्याय – नेहमीच्या भाषेत प्लॅन बी – ऑनलाईन नाव नोदणी.

Chief Electoral Officer, Maharashtra
Greater Participation for a Stronger Democracy
Online Voter Registration
Inclusion of names for residents electors
Inclusion of names for overseas electors
Any objection on inclusion of names)
Correction of entries in the Electoral Rolls
Transposition within Assembly

आधी नावनोंदणी केली, मोबाईलवर पासवर्ड आला. अर्ज क्रमांक ६ उघडला – माहिती भरायला सुरुवात केली. एक फोटो, निवासाचा पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा जोडायचा होता. हे सगळे ‘पुरावे’ माझ्या संगणकात होते त्यामुळे अडचण येणार नव्हती मला. दुस-या पानावर गेल्यावर लक्षात आलं की पीडीएफ जोडून चालणार नव्हतं तर जेपीईजी इमेज जोडायची होती. मी निमूट अर्ज बंद केला आणि दुस-या कामाला लागले.

दुस-या दिवशी डिजिटल कॅमे-यावर ते दोन पुरावे टिपले, संगणकात ते साठवले आणि पुन्हा ऑनलाईन अर्जाचा दरवाजा ठोठावला. पहिला अर्धवट अर्ज मला उघडता येत नव्हता – मग पुन्हा सगळी प्रक्रिया केली आणि एकदाचा अर्ज भरून झाला.

तीन चार दिवसांनी पुन्हा नाव तपासलं – पण अजूनही ते नव्हतंच यादीत. 

मग वर्तमानपत्रात एका बातमीत टोल फ्री नंबरची माहिती मिळाली. प्रत्यक्षात १९५० हा फोन चालत नव्हता. दहा वेळा प्रयत्न केला आणि मग गप्प बसले.

९ मार्च रोजी मतदार यादीत नाव  नोंदवायची अजून एक संधी होती. मतदान केंद्रावर जायचं; यादीत नाव आहे का ते बघायचं; असलं तर ठीकच – नाहीतर अर्ज भरून द्यायचा. मी फोटो आणि त्या दोन कागदांच्या फोटोप्रती घेऊन गेले शाळेत – म्हणजे आमच्या मतदान केंद्रात.

तिथं चार जोडून ठेवलेल्या टेबलांच्या मागे चार लोक बसले होते. केंद्रात पन्नासेक लोक असतील. प्रत्येक गटाच्या हातात  एकेक यादी होती आणि त्या यादीत लोक डोकावून पाहत होते. मीही एका गटात डोकावून बघितलं – मग लक्षात आलं की आपल्याला प्रभाग अथवा वॉर्ड क्रमांक माहिती नाही.मग तिथल्या कर्मचारी स्त्रीला माझ्या निवासस्थान संकुलाचं नाव सांगून यादी मागितली; तर त्या ‘प्रभाग सांगा’ म्हणाल्या. तो तर मला माहिती नव्हता.

तोवर मला एकंदर इकडून तिकडे टोलवलं जाण्याचा कंटाळा आला होता. इतकं झंझट करत बसण्यापेक्षा ‘नवा अर्ज भरू’ असं म्हणत मी दुस-या कोप-यातल्या कर्मचा-याकडे गेले. तर तिथं अर्ज संपले होते. सकाळी साडेदहा वाजताच अर्ज संपले होते. “आम्हाला फक्त दहा अर्ज दिले होते, आम्ही काय करणार? तलाठी ऑफिसात जाऊन भांडा तिथल्या साहेबांशी” असा त्या बाई मला सल्ला देत होत्या आणि इतर तीन कर्मचारी त्यांना अनुमोदन देत होते उत्साहाने. रविवारी काम करायला लागल्याचा रागही त्यांनी व्यक्त केला.

“नगरसेवकाच्या ऑफिसात मिळताहेत अर्ज, तिकडून घेऊन या”, दुस-या रांगेत उभ्या असलेल्या एका सद्गृहस्थांनी सल्ला दिला. आमच्या नगरसेवकाचं कार्यालय मला माहिती नव्हतं – पण ‘शोधा म्हणजे सापडेल’ या तत्त्वानुसार शोधल्यावर ते सापडलं. तिथं नमुना अर्जही मिळाला – तो घेऊन मी शाळेत परतले तर गर्दी (अपेक्षेप्रमाणे) अजून वाढली होती. लोक अधिकच वैतागले होते, कर्मचारी गर्दीला हाताळू शकत नव्हते, पुरेसे अर्ज नव्हते, प्रभागांचे नंबर लोकांना माहिती नव्हते – सगळा नुसता गोंधळ होता.

मी अर्ज भरण्याच्या तयारीत होते तर मला सांगितलं गेलं की  कागदपत्र नुसती जोडून चालणार नाहीत; ती कागदपत्र खरी असल्याचा सही शिक्का हवा. कुणाचा आणायचा असतो तो? तो कुठून आणायचा आता रविवारच्या दिवशी?

मला त्या कर्मचा-यांची दया आली आणि माझ्यासकट तिथं आलेल्या इच्छुक मतदार लोकांचीही दया आली. निवडणूक आयोगासमोर काय प्रकारची आव्हानं असतात याची ही फक्त एक झलक!


मतदान करणं – हा हक्क आहे, तर तो सहजी का मिळू नये? प्रत्येक वेळी हक्क मिळवण्यासाठी इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया का करावी लागते? मुळात यादीत असलेली नावं गायब का आणि कशी होतात? निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काय होतंय याची माहिती कधी मिळते का? निवडणूक तयारीच्या बाबतीत ही माहिती देणारी यंत्रणा असते का? प्रश्नच प्रश्न!

या सगळ्या गदारोळात एक गोष्ट ठळकपणे जाणवली; ती म्हणजे  राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अभाव. इथं इच्छुक मतदारांना मदत करायला कुणीच नव्हतं. नेते येतात तेव्हा कार्यकर्त्यांची गर्दी असते – इतर वेळी ते कुठे असतात कोण जाणे! बहुधा फेसबुकवर किंवा तत्सम सोशल मिडीयायामध्ये आपापल्या नेत्यांना “लाईक” देत बसले असतील – किंवा दुस-या पक्षांबद्दल अपप्रचार करत बसले असतील.

**

Saturday, March 1, 2014

१९१. वाचननोंदी: २


फेब्रुवारी २०१४ 

५. टीचर: सिल्व्हिया अ‍ॅश्टन वॉर्नर; अनुवाद: अरुण ठाकूर (पानं १८३ )

प्रचलित शिक्षणपद्धती हा अनेकांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. आपल्यासारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशात ‘शिक्षणाचं माध्यम’ या विषयावर बरीच चर्चा आणि काही प्रसंगी वादविवाद होत असतात. भाषिक राज्यं निर्माण झाल्यावर ‘मातृभाषेचा’ प्रश्न सुटेल अशी अशा होती. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात ४७  प्रकारचे आदिवासी राहतात आणि मराठी त्यांची मातृभाषा नाही हे कळल्यावर प्रश्न आपण समजतो त्याहून अधिक गंभीर आहे हे लक्षात आलं होतं.

सिल्व्हियाचं ‘टीचर’  हे पुस्तक न्युझीलंडमधील ‘मावरी’ मुलांसोबत पूर्व प्राथमिक शिक्षणात तिने केलेल्या विविध प्रयोगांची तिची धडपड सांगते. हा प्रयोग पुरेसा जुना आहे – इंग्लिशमधलं पुस्तक १९६३ मध्ये प्रसिद्ध झालं आहे.
काय आहेत हे प्रयोग? एक दोन उदाहरणं सांगते इथं.

सिल्व्हिया ‘सहज शब्दावली’ पद्धत वापरते – ते तिने विकसित केली आहे. काय आहे ही पद्धत? प्रौढ शिक्षण तज्ज्ञांनी तयार केलेली शब्दावली मावरी मुलांना परकी वाटते हे लक्षात आल्यावर सिल्व्हियाने एक नवी पद्धत अमलात आणली. ती एकेका मुलाला त्याला/तिला कोणता शब्द हवा आहे ते विचारते. मुलं त्यांच्या रोजच्या जगण्यातले शब्द सांगतात – जेट, घर, भूत, भांडण, बॉम्ब, नवी आई, भावंडे, मारतात ... असे शब्द मुलं सांगतात. ज्याने जो शब्द सांगितला तो शब्द सिल्व्हिया त्याला/तिला लिहून देते. हा शब्द मुलं फार सहजतेने वाचायला आणि लिहायला शिकतात – कारण शब्द त्यांच्या जगण्यातून येतात, त्यांच्या संस्कृतीचा गंधही नसलेल्या प्रौढ लोकांकडून येत नाहीत ते!

मुलांवर सिल्व्हिया लेखन लादत नाही, तर त्यांना लिहायला प्रेरित करते. एखादे मुल म्हणते, “मला लिहायचे नाही”; त्यावर सिल्व्हिया त्याला रागवत नाही. “बरं, तेच लिही मग” म्हणते. “तुला का लिहावसं नाही वाटत?” अस हळूच विचारते आणि मुलाने सांगितल्यावर तीच कारणं ‘लिहायला’ ती मुलाला प्रोत्साहित करते. लिहायला सुरवातीस तयार नसणारं मुल त्याच्याही नकळत लिहायला लागतं – आणि ते शिक्षेच्या धाकाविना वा कसल्याही आमिषाविना.
निसर्गाकडून शिकणे, मुलांना स्व-शिक्षणास मदत करणे, नृत्य-संगीत-खेळ  यांचा मुक्तहस्ते वापर करणे .. अशा अनेक गोष्टींबाबत सिल्व्हिया तिचे अनुभव सविस्तर सांगते.

नेहमी तार्किक पद्धतीने  लिहिलेली पुस्तक वाचायची सवय असल्याने सुरुवातीला मला हे पुस्तक फार विस्कळीत वाटत राहिलं. पण त्या विस्कळीतपणामागचे तत्त्व एकदा लक्षात आल्यावर मी पुस्तकात रंगून गेले. अनेक ठिकाणी आपल्याकडची (काहीशी समांतर) परिस्थिती आठवत गेली आणि पुस्तक थांबून थांबून वाचलं.

पुस्तकाला श्री पु. ग. वैद्य यांची सविस्तर प्रस्तावना आहे. वैद्य सरांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल मला आदर असला तरी प्रस्तावनेत स्वत:च्या कामाबद्दल वेळोवेळी सांगण्याचा मोह त्याना आवरला नाही त्यामुळे त्यांची विस्तृत प्रस्तावना कंटाळवाणी झाली आहे. मी प्रस्तावना अर्ध्यात सोडली, पुस्तक वाचलं पूर्ण आणि मग नंतर  कधीतरी प्रस्तावना वाचली.

२००७ ते २०१३ या काळात या पुस्तकाच्या तेरा आवृत्त्या निघाल्या – याचा अर्थ मराठी वाचकांनी या पुस्तकाला चांगला प्रतिसाद दिला आहे – ही समाधानाची बाब आहे. “अवश्य वाचावं “ असं पुस्तक आहे हे!

६. प्रिय बाई: बर्बियानाची शाळा (पानं १३६ )

परत एकदा वाचलं हे पुस्तक. बर्बियानाच्या शाळेतल्या आठ मुलांनी मिळून लिहिलेलं पत्ररुपी पुस्तक. या पुस्तकाविषयी अनेकांनी आधीही लिहिलं आहे – म्हणून सविस्तर लिहीत नाही. पण थोडक्यात महत्त्वाचं सांगायचं तर:

पुस्तकाची भाषा अगदी सोपी आहे. मुलांनी स्वानुभवातून लिहिल्यामुळे इथं फक्त सिद्धांत नाहीत तर शिक्षणविषयक सिद्धांतांचा मुलांवर कसा विपरीत परिणाम होतो याचं विदारक चित्र रंगवलं आहे.

स्वत:ची मतं मांडताना पूरक आकडेवारी दिली आहे. शाळेत प्रवेश घेतलेली मुलं पुढे कशी गळतात आणि ही गळणारी मुलं कोणत्या वर्गातली असतात (आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातली!) याची आकडेवारी  विलक्षण आहे. आपण सध्याच्या शिक्षणव्यवस्थेतून मुलांना शिकायला प्रोत्साहित करतो का त्याना शाळेतून बाहेर पडायला भाग पाडतो याचं स्पष्ट उत्तर देणारे आकडे आहेत हे.

या पुस्तकातली ‘बिना सुट्टीच्या शाळेची” मुलांची मागणी वेगळी वाटते. “सक्तीच्या शाळांनी विद्यार्थ्याना नापास करता कामा नये” ही मागणी अवास्तव वाटली सुरुवातीला तरी मुलांचा युक्तिवाद (खरं तर अनुभव) वाचल्यावर ही मागणी पटते. शिक्षकांची भूमिका काय असावी, त्यांची जबाबदारी काय असावी याबद्दलच्या मुलांच्या अपेक्षा डोळ्यांत अंजन घालणा-या आहेत. ही सगळी कष्टकरी वर्गातली, डोंगराळ भागातली मुलं आहेत; ते शिकायला उत्सुक आहे, पण सध्याची शाळा त्यांना सामावून घेत नाही अशी त्यांची रास्त तक्रार आहे.

इटलीमध्ये या पुस्तकातल्या शिफारसींच पुढं काय झालं असेल हे जाणून घायची इच्छा आहे.

७. Visibility and Effectevity: report by Alochana (पानं १६५ )

आलोचना संस्थेने २००० ते २००३ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांसाठी ‘पंचायत राज सक्षमीकरणा’साठी एक प्रकल्प राबवला होता; त्याचा हा अंतिम अहवाल. संदर्भांसाठी अनेकदा वापरला होता मी सुटासुटा; संपूर्ण आत्ताच वाचला. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर स्त्रियांना ‘पंचायत राज’ची दारं खुली झाली खरी, पण अनुभव नसल्याने अनेक अडचणी येत होत्या (आजही येतात.) तिथे कार्यक्षमतेने काम करण्यासाठी अनेक स्त्रिया स्वयंसेवी संस्थांच्या सक्रिय मदतीची अपेक्षा करतात; पण स्वयंसेवी संस्थांना तरी ‘पंचायत राज’ची पुरेशी माहिती तेव्हा कुठे होती. म्हणून मग प्रशिक्षणाचा हा खटाटोप.

प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, त्यात आलेल्या अडचणी, ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध सहभागी संस्थांनी राबवलेले उपक्रम; त्यातले यशापयश, नेट्वर्किंगमधून मिळालेले बळ, सहभागी कार्यकर्त्यांच्या क्षमतांचा विकास – असे अनेक मुद्दे सविस्तर लिहिले आहेत या अहवालात. एका प्रक्रियेचा  उत्तम दस्तावेज आहे हा.

या परिसरात पुन्हा एकदा जाऊन या प्रशिक्षणाचे काय परिणाम टिकले आहेत, आणखी काय बदल झाला आहे, नवी काय आव्हाने आहेत – हे पाहण्याचा विचार मनात आहे. बघू कसं जमतंय ते!

८. मुसाफिर: अच्युत गोडबोले (पानं ४७२)

मी वाचली ती या पुस्तकाची सव्विसावी आवृती. एक वर्षाच्या आत इतक्या आवृत्त्या निघाव्यात याचा अर्थ पुस्तक भलतंच गाजलेलं आहे. पहिल्या पानावर श्री. गोडबोले यांची ओळख दडपून टाकणारी आणि पुस्तकाबद्दल ब-याच अपेक्षा निर्माण करणारी. सुरुवात ठीक. जसजशी मी पुढे वाचत जाते, तसतसा अपेक्षाभंग होतो.

गोडबोले बोर्डात आले; गोडबोले आयआयटीत होते; गोडबोले संगीतप्रेमी आहेत, गोडबोलेनी शहाद्यात आदिवासी लोकांसाठी एक वर्ष काम केलं; इन्फोटेकमध्ये गोडबोले यांचं नाव आहे; गोडबोले ब-याच नामांकिंत पुस्तकाचे लेखक आहेत – हे सगळं लक्षात घेता या पुस्तकाने घोर निराशा केली.

स्वत:च्या आयुष्यातल्या घटना सांगताना उगाच सिद्धांत मांडत बसायची लेखकाची हौस काही काळाने कंटाळवाणी होत जाते. उदाहरणार्थ गोडबोले दहा दिवस धुळ्याच्या तुरुंगात राहिले (आदिवासी चळवळीत गोडबोले सक्रीय होते). आता शहरातला मध्यमवर्गीय मुलगा, आयआयटीचा पदवीधारक पहिल्यांदा तुरुंगाचा अनुभव घेताना त्याची मन:स्थिती कशी असेल? (या अनुभवानंतर ते काम सोडून मुंबईत परतले.) गोडबोले मात्र आपण जणू काही अध्ययनासाठी तुरुंगात गेलो होतो अशा थाटात त्याबद्दल बावीस पानं मजकूर लिहितात. तिथं उगाच क्वालीन विल्सन, विजय तेंडुलकर, जिअम जेन .. अशी नावं. माहितीचा भडीमार करण्याचा गोडबोलेंचा सोस हास्यास्पद होऊन जातो.

याच ठिकाणी अनेक गुन्हेगारांना भेटल्याची वर्णनं. तुरुंगात इतर कैद्यांशी बोलणं इतकं सोपं असतं का? आणि बोलायची संधी मिळाली तरी कैदी लगेच आपली रामकहाणी सांगत बसतील काय? ते तुरुंगात असताना एकाही कैद्याला फाशी झाली नव्हती – तरीही त्याचं वर्णन. एकंदर या माणसाने ख-या आणि कल्पित गोष्टी सरमिसळ करून लिहिल्या आहेत की काय अशी मला शंका यायला लागली.

पुस्तकात फक्त स्वत:चे फोटो; जवळच्या व्यक्तींपेक्षा जगभरातल्या थोर लोकांबद्दल जास्त लिहिणं, सारखा शहाद्याचा उल्लेख करत स्वत:च्या संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणं... हा माणूस नेमका कसा आहे, याची जीवनविषयक दृष्टी नेमकी कशी आहे, याची मूल्यं कोणती आहेत, याला ‘स्व’ सोडून आणखी कुणाबद्दल प्रेम आहे – याचा काही पत्ता लागला नाही मला पूर्ण पुस्तक वाचूनही.

पुस्तक मी विकत घेतलं नाही – याचा आनंद झाला. अशी पुस्तकं मराठीत इतकी लोकप्रिय होतात याची चिंता वाटली. पण असो.