ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, February 26, 2012

११५. मसरबाई

ती माझ्यावर एकदम जोरात ओरडली.

आमच्या संवादाची सुरुवात मोठी विचित्र झाली होती खरी.  कामाच्या निमित्ताने, आमच्या विकास कार्यक्रमांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी सगळीकडे जात असते नेहमी मी – आज  तशी नंदूरबार भागात आले होते. आम्ही एका शेतात होतो. तिथल्या चांगल्या फळझाड लागवडीबाबत आम्ही बोलत होतो.  आंबा तर चांगला वाढलेला दिसतच होता आणि सोबत भाजीपालाही दिसत हो्ता चांगला उगवलेला.  म्हणून मी त्या शेताचा फोटो काढत होते. त्यावर एक स्त्री माझ्यावर ओरडली, “मला  न सांगता तू माझा फोटू का घेतलास?” म्हणून.

माझी आणि त्या स्त्रीची काही ओळख नव्हती; आमची पहिलीच भेट होती ती. ती तिच्या भाषेत म्हणजे ‘मावची’ भाषेत बोलत होती. ही भाषाही इतर अनेक भाषांप्रमाणे मला ‘अंदाजाने' समजते.  त्यावेळी माझ्याभोवती आणखी सहा माणसं – सगळे पुरुष - होती. त्या स्त्रीच ओरडणं ऐकून वातावरणात एकदम तणाव निर्माण झाल्याच मला जाणवलं. एक पुरुष रागारागाने त्या स्त्रीशी बोलायला लागला. मी त्या सगळ्या पुरुषांना ‘काही न बोलण्याची’ विनंती केली. त्या स्त्रीची माफी मागत मी तिला सांगितलं ,” अगं, शेत फार छान दिसतय तुझ, म्हणून मी त्याचा फोटो काढत होते.”

माझ्या शांत स्वरामुळे की काय पण तिचा राग थोडा निवळला.

ती  मराठीत म्हणाली, “तुला काही आमची मावची कळत नसेल. कळती का?”

“अगदी थोडी,” मी  हसून सांगितलं.

तीही हसली. म्हणाली, “तुम्ही लोक शाळेत जाऊन शिकता एवढ आणि तरी तुम्हाला काही आमची भाषा येत नाही. मी कधी शाळेत गेले नाही, पण मला बघ तुझी पण भाषा बोलता येते." तिच्या या चमकदार प्रतिक्रियेच मला छान  हसू आलं. आणि बरोबरच होतं ती काय म्हणाली ते!

ती पुढे आली. माझा हात पकडून तिने शेताच्या एका कोप-यात असलेल्या झोपडीकडे मला खेचून नेलं. त्या झोपडीत बरच सामान होतं. त्याची उलथापालथ करून तिने एक हिरवागार कापडाचा तुकडा शोधून काढला. तो स्वत:च्या  डोक्यावर घेऊन, त्यातला काही भाग खांद्यावर ओढून ती मला  म्हणाली, “हं , काढ आता माझा फोटो.”

मी तिच्या हुकुमानुसार तिचा फोटो काढला. डिजीटल कॅमेरा असल्याने मी तिला तिचा फोटो लगेच दाखवू शकले.
“छान आलाय ना फोटो?” मी तिला विचारलं.

ती लहान मुलासारखं हसली. म्हणाली, “आता कसा बेश आलाय फोटू. आता तो छाप तू.”

“फोटो छापायचा? कुठे? “– मी गोंधळले होते.

तिला आता माझा गोंधळ पाहून मजा वाटत होती बहुतेक. “कुठे म्हणजे काय? छाप पेपरात. मला काय माहिती? मला कशाला विचारतेस? ”

मला माझी चूक लक्षात आली. तिचा आधीचा फोटो मी डिलीट करून टाकला तिच्यासमोर.

मी तिला तिचा फोटो दाखवला  आणि त्यापेक्षाही आधीचा काढून टाकला म्हणून बहुतेक मसरबाई (हे त्या स्त्रीचं नाव) माझ्यावर एकदम खूष झाली आणि माझ्याशी गप्पा मारायला लागली. साधारण ४०च्या आसपास वय असेल तिचं, तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्या दोघांचही  लग्न झालेलं होत. एक दोन एकर जमीनीवर मसरबाई आणि तिचा नवरा राबत होते. मसरबाई कधीच शाळेत गेलेली नव्ह्ती. 

कां कुणास ठावूक पण तिला मला ब-याच गोष्टी सांगाव्याशा वाटत होत्या. ती मावची आणि मराठी अशा मिश्र भाषेत बोलत होती आणि मावची बोलली की ‘समजलं का तुला मी काय बोलले  ते?’ असा प्रश्न विचारून खात्री करून घेत होती. मी दोन तीन वेळा ‘हो, समजतय' अस म्हटलं तरी तिचा बहुतेक विश्वास नाही बसला. कारण ती म्हणाली, “या लोकांना (सोबत असलेले पुरुष) माझ्यापेक्षा जास्त चांगली येते तुझी भाषा, त्यामुळे काही समजलं नाही, तर त्यांना विचार. समजलं नाही तर तशीच गप्प नको बसू.” मला तिच्या या हुकुमाची गंमत वाटली आणि मी आमच्या संवादात मनापासून रमले. तिची माझ्यावरची हुकुमत मला खुपत  नव्हती तर तिच्या   आत्मविश्वासाचं मला कौतुक  वाटत होतं.

मसरबाईला शेतावरचं काम सोडून जाता येत नव्हतं आणि झोपडीत तर मला देण्याजोगं काही नव्हतं. मग ती माझ्या सहका-यांना (जे त्या गावात नियमित जात असतात), म्हणाली, “ताईला माझ्या घरी घेऊन जा आणि चहा पाजा.” तिचं घर तिथून निदान दोन किलोमीटर अंतरावर  होतं.  “तू आणि तुझा नवरा तर इकडेच आहेत, मग तुझ्या घरी मला कोण चहा पाजणार?”  या माझ्या प्रश्नावर तिचे “पोरग्याची बायको असेल की घरी” हे उत्तर तयार होतं. मग माझ्या        सहका-याकडे वळून ती म्हणाली, “आणि ती नसेल घरात, तर तू दे रे करून चहा ताईला."  आम्ही सगळे हसलो. मग “पुढच्या वेळी नक्की तुझ्या घरी चहा घेईन" अशी कशीबशी मी तिची समजूत घातली आणि चहाचा विषय संपला.

तिच्या घराच्या आवक-जावकाची  चर्चा मी  चालू केली. घरात वर्षभरात कुठून आणि किती पैसे येतात आणि कशा कशावर ते खर्च  होतात, कर्ज घ्यावं लागतं कां, ते कुठून मिळतं, व्याजाचा दर काय असतो  – अशी चर्चा मी गावात गेले की करते साधारणपणे.  गरीब कुटुंबांना नेमक्या कशा प्रकारच्या विकास कार्यक्रमाची गरज आहे याचा अंदाज यायला अशा अनौपचारिक चर्चा मला नेहमीच मोलाच्या आणि मार्गदर्शक ठरल्या आहेत. गप्पा चालू असताना स्थानिक पुरुषांपैकी एकजण हसून म्हणाला, “तुझे दारूवर किती पैसे जातात ते पण सांग की ताईला."

मसरबाई बोलायची एकदम थांबली. मलाही क्षणभर काय बोलावे ते सुचेना. मसरबाईने थेट माझ्या नजरेला नजर भिडवून विचारलं, “तू नाही दारू पीत?’

“नाही, मी नाही पीत दारू”, मी शांतपणे सांगितलं.

“का?’ तिचा पुढचा प्रश्न तयारच होता.

मला तो प्रश्न त्या क्षणी एकदम अवघड वाटला कारण तिच्या दारू पिण्याबद्दल मला काही म्हणायचं नव्हत, ते अयोग्य आहे असं म्हणून तिला शरमिंदा नव्हतं करायचं मला!

“आमच्या समाजात नाही दारूची परंपरा , म्हणून नाही पीत मी ती” – तिला समजेल अशा भाषेत मी उत्तर दिलं. आदिवासी समाजाच्या प्रथांबाबत संवेदनशील असण्याचा माझ्या परीनं मी प्रयत्न करत होते.

“तू  मटण खातेस का?” मसरबाईचा पुढचा प्रश्न. मी त्यावर काही न बोलता नुसती हसले. हसून उत्तर टाळण्याचा माझा तो क्षीण प्रयत्न होता.

“मला मटण आवडतं आणि कोंबडी तर फारच आवडते. तू कधी खाल्ली आहेस कोंबडी?” मसरबाई काही मला तशी सोडणार नव्हती तर!

मसरबाईने माझ्यावर असा प्रश्नांचा भडिमार सुरु केल्यावर माझे सहकारी आणि गावातले पुरुष रागावले. त्यांच्या मते मी प्रश्न विचारायला तिथं आले होते. मसरबाईने मला प्रश्न – आणि तेही दारू आणि मांसाहार याबद्दल – विचारणं बहुधा कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण मी जर मसरबाईला खासगी स्वरूपाचे प्रश्न विचारू शकते, तर मसरबाईलाही तसे प्रश्न मला विचारण्याचा अधिकार आहे अशी माझी सरळ साधी भूमिका होती. असे प्रश्न विचारून तिच्या जगण्यात आणि माझ्या जगण्यात काही साम्य आहे का , कुठे नेमके आमचे नाते जुळू शकते याचा ती अंदाज घेत होती असं मला वाटलं. तिच्या पद्धतीने ती मला अजमावत होती आणि त्यात माझ्या मते काही गैर नव्हतं.  माझ्यावर तिने का म्हणून विश्वास टाकावा मी तिच्यावर तसाच  विश्वास टाकून खासगी माहिती तिला दिल्याविना?

मी मसरबाईला म्हटलं, “नाही, मी मटण आणि कोंबडी दोन्ही खात नाही. पण तुला आवडते ना, मग पुढच्या वेळी आले की तुझ्या घरी खाईन मी. “

तिने मान हलवली आणि माझा समजूतदारपणा एकदम मोडीत काढला. “तुला एखादी गोष्ट पसंत नसेल, तर  कशाला मी म्हणते ती दुस-यासाठी करायची? मला खूष करायला तुला कशाला मटण आणि कोंबडी खायला पाहिजे मनाविरोधात? हे काही मला तुझं पटलं नाही बघ ताई.”

मी तिच्या विचारांच्या  स्पष्टतेने चकित झाले होते. मला काय उत्तर द्यायचे ते सुचले नाही. मी गप्प बसले.

दोन मिनिटं मसरबाईही शांत होती. तिच्या मनात काहीतरी चाललं होत ते कळत होत  त्यामुळे मीही बोलायची घाई केली नाही.

मग निश्चय केल्याप्रमाणे मसरबाई म्हणाली, “बरं मी दारू सोडेन, पण मटण आणि कोंबडी मात्र मी खाणारच.”

“ चालेल ना ताई?” तिने परत एकदा खात्री करून घेतली.

तिच्याच तर्काने तिने माझ्यासाठी काही करायची गरज नव्ह्ती खर तर; पण “नाही तू दारू प्यालीस तरी माझी काही हरकत नाही” असंही मी तिला म्हणू शकत नव्ह्ते!! शिवाय असल्या क्षणिक भावनेत केलेला निश्चय ती खरच अंमलात आणेल की नाही हे काळच सांगेल.  

पण मला मसरबाईच्या व्यक्‍तिमत्त्वाच फार नवल वाटलं. खेड्यात वाढलेली, शाळेत जाण्याची संधी कधीच न मिळालेली ही एक आदिवासी स्त्री. पण तिच्या विचारांत एक प्रकारची स्पष्टता आणि सहजता होती. मी तिच्यासारखी नव्हते तरी तिने मला सहजतेने स्वीकारले. तिच्या आवडीनिवडी एकदम स्पष्ट आहेत पण त्याचबरोबर दुस-या प्रकारच्या लोकांचा आदर करण्याची भावनाही तिच्यात मला  आढळली.  स्वत:चच मत माझ्यावर लादण्याची कसलाही प्रयत्न तिने केला नाही आणि माझ्यासमोर तिला कसलाही न्यूनगंड वाटत नव्हता हे विशेष होते. ती बदलायला तयार आहे, स्वत: च्या सवयींना मुरड घालायला तयार आहे.

कुठ शिकली असेल मसरबाई हे सगळ?
त्या अर्ध्या तासात मसरबाईला मी काहीच शिकवलं नाही खर तर, मी मात्र तिच्याकडून बरच काही शिकले. माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडला तिच्याशी झालेल्या बोलण्यातून .

‘आपण जसे आहोत तसे स्वत: ला स्वीकारले पाहिजे’ याची जाण  झाली  मला परत एकदा!
**

Friday, February 17, 2012

११४. जाण कावळ्यांची


प्रकाश यांनी लिहिलेली कावळा ही कथा वाचली
http://www.mimarathi.net/node/8136
त्यावर निरंजन यांनी लिहिलेली 'कुमार' ही कथा वाचली.
http://mimarathi.net/node/8151

आणि मलाही एक अनुभव आठवला.

***********

पुणे- नाशिक प्रवासात वाटेत 'दौलत'वर नेहेमीप्रमाणे बस थांबली. दहा मिनिटंच बस थांबते इथं. तेवढयात धावाधाव करत खाणं - मग कितीही भूक लागलेली असली तरी - मला आवडत नाही आणि जमतही नाही. 'खाणं' ही इतर अनेक गोष्टींप्रमाणे निवांतपणे करायची आनंददायी कृती असावी अशी माझी धारणा आहे.पोट भरण्याच्या खटाटोपात ते केवळ 'उदरभरण नोहे' हे आपण जवळजवळ विसरूनच गेलो आहोत!

मी पॉपकॉर्न घेतलं आणि सगळ्या गर्दीपासून आणि गोंगाटापासून थोडी लांब जाऊन उभी राहिले. डाव्या बाजूच्या शेतात हिरवगार पीक डोलत होत. लांबून कुठूनतरी दयाळाच सुरेल गाणं ऐकू येत होत पण तो दिसत मात्र नव्हता मला.

तेवढयात 'काव काव' असा ओळखीचा स्वर आला. एक कावळा खायला मिळेल अशा हिशोबानं माझ्याजवळ आला होता. 'माणसांच्या नादाने प्राणी आणि पक्षीदेखील काहीबाही खायला लागलेत' असा विचार माझ्या मनात आला. मी दोन पॉप कॉर्न कावळ्यासमोर फेकले. मग त्यावर तीन चार कावळ्यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. त्यांची आपापसात 'लढाई' होऊ नये असं मला वाटलं म्हणून मी आणखी काही पॉप कॉर्न जमिनीवर टाकले. पण आश्चर्य म्हणजे दुसरा कोणताही कावळा ते मटकावायला आला नाही. पहिल्या कावळ्याची आता भीड चेपली होती. एक उडी मारून तो माझ्या आणखी जवळ आला. मी परत दोन पॉप कॉर्न त्याच्यासमोर टाकले. पुन्हा दोन चार कर्कश 'काव काव' झाले पण समोर माझ्या कोणीच आलं नाही.

साधारणपणे खायला काही मिळालं की कावळ्यांची झुंड येते. आज मात्र हा कावळा एकटाच खात होता. माझ कुतुहल वाढल या प्रकारामुळे. मी नीट पाहिल्यावर दोन बाबी ठळकपणे नजरेत भरल्या. एक म्हणजे पॉप कॉर्न खाण्यासाठी माझ्या जवळ आलेला कावळा लंगडत होता. तो उडया मारत होता तोही एकाच पायाच्या आधारे. त्याला बहुधा लांबवर उडताही येत नसणार. दुसरं म्हणजे वरती आजुबाजूला तीन चार कावळे होते - ते या जमिनीवरच्या कावळ्याचे जणू रक्षक होते. कारण मी पॉप कॉर्न जमिनीवर टाकल्यावर त्यावर झडप घालायला येणा-या इतर कावळ्यांना हे तिघे चौघे 'संरक्षक कावळे' हुसकावून लावत होते.

मला ते दृष्य फार विलक्षण वाटलं होत तेव्हा आणि आजही माझ आश्चर्य कमी झालेलं नाही.

आपला सहकारी जखमी आहे; पूर्ण ताकद पणाला लावून तो अन्न मिळवू शकणार नाही; त्याला मिळणारे अन्न आपण त्याच्या तोंडातून काढून घेऊ नये - अशी अत्यंत संवेदनशील जाण त्या इतर कावळ्यांचा व्यवहारातून प्रकट होत होती.

ज्यांचे शोषण झाले आहे; जे आजारी आहेत; जे संकटग्रस्त आहेत; ज्यांची स्पर्धेत भाग घेण्याची क्षमता कमी आहे - अशांची विशेष काळजी घेतली पाहिजे - हे माणसांना कधी समजेल? हा प्रश्न मला आजही पडतो अनेकदा.

पूर्वप्रसिद्धी: मी मराठी http://mimarathi.net/node/8157

Tuesday, February 14, 2012

११३. काही कविता: १९ पालवी

मन रंगात रंगले
रंग मनाला लागेना;

भोगताना सारे काही
मन काहीच भोगेना;

आस सावळ्याची नाही
मन आधार मागेना;

जाणायची वेळ झाली
तरी मन हे जागेना.

मन गवसता त्याची
खूण पुसटशी झाली;

खोळ चढवून पुन्हा
नवी पालवी ही आली.


पुणे २६ मार्च २००५, 

Tuesday, February 7, 2012

११२.नेहमीचेच

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. मी मेट्रोतून येत असताना एक दहा वर्षाचा मुलगा आणि त्याची आई माझे सहप्रवासी होते.
दहा वर्ष म्हणजे काही 'समज नसणारं' वय नाही मानता येणार आजच्या काळात.
तो मुलगा त्याच्या घाण बुटांसह सीटवर उभा राहून वरच्या कड्यांना लोंबकळत होता.
दोन मिनिटे झाली, तीन झाली ..

पाच मिनिटांनी मी त्या मुलाला म्हटलं, "बेटा, इस सीटपे आगे लोग बैठेंगे. आप गंदे शूज रखकर उस सीटपर खडे मत रहना, सीट गंदा हो रहा है वह ..."
मी हे शांत समजुतीच्या स्वरांत बोलले, कारण 'मूल लहान आहे, मी मोठी आहे' याच मला भान होत.

त्यावर त्या मुलान लगेच मला दरडावून सांगितलं, "इस सीट पे मेरा नाम लिखा है'.
मला एकदम त्याने माझ्या कानफाटात मारल्यासारखं वाटलं. तरीही मी हसून पुन्हा म्हटलं, "बहुत तेज दिमाग है आपका ..."

त्याच्या आईने त्याला जरा दटावलं अस बोलण्याबद्दल - 'ऐसा मत बोलना' असं ती म्हणाली. पण घाण बूट त्या सीटवर ठेवण्याबाबत काहीच नाही.

आसपासच्या स्त्रियांनी माझ्याकडे अपेक्षेन पाहिलं. आता भांडण रंगणार, काहीतरी करमणूक होणार अशी त्यांची अपेक्षा होती बहुतेक.

मी शांत राहिले. एका मर्यादेपलिकडे डोक भिंतीवर आपटण्यात काही अर्थ नसतो हे मला माहिती आहे.

माझ्या मनात आलं -  हे पोरग पुढे काय प्रकारचं नागरिक बनणार हे स्वच्छ दिसतच आहे. अशा प्रसंगी आई-वडिलांची, अन्य पालकांची भूमिका काय असावी? काय असते साधारणपणे?

आपली फक्त 'बघ्यांची' भूमिका असावी? का आपण प्रयत्न करावा बदल घडवून आणण्याचा? ते करताना कटुता कशी टाळायची? स्वतःला मनस्तापापासून कस अलिप्त ठेवायच?
हे खरे तर नेहमीचेच .. म्हणून मीही निर्ढावले आहे का या सगळ्याला?

काय वाटतय इतरांना?

पूर्वप्रसिद्धी:  http://mimarathi.net/node/8076