ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, September 24, 2012

१३७. झाड

१.
पुस्तकाच्या पानातून
अचानक प्रकट होत
(मी प्रश्न विचारलेला नसतानाही)
तू म्हटलंस:
"जीवन समजून घ्यायचे आहे?
तर मग जरा नीटपणे झाड पहा."

असलं काही गूढ तत्त्वज्ञान सांगण्यासाठी
जगात प्रसिद्ध आहेस तू -
म्हणून  दुर्लक्ष केलं मी.

तशा सगळ्याच गोष्टी
मनाच्या तीरावर
पेलून न्यायच्या म्हटलं तर
जगणं  मुश्किल होतं
हा अनुभव गाठीशी ताजातवाना
म्हणून कदाचित सौम्य हसता आलं मला.

२.
पण तेव्हापासून नकळत
जाणीवेच्या - नेणीवेच्या
त्यांच्या अस्फुट तीरावर रेंगाळणा-या
जीवनाच्या
अगाध तृष्णेचा
झाड एक भाग बनले.

Tree in Lalbag, Bangaluru, Age: 200 Years only
       
इकडं तिकडं भटकून,
सुख-दु:खांचं ओझं पेलून,
प्रश्नचिन्हं, विरामचिन्हं  घेऊन मी परत येते
तेव्हा घराइतकीच
स्थिर असतात
आणि परत अचूक सापडतात
माझ्या अंगणातील झाडं.

कधी पानं टाकून संन्यस्त होतात;
कधी रंगाने
उधळत माखून जातात;
वा-याच्या तालावर
सर्वांगे नाचतात;
सा-यात असून
नसल्यासारखी असतात.

मला वाईट वाटायचं
झाडांना मनसोक्त
भटकता येत नाही याचं;
उन्हाच्या तापातून
झाड मायेच्या सावलीत
आणून ठेवता येत नाही याचं;
मूळ तोडून निघून जावं
अशी शक्यताच नसलेल्या
त्यांच्या स्थिर आयुष्याचं.

काहीही झालं,
तरी तिथंच राहायचं;
रोज भोवताली
तेच पाहायचं;
पाखरांच तेचं गाणं
सकाळ-संध्याकाळ ऐकायचं;
गर्दी असूनही
हरवून एकटचं राहायचं.

तशी सगळी झाडं
सारखीच भासतात मला;
कुठेही- कधीही- कशीही भेटली तरी-
अंतर्मनाशी जोडलं जाण्याची
एक जन्मजात देणगी
लाभली आहे त्यांना.

३.
हे सगळं
कधीतरी तुला सांगितलं.
तू ऐकून घेतोस
म्हणून सांगत जाते मी.
कधी तू ऐकलंच नाहीस तर
काय करेन मी
काही कल्पना नाही.

असो.
हे विषयांतर झालं.

तर नेहमीच्याच
प्रगल्भ समंजसपणाने
तू म्हटलंस:
"झाडांची कीव करू नकोस.
तो अधिकार तुझा नाही.
झाडं अशी आहेत '
कारण त्यांनी खुलेपणाने
स्वधर्माचा स्वीकार केला आहे."

बराच काळ
मौनात गेल्यावर
तू आणिक म्हटलंस:
"स्वयंनिर्णयाचा अधिकार पुन्हा मिळाला तरी
बहुसंख्य झाडं
हे असंच जगणं मागून घेतील
किंवा मिळवतील
याची खात्री आहे मला"

आकाश आणि माती
यांचा दुवा सांधताना
झाड सत्य पाहते;
क्षुद्र गोष्टींकडे
दुर्लक्ष करत वाढताना
झाड आत्ममग्न राहते;
अंग सैलावत
वा-याबरोबर मस्त झुलताना
झाड स्थिर राहते;
सारे गळून गेले
तरी त्यापल्याड
झाड जीवनाचा अर्थ पाहते.

देणारा आला
तर झाड घेते;
घेणारा आला
तर झाड देते;
कोणी नाही आलं
तरी झाड
खुशीत राहते.

बाकी सारे विश्व
कस्तुरीच्या शोधात
भटक भटक भटकते
तेव्हा झाड
मूळ रोवून
स्तब्ध साक्षी असते.

४.
शरीर, मन, बुद्धी, अहंकार,
वासना, स्वप्नं, आकांक्षा, लालसा,
सल, अपराध,  महत्त्वाकांक्षा, दौर्बल्य,
असमाधान, अस्वस्थता,
सुख, उत्कटता, आवेग
या फांद्यांचे
कुठेच न रुजणारे आयुष्य
आता अलगद
गूढ, तत्त्वज्ञ झाडांच्या
सलगीसाठी
राखून ठेवले आहे मी!!

Tuesday, September 18, 2012

१३६. भारतीय स्त्रिया आणि विवेकानंद विचार: भाग २


 प्रत्येक राष्ट्राला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक संस्कृतीला एक नियतीनियोजित भूमिका आहे हे विवेकानंदांनी आग्रहाने प्रतिपादन केले. प्रत्येक समाजाला काहीतरी उद्दिष्ट साधायचे असते. हरेक समाजाला मानवस्वभावाच्या एखाद्या विशिष्ट अंगाचा विकास करावयाचा असतो. “ (पान , भारतीय नारी) एक म्हणजे, जो समाज जिथे आहे, तिथून त्याला पुढे न्या पण ते करताना आत्मगौरवाची भावना जागृत राहू द्या. दुसरे म्हणजे जगात जे जे काही आहेभले ते अगदी तुम्हाला पटणारे, तुमच्या सांस्कृतिक संचिताच्या पूर्ण विरोधी काही असेल तरी त्याचीही जगाच्या प्रवासात एक भूमिका आहे हे समजून घेऊन त्याचा आदर करा आणि तिसरे म्हणजे आपले ध्येय एकच आहे याचे भान ठेवा. जडवाद आणि चैतन्यवाद; पाश्च्यात्य विज्ञान आणि भारताची आध्यात्मिक विचारधारा यांची सांगड घालण्यात जगाचे भले आहे अशी त्यांची धारणा होती.

व्यक्तीस्वातंत्र्य आणि सामाजिक धर्म असा आदर्शातला फरक असल्यामुळे भारतीय समाजरचनेत आणि पाश्चात्य समाजरचनेतआणि त्याचा परिणाम म्हणून स्त्रियांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितितही - फरक दिसतो असे विश्लेषण विवेकानंदांनी केले आहे. पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून सारी नारी शक्तीपत्नीत्वातकेंद्रिभूत झाली आहे, आणि भारतातील सामान्य माणसाच्याही दृष्टीने सारी नारी शक्ती घनीभूत झालेली असतेमातृत्वात’. मातृपदलाभातच स्त्री जीवनाची सार्थकता आहे. पण ज्या स्त्रीला विवाह करायचा नसेल तिला वैराग्याचे, ब्रह्मवादिनीचे जीवन जगण्याची संधी समाजाने दिली पाहिजे. तसे जगण्याचा स्त्रीला आध्यात्मिक अधिकार आहे. पण भारतातील सामान्य माणसाच्या दृष्टीने सारी नारीशक्ती मातृत्वात घनीभूत झाली आहे (पान , भारतीय नारी) भारतीय स्त्रियांच्या जीवनसाफल्याचे आदर्श प्रतीक आहे सीता.  (भारतीय नारी, पान ३२) सीता ही सहिष्णुतेचा सर्वोत्तम सर्वोच्च आदर्श आहे, तर सावित्रीचा आदर्श सतीत्वासाठी आहे. विवेकानंद आपल्याला व्यक्तिवादाच्या पलिकडे पहायला सांगतात. मातृत्व ही संकल्पना आत्मकेंद्रितपणा कमी होणे अशा व्यापक अर्थाने आपण घेतली तर विवेकानंदांचा  मातृत्वाचा आदर्श केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही ठेवला पाहिजे हे लक्षात येते. आत्मकेंद्रितता सोड्णे आपल्याला अवघड वाटते म्हणून कधीकधी विवेकानंदांचे विचार आपल्याला अव्यवहार्य वाटतात!
चांगले वाईट तर सगळीकडे राहणारचपण ज्यांना आपण नष्टभ्रष्ट म्हणतो त्यांच्यावरून त्या समाजाबद्दल मत बनवणे योग्य होणार नाही (पान ४२ भारतीय नारी). म्हणून कोणत्याही समाजाबद्दल निर्णय घेताना त्यातील वाईट गोष्टींकडे पाहण्याऐवजी त्यातील चांगल्या गोष्टींकडे पहायला पाहिजे असे विवेकानंदांचे मत आहे. भारतीय समाजात दोष नाहीत असे नाही, भारतातील स्त्रियांची स्थिती एकदम परिपूर्ण आहे असे विवेकानंदांनी कधीही मानले नाही. भारतात सुधारणेची गरज आहे, पण त्यासाठी लगेच पूर्ण भारतीय संस्कृती मोडीत काढण्याची गरज नाही.  कोणत्याही समाजरचनेला सगळ्यांचे सुख आजवर तरी साधता आलेले नाही. त्यामुळॆ भारतीय धारणा एकाच्या सुखापेक्षाअधिकांचे अधिक सुखपाहणारी आहे. हेअधिकनक्की कोण असा प्रश्न विचारला तर विवेकानंद दीनदुबळयांच्या, वंचितांच्या, शोषितांच्या बाजूने उभे राहतात याची साक्ष त्यांच्या विविध विचारांतून पुन्हपुन्हा मिळते.
आदर्श दुबळेपणाने अन्याय सहन करण्याचा नाही प्रेमाचा, जिद्दीचा, त्यागाचा आहेसीता सावित्रीचा आदर्श फक्त स्त्रियांनी नाही तर संपूर्ण समाजाने ठेवायची गरज आहे. सहनशीलता दोन प्रकारची आहे. प्रतिकारक्षमता नसल्याने, दुबळेपणातून असहाय्यतेतून येणारी सहनशीलता. दुर्दैवाने आपल्याला फक्त याच प्रकारची सहनशीलता माहिती आहे. पण प्रतिकाराचे सामर्थ्य अंगी असतानाही क्षमाशील असणॆ ही एक वेगळीच बाब आहे. मानवी मनाच्या मर्यादा ओलांडून जाण्याचे ते एक उदाहरण आहे.
विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न फक्त उच्चवर्णियांपुरता मर्यादित आहे असे विवेकानंदांचे निरीक्षण होते. म्हणून या एका प्रश्नाभोवती भारतीय स्त्रियांचा प्रश्न जोडला जाऊ नये असे त्यांचे मत होते. विधवा पुनर्विवाहास बंदी अथवा बहुपत्नीत्व यांसारख्या धार्मिक कारणांपेक्षा आर्थिक सामाजिक कारणेच आहेत. ज्या समूहांत स्त्रियांच्या तुलनेत पुरुष कमी आहेत तेथे विधवा विवाहाला असणा-या बंदीमागेही व्यापक सामाजिक विचार होता. स्त्रियांची विधवा पुनर्विवाहासारखी एखादी समस्या सुटली म्हणजे लगेच स्त्रियांचे सारे प्रश्न सुटणार नाहीत याचे भान ठेवायला हवे असे विवेकानंद सांगतात.
स्त्रियांचे प्रश्न पुरुष सोडवू शकणार नाहीत. ते स्त्रियांनीच सोडवायला हवेत यावरही त्यांनी अनेकदा भर दिला आहे.स्त्रियांबाबत सुधारणॆचा विचार मूठभरांनी लादल्यास त्याचा फारसा उपयोग नाही. त्यासाठी सर्वांगीण विकास करणारे शिक्षण आवश्यक आहे. वेदान्त विचाराचा गाभा आहे मानवाच्या आंतरिक शक्तीचा पूर्ण विकास. दीनदुबळयांचे, शोषितांचे (ज्यात स्त्रियाही आल्या) उत्थान होण्याचा एक मार्ग म्हणजे शिक्षण. विवेकानंद फक्त पुस्तकी शिक्षणाबद्दल बोलत नाहीत तर मानवी जीवनाचे उन्नयन करणा-या प्रक्रियेबद्दल बोलतात.
जग बदलण्याची ताकद कष्टकरी वर्गात आहे असे विवेकानंदांचे मत होते.  त्यांच्यात असलेल्या शक्तीवर त्यांचा अतोनात विश्वास  होता. “मानवसेवा हीच ईश्वरसेवाअसा केवळ संदेश देऊन विवेकानंद थांबले नाहीत तर त्यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाच्या माध्यमातून त्यांनी अशा जनसेवेचे प्रत्यक्ष उदाहरणही घालून दिले. आपण पुरुष आहोत, त्यातही संन्यासी आहोत त्यामुळे स्त्रियांचे प्रश्न आपल्याला पूर्णपणे कधीही समजणार नाहीत याची जाणीव विवेकानंदांना होती. एका मुलाखतीत ते म्हणतात, विधवांच्या सर्वसामान्य स्त्रीजातीच्या उन्नतीसाठी योजावयाच्या उपायांबद्दल मला अनेकदा प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचे अगदी निर्वाणीचे उत्तर मी आता देऊन टाकतोमाझे उत्तर हेच की मी काय विधवा आहे म्हणून मला असले हे फालतू प्रश्न विचारता? मी काय स्त्री आहे म्हणून मला वारंवार हे प्रश्न तुम्ही विचारता? तुम्ही असे कोण लागून गेला आहात की अगदी गळी पडून स्त्रीजातीचे प्रश्न सोडवण्यासाठी व्याकूळ झाला आहात? तुम्ही काय प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक विधवेच्या अंतर्यामी विराजणारे साक्षात भगवान आहात की काय? दूर व्हा! आपले प्रश्न त्या आपण होऊनच सोडवतील." (भारतीय नारी, पान ५४)
स्त्री दाक्षिण्यासंबधीचे विवेकानंदांचे  काही विचार आधुनिक काळातील स्त्रीवादी विचारांच्याही दोन पावले पुढे आहेत असे जाणवते. स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणून पाहिले जाऊ नये, तर माणूस म्हणून पाहिले जावे असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. स्त्रीपूजा म्हणजे तिच्या सौंदर्याची, यौवनाची पूजा नाही तर स्त्रीची आनंदमयी जगदंबा या ज्ञानाने केलेली पूजा होय.त्यांच्या शिष्य परिवारात अनेक स्त्रिया होत्या. स्त्रियांना शिक्षण द्या (आणि शिक्षण म्हणजे आंतरिक क्षमतांचा विकास) म्हणजे त्यांचे प्रश्न त्या स्वत: सोडवतील अशी भूमिका विवेकानंदांनी काळाच्या फार पुढे जाऊन सहजतेने मांडलेली आढळते.
अर्थात कधीकधी असही वाटत की स्त्री प्रश्नांबाबत विवेकानंद फार आदर्शवादी भूमिका मांडताहेत. आत्मज्ञानाच्या पातळीवर लिंगभेद उरत नाही असे स्वामीजी म्हणतात पण कोणत्याही काळात कोणत्याही समाजात अशी आत्मसाक्षात्कारी माणसे कितीशी असणार आहेत आणि समाजावर त्यांचा प्रभाव कितपत असणार आहे?
विवेकानंदांचे विचार म्हणजे एखाद्या रोगावर रामबाण उपाय आहे अशा थाटात त्याच्याकडे पहायची गरज नाही. विवेकानंदांच्या उद्गारांचा शब्दश: अर्थ घेता त्यांचा व्यापक अर्थ लावण्याचे आणि आपली उत्तरे शोधण्याचे आव्हान आपण घ्यायला तयार आहोत का? विवेकानंद पूर्वी ते जे बोलले तेच आजही बोलले असते असे म्हणणे चुकीचे ठरेल. आज विवेकानंद असते तर ते सद्यस्थितीतल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रागतिक भूमिका घेतली असती याबाबत माझ्या मनात अजिबात  शंका नाही. गर्भजलचिकित्सेचा वापर करून स्त्री भ्रूण हत्या, हुंडा, कौटुंबिक हिंसा, स्त्रियांचा उपभोग्य वस्तू म्हणून बाजारपेठेद्वारे केला जाणार वापर याबाबत त्यांनी आपल्याला कठोरपणे सुनावले असते, वेदान्ताच्या तत्त्वांची त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली असती.  स्त्रियांचा राजकीय सहभाग, स्त्रियांचा सार्वजनिक कामातला सहभाग, स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण याबाबत त्यांनी आपल्याला नवे प्रयोग करायला प्रोत्साहन दिले असते.
स्त्रियांचे प्रश्न केवळ स्त्रियांचे नाहीत तर ते संपूर्ण समाजाचे आहेत याचे भान विवेकानंदांच्या विचारांत सतत आढळते. तसे कोणतेच उत्तर परिपूर्ण नसते, कारण काळ सतत पुढे जात असतो, परिस्थिती सतत बदलत असते. शिवाय जी उत्तरे परिपूर्ण असतात ती तात्त्विक असल्याने तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना अव्यवहार्य वाटतात. आपण सारे आपल्याच प्रश्नांत दंग असतो आणि त्या त्या प्रश्नांची तात्कालिक उत्तरे शोधण्यातच आपल्याला धन्यता वाटते. तात्कालिक उत्तरांच्या क्षणभंगुरतेची जाणीव विवेकानंदांना आहेम्हणून त्यांची झेप त्यापलिकडची आहे. ज्याची वाटचाल जितकी, तितकेच त्याला/तिला समजते.विवेकानंद वाचताना उत्तरे मिळतील किंवा कदाचित मिळणारही  नाहीतपण दृष्टिकोन जरूर मिळतो.
प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात प्रगती आणि अधोगती यांचे एक चक्र अव्याहतपणॆ चालते असे दिसते. ज्या मूल्यांमुळे समाजातल्या अधिकांचे सुख पाहिले जाते, त्या मूल्यांची, विचारांची पुन्हापुन्हा आठवण करून घ्यावी लागते. विवेकानंद त्यासाठी आपल्याला मदत करतात. विवेकानंद आपल्याला मदत आणि मार्गदर्शन जरूर करत राहतील पण आपली सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकून निवांत बसलो आपण तर विवेकानंदांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण वाटचाल केली नाही असे होईल. लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी 'खजिना शोधण्याचा' खेळ खेळला असेल. त्या खेळात नेमक्या खुणा उमगल्या तरच खजिना सापडतो अन्यथा नुसतीच पायपीट होते. विवेकानंदही आपल्याला काही सांगताहेत पण त्या शब्दांचा योग्य तो अर्थ लावून पुढचा प्रवास मात्र आपल्यालाच करावा लागेल.

समाप्त 
(हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या 'कृतिरूप विवेकानंद' या लेखसंग्रहातील लेख) 
(विवेकानंदांचा  फोटो आंतरजालावरून साभार)