ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label जगणं. Show all posts
Showing posts with label जगणं. Show all posts

Sunday, September 7, 2025

२७७. विवेकानंदपुरम

(भाग १ : कन्याकुमारीच्या दिशेने) 

(Want to read this post in English? It is here!) 

कन्याकुमारी रेल्वे स्थानकं खरं तर एक टुमदार आणि देखणं स्थानक आहे.

पण यावेळी का कुणास ठाऊक त्याचं पहिलं दर्शन फारच उदासवाणं होतं. सगळीकडं फक्त धूळ होती, . बाहेर पडताना लक्षात आलं की स्थानकाचं दुरूस्तीचं काम चालू होतं. छोट्या छोट्या गोष्टींत आपल्याला किती अपेक्षा असतात आणि आपले अपेक्षाभंग देखील किती इवल्याशा गोष्टींमध्ये असतात हे जाणवून हसूही आलं. यावेळी काही मी कन्याकुमारी रेल्वे स्थानकाचा फोटो काढला नाही. एक दिवस चालत गांधी मंडपापर्यंत आले होते, तेव्हा तर रेल्वे स्थानकाच्या दिशेने मी नजरसुद्धा टाकली नाही.

हा २०११ साली काढलेला फोटो. घरी आल्यावर शोधला.

कन्याकुमारी रेल्वे स्थानक
स्थानकाबाहेर रिक्षा रांगेत उभ्याच होत्या. तसं तर स्थानक ते विवेकानंदपुरम हे अंतर केवळ दीड किलोमीटर आहे. सामान नसेल तर रमतगमत चालत जाता येईल इतकंच. पण सामान असल्यावर रिक्षाला पर्याय नाही. रिक्षावाल्याने शंभर रूपये सांगितले. हा बहुधा ठरलेला दर असणार. चार-पाच लोक मिळून जात असतील एरवी. मी फार काही विचार न करता रिक्षात बसले आणि विवेकानंदपुरममध्ये पोचले.
विवेकानंदपुरममध्ये प्रवेश करताना

विवेकानंदपुरम

विवेकानंदपुरम हा सुमारे शंभर एकरांचा परिसर आहे. हे ‘विवेकानंद शिला स्मारक’ आणि ‘विवेकानंद केंद्र’ यांचं मुख्यालय आहे. इथं त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण केंद्र आणि निवास व्यवस्था आहे. सुमारे एक हजार पर्यटक एका वेळी इथं राहू शकतात अशी सोय आहे. नाश्ता-जेवणासाठी एक उपाहारगृह आहे. दिवसातून काही ठराविक वेळा कन्याकुमारी गावात जाण्या-येण्यासाठी मोफत बससेवा आहे. ग्रंथालय आहे, विवेकानंद चित्र प्रदर्शनी आहे, गणपतीचं देऊळ आहे, स्वातंत्र्ययोद्ध्यांचं स्मारक आहे, रामायण प्रदर्शन आहे, पर्यावरणविषयक कामाची माहिती देणारं केंद्र आहे, विवेकानंद केंद्राचे संस्थापक कै. एकनाथजी रानडे यांची समाधी आहे, त्यांच्या जीवनाची माहिती देणारं प्रदर्शन आहे, ध्यानमंदिर आहे, भरपूर झाडं आहेत, मोरांचं अभयारण्य असल्याने मोरही खूप दिसतात, केंद्राचा समुद्रकिनारा (बीच) आहे - जिथून सूर्योदय दिसतो. अशा बऱ्याच गोष्टी परिसरात आहेत. एक कॉन्फरन्स हॉलही दिसला. आणि अर्थातच विवेकानंद केंद्राची शाळाही आहे.

दुपारी चारच्या सुमारास ‘विवेकानंद चित्र प्रदर्शनी’मध्ये गेले. हे या परिसरातलं माझं एक आवडतं ठिकाण. १९८३ मध्ये मी पहिल्यांदा कन्याकुमारीला गेले तेव्हा हे ठिकाण टुमदार, स्वच्छ, आणि मला नवा दृष्टिकोन देणारं होतं. आजही ते तसंच आहे. काही गोष्टी अपरिवर्तनीय असतात, त्यातली जणू ही एक. त्यावेळच्या विवेकानंद केंद्राच्या नेतृत्वाची दूरदृष्टी आणि पुढील पिढ्यांनी त्याची घेतलेली काळजी हे दोन्ही यातून दिसून येतं. प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारात स्वामी विवेकानंदांचे पूर्णाकृती चित्र आहे, जे लक्षवेधक आहे.

दहा रूपये प्रवेशशुल्क देऊन आत गेले. माझ्या आठवणीप्रनुसार यात मूळ सत्तरच्या आसपास फलक (पोस्टर्स) होते. आता त्यात विवेकानंद केंद्राच्या कामाचा तपशील पुरवणाऱ्या फलकांची भर पडली आहे. अत्यंत उत्तम चित्रं आहेत ही. हे चित्रकार कोण आहेत यासंबंधी आंतरजालावार माहिती मिळाली नाही. पुण्यात परत आल्यावर विवेकानंद्र केंद्रातल्या एका वरिष्ठ कार्यकर्तीला विचारलं, तेव्हा समजलं की कोलकाताचे रघुनाथ गोस्वामी यांनी ही चित्रं काढली आहेत. या प्रदर्शनातलं नचिकेताचं चित्र माझ्या अतिशय आवडीचं आहे. (नचिकेताची कथाही अर्थातच आवडीची.) 

इंग्रजी, तामिळ, आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रत्येक चित्राखाली स्पष्टीकरण आहे. भारताचा इतिहास आणि संस्कृती, नरेंद्रनाथ दत्त या युवकाचा स्वामी विवेकानंद बनण्याचा प्रवास, त्यांची शिकवण, त्याचा भारतावर आणि जगावर झालेला परिणाम ... अशा दोन तीन भागांत या प्रदर्शनाची विभागणी करता येईल. निवांत वेळ काढून या ठिकाणी जावं असं मी सुचवेन.

पर्यटकांच्या अर्ध्या किंवा एक दिवसाच्या सहलीचा विवेकानंदपुरम आता एक मोठा भाग आहे. अशा कुठल्याही सहलीत असतो तसा प्रत्येक ठिकाणासाठी अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो. या अर्ध्या तासात लोक किती आणि काय वाचत असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. १९८० च्या दशकात त्या वेळच्या युवकांना बांधून ठेवणारी, प्रभावी वाटणारी भाषा आता बदलली आहे. इन्स्टा आणि ट्विटरच्या पिढीला ही पोस्टर्स शब्दबंबाळ वाटू शकतात. असो.

पुन्हा अपेक्षाभंग

तिथून विवेकानंदपुरममधल्या समुद्रकिनाऱ्यावर गेले. समुद्रात - पाण्यात - थेट उतरता येत नाही कारण संरक्षक भिंत बांधलेली आहे. सकाळी सूर्योदय पाहायला मोठ्या संख्येने लोक येतात, तेव्हा एक तास त्या भिंतीतला छोटा दरवाजा उघडतात. तिथं सुरक्षारक्षक सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असतो. या किनाऱ्यावरून समोरच्या विवेकानंद शिला स्मारकाचं छान दर्शन होतं.

पण आज आणखी एक अपेक्षाभंग झाला. समुद्रात ठिकठिकाणी भराव घालण्याचं काम चालू आहे. आणि एक भराव नेमका ‘शिला स्मारक’ आणि समुद्रकिनारा यांच्या मध्ये येतोय. आता किनाऱ्यावरून शिला स्मारक नीट दिसत नाहीय.

हा फोटो सकाळी काढला आहे. 

आणि हा संध्याकाळी.

वैतागवाणी भेट

समुद्रकिनाऱ्यावर मी वगळता सुरक्षारक्षक आणि आणखी एक तरूण माणूस होता. मी निवांत उभी होते, तेवढ्यात मला एक फोन आला. बोलणं झालं, मी फोन ठेवला आणि लगेच “आप महाराष्ट्रसे हो क्या दीदी” असं म्हणत तो तरूण मुलगा माझ्याशी बोलायला आला. मीही त्याची चौकशी केली. मेवाड(राजस्थान)मधला हा तरूण मुलगा चालत चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहे. गेले एक महिना तो  विवेकानंदपुरममध्ये राहतो आहे. मी त्याच्याशी जुजबी बोलून पुन्हा समुद्र पहायला वळणार इतक्यात त्याने “महाराष्ट्रात अमराठी लोकांवर हल्ले का होताहेत”, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना का आक्रमक झाली आहे” वगैरे चर्चा सुरू केली. मी त्याला शांतपणे “हल्ले वगैरे काही झाले नाहीयेत”, “पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती”, “काही अमराठी लोकांचा उद्दाम अविर्भाव” असं समजावून सांगत होते. पण लगेच माझ्या लक्षात आलं की याला ऐकायचं काही नाहीये, फक्त बोलायचं आहे. धर्म, संस्कृती, परंपरा .... या मार्गावर त्याची गाडी अपेक्षेप्रमाणे जात राहिली.

पुढं त्याने ‘उद्धव ठाकरे भाजपची सोबत सोडून काँग्रेससोबत गेले ही कशी चूक आहे’ वगैरे सुरू केलं.  मी त्यावरही काही न बोलता त्याचं ऐकून घेत होते. मी काही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची प्रवक्ती नाहीये 😀धर्म आणि पक्षीय राजकारण एकत्र करणारे लोक भेटणं यात आता काही नवल राहिलेलं नाही. असले लोक प्रचंड प्रेडिक्टेबल आणि म्हणून कंटाळवाणे असतात. मी त्या संवादातून बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्थातच अयशस्वी झाला.

हळूहळू त्याची गाडी केरळ-तामिळनाडूवर टीका करण्याकडं वळली. इथले लोक कसे हिंदी बोलत नाहीत, इकडे कसा सारखा भात आणि इडलीच खावी लागते वगैरे. पुढं मात्र तो जे काही बोलला, त्यावर मी त्याला जवळजवळ फैलावरच घेतलं. “दीदी, आप कैसे सभ्य कपडे पहने हुए हो, लेकिन मै यहाकी मंदिरोंमे कई लडकियोंको देखता हूँ तो उनके आधे-अधुरे कपडे देखकर मुझे अजीब लगता है”.  त्याचं हे वाक्य मला संताप आणणारं होतं. मी त्याला म्हणलं, “भावा, मुलींना कोणते कपडे घालायचेत ते घालू दे, तू कोण त्यांना सांगणारा? त्या काय तुझ्याकडं कपड्यासांठी पैसे मागतात काय? आणि काय रे, तू देवळात जातोस तेव्हा मुलींकडं कशाला बघतोस?  देवाचा विचार कर ना. देवळात जायचं निमित्त करून मुलींकडं बघायला जातोस की काय तू? असली दांभिकता काही बरी नाही. सुधरा जरा.” 

तो थोडा वरमला. मग त्याने गाडी दुसऱ्या मार्गावर नेली. एकदम ‘परदेशस्थ भारतीयांवर’ (एनआरआय). ते कसे आईबापांना इकडं सोडून परदेशात चैन करत असतात, इकडं त्यांच्या आई-वडिलांची काळजी घ्यायला कुणी नसतं वगैरे. त्यावरही मी त्याला फटकारलं. म्हणलं, “त्यांना नावं ठेवतोस खरी, पण तू तरी काय करतो आहेस? आई-वडिलांना घरी सोडून तूही महिनोनमहिने धाम आणि ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहेस ना? मग तुझ्यात आणि त्या एनआरआयमध्ये काय फरक आहे?” मग तो आणखी वरमला. “नाही दीदी, मी यात्रा संपल्यावर घरीच जाणारेय. मी आयुष्यभर माझ्या आई-वडिलांची सेवा करणार आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी आजन्म अविवाहित राहीन.” मला खुदकन हसायलाच आलं.  

सगळं जग सोडून (ही आपली म्हणायची पद्धत, काही सोडून वगैरे नव्हते गेले मी!)  कन्याकुमारीला गेले, तिथं समुद्रकिनाऱ्यावर हा एकच पर्यटक होता, तो नेमका मलाच भेटावा .... या योगायोगाचंही मला हसू आलं. जगं तेच असतं. माणसं तशीच असतात - चांगली, वाईट, निरागस, स्वार्थी, दुष्ट, मतलबी, सरळ, सज्जन ...... त्यातली कुणी अध्यात्माची फुलबाजी (ग्लोरिफाईड) भाषा बोलतात, तर आणखी कुणाला तसली भाषा बोलायला जमत नाही इतकाच फरक असतो का माणसां-माणसांत?

तेवढ्यात अचानक पाऊस आला. मी सोबत छत्री नेली नव्हती. तो पळत पळत निघून गेला. मागे उरलो मी, पाऊस, समुद्र, आणि तो सुरक्षारक्षक. त्याच्याशी दोन वाक्यं बोलले आणि मग छान भिजत सावकाश चालत परत आले.

काही जुनं, काही नवं

पुढच्या दोन तीन दिवसांत विवेकानंदपुरममधल्या जमेल तितक्या ठिकाणांना भेटी दिल्या. एके ठिकाणी तिथं बसलेले गृहस्थ रेडिओ ऐकत होते. मी एकटीच पर्यटक होते. मी आत जाऊन सगळं बघून आले, तिथून निघाले. त्या अर्ध्या-पाऊण तासात ते गृहस्थ माझ्याशी अवाक्षरही बोलले नाहीत. किंबहुना मी तिथं आले आहे याची त्यांनी दखलही घेतली नाही याची मला फारच गंमत वाटली. पॅशनचं तुम्हाला प्रशिक्षण देता येत नाही, ती आतूनच यावी लागते हे पुन्हा एकदा जाणवलं.

“रामायण” प्रदर्शनाची इमारत छान आहे.

आतमध्ये भास्कर दास (चेन्नै) यांनी काढलेली चित्रं आहेत. १०८ चित्रं आहेत. कलाकाराबद्दल आदर व्यक्त करूनही मी म्हणेन की मला ती चित्रं एकसुरी वाटली. रामायणाची कथा माहिती आहे त्यामुळे सगळं काही वाचत बसले नाही मी. थोडी कमी चित्रं चालली असती, पण १०८ संख्येचं महत्त्व असावं कदाचित. वरच्या दालनात भारतमाता आणि मा अमृतानंदमयी यांच्या प्रतिमेसह इतर काही प्रतिमा आणि मूर्ती आहेत. शेजारीच “सस्टेनेबल लिविंग” या विषयावरचं डिजिटल प्रदर्शन आहे. ते मला काहीच कळलं नाही. दोन दिवसांनी केंद्रातल्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने ते मला सविस्तर दाखवलं. या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे सौरऊर्जेचा वापर. हे चांगलं आहे. तसंच पावसाचं पाणी इमारतीच्या तळघरात साठवण्याची सोय आहे (Rain Water Harvesting). एका अर्थी हा नव्या-जुन्यांचा (धर्म आणि विज्ञान) संगमच म्हणायला हवा. तिथं अर्थातच सौरऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहायला कुणी येत नाही म्हणा.

काही जुने लोक भेटले. गप्पा झाल्या. जुनी नावं. जुन्या आठवणी. वगैरे.

एका सकाळी समुद्रकिनाऱ्यावर गेले. सूर्योदय पाहायला प्रचंड गर्दी होती.

सूर्य उगवला की लोक निघून जातात. बहुधा त्यांचे पुढचे प्रवास ठरलेले असतात. सुरक्षारक्षकही तासाभराची वेळ संपल्यानंतर निघून गेला. मी निवांत बसून राहिले. समुद्राची गाज, सौम्य झुळुक, समोर दिसणारं शिला स्मारक. मग एक नीलपंख (किंवा नीलकंठ)  उडत आला. गिरक्या घेणं आणि फांदीवर किंवा जमिनीवर बसणं - असा त्याचा कार्यक्रम चालू होता. ज्यांनी नीलपंख उडताना पाहिला असेल, त्यांना माझ्या भाग्याचा हेवा वाटेल याची मला खात्री आहे. दोन मोरही आले. इथं अर्थात मोरांचं अभयारण्य आहे, त्यामुळे ते मोठ्या संख्येने दिसतात.

कै. एकनाथजी रानडे यांची समाधी आणि त्यासमोर विवेकानंदांचा आणखी एक पुतळा असंही एक स्मारक बीचजवळ आहे. तिथं फारसं कुणी येत नाही. दोन दिवस सकाळी काही काळ तिथंही निवांत बसून राहिले.

पुढं जाताना

इथं लोक एक तर पर्यटक म्हणून येतात किंवा या ना त्या संदर्भात विवेकानंद केंद्राशी नातं असणारे लोक येतात. मी यापैकी काहीच नव्हते. मी फक्त एके काळच्या माझ्या आयुष्यातल्या खुणांपैकी काय काय शिल्लक आहे ते तपासून पाहणारी एक प्रवासी होते. या खुणा फक्त बाहेरच्या परिसरात नव्हत्या, त्या माझ्या मनातही होत्या. आतल्या आणि बाहेरच्याही अनेक खुणा लोप पावल्या आहेत हे कळताना दु:ख झालं नाही. आपण पुढची वाट चालतो, तेव्हा मागचं नामशेष होणार हे अपेक्षितच असतं.  त्यातूनही जे काही अजून शिल्लक आहे ते सुखावणारं होतं - हेदेखील कालांतराने कधीतरी संपेलच या जाणीवेतही 😊

मी (फार पूर्वी) कन्याकुमारीत असताना ‘विवेकानंद केंद्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारात आहे की नाही’ अशा चर्चा व्हायच्या. विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांचं निधन होऊन तेव्हा जेमतेम दीड वर्ष झालं होतं, त्यामुळे या चर्चा स्वाभाविक होत्या. अगदी “हे आरएसएस आरएसएस तुम्ही जे म्हणताय, ते काय आहे” असं विचारणारे निरागस कार्यकर्तेदेखील आमच्यात होते. (विवेकानंद केंद्रातला माझा एक सहकारी मित्र  परवाच या वाक्याची आठवण काढत होता आणि आम्ही दोघेही आमच्या बावळटपणावर खूप हसलो होतो). “जाणीव” संघटनेची स्थापना आणि काम या प्रक्रियेत असताना आम्ही मित्रांनी समाजातल्या विविध विचारसरणींचा प्राथमिक अभ्यास केला होता, त्यामुळे आरएसएसच्या विचारप्रणालीची मला तोंडओळख होती - इतकंच. पण आज आता हा प्रश्न (विवेकानंद केंद्र आणि संघ) विचारण्याचं कुणालाही कारण पडणार नाही. विवेकानंद केंद्र ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातली संस्था आहे याच्या खुणा जागोजागी दिसतात. ठळकपणे दिसतात.

मी कन्याकुमारीत येण्याइतकंच मी कन्याकुमारीतून परत जाणंही माझ्या आयुष्यात महत्त्वाचं होतं, आहे, राहील. मुक्कामाइतकाच - किंबहुना काहीसा जास्तच - महत्त्वाचा असतो तो प्रवास. तो चालूच आहे. आजही.


(पुढील भाग लवकरच ....)

 

Monday, September 1, 2025

२७६. कन्याकुमारीच्या दिशेने...

(Want to read this post in English? It is available here!) 

खरं तर कन्याकुमारीला जायचा माझा काही बेत नव्हता.

पण वीसेक महिने काम केलेला एक प्रकल्प नुकताच संपला होता. ऑनलाईन काम करण्याचे फायदे खूप जास्त असले तरी सतत संगणकाच्या स्क्रीनवरून लोकांशी बोलण्याचा कंटाळा आला होता. बाहेर कुठंतरी लांबवर भटकायला जाण्याचा मूड होता. तसं तर मला जायचं होतं “स्पिती व्हॅली”त. पण ज्या गटाबरोबर मी जाणार होते, त्यांचा तो कार्यक्रम रद्द झाला. मग म्हटलं “चला, कन्याकुमारीला जाऊयात.” 

कन्याकुमारीला जाणं हे वेळ घेणारं प्रकरण आहे. आता सुदैवाने बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यातून बसने अथवा ट्रेनने मुंबईपर्यंत जायचं, तिथून तिरूवनन्तपुरमपर्यंतचं विमान पकडायचं, तिथून बसने अथवा ट्रेनने किंवा टॅक्सीने कन्याकुमारीला जायचं हा एक पर्याय. दुसरा असाच रस्ता पुणे-चेन्नै-कन्याकुमारी असा आहे. या दोन्ही मार्गांवरून प्रवास केला तर काही तासांचा वेळ वाचतो हे खरं आहे, पण दगदग फार होते. शिवाय वेळ वाचवून मला फारसं काही करायचं नव्हतं. म्हणून मग मी पुणे-कन्याकुमारी असा ट्रेनचा प्रवास निवडला.

काही दशकांपूर्वी जेव्हा मी पुण्याहून कन्याकुमारीला (पहिल्यांदा) गेले होते, तेव्हा १०८१ डाऊन ट्रेनने गेले होते. जनरल डब्यातून. लांब पल्ल्याचा असा माझा तो पहिलाच प्रवास होता. मुंबईहून तेव्हा रात्री साडेआठच्या सुमारास ही गाडी पुणे स्थानकात यायची. तेव्हा ती मुंबई-त्रिवेंद्रम गाडी होती. त्या दोन दिवसांच्या प्रवासातल्या अनेक रोचक आठवणी आहेत. ट्रेनमध्ये काही विक्रेते “पाल, पाल” असं ओरडत होते ते ऐकून मी दचकले होते ते आठवतं. “पाल” म्हणजे “दूध” हे कळल्यावर हुश्श झालं होतं. दोनेक वर्षांची रोझी नामक माझी एक सहप्रवासी होती. तिच्याशी खेळताना मजा आली होती. तिच्या आई-वडिलांनी प्रवासात मला खूप मदत केली होती. तेव्हा त्रिवेंद्रमला उतरून कन्याकुमारीचं तिकिट काढायचं होतं- तर सगळेजण मला “केप”चं तिकिट काढायला सांगत होते. “केप” म्हणजेच कन्याकुमारी हे सामान्यज्ञानही त्यानिमित्ताने झालं होतं. ... अशा अनेक रम्य आठवणी सोबत असल्याने मला पुणे-कन्याकुमारी ट्रेन सोयीची वाटली तर नवल नव्हतं.

आता ही गाडी १६३८१ पुणे- कन्याकुमारी अशी आहे. मुंबईऐवजी गाडी पुण्यातून सुटते आणि साधारणपणे छत्तीस तासांनी कन्याकुमारीला पोचते. आता त्रिवेंद्रमला गाडी बदलावी लागत नाही. या गाडीची मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आणि केरळ अशा पाच राज्यांतून ही जाते. सोलापूर (महाराष्ट्र), वाडी आणि रायचुर (कर्नाटका), गुंटकल, कडप्पा, तिरूपती (आंध्र प्रदेश), सेलम, कोइंबतुर (तामिळनाडू) अशी महत्त्वाची स्थानकं ही गाडी घेते. केरळमध्ये बराच प्रवास करून नागरकोविलला पुन्हा तामिळनाडूत गाडी प्रवेश करते आणि कन्याकुमारीला पोचते. या प्रवासात ही गाडी भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, पलार, वसिष्ठ, कोल्लार अशा अनेक नद्या ओलांडते.



तिकिट काढण्यापूर्वी राहायची व्यवस्था करणं आवश्यक होतं. कन्याकुमारीत जायचं तर विवेकानंदपुरममध्येच राहायला हवं. कन्याकुमारीत जाऊन दुसरीकडं कुठंतरी राहण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. मग विवेकानंदपुरमच्या वेबसाईटवर जाऊन रीतसर माहिती वगैरे भरली. मग असं लक्षात आलं की हल्ली ते एकट्या व्यक्तीला खोली देत नाहीत.

आता जग “सोलो ट्रॅव्हल”च्या युगात आहे, आणि हे लोक एकट्या व्यक्तीला खोली देत नाहीत. The contrast remains strong as ever …. असं वाटलंच. तरीही मी परिसर व्यवस्थापकांना इमेल पाठवली. ओळखी वगैरै सांगायचा (त्यातही मोठ्या लोकांच्या ओळखी सांगायचा) मला प्रचंड कंटाळा येतो. पण मग मी त्या व्यवस्थापकांना  शेवटी  ‘त्यांच्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांशी - पदाधिकाऱ्यांशी - माझी ओळख असल्याचं’ सांगितलं. त्यांनी त्याची खातरजमा केली आणि मग राहण्याची व्यवस्था मार्गी लागली.

कन्याकुमारीला अनेक वेळा गेले असले तरी तिथल्या परिसरात कधी फारशी भटकंती करण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळी त्यासाठी काही वेळ काढायचं ठरवलं. येताना तिरूअनन्तपुरमलाही दोन दिवस जावं असं ठरवलं. त्यानुसार राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.

२३ जुलैला रात्री पुणे स्थानकावर पोचले. तिथं टॅक्सीचालकाला पैसे देण्यासाठी माझं मोबाईल इंटरनेट चालेना (बीएसएनएल, दुसरं काय?) तेव्हा टॅक्सीचालकाने त्याच्या मोबाईल इंटरनेटचा हॉटस्पॉट मला दिला आणि मी पैसे दिले. त्याच्या व्यावसायिकतेचं कौतुक वाटलं.

मेट्रो स्थानक आणि रेल्वे स्थानक यांना जोडणाऱ्या पुलावर काही वेळ निवांत बसून राहिले. गाडीची घोषणा झाल्यावर फलाटावर गेले. गाडी वेळेत लागली.


माझ्या बर्थच्या वरच्या बर्थवर एक गृहस्थ अगदी निगुतीने त्यांच्या झोपण्याची व्यवस्था लावत होते. गाडी सुटायच्या आत ते झोपीही गेले. गाडी सुटल्यावर अर्ध्या तासाने तिकिट तपासनीस आला तेव्हा हे गृहस्थ गाढ झोपेत होते. तिकिट तपासनीसाने त्यांना बऱ्याच हाका मारल्या, हलवलं, तरी ते काही झोपेतून जागे झाले नाहीत.

गाडी सुटायच्या पाच मिनिटं आधी एक बाई माझ्या समोरच्या बर्थवर आल्या. त्यांच्याशी जुजुबी बोलणं झालं. त्या इरोडला उतरणार होत्या. तिकीट तपासनीसाने आमचं कोणाचंच तिकिट पाहिलं नाही, फक्त नाव विचारलं, त्याच्याजवळच्या कागदावर खूण केली, आणि गेला.

अशा रीतीने प्रवासाला सुरूवात झाली.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मला जाग आली. प्रवासात असले, काही नवं करायचं असलं की मला गजराची गरज भासत नाही. खिडकीतून बाहेर मस्त पहात बसले.

(वाडी जंक्शन, कर्नाटका)

                                                                                   (कृष्णा नदी की तुंगभद्रा नदी ?) 

थोड्या वेळाने समोरच्या अम्माही उठल्या. आणि मग सकाळी सहापासून त्यांचे जे व्हिडिओ कॉल्स सुरू झाले ते काही संपता संपेनात. त्याच्यातून थोडी उसंत मिळाली की त्या युट्युबवर काहीबाही ऐकत होत्या. त्यांचा फोन, त्यांचं इंटरनेट, त्यांनी काय ऐकावं यावर मी का मत व्यक्त करतेय असं तुम्हाला वाटत असेल. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल मला काहीच म्हणायचं नाही. पण माझी अडचण अशी होती की त्या इअरफोन-हेडफोन वापरत नव्हत्या. त्यामुळे ते सगळं माझ्या कानांवर सतत आदळत होतं. “बॅग भरताना गडबडीत इअरफोन घरी विसरला वाटतं तुमचा” - असं माझं गंमतीत म्हणून झालं. पण त्याचा अर्थ त्यांना बहुधा कळला नाही. त्यांचं मनोरंजन चालूच होतं. अखेर तासाभराने मी त्यांना “जरा आवाज कमी करता का तुमच्या मोबाईलचा” असं म्हटलं. काही वेळापुरता आवाज थांबला. परत तो चालू झाला. परत मी त्यांना टोकलं. हे चक्र दिवसभर चालू राहिलं. एकंदर सार्वजनिक जागेत वावरताना मोबाईलवर मोठ्या आवाजात काही ऐकू नये हे पथ्य फारच कमी लोक पाळतात हा अनुभव नेहमीचाच. त्यामुळे मी त्याचा त्रास करून घेतला नाही.

मला त्यांना असं पुन्हापुन्हा टोकताना वाईटही वाटत होतं. कारण त्या बाई तशा अगदी साध्या होत्या. गेली चार वर्ष पुण्यात राहताहेत. मराठी, हिंदी येत नाही. इंग्रजी कामापुरतं बोलू शकत होत्या त्या. त्यांच्या माहेरी भाच्याचं जावळं वगैरे काहीतरी होतं, त्यासाठी इरोडला चालल्या होत्या. प्रेमळ होत्या बाई.

मोडक्यातोडक्या आमच्या संवादाला आणखी चांगली भाषांतरकार मिळाली ती सकाळी आठच्या सुमारास. इंग्रजी आणि तामिळ दोन्ही उत्तम बोलणारी आणखी एक स्त्री प्रवासी रायचुरला आमच्यासोबत आल्या. त्या एका खत कंपनीत शेती अधिकारी होत्या. त्यामुळे ग्रामीण भारताविषयीचे - शेतकऱ्यांविषयीचे - त्यांचे अनुभव ऐकण्याजोगे होते. महाराष्ट्रातल्या विदर्भाचीही जबाबदारी त्यांना नुकतीच मिळाली होती. त्या त्यांच्या स्थानकावर बसताना तिथून इडली घेऊन आल्या होत्या. ती इडली खाण्याचा त्यांनी मला आग्रह केला. मग मी त्या दोघींना आणि तोवर वरच्या बर्थवरून उतरून खाली आलेल्या गृहस्थांना (हे त्रिवेंद्रमचे होते, पुण्यात काही कामासाठी आले होते) माझ्यासोबत कॉफी पिण्याचा आग्रह केला. मग पुढं आपापल्या स्थानकावर ते सगळे उतरून जाईपर्यंत एकत्र खाणं आणि कॉफी घेणं चालू राहिलं.

“गैरसोय झाली तरी चालेल, पण भाषिक अस्मिता आम्ही बाळगूच बाळगू” - या संकल्पनेत लोक कसे अडकलेले असतात त्याचा मग दिवसभर अनुभव आला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी येत नाही, आणि या तिघांना हिंदी अजिबात येत नाही - अशी स्थिती. त्यामुळे मला त्यांना मदत करावी लागली. सुरूवातीला मी उत्साहात होते, पण नंतर मात्र मला कंटाळा आला. दोन्ही पार्ट्या अडेलतट्टू आहेत असं माझ्या लक्षात आलं. “टी” म्हणजे “चाय” आणि “दस” म्हणजे “टेन”  इतकंही लोकांना कळत नसेल यावर विश्वास बसणं कठीण होतं. मी नंतर निवांत वाचत बसले. तसंही हे पुस्तक लिहून झाल्यावर मी वाचलं नव्हतंच.


थोडं पल्याड फक्त हिंदी बोलणारं कुटुंब होतं. त्यांचं दीड-दोन वर्षांचं बाळ होतं. हिंदी बोलता न येणारे हे तिघं आणि इंग्रजी बोलता न येणारे ते दोघं यांच्यात काहीही संवाद झाला नाही. मला दोन्ही भाषा बोलता येतात त्यामुळे माझं काही अडलं नाही. मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे. पण समोरच्या व्यक्तीशी बोलता नाही आलं तरी चालेल, पण मी त्यांची भाषा बोलणारच नाही अशा प्रकारचा (एकांगी)  अभिनिवेश आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतो त्याची ही एक झलक लक्षात राहण्याजोगी आहे.

मी त्या संवादात पाचसहा तामिळ शब्द शिकून घेतले. वणक्कम (नमस्कार), नंद्री (आभार-धन्यवाद), तंबी (धाकटा भाऊ), सापाड (खाणं, जेवण), तन्नी (पाणी), चिन्न (छोटं), सरी (ओके), इप्पडी (कसं), नल्ला (सुंदर)  ....... त्या दोघी आपापसात तामिळमध्ये बोलत होत्या तेव्हा असे बरेच शब्द संदर्भाने कळले आणि मी ते त्यांना परत विचारून खात्री करून घेतली. इच्छा असेल तर संवादासाठी कोणतीही भाषा शिकता येते. व्याकरण नाही शिकता येत लगेच, पण मोडकातोडका संवाद नक्कीच साधता येतो.

या प्रवासात आणखी एक प्रयोग केला. रेलरेस्ट्रोमधून जेवण मागवण्याचा. अनुभव चांगला होता. 


वेगवेगळ्या राज्यांतून गाडी जात असताना समोरचं दृष्य बदलत होतं. भारताचं भौगोलिक वैविध्य(ही) अचंबित करणारं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं.

(शक्तिनगर, कर्नाटका) 

(कडप्पा स्थानकाजवळ, आंध्र प्रदेश) 

(नागरकोविलजवळ, तामिळनाडू)

या सगळ्या बाह्य घडामोडींमध्ये मी कन्याकुमारीला जाण्याबद्दल विचार करत होते. मी का चालले आहे तिथं परत? एकदा सोडलेल्या जागांवर परत जायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही हे पथ्य बऱ्यापैकी पाळलं आहे आजवर. एका अर्थी परत भूतकाळाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करत होते का मी?  पण कितीतरी बदल झालेत. मीच किती बदलले आहे. परिस्थितीही बदलली आहे. अगदी या गाडीचा जुना नंबरही बदलला आहे. माझा दृष्टिकोन बदलला आहे. संदर्भ बदलला आहे. कदाचित जुन्या “मी”च्या संदर्भात आज मी कुठं आहे हे मला तपासून पाहायचं आहे का? (त्यासाठी खरं तर हजारो मैल प्रवास करायची काही गरज नसते - हेही मला माहिती आहेच की!)

खूप वर्षांपूर्वी कन्याकुमारीत  मी पहिल्यांदा आले होते, ती माझ्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. त्या घटनेचे तात्कालिक आणि दूरगामी असे अनेक चांगले-वाईट परिणाम झाले. तो प्रवास एका अर्थी आता पूर्ण झालाय. कदाचित तो साजरा करण्यासाठी कन्याकुमारी हे मला एक योग्य ठिकाण वाटलं असेल.

कळेलच काय ते पुढच्या काही दिवसांत - असं म्हणून जास्त विचार न करता मी निवांत बसून राहिले.

त्रिवेद्रमनंतर डबा जवळजवळ रिकामा झाला होता.

गाडी कन्याकुमारीला पोचली.

(कन्याकुमारी रेल्वे स्थानक) 

हे भारतातलं दक्षिणेतलं शेवटचं रेल्वे स्थानक. 

इथं माझ्या एका प्रवासाची सुरूवात झाली होती - हे माझ्यापुरतं महत्त्वाचं. 


(पुढील भाग लवकरच....) 

Tuesday, June 3, 2025

२७५. अनपेक्षित आनंद

(For English readers, this post is here too!) 

त्या दिवशी मला एक जाणवलं की गेली कित्येक वर्ष 'आनंदाचे क्षण'  ही माझ्यासाठी एक पूर्वनियोजित बाब झाली आहे. कामधंदा करत असताना सुट्टी खूप आधी ठरवून घ्यावी लागते. आपण सुट्टीवर जाऊ तेव्हा आलेलं काम कोण करेल हे बरंच आधी ठरवावं लागतं. मग जाण्या-येण्याची तिकिटं, राहायची व्यवस्था, बॅग भरणं, घरातली आवराआवरी... सगळं व्यवस्थित करावं लागतं. अचानक गायबं होऊन जाणं ही शक्यता आता माझ्यासाठी उरलेली नाही. (एके काळी ते मला सहज जमत असे!) गेल्या अनेक वर्षांत हीच माझी जीवनशैली झाली आहे. अर्थात,  अशा पूर्वनियोजित गोष्टींमध्येही काही अनपेक्षित आनंदाचे क्षण मिळत असतात.

त्या संध्याकाळी परिसरातल्या एका संस्थेत एक हिंदी नाटक होतं. फेसबुकवर मी त्याची पोस्ट वाचली. नाटकाचं नाव होतं ‘कोर्ट मार्शल’. मी इंटरनेटवर त्याची माहिती शोधली आणि मला ते नाटक रंजक वाटलं. Indian Express मध्ये या नाटकाविषयी लिहिलं आहे – “कोर्ट मार्शल हे नाटक एका अतिशय आज्ञाधारक सैनिकाबद्दल आहे, जो एका गुन्ह्यात अडकलेला असतो. त्याचं वागणं संपूर्ण रेजिमेंटला हादरवून टाकतं आणि त्याच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी सैन्य कोर्ट मार्शलची कारवाई करते.”

योगायोगाने, त्याच दिवशी सकाळी यामिनीचा फोन आला. तीही त्या परिसरात दुसऱ्या कार्यक्रमासाठी येणार होती. आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता भेटायचं ठरवलं.

मी नाटकाच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा तिथं बरीच गर्दी होती. मी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना नाटक नेमकं कुठं होणार आहे हे विचारलं. कारण तिथे दोन-तीन सभागृहं आहेत, त्यामुळे आधीच विचारलेलं बरं असतं. ते दोन कर्मचारी त्यांच्या मोबाईलमध्ये एका व्हिडिओ पहात होते. माझ्याकडं न पाहताच त्यांनी मला तळमजल्यावरच्या सभागृहाकडं जायची खूण केली. मी त्या सभागृहात जाऊन तिसऱ्या रांगेत बसले. काही तरुण मुली पारंपरिक नृत्याच्या पोशाखात दिसल्या. मी थोडी गोंधळले. पण वाटलं, नाटक सुरू होण्यापूर्वी कदाचित काही छोट्या मुलींच्या नृत्याचा कार्यक्रम असावा.

माझ्या मागे बसलेल्या एका वयस्क बाईंनी मला विचारलं, “तुमच्या मुलीचा किंवा नातीचा पण नाच आहे का? कोणता आहे?तेव्हा लक्षात आलं की मी चुकीच्या सभागृहात बसले आहे!

मी पुन्हा बाहेर आले आणि त्याच कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा नाटकाबद्दल विचारलं. यावेळी त्यांचा व्हिडिओ पाहून झालेला होता, त्यामुळे बहुधा त्यांनी माझा प्रश्न नीट ऐकला. एकजण म्हणाला,  अहो, कालच झालं ते नाटक.!”  दुसरा म्हणाला,थोडं कर्कश होतं ते नाटक, पण चांगलं होतं.” मी संस्थेच्या ज्या पदाधिकारीच्या पोस्ट वाचते, त्यांनी नजरचुकीने फेसबुकवर चुकीची तारीख टाकलेली होती असं लक्षात आलं.

आता माझ्यासमोर चार पर्याय होते: घरी परत जायचं आणि तासाभराने परत यामिनीला भेटायला याच भागात यायचं. ते जरा अवघडच होतं. दुसरा पर्याय म्हणजे यामिनीला न भेटता थेट घरी जाणं. पण मला तिला भेटायचं होतं, बऱ्याच दिवसांत भेटलोच नव्हतो आम्ही. तिसरा पर्याय म्हणजे बाहेर झाडाखाली  ७.३० पर्यंत बसून राहायचं. पण मी सोबत एकही पुस्तक घेऊन आले नव्हते. आणि चौथा पर्याय होता – समोर जो काही कार्यक्रम होत होता, तो बघणं.

चौथा पर्याय जरा गंमतशीर होता. ना आयोजकांपैकी (आणि त्यात सहभागी होणाऱ्यांपैकी) कोणाला मी ओळखत होते, ना मला नृत्यामध्ये फारसं गम्य होतं. ना आमंत्रण, ना ओळखदेख – तरीही मी त्यांच्या कार्यक्रमात आले होते. हॉलमध्ये खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मी शेवटच्या रांगेत बसले, म्हणजे त्यांच्या पाहुण्यांना जागा लागली तर मी कार्यक्रमात व्यत्यय निर्माण न करता तिथून बाहेर पडू शकत होते.

तो कार्यक्रम एका नृत्यशाळेचा होता. भरतनाट्यम शिकवणारी नृत्यशाळा. (नृत्यशाळेचं नाव आणि कार्यक्रमाचे फोटो मी जाणीवपूर्वक इथं देत नाही. कारण ते योग्य ठरणार नाही.) कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या ताई दोन्ही भाषा – मराठी आणि इंग्रजी – सहजतेने बोलक होत्या. त्यांचं सूत्रसंचलन काव्यात्मक होतं, पण पाल्हाळ नव्हतं. सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक नृत्याची त्यांनी थोडक्यात ओळख करून दिली. त्या अभ्यास करून आल्या होत्या हे स्पष्ट जाणवत होतं. खूप दिवसांनी इतकं प्रभावी सूत्रसंचालन ऐकलं. त्या ताईंचं मनापासून कौतुक वाटलं.

भरतनाट्यम ही दक्षिण भारतातील – तमिळनाडू राज्यातील – एक पारंपरिक नृत्यशैली आहे. त्याबाबत काहीही वाचलं नसतानाही कार्यक्रमाच्या सुरूवातीचं संगीत ऐकूनच मला त्याचं तामिळनाडूशी नातं ओळखता आलं. त्या सूरांनी मला चाळीस वर्षांपूर्वीच्या कन्याकुमारीला नेलं. तिथे मी एम.एस. सुब्बुलक्ष्मींची भजनं पहाटे ऐकत असे. त्यासोबत समुद्राचा आवाज, थंड हवा, शांतता, मनात दाटून येणारा आनंद – हे सगळं क्षणात आठवलं. एखादा अनुभव मनाला कुठल्या कुठं घेऊन जातो हे पाहून गंमत वाटली.

विविध वयोगटांतील मुलींनी एकत्र नृत्य सादर केलं. त्यांचं देहबोलीद्वारे भाव व्यक्त करणं, समन्वय, एकत्र हालचाली करताना एकमेकांना समजून घेणं – फार सुरेख होतं. मला त्या गाण्यांचे शब्द समजले नाहीत, पण नृत्य करणाऱ्यांच्या हालचाली आणि चेहरे भाव मला अर्थपूर्ण वाटले. मला त्यांचा थोडासा हेवाही वाटला. कारण मी एक ‘कलाशून्य’ व्यक्ती आहे आणि याची खंत मला अधूनमधून वाटत असते.  😊

हे कलाकार नेहमी स्वतःच्या शरीराशी इतकं एकरूप असतात का? शब्दांशिवाय संवाद शक्य आहे का त्यांच्यासाठी? नृत्य आणि दैनंदिन जीवन यांच्यातला पूल ते कसा बांधतात?

नृत्य करणाऱ्या काही मुली लहान होत्या. तर काही प्रौढ स्त्रिया – त्या नृत्यशिक्षिका होत्या. पण नृत्य सादर होत असताना त्यांचा कुठेही ‘शिक्षिका’ असल्याचा आव नाही. सादरीकरणात सगळ्याचजणी गुंगून गेल्या होत्या. एखाददुसरा अपवाद वगळता सादरीकरण सामूहिक होतं. त्या प्रत्येक नृत्यामागे किती तयारी आणि सराव असेल!

नृत्यं शिव, नटराज, पार्वती, अष्टलक्ष्मी यांच्याशी संबंधित होती. पुष्पांजली, अलारिप्पू, जातिस्वरम्, देवी कीर्तनम् यासारखी नवी नावं ऐकायला मिळाली. राग आणि ताल यांचं थोडक्यात वर्णनही ऐकलं.

साधारण दीड तास मी आनंदाने हे सगळं पाहत होते. तेव्हा मनात वेगवेगळे विचारही आले.

पहिला प्रश्न – मी आपल्या लोककथांपासून कधी दूर गेले? पूर्वी ह्या कथा – जसं की शिव नाचतोय, रामसेतू बांधला जातोय – यांचं आणि म्हणून सण-उत्सवांचंही आकर्षण वाटायचं. पण हल्ली सण-उत्सवांमधला निरागसपणा लोप पावतो आहे. माझ्याभोवती, माझ्या परिसरात, माझ्या जगात आता सण उत्सव म्हणजे निव्वळ कर्मकांड झालं आहे. त्यात भर पडली आहे ती धर्माचा अभिमान या बाबीची. आणि “ते आणि आम्ही” असं सातत्याने कर्कश आवाजात सांगणाऱ्या द्वेषाची. मला ते पचनी पडत नाही.  पण या कार्यक्रमामुळे लोककथा परत एकदा वाचायला हव्यात असं वाटतंय. 

दुसरं असं वाटलं की आनंद वाटायला आपण एखाद्या समूहाचा सदस्य असण्याची, लोक आपल्या ओळखीचे असण्याची काही गरज नाही.  अनोळखी लोकांसोबतही आपण आनंद अनुभवू शकतो. आपल्याला हसायला, बोलायला, आनंदी व्हायला काहीही निमित्त होऊ शकतं.

मला नेहमी असं वाटतं की मी या जगात योगायोगानेच आले आहे – (जशी मी या कार्यक्रमाला आले तशीच). या जगात येताना माझ्या कुणीही ओळखीचं नव्हतं. इथं मी काही मर्यादित काळासाठी असणार आहे, आणि इथून मला काही घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे म्हटलं तर एक प्रकारचं उपरेपण आहे. पण त्याचवेळी असंख्य लोकांशी निर्माण झालेले स्नेहबंध आहेत, जागांच्या रमणीय आठवणी आहेत. हे लोक, या जागा, या आठवणी आता माझाच समृद्ध हिस्सा आहेत. एके काळी अनोळखी असलेली माणसं, जागा ... आज आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत. आज मी जी काही आहे, ती या सर्वांमुळे आहे. उपरेपण आणि आपलेपण हे दोन विरूद्ध प्रवाह माझ्यात एकत्रित रहात आले आहेत. काही आनंद तात्कालिक असतात, काही दीर्घकाळ सोबत राहतात. आनंदी राहावं असे प्रसंग, घटना वारंवार होत राहतात. म्हणून  to be or not to be” या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे  – “be and be not”.

साडेसात झाले. यामिनीला फोन करायची वेळ झाली होती. मी शांतपणे निघाले – कुणालाही न सांगता, निरोप न घेता. कुणाला माझं येणं लक्षात आलं नव्हतं, आणि जाणंही नाही. एकदम परफेक्ट! ती दीड तासांची भेट जणू माझ्या आयुष्याचंच सार वाटलं – एखादा सुंदर क्षण अनुभवायचा, आणि शांतपणे निघून जायचं. प्रत्यक्ष आयुष्यात कधी कधी मीही काहीतरी सादर करते म्हणा – अर्थातच भरतनाट्यम् नक्कीच नाही 😊

आणखी एक. नियोजन महत्त्वाचं आहे. पण काही गोष्टी अशा न ठरवता, अचानक करणंही आनंददायी अनुभव असू शकतो. नवीन शक्यता, नवीन माणसं, नवीन अनुभव यांच्यासाठी आपलं मन खुलं असायला हवं. चुकीच्या हॉलमध्ये जाऊन त्या संध्याकाळी मला निखळ आनंद मिळाला; आणि स्वतःशी संवाद साधण्याची एक संधीही! कोण जाणे पुढच्या क्षणी, पुढच्या वळणावर असा एखादा अनपेक्षित आनंदाचा अनुभव आपल्यासाठीही असेल.    

Sunday, February 2, 2025

२७३. २०२४ मधला एक प्रयोग

(Want to read this post in English? It is available here!) 

तुमचे सगळ्यात आवडते शिक्षक कोणतुमचे सगळ्यात आवडते लेखक कोण? हे प्रश्न मला विनोदी (आणि कधीकधी तर निरर्थक) वाटतात. कारण अशा बाबतीत एक व्यक्ती अगदी शिखरावर आणि दुसरं कुणी त्यांच्या जवळपासही पोहोचू शकत नाही – अशी काही वस्तुस्थिती नसते. एकापेक्षा जास्त शिक्षक आणि लेखक आपल्याला एकाच वेळी आवडू शकतात.  माणसांसोबतच्या, माणसांबाबतच्या आपल्या आठवणींना अनेक संदर्भ असतात. त्यातली कोणती आठवण नेमकी कधी डोकं वर काढेल याबाबत काही आडाखा बांधता येत नाही.

याच धर्तीवर मला मध्यंतरी कुणीतरी २०२४ मधला तुझ्यासाठीचा सर्वात आनंदाचा क्षण कोणता असं विचारलं आणि मी गोंधळून गेले. मला अनेक गोष्टी आठवल्या, पण त्यांची क्रमवारी लावता येणं मला शक्य नव्हतं. म्हणजे मला एखादा सुंदर पक्षी अनपेक्षितपणे दिसला तो आनंद आणि मी अमूक एक नवं कौशल्य आत्मसात केलंय – यामुळे वाटणारा आनंद - यांची वर्गवारी नेमकी कशाच्या आधारे करायची? वर्गवारी केलीच पाहिजे का? एक श्रेष्ठ आणि बाकी सगळे मग कमी प्रतीचे असा अट्टहास केलाच पाहिजे का? अर्थातच हे सगळं काही मी त्या व्यक्तीशी बोलले नाही. काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन मी वेळ मारून नेली.

कामाची वेळ संपली आणि मग कपाटातून मी हे खोकं बाहेर काढलं. 


नाही, नाही,
श्रुजबरी कुकीज खाण्यासाठी नाही (त्या फार पूर्वीच खाऊन झालेल्या आहेत!)  या खोक्यात मागचं वर्षभर मी केलेल्या प्रयोगाची सामग्री होती. आता तिच्याकडं जरा निगुतीने पाहण्याची वेळ आली होती. काय होता हा प्रयोग?

जानेवारी २०२४ च्या सुरूवातीस मी फेसबुकवर एक पोस्ट वाचली होती. दर आठवड्याला – त्या आठवड्यात घडलेल्या - एखाद्या चांगल्या गोष्टीची नोंद एका कागदावर करायची. ते कागद दर आठवड्याला एका बरणीत टाकायचे. वर्ष संपताना ही बरणी उघडून वर्षभरात आपल्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक नोंदींचा एकत्र आस्वाद घ्यायचा – असा हा काहीसा उपक्रम.



मला उत्सुकता वाटली. प्रयोग करून पाहावा वाटला. बरणीऐवजी खोकं हा किरकोळ बदल केला. आणि सकारात्मक गोष्ट ही बाब मला जरा मोघम वाटली. म्हणून मी त्यातही थोडासा बदल केला – या आठवड्यात मला कशामुळे छान वाटलं, कशामुळे आनंद झाला – अशा नोंदी ठेवायला मी सुरूवात केली. मोबाईलमध्ये रिमाइंडर लावल्यामुळे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मला तो Weekly Positive Note लिहायची आठवण करून देऊ लागला.

प्रत्येक वेळी त्या आठवड्यातल्या आनंदाची नोंद रविवारी संध्याकाळीच लिहिली असं काही घडलं नाही. कधीकधी दोन-तीन दिवस उशीरही झाला. खोकं उघडल्यावर वर्षभरातल्या ५२ पैकी ५१ आठवड्यांच्या नोंदी मला त्यात मिळाल्या. एक आठवडा कधीतरी राहून गेला असणार, किंवा चिठ्ठी कदाचित खोक्याबाहेर – कपाटात कुठंतरी – पडली असणार.

काय आहेत या नोंदी? भव्यदिव्य काहीच नाही. एरवी आठवणारही नाहीत अशा अगदी छोट्या घटना आणि प्रसंग आहेत. वर्षभराचा आढावा घेताना यातल्या कदाचित दोन-तीन गोष्टीच मला आठवल्या असत्या. उरलेल्या ४७-४८ प्रसंगांमध्येही मला आनंद मिळाला होता हे मी विसरून गेले असते. ४७-४८ नोंदीही आठवड्याला एक धरून निवडक लिहिलेल्या. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा मला आनंद वाटला असणार याची मला पूर्ण खातरी आहे.


काय दाखवतात या नोंदी
? माणसांच्या भेटींचा आनंद आहे. त्यांच्या यशाचा आनंद आहे. अनपेक्षितपणे एक अतिशय सुंदर पक्षी दिसला, तो आनंद आहे. पाऊस पडतोय मस्त – त्याचा आनंद आहे. रविवारी सकाळी सुखद गारव्यात मोकळ्या रस्त्यावर चालण्याचा आनंद आहे.

शहरातल्या शहरातच काही भागांमध्ये (कोंढवा, रामवाडी...) मी पहिल्यांदाच गेले, त्याचा आनंद आहे. मेट्रोने प्रवास करताना दिसलेल्या डेरेदार वृक्षांमुळे झालेला आनंद आहे. पुस्तक खरेदीचा आनंद आहे. वर्षात जितकी पुस्तकं वाचायची ठरवली होती, त्यातली बरीचशी वाचून झाली त्याचा आनंद आहे. काही लिहिण्याचा आनंद आहे.

काही आनंद कामातले सुद्धा आहेत. ज्यात आनंद वाटेल तेच काम करायचं हा मार्ग नेहमी वापरला आहे. पण त्यातले सूक्ष्म बारकावेही कसा आनंद देतात ते मागे वळून पाहताना आजही छान वाटलं. ग्रामीण भागातल्या लोकांशी एलबीजीटीक्यू या विषयावर सहजपणे संवाद साधता आला – हे कौशल्य आता आपल्यात आलं आहे – याचा आनंद आहे. एक ट्रेनिंग मॅन्युअल लिहून पूर्ण झालं, त्याचा आनंद आहे. एका प्रशिक्षणात फार प्रभावी रीतिने लोकांनी चर्चेत सहभाग घेतला, त्याचा आनंद आहे. नवी भाषा शिकता आली, त्या भाषेतला सिनेमा पाहताना आता सबटायटल्सची गरज कमी लागते - याचाही आनंद आहे. 

पुणे वेधशाळेला भेट देणं असो की राज्यघटनेवरच्या एका कार्यशाळेतला सहभाग असो – या दोन्ही गोष्टी नव्याने (पहिल्यांदाच) केल्या त्याचा आनंद आहे. पुण्यातल्या यशदा संस्थेच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी वाद्यसंगीत ऐकल्याचा आनंद आहे. पॅनकेक बऱ्याच वर्षांनी खाल्ला, याचाही आनंद आहे 😊

२०२४ मध्ये मला एक अपघात झाला आणि त्यामुळे एक शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे या वर्षातले माझे बरेच आनंदाचे क्षण हे माझ्या वैद्यकीय प्रगतीशी निगडित आहेत. आता आपलं आपण उठता यायला लागलं, आता हात उचलता यायला लागला, आता उजव्या हाताने खाणं जमायला लागलं, लॅपटॉपवर टायपिंग करता यायला लागलं .... तीन-चार महिने या आणि अशाच नोंदींचे आहेत.

काही नोंदी कृतज्ञतेच्या आहेत. माणसांबद्दलची कृतज्ञता. आयुष्याबद्दलची कृतज्ञता. काही गोष्टी सहजपणे सोडून देता आल्या त्याचाही आनंद आहे.

आनंद, समाधान हे काही फक्त मोठ्या गोष्टींत असत नाही – हे ऐकून, वाचून आणि खरं तर अनुभवानेही माहिती होतंच. पण वर्षभर नोंदी ठेवण्याच्या या प्रक्रियेमुळे हे शहाणपण अधोरेखित झालं.

म्हणजे वर्षभरात काही त्रासदायक, वेदनादायी वगैरे घडलंच नाही असं नाही. निसर्गनियमाप्रमाणे त्याही घटना घडल्याच. पण आज या सगळ्या आनंदी नोंदींकडे पाहतानाही मला पुन्हा एकदा मजा आली. बेरीज-वजाबाकी केली तर या आनंदाच्या गोष्टी टिकल्या, रूजल्या असं म्हणता येईल.

एरवीही या अशा असंख्य सकारात्मक गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आल्या असणारच आहेत. पण त्याकडं कधी एवढं लक्ष देऊन पाहिलं नव्हतं. आता अजून नेटाने पहात गेलं तर त्यातले अनेक बारकावे समोर येतील.

हा प्रयोग २०२५ मध्येही चालू ठेवायचा विचार तरी आहे. 😊

 

Monday, June 17, 2024

२७०. बावळटपणा? की .....?

 (नोंद: मूळ पोस्ट फेसबुकवर प्रकााशित केली होती. तिचा जीव तेवढाच आहे खरं तर. नोंद रहावी म्हणून इथंही प्रकाशित करते आहे.)

१९८४मध्ये पहिल्यांदा मुंबईत राहायला गेले तेव्हा अनेकांनी (त्यात मुंबईत जन्मलेले-वाढलेले-बरीच वर्ष राहिलेले लोकही होते) सांगितलं की, 'मुंबई शहरात सगळे लोक आपापल्या गडबडीत असतात, इतरांकडं पाहायला त्यांना वेळ नसतो.' थोडक्यात काय तर माणुसकी, संवाद वगैरेची अपेक्षा करू नकोस.
पहिल्या दिवशी लोकलच्या गर्दीत अनेकींनी 'कुठं उतरणार' असं मला विचारलं, डब्यातल्या इतर अनेक स्त्रियांनाही विचारलं. तेव्हा मी मुंबईतल्या माणुसकीच्या दर्शनाने भारावून गेले होते. काही दिवसांनी कळलं की 'बसण्याची जागा पक्की होतेय का आणि कोणत्या स्थानकात' हे तपासून पाहण्यासाठी हा प्रश्न असतो. अगदी व्यावहारिक, त्यात भावना वगैरे काही नसते.
(मुंबईतल्या माणुसकीचे, संवादाचेही पुष्कळ सारे अनुभव यथावकाश मिळाले, तो विषय वेगळा आहे.)
मोडलेल्या हातासाठी फिजिओथेरपीचे उपचार करून घेण्यासाठी गेले दीड महिना एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये जातेय. तिथं रांगेत उभं राहून, आपला रजिस्टर्ड नंबर सांगून, कोणत्या डॉक्टरांकडं जायचंय ते सांगितलं की पास मिळतो. तो दाखवल्यावरच आत प्रवेश मिळतो.
तर पास देणाऱ्या ताईंनी 'एकट्याच आहात का?' असं विचारलं तेव्हा इथल्या लोकांमध्ये माणुसकी आहे, रूग्णांची फार काळजी घेतात हे लोक - असं वाटून मी खूष झाले होते.
इथंही दोन दिवसांनी कळलं की 'एकट्याच आहात का?' या प्रश्नाचा अर्थ 'तुम्हाला एक पास हवा आहे की दोन हवे आहेत' असा एवढाच असतो.
वर्ष कितीही उलटली तरी माझा बावळटपणा काही कमी होत नाहीये हेच खरं ....😉

किंवा निरागसता कायम ठेवण्यात मी यशस्वी झालेय असंही म्हणता येईल 🤣


Friday, January 12, 2024

२६८. कातरवेळी ...

झोपेतून जागी झाले आणि क्षणभर ही सकाळ आहे की संध्याकाळ आहे या संभ्रमात पडले. कधी कधी तर मैं कहा हूं असं फिल्मी थाटात स्वत:ला विचारण्याची वेळ येते. हल्ली प्रवास कमी झालाय, त्यामुळे तो फिल्मी संभ्रमदेखील कमी झालाय. पण ते असो. सांगत होते ते कातरवेळी जाग आल्यावर येणाऱ्या अनुभवाबाबत. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव येत असणार याची मला कल्पना आहे. त्यामुळे काळजी न वाटता हसू येईल याचीही कल्पना आहे. 😊

संध्याकाळी झोपणं अशुभ आहे असं काही लोक मानतात. शुभ-अशुभावर माझा विश्वास नसला तरी संध्याकाळी झोपले, तर उठते तेव्हा प्रत्येकवेळी मला उदास, खिन्न वाटतं हा अनुभव आहे. त्यामुळे कितीही दमले तरी संध्याकाळी पाचनंतर (किमान रात्री दहापर्यंत तरी) झोपायचं मी टाळते. पण त्यादिवशी खूप दमणूक झाली होती, बरेच दिवस वर्क फ्रॉम होममुळे झोप पुरेशी झाली नव्हती. त्यामुळे कितीही अनुभव गाठीशी असला तरी त्यादिवशी मी संध्याकाळी पाच वाजता झोपलेच.

पाऊण तासाने उठले. गजर लावला होता, नाहीतर मी थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले असते. तर मग अपेक्षेप्रमाणे अतिशय उदास वाटायला लागलं. काही सुचेना. काही हालचाल करावी वाटेना. अगदी परत झोपावं असंही वाटेना. म्हटलं चला, कुणालातरी फोन करू. फोनवर गप्पा मारून बरं वाटेल. कुणाला बरं फोन करावा असा विचार करायला लागले.

तसे माझ्या संपर्कयादीत (म्हणजे कॉन्टक्ट लिस्टमध्ये) चारेकशे लोक आहेत. त्यातले काही नंबर विविध सेवांच्या कस्टमर केअरचे आहेत, म्हणजे ते अशा अनौपचारिक संवादासाठी बाद. काही अन्य सेवांचे आहेत – जसे की फार्मसी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वाहन दुरूस्ती वगैरे. त्यांचाही उपयोग नाही. काही नंबर कामाच्या ठिकाणचे आहेत. माझ्या कामाच्या ठिकाणचे लोक दुसऱ्या देशांत आहेत, त्यामुळे सहज म्हणून फोन होत नाहीत. वेळ ठरवून ते करावे लागतात. त्यांच्याशी होणाऱ्या अनौपचारिक संवादातही मुख्य भर फोनऐवजी चॅटिंगवर असतो. काही नंबर मी पूर्वी ज्या लोकांसोबत काम केलं, त्यांचे आहेत. ते कधीतरी कामासाठी अजूनही फोन करतात, त्यामुळे ते अद्याप काढून टाकलेले नाहीत. फक्त फॉरवर्ड पाठवणाऱ्या लोकांचे (आणि अनेक व्हॉट्सऍप गटांचे) नंबर archive करण्याची युक्ती मला अलिकडेच समजली आहे. त्यामुळे माझी अजिबात चौकशी न करता फक्त स्वत:चे लेख, फोटो, वर्तमानपत्रांची कात्रणं वगैरे पाठवणारे सध्या तिकडं आहेत. या लोकांचे आणि माझे काही कॉमन ग्रुप्स असल्याने यांना यादीतून काढून टाकणं जरा अवघड असतं.

काही नंबर अशा लोकांचे आहेत, की जे मरण पावले आहेत. आता तो नंबर ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये, हे माहिती असूनही त्यांचे नंबर मात्र काढून टाकावेसे वाटले नाहीत, तसा विचारसुद्धा कधी केला नाही. पण या लोकांना काही फोन करता येत नाही.

काही लोकांशी वर्षानुवर्ष काहीही संवाद नाहीये. १ जानेवारीला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीला लक्ष लक्ष दिव्यांची…” छापाचे फॉरवर्डेड मेसेजेस ते मला पाठवतात, यापल्याड आमच्यात काहीही संवाद नाही. काही लोक मला फक्त व्हॉट्सऍप फॉरवर्ड पाठवतात, व्यक्तिगत संवाद साधण्यात त्यांना काही रस नसतो. मग बहुतेक अशा वेळी मी त्यातले दोन-चार नंबर डिलीट करून टाकते. तो या कातरवेळच्या उदासीनतेचा एक फायदा.

या गाळणीतून काही ठरलेली नावं मागे राहतात. हे लोक अनेक वर्ष माझ्या संपर्कात आहेत ही जमेची बाजू. यातल्या सर्वांची वर्ष दोन वर्षांतून एकदा तरी निवांत भेट होते, गप्पागोष्टी होतात. त्यांच्या घरी माझं जाणं आहे. मी फार कमी लोकांना घरी बोलावते, मात्र हे लोक कधीही माझ्या घरी येऊ शकतात, येतातही. त्यांच्या घरातली माणसं मला ओळखतात. मला काही अडचण आली तर यातले अनेक लोक धावत येतात, मदत करतात. वेळी-अवेळी, पूर्वनियोजित नसलेला फोन करण्यासाठी खरं तर एवढं पुरेसं आहे.

पण त्यातल्या कुणालाही मी लगेच फोन करायला तयार होत नाही. काहीजण काही मिनिटांनंतर त्यांच्या आध्यात्मिक गुरूविषयी बोलायला लागतात. हे मला ओळखतात का खरंच -असा प्रश्न पडावा इतकं ते अध्यात्मिक बोलतात. यातले काहीजण फक्त तक्रार करतात. कुणाबद्दल तक्रार हे महत्त्वाचं नाही, फक्त तक्रार करतात. मला या तक्रारखोर लोकांबाबत नेहमी एक प्रश्न पडतो. ज्या लोकांबाबत हे तक्रार करताहेत, त्यांच्याशी तर यांचे चांगले संबंध आहेत, ते एकंदर एकमेकांच्या सहवासात सुखी दिसतात. मग माझ्याकडेच तक्रार का? आणि दुसरं म्हणजे मी फोन केलाय. तरीही माझी जुजबी चौकशी करून मग हे लगेच आपल्या तक्रारीच्या विषयाकडं वळतात. सुखाच्या काही गोष्टी सांगायला यांना जमतच नाही. मी फक्त उदास वाटल्यावर नाही, तर चांगलं घडल्यावरही या लोकांना फोन करत असे. हल्ली मात्र मी टाळते.

काहीजणांना फक्त गॉसिप करण्यात आणि नकारात्मक बातम्या पसरवण्यात रस असतो – तेही नको वाटतं. क्ष या व्यक्तीचं माझ्याबद्दल किंवा माझं क्ष या व्यक्तीबद्दल काहीही मत असलं तरी त्याने माझ्या किंवा क्षच्या जगण्यात काय फरक पडतो? काहीच नाही. मग असू द्यावं ज्यांचं मत त्यांच्यापाशी. काहीजण लगेच खूप काळजी करत भरमसाठ सल्ले द्यायला लागतात. कुणी जेवणाखाणाचा उपदेश करायला लागतं. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. एरवी मी त्या प्रत्येकाच्या वैशिष्ट्याचा, वेगळेपणाचा आनंद घेते. त्यांच्या व्यक्तिमत्वासकट ते माझे मैत्रीण-मित्र असतात, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे याबद्दल मी कृतज्ञही असते. पण यावेळी मात्र फोन करायला नको वाटतं.

काहीजण त्यांच्या व्यापात खोलवर बुडालेले आहेत हे माहिती असतं. मग त्यांना असा अवेळी फोन केला जात नाही. काहीजण ऑफिसच्या कामात किंवा परतीच्या प्रवासात असतील म्हणून फोन करायला नको वाटतो.

असं मी एकेक नाव पहात जाते. पुढं जाते. फोन कुणालाच करत नाही. आपल्या उदासीनतेला काही कारण नाही, ती आपोआप नाहीशी होईल हे मला माहिती आहे. बोलण्यासारखं आपल्याकडं काही नाहीये हेही मला कळतं. आणि या क्षणी कुणाचं काही ऐकत बसण्याइतका उत्साह मला नाहीये, हेही मला माहिती आहे. खरं सांगायचं तर त्या निरर्थक, पोकळ वाटणाऱ्या त्या क्षणांमध्ये एक अद्भूत असं काहीतरी असतं. त्याच्या मोहात मी त्या क्षणी असते, त्यामुळे माणसांची सोबत नकोशी वाटते.

शेवटचा नंबर नजरेखालून गेल्यावर मी स्वत:शीच हसते. उरतो तो फक्त आपलाच नंबर. आपणच आपल्याशी संवाद साधणं, राखणं महत्त्वाचं असतं याची आठवण करून देणारा तो आपलाच नंबर.

मग O Mister Tambourine manलावते.

किंवा हृदयसूत्र ऐकते.

किंवा मग आमि शुनेछि शेदिन तुमि हे बंगाली गीत ऐकते.

उन्हाळ्याचे दिवस असतील तर कपाटातली दुर्बिण काढते. गॅलरीतून दिसणारे पक्षी पाहते. पावसाळा असेल तर पाऊस पहात बसते.

कुठल्यातरी पुस्तकातलं एखादं वाक्य आठवून संग्रहातलं ते पुस्तक शोधते. एखादी कविता, गाणं गुणगुणत बसते.

डोळे मिटून निवांत श्वासाकडे बघत बसते. झोपाळ्याच्या हालचालीसोबत वाजणाऱ्या छोट्या घंटेच्या किणकिणाटाच्या नादाने स्तब्ध होऊन जाते.

मग कधीतरी विनाकारण आलेली खिन्नता विनासायास निघून जाते.

रिकामपणाचा तो एक क्षण मात्र सोबत राहतो. बाहेर कितीही गर्दी असली तरी तो क्षण सोबत राहतो. तो वेदनादायी वगैरे अजिबात नसतो, फक्त वेगळा असतो. क्वचित कातडी सोलून काढणारा असतो आणि तरीही वेदनादायी नसतो. अधुनमधून असा क्षण अनुभवता येणं ही एक चैनच आहे एका अर्थी. ती वाट्याला येईल तेव्हा मी ती करून घेते.

मग कुणाचातरी फोन येतो. गप्पा सुरू होतात.

आत्ताच मला हे असं वाटतं होतं - वगैरे इतकं सगळं काही मी त्या मैत्रिणीला-मित्राला सांगत बसत नाही. आपल्याला फोन आला की आपण ऐकायचं हे सूत्र उभयपक्षी लाभदायक असतं हे मला अनुभवाने माहिती आहे.

मी कन्याकुमारी स्थानकातून पहाटे पाच वाजता सुटणाऱ्या रेल्वेने प्रवासाला निघाले आहे असं स्वप्नं मला अनेक वर्ष पडायचं. कन्याकुमारी कायमचं सोडण्याचा तो क्षण मी स्वप्नांमध्ये अनंत वेळा पुन्हापुन्हा अनुभवला होता. एकदा कधीतरी मी त्याबद्दल लिहिलं आणि मग मला कधीच ते स्वप्न पडलं नाही.

मला आत्ता भीती वाटतेय की रिकामपणाच्या, निरर्थकतेच्या अनुभवाबद्दल मी लिहिते आहे, तर कदाचित ते क्षण मला परत कधाही अनुभवता येणार नाहीत. लिहिणं हे भूतकाळाचं ओझं कमी करण्याचा माझ्यासाठी तरी एक रामबाण उपाय आहे.

बघू, आगे आगे क्या होता हैं 😊