वारी. पंढरीची वारी. आषाढी वारी. मराठी माणसाच्या भावविश्वातला एक महत्त्वाचा उत्सव.
पण ‘भक्ती’ – म्हणजे ईश्वरावर, कोणा गुरूवर भक्ती - हा माझा प्रांत नाही. (‘भक्तीहीनता’ या माझ्या एका जुन्या पोस्टमध्ये मी याबाबत सविस्तर लिहिलं आहे, तेच पुन्हा लिहित नाही.) मी एखाद्या भागात कामासाठी अथवा फिरायला गेले तर देवळात जाते. तिथं चार लोक हात जोडतात म्हणून मीही जोडते. पंढरपूरलाही एक-दोनदा जाऊन आले आहे. विठ्ठलाशी संतांच्या नात्यांच्या अभिव्यक्त झालेल्या लोककथा विलक्षण आहेत. मला वाटतं मला देवापेक्षा जास्त पाहायला आवडतं ते देवाचं आणि त्याच्या भक्तांचं नातं. जोवर त्यात शोषण नाही, तोवर मला त्याचा काही त्रास होत नाही.
कदाचित यामुळेच असेल पण पुण्यात अनेक वर्ष राहूनही मी कधी वारीत सहभागी झाले नव्हते. माझ्या तीन मैत्रिणी वारीत जाऊन आल्या. त्यांचे अनुभव ऐकूनही मला काही वारीत जाण्याची प्रेरणा मिळाली नाही. इतकं चालणं जमेल का (साधारणपणे साडेचारशे किलोमीटर) असा एक प्रश्न नेहमीच असायचा. चालणं एकवेळ जमेल, पण दिवसभर अभंग आणि हरिपाठ वगैरे जमणार नाही याची मला खातरी होती.
२०२२-२३ मध्ये राहुल गांधी (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत मी पंचेचाळीस दिवस चालले. (त्याबद्दल मी फेसबुकवर लिहिलं आहे, ब्लॉगवर मात्र अद्याप काही लिहिलेलं नाही.) त्यामुळे चालण्याच्या माझ्या क्षमतेबद्दल मला जबरदस्त आत्मविश्वास आला. दर दिवशी दहा तरी अनोळखी माणसांशी बोलायचं असं मी ठरवलं होतं आणि ते करताना मला फार चांगला अनुभव आला. चालण्याची तशीही मला आवड आहेच. चालताना नेहमीचं जग वेगळं दिसतं हेही आजवरच्या चालण्यातून ध्यानात आलं होतं. एरवी आपल्या जगात (म्हणजे आपल्या आसपास) नसणाऱ्या माणसांशी बोलायची एक उत्तम संधी चालताना मिळते. आणि म्हणून यावर्षी वारीच्या बातम्या जेव्हा प्रसारमाध्यमांत यायला लागल्या, तेव्हा ‘आपण वारीत जाऊन बघूया’ असा एक विचार डोक्यात आला. पंधरा दिवसांसाठी त्यात एकदम उडी मारण्याऐवजी एखादा दिवस जाऊन बघूयात असा विचार केला.
तेवढ्यात माहिती मिळाली की पुण्यातल्या प्रागतिक विचारांच्या संस्था संघटना ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमाचे आयोजन करतात. (उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे.) तुकोबारायांच्या पालखीत एक दिवस चालणे – असा हा उपक्रम. हे चालणं नुसतं नाही तर ‘संविधान समता दिंडी’मध्ये सामील होऊन चालायचं असा हा उपक्रम. या दिंडीचं हे पाचवं वर्ष होतं.
राज्यघटना आणि वारी, राज्यघटना आणि संतांची शिकवण यांचा एकमेकांशी संबंध जोडणं याविषयी मला कुतूहल वाटलं. रविवारी, १८ जून रोजी गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर असे दहा किलोमीटर चालायचं होतं. मी नाव नोंदवलं.
भारतीय राज्यघटना लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार करते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घटनेला अपेक्षित आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय विकास करण्याची सर्व नागरिकांना समान संधी असावी असं राज्यघटना सांगते.
माझा काही संत साहित्याचा गाढा अभ्यास नाही. परंतु संताच्या शिकवणुकीतून त्यांनीही सामाजिक न्यायावर आणि समतेवर भर दिल्याचं स्पष्ट दिसतं. देव आणि माणूस यांच्या नातेसंबंधातल्या पुरोहितांच्या दलालीला आव्हान देण्याचं काम संतानी केलं आहे (जरी पंढरपूरच्या विठठल मंदिरात आजही बडव्यांचं प्रस्थ असलं तरीही). ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या फेसबुक पेजवर मग मला संत साहित्य आणि राज्यघटनेतील कलमे यांच्यातलं साम्य सांगणारी माहिती वाचायला मिळाली. वारीत एकूण ४५ वेगवेगळ्या संतांच्या पालख्या असतात, पालखीचा समावेश वारीत १८६५ मध्ये नारायणबाबांनी (संत तुकाराम यांचा धाकटा मुलगा) केली, दिंडी आणि वारी, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे हे ३३८वे वर्ष आहे, वारी एकूण २२ दिवस चालते, दिंड्यांची संख्या .... अशी माहिती मी वाचत राहिले.
१८ जूनला सकाळी साडेसहाला आम्ही पुण्यातून निघालो. मुंबई, ठाणे, पनवेल, खोपोली, सातारा, नाशिक, नागपूर ... अशा विविध ठिकांणाहून आलेले आणि विविध वयोगटातले सुमारे पावणेदोनशे लोक आले होते. तरूणांची संख्या लक्षणीय होती. गवळ्याची उंडवडी इथं बसमधून उतरून आम्ही २६१ क्रमांकाच्या दिंडीत सामील झालो.
वारीची चालण्याची स्वत:ची गती असते, नव्या माणसाला ती लय पकडायला जरासा वेळ लागतो. वारकरी त्यांच्या त्यांच्या दिंडीत स्वयंशिस्तीने चालले होते. आमच्यासारखे नवखे लोक कोणत्याही दिंडीत सामील होत होते, पण त्याला कुणीही आक्षेप घेतला नाही. वारकऱ्यांच्या प्रथेप्रमाणे सगळेजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणत होते. ‘हे शेरातले नाजूक मावली लई आलेत आज, चालाया जमना त्यास्नी नी आपल्यालाबी पुडं जाऊदीनात’ अशी एक प्रेमळ तक्रार मला मागून ऐकून आल्यावर मी हसून बाजूला झाले. पण एवढ्या गर्दीत आणि इतक्या कमी पोलिसांच्या उपस्थितीत कुठंही धक्काबुक्की वगैरे नव्हती.
प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर्स जागोजागी ठेवले होते. वारी मार्गावर पालखीच्या मागून सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक गट दिसला – त्यामुळे वारी मार्गावर फारसा कचरा दिसत नव्हता. अनेक लोक नाश्ता-चहा-फळं-पाणी मोफत वाटत होते. मार्गावर अनेक ठिकाणी सरकारी वैद्यकीय पथकं (रुग्णवाहिकेसह) उपस्थित होती आणि वारकरी त्या सेवेचा लाभही घेताना दिसत होते. फिरत्या शौचालयांची व्यवस्था असल्याचं मी वाचलं होतं, पण वाटेत मला ती कुठं दिसली नाहीत. ती कदाचित फक्त वारीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी असतील – पण मधल्या मार्गावरही खरं तर शौचालयाची व्यवस्था पाहिजेच.
निदान मला तरी पायात चप्पल नसलेला वारकरी (पुरूष-स्त्रिया) दिसला नाही. स्त्रियांनी टोप्या आणि उन्हापासून रक्षणासाठी सनकोट घातलेले दिसले. अनेक स्त्रिया त्यांचं सामान डोक्यावर घेऊन चालताना दिसल्या. शेतकरी-कष्टकरी वर्गातून वारकरी येत असल्याने कुपोषित म्हणता येईल इतक्या तोळामासा प्रकृतीचे काही लोक दिसले. नवा महामार्ग तयार करताना झाडं तोडून टाकल्याने आता हा पालखी मार्ग म्हणजे नुसता रखरखीत आणि वैराण प्रदेश झाला आहे. दुपारच्या विश्रांतीच्या वेळात ऐन उन्हात वारकरी डांबरी रस्त्यावर झोपले होते – ते पाहून वाईट वाटलं.
कोणताही धार्मिक उत्सव हा एक बाजारदेखील असतो. वारीच्या बाजूला रस्त्यावर असंख्य दुकानं होती – चपला, कपडे, कुल्फी, सोडा वॉटर, पाणी, गोडीशेव-रेवडी-फरसाण असा कोरडा खाऊ, प्लास्टिकची खेळणी, मोबाईल दुरुस्ती, अगदी मोबाईलचा गोरिला ग्लासही तिथं विकायला होते, आणि वारकरी तिथं जाऊन खरेदीही करत होते. अनेक वारकऱ्यांच्या हातात साधे मोबाईल (स्मार्ट नसलेले) दिसले.
दिंडीतल्या अनेकांशी बोलणं झालं. ७४ वर्षांचे एक आजोबा गेली चाळीस वर्ष नियमित वारीत जातात. नियमित वारी करणाऱ्या अनेक स्त्रियांशीही थोडंस बोलता आलं. काहीजणी अनेक वर्ष वारीत येत आहेत. ‘इठ्ठलाचं नाव घेत चलायचं, बाकी काई नाई बगा’ असं त्यांचं भक्तीचं सूत्र त्यांनी मला सांगितलं. सविस्तर बोलायचं तर जास्त वेळ वारीत सामील व्हायला पाहिजे हे जाणवलं.
वारकऱ्यांची एवढी मोठी संख्या असून कुठंही स्पीकर्सच्या भिंती नव्हत्या हे फार छान वाटलं. टाळ-मृदुंगाच्या साथीने प्रत्येक दिंडीत हरिपाठ-अभंग असं काहीतरी चालू होतं. एकजण पुढं सांगणार आणि उर्वरित दिंडी त्याच्यापाठीमागे गाणार असं त्याचं स्वरूप होतं. तालासुरात पक्के होते वारकरी. फक्त एकाच दिंडीत स्त्रिया गाताहेत आणि बाकी दिंडी त्यांच्यामागे गातेय असं दिसलं – बाकी सर्वत्र मुख्य गायकाचा मान पुरूषांनाच होता. तुळशीवृंदावन फक्त स्त्रियांच्या डोक्यावर दिसलं आणि वीणा फक्त पुरूषांच्या गळ्यात दिसली. स्त्रियांच्या डोक्यावर विठ्ठलाच्या मूर्ती, कलश हेही दिसले. टाळ-मृदुंग वाजवणारेही फक्त पुरूष होते. पताका (भगवा ध्वज) मला फक्त एका स्त्रीच्या हातात दिसला. पण अर्थात दहा किलोमीटर वारीबरोबर चालताना मला सगळंच दिसलं असा माझा दावा नाही – मी फक्त मला काय दिसंल ते नोंदवते आहे. स्त्रियांच्या आणि पुरूषांच्या संख्येत मात्र फारसा फरक दिसला नाही.
बुऱ्हाणपूरला आम्ही पालखीसोबत चालणं थांबवून भैरोबानाथ मंदिरात आलो. मंदिराच्या अंगणात प्राथमिक शाळा आहे, तिथं आमच्या जेवणाची व्यवस्था होती. वाटेत आमचा एक सहकारी मंदिराची दिशा विचारता झाला तर ते गृहस्थ आम्हाला त्यांच्याकडं जेवणाचा आग्रह करायला लागले. “माऊली, आपल्याकडंही आहे भाजी-भाकरी, कशाला उन्हात तिथंवर जाताय” हा त्यांचा आग्रह ऐकून मला तर त्यांच्याकडं जेवायचा मोह झाला होता. पण गटातल्या इतरांना चिंता नको म्हणून त्यांना नम्रपणे नकार देत मीही मंदिराकडं गेले.
पिठलं-भाकरी-ठेचा-भात-आमटी-बुंदी असं आग्रहाने वाढलेलं जेवण झाल्यानंतर सुस्ती येऊ लागली होती. पण तरूण कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण गीतांनी सगळ्यांना जागं केलं. ज्ञानेश्वर बंडगर महाराज, वर्षा देशपांडे. शामसुंदर सोन्नर महाराज, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील या सर्वांनी समता दिंडीमागची भूमिका, आणि तिची वाटचाल याविषयी आम्हाला सांगितलं.
‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ उपक्रमाचं आयोजन अतिशय नेटकं होतं. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आम्हा लोकांना कुठंही अडचण आली नाही. नेमक्या सूचना आणि चांगलं नियोजन या दोन्ही गोष्टींमुळेच हे शक्य झालं. या उपक्रमामागे अनेक कार्यकर्त्यांनी श्रम घेतले आहेत, त्या सर्वांचे आभार.
एक दिवसाचा वारीचा माझा अनुभव अतिशय चांगला होता. पण ....
पण तरीही अनेक प्रश्न पडले. वारीचं आता एखाद्या व्हॉट्सऍप ग्रुपसारखं झालंय. एका विशिष्ट उद्देशाने आपण ग्रुप करतो. पण त्या ग्रुपवर मोदींची अमेरिका वारी, पाऊस कसा मोजायचा, पुल देशपांडे यांचे व्हिडिओ, आदिपुरूष सिनेमा बघा (किंवा बघू नका), चीनमधला एखादा पूल, २१ जूनला सर्वात मोठा दिवस का असतो.... असे वाट्टेल ते निरोप येत राहतात. विठ्ठलाच्या नामाचा गजर करत चालणाऱ्या वारकऱ्यांवरही विविध क्षेत्रातले लोक येऊन माहितीचा भडिमार करत असतात. संविधान आणि वारी प्रथा यांच्यातलं साम्य शोधण्याचा प्रयत्न हा प्रयत्न म्हणून कौतुकास्पद असला तरी तो वारीत कितपत परिणामकारक होत असेल याविषयी मला शंका आहे. एका उद्देशाने जमलेली गर्दी दुसऱ्या प्रकारच्या संदेशांकडे दुर्लक्ष करत असते हा नेहमीचा अनुभव आहे.
व्यक्ती म्हणून एक दिवस वारीत सामील होणं हे मी समजू शकते. पण विचारांचा प्रसार करण्यासाठी समूहाने वारीत सामील होणं हे काही माझ्या तितकंस पचनी पडलं नाही. आपली विठ्ठलावर भक्ती नसताना उगीच लोकानुयय करण्यासाठी एक दुसऱ्यांना आपण ‘माऊली’ म्हणणं किंवा ‘नमस्कार’ ऐवजी ‘रामकृष्णहरी’ म्हणणं हे काही माझ्याच्याने झालं नाही. आणि त्याबद्दल मला खंतही नाही.
धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याच्या नादात जसं छद्मविज्ञानाला (pseudoscience) बळ मिळालं तसाच काहीतरी प्रकार वारी आणि संविधान यांची सांगड घालण्यातून निर्माण तर होणार नाही ना अशी भीती वाटते. संतांचे निवडक अभंग निवडून त्यात संविधान शोधणं मी समजू शकते. अभ्यास म्हणून हे करण्याजोगं आहे. पण केवळ तेवढ्या आधारावर ‘वारी परंपरा राज्यघटनेच्या मूल्यांना आविष्कृत करते’ असा निष्कर्ष काढणं घाईचं आहे. वारीत सामील होणारे लोक ज्या गावांतून येतात, त्या गावांतल्या परिस्थितीचा अभ्यास केल्यावरच काही नेमकं म्हणता येईल. अन्यथा धर्म आणि व्यवहार यांना पूर्ण वेगळं ठेवण्याचं कौशल्य आपला समाज (एकूणच मानवी समाज) नेहमीच दाखवत आला आहे.
राज्यघटना व्यक्तीचं धर्मस्वातंत्र्य मानते – पण ती कुठलाही धर्म मानत नाही. अशा परिस्थितीत एका धार्मिक – सांस्कृतिक उत्सवावर राज्यघटनेने दिलेल्या मूल्यांचं प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न अनेक क्रिया-प्रतिक्रियांना जन्म देण्याची शक्यता आहे.
या साऱ्या प्रयत्नांतून अधिकाधिक वारकरी संविधानाची मूल्ये मानायला लागलेत की उपक्रमात सामील होणारे लोक अधिकाधिक भक्तीमार्गाकडं वळायला लागलेत (किंवा भक्तीमार्गावर श्रद्धा असणारेच उपक्रमात अधिकाधिक सहभागी व्हायला लागलेत) या एका प्रश्नाचं उत्तर शोधलं तरी अशा प्रकारच्या उपक्रमांची प्रासंगिकता (relevance) लक्षात येईल असं वाटतं.
वारीत एक दिवस चालणं हा एकंदर विचारांना चालना देणारा अनुभव होता.