ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, July 20, 2012

१३२. विचित्रपणा

कधी कधी आपण विचित्र वागतो. 
गोष्ट काही फार गंभीर नसते, किरकोळच असते - तरीही 'असं का वागलो त्यावेळी' हा प्रश्न काही पाठ सोडत नाही. 
त्याच उत्तर आता मिळून काही फरक पडणार नसला तरीही. 

ही गोष्ट दुस-या कुणालाच माहिती नाही मी सोडून. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी नाही - एका अर्थी तो स्वत:चा शोध आहे - न समजलेल्या स्वत:चा शोध! 

त्या दिवशी मी एका जिल्ह्याच्या शहरात होते. छोटसंच शहर आहे ते, फार मोठ नाही. तिथल्या एका स्वयंसेवी संस्थेनं एका कार्यक्रमासाठी मला बोलवलं होतं.  दगदगीचा दिवस होता तो.  कार्यक्रमात मला मुख्य वक्ता म्हणून काम होतं आणि त्याच्या पुढे मागे अनेक औपचारिक आणि अनौपचारिक भेटीगाठी आणि मीटिंग होत्या.  कार्यक्रमाला ब-यापैकी गर्दी होती आणि श्रोत्यांचा उत्साह मला काहीसा अनपेक्षित होता. त्यामुळे मुख्य कार्यक्रमानंतरही माझं बोलणं चालूच राहिलं. लोक अनेक गोष्टी सांगतात - त्यांचे विचार, त्यांचे अनुभव, त्यांची दु:खं, त्यांची स्वप्नं ....कोणत्याही व्यक्तीच 'एक' आयुष्य हे ब-यापैकी एकसारखं आणि म्हणून एकसुरी असल्याने मी अशा गप्पा ऐकायला नेहमीच उत्सुक असते. त्यातून मला इतरांच आयष्य कसं असेल याच एक दर्शन होतं! 

दिवस संपताना मी खूप दमले होते. पण हा थकवा अपयशातून येणारा नव्हता ( निरर्थक, वांझोटा दिवस कसा असतो तेही मला माहिती आहेच .. ). मी दिवसभर ब-यापैकी खाल्लं होतं - त्यामुळे ती दमणूक भुकेमुळे अथवा तहानेमुळेही नव्हती. कदाचित बोलण्याचा थकवा असावा तो. माझी ट्रेन रात्री साडेअकराला होती. हितचिंतकाच्या मागे लागून मी रात्री  साडेदहालाच स्टेशनवर सोडायला लावलं मला त्यांना. ते दोघे "थांबतो गाडी येईपर्यंत" म्हणत होते - पण त्यांची दोन लहान मुलं घरात होती म्हणून मी त्यांना लगेच परत घरी जायचा आग्रह करत होते. म्हणजे ते थांबायचा आग्रह करत होते आणि मी त्यांना परत पाठवायचा आग्रह करत होते. मला खरं तर सकाळपासून अजिबात निवांतपणा मिळाला नव्हता - रेल्वे स्थानकावर निदान अर्धा तस जरी माझा मला  मिळाला तरी ते मला पुरेसं होतं. 

अखेर हो ना करता अकरा वाजता ती मंडळी मला स्थानकावर सोडून नाराजीने घरी गेली. आता काय अर्ध्या तासात गाडी येईलच असं मी म्हणेतो 'गाडी अर्धा तास उशीराने धावत आहे' अशी उद्घोषणा झाली.  शहर लहान असल्याने फारशी गर्दी नव्हतीच स्थानकावर. मी एक स्वच्छ बाक शोधला, तिथं बैठक मारली, सकाळी वाचायचं राहून गेलेलं वर्तमानपत्र काढलं आणि वाचायला सुरुवात केली.  एखादी  गाडी येण्याची वेळ झाली की पाच दहा मिनिट गर्दी व्हायची आणि स्थानक पुन्हा शांत होऊन जायचं.  रात्री ब-याच गाड्या इथं थांबतात तर - असा एक विचार माझ्या मनात येऊन गेलाच. 

एक गाडी आली, काही प्रवासी त्यातून उतरले, काही त्यात चढले आणि गाडी निघून गेली. स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी आपापसात बोलत असताना त्यातला एक आवाज मला माझ्या मैत्रिणीचा वाटला. या शहरात माझ्या ओळखीचे काही लोक होते आणि त्यातल्या एक दोन घरांशी माझी जवळीक होती. पण भेटायला वेळ मिळणार नाही म्हणून मी त्यांना कोणालाच माझ्या शहर भेटीविषयी कळवले नव्हते. मी ज्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते, ती छोटी संस्था होती त्यामुळे माझ्या आजच्या भाषणाच्या कार्यक्रमाविषयी स्थानिक वृत्तपत्रांत काही बातमी येण्याची शक्यता नव्हती. या संस्थेशी माझ्या परिचितांचा काही संबंध नव्हता.  मला भास तर होत नव्हता परिचितांना न कळवण्याच्या अपराधी भावनेतून? 

मी नीट लक्ष देऊन पाहिलं. तो आवाज ओळखीचा आहे असा मला भास नव्हता झाला - तो माझ्या एका मैत्रिणीचा आवाज होता. तिच्या घरच्या इतर लोकांबरोबर ती होती.  त्यांच्या बरोबर असलेल्या सामानावरून ते सगळेजण कुठून तरी घरी परतत होते हे कळत होतं. 

आणि मग फारसा विचार न करताच मी हातातलं वर्तमानपत्र पुन्हा वाचायला लागले. 

छे! छे! आमचं काही भांडण वगैरे नाही झालेलं!  मैत्रिणीशी माझे चांगले संबंध आहेत. तिच्या घरच्यांशीही माझा घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्या घरी मी अनेकदा जाऊन राहिले आहे. माझ्या अडचणीच्या काळात त्यांचा  मला आधार असतो. त्यांना कुणालाच आज मी इथं आहे हे माहिती असण्याचं कारण नव्हत. ते जेव्हा उजेडात आले तेव्हा त्यांच्या चेह-यावरचा प्रवासाचा शीण मला स्पष्ट दिसला.  इतर वेळी फक्त त्यांना भेटण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून मी आले असते. पण त्या क्षणी मला त्यांना भेटावसं वाटत नव्हत हे मात्र खरं! काय कारण? काही नाही. 

त्या फलाटावरून माझी मैत्रीण आणि तिच्या घरची मंडळी दिसेनाशी होऊ लागली. अजूनही ते सगळे माझ्या हाकेच्या अंतरावर होते. मी एक हाक मारून त्यांना थांबवू शकले असते. त्यांच्या घरी मी जाऊ शकले नसते पण त्यांच्याशी बोलू शकले असते. पण मला त्यांच्याशी बोलायचं नव्हत त्या क्षणी. मी वर्तमानपत्रातल्या निरर्थक बातम्या वाचत बसले. 

मी त्या दिवशी अशी का वागले? मला माहिती नाही. अनेकदा मला एकट राहायला आवडतं आणि मी माणसांना टाळते हे आहेच. पण या मैत्रिणीची गोष्ट वेगळी होती. 'मला बोलायचा कंटाळा आलाय' असं मी तिला सहज सांगू शकले असते आणि तिला ते समजलं असतं. माझ्या इच्छेविरुद्ध काही वागायला तिने मला कधीच भाग पाडलेलं नाही आजवर ...

प्रत्येक नात्यात विश्वास असतो एक. तो जोवर असतो तोवर नात्याला कशाची झळ नाही पोचत. सगळ्या अडचणींना, परिस्थितींना हे नातं झेलू शकत ते विश्वासाच्या आधारेच. एकदा तो विश्वास गमावला कोणी एकाने की नातं संपत. 

मी त्यादिवशी रेल्वे स्थानकावर तिला टाळलं - हे माझ्या मैत्रिणीला माहिती नाही - पण मला माहिती आहे. मी तिचा एक प्रकारे विश्वासघात केला आहे माझ्या मते. मी जे करायला नको होतं ते केलं आहे अशी एक अपराधी भावना माझ्या मनात आहे. मी आजही तिला हे सांगितलं तर ती फक्त हसेल आणि 'विचित्र आहेसच तू' असं म्हणून मला माफ करेल हे मला माहिती आहे. तिने आणि तिच्या घरच्यांनी माझ्याकडून काही साध्या अपेक्षा ठेवणंही केव्हाच सोडून दिलंय! 

जे काही मी केलं ते आता 'अनडू' तर नाहीच करता येत. बिरबलाने म्हटलं होतं तसं 'बूंद सें गयी वह हौद सें नही आती' हेही मला माहिती आहे. आपल्या काही कृत्यांबरोबर आपल्याला जन्मभर राहावं लागतं - आपल्याला आवडो की न आवडो. 

माझ्या आयुष्यात विचित्रपणाचा हा एकच क्षण आहे असं मात्र नाही ... भरपूर आहेत ते .. त्यामुळे त्यांच मला काही अप्रूप वाटत नाही ...

(आता  ' हे नेमकं कोण होतं '- असा विचार करत बसू नका! खूप जुनी गोष्ट आहे ही! 
हे खरंच घडलं होतं की मला झालेला भास आहे - हेही मला सांगता नाही येणार इतकी जुनी गोष्ट :-) )
** 

Wednesday, July 11, 2012

१३१. मेट्रोत पादत्राणं पाहताना

लेखाचं शीर्षक विचित्र वाटतंय ना?  मलाही तसंच वाटतंय - पण पर्याय नाही सध्या सुचत. 
अर्थात ते शीर्षक मी जे करते आहे, सध्याचा माझा जो  प्रासंगिक छंद आहे  त्याच्याशी सुसंगत आहे. 
कारण माझ्या लक्षात आलं आहे की मी परत एकदा मेट्रोमध्ये बूट आणि चपला पाहते आहे. 

छे! गैरसमज नको. मी माझं नेहमीचं काम सोडून दुस-या उद्योगात पडलेले नाही! मी चपलांच्या दुकानात काम करायला लागलेले नाही आणि नजीकच्या भविष्यात तसं काही करायचा माझा विचारही नाही. 
मग मला काय म्हणायचं आहे? 
का पाहते आहे मी बूट आणि चपला - तेही इतरांच्या? 

'मी दिल्लीत राहते' असं मी सांगत असले तरी मी एका अर्थी 'अनिवासी दिल्लीकर' आहे - जितका काळ मी दिल्लीत असते; तितकाच काळ  मी दिल्लीच्या बाहेर असते. प्रत्येक वेळी मी दिल्लीत परत आल्यावर जेव्हा मेट्रोने प्रवास करते, तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी मेट्रोत इतरांचे बूट आणि चपला पाहते आहे! 

हो, मी काय सांगते आहे नेमकी, हे अजूनही नीट स्पष्ट होत नाही ना? 
ठीक आहे.
जरा सविस्तरच सांगते आता. 
मी बूट आणि चपला का पाहते - त्यामागचा संदर्भ सांगायला हवा नीट.  नाहीतर हे काहीतरी नवं खूळ घेतलं आहे मी डोक्यात- असं तुम्हाला वाटायचं! 

दिल्लीत असताना रोज ऑफिसला जायला आणि घरी परत यायला मी मेट्रो वापरते - म्हणजे मेट्रोने प्रवास करते रोजचा. मेट्रो खूप स्वच्छ आहे, वेळेत असते, त्यात स्त्रियांसाठी राखीव डबा असल्याने पुरुषांचे धक्के खावे लागत नाहीत गर्दीत आणि वेळही भरपूर वाचतो. त्यामुळे प्रवासाचा शीण असा जाणवतच नाही कधी. हाच प्रवास मी  बसने किंवा अगदी चारचाकीने केला असता  तर  बहुधा एव्हाना मी दिल्ली सोडून गेले असते.

मी ज्या मेट्रो मार्गावर नियमित प्रवास करते, तो भुयारी मार्ग आहे. एकदा पहिल्या मेट्रो स्थानकात मी प्रवेश केला की जिथं पोचायचं त्या मेट्रो स्थानकातून बाहेर पडेपर्यंत माझा आकाशाशी संबंध पूर्णपणे तुटतो.  मेट्रो वातानुकुलित असल्याने गाडीचे दरवाजे बंद असतात आणि खिडक्या नाहीतच .. फक्त खिडकीसारख्या मोठया काचा आहेत - त्या उघडत नाहीत. स्थानक आल्यावर मिनिटभरासाठी दरवाजे उघडतात तेव्हा त्यातून समोरचा फलाट दिसतो फक्त - समोरच्या फलाटावर असली तर मेट्रो, त्यातली माणसं असं दृश्य काही क्षण दिसतं आणि पुन्हा दरवाजे बंद होतात. 

त्यामुळे मेट्रोने प्रवास करताना मला नेहमी आपण एका मर्यादित जागेत बांधले गेलो आहोत असा अनुभव येतो. आकाश दिसत नाही, झाडं दिसत नाहीत, इमारती दिसत नाहीत - बाहेर फक्त काळोख असतो आणि आतमध्ये माणसांची गर्दी. अशा वेळी मला कशाशी जोडलं जावं हे न कळल्याने माझी अवस्था विचित्र होते. एखादं रोप मुळापासून उखडलं तर खरं, पण त्याला कुठेच रुजवलं नाही तर त्याची जशी अवस्था होते, तशीच काहीशी मी त्या क्षणांत होते.  ती पोकळी भरून काढायला मला काहीतरी 'कृती' करण्याची गरज असते त्या वेळी.  पण तेव्हा 'पाहण्या'व्यतिरिक्त मी दुसरं काहीच करू शकत नाही. माझी नजर निरुद्देशपणे इतस्तत: फिरत राहते. मग माझ्याही नकळत माझे डोळे एखाद्या स्त्रीच्या चेह-यावर जाऊन थबकतात. अनोळखी  व्यक्तींना - मी स्त्री असले आणि त्याही स्त्रियाच असल्या तरी - असं  'पाहणं ' माझं मलाच विचित्र वाटतं. या पाहण्यात कसलाही रस नसतो, कसलाही उद्देश नसतो, काही हेतू नसतो, मी पाहते आहे ही जाणीवही नसते - आणि म्हणूनच असं पाहणं जास्त 'विचित्र' होऊन जातं! 

माझी अशी निरुद्देश, निरर्थक नजर कोणावर पडते तेव्हा मिळणारे प्रतिसाद अनेक प्रकारचे असतात. एखादी स्त्री हसते, कारण तीही नेमकी त्याच क्षणी तितक्याच निरर्थकपणे आणि नकळत माझ्याकडे पहात असते. एखादी स्त्री अगदी वैतागते - जे अगदी स्वाभाविक आहे; कारण एका प्रकारे तिच्या खासगीपणावर मी त्या क्षणी आक्रमण केलेलं असतं. एखादी सरळ रागाने बघते माझ्याकडे. आणखी एखादी माझ्याकडे अजिबात लक्ष न देता संगीत ऐकायला लागते किंवा आपल्या मोबाईलमध्ये किंवा सोबतीच्या मैत्रिणीशी बोलायला लागते. एखादी बिचकते तर आणखी एखादी कानकोंडी होऊन दुसरीकडे पहायला लागते. एखादी माझ्याकडे दुर्लक्ष करते तर एखादी मला जणू आव्हान देत आक्रमकपणे माझ्याकडे उलट नजर रोखून पाहते. क्वचित कोणीतरी हवापाण्यासारखा निरुपद्रवी विषय काढून बोलायला सुरुवात करते. 

काही स्त्रिया अधिक समंजस असतात - त्या चेह-यावर काहीही भाव न दाखवता डोळे मिटून घेतात. मी जणू तिथं नाहीच, मी जणू त्यांच्याकडे पाहिलंच नाही अशा थाटात त्या त्यांचं काम पुढे चालू ठेवतात. हा सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय असल्याने मी स्वत:ही हा मार्ग वापरते अनेकदा. एखाद्या परिस्थितीवर, प्रतिक्रियेवर आपल्याला काही म्हणायचं नसेल तर डोळे (किंवा कान किंवा तोंड...) मिटून घेणं सगळ्यात चांगलं यात शंकाच नाही. मीही खरं तर मेट्रोत एक डुलकी काढू शकते. पण मी झोपत नाही - कारण आठवायला माझ्याकडे बरंच काही असतं नेहमी. विचार करायलाही बरंच असतं डोक्यात - कामाचं, बिनकामाचं - असं काहीबाही. या रिकाम्या वेळेचा उपयोग करत मला काही आठवायचं असतं आणि काही विसरायचंही असतं!  शिवाय सकाळी सकाळीच झोपेत जायचं तर दिवस सगळा झोपाळल्यागत जातो. 

पण तरी नजर उगीच इतरांवर पडायला नको म्हणून मी डोळे मिटते - आणि पुढच्याच क्षणी ते पुन्हा उघडते. मेट्रोत सतत काहीतरी उद्घोषणा होताच असतात - अनोळखी लोकांशी मैत्री करू नका; मेट्रोत खाण्या-पिण्याला परवानगी नाही; मेट्रोत खाली फरशीवर बसू नका, पुढचे स्थानक अमुक एक आहे आणि दरवाजा डावीकडे (किंवा उजवीकडे) उघडेल .. हे आणि ते .. सारखं काही ना काही चालू असतं - एक मिनिटही शांतता नसते. प्रत्येक वेळी उद्घोषणा  सुरु झाली की माझे डोळे आपोआप उघडले जातात. मला ईअरफोन  लावून गाणी ऐकायला आवडत नाहीत. इथं दिल्लीत माझ्या फारशा ओळखी नाहीत त्यामुळे मेट्रोत मला ओळखीचं कुणीतरी रोज भेटेल आणि रोज मी गप्पा मारत प्रवास करेन अशी शक्यता शून्यच. मेट्रोत फोनला रेंज नसते चांगली  - त्यामुळे कुणाला फोन करण्याचा किंवा कोणाचे फोन येण्याचा प्रसंग अगदी क्वचित येतो. आणि सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत गोष्टी फोनवर बोलायला मला आवडत नाहीत. प्रवास जेमतेम अर्ध्या तासाचा असतो - पुस्तकं उघडण्यात पण काही अर्थ नसतो फारसा. मग काय करायचं? मी डोळे मिटते , उघडते, पुन्हा मिटून घेते .. पुन्हा उघडते .. हे चालू राहतं अविरत...

डोळे उघडले की मला काय काय दिसतं? मी आधीच सांगितल्याप्रमाणे बाहेर फक्त काळोख असतो, काही दिसत नाही, काही पाहता येत नाही. त्याचवेळी मला आतल्या स्त्रियांच्या चेह-यांकडे पाहणं टाळायचं असतं. या सगळ्यातून मार्ग काढता काढता मग मला एक नवीच सवय लागली आहे - ती म्हणजे डब्यातल्या इतरांच्या - सहप्रवाशांच्या - चपला पहायच्या, त्यांचे बूट पाहायचे! एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा चेहरा पाहताना त्या व्यक्तीला 'कोणीतरी पहात आहे' ही जाणीव होतेच - पण चपला आणि बूट पाहताना मात्र हे काही त्यांना जाणवतही नाही. शिवाय एका नजरेत कितीतरी चपला -बूट मला दिसतात - हाही एक फायदाच म्हणायचा.

आणि आता काही महिने असं निरीक्षण केल्यावर 'पादत्राणांच जग' हे एक अजब विश्व आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते. त्यांचे किती आकार, किती रंग, किती वेगवेगळ्या शैली, किती वेगवेळ्या प्रकारे  ती  बनवलेली!! काही प्लास्टिकची, तर काही रबराची  तर काही चामड्याची! काही चपला, काही बूट, काही फ्लोटर्स, काही सेंन्डल! काही अंगठा असलेले काही नसलेले; काही लेस असलेले तर काही नसलेले; काही एका उभ्या पट्ट्याचे तर काही एकमेकांना छेद देणा-या पट्ट्यांचे!

हे प्रत्येक पादत्राण फक्त खूप काही सांगून जातं - फक्त त्याच्याबद्दल नाही तर ते वापरणा-या व्यक्तीबद्दलही!! मी चपला-बूट पाहून  ती व्यक्ती कशी असेल याचा एक अंदाज बांधते - आणि तो खरा आहे की नाही हे पाहण्यासाठी त्या स्त्रीच्या चेह-यावर एक नजर टाकते. गंमत म्हणजे अनेकदा माझी त्या व्यक्तीबद्दलची कल्पना खरी ठरते. ही कल्पना कसलीही असते - काय वय असेल, हेडफोन लावून गाणी ऐकत असेल का, केस कसे असतील  - काहीही कल्पना करते मी आणि त्या तपासून पाहते. आता मला तुम्हीच सांगा, गुलाबी रंगाचे बूट दिसले, किंवा झेब्रा पटेटे असले चपलेचे, किंवा निळी किनार असलेले लाल रंगाचे बूट असले.............. तर तुमच्या डोळ्यांसमोर एक व्यक्तिमत्व उभं राहणारच ना! बुटाची लेस किती घटट बांधली आहे किंवा किती सैल सोडली आहे यावरून माणूस थोडाफार कळतो असं मी म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती नाही. अर्थात ही फक्त कल्पनाशक्ती नाही - आधीची निरीक्षणं आणि आधीचे अनुभव यांचा आधार असतो असे अंदाज बांधताना.

सुरुवातीला मला असं 'पादत्राणं' न्याहाळताना काहीसा संकोच वाटायचा आणि थोडं अपराधीही वाटायचं. पण हल्ली मला तसं काही वाटत नाही आणि प्रवासात 'वेळ कसा घालवायचा' हा प्रश्न आता उरला नाही माझ्यापुढे.  शब्दांशिवायचं ते एक मस्त जग असतं माझं. 'पादत्राण निरीक्षण' हे फक्त मनोरंजन नाही माझ्यासाठी तर माणसांबाबत बरंच शिकण्याची ती एक संधीही आहे. त्यातून मन, विचार, कल्पनाशक्ती यांना चालना मिळते. त्यातून नवी गृहितकं तयार होतात, त्यातून नवी निरीक्षणं होतात आणि पुन्हा नवे सिद्धांत मनात तयार होतात. ते एक चक्र आहे - ते चालू राहतं - भर घालत, काही गोष्टी बाजूला सारत. पण प्रक्रिया मात्र  चालू राहते निरंतर.

मला या सगळ्या प्रकारात मनाची फार गंमत वाटते. एखादी परिस्थिती आपल्यावर लादली गेली, त्यातून बाहेर पडायचा काही मार्ग नसला (मेट्रो प्रवासाला मला पर्याय आहेत - पण ते अधिक गैरसोयीचे आहेत हे मला माहिती आहे!) की आपलं मन असलेल्या परिस्थितीत कसं आनंदाचे जगण्याचे आणि शिकण्याचे क्षण आणि संधी शोधतं हे मजेदार आहे. मन एका मर्यादित अवकाशात स्वत:चं जग निर्माण करू शकतं आणि त्यात आनंदाने राहू शकतं - मजेत राहू शकतं - स्वत:ला रमवू शकतं! बाहेरच्या जगासाठी खिडक्या आणि भिंती बंद असल्या तर  आपल्या  मर्यादित जागेत नवं जग निर्माण करण्याची क्षमता मनात असते याचा प्रत्यय देणारा अनुभव होता हा माझ्यासाठी. . जे काही समोर आहे, जे वाट्याला आलेलं आहे त्याचा अर्थ लावण्याची आणि त्याला नवा अर्थ प्राप्त करून देण्याची क्षमता मनात आहे असं या निमित्ताने माझ्या लक्षात आलंय. माझ्या प्रवासाची वेळ अगदी कमी आहे याची मला जाणीव आहे - पण उदया काही कारणान जास्त वेळ मला बंदिस्त अवकाशात काढावा लागला तर काय केलं पाहिजे अशा वेळी याची कल्पना मला आलेली आहे. 

'आता यातून काही मार्ग नाही' असं ज्या ज्या वेळी आपल्याला वाटतं, त्यावेळी मनाच्या या क्षमतेला आव्हान देऊन बघायला पाहिजे, मनाला थोडं भटकू दिलं पाहिजे, त्याच्यावर सामाजिक संकेतांचे जे संस्कार आहेत त्यापासून त्याला थोडी मोकळीक दिली पाहिजे - मग बाहेरची परिस्थिती तीच राहूनही मन बदलतं, दृष्टी बदलते आणि जगणंही बदलून जातं!! 

आता आयुष्यभर मी काही मेट्रोत पादत्राण दर्शन करत बसेन असं नाही - कदाचित त्याचा मला लवकरच कंटाळा येईल आणि मी नवा काहीतरी खेळ शोधून काढेन. जोवर मला मजा येतेय; माणूस म्हणून माझी समज वाढतेय  आणि त्यातून  मला काही शिकायला मिळतंय तोवर मी 'काय करते आहे' हे फारसं महत्त्वाचं नसतं - नाही का? - विशेषत: त्याचा इतरांना काहीही उपद्रव नसताना? 

हं ... फक्त पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा मी तुमच्याकडे पाहण्याऐवजी तुमच्या चपलांकडे (बुटांकडे)  जास्त लक्ष दिलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका!! 
**