वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं.
त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त
गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत
माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर
घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’
अविर्भावात बसले होते.
तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख
करून घेण्यापासून सुरुवात. स्वत:च नाव सांगायची प्रत्येकीची त-हा वेगळी. कोणी घाईघाईने
नाव सांगून मोकळी होत होती; तर कोणी आधी हसावं की नाव सांगावं या संभ्रमात. एखादी
दुसरीलाच नाव सांगायचा आग्रह करत होती – तेंव्हाचा त्यांचा संवाद ऐकण्याजोगा होता.
त्यांनी सहा सात महिन्यांपूर्वी हा बचत गट स्थापन केला होता. महिन्यातून एकदा
त्या सगळ्या नियमित भेटतात आणि बचत करतात. बॅंकेच दर्शन त्यातल्या एक दोघींनीच
घेतलेलं – तेही या गटामुळे. बचत गटाच वैयक्तिक पासबुक त्या अगदी जपून ठेवतात.
प्रत्येकील मी तिच पासबुक पहावं असं वाटतं. खरं तर एक दोन पासबुकं पाहिली की कळतो
त्या गटाचा एकंदर आर्थिक व्यवहार आणि शिस्त. पण त्यांना बरं वाटावं म्हणून मी
प्रत्येक पासबुक पाहते, त्यावर काहीतरी बोलते /विचारते आणि हसून ते परत करते.
मी त्यांच्याकडून गट बांधणीच्या प्रक्रियेची माहिती घेते आहे. ती घेताना
त्यांच जगणं, त्यांचा संदर्भ मी समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे. मी इतके सगळे
प्रश्न का विचारतेय हे त्याही समजून घ्यायचा प्रयत्न करताहेत हे माझ्या लक्षात येतं.
खरं तर जगण्याबद्दल विचार करत बसण्याची चैन त्यांना परवडणारी नाही.
दारिद्र्याशी झुंजण्यात त्यांची सारी शक्ती खर्च होते. हंडाभर पाणी आणायचं तर
अर्ध्या तासाची पायपीट केल्याविना त्यांना ते मिळत नाही. घरात खाणारी सहा सात तोंडं आहेत – त्याची तजवीज करावी लागते. लाकूडफाटा, धुणी-भांडी, स्वयंपाक, साफसफाई,
शेणगोठा – ही त्यांचीच कामं! गेली दोन वर्ष पावसानं ओढ दिलीय खरी, पण शेत तयार तर
करावं लागतं आशेनं!
गावातल्या अनेक गोष्टींबद्दल आम्ही बोलतो. इतर गावातील गटांचे अनुभव मी
त्यांना सांगते तेव्हा त्यांच्या नजरेत नव्या स्वप्नांचं बीज रुजताना मला दिसतं.
“ताई, रसायन घ्यायला आवडेल का तुम्हाला?” रखमाताई विचारतात आणि मी दचकते. फार
वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशाच्या भटकंतीत तिथल्या आदिवासींच्या भावनांचा मान
राखण्यासाठी मी ‘अपांग’(तांदळाची दारू) चाखली होती. तसाच प्रसंग दिसतोय आज. माझा
गोंधळ चेह-यावर दिसला असणार. कारण नीता (सोबत असलेली संस्थेची कार्यकर्ती) हसून
म्हणाली, “घाबरू नका, रसना पिणार का असं
विचारताहेत त्या!”
रखमाताई आधीच माझ्याशी बोलताना जरा बावरलेल्या होत्या.
नीताच्या बोलण्यावर जमलेल्या सगळ्या बाया हसतात तेव्हा त्या आणखीच खजील होतात. मला
एरवी रसना आवडत नाही. पण आत्ता रखमाताईंना बरं वाटावं म्हणून मी उत्साहाने होकार
देते.
रखमाताईंच घर छोटसं आहे. पुरेसा उजेड पण नाही. रसना येतं. मी ग्लासातलं रसना कमी
करायचा प्रयत्न करते तो एकमुखाने हाणून पाडला जातो.
मग गावात एक फेरफटका मारायला आम्ही निघतो. गुलाबताईंच घर दूर आहे. पाण्याचा
टिपूस नसलेल्या नदीच्या पात्रातून आम्ही चाललो आहोत. भर दुपारी दोन वाजता वाळूतून
चालणं सोपं नाही. आम्ही दोघी तिघी सोडल्या तर कोणाच्याच पायात चप्पल नाही. पण जणू
एखादा आनंदसोहळा असल्यागत सर्वांचा उत्साह!
एक चढण चढून आल्यावर समोर एकदम हिरवाई आहे. गुलाबताई बायफ संस्थेच्या शेती
विकास कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. खड्डे कसे खणले, लांबून पाणी आणून
लेकराच्या मायेनं आंबा आणि काजू कसे जगवले, त्यापायी शरीर कसं हलकं झालं ... असं
बरंच काही गुलाबताई बोलतात. त्यांचं घर त्यामानाने मोठं वाटलं मला. एका दोरीवर काही कपडे
टांगलेले होते; एका कोप-यात चूल – दोन तीन पातेली आणि तीन चार ताटल्या फक्त
दिसल्या. दुस-या कोप-यात दोन मध्यम आकाराच्या कणग्या. आणि तिस-या कोप-यात एक मध्यम
आकाराची पेटी. घरात फक्त एवढंच सामान.
शेजारचे लहान-मोठे सगळे मला पहायला येतात. पुन्हा एकदा ‘परिचयाचा’ कार्यक्रम
होतो. एक पोरगेलासा तरुण पुन्हा एकदा मला नाव विचारतो. नवा शब्द सापडल्यागत तो
स्वत:शी हसतो आणि एका अंधा-या कोप-यात दिसेनासा होतो. दोन मिनिटांत तो लगबगीने
परततो. “माझ्या लग्नाला यायचं बरं का ताई,”
असं म्हणत माझ्या हातात पत्रिका देतो. त्याचा निरागस आनंद पाहून “लग्नाच्या योग्य
वयाबाबत” काही बोलायचा मोह मी निग्रहानं टाळते.
तेवढ्यात टोपलीभर बटाटे घेऊन एक आजीबाई येतात. इतके स्वच्छ आणि तुकतुकीत बटाटे
मी आजवर कधी पाहिले नव्हते. त्या बाजारात बटाटे विकायला निघाल्या आहेत असं समजून
मी विचारते, “किती किलो बटाटे आहेत, आजी?” त्यावर आजीबाई हसत म्हणाल्या, “ मापून
थोडेच आणलेत? तुझ्यासाठी घेऊन आलेय मी. घरी घेऊन जा.”
सकाळपासून या गावात मला आदराची आणि प्रेमाची वागणूक मिळते आहे. या गावात मी
आयुष्यात पुन्हा कधी कदाचित पाऊलही टाकणार नाही. या स्त्रियांकडून खास वागणूक
मिळावी असं वास्तविक मी काही केलेलं नाही. मी या स्त्रियांशी फक्त गप्पा मारायला
आलेय. मी ना त्यांना कसली आशा दाखवतेय ना आश्वासन देतेय - आशेनं त्या माझ्या पुढेपुढे करताहेत अशातलाही
भाग नाही. मला भरून आलं – माझ्या डोळयांत पाणी तरारलं.
पण माझ्या मनाची एक गंमत आहे. ते जितक्या चटकन भारावतं, तितक्याच सहजतेने ते
वास्तवही स्वीकारतं. सकाळपासूनच्या भारावून टाकणा-या आदरातिथ्यासमवेत नकळत नजरेआड
केलेली वास्तवाची काही प्रखर रुपंही होती – ती आता ठळकपणे नजरेसमोर येऊ लागली.
शहर असो की खेडं, माणसांच्या मूळ स्वभावात आणि परस्परनातेसंबंधात
फारसा फरक आढळत नाही. व्यक्ती म्हणून एकटी भेटणारी माणसं, आणि समूह रूपांत भेटणारी
माणसं यांत नेहमीच अंतर राहतं. मी या गावातली – त्यांच्यातलीच एक - असते; तर रखमाताईंनी
मला ग्लास भरून रसना दिल नसतं; आपलं काम सोडून या स्त्रिया माझ्याशी अशा गप्पा
मारत बसल्या नसत्या; गुलाबताईंनी मला आग्रहाने त्यांच्या घरी नेलं नसतं आणि त्या
पोरगेल्या युवकाने मला इतक्या लगबगीने त्याच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नसतं.
पण बाहेरून पाहिलं, की तेच जग वेगळं दिसतं!
आपण सर्वचजण बाहेरून काही काळासाठी आपल्यात आलेल्या
व्यक्तीशी वेगळं वागतो. बाहेरून आलेली व्यक्ती आपल्याच जगाचा भाग झाली, की मात्र
आपली गाडी मूळ पदावर येते. रोजच्या संबंधातील व्यक्तींना गृहित धरून चालताना आपलं
काही चुकतंय असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्यातील एका व्यक्तीला नेम धरून एकटं पाडणं – हा समाजातल्या रंजनाचा सर्वमान्य नमुना. कोणाच्याही अनुपस्थितीत भलतेसलते
शेरे मारत त्या व्यक्तीच्या वागण्याचा अनर्थ काढण्यात आपली सारी हुशारी खर्ची पडते.
रोजचे संबंध आले की, काही वाटून घेणं, काही सोडून देणं, काही स्वीकारणं भाग असतं.
ते आपण सहज करू शकत नाही. क्रिया-प्रतिक्रियांच्या जंजाळात सोप्या गोष्टी अवघड
करून घेण्यात, दुस-यांच्या माथी खापर फोडण्यात धन्यता वाटायला लागते. आपल्यात
मार्दव, सहजता, नम्रता ... फक्त बाहेरच्या माणसांच्या वाटयाला येईल इतकीच
दुर्दैवाने उरते!
परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं. पण ते
आपल्यासाठी नसतं, हे आपण जाणून घ्यायला हवं. पाहुण्यासारख जगणं जमतं, तोवर चैन असते.
कशाला आपलं मानून स्थिरावलं की मग नाण्याची दुसरी बाजू समोर येते. जे आपलं असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही
असतंच! परिघ आणि केंद्रबिंदू यांचा तोल राखणं जमलं, तर कदाचित काही रहस्याचा उलगडा
होईलही!
वैशाखाच्या रणरणत्या उन्हात कधीतरी आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली
बसण्याच सुख जरूर उपभोगावं! पण रोजचीच गोष्ट असेल तर आपली सावली आपल्याला आतच शोधायला
हवी!
पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता, ६ नोव्हेंबर २००४