ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, January 12, 2024

२६८. कातरवेळी ...

झोपेतून जागी झाले आणि क्षणभर ही सकाळ आहे की संध्याकाळ आहे या संभ्रमात पडले. कधी कधी तर मैं कहा हूं असं फिल्मी थाटात स्वत:ला विचारण्याची वेळ येते. हल्ली प्रवास कमी झालाय, त्यामुळे तो फिल्मी संभ्रमदेखील कमी झालाय. पण ते असो. सांगत होते ते कातरवेळी जाग आल्यावर येणाऱ्या अनुभवाबाबत. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव येत असणार याची मला कल्पना आहे. त्यामुळे काळजी न वाटता हसू येईल याचीही कल्पना आहे. 😊

संध्याकाळी झोपणं अशुभ आहे असं काही लोक मानतात. शुभ-अशुभावर माझा विश्वास नसला तरी संध्याकाळी झोपले, तर उठते तेव्हा प्रत्येकवेळी मला उदास, खिन्न वाटतं हा अनुभव आहे. त्यामुळे कितीही दमले तरी संध्याकाळी पाचनंतर (किमान रात्री दहापर्यंत तरी) झोपायचं मी टाळते. पण त्यादिवशी खूप दमणूक झाली होती, बरेच दिवस वर्क फ्रॉम होममुळे झोप पुरेशी झाली नव्हती. त्यामुळे कितीही अनुभव गाठीशी असला तरी त्यादिवशी मी संध्याकाळी पाच वाजता झोपलेच.

पाऊण तासाने उठले. गजर लावला होता, नाहीतर मी थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले असते. तर मग अपेक्षेप्रमाणे अतिशय उदास वाटायला लागलं. काही सुचेना. काही हालचाल करावी वाटेना. अगदी परत झोपावं असंही वाटेना. म्हटलं चला, कुणालातरी फोन करू. फोनवर गप्पा मारून बरं वाटेल. कुणाला बरं फोन करावा असा विचार करायला लागले.

तसे माझ्या संपर्कयादीत (म्हणजे कॉन्टक्ट लिस्टमध्ये) चारेकशे लोक आहेत. त्यातले काही नंबर विविध सेवांच्या कस्टमर केअरचे आहेत, म्हणजे ते अशा अनौपचारिक संवादासाठी बाद. काही अन्य सेवांचे आहेत – जसे की फार्मसी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वाहन दुरूस्ती वगैरे. त्यांचाही उपयोग नाही. काही नंबर कामाच्या ठिकाणचे आहेत. माझ्या कामाच्या ठिकाणचे लोक दुसऱ्या देशांत आहेत, त्यामुळे सहज म्हणून फोन होत नाहीत. वेळ ठरवून ते करावे लागतात. त्यांच्याशी होणाऱ्या अनौपचारिक संवादातही मुख्य भर फोनऐवजी चॅटिंगवर असतो. काही नंबर मी पूर्वी ज्या लोकांसोबत काम केलं, त्यांचे आहेत. ते कधीतरी कामासाठी अजूनही फोन करतात, त्यामुळे ते अद्याप काढून टाकलेले नाहीत. फक्त फॉरवर्ड पाठवणाऱ्या लोकांचे (आणि अनेक व्हॉट्सऍप गटांचे) नंबर archive करण्याची युक्ती मला अलिकडेच समजली आहे. त्यामुळे माझी अजिबात चौकशी न करता फक्त स्वत:चे लेख, फोटो, वर्तमानपत्रांची कात्रणं वगैरे पाठवणारे सध्या तिकडं आहेत. या लोकांचे आणि माझे काही कॉमन ग्रुप्स असल्याने यांना यादीतून काढून टाकणं जरा अवघड असतं.

काही नंबर अशा लोकांचे आहेत, की जे मरण पावले आहेत. आता तो नंबर ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये, हे माहिती असूनही त्यांचे नंबर मात्र काढून टाकावेसे वाटले नाहीत, तसा विचारसुद्धा कधी केला नाही. पण या लोकांना काही फोन करता येत नाही.

काही लोकांशी वर्षानुवर्ष काहीही संवाद नाहीये. १ जानेवारीला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीला लक्ष लक्ष दिव्यांची…” छापाचे फॉरवर्डेड मेसेजेस ते मला पाठवतात, यापल्याड आमच्यात काहीही संवाद नाही. काही लोक मला फक्त व्हॉट्सऍप फॉरवर्ड पाठवतात, व्यक्तिगत संवाद साधण्यात त्यांना काही रस नसतो. मग बहुतेक अशा वेळी मी त्यातले दोन-चार नंबर डिलीट करून टाकते. तो या कातरवेळच्या उदासीनतेचा एक फायदा.

या गाळणीतून काही ठरलेली नावं मागे राहतात. हे लोक अनेक वर्ष माझ्या संपर्कात आहेत ही जमेची बाजू. यातल्या सर्वांची वर्ष दोन वर्षांतून एकदा तरी निवांत भेट होते, गप्पागोष्टी होतात. त्यांच्या घरी माझं जाणं आहे. मी फार कमी लोकांना घरी बोलावते, मात्र हे लोक कधीही माझ्या घरी येऊ शकतात, येतातही. त्यांच्या घरातली माणसं मला ओळखतात. मला काही अडचण आली तर यातले अनेक लोक धावत येतात, मदत करतात. वेळी-अवेळी, पूर्वनियोजित नसलेला फोन करण्यासाठी खरं तर एवढं पुरेसं आहे.

पण त्यातल्या कुणालाही मी लगेच फोन करायला तयार होत नाही. काहीजण काही मिनिटांनंतर त्यांच्या आध्यात्मिक गुरूविषयी बोलायला लागतात. हे मला ओळखतात का खरंच -असा प्रश्न पडावा इतकं ते अध्यात्मिक बोलतात. यातले काहीजण फक्त तक्रार करतात. कुणाबद्दल तक्रार हे महत्त्वाचं नाही, फक्त तक्रार करतात. मला या तक्रारखोर लोकांबाबत नेहमी एक प्रश्न पडतो. ज्या लोकांबाबत हे तक्रार करताहेत, त्यांच्याशी तर यांचे चांगले संबंध आहेत, ते एकंदर एकमेकांच्या सहवासात सुखी दिसतात. मग माझ्याकडेच तक्रार का? आणि दुसरं म्हणजे मी फोन केलाय. तरीही माझी जुजबी चौकशी करून मग हे लगेच आपल्या तक्रारीच्या विषयाकडं वळतात. सुखाच्या काही गोष्टी सांगायला यांना जमतच नाही. मी फक्त उदास वाटल्यावर नाही, तर चांगलं घडल्यावरही या लोकांना फोन करत असे. हल्ली मात्र मी टाळते.

काहीजणांना फक्त गॉसिप करण्यात आणि नकारात्मक बातम्या पसरवण्यात रस असतो – तेही नको वाटतं. क्ष या व्यक्तीचं माझ्याबद्दल किंवा माझं क्ष या व्यक्तीबद्दल काहीही मत असलं तरी त्याने माझ्या किंवा क्षच्या जगण्यात काय फरक पडतो? काहीच नाही. मग असू द्यावं ज्यांचं मत त्यांच्यापाशी. काहीजण लगेच खूप काळजी करत भरमसाठ सल्ले द्यायला लागतात. कुणी जेवणाखाणाचा उपदेश करायला लागतं. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. एरवी मी त्या प्रत्येकाच्या वैशिष्ट्याचा, वेगळेपणाचा आनंद घेते. त्यांच्या व्यक्तिमत्वासकट ते माझे मैत्रीण-मित्र असतात, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे याबद्दल मी कृतज्ञही असते. पण यावेळी मात्र फोन करायला नको वाटतं.

काहीजण त्यांच्या व्यापात खोलवर बुडालेले आहेत हे माहिती असतं. मग त्यांना असा अवेळी फोन केला जात नाही. काहीजण ऑफिसच्या कामात किंवा परतीच्या प्रवासात असतील म्हणून फोन करायला नको वाटतो.

असं मी एकेक नाव पहात जाते. पुढं जाते. फोन कुणालाच करत नाही. आपल्या उदासीनतेला काही कारण नाही, ती आपोआप नाहीशी होईल हे मला माहिती आहे. बोलण्यासारखं आपल्याकडं काही नाहीये हेही मला कळतं. आणि या क्षणी कुणाचं काही ऐकत बसण्याइतका उत्साह मला नाहीये, हेही मला माहिती आहे. खरं सांगायचं तर त्या निरर्थक, पोकळ वाटणाऱ्या त्या क्षणांमध्ये एक अद्भूत असं काहीतरी असतं. त्याच्या मोहात मी त्या क्षणी असते, त्यामुळे माणसांची सोबत नकोशी वाटते.

शेवटचा नंबर नजरेखालून गेल्यावर मी स्वत:शीच हसते. उरतो तो फक्त आपलाच नंबर. आपणच आपल्याशी संवाद साधणं, राखणं महत्त्वाचं असतं याची आठवण करून देणारा तो आपलाच नंबर.

मग O Mister Tambourine manलावते.

किंवा हृदयसूत्र ऐकते.

किंवा मग आमि शुनेछि शेदिन तुमि हे बंगाली गीत ऐकते.

उन्हाळ्याचे दिवस असतील तर कपाटातली दुर्बिण काढते. गॅलरीतून दिसणारे पक्षी पाहते. पावसाळा असेल तर पाऊस पहात बसते.

कुठल्यातरी पुस्तकातलं एखादं वाक्य आठवून संग्रहातलं ते पुस्तक शोधते. एखादी कविता, गाणं गुणगुणत बसते.

डोळे मिटून निवांत श्वासाकडे बघत बसते. झोपाळ्याच्या हालचालीसोबत वाजणाऱ्या छोट्या घंटेच्या किणकिणाटाच्या नादाने स्तब्ध होऊन जाते.

मग कधीतरी विनाकारण आलेली खिन्नता विनासायास निघून जाते.

रिकामपणाचा तो एक क्षण मात्र सोबत राहतो. बाहेर कितीही गर्दी असली तरी तो क्षण सोबत राहतो. तो वेदनादायी वगैरे अजिबात नसतो, फक्त वेगळा असतो. क्वचित कातडी सोलून काढणारा असतो आणि तरीही वेदनादायी नसतो. अधुनमधून असा क्षण अनुभवता येणं ही एक चैनच आहे एका अर्थी. ती वाट्याला येईल तेव्हा मी ती करून घेते.

मग कुणाचातरी फोन येतो. गप्पा सुरू होतात.

आत्ताच मला हे असं वाटतं होतं - वगैरे इतकं सगळं काही मी त्या मैत्रिणीला-मित्राला सांगत बसत नाही. आपल्याला फोन आला की आपण ऐकायचं हे सूत्र उभयपक्षी लाभदायक असतं हे मला अनुभवाने माहिती आहे.

मी कन्याकुमारी स्थानकातून पहाटे पाच वाजता सुटणाऱ्या रेल्वेने प्रवासाला निघाले आहे असं स्वप्नं मला अनेक वर्ष पडायचं. कन्याकुमारी कायमचं सोडण्याचा तो क्षण मी स्वप्नांमध्ये अनंत वेळा पुन्हापुन्हा अनुभवला होता. एकदा कधीतरी मी त्याबद्दल लिहिलं आणि मग मला कधीच ते स्वप्न पडलं नाही.

मला आत्ता भीती वाटतेय की रिकामपणाच्या, निरर्थकतेच्या अनुभवाबद्दल मी लिहिते आहे, तर कदाचित ते क्षण मला परत कधाही अनुभवता येणार नाहीत. लिहिणं हे भूतकाळाचं ओझं कमी करण्याचा माझ्यासाठी तरी एक रामबाण उपाय आहे.

बघू, आगे आगे क्या होता हैं 😊