ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, February 19, 2015

२२२. शिकाम्बा-मशाम्बा

कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही.

त्या दिवशी मी होते मॅक्वेन्जेरे (Macuenjere) नामक एका गावात. निमित्त होतं  ‘स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं.

पालकांचा आणि पर्यायाने समाजाचा शिक्षणव्यवस्था सुधारण्यात सहभाग वाढावा, शाळेने कार्यक्रम आखताना आणि राबवताना समाजाचा सहभाग घ्यावा आणि या माध्यमातून “सर्वांसाठी (प्राथमिक) शिक्षण” हे उद्दिष्ट साध्य व्हावे असा मोझाम्बिक सरकारचा प्रयत्न. या स्कूल कौन्सिलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी असतात, काही शिक्षक असतात आणि काही पालक. दर तीन वर्षांनी स्कूल कौन्सिलची निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच लोक आहेत. पण तो आजचा विषय नाही. मुलींच्या शिक्षणाशी संबंधित एका प्रकल्पावर मी सध्या ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करते आहे. त्यामुळे या कौन्सिलचं प्रशिक्षण पाहणं; त्याचा आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल सुचवणं; ते अमंलात येतील हे पाहणं – हे माझं (अनेक कामांपैकी) एक काम. 

या गावात जाताना जेव्हा मुख्य रस्ता सोडून आम्ही उजवीकडे वळलो; तेव्हा डाव्या बाजूला ‘शिकाम्बा’ नामक नदीवर बांधलेलं धरण असल्याची आणि त्या धरणाला ‘शिकाम्बा लेक’ म्हटलं जातं अशी माहिती उत्साही सहका-यांनी दिली होती. “आज वेळ नाही आपल्याकडे, पण पुढच्या भेटीत जमवू आणि जाऊ थोडा वेळ तरी ‘शिकाम्बा लेक’ परिसरात” असंही आमचं आपापसात बोलणं झालं. त्यामुळे ‘शिकाम्बा’ शब्द मेंदूत रुजला. 

आज माझ्या सोबत स्थानिक एनजीओचे जे सहकारी आहेत, त्यांच्यातल्या कुणालाच इंग्रजी भाषा समजत नाही. त्यामुळे मी पोर्तुगीज भाषा किती आत्मसात केली आहे याची आज कसोटी आहे. प्रशिक्षण सुरु झालं आणि पहिल्याच मिनिटात माझ्या लक्षात आलं की मला स्थानिक लोकांचं ‘पोर्तुगीज’ नीटसं समजत नाहीये. चौकशी केल्यावर स्थानिक भाषा ‘शुटे’ (Chute) असल्याचं कळलं. मग लोक काय बोलतात ते मला पोर्तुगीजमध्ये अनुवाद करून सांगायची आणि माझं पोर्तुगीज लोकांना त्यांच्या भाषेत सांगण्याची जबाबदारी बेलिन्या आणि किटेरिया या दोघींनी घेतली आणि फार अडचणी न येता माझा लोकांशी संवाद सुरु झाला. 

लोक काय काम करतात; शेती आहे का; त्यात काय उगवतं; ते पुरतं का कुटुंबासाठी; कुणाकुणाच्या मुली या शाळेत आहेत; माध्यमिक शिक्षणासाठी मुली पुढे कुठे जातात; प्राथमिक शाळेतून मुलींची गळती मोठ्या प्रमाणात होण्याची कारणं; कुटुंबात साधारण किती लोक असतात; स्त्रियांचं आरोग्य ..... असंख्य प्रश्न. मी भारतीय असल्याचं त्यांना सुरुवातीलाच सांगितलं आहे मी; त्यामुळे (मी पाहुणी असल्याने) आमची मस्त चर्चा चालू आहे. 

एक सत्र संपून दुसरे सुरु होताना एखादा खेळ  घ्यावा म्हणून बेलिन्या पुढे येते. पण स्थानिक स्त्रिया (ज्या स्कूल कौन्सिलच्या सदस्य आहेत) त्या बेलिन्याला थांबवतात आणि माझ्याकडे हात दाखवत काहीतरी म्हणतात – त्यावर सगळा समूह हसत तत्काळ सहमत होतो. मी प्रश्नार्थक नजरेने किटेरियाकडे पाहते. “भारतातल्या मुली खेळतात असा एखादा खेळ तुम्ही घ्या आमचा” अशी त्या लोकांची मागणी आहे. 

एक क्षण मी विचारात पडते. प्रशिक्षणात दोन सत्रांच्या मध्ये घेतले जाणारे हे खेळ छोटे आणि गमतीदार असतात. लोकांचा कंटाळा घालवायचा हाच त्याचा मर्यादित उद्देश असतो. आता इथं त्या खेळाचा अनुवाद करत बसले तर मजा जाणार. मला एकदम ‘शिकाम्बा लेक’ची आठवण येते.

मी पुढं येते. सगळ्यांना गोलात उभे राहायला सांगते. ‘शिकाम्बा सगळ्यांना माहिती आहे का’ ते विचारते – अर्थात ते त्या सगळ्यांना माहिती असतं. मी जे शब्द बोलेन त्यानुसार कृती करायची हे मी समजावून सांगते आणि मग मी ‘शिकाम्बा’ शब्द उच्चारून पुढे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. मग मी म्हणते ‘मशाम्बा’ आणि मागे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. सगळे हसतात. मी ‘शिकाम्बा’ म्हटलं की सगळे पुढे उडी मारतात आणि मी ‘मशाम्बा’ म्हटलं की सगळे मागे उडी मारतात. खिडकीतून अनेक लहान मुलं कुतूहलाने पाहताहेत आमच्याकडं – विशेषत: माझ्याकडं!

दोन चार उड्या झाल्यावर मी ‘मशाम्बा’ म्हणत पुढे उडी मारते ....अनेकजण माझं अनुकरण करतात.
मग हास्याची एक लाट. 

आम्ही पुढे काही मिनिटं खेळतो.
“शिकाम्बा–मशाम्बा” म्हणजे आपलं  “तळ्यात-मळयात”.
पोर्तुगीज भाषेत ‘मशाम्बा’ म्हणजे शेत.  

संध्याकाळी मी तिथून निघते तेव्हा शाळेचा आवारात काही मुलं “शिकाम्बा-मशाम्बा” खेळताहेत. 

लहानपणी मी ज्या गावात होते तिथल्या तळ्याची मला फार आठवण येते.
आता लवकारात लवकर ‘शिकाम्बा लेक’ला जायला हवं....

Sunday, February 1, 2015

२२१. भीतीच्या भिंती ५: स्थिरावताना


भाग , , ,
इथं आल्यापासून माझी ‘सकाळची शाळा’ सुरु झालीय. दिवस लवकर सुरु होतो इथला – पहाटे चारपासूनच वातावरणात माणसांची चाहूल लागते. माझं नाव सूर्याच्या अनेक नावांपैकी एक असलं तरी आमचं घड्याळ एकमेकांशी जुळण्यात अडचणी येतात. एरवीही ‘कामाची वेळ दुपारी बारा ते रात्री आठ अशी असती तर किती बरं झालं असतं’ असं मला वाटतं. पण आता इथं तर ऑफिस आठ वाजता सुरु होतं. राहत्या जागेपासून ऑफिसचं अंतर जेमतेम अर्धा तास, पण कधी अचानक दुस-या रस्त्याने जावं लागेल, कधी ट्रॅफिक जाम लागेल ते सांगता येत नाही. त्यामुळे सकाळी सात वाजताच बाहेर पडते मी रोज.    
आज ऑफिसात गेल्यागेल्या सिक्युरिटीचं ‘प्रेमपत्र’ मिळालं. मी काल पहिला ‘सिक्युरिटी ब्रीच’ केला होता म्हणून मला वॉर्निंग देणारा निरोप होता तो. अशी चूक मी तिस-यांदा केली की माझी इथून हकालपट्टी होणार!
इथं असणा-या प्रत्येक कर्मचा-याचं एक ‘सांकेतिक नाव’ आहे. संध्याकाळी ठरलेल्या वेळात एका (ठरलेल्या) नंबरवर फोन करुन स्वत:चं ‘सांकेतिक नाव’ सांगून ‘मी सुरक्षित आहे’ अशा अर्थाचं एक वाक्य बोलायचं. हे सांकेतिक नाव फक्त सुरक्षा व्यवस्था आणि तुम्ही या दोघांनाचं माहिती असतं, त्यामुळे तुमच्या नावे दुसरं कुणी फोन करु शकत नाही. तुमचं अपहरण झालं; किवा तुम्ही एखाद्या हल्ल्यात जखमी झालात किंवा मरण पावलात तर मग किमान चोवीस तासांत सुरक्षा यंत्रणेला ते कळावं अशी ही व्यवस्था. खरं तर प्रत्यक्षात काही दुर्घटना घडते, तेव्हा सुरक्षा यंत्रणेला लगेच कळतं – चोवीस तास लागत नाहीत. कारण प्रत्येक क्षणी तुम्ही कुठं आहात हे त्यांना माहिती असतं; त्यांच्या परवानगीविना तुम्ही एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाऊ शकत नाही. खरं तर अडचणीत आल्यास या नंबरला कधीही फोन करता येतो. पण तरीही असा फोन शिस्त म्हणून करायचा – ठरलेल्या वेळी, अगदी रोज, न चुकता!  
मला हे ‘रोज फोन करून सांकेतिक नाव सांगणं’ फार फिल्मी वाटायचं, कधी कधी तर आपण कुठल्यातरी गुप्त कटात सामील आहोत असं वाटायचं. ऑफिसमधल्या त्या माणसांना त्या दोन-तीन तासात असे शेकडो फोन येत असणार, त्यामुळे हवापाण्याच्या गप्पा अपेक्षित नव्हत्या. मी त्यांच्यासाठी शेकडो नावांपैकी एक होते. मला असल्या कृत्रिम, बिनचेह-याच्या संवादाचा प्रचंड कंटाळा – रोज अगदी जीवावर आल्यागत मी हा फोन करायचे.
काल संध्याकाळी दोन वेळा प्रयत्न करून फोन लागला नव्हता तेव्हा मी नाद सोडून दिला होता. रात्री दहा वाजता मला सिक्युरिटीचा फोन आला होता. ‘सगळं ठीक आहे ना, काही अडचण नाही ना’ अशी विचारणा करून पलीकडचा माणूस मला ‘गुड नाईट’ म्हणाला होता. त्यामुळे ‘आपण फोन नाही केला; तर ते करतील आणि कदाचित थोड्या गप्पा मारता येतील त्यांच्याशी’ असे मांडे मी मनात रचले होते – ते क्षणात कोलमडले. मग ‘काल फोन का केला नाही’ याचं लेखी स्पष्टीकरण मी दिलं; जॉर्जने ते पाहून ‘यापुढे ही चूक माझ्याकडून होणार नाही’ असं एक वाक्य त्यात जोडलं आणि सगळया प्रकारावर तात्पुरता पडदा पडला.
खायचं काय हा एक मोठा प्रश्न इथं माझ्यासमोर आला. इथले ९९ टक्के लोक मांसाहारी. मला माझ्यासाठी शाकाहार योग्य वाटतो – त्याचा ‘धर्मा’शी काही संबंध नाही. कोळ्याच्या घरात जन्मले असते तर मासे आवडीने खाल्ले असते मी; याची जाणीव आहे मला! त्यामुळे ‘लोकांनी आपापल्या आवडीचं खावं – त्यात ढवळाढवळ करण्याचा मला अधिकार नाही’ अशी नेहमीची भूमिका. शिवाय आपद्धर्म म्हणून काही वेळा कोंबडी-बकरी पोटात प्रवेश करते झाले आहेत (ती एक वेगळीच गोष्ट आहे – पुन्हा कधीतरी!). पण रोज मांसाहार मला काही जमला नसता.
स्वैपाक करता येईल अशा ठिकाणी माझी राहायची सोय नव्हती. ती दीडेक महिन्याने झाली आणि प्रश्न मिटला, पण तोवर अनेक गंमतीजमती झाल्या.
पहिल्याच आठवडयातली गोष्ट. नेमका जेवणाच्या सुट्टीच्या वेळी पाऊस कोसळायला लागला. माझा सहकारी हमीद म्हणाला, “तुला काय पाहिजे जेवायला ते सांग, खालाजान (आमच्या सेक्शनच्या स्त्री शिपाई, -‘खाला’ म्हणजे मावशी) घेऊन येतील रेस्टॉरंटमधून.” मी एक नान आणि भाजी आणायला सांगितली, पैसे दिले. माझ्यासाठी कोंबडी-बकरी आणायची नाही हे हमीदने खालाजानना व्यवस्थित समजावून सांगितलं. थोड्या वेळाने खालाजान परतल्या. म्हणाल्या, “तुझ्यासाठी गंमत आणलीय एक” आणि हसत मला मासा दाखवला. मी ‘मासा नको’ म्हणाल्यावर बिचा-या नाराज झाल्या. तो मासा त्यांना देऊन टाकला मी. मी तिथं असेतोवर ‘पण मी म्हणते, मासा खायला काय हरकत आहे’ असं त्या दिवसातून एकदातरी मला सुनवायच्या.
मी राहत होते त्या हॉटेलमध्ये सकाळी नाष्टा त्या मानाने सोपा होता. पाव, बटर, चीज, कॉर्नफ्लेक्स उपलब्ध होतं. मला एरवी ‘ऑरेंज ज्यूस’ आवडत नाही. पण इथं ताजा रस मिळायचा, जो मला खूप आवडला. माझ्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट ‘ऑरेंज ज्यूस’ मी काबूलमध्ये प्यायले – असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. प्रश्न यायचा तो रात्रीच्या जेवणाचा. एकट्या माझ्यासाठी शाकाहारी जेवण बनणं अवघड होतं. मग तिथला एक वेटर मला थोडी मदत करायचा – ‘ते घेऊ नका; थांबा थोडं, सॅलड/सलाड करून ठेवलंय तुमच्यासाठी; भोपळा आवडेल का तुम्हाला; दही आणतो..’ अशी त्याची मदत.
एका रात्री मी नेहमीपेक्षा पंधरा मिनिटं आधी गेले जेवायला तर दुसराच पोरगा ड्यूटीवर होता. मला एका भांडयात ‘वांग्याचे तळलेले काप’ दिसले. तरी मी वेटरला विचारलं, “शाकाहारी आहे का?” पठठया “हो” म्हणाला. एकंदर ते बेचव प्रकरण होतं. तेवढ्यात माझा तो वेटर-मित्र धावत आला. “अहो, तो मासा (माशाचे कसलेसे काप) आहे. खाता मासा तुम्ही? आणू अजून?” (‘मासा बेचव होता’ असं म्हटल्याबद्दल मासेप्रेमींनी माफ करावं, ही विनंती.) मी ‘मासा नको’ म्हणाल्यावर “मग तुमचा धर्म बुडला का आता?” अशी भीती त्याला वाटली. आता त्याला तत्वज्ञान कुठं  सांगत बसणार? मी त्याच्यावर आणि त्याच्या मित्रावर रागावले नाही याची खात्री पटायला त्याला पुढं एक आठवडा लागला.
एकदा एका दिवसभराच्या बैठकीत जेवणासाठी ‘नान’ आणि कबाब आले. ‘नान’ची गुंडाळी करून त्यात कबाब ठेवलेले असतात. मंत्रालयातली बैठक. ‘उगाच कुठं इथं आता शाकाहाराचं कौतुक करायचं – कबाब तर कबाब, बघू खाऊन एखादा’ – अशी मी मनाची तयारी केली. तेवढ्यात खात्याच्या वरिष्ठ संचालकांना माझ्या शाकाहाराची आठवण आली. त्यांनी त्वरित दही मागवलं. दही आलं. मग ‘नान’मधले कबाब काढून ते मी इतर सहका-यांना दिले आणि तोच ‘नान’ दह्यासोबत खाल्ला.
इथला ‘नान’ पाहिल्यावर एरवी आपण त्याची किती भ्रष्ट नक्कल खातो हे लक्षात आलं. ‘नान’ म्हणजे अफगाण लोकांचा जीव की प्राण. तो टाकून द्यायचा नाही अशी पद्धत. त्यामुळे ‘नान’ उरला तर तसाच कागदात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतात. भूक लागली की तोच काढायचा आणि खायचा. अर्थात उरतो तो ‘दुसरा’ नान – पहिला सहज संपतो.
हे ‘नान’ कुठेही, कसेही ठेवतात. कार्यालयात टेबलावर ‘नान’ असे ठेवलेले सगळीकडे दिसतात.

एकदा आम्ही शेजारच्या प्रांतात चाललो होतो. माझ्यासोबत एक वरिष्ठ शासकीय अधिकारी होते. वाटेत त्यांना भूक लागली. मग काय, त्यांनी दोन नान विकत घेतले – एक खाल्ला; नुसता नान खाल्ला; दुसरा ठेवला गाडीत तसाच. 

 परतीच्या प्रवासात भूक लागली तेव्हा साताठ तास उघड्यावर ठेवलेल्या नानचा समाचार पुढे चालू.
मला नान आवडला पण एका दमात एक नान मी कधीच खाऊ शकले नाही. अफगाण लोकांचा आहार भरभक्कम असतो. त्यामुळे मी लाजतेय असं समजून ते मला आग्रह करत राहायचे.


इथं फळं भरपूर आहेत हे लक्षात आल्यावर माझा खाण्याचा प्रश्न आवाक्यात आला. भरपूर 'किवी' खाल्ले. आंबे पाकिस्तानमधून येतात. पण ‘आंब्याला कसल्या राष्ट्रवादाच्या चौकटी’ असं म्हणत मी आंबे खाल्ले. दूध, चीज, डबाबंद खाद्यपदार्थ, मॅगी इत्यादी मिळायचं मॉलमध्ये. तशाही माझे खाण्याचे फार नखरे नसतात; त्यामुळे एवढं  माझ्यासाठी पुरेसं होतं.
युएनचा पसारा मोठा आहे, हे दिल्लीत माहिती होतं – इथं तो मोठा असणं स्वाभाविक. मग इथं काही भारतीय भेटले. आशियाई विरुद्ध युरोपीयन, युरोपीयन विरुद्ध अमेरिकन, भारतीय विरुद्ध इतर आशियाई – असे बॉसच्या तक्रारी करणारे भरपूर लोक भेटले. देश कोणताही असो, बॉसबद्दल तक्रार सार्वत्रिक असते हे लक्षात आलं.
एक दिवस अस्मिता माझ्या खोलीत आली. टिपिकल दिल्लीवासी. मला म्हणाली, “शुक्रवारी रात्री कुठं जाऊ नकोस.” आता मी कुठं जाणार काबूलमध्ये? (पुढे कळलं की बरेच लोक सिक्युरिटीला न सांगता जेवायला वगैरे बाहेर जातात. एकदा शेजारच्या खोलीतली कोरियन माझ्या मागे लागली होती ‘जेवायला बाहेर जाऊ – आणि तेही खाजगी वाहनाने’ – मी गेले नाही!) पण अस्मिता मला हे का सांगतेय ते मला कळेना. मग ती म्हणाली, “ आपण श्री.... यांना निरोप देतोय त्याची पार्टी आहे. तू पण ये.”
“कोण आहेत हे गृहस्थ?” मी विचारलं.
“भारताचे राजदूत. त्यांची टर्म संपली इथली,” ती शांतपणे म्हणाली.
दिल्लीत होते तेव्हा मी असले काही समारंभ जवळून पाहिले होते आणि ते प्रचंड कृत्रिम आणि कंटाळवाणे असतात हे मला माहिती होतं. त्यामुळे मला या पार्टीत रस नव्हता.
“पण ते काही मला ओळखत नाहीत. खरं तर मी कुणालाच ओळखत नाही.” मी प्रयत्न केला. पण तो क्षीण  ठरला.
“ मी आहे ना तुझ्या ओळखीची. आणि इतरांशी ओळखी कशा होणार तू नाही आलीस तर?” अस्मिता. दिल्लीकर ठामपणाने.
“ठीक आहे. सिक्युरिटीची परवानगी घेते. ती मिळाली नाही, तर मात्र मी येणार नाही.” मी म्हणाले. ‘भारतीय दूतावास तालिबान टार्गेट असल्याने शक्यतो तिथं जाऊ नकोस, अगदीच गरज असली तर जा’ असा सल्ला (हुकूम!) जॉर्जने मला पहिल्या दिवशीच दिला होता.
आता अस्मिता खळाळून हसली. म्हणाली, “इथंच (आमच्या हॉटेलमध्ये) आहे पार्टी, काही गरज नाहीये परवानगीची. आणि हो, शाकाहारी पदार्थ पण सांगतेय मी खास तुझ्यासाठी.” 
सांगायला काहीही सबब उरली नव्हती आता मला.
मग गेले पार्टीत. बरेच लोक भेटले. नव्या ओळखी झाल्या. या पातळीवर कसे हितसंबंध निर्माण होतात, जपले जातात हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. काही नव्या गोष्टी कळल्या. काही नवं गॉसिप ऐकलं. वगैरे, वगैरे. राजदूत बरेच लोकप्रिय होते (आहेत) असं लक्षात आलं. माणूस साधा वाटला. पार्टीतल्या प्रत्येकाशी ते बोलले. भाषण थोडक्यात पण मुद्देसूद आणि सकारात्मक होतं त्यांचं.
त्या पार्टीतून परतताना एक लक्षात आलं की इथल्या माझ्या जगण्यात भवतालच्या समाजापासून एक तुटलेपण आहे. मी सध्या एका हस्तिदंती मनो-यात राहतेय. इथल्या सुखसोयी जोवर आहेत तोवर उपभोगाव्यात हे नक्की. पण त्यातच स्थिरावले तर आजवरचा प्रवास व्यर्थ ठरेल.
स्थिरता-अस्थिरता या व्यक्तिगत जीवनात एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कुठंही नव्याने स्थिरावताना आपल्यातलं ‘जुनं’ काय जपायचं आणि काय सोडून द्यायचं; नव्या- जुन्याची सांगड कशी घालायची हे नेहमीच एक आव्हान असतं! काबूलमध्ये स्थिरावताना मी ते आव्हान घ्यायला सज्ज झाले.  
क्रमश: