तुझ्या
बेफिकीर ऐटीचा
काही अंश
माझ्यात
नक्कीच उतरला आहे;
सलगीच्या
तुझ्या विविध त-हा
कदाचित मला
त्याच्याच बळावर
उपभोगता येत आहेत.
*********
प्रथमदर्शनीच
जीवलग सखा बनून जाण्याची,
अंतरंगाचा ठाव घेण्याची;
सा-यांना मोहात पाडून
स्वत: निर्मोही राहण्याची
तुझी किमया मला नको आहे.
जर अखेर नसायचेच
कोठे आणि कशातही
तर व्याप उभारण्याचा
निरर्थक खेळ कशाला पुनश्च?
*********
तुझ्या भव्य
प्रचंड अस्तित्त्वाने
बरेच काही पाहिले असेल;
पण तू जणू
त्यांच्या पल्याड -
सा-या अनुभवांना पेलून
दशांगुळे आत्ममग्न.
इतक्या उंचीवरून,
इतक्या विस्तारातून
तुला जे जग दिसते
ते कसे आहे
- मी न विचारताही
तू आस्थेने सांगतोस खरा!
******
तू कधीपासून आहेस?
काय घेऊन उभा आहेस?
कोणाचे काय देणे लागतोस?
काही सायास न करता
केवळ नुसते असण्यातून
असण्याला अर्थ लाभतो का?
- हे प्रश्न तुला पडत नाहीत?
की
या सा-याला भेदून जाणा-या
गाभ्याची खोल जाण
मला मुठीत पकडता येत नाही?
******
या सगळ्या खटाटोपात
कणाकणाने
जीर्ण होत चालला आहेस;
तुझे स्वत्व गमावत चालला आहेस
त्याबद्दल तुला काय वाटते?
जाऊ दे, असो!
तू ’वासांसि जीर्णानि...’
वगैरे ऐकवणार
हे मला
आधीच कळायला हवे होते!
******
इतक्या अवाढव्य
भौतिक पसा-यासह
तुला इकडे तिकडे
भटकता येत नाही -
याचे नाही म्हटले तरी
मला वाईटच वाटते.
तुझे बोट धरून
रोजच्या गर्दीत हिंडायला
कदाचित आवडले असते मला.
सारे मागे ठेवून
केवळ तुझी ओढ लेवून
तुला भेटणारी मी
आणि एरवी
माझ्या जगात वावरणारी मी
यात फरक आहे
- हे एव्हाना
तुझ्या लक्षात आलेच असेल.
हृदयांच्या नात्यांत
असले किरकोळ तपशील
मन मोडून टाकत नाहीत
- हे शिकते आहे मी तुझ्याकडून.
******
तुझी ही सात रूपे;
सात अवस्था, सप्त स्वर;
अग्नीच्या झळाळत्या सात जिव्हा;
अज्ञाताचा प्रदेश धुंडाळणारी
सात विराट पावले;
आकाशात अकस्मात उमलणारे
इंद्रधनुचे सात रंग;
कर्मयोगी सूर्याच्या रथाचे
सात अवखळ अश्व;
महारूद्राच्या नर्तनाने
डगमगणारे सप्त पाताळ;
समाधीमध्ये अलगद रूजलेले
ते सात ऋषीवर;
अजाणतेपणी वाहिलेले
वेदनेचे सात दगड;
ज्यांचा थांग नाही
असे सप्त समुद्र;
आणि मीलनास उत्सुक
सात खळाळते प्रवाह;
अव्यक्त असणारे
तुझे अन माझे
सात युगांचे नाते;
'सत्'च्या तेजाने उजळलेली
तुझी ही सात शिखरे.....
******
तू सप्त; तू व्यक्त.
तू तप्त; तू मुक्त.
तू आकाश.
तू प्रकाश.
तू प्राण.
तू आण.
तू काळाची जाण.
****
पंथ पुष्कळ झाले, आता
भटकंती झाली रगड;
त्रैलोक्याच्या नाथा, फिरून
एकवार दार उघड!!
सातपुडा, २५ नोव्हेंबर २००४