वर्ष: १९८७. ठिकाण: राळेगण सिद्धी. अण्णा हजारे तेव्हाही
प्रसिद्ध होते, पण आजच्यासारखे प्रसारमाध्यमांच्या गराड्यात नव्हते. त्या वर्षी
मला अण्णांना अनेकदा भेटायची संधी मिळाली होती. आम्ही आठ दिवसांच एक युवक शिबीर
राळेगणमध्ये घेऊ इच्छित होतो. त्याच्या परवानगीसाठी, पूर्वतयारीसाठी आणि प्रत्यक्ष
शिबिरात अण्णांना मी अनेकदा भेटले, त्यांच्याशी बोलले. शिबिराच्या काळात आठही दिवस
अण्णा राळेगणमध्ये होते; रोज एक तास ते आमच्या युवकांशी बोलायचे. एरवीही ते आमच्या
आसपास, हाकेच्या अंतरावर असायचे. कधीही त्यांच्याकडे गेले तर ते बोलायचे. त्यांच
बोलण सौम्य, मृदू, कधीही आवाज चढला नाही की कधी कपाळावर आठी उमटली नाही. शांतपणे
समजून घेऊन बोलायची त्यांची पद्धत होती तेव्हा. मी खूप केलय, मला सगळ कळतंय असा
त्यांचा अविर्भाव अजिबात नव्हता. पण हा माणूस विरोधाला नमणार नाही, संकटाला
घाबरणार नाही अशी साक्षही मिळत होती त्यांच्याशी होणा-या संभाषणातून.
ते आठ दिवस राळेगणमध्ये आम्ही लाडक्या पाहुण्यांसारखे
राहिलो. तसं पाहिलं तर अण्णांच्या समोर आम्ही तेव्हा नगण्य होतो – धडपडणारे युवक
यापलीकडे आमच काही कर्तृत्व नव्हत. पण अण्णांनी आमची खूप काळजी घेतली. त्यांच्या
साधेपणाने, त्याच्या त्यागाने, त्यांच्या मृदू स्वभावाने त्यांनी आमच्या
शिबिरातल्या सगळ्यांची मन जिंकून घेतली. मी तशी कोणाच्या पाया वगैरे कधी पडत नाही.
पण राळेगणमधून निघताना मी अण्णांना वाकून नमस्कार केला होता हे आजही मला आठवत.
*****
वर्ष २०११. ठिकाण: दिल्ली. रविवार, २८ ऑगस्टची सकाळ. सगळ्या
देशाच लक्ष आज इथ असण स्वाभाविक होत. अण्णा हजारे सकाळी दहा वाजता उपोषण सोडणार हे
प्रसारमाध्यमांनी आधीच जाहीर केल होत. गर्दी असणार भरपूर हा अंदाज येणा-या
लोकांनाही होता – आणि बसायला पुढे जागा मिळावी म्हणून लोक लवकर आले होते. मागच्या
शनिवारी मी इथे येउन गेले होते – त्यावेळची रांग लक्षात घेऊन मीही आज लवकर आले
होते.
नवी दिल्ली मेट्रो स्थानकावर फारशी गर्दी नव्हती – म्हणजे
माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच होती. बहुतेक सगळे बाहेर गावाहून आलेले प्रवासी होते.
स्थानकाच्या बाहेर कमला मार्केटच्या परिसरात बसेस उभ्या होत्या, हातात अवजड सामान
घेतलेले नवखे प्रवासी नेमकी कोणती बस पकडायची या चिंतेत होते. कोणत्याही रेल्वे
स्थानकाबाहेर रोज जे दृश्य दिसत, त्यापेक्षा वेगळ इथे काहीही नव्हत. मी चुकून
दुस-याच ठिकाणी तर नाही ना उतरले अशी माझ्या मनात आलेली शंका क्षणभरात विरून गेली
कारण तिरंगा आणि ‘मी अण्णा आहे’ अस इंग्रजी-हिंदीत लिहिलेल्या टोप्यांची विक्री
करणारे लोक, मुख्यत्वे लहान मुल आणि स्त्रिया लगेचच समोर आल्या. आज आंदोलनाचा
शेवटचा दिवस आहे हे त्यांना माहिती होत अस दिसलं – कारण आज मिळेल त्या भावात
हातातला माल विकून मोकळ व्हायची त्यांची लगबग दिसत होती. रस्त्यावर सामोसे आणि इतर
खादय पदार्थही विकले जात होते. जर आंदोलनाचा मुद्दा एखाद्याला माहिती नसेल तर
एकंदर वातावरण एखादया राजकीय सभेच वाटलं असत!
मागच्या शनिवारी मला बराच वेळ रांगेत उभ राहायला लागल होत.
म्हणून रविवारचा दिवस असूनही मी लवकर इकडे आले होते. यावेळी रांग फार मोठी नव्हती –
मी पाच मिनिटांतच रामलीला मैदानावर पोचले, पावसाने निम्म मैदान अजून चिखलात होत;
त्यामुळे ‘मुंगीला शिरायलाही जागा नसण्याइतकी गर्दी असल्याची’ वृत्तपत्रांची बातमी
दुस-या दिवशी वाचून मला हसायला आलं. माध्यम किती अतिशयोक्ती करतात – चांगली आणि
वाईटही हे अशा प्रसंगीच माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या लक्षात येत.
रामलीला मैदान अर्थात प्रचंड मोठ आहे. त्यामुळे अर्ध्या भरलेल्या
मैदानात सकाळी आठ वाजताच त्यादिवशी हजारोंची गर्दी होती. मी आपली गर्दीच्या एका
भागात स्वत:साठी जागा करून घेत होते, तेवढयात ‘स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था
असल्याच’ मला सांगण्यात आलं. धक्के कमी खावे लागतील या अपेक्षेने मी तिकडे गेले
खरी पण अण्णा दिसल्यावर गर्दी त्यांना बघायला जागा सोडून उन्मादाने उभी राहिली
तेव्हा स्त्रियांच्यासाठी केलेल्या व्यवस्थेभोवतीचे बांबू कोसळून पडले आणि गर्दीत
पुरुषांचे धक्के खाण काही चुकल नाही. पण ही अर्थातच पुढची गोष्ट झाली.
सभास्थानीच वातावरण एकदम भावूक होत. जिकडे तिकडे तिरंगा
लहरत होता, देशभक्तीपर गाणी होती, घोषणा होत्या. स्त्रिया बसल्या होत्या त्या
भागातही घोषणा चालू होत्या. कोणी उभ राहिलं की, स्वयंसेवक ताबडतोब येऊन ‘बसून
घ्यायला’ सांगत होते. सगळ कस बराच काळ शिस्तीत चालल होत. बसायची सवय आता लोकांना
फारशी राहिली नसल्याने, नऊच्या आसपास चुळबूळ सुरु झाली. तेवढयात टी.व्ही. कॅमेरे इकडे
वळले आणि एवढा वेळ शिस्तीत बसलेली जनता उधळली. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीची
लोकांना किती हाव असते, त्याच एक विलक्षण दर्शन त्या तासाभरात मला झालं. वय विसरून
स्त्रिया धावत होत्या (याचा अर्थ फक्त स्त्रिया अस वागत होत्या असा मात्र नाही,
पुरुषांच्या बाबतीतही हेच घडत असणार, मी ते त्यावेळी पाहिलं नाही इतकच!),
देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर नाचत होत्या. पुढे बसलेल्या गर्दीला ढकलत मागून
पुढे येत कॅमेरासमोर जाण्याची अहमहिका शिसारी आणणारी होती. तीच अवस्था पिण्याच्या पाण्याचे पाउच (अर्थातच फुकट) मिळवण्यासाठी झाली.
प्रसंग कोणताही असो, लोकांचा स्वार्थ काही सुटत नाही हे पुन्हा एकदा लक्षात आलं! गर्दीच्या वेडेपणाची ही केवळ सुरुवात होती.
अण्णा आल्यावर ती सगळी गर्दी एकदम पुढे झेपावली. सगळा गोंधळ
माजला. संसदेला ‘जन संसद’ पुरून उरेल याची ग्वाही मला पुन्हा एकदा त्या सकाळी
मिळाली. ‘इतक्या लांबून काही नीट दिसणार नाही, सगळे बसले तर सगळ्यांना व्यासपीठ
नीट दिसेल’ अस सांगता सांगता आमचा काही जणींचा घसा सुकून गेला. पण इथ अगदी भारतीय
मनोवृत्तीच दर्शन झालं – ती खाली बसत नाही तर मी तरी का बसू? – असा प्रत्येकीचा
प्रश्न होता. नियम पालनाची, स्वयंशिस्तीची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, इतर
कोणी नियम पाळत नसेल तेव्हाही स्वत:चे जीवनमूल्य म्हणून काही गोष्टी पाळायला
हव्यात हे कोणाच्या गावीही नव्हते. लोकपाल आला तरी ‘इतर भ्रष्टाचार करतात, मग मीच
का नुकसान करून घेऊ माझ पैसे न देऊन?” असा प्रश्न विचारणारे लोक तरीही संख्येने
अगणित असतील हे लक्षात येऊन मला फार निराश वाटलं.
श्री. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाची सुरुवात ‘आभार
प्रदर्शनाने’ झाली. गेल्या काही महिन्यांत त्यांच्याबद्दल बरच काही वाचलं होत आणि
म्हणून मी त्यांना ऐकायला उत्सुक होते. पण माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. म्हणजे
‘प्रसारमाध्यमांचे आभार’ मला आवडले नाहीत तरी मी समजू शकते. पण ‘अनेक दिल्ली पोलिस
दिवसभर गणवेषात काम करत आणि संध्याकाळी गणवेष उतरवून आंदोलनात सामील होत’ हे तिथ
सांगणारे केजरीवाल मला तरी प्रगल्भ वाटले नाहीत. आता बिचा-ऱ्या त्या पोलीसांच्या
मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणजे झालं!
आणखी एक गोष्ट म्हणजे अण्णांसोबत उपोषणाला बसलेले तीस लोक
कुणाच्याच खिजगणतीत नव्हते. त्यांच नाव घेऊन त्यांच कौतुक करण तर दूरच, त्यांचा
उल्लेखही सगळ्यात शेवटी घाईघाईने (बहुधा कोणीतरी लक्षात आणून दिल्यावर) केजरीवालांनी
केला तेही खटकल. अनाम वीरांना जनता ‘नंतर’ विसरते अस नाही तर त्यांच्या
जीवनकाळातही विसरते हेच दिसलं तिथ! शिवाय ‘आम्ही काही सगळे राजकीय नेते वाईट आहेत
अस म्हटल नव्हत कधी’ अशी सफाई द्यायची काय गरज होती? विशेषत: आदल्या संध्याकाळी
सरकारच्या ज्या प्रतिनिधींबरोबर व्यासपीठावर सगळे उभे होते, त्यातून
अण्णांच्या सहका-यांच मतपरिवर्तन जगजाहीर
झालं होतच की!
केजरीवालांनी ‘संध्याकाळी इंडिया गेटवर विजय साजरा करायला
जमा’ सांगितलं ते मला विनोदी वाटलं. कसला आणि कोणाचा विजय झाला होता? मला तर वाटत
की रोजच्या सवयीने केजरीवालांनी ती घोषणा केली असेल. अन्यथा दिल्लीच्या वर्तुळात
वावरणा-या केजरीवाल आणि किरण बेदी यांना मागच्या चार पाच दिवसांतल्या घटनांचा अर्थ
समजला नसेल अस मानण म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेबाबत शंका घेण्यासारखच आहे!
तिथ जमलेल्या लोकांमध्ये ‘अण्णांनी उपोषण सोडलं एकदाच, बर
झालं’ अशीच भावना जास्त होती. चेंगराचेंगरी होताना स्त्री पुरुषांच्या गर्दीतले
संवाद केजरीवाल आणि सहका-यांनी अवश्य ऐकायला हवे होते. नंतर बाहेर पडतानाही “अण्णांनी
उपोषण सोडल ते बर केलं, उगाच या म्हाता-या माणसाला मारलं असत यांनी’ अस लोक म्हणत
होते आणि सहमतीचे सूर उमटत होते. एकजण म्हणाला, “अण्णा हुशार आहेत. जन लोकपाल पास
होवो अथवा न होवो, आपल्यासारख्या फालतू लोकांसाठी जीव गमावण्यात शहाणपण नाही हे
त्यांना एकदाच लक्षात आलं ते चांगल झालं!” भ्रष्टाचार, जन लोकपाल हे मुद्दे मागे
पडून अण्णांची तब्येत हाच मुद्दा होता. अण्णा इतक्या खणखणीत आवाजात बोलत होते
याबद्दल अनेकांना आनंद वाटत होता पण आश्चर्यही वाटत होत!
अण्णा उपोषण सोडताना व्यासपीठावर दोन लहान मुली होत्या
त्यांच्या सोबत – सिमरन आणि इकरा. सिमरन दलित आहे आणि इकरा तुर्कमान गेट परिसरात
राहते (म्हणजे मुस्लिम आहे) हे केजरीवालांनी प्रसारमाध्यमांच लक्ष वेधून घेत
अधोरेखित केल. सात वर्षाच्या मुलींचा असा वापर पूर्ण अयोग्य वाटला मला. भ्रष्टाचार
म्हणजे काय, संसद म्हणजे काय, लोकपाल म्हणजे काय .. हे सगळ कळण्याच त्यांच वय
नाही. ती आत्ता त्यांची जबाबदारीही नाही. केवळ राजकीय नेते अशी ‘सहभागाची’ नाटकं
करतात अस माझ आजवर मत होत! जात आणि धर्म यांच्या नावावर माणसांना ओळखण्याच,
त्यांना स्थान देण्याच आपण टाळू शकलो नसतो का या आंदोलनात? दलित समाज बाबासाहेब
आंबेडकरांच नाव घेतलं की खूष होतो अस समजण म्हणजे आंबेडकर केवळ दलितांचे आहेत असा
संदेश देण आणि दलितांना मूर्ख समजण! ‘आम्ही लाच देणार नाही आणि घेणार नाही’ ही
सार्वजनिक शपथ इतकी निर्जीव होती, की ती कोणाच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल
तर तो चमत्कार मानावा लागेल या शतकातला! एकदा लोकानुनय करायचा म्हणला की कशी तडजोड
करतात माणस याचा उत्तम नमुना मला रामलीला मैदानावर त्या सकाळी पहायला मिळाला.
गर्दी इतकी अनावर होती की ती ना स्वयंसेवकांच्या ताब्यात
होती ना केजरीवालांच्या नियंत्रणात होती! “तुम्ही आता शांत बसला नाहीत तर अण्णा
उपोषण सोडणार नाहीत, इतके दिवस केल तसं आणखी काही तास ते उपोषण करू शकतात’ ही
केजरीवालांची धमकी त्यांची हतबलता दाखवणारी होती. तिथ आलेले ‘समर्थक’ कसे होते
याची झलक दाखवणार वाक्य होत ते! या गडबडीत अण्णांनी उपोषण कधी सोडलं ते अनेकांना
कळलच नाही. अण्णांच भाषण संपल तरी ‘ते कधी सोडणार उपोषण?’ अशी चौकशी लोक करत होते.
अण्णा काय बोलले ते आधीच पेपरमध्ये येऊन गेलय – त्यामुळे
त्याबद्दल काही लिहीत नाही मी. अण्णांच भाषण चालू असताना गर्दीचा एक लोंढा
मंडपाच्या बाहेर पडत होता आणि नवा लोंढा आत येत होता. जाणारा लोंढा ‘अण्णा की
रसोई” आणि ‘अण्णा की मुफ्त चाय’ या दोन ठिकाणी रांगेत उभ राहत होता. उपोषण करणा-या
लोकांच्या समर्थकांसाठी फुकट खाण आणि चहा वाटण्याच काय प्रयोजन होत हे समजण माझ्या अल्प मतीच्या
पल्याड होत! या समर्थकांना आंदोलनाच्या पुढच्या दिशेत, कार्यक्रमात काही गम्य
नव्हत! चेंगराचेंगरीत बाजूला होत होत मीही तोवर मंडपाच्या शेवटच्या टोकाला येऊन
पोचले होते. येणारी गर्दी घोषणा देत होती आणि जाणारी गर्दी त्यांना प्रतिसाद देत
होती; अण्णा काय बोलत होते त्याकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हत. मला मात्र अण्णांनी
एकदाही ‘वंदे मातरम’ म्हटलं नाही त्यांच्या पंचवीस मिनिटांच्या भाषणात हे जाणवलं.
‘जंतर मंतर’ आंदोलनाच्या काळात एका संध्याकाळी ‘वंदे मातरम’
म्हणणारा मुस्लिम तरुणांचा एक गट मला भेटला होता, मी त्यांच्याशी या विषयावर
बोललेही होते. “हम भी तो इस मिटटीसे पले हुये है” हे त्यांचे भावूक आणि हृदयातून
आलेले उद्गार आजही मला आठवतात. अशा सगळ्या तरुणांना – मग ते हिंदू असोत की मुसलमान
– आपण पुन्हा एकदा धर्ममार्तन्डाच्या ताब्यात देणार आहोत का? – अशी मला शंका येते.
युवकांची जागृती वगैरे सगळ सुरुवातीलाच संपून जाईल अशा आपल्या वागण्याने.
******
राळेगणमध्ये पंचवीस वर्षांपूर्वी मला भेटलेले आणि कळलेले
अण्णा बदलले आहेत का असा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत राहिला. म्हणजे एका
बाजूने अण्णा तसेच आहेत – साधे, सौम्य बोलणारे, निश्चयी, सरळ, काहीसे भोळेभाबडे,
दुस-यांसाठी त्याग करणारे, विरोधाला न नमणारे. त्यांच्या या गुणांवर तर देशातले
इतके लोक फिदा झाले. कधी नाही ते निस्वार्थी नेतृत्व लाभलेय अशी अनेकांची भावना
झाली – ज्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.
पण इथे व्यासपीठावर बसलेले, कॅमेऱ्याच्या गराड्यात
लोकांपासून दूर असलेले अण्णा वेगळे वाटत होते. ‘मी अण्णा आहे’ हे छापलेले
स्वीकारणारे; स्वत:चा चेहरा तिरंग्याच्या मध्यभागी टी शर्टवर छापायला परवानगी
देणारे; स्वत:वर रचलेल गाण रामलीला मैदानावर इतरजण गाताना विनातक्रार ऐकणारे;
ज्यांच्याबद्दल भ्रष्टाचाराची तक्रार आहे अशा लोकांबरोबर व्यासपीठावर उभे राहणारे
(भले मग ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे असोत!); उपोषण करणा-या सहका-यांना
विसरणारे: एके काळी विवेकानन्दाबद्दल भरभरून बोलणारे पण आता ‘युवाशक्ती ही
राष्ट्रशक्ती’ आहे अस म्हणताना विवेकानन्दान्चा साधा उल्लेखही न करणारे; हे अण्णा
तेच आहेत का असा मला संभ्रम पडला. हजारोंच्या, लाखोंच्या गर्दीत मला अण्णा एकदम
परके, अनोळखी वाटले. माझ्या बाजूने त्यांच्याशी माझ जे नात होत, मी जे आजवर जपल
होत – ते एकदम तुटून गेल्यासारख वाटलं मला
त्या क्षणी!
परत एकदा राळेगणमध्ये जाऊन अण्णांना भेटायला हव. माझ्या या असल्या
सगळ्या प्रश्नांची उत्तर १९८७ मध्ये देत
होते, तशीच पुन्हा एकदा अण्णा हसत,
शांतपणे, विचारपूर्वक देतील अशी मला आशा आहे. निदान त्यापूर्वी मी त्यांच्याबद्दलच
माझ मत बदलण्याची घाई करू नये. माणसाच मूळ जिथं रुजलेल असत, तिथ तो माणूस खराखुरा
कळतो. तिथच त्या माणसाला शोधायला हव – रामलीला मैदानावरची गर्दी ही
काही योग्य जागा आणि वेळ नाही त्यांना समजून घेण्याची!
या विषयावरच्या आणखी काही पोस्ट्स : मतभिन्नतेतून, जंतर मंतरलेल्या संध्याकाळी
या विषयावरच्या आणखी काही पोस्ट्स : मतभिन्नतेतून, जंतर मंतरलेल्या संध्याकाळी