ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, August 22, 2011

८६. मतभिन्नतेतून …..

पुन्हा एकदा सगळा  देश मतामतांच्या  गल्बल्यात अडकला आहे. यावेळचा विषय आहे ‘जन लोकपाल' अर्थात देशातल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन!


पण माझ्या मते या मत- मतमतांतराबाबत  जास्त काळजी करण्याचे काही कारण नाही. कोणताही विषय घेतला तरी त्यावर टोकाची वेगवेगळी मत आणि दृष्टिकोन असण्याची आपली परंपरा फार प्राचीन आहे. किंबहुना मतभिन्नता हे आपल्या  देशाच, आपल्या समाजाच एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. आपला देश, आपला समाज एकमुखाने बोलतो आहे अशी घटना इतिहासाला आठवते तशी शेवटची कधी घडली होती? 

गेल्या काही वर्षांतल्या अनेक बॉम्बस्फोटानंतर ? दंगलींनंतर ? कोसीच्या महाप्रलयात? नक्षलवादी हल्ल्यात? सुनामीने माजवलेल्या हाहाकारात? भूकंपात?  आणीबाणीच्या काळात? त्यांनतर ? १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्यात आणि फाळणीत? १९४२ सालच्या ‘चले जाव' आंदोलनात? १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीत? शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत? राणा प्रतापच्या काळात? गौतम बुद्धाच्या वेळी?  शंकराचार्यांच्या काळी? श्रीकृष्णाच्या काळात? रामाच्या राज्यात? उपनिषदांच्या वेळी? सिन्धु संस्कृतीच्या काळात? आर्यांच्या काळात? कधी आपण एकमुखाने बोलत होतो?

कोणत्याही सुधारणा घ्या – सामाजिक असोत, शैक्षणिक असोत, राजकीय असोत किंवा धार्मिक असोत – त्याला पाठिंबा  देणारे लोक समाजात असतात तसेच त्याबाबत शंका उपस्थित करून त्याला विरोध करणारेही सर्व काळात असतात. कोणता बदल आजवर १०० टक्के लोकांच्या सहभागाने आणि पूर्ण सहमतीने झाला आहे? नवा विचार नेहमी उपेक्षिला जातो, त्याची थट्टा होते, त्याला विरोध होतो आणि त्या विचाराचा प्रसार करणा-यांना धमक्या दिल्या जातात – हे अगदी याच क्रमाने घडते असे नाही, पण टप्पे सगळे असतात जवळजवळ हेच. हे पुन्हपुन्हा घडताना दिसते. मोठी माणसे या सगळ्याला तोंड देत त्यांचा विचार पुढे नेत राहतात – जोवर मोठ्या संख्येने समाज त्या विचाराचा स्वीकार  करत  नाही तोवर! फार कमी लोकांना  त्यांचा विचार समाजाने स्वीकारला आहे हे पाहण्याचे समाधान लाभते, अनेकानां त्याविना काळाच्या पडद्याआड जावे लागते. काही तर पूर्णपणे समाजाच्या स्मरणातून जातात – त्यांचे जगणेही एकाकी असते आणि मरणेही. ते गेल्यावर अनेक वर्षांनी समाजाला त्यान्चे मोठेपण समजते. असा हा आपला आजवरचा इतिहास असल्यामुळे एकदम कधी नाही ते भ्रष्टाचार निर्मूलनासारख्या मुद्यावर आपल्या देशात वैचारिक एकवाक्यता असावी अशी अपेक्षा करणे अवाजवी ठरेल.

गेले काही महिने माझ्या आसपास अण्णा हजारे आणि त्यांचे आंदोलन या विषयावर सतत चर्चा चालू आहे.             महाराष्ट्रातल्या माझ्या ओळ्खीच्या अनेक लोकांना वाटत, की या आंदोलनाचा केंद्रबिंदू (म्हणजे अण्णांच उपोषण) दिल्लीत आहे – आणि मी सध्या दिल्लीत आहे - त्यामुळॆ मी त्यात सहभागी होत असणारच. दुस-या बाजूने दिल्लीतल्या माझ्या ओळखीच्या लोकांना वाटत की, अण्णा हजारे मराठी आहेत आणि मीही मराठी आहे; त्यामुळॆ मी त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत असणार. (श्री. अरविन्द केजरीवाल हरयाणात वाढले म्हणून दिल्लीतल्या प्रत्येक हरयाणवी माणसाने यात सामील व्हावे अशीही दिल्लीकर अपेक्षा करतात की नाही हे मला माहिती नाही! ) त्यामुळॆ गेल्या काही महिन्यांत मी दर दहा संवादांत किमान तेरा वेळा 'जन लोकपाल आणि  अण्णा हजारे' याबद्दल बोलत असते – हो, तेरा वेळा; कारण आपल्याकडे लोकांना तोच तोच मुद्दा घोळवत बसायला आवडत!

****
मी रामलीला मैदानाकडे चालले आहे – जिथे अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी ‘जन लोकपालच्या’ मागणीसाठी उपोषण करत आहेत. नवी दिल्ली मेट्रो स्थानकात शेकडो, नाही हजारो लोक आहेत – ते सगळॆ रामलीला मैदानावर चालले आहेत. गर्दीचा लोंढा मला आपसूक बाहेर पडण्याची दिशा दाखवतो आहे . स्थानकात प्रचंड  गर्दी आहे. मेट्रोने व्यवस्था नीट चालावी म्हणून जास्तीचे लोक स्थानकात नेमले आहेत. एवढ्या गर्दीला सांभाळण्याचे काम ते चांगले करत आहेत. मेट्रो स्थानकात घोषणा देणारा जनसमूह हे एक अनोखे द्रुश्य आहे. स्थानकात प्रवेश करणारे आणि स्थानकातून बाहेर पडणारे लोक ‘वन्दे मातरम' , ‘इन्किलाब झिन्दाबाद' अशा घोषणानी एकमेकांना प्रेरित करत आहेत. ती जणू ‘खूण पटवण्याची’ एक पद्धत आहे. स्थानकाबाहेर पडल्यावर “रामलीला मैदान कोणत्या बाजूला आहे हो?” अस मला कुणाला विचारण्याची गरज नाही – सगळी गर्दी त्याच दिशेने चालली आहे. सगळे रस्ते जणू रामलीला मैदानाला जाऊन मिळताहेत!

पण मी नुकतीच Connaught Place परिसरात जाऊन आले आहे आणि तिथलही दृश्य माझ्या नजरेसमोर आहे. राजीव चौक मेट्रो स्थानकात शेकडो, नव्हे हजारो लोक आहेत. ते स्थानकात प्रवेश करत आहेत आणि स्थानकातून बाहेर जात आहेत. त्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाशी, परिसरात चालू असलेल्या उपोषणाशी काही देणे घेणे नाही. मी त्या परिसरात अर्धा तास फिरते. हजारो लोक मला वेगवेगळ्या चमचमत्या  दुकानांपाशी दिसतात. त्यांचे ‘संघर्षाचे’ मुद्दे वेगळे आहेत – McDonalds  मध्ये  जाव की Subways मध्ये? कोल्ड कॉफी प्यावी, की मिल्क शेक? आईसक्रीम आत्ता खाव, की सिनेमानंतर? सोनीचा laptop घ्यावा आधी, की रीबोकचे बूट? ते सगळे भारतीयच आहेत – पण India Against Corruption त्यांच्या विषयपत्रिकेवर नाही, त्यांच्या विचारांच्या परिघात नाही. मी एक दोन जणांना ‘के’ block पासून निघणा-या मोर्चाविषयी विचारते – पण त्यांना अर्थातच काहीही माहिती नाही.


****
तर रामलीला मैदानाकडे!  रस्त्याच्या दोन्ही बाजूला  तिरंगा विक्रीला आहे. तो वेगवेगळ्या आकारांत आणि वेगवेगळ्या स्वरूपांत उपलब्ध आहे.म्हणजे  wristband आहे, बिल्ला आहे, खिशाला लावायचे छोटे ध्वज आहेत आणि हवेत लहरवण्यासाठीचे मोठे ध्वजही आहेत,उपरण्यासारखे गळ्याभोवती लटकवायचे पट्टे आहेत, आणि नव्या रीतीचे hair bands आहेत. . जशी तुमची इच्छा आणि ऐपत, तशी तुम्ही खरेदी करू शकता. गांधी टोप्या (तिला खर तर नेहरु टोपी म्हणायला पाहिजे अस मला नेहमी वाटत!) – ज्यावर ‘मी अण्णा आहे' असा मजकूर हिन्दी आणि इन्ग्रजी भाषेत लिहिलेला आहे – विक्रीला आहेत. लोक मोठ्या प्रमाणावर या वस्तू खरेदी करताहेत. ते पाहून विक्री करणारी लहान मुले आणि    स्त्रियांचे चेहरे फुलले आहेत. भारत  भ्रष्टाचारमुक्त होवो अथवा न होवो, या विक्रीतून त्याना दोन वेळचे पोट भरण्याइतके पैसे मिळत आहेत हे महत्त्वाचे! त्यांच्या दृष्टीने एखादी राजकीय सभा अथवा धार्मिक कार्यक्रम आणि हे आंदोलन यात काहीच फरक नाही. जेथे जे विकते तेथे ते विकायचे असे त्यांचे धोरण आहे . दोन चार दिवस धंदा बरा होतो आहे हेच त्यांचे सुख आणि समाधान.

मैदानात प्रवेश करायचा तर मोठी रांग आहे. एप्रिल महिन्यात जंतर मंतरमध्ये जाणे – येणे फार सोपे होते, गर्दीही इतकी नसायची. तेव्हा पोलिस होते हजर, पण पडद्याआड  होते जणू. आता इथे मात्र सुरक्षा व्यवस्था जास्त कडक आहे. bag  मशीनद्वारे तपासल्या जाताहेत आणि माणसान्चीही सुरक्षा तपासणी होते आहे. काही दुर्घटना होण्यापेक्षा आधीच काळ्जी घेणे हे जास्त चांगले. तशीही दिल्लीतल्या लोकांना पदोपदी सुरक्षा तपासणीची आता सवय झाली आहे म्हणा. हे आपल्या भल्यासाठी आहे हे लोक जाणतात त्यामुळे सगळे जण पोलिसांना सहकार्य करत आहेत.

काही लोकाना इतका वेळ रांगेत थांबायची सवय नाही. ते रांग मोडून मधेच पुढे घुसतात. माझ्यासारखे काही लोक त्याना ‘अशी रांग मोडून पुढे जाणे म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे’ असे सुनावतात. त्यावर ते थोडे कसनुसे हसतात पण पुढची जागा काही सोडत नाहीत. आम्ही तो विषय लावून धरतो तेव्हा रांगेतले इतर लोक “जाऊ द्या हो, एवढ्या तेवढ्याने काय फरक पडतो" अशी आमची ‘समजूत' घालतात.  मनमानी करणारे लोक आणि ती मुकाट्याने स्वीकारणारे लोक, साधे नियम मोडणारे लोक आणि तो हसत स्वीकारणारे लोक – अशा समर्थकांच्या बळावर हे आंदोलन कसे काय दीर्घकाळ चालणार असा मला प्रश्न पडतो! India Against Corruption ची ‘ जन लोकपालच्या ‘पुढे जाऊन काही नक्की विचारप्रणाली तरी आहे का हे जरा बघावे लागेल.

मैदानात मला तीन तरूण मुली आणि दोन तरुण दिसतात. ते स्वत:च्या पिशवीतून प्लास्टिक bag  काढतात आणि भोवतालचा कचरा त्यात भरायला लागतात. ते ‘आय ए सी’ चे स्वयंसेवक आहेत का अस मी त्यांना विचारल्यावर ते ‘नाही' म्हणून सांगतात. पण या ठिकाणी असा कचरा पसरणे योग्य नाही या भावनेतून ते आपण होऊन स्वच्छतेचे काम करताहेत. मला त्या तरूणांच, त्यांच्या स्वयंप्रेरणेच, त्यांच्या समजूतदारपणाच  मनापासून कौतुक वाटत. 

मला  आणखी एक रांग दिसते. कसली आहे ती – मोर्चासाठी नाव नोदवायची आहे की काय - म्हणून मी चौकशी करते. मग कळत की, कोणीतरी तिथ बिस्किटांचे पुडे वाटतय – अर्थात फुकट! लोकांची मोठी रांग आहे तिथ आणि एकापेक्षा जास्त पुडे मिळवायचा अनेकांचा प्रयत्न आहे.  गरज नसताना जास्त पुडे जमा करणारे लोक कसे काय भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहणार असा मला पुन्हा प्रश्न पडतो. पाण्याचे विनामूल्य वितरण मी समजू शकते अशा प्रसंगी  – पण बिस्किटांचे काय प्रयोजन?
***
काही तासानंतर मी रामलीला मैदानाच्या बाहेर पडते. मेट्रो स्थानकाबाहेर मला एक ‘फूड प्लाझा’ दिसतो. मी कॉफी प्यायला तिथ जाते. बरीच गर्दी आहे तिकडे. एका टेबलापाशी दोन स्त्रिया बसल्या आहेत – तिथ दोन खुर्च्या रिकाम्या आहेत. मी त्यांची  परवानगी घेऊन तिथ बसते. मी सहज विचारते, “तुम्ही पण रामलीला मैदानवर जाऊन आलात का?” “छे, नाही गेलो,” त्या हसत उत्तरतात. त्या दोघी आई आणि मुलगी आहेत. आई पुढे म्हणते, “जाईन म्हणते मी एखाद्या दिवशी. काही interesting आहे का तिथ?” मला तिच्या प्रश्नाचा अर्थ कळत नाही; interesting  म्हणजे  काय  म्हणायचय  त्यांना?  मी नुसतीच हसते.  तरूण मुलगी म्हणते, “कामधंदा नसलेले रिकामटेकडे लोक जातात तिकडे, मला नाही वेळ असल्या गोष्टींसाठी .” मग मी नुकतीच तिकडून येते आहे हे लक्षात येऊन ती चपापून गप्प बसते.

काउन्टरवरच्या बाईंना मी विचारते, “कस काय चाललय एकंदरीत ?” हा प्रश्न तसा निरर्थकच म्हणायला हवा. पण ती उत्साहाने म्हणाली, “यामुळे जोरात चाललाय आमचा धंदा” – इतक्या प्रामाणिक प्रतिक्रियेवर पुढ काय बोलायच ते मला कळत नाही आणि मी पुन्हा एकदा नुसतीच हसते.

***
एकंदरीत  काय तर विभिन्न दृष्टिकोन असणारे आणि विभिन्न प्राधान्यक्रम असणारे लोक आहेत. वेगवेगळी मत असणारे आणि वेगवेगळ्या विचारांशी संलग्न असणारे लोक आहेत. विविध प्रकारच्या अपेक्षा असणारे लोक आहेत आणि विविध प्रकारची स्वप्न असणारे लोक आहेत. लोकांची गुंतवणूक  वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि उत्तरदायी असण्याच्या त्यांच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. लोकांचे समजून घेण्याचे स्तर वेगवेगळे आहेत आणि जबाबदारी घेण्याची तयारीही वेगवेगळी आहे.

एका बाजूने असे दिसते की अण्णांचे आंदोलन एप्रिल महिन्याच्या एक पाऊलही पुढे गेलेले नाही, आणि दुस-या बाजूने या आंदोलनावर टीकेची झोड उठली आहे. संसदेचे सार्वभौमत्त्व, लोकशाही प्रक्रिया, नागरिक संघटनांची भूमिका याबाबत सगळीकडे चर्चा चालू आहे. 

यातला एक गमतीचा भाग म्हणजे आंदोलनकर्ते आणि विरोधक दोन्हीही बाजू संख्येच्या पाठबळाबद्दल बोलताहेत. म्हणजे आंदोलनकर्ते सांगतात की, आम्हाला इतके इतके missed calls आले  आणि इतक्या मोठ्या संख्येने विविध ठिकाणी लोक मोर्चात सामील झाले. पण ते विसरतात की  missed calls देणे हे श्वासासाठी फुकट मिळणा-या हवेसारखे आहे – त्याचा कोण हिशोब ठेवतो? मोर्चात आणि उपोषणाच्या जागी येणारे लोक दोन तीन तास थांबतात  माझ्यासारखे  आणि मग आपापल्या कामाला निघून जातात. आमच्यासारख्यांच्या निष्ठेची काय खात्री? आंदोलनाचे टीकाकार म्हणतात की यात फक्त मध्यमवर्गाचा सहभाग आहे आणि जे खरे शोषित आणि पीडित आहेत ते यात सामील नाहीत. पण टीकाकार हे विसरतात की, कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात छोटीच असते आणि त्यात कमीच लोक  प्रारंभी सामील असतात . एखाद्या व्यक्तीने मांडलेल्या मताला दुस-या कोणाचा पाठिंबा नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की ते मत अथवा तो विचार पूर्णतया  चुकीचा  आहे – कदाचित ती व्यक्ती काळाच्या फार पुढचा विचार करत असण्याचीही शक्यता आहे!

या सगळ्या चित्रविचित्र घटना आणि घडामोडी लक्षात घेऊनही मला असे दिसते आहे की, आंदोलनाला एक वेगळे बळ मिळते आहे. गेले सहा महिने भ्रष्टाचाराचा विषय सातत्याने  लोकांसमोर ठेवणे हे एक मोठे यश मानायला हवे. दोन तीन तासांपुरते का होईना पण तरुण आणि तितक्याच प्रमाणात प्रौढ माणसे आंदोलनात सहभागी होत आहेत हेही एक मोठे यशच आहे. तिरंगा लहरविण्यात लोकाना अभिमान वाटतो  आहे ही चांगली बाब आहे. १५ ऑगस्ट  आणि २६ जानेवरी हे दोन नेहमीचे दिवस वगळता इतर दिवशीही भारताची आठवण लोकांना आहे, त्याबद्दल बोलले जात आहे हे    कौतुकास्पद आहे. संसदेचे सार्वभौमत्त्व, संसदेचे काम, लोक संघटनांची भूमिका, स्वयंशासन अशा गोष्टींवर गांभीर्याने  चर्चा होत आहे हेही एक मोठे यश आहे.  काही लोकांना यामुळे सामाजिक कामात सहभागी होण्याची, योगदान देण्याची संधी उपलब्ध  होत आहे  (असे  त्यांना  वाटते)  हेदेखील महत्त्वाचे आहे.  

आपल्यापैकी काही लोकांचा जन लोकपाल' आंदोलनाच्या पद्धतीला विरोध आहे आणि त्याबाबत ते आवाज उठवत आहेत. अशा लोकांना ‘देशद्रोही’ असे शेलके विशेषण न लावता आपण त्यांचे ऐकून घेत आहोत – आपल्याला  न आवडणा-या मताचाही आदर करत आहोत – हे तर माझ्या मते सर्वात मोठे यश आहे.
  
म्हणून मला अस वाटत, की आमची मत कितीही विभागलेली असोत, त्यातून समाज म्हणून, देश म्हणून, माणूस म्हणून आम्ही अधिक सामर्थ्यशील बनत आहोत!
**                                                                                                                                                                 
तुम्हाला कदाचित 'जंतर मंतरलेल्या संध्याकाळी' वाचायला आवडेल. 

9 comments:

 1. सुंदर लिहीले आहे. अगदी पटले. असाच अनुभव मला बंगळूरूला फ़्रीडम पार्क ला आला.
  आयटीवाल्यांची बैठक होती एका भागात. मी आयटीवाला म्हणून तिथे जाऊन बसलो. अतिशय छान, व्यवस्थित चर्चा चाललेली. हे काही पुढारी नव्हते. माझ्यासारखेच संगणकाचे कीडे होते. पण स्वयंस्फ़ूर्तीने एकत्र आलेले. तेथे पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरली. या बुधवारी मानवी साखळी बनवायचे ठरले. कार्यकर्ते म्हणून आपोआप हात वर येत होते. सगळे कसे योजनाबद्ध. जबाबदारीची अधिक प्रकर्षाने जाणीव या आंदोलनाच्या निमित्ताने आम्हा तरुण पिढीला होत आहे; हे सहज लक्षात येत होते.
  तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग ही एक जमेची बाजू.. देश एकत्र येतोय, लोकांचा आक्रोश बाहेर पडतोय ही एक मिळकत.

  ReplyDelete
 2. गौरी, :-)
  संकेतजी, मला वाटत तरुणांचा स्वयंसेवी सहभाग ही या आंदोलनाची सगळ्यात मोठी देणगी आहे देशाला

  ReplyDelete
 3. दोन्ही बाजूंची मतं ऐकून घेऊन, विचार करून अगदी छान शांत संयमीपणे मांडली आहेत तुम्ही.. नेहमीप्रमाणेच मस्त लेख !!

  ReplyDelete
 4. हेरंब, :-) ब-याच दिवसांनी इकड फिरकलात तुम्ही अस दिसतंय.

  ReplyDelete
 5. क्या बात है !..............रामलिलावर जावून आल्यासारखे वाटले. .....We are soo lucky that we R having leader like Anna ...........and U R very blessed that U could experience it ........

  Sameer is handling a very initiative from Nashik...............he is aggressive in that specific committee in Nashik,...he & his team prepared 100 leaders in Nashik who are accomplishing corner meetings at Nashik...... he is from RSS .....but RSS is not taking any steps.............so is handling in other groups..........presently he is one of the leading person in Nashik in this issue

  ReplyDelete
 6. आश्लेषा, समीरने यात पुढाकार घेतला आहे हे वाचून बर वाटलं. तू पण फक्त अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्ष सहभागी झालीस ना?
  समीरचं कौतुक आपण भेटू तेव्हा करेनच, तोवर माझी दाद त्याच्यापर्यंत पोचव :-)

  ReplyDelete
 7. सविता, स्वत: प्रवाहात सामील होऊन निरनिराळ्या अंगांनी एकाच घटनेचे अनेक पैलू अतिशय नेटकेपणाने मांडले आहेस. काहीही असले तरी इतक्या प्रचंड जनसमुदायाचे रस्त्यावर उतरणे व इतका काळ सतत एकाच गोष्टीचा एकमुखाने पाठपुरावा करणे हे फार महत्वाचे आहे.

  बाकी आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा धंदा कसा करावा ह्याचे गणित मांडून झर्रकन अमंलातही येते.

  ReplyDelete
 8. भाग्यश्री, हो, धंदा तर कशाचाही होऊ शकतो आपल्या देशात कारण खरच गरीबी खूप आहे. बाकी 'व्यक्ती तितकी मत' हे तर आहेच!

  ReplyDelete