ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 1, 2013

१६२. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग ९. अमृतसंचय

भाग .........

विवेकानंदांच्या वेदान्तावर ज्या ज्या विचारांचा प्रभाव आहे त्यांपैकी काही विचारांचा आढावा आपण यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये घेतला आहे. त्यात मुख्यत्वे भारतीय आचार्यांचा सामावेश होता. आणखी काही व्यक्तींचा आणि विचारांचाही विवेकानंदांवर बराच प्रभाव आहे, त्याचा आपण या ठिकाणी परामर्ष घेणार आहोत. निरनिराळया फुलांमधून मध गोळा करणा-या फुलपाखराची येथे आपल्याला आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे. अर्थात विवेकानंदांनी केवळ मधुसंचयाची भूमिका निभावून नेली नाही; तर वेदान्त विचारांना त्यांनी एक नवे परिमाणही प्राप्त करुन दिले आहे.

सर्व वेदान्त दर्शने प्रस्थानत्रयींवर आधारलेली आहेत हे आपण यापूर्वीच पाहिले आहे. यांपैकी ब्रह्मसूत्रे अथवा वेदान्तसूत्रांचा फार मोठा (थेट) प्रभाव विवेकानंदांवर असल्याचे दिसून येत नाही - अप्रत्यक्षरीत्या तो आहे यातही काही संशय नाही. पण उपनिषदे आणि भगवद्गीता या दोन प्रस्थांनावर विवेकानंदांचा वेदान्तविचार मुख्यत्वे आधारलेला आहे.

उपनिषदे

'शक्ती! शक्तीची उपासना!, विवेकानंद म्हणतात, 'हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. हा एकच संदेश मी आयुष्यभर शिकत आलो आहे; हे बंधो! दुर्बल बनू नको! शक्तीची उपासना कर! बलाची उपासना हाच विवेकानंदांचा जगाला संदेश आहे. दुर्बल शरीरात रोग ठाण मांडून बसतो याची आपल्याला आठवण करुन देऊन विवेकानंद म्हणतात की आपण निर्भय बनले पाहिजे. विवेकानंद म्हणतात, ' उपनिषदे म्हणजे सामर्थ्याचा, शक्तीचा अक्षय कोषच आहे. सर्व विश्व गदागदा हलवील असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य हे उपनिषदांचे प्राणसूत्र आहे.

शक्तीइतकाच उपनिषदांचा श्रद्धेचा संदेश विवेकानंदांना महत्त्वाचा वाटतो. 'नचिकेताची श्रद्धा आपल्या सर्वांच्या मनात उदय पावो अशी त्यांची इच्छा आहे. 'शक्तिमान आणि श्रद्धावंताच्या पायाशी यश चालत येते असे ते पुन:पुन्हा सांगतात.

वेदांमधील कर्मकांडाला विवेकानंद फारसे महत्त्व देत नाहीत. ते म्हणतात, 'जेंव्हा बुद्धीला जीवनातल्या मोठया प्रश्नांचा आवाका येईनासा होतो, सर्व प्रतिभा, सर्व मन:शक्ती, विचारशक्ती यांचा -हास होतो आणि बुद्धी टीचभर वर्तुळात भ्रमत राहते तेव्हा बुद्धिमांद्य आले आहे असे खुशाल समजावे! कर्मकांडात गुंतून या देशाने स्वत:ची जी काही अवस्था करुन घेतली आहे त्याबददल स्वामीजींना अतिशय खेद वाटत असे. उपनिषदांच्या संदेशाकडे आपण परत फिरले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे.
उपनिषदांमध्ये परा आणि अपरा विद्यांचे विवेचन आहे. 'अध्यात्मविद्या हीच सर्वश्रेष्ठ विद्या आहे असे विवेकानंदांचे मत होते. 'अध्यात्मज्ञान ही एकच अशी वस्तू आहे की जी आमच्या दु:खकष्टांचा कायमचा अंत करण्यास समर्थ आहे. दुसरी कोणतीही विद्या किती झाले तरी फक्त काही काळासाठी आमची वाण दूर करु शकते असे  विवेकानंद जेंव्हा म्हणतात तेंव्हा ते अप्रत्यक्षरीत्या मोक्षमार्गाचेच दिग्दर्शन करीत असतात.

'नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, न मेधया न बहुधा श्रुतेन असे कठोपनिषदात म्हटले आहे. विवेकानंदही माहिती आणि साक्षात्कार यातील फरक स्पष्ट करतात. पांडित्याचा गवगवा करणा-या जमान्यात 'ग्रंथांच्या मा-यांनी आध्यात्मिक शक्ती कधी साधत नसते असे रोखठोक मत विवेकानंद व्यक्त करतात. अन्यथा   ' सारी ग्रंथालयेच चालतेबोलते ऋषी ठरले असते असा शेराही ते मिस्कीलपणे मारतात!

'संहिता व ब्राह्राणांपेक्षा उपनिषदे श्रेष्ठ आहेत असा अभिप्राय स्वामीजी देतात. 'औपनिषदिक तत्त्वे आधी आचरणात आणली गेली आहेत आणि मग त्यांना तत्त्वज्ञानाचे रुप लाभले आहे अशी ग्वाहीही विवेकानंद देतात. 'सर्व तत्त्वज्ञांना प्रमाण म्हणून उपनिषदांचा आधार घ्यावाच लागला, नाहीतर त्यांच्या तत्त्वज्ञानाला कोणताच आधार राहिला नसता असे स्वामीजी म्हणतात तेंव्हा उपनिषदे हाच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे असे ते आपल्याला सांगतात.

भगवद्गीता

युद्धभूमीवर, कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला 'तस्मादुत्तिष्ठ’ (म्हणून उभा रहा (आणि लढ)) हा संदेश विवेकानंदांसारख्या योद्धा संन्याशाच्या वृत्तीला साजेसा, अनुरूप असाच आहे यात काहीच शंका नाही. 'गीतेने कर्मकांड आणि ज्ञानकांड यांचा समन्वय साधला अशी तिची महती विवेकानंद सांगतात.

पाचही आचार्यांनी सांगितलेल्या मोक्षमार्गाची माहिती आपण यापूर्वी विस्ताराने घेतली आहे. भक्तीने मोक्ष मिळतो,  की ज्ञानाने मोक्ष मिळतो की कर्माने मोक्ष मिळू शकतो हा त्या आचार्यांच्या वादाचा एक महत्त्वाचा मुददा आहे. विवेकानंदांनी मात्र ज्ञान, कर्म, भक्ती आणि राजयोग या चारही मार्गांना समान महत्त्व दिले आहे. पारंपरिक वेदान्तात फक्त ज्ञान आणि भक्ती यांनाच महत्त्व आहे असे माझे मत आहे. मला वाटते की कर्मयोग आणि राजयोग यांना दिलेले महत्त्व विवेकानंदांवरील गीतेचा प्रभाव स्पष्ट करणारे आहे.

निष्काम कर्माची, कर्मयोगाची संकल्पना विवेकानंदांनी गीतेच्या शिकवणुकीतून घेतली असावी. गीता समजून घेण्यासाठी सुदृढ मन आणि सुदृढ शरीर हवे असे स्वामीजी आवर्जून सांगतात. श्रीकृष्णाच्या लोकसंग्रहाच्या कल्पनेचाही स्वामीजींवर प्रभाव पडला असावा असे म्हणता येते. कारण संन्याशांनी लोकसंग्रहाचे, लोकशिक्षणाचे काम हाती घ्यावे असा प्रयत्न विवेकानंदांनी पश्चिमेतून भारतात परत आल्यावर केला आहे.

वेदान्त परंपरा

वेदान्त दर्शनाच्या परंपरेपैकी शंकराचार्यांचा विवेकानंदांवरील प्रभाव सर्वात मोठा आहे असे दिसते. शंकराचार्यांची सगुण-निर्गुण  ब्रह्माची कल्पना विवेकानंद स्वीकारतात. मायावादही त्यात काही बदल करुन विवेकानंदांनी मान्य केला आहे. 'जीवो ब्रह्रौव नापर: हे तर विवेकानंदांच्याही वेदान्ताचे सूत्र आहे. केवळ ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे शंकराचार्यांचे मत मात्र विवेकानंदांना अमान्य आहे.

रामानुजाचार्यांचा आणि मध्वाचार्यांचा भक्तीमार्ग मोक्षाचे साधन म्हणून विवेकानंद स्वीकारतात. पण निर्गुण-सगुण ब्रह्माबाबत वादविवाद करण्यात त्यांना फारसा रस नाही. ते ब्रह्माची दोन्हीही रुपे स्वीकारतात. जग सत्य आहे असे विवेकानंद मानतात. ईश्वर सर्वव्यापी आहे म्हणून मानवरुपी ईश्वराची सेवा करणे आपले कर्तव्य आहे असे विवेकानंद सांगतात. या संदेशाद्वारे 'तत्त्वमसि’ (ते तू आहेस) या महावाक्याची आणि भक्तीमार्गाची विलक्षण अलौकिक अशी सांगड विवेकानंद घालतात.
पुढे या प्रत्येक मुद्द्याचा विचार आपण एकेका स्वतंत्र भागात करणार आहोत.

गौतम बुद्ध

गौतम बुद्धाचाही विवेकानंदांच्या विचारसरणीवर फार मोठा प्रभाव आहे. गयेला - बोधगयेला विवेकानंदांनी भेट दिली होती आणि त्या भेटीच्या आठवणी त्यांच्या मनात नेहमी रेंगाळत होत्या. गौतम बुद्धाच्या करुणेने विवेकानंदांना झपाटून टाकले होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बौद्ध विचारसरणीतील दहा अव्याकृत प्रश्न प्रसिद्ध आहेत. 'या जीवनातले दु:ख दूर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. उगीच तात्त्विक चर्चा करत बसण्यात काय हशील आहे? अशा आशयाचे गौतम बुद्धाचे विधान विवेकानंद नेहमी उदधृत करीत असत. बुद्धाचा उपदेश प्रामुख्याने नैतिक स्वरुपाचा होता. हाती तलवार न घेता, हृदयात शांतीचा मंत्र जपत बौद्ध धर्माने ज्या पद्धतीने जग पादाक्रांत केले त्याबददल स्वामीजींना नेहमीच अभिमान वाटत असे. बौद्धांच्या भिक्षु संघाबददलही विवेकानंदांना अपार प्रेम होते.

बौद्ध धर्मातील बोधिसत्त्वाची, सामूहिक मुक्तीची कल्पना विवेकानंदांच्या विचारांतही कधीकधी आपल्याला दिसून येते. 'जोवर या पृथ्वीतलावर एखादा कुत्राही उपाशी असेल तोवर पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मी त्याची सेवा करेन असे एक विवेकानंदच म्हणू शकतात! 'ज्या नावेतून आपण नदी पार केली, ती नाव इतरांना वापरण्यास द्यावी’ (म्हणजे ज्ञानाचा प्रसार करावा) अशा अर्थाची बौद्ध संकल्पना स्वामीजींच्या आयुष्यातही आपल्याला दिसते. म्हणूनच कदाचित त्यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठ आणि मिशनचे ध्येयवाक्य 'आत्मनो मोक्षार्थं, जगदहितायचअसे आहे - फक्त आत्मनो मोक्षार्थम्’ असे नाही! विवेकानंदांनी संन्यासी धर्माला सेवाव्रताची जी जोड दिली तीही बौद्ध मताचा परिणाम असावा असे आपल्याला म्हणता येते.

ब्राह्मो समाज

रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात येण्यापूर्वी काही काळ आणि दक्षिणेश्वरला येणे जाणे सुरु झाल्यानंतरही नरेन्द्रनाथ ब्राह्मो समाजात जात असे हे सर्वज्ञात आहे. ब्राह्मो समाजाचे दोन गटांत विभाजन होऊन केशवचंद्र एका गटाचे नेते बनले. त्यानंतर १८८१ मध्ये केशवचंद्र गटात पुन्हा फूट पडून साधारण ब्राह्मो समाजनवविधान ब्राह्मो समाज असे दोन गट निर्माण झाले.

Spencer Lavan त्यांच्या The Brahmo Samaj: India’s First Modern Movement of Religious Reform या लेखात ब्राह्मो समाजाच्या विचारसरणीची रुपरेखा देतात. इसवी सन १८४३ मध्ये देवेन्द्रनाथ ठाकूर यांनी ही रुपरेखा मांडली होती. ती थोडक्यात अशी सांगता येईल: १. ईश्वर सगुण आहे. २. ईश्वराने कधीही अवतार धारण केला नाही. ३. ईश्वर आपल्या प्रार्थना ऐकतो आणि त्याला उत्तरही देतो. ४. ईश्वराची पूजा फक्त आध्यात्मिक रीतीनेच केली पाहिजे. हिंदूंची संन्यासी परंपरा, मंदिरे आणि निशिचत पूजापद्धती पूर्णत: अनावश्यक आहेत. पण सर्व जाती आणि धर्म त्यांना हव्या त्या पद्धतीने ईश्वराची पूजा करु शकतात.  ५. पश्चाताप आणि पापकर्माचा त्याग हा ईश्वरी क्षमेचा आणि मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. ६. निसर्ग आणि अंत:प्रेरणा यातूनच केवळ ईश्वराचे ज्ञान होऊ शकते. कोणत्याही पुस्तकाद्वारे ते होऊ शकत नाही.

विवेकानंदांच्या ब्रह्म संकल्पनेवर ब्राह्मो समाजाच्या विचारांचा पगडा होता असे दिसते. त्याचे विवेचन आपण पुढील भागात पाहणार आहोत.

रामकृष्ण

इतके सारे असूनही विवेकानंदांच्या विचारांवर श्रीरामकृष्ण परमहंसांच्या विचारांचा पगडा सर्वात जास्त होता हे तर त्रयस्थ वाचकही सांगू शकेल. रामकृष्ण लौकिक अर्थाने फारसे शिकलेले नव्हते - त्यांना काहीशी अक्षरओळख होती इतकेच म्हणता येईल. पंडितांच्या रुक्ष वादविवादांतही श्रीरामकृष्णांना अजिबात रस नव्हता. साक्षात्कार प्राप्त करुन घेणे हेच मानवी जीवनाचे ब्रीद असले पाहिजे असे त्यांचे मत होते. स्वत:ला योग्य वाटेल त्या मार्गाने साक्षात्कार साधला पाहिजे असेच विवेकानंदही आपल्याला वारंवार सांगत असतात.

एकदा साक्षात्कार होऊन श्रीरामकृष्ण त्याच ठिकाणी थांबले नाहीत, तर त्यांनी अनेकविध साधना केल्या. प्रत्येक मार्गाच्या शेवटी, सा-यांचे पोहोचण्याचे, मुक्कामाचे ठिकाण एकच आहे हे त्यांनी त्यांच्या स्वत:च्या अनुभवातून पुन्हा एकदा जगासमोर मांडले.

मूर्तिपूजेसंबंधीचे विवेकानंदांचे मत श्रीरामकृष्णांच्या साक्षात अनुभूतीवर आधारलेले आहे. प्रतिकांची माणसाला गरज असते हे एक. आणि दुसरे म्हणजे जर मूर्तिपूजेतून श्रीरामकृष्ण निर्माण होत असतील, आपल्याला लाभत असतील तर आपण का म्हणून प्रतिकांच्या पूजेचा निषेध करावा? – असा विचार विवेकानंद मांडतात.

श्रीरामकृष्णांना साधनेतील कर्मकांड, गुंतागुंत आवडत नसे. विवेकानंदांनीही पुढे साधनेतील साधेपणाचाच पुरस्कार केला आहे. श्रीरामकृष्णांनी कधीही कोणत्याही संकुचित धर्माचा पुरस्कार केला नाही. विवेकानंदांच्या स्वभावात आणि प्रतिपादनात आपल्याला हीच उदारता दिसते.  ईश्वर साकारही आहे आणि निराकारही आहे, जो ज्या स्वरुपाची उपासना करतो त्याला त्या स्वरुपात ईश्वर प्राप्त होतोसे श्रीरामकृष्णांचे मत होते. त्यांचे हे शब्द म्हणजे निव्वळ शब्द नव्हते तर तो त्यांचा अनुभव होता.

श्रीरामकृष्ण पुरुष आणि प्रकृतीत भेद मानीत नसत. त्यांच्या दृष्टीने ती एकाच चैतन्याची दोन रूपे. ‘निरनिराळी वेदान्तदर्शने एकमेकांच्या विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत; एकाच शिडीच्या त्या निरनिराळया पाय-या आहेत असे श्रीरामकृष्णांचे मत होते. विवेकानंदांच्या कथनातही आपल्याला हाच संवादी सूर सर्वत्र आढळतो. प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य मार्ग कोणता हे त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार आणि गरजेनुसार ठरते असे विवेकानंद मानतात. मार्ग हे उदिदष्ट नसून केवळ साधन आहे. म्हणूनच त्यांच्या मते मार्गांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा काहीही भेद नाही. दुस-याची नक्कल करुन आपले काहीही भले होत नाही;  आपण आपल्या स्वधर्माचे पालन विनातक्रार करावे असाही सल्ला विवेकानंद आपल्याला देतात तो याच भूमिकेतून!

विवेकानंदांच्या मते सत्याचे विभाजन करता येत नाही म्हणून प्रत्येकच धर्ममार्ग पूर्णत: सत्य ठरतो. चूक धर्माची नाही, चूक असेलच तर ती धर्म वापरणारांची आहे असे त्यांचे मत आहे.

'अरे, जीवावर दया करणारे तुम्ही कोण? शिवभावाने जीवाची सेवा करा या श्रीरामकृष्णांच्या वचनाने तर विवेकानंदांच्या जीवनात फार मोठे परिवर्तन घडवून आणले. 'मानवसेवा हीच माधवसेवा असे विवेकानंद आपल्याला गर्जून सांगतात ते याच भावनेच्या आधारावर! मूर्खनारायण, दरिद्रीनारायण, अज्ञानीनारायण अशी विवेकानंदांची नारायणाची सारी रुपे श्रीरामकृष्णांच्या वरील वचनातून उगम पावलेली आहेत यात काहीच संशय नाही.

निर्विकल्प समाधीच्या अनुभवातच राहण्याची इच्छा नरेन्द्राने व्यक्त केल्यावर श्रीरामकृष्ण त्याला रागावतात आणि 'आईचे काम करण्याची आज्ञा देतात. हेच विवेकानंद पुढे गुरुबंधुंच्या टीकेला तोंड देताना म्हणतात, 'बाबांनो, तुमची मुक्ती-बिक्ती सगळं मायेच्या राज्यातल बरं का! -  तेंव्हा वेदान्ताचा एक नवा व्यावहारिक अर्थ झळाळून निघतो!

श्रीरामकृष्णांच्या वेदान्तात गृहस्थांचा तिरस्कार नव्हता. विवेकानंदांनीही स्त्रियांपासून, गृहस्थांपासून, तथाकथित अध:पतित वर्गातील लोकांपासून कधीही पळ काढला नाही. त्यांच्या लेखी सारे पतित जीव म्हणजे त्याचीच वाट चुकलेली रुपे आहेत. ईश्वरसाक्षात्कारासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यकच असते अशातला भाग नाही अशी विवेकानंदांची धारणा होती.

विज्ञानाच्या तार्किक पद्धतीचे अनके फायदे आहेत तशाच त्याच्या काही अंगभूत मर्यादा आहेत आणि सत्य त्यामुळे दरवेळी विज्ञानाच्या आवाक्यात येईलच असे नाही. (खरं तर विज्ञान ‘सत्य शोधल्याचा’ दावाही कधी करत नाही.) श्रीरामकृष्णांनी तर्काच्या मर्यादेपलिकडचा मार्ग बुद्धिवादी नरेन्द्रला दाखविला. श्रीरामकृष्णांच्या सान्निध्याने नरेन्द्राचे सारे जीवन उजळून निघाले. त्याच प्रकाशात विवेकानंदांनी आपल्यासारख्या कोटयवधी लोकांना जगण्याचा मार्ग दाखविला आहे. विवेकानंदांनी हे जे देणे आपल्याला दिले त्यातील सिंहाचा वाटा श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांचे हे ऋण विवेकानंदांनीही मान्य केले आहे, अतिशय कृतज्ञतेने मान्य केले आहे! 

क्रमश:

1 comment:

  1. नमस्कार अतिवास ताई,

    पुरूष आणि प्रकृती ही एकाच चैतन्याची दोन रूपं आहेत हे श्रीरामकृष्णांचं विधान पटतं. समजा तशी नसतील तर पुरूष आणि प्रकृती ही दोन स्वतंत्र तत्त्वे मानावी लागतात. तर मग या दोन तत्त्वांना पाहणारा 'मी' कोण, हा प्रश्न उद्भवतो. असा तो 'मी' धड पुरूष नाही आणि प्रकृतीही नाही अशा अवस्थेस येतो. म्हणजेच 'मी' हे पुरूष आणि प्रकृती या दोहोंना व्यापणारं चैतन्य आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete