"वाय वाय"? का मोमो? काय खाणार मॅडम तुम्ही?" माझ्या सहका-याने विचारलं.
मोमो मला माहिती आहेत आणि आवडतातही. दिल्लीत आल्यापासून तर ते ब-याचदा खाल्ले आहेत.
पण आज मला नको होते मोमो. काल दुपारी आणि काल संध्याकाळी असे दोन्ही वेळा मोमोच खाल्ले होते मी.
पण 'वाय वाय' म्हणजे काय? मी विचारलं आणि कळलं की वाय वाय म्हणजे एक प्रकारचे नूडल्स.
सिक्कीम राज्यातल्या नामची परिसरातल्या (दक्षिण सिक्कीम जिल्ह्यातल्या) सिक्कीप या गावात होते मी. सोबत स्थानिक पाच सहा सहकारी. सकाळी 'वाक' गावात डोंगर चढून-उतरून कॅलरीज ब-यापैकी खर्च झाल्या होत्या आणि मला चांगली भूक लागली होती. पण इथं 'वाय वाय' आणि मोमो असे दोनच पर्याय दिसत होते.
'वाय वाय' खाउन माझं पोट भरलं पण माझ्या सहका-यांची भूक भागली नव्हती. सूप, मोमो मागवण्याचा त्यांचा बेत ऐकून मी म्हटलं, "तुम्ही सावकाश पोटभर खा. मी तोवर बाहेर भटकते; काही फोटो काढते." त्यांना नेपाळी भाषेत बोलता येत नव्हतं आपापसात माझ्या उपस्थितीत - त्यामुळे त्यांनीही लगेच परवानगी दिली मला.
मी बाहेर आले तर डाव्या बाजूला मस्त नदी होती. मघा जाताना दिसली होती - तिचं नाव आहे 'रंगीत' नदी. तिस्ता नदी - जी सिक्कीमची जीवनदायिनी आहे - तिची ही एक उपनदी. तिस्ता नदीबद्दल स्वतंत्रपणे लिहायला हवं - पण ते आज नाही. नदीच्या पाण्यात किमान पाय तरी भिजवावेत असा माझा बेत होता. पण माझ्या लक्षात आलं की नदीचं पात्र एकदम खोल आहे आणि नदीत उतरायला वाटच नाही. शिवाय नजर पोचेल तिथवर कुणीही नदीच्या पात्रात - त्याच्या जवळपासही - नव्हत; आणि हे आजच नाही तर मागचे तीन दिवस. स्वाभाविक आहे म्हणा. नदी इतकी रोरावत धावते आहे की कुणाची हिंमत नसणार तिच्या जवळ जाण्याची. मीही तो विचार सोडून दिला.
डावीकडे एक पूल दिसला. सिक्कीममध्ये हे पूल वारंवार लक्ष वेधून घेतात. हे पूल नसतील त्या काळात अनेक गावांचा इतरांशी संपर्क तुटत असणार नक्कीच. हे पूल दिसतात जुने-पुराणे; कधी कोसळतील माहिती नाही असं त्यांच्याकडे पाहून वाटतं- पण आहेत ते भक्कम. अगदी भक्कम. सारी वाहतूक पेलणारे आणि लोकांना जोडणारे पूल!
मी त्या पुलाचा फोटो काढायला माझ्या कॅमे-याची जुळणी करत होते तेव्हा त्या दोघांना मी पाहिलं. पुलाच्या अगदी मध्यभागी ते दोघे गप्पा मारत उभे होते. माझ्या हातातला कॅमेरा पाहून आधी ते थोडे बिचकले होते पण आता वळून ते थेट माझ्याकडे पहात होते. मी घाई न करता त्यांचा दिशेने चालत गेले. आता ते अधिकच उत्सुकतेने माझ्याकडं पहात होते. हसावं की नाही असा संभ्रम त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. मी हसले.
"फोटो काढू तुमचा?" मी हिंदीत विचारलं. एकाने लगेच हसून परवानगी दिली आणि सज्जही झाला तो. दुसरा मात्र लगेच संशयाने म्हणाला, "नेपाळी नाही येत तुम्हाला बोलता?" त्यावर मी नकारार्थी मान हलवली. दुसरा विचारात पडला. पण पहिल्याला आता ही संधी गमवायची नव्हती. त्याने आपल्या मित्राला गप्प बसवलं.
फोटो काढला, तो दाखवला. दोघेही एकदम खूष झाले.
"एकटयाच आहात तुम्ही?" एकाने विचारलं.
"नाही, एकटी नाही. माझ्यासोबतचे लोक जेवताहेत. माझं झालं जेवण म्हणून फोटो काढायला आले मी." मी स्पष्टीकरण दिलं.
"हॉटेलात का जेवताय? तुमचं घर नाही इथं" आणखी एक प्रश्न.
"नाही, माझं घर नाही इथं" मी सांगितलं.
"मग कुठ आहे घर?" पुन्हा प्रश्न.
"दिल्लीत" - माझं उत्तर.
"हं.. म्हणून तुम्हाला नेपाळी येत नाही" समंजस प्रतिक्रिया.
"इथं कुणाकडं आलात?" पुन्हा प्रश्न.
मी ज्या कार्यालयात आले होते, ते हाताने दाखवलं.
"हं .. माहिती आहे मला ते ऑफिस. तिथल्या साहेबांकडे आला होतात का कामाला?" आणखी विचारणा.
"हो" माझं उत्तर.
"आता कुठं जाणार?"
"नामचीला" मी सांगितलं.
"ती जीप दिसतेय ती तुमची की त्यामागची पांढरी गाडी?" मुलांच निरीक्षण चांगलं होतं एकंदरित. मी सांगितली कोणती गाडी ती.
मग जरा मीही प्रश्न विचारायचं ठरवल.
दोन्ही पोरं लहानखुरी दिसत असली तरी पाचवीत शिकत होती. शाळा; नेपाळी भाषा; शाळेत मिळणारं जेवण; तिथले शिक्षक; होस्टेल आणि होस्टेलमध्ये राहणारी मुलं... याबाबत त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या माझ्या.
"आता इथं काय करताय तुम्ही?" मी विचारलं.
"पाणी पाहतोय नदीचं" त्यांच एकमुखी उत्तर.
मग नदीचं नाव 'रंगीत' आहे, तिच्या वरच्या बाजूला एक धरण आहे; दिवसा पाणी वाढतं आणि रात्री मात्र कमी होतं (कारण पाउस रात्री जास्त पडतो आणि दिवसा कमी) अशी बरीच माहिती त्यांनी पुरवली. पोहायला येत त्यांना पण या नदीत पावसाळ्यात कुणीच पोहत नाही हेही सांगितलं.
"मासे आहेत का नदीत?" माझा आपला उगाचच एक प्रश्न.
"आत्ता नसतात मासे. फुलांचा जसा सीझन असतो ना, तसा माशांचाही असतो सीझन - पाउस संपल्यावर येतात ते ..."त्याचं समजूतदार स्पष्टीकरण.
"तुमची गाडी निघाली बघा. पळा लवकर, नाहीतर तुम्हाला सोडून जातील ते लोक ..." माझी गाडीकडे पाठ असल्याने मला ती दिसत नव्हती पण या दोघांच लक्ष होत. गाडी काही मला सोडून जाणार नव्हती. त्या मुलांना माझी काळजी वाटावी याची मला गंमत वाटली.
"इकडून पुलावरूनच जाईल ना गाडी? घेतील ते मला इथं..." मी.
"नामची इकडे कुठे? ते त्या रस्त्याने आहे ..." असं म्हणत त्या दोघांनी मला जवळजवळ ढकललचं म्हणा ना!
मी हात हलवून त्यांचा निरोप घेतला.
सगळ काही हेतू ठेवून करा; 'अनोळखी लोकांशी मैत्री करू नका'; स्वत:चं खाजगीपण जपा ... अशा सूचनांचा भडीमार शहरात सतत होत असतो. माणसांवर विश्वास न ठेवण्याचं शिक्षण आपल्याला वारंवार दिलं जातं - त्याला कारणंही आहेत परिस्थितीने दिलेली आपल्याला.
अशा वातावरणात ओळख नसताना कोणीतरी माझ्याशी अर्धा तास गप्पा मारल्या, माझ्यावर विश्वास ठेवला, माझी काळजी केली, विचारपूस केली, मला समजून घेतलं - याचं मला अप्रूप आहे.
रंगीत नदीच्या खळाळत्या पाण्याबरोबर, तिथल्या नजर पोचेल तिथवर असणा-या हिरव्या डोंगररांगांबरोबर मला लक्षात राहिला आहे तो रंगीततीरी त्या दोन मुलांबरोबर सहज घडून आलेला एक निरागस संवादही.
असे लोभस रंग आयुष्य सप्तरंगी बनवतात नाही का?
ReplyDeleteफारच गोड पोरं आहेत. :)
ReplyDeleteदार्जिलिंगमधून गंगटोकला जाताना तिस्ता पाहिली होती. वर्णन करणं अशक्य, नुसतं अनुभवायचं.
छान. :)
ReplyDeleteसुंदर! तीस्तेविषयी अजून वाचायला आवडेल.
ReplyDeleteप्रीति, हो, विशेषत: ते अनपेक्षितपणे आले की जास्तच!
ReplyDeleteराजजी, तिस्ताबद्दल नंतर लिहायचं असं मी म्हणतेय खरी पण त्याला काही अर्थ नाही. तुम्ही म्हणालात तसं 'तिस्ता' ही बोलण्याची, लिहिण्याची गोष्ट नाहीच - ती आहे फक्त अनुभवण्याची!!
ReplyDeleteअनघा, :-)
ReplyDeleteगौरी, बघते लिहायला जमतंय की नाही ते :-)
ReplyDeleteएकदम सुंदर निरागस पोस्ट :)
ReplyDeleteहेरंब, :-)
ReplyDeleteसुंदर पोस्ट आहे... कधी वाचुन संपली कळलेच नाही
ReplyDeleteथोडा हात सैल सोडण्यास हरकत नाही. :-)
ReplyDeleteगौरवजी, आभार. सिक्कीम आहेच तितकं सुंदर!!
ReplyDeleteअनामिक/अनामिका, मी पाल्हाळ लावायला हरकत नाही दिसत तुमची!!
ReplyDeleteहेरंब म्हणतोय तसंच अगदि निरागस पोस्ट....आवडली...आणि त्या दोन मुलांचा फ़ोटो असल्याने त्या संवादाला चेहरेही होते...दोन निरागस चेहरे...:)
ReplyDeleteहो हो तीस्तावर पोस्ट पाहिजेय!
ReplyDeleteआणि हा आम्हा वाचणाऱ्याचा हावरेपणा आहे कि तुझा मुद्देसूदपणा, पण अजून भूक नं भागल्यासारखं होतं खरं!
दोन्ही पिल्लं काय गोड आहेत! या सगळ्या ईशान्येकडील लोकांना देवाने कायमचं स्मित देऊन ठेवलंय!
सगळी समंजस स्पष्टीकरणेही मस्त आहेत! देव करो अन ती रंगीत तीस्ता अन ते सामंजस्य असंच नितळ राहो...
अनू, आता खास लोकाग्रहास्तव मला 'तिस्ता'वर लिहायला लागणार असं दिसतंय :-)
ReplyDeleteतिस्ता नदी एकदा पहिली होती, ती कायमची घर करून राहिली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. तुम्ही ती आठवण जागी केली. फार बरं वाटलं! त्यावेळी स्थानिक लोकांशी फारसा संपर्क आलाच नाही. ते सर्व कॉलेज संपल्यावर केले. पण तिस्तेला पुनर्भेट शक्यच नाही.
ReplyDeleteआपल्याला "खो" दिलाय! जरूर लिहा.
साधा सुंदर छान लेख....
ReplyDeleteईशान्येकडील खाद्यपदार्थाँची नावेही मजेशीर आहेत.... वायवाय.... मोमो....
रेमीजी, तिस्ता एकदा पहिली की तिला विसरणं शक्य नाही - त्यामुळे पुनर्भेट न होण्याचं फार दु:ख् वाटून घेऊ नका.
ReplyDeleteअभिषेकजी, अशा अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला सहज समजत नाहीत. तिथून दिल्ली-मुंबई-पुणे इथं येणा-या लोकाना काय अडचणींना तोंड द्यावे लागत असेल याची थोडी कल्पना येते आपल्याला त्या भागात जाऊन आलं की!
ReplyDeleteअपर्णा, माफ कर, तुझा प्रतिसाद स्पॅममध्ये जाऊन पडला होता. तो आज पाहिला आणि इकडं आणलं त्याला - आभार. हो फोटोमुळे ती निरागसता पोचायला मदत होते भरपूर.
ReplyDeleteतिस्ताची सलग १२ दिवसांची सोबत ताजी ताजीच आहे. सिक्कीमची सफर तिस्ताच्या वेगवेगळ्या रुपांनी डोळ्याचे पारणे फेडून गेली आहे.
ReplyDeleteनिरागसपणाने किती सहज आपल्या मनात लहानगे घर करून जातात. पोस्ट छानच !