ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, June 7, 2019

२५६. 'मी' आणि 'डवाव' भाग २ : १ ते ७ जून २०१९

भाग १


जून
काल संध्याकाळी परत येताना दोन-तीन दुकांनात डोकावले. एका ठिकाणी ब्राऊन ब्रेड मिळाला. दुसऱ्या ठिकाणी ब्राऊन राईस होता, पण दोन किलोंचं पाकिट होतं. माझं हे घर छोटं आहे आणि साठवण करायला फार जागा नाही म्हणून मी एक किलोचं पाकिट घेता येईल का ते बघत होते, पण नाही झालं काम. पण सगळे लोक इंग्लीश बोलतात हे किती सुखावह आहे. इथं सगळे सेटलिंग ट्रबल्स जणू नाहीसेच झाले आहेत. जरी अन्य काही आहेत म्हणा ...

कोपऱ्यावर एस ऍन्ड आर नावाचं एक सुपरमार्केट आहे. तिथं फक्त सभासदांना प्रवेश आहे असं कळलं म्हणून मी जरा कुतुहलाने तिकडं डोकावले. वर्षाला सातशे पेसो भरून सभासद व्हायचं हे कळलं. पण सभासद होण्याचे नेमके काय फायदे आहेत हे मात्र तिथल्या कर्मचारी वर्गाला नीटसं सांगता आलं नाही. कदाचित सुपरमार्केटमध्ये प्रवेश करता येतो हाच मोठा फायदा असेल.

घरी येऊन निवांत चहाचा आस्वाद घेत होते. ही ग्रीन टी आणि विविध फ्लेवर्ड टी (साखर आणि दूध नसलेले) घेण्याची सवय मला म्यानमामध्ये लागली. खरं तर दुपारी तीनपर्यंत बाहेर प्रचंड उकाडा होता. पण वातानूकुलित कार्यालयात दिवसभर बसले आणि नंतर ढगाळ हवा होती, त्यामुळे चहाची गरज भासली. तर अचानक सोफा जोरजोरात हलायला लागला. दोन सेकंदांनी माझ्या लक्षात आलं की भूकंप होतो आहे. मी हातातला चहाचा कप बाजूला ठेवला, पंखा बंद केला आणि बाहेर पडले. शेजारची दोन-तीन कुटुंबही बाहेर आली होती. मी दार ओढून घेईतो भूकंप थांबला आणि मी परत आत जाण्याचा विचार करत होते तेवढ्यात सायरन वाजला. मग आम्ही सगळे खाली गेलो. जॉय आणि रोझा अशा दोन शेजारणी, जॉयची मुलं (मोठी मुलगी, लहान मुलगा) असे आम्ही सगळे एकत्र उभे होतो. रोझा खूप घाबरली होती आणि जॉयच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. आम्ही उभ्याउभ्या दहा मिनिटं गप्पा मारल्या. जॉयच्या मते पूर्वी डवावला भूकंप होत नसे, अलिकडे मात्र कंप जाणवतो आहे. दोनेक महिन्यांपूर्वी मनिला शहराला भूकंपाचा धक्का बसला होता आणि तिथल्या काही इमारती खचल्या होत्या. त्यामुळे इथले लोक चिंतेत आहेत.

जोआन आली. तीही घाबरलेली होती. मग तिला जरा शांत केलं. पुन्हा भूकंपाचा धक्का बसला तर आम्ही दोघींनी काय करायचं याचं नियोजन केलं.

आमच्या घरात मोबाईल रेंज अजिबातच नाही. मग खाली जाऊन स्विमिंग पूलाजवळ रेंज मिळाली तेव्हा भूकंपाची माहिती वाचली. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता . होती आणि सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर (आणि ऐशी किलोमीटर खोलीवरतपशिलातली चुभूदेघे.) त्याचा केंद्रबिंदू होता हे कळलं. भूकंपाचे तुमचे अनुभव लिहा असं या साईटवर आवाहन असतं. मग तिथं इमानेइतबारे अनुभव लिहून आले. डवाव शहरातल्या काही लोकांनी लिहिलेले अनुभव वाचले. आमच्यातल्या काहींनी सौम्य धक्का असं ज्याचं वर्णन केलं होतं, त्यालाच काहींनी तीव्र धक्का असं म्हटलं होतं. कदाचित घराची रचना, कितव्या मजल्यावर त्यावेळी व्यक्ती होती, खुल्या जागेत होती की बंदिस्त जागेत होती अशा अनेक गोष्टींवरून धक्क्याची परिणामकारकता बदलत असावी असं वाटलं. याविषयी जरा अधिक वाचायला हवं. बाकी या भूकंपाच्या धक्क्यामुळे आपलं इथलं वास्तव्य तात्पुरतं आहेइथलं म्हणजे डवावमधलं नाही तर पृथ्वीवरचंयाची जाणीव झाली. आपण लॅपटॉप, पासपोर्ट वगैरे फार जपतोपण कोणत्या क्षणी हे सगळं सोडून जायला लागेल त्याचा काही भरोसा नाही. अर्थात आहोत तोवर या गोष्टींना जपणंही क्रमप्राप्त आहे. प्रश्न मरणानंतरचे नसतातच (असले तर आपल्याला माहिती नाहीत), ते जगण्यातलेच असतात...

संध्याकाळी बाहेर पडलो तर पाऊस आला. पाऊस इथं बाराही महिने (आणि महिन्यातले बारा ते पंधरा दिवस नक्की) असतो. पावसामुळे कामं पुढं ढकलण्यात काहीही अर्थ नसतो. मग चालत राहिलो. मला मॉल दाखवायची जोआनला इच्छा होती आणि मला मात्र काहीही खरेदी करायची नव्हती, मग ते समजल्यावर चाळीस एक मिनिटांनी आम्ही परत फिरलो. वाटेत एक कप कॉफी घेतली. तिथंही पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाअगदी दोन ते तीन सेकंद इतकाच होता तो.

जून
आज सकाळी मला पहिली पोलिस वॉर्निंग मिळाली. त्याचं असं झालं की वाहनांसाठी सिग्नल लाल झाल्यावर मी रस्ता ओलांडला. असं करणारी मी एकटीच होते हे माझ्या तितकंस लक्षात आलं नाही.

समोर फूटपाथवर पिवळा शर्ट घातलेला एक पुरूष माझ्याशी बोलायला आलं. “Do you speak English?” त्याने विचारलं. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला (आमचा संवाद आता मराठीत लिहिते) , तू आत्ता जिथून रस्ता ओलांडलास ती रस्ता क्रॉस करण्याची अयोग्य जागा आहे. थोडं पलिकडं पहा, तुला ते पांढरे आडवे पट्टे (Zebra crossing) दिसताहेत ना? ती रस्ता क्रॉस करायची योग्य जागा आहे. बघ, सगळे लोक तिथूनच रस्ता ओलांडत आहेत. या बाजून रस्ता ओलांडणारी तू एकटीच आहेस. मी म्हटलं, माफ करा. मी इथं नवीन आहे. मी नियम माहिती करून घेण्यात आळस केला आणि माझ्याकडून चूक झाली. त्यावर तो हसून म्हणाला, ठीक आहे, इथून पुढं लक्षात ठेव. मीही मान डोलावली. आणि पाहिलं तर तो डवाव पोलिस दलाचा कर्मचारी होता.

पादचारी आणि वाहनचालक या दोघांसाठीही अतिशय सोयीची व्यवस्था आहे. पादचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम इथले पोलिस करताना पाहून आदर वाटला. नंतर मी पहात होते तर खरोखर सगळे लोक झेब्रा क्रॉसिंगचा वापर करत होते. सिग्नल नसलेल्या ठिकाणी आपण झेब्रा क्रॉसिंगवर चालत असलो तर वाहनं थांबतात, हॉर्न वगैरे वाजवता शांतपणे सगळ्या लोकांना रस्ता ओलांडू देतात हे चित्र दिवसभर सर्वत्र दिसलं.

भाषा शिकण्यासाठी काल एक मोबाईल ऍप डाऊनलोड करून घेतलं होतं. बातम्यांच्या खालच्या ओळी वाचून, त्यातले शब्द ऍपवर शोधून बातम्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालला होता. बातम्यांच्या ओळी थोड्या वेळाने परत समोर येत असल्याने शब्द ते वाक्यं असा प्रवास करता आला. ते करत असताना मात्र एक धक्का बसला. Hindi या शब्दाचा अर्थ इथल्या भाषेत पूर्ण नकारात्मक आहे .-  not, no, negative vote, negative answer, didn’t, weren’t , doesn’t ….असे या शब्दाचे अर्थ पाहून विचारांत पडले.

जून

मागचे दोन-तीन दिवस ऑफिसातल्या लोकांशी ओळख करून घेणं, इथलं काम समजून घेणं यात जात आहेत. फिलिपिन्सचा इतिहास आणि भूगोल समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या देशाबद्दलची माझी पाटी कोरी असल्याने जरा वेळ लागणार आहे खरं, पण वेळ आहे माझ्याकडं भरपूर त्यामुळे काळजी नाही.

काबूल आणि यांगून या दोन्ही ठिकाणी एक पाहिलं होतं की फिलिपिन्सच्या लोकांचं नेटवर्क जबरदस्त असतं. सगळे एकमेकांना कायम मदत करत असतात. अडचण आली तर फिलिपिन्सचे नागरिक त्यांच्या दूतावासाकडं सहज जाऊ शकतात. यांगूनला ते सगळे एकत्र बॅडमिंटन खेळायचे, पार्ट्या करायचे हे माझ्या फिलिपिनो सहकाऱ्यांकडून नेहमी ऐकलं होतं. कोण कोणत्या संस्थेत आणि कोणत्या पदावर आहे याचा त्यांना फरक पडत नाही. ते सगळे एकमेकांना धरून असतात.

मी इथं आल्याचं कळल्यावर लगेच सिसिलिया आणि पिटा यांचं मनिलाला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण आलं. सिसिलिया आणि मी काबूलमध्ये एकाच संस्थेचं काम करत होतो. तर पिटा म्यानमामध्ये माझ्याचं संस्थेचं पण मंडले शहरात काम करत होती. कोरा माझ्याबरोबर काम करत होती, ती सध्या बांगलादेशमध्ये आहे, तर ज्युल्स म्यानमातच आणखी काही काळ राहण्याचा विचार करत आहे. त्या सगळ्यांचं अगत्यपूर्ण बोलणं ऐकताना हे फक्त फिलिपिन्स नागरिकांशीच नाही तर इतरांशीही तितकेच मैत्रीपूर्ण वागतात असं लक्षात आलं.

देशातली सध्याची ठळक बातमी म्हणजे ‘Trash Shipped Back to Canada’.


२०१३-१४ मध्ये रिसायकल करण्यासाठी या नावाखाली कॅनडातून काही हजार टन कचरा फिलिपिन्समध्ये पाठवण्यात आला होता. गेली पाच वर्ष या मुद्द्यावरून मनिला-ओटावा संबंध बिघडले होते. अखेर शुक्रवारी (३१ मे) ६९ कंटेनरमधून हा कचरा कॅनडाला परत पाठवण्यात आला. पडद्यासमोर आणि पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडून गेल्यावर ही कृती झाली आहे. विकसित देश आता त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना अधिक काळजी घेतील अशी एक आशा या घटनेतून निर्माण झाली आहे.

जालावर वाचत असताना अचानक लक्षात आलं की मिंडनाव विभागात मे २०१७ मध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. त्याची कालमर्यादा वाढवत वाढवत आता डिसेंबर २०१९ पर्यंत करण्यात आली आहे. आपण मार्शल लॉ लागू असलेल्या शहरात आणि विभागात राहतो आहोत हे मला मागच्या आठवड्यात कधी जाणवलंच नव्हतं. शहरातल्या मॉलमध्ये प्रवेश करताना सुरक्षा तपासणी होणं हे आता नेहमीचं दृष्य असल्याने त्याबाबत काही वेगळं वाटलं नव्हतं. लायका (माझी सहकारी) मला आजच सांगत होती, डवावमध्ये तुला जे दिसतं आहे त्यावर जाऊ नको. या शहराबाहेर दहा-वीस किलोमीटर गेलं की जग एकदम बदलून जातं. आमचा देश गरीबी, आंतरिक संघर्ष आणि क्लायमेट चेंज या तीन महाकाय समस्यांशी एकाचवेळी लढतो आहे. आणि उद्याचं चित्र काही फारसं आशादायक नाही...

भारतात मी हेच म्हणते. अफगाण सहकारी हेच सांगत होते. मोझाम्बिक आणि म्यानमा सहकाऱ्यांचंही हेच म्हणणं होतं. देश बदलला, भाषा बदलली, रीतीरिवाज बदलले, सत्ताधारी बदलले तरी समस्या मात्र कमीअधिक त्याच आहेत. ग्लोबल विलेज या संकल्पनेच हे एक स्पष्ट उदाहरण. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत? आपण कुठं पोचणार आहोत? जिथं कुठं जेव्हा कधी आपण पोचू तेव्हा कितीजण शिल्लक असतील? त्यांच्यापुढं काय वाढून ठेवलं असेल?

क्रमश:
भाग ३

16 comments:

 1. >>आपलं इथलं वास्तव्य तात्पुरतं आहे – इथलं म्हणजे डवावमधलं नाही तर पृथ्वीवरचं – याची जाणीव झाली. आपण लॅपटॉप, पासपोर्ट वगैरे फार जपतो – पण कोणत्या क्षणी हे सगळं सोडून जायला लागेल त्याचा काही भरोसा नाही. अर्थात आहोत तोवर या गोष्टींना जपणंही क्रमप्राप्त आहे. प्रश्न मरणानंतरचे नसतातच (असले तर आपल्याला माहिती नाहीत)
  -- हे खूप आवडलं

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद, प्राची.

   Delete
 2. काहीच आशा वाटायला लावणारं नाही. तरी तू लिहित्येस हे बेष्टच. छोटी छोटी खुशियाँ.

  ReplyDelete
 3. भूकंपाचा अनुभव काळजीत टाकणारा होता. लिखाण नेहमीप्रमाणे उत्तमच. - क्षिप्रा

  ReplyDelete
  Replies
  1. छे, हा भूकंप काही भयंकर नव्हता. काळजीचं कारण नाही.

   Delete
 4. तू एक अनुभवांचा खजिना आहेस - मनीषा

  ReplyDelete
 5. Nice and interesting - Sunita

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद, सुनीता.

   Delete
 6. आभार. तुझ्याबरोबर मीही डवावला अनुभवत आहे - रजनी

  ReplyDelete
  Replies
  1. प्रत्यक्षातही या. :-)

   Delete
 7. दोन्ही पोस्ट्स मस्त लिहिल्या आहेस - राज्यश्री

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद, राज्यश्री.

   Delete
 8. कुठेही जा शेवटी माणूस नावाचा प्राणी हावरट आणि ओरबडून घेणाराच आहे. त्याचे परिणाम आता पुढच्या पिढ्यांना चांगलेच भोगावे लागणार आहेत तरीही शहाणपण येत नाही हेच खरं. पण इतके छोटे विकसनशील देशही सार्वजनिक शिस्त पाळतात. आपण मात्र ...

  ReplyDelete