फेब्रुवारी २०१४
५. टीचर: सिल्व्हिया अॅश्टन वॉर्नर; अनुवाद: अरुण ठाकूर (पानं
१८३ )
प्रचलित शिक्षणपद्धती हा अनेकांच्या
चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. आपल्यासारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशात
‘शिक्षणाचं माध्यम’ या विषयावर बरीच चर्चा आणि काही प्रसंगी वादविवाद होत असतात.
भाषिक राज्यं निर्माण झाल्यावर ‘मातृभाषेचा’ प्रश्न सुटेल अशी अशा होती. पण
प्रत्यक्षात महाराष्ट्रात ४७ प्रकारचे
आदिवासी राहतात आणि मराठी त्यांची मातृभाषा नाही हे कळल्यावर प्रश्न आपण समजतो
त्याहून अधिक गंभीर आहे हे लक्षात आलं होतं.
सिल्व्हियाचं ‘टीचर’ हे पुस्तक न्युझीलंडमधील ‘मावरी’ मुलांसोबत
पूर्व प्राथमिक शिक्षणात तिने केलेल्या विविध प्रयोगांची तिची धडपड सांगते. हा
प्रयोग पुरेसा जुना आहे – इंग्लिशमधलं पुस्तक १९६३ मध्ये प्रसिद्ध झालं आहे.
काय आहेत हे प्रयोग? एक दोन उदाहरणं
सांगते इथं.
सिल्व्हिया ‘सहज शब्दावली’ पद्धत
वापरते – ते तिने विकसित केली आहे. काय आहे ही पद्धत? प्रौढ शिक्षण तज्ज्ञांनी
तयार केलेली शब्दावली मावरी मुलांना परकी वाटते हे लक्षात आल्यावर सिल्व्हियाने एक
नवी पद्धत अमलात आणली. ती एकेका मुलाला त्याला/तिला कोणता शब्द हवा आहे ते
विचारते. मुलं त्यांच्या रोजच्या जगण्यातले शब्द सांगतात – जेट, घर, भूत, भांडण,
बॉम्ब, नवी आई, भावंडे, मारतात ... असे शब्द मुलं सांगतात. ज्याने जो शब्द
सांगितला तो शब्द सिल्व्हिया त्याला/तिला लिहून देते. हा शब्द मुलं फार सहजतेने
वाचायला आणि लिहायला शिकतात – कारण शब्द त्यांच्या जगण्यातून येतात, त्यांच्या
संस्कृतीचा गंधही नसलेल्या प्रौढ लोकांकडून येत नाहीत ते!
मुलांवर सिल्व्हिया लेखन लादत नाही,
तर त्यांना लिहायला प्रेरित करते. एखादे मुल म्हणते, “मला लिहायचे नाही”; त्यावर
सिल्व्हिया त्याला रागवत नाही. “बरं, तेच लिही मग” म्हणते. “तुला का लिहावसं नाही
वाटत?” अस हळूच विचारते आणि मुलाने सांगितल्यावर तीच कारणं ‘लिहायला’ ती मुलाला
प्रोत्साहित करते. लिहायला सुरवातीस तयार नसणारं मुल त्याच्याही नकळत लिहायला
लागतं – आणि ते शिक्षेच्या धाकाविना वा कसल्याही आमिषाविना.
निसर्गाकडून शिकणे, मुलांना
स्व-शिक्षणास मदत करणे, नृत्य-संगीत-खेळ
यांचा मुक्तहस्ते वापर करणे .. अशा अनेक गोष्टींबाबत सिल्व्हिया तिचे अनुभव
सविस्तर सांगते.
नेहमी तार्किक पद्धतीने लिहिलेली पुस्तक वाचायची सवय असल्याने
सुरुवातीला मला हे पुस्तक फार विस्कळीत वाटत राहिलं. पण त्या विस्कळीतपणामागचे
तत्त्व एकदा लक्षात आल्यावर मी पुस्तकात रंगून गेले. अनेक ठिकाणी आपल्याकडची
(काहीशी समांतर) परिस्थिती आठवत गेली आणि पुस्तक थांबून थांबून वाचलं.
पुस्तकाला श्री पु. ग. वैद्य यांची
सविस्तर प्रस्तावना आहे. वैद्य सरांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल मला आदर
असला तरी प्रस्तावनेत स्वत:च्या कामाबद्दल वेळोवेळी सांगण्याचा मोह त्याना आवरला
नाही त्यामुळे त्यांची विस्तृत प्रस्तावना कंटाळवाणी झाली आहे. मी प्रस्तावना
अर्ध्यात सोडली, पुस्तक वाचलं पूर्ण आणि मग नंतर कधीतरी प्रस्तावना वाचली.
२००७ ते २०१३ या काळात या
पुस्तकाच्या तेरा आवृत्त्या निघाल्या – याचा अर्थ मराठी वाचकांनी या पुस्तकाला
चांगला प्रतिसाद दिला आहे – ही समाधानाची बाब आहे. “अवश्य वाचावं “ असं पुस्तक आहे
हे!
६. प्रिय बाई: बर्बियानाची शाळा
(पानं १३६ )
परत एकदा वाचलं हे पुस्तक. बर्बियानाच्या
शाळेतल्या आठ मुलांनी मिळून लिहिलेलं पत्ररुपी पुस्तक. या पुस्तकाविषयी अनेकांनी
आधीही लिहिलं आहे – म्हणून सविस्तर लिहीत नाही. पण थोडक्यात महत्त्वाचं सांगायचं
तर:
पुस्तकाची भाषा अगदी सोपी आहे.
मुलांनी स्वानुभवातून लिहिल्यामुळे इथं फक्त सिद्धांत नाहीत तर शिक्षणविषयक
सिद्धांतांचा मुलांवर कसा विपरीत परिणाम होतो याचं विदारक चित्र रंगवलं आहे.
स्वत:ची मतं मांडताना पूरक आकडेवारी
दिली आहे. शाळेत प्रवेश घेतलेली मुलं पुढे कशी गळतात आणि ही गळणारी मुलं कोणत्या
वर्गातली असतात (आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातली!) याची
आकडेवारी विलक्षण आहे. आपण सध्याच्या
शिक्षणव्यवस्थेतून मुलांना शिकायला प्रोत्साहित करतो का त्याना शाळेतून बाहेर
पडायला भाग पाडतो याचं स्पष्ट उत्तर देणारे आकडे आहेत हे.
या पुस्तकातली ‘बिना सुट्टीच्या
शाळेची” मुलांची मागणी वेगळी वाटते. “सक्तीच्या शाळांनी विद्यार्थ्याना नापास करता
कामा नये” ही मागणी अवास्तव वाटली सुरुवातीला तरी मुलांचा युक्तिवाद (खरं तर
अनुभव) वाचल्यावर ही मागणी पटते. शिक्षकांची भूमिका काय असावी, त्यांची जबाबदारी
काय असावी याबद्दलच्या मुलांच्या अपेक्षा डोळ्यांत अंजन घालणा-या आहेत. ही सगळी
कष्टकरी वर्गातली, डोंगराळ भागातली मुलं आहेत; ते शिकायला उत्सुक आहे, पण सध्याची
शाळा त्यांना सामावून घेत नाही अशी त्यांची रास्त तक्रार आहे.
इटलीमध्ये या पुस्तकातल्या
शिफारसींच पुढं काय झालं असेल हे जाणून घायची इच्छा आहे.
७. Visibility
and Effectevity: report by Alochana (पानं १६५ )
आलोचना संस्थेने २००० ते २००३ या
कालावधीत पुणे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांसाठी ‘पंचायत राज सक्षमीकरणा’साठी
एक प्रकल्प राबवला होता; त्याचा हा अंतिम अहवाल. संदर्भांसाठी अनेकदा वापरला होता
मी सुटासुटा; संपूर्ण आत्ताच वाचला. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर स्त्रियांना ‘पंचायत
राज’ची दारं खुली झाली खरी, पण अनुभव नसल्याने अनेक अडचणी येत होत्या (आजही येतात.)
तिथे कार्यक्षमतेने काम करण्यासाठी अनेक स्त्रिया स्वयंसेवी संस्थांच्या सक्रिय
मदतीची अपेक्षा करतात; पण स्वयंसेवी संस्थांना तरी ‘पंचायत राज’ची पुरेशी माहिती
तेव्हा कुठे होती. म्हणून मग प्रशिक्षणाचा हा खटाटोप.
प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, त्यात आलेल्या
अडचणी, ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध सहभागी संस्थांनी राबवलेले
उपक्रम; त्यातले यशापयश, नेट्वर्किंगमधून मिळालेले बळ, सहभागी कार्यकर्त्यांच्या
क्षमतांचा विकास – असे अनेक मुद्दे सविस्तर लिहिले आहेत या अहवालात. एका प्रक्रियेचा
उत्तम दस्तावेज आहे हा.
या परिसरात पुन्हा एकदा जाऊन या प्रशिक्षणाचे
काय परिणाम टिकले आहेत, आणखी काय बदल झाला आहे, नवी काय आव्हाने आहेत – हे पाहण्याचा
विचार मनात आहे. बघू कसं जमतंय ते!
८. मुसाफिर: अच्युत गोडबोले
(पानं ४७२)
मी वाचली ती या पुस्तकाची सव्विसावी
आवृती. एक वर्षाच्या आत इतक्या आवृत्त्या निघाव्यात याचा अर्थ पुस्तक भलतंच
गाजलेलं आहे. पहिल्या पानावर श्री. गोडबोले यांची ओळख दडपून टाकणारी आणि
पुस्तकाबद्दल ब-याच अपेक्षा निर्माण करणारी. सुरुवात ठीक. जसजशी मी पुढे वाचत जाते,
तसतसा अपेक्षाभंग होतो.
गोडबोले बोर्डात आले; गोडबोले
आयआयटीत होते; गोडबोले संगीतप्रेमी आहेत, गोडबोलेनी शहाद्यात आदिवासी लोकांसाठी एक
वर्ष काम केलं; इन्फोटेकमध्ये गोडबोले यांचं नाव आहे; गोडबोले ब-याच नामांकिंत
पुस्तकाचे लेखक आहेत – हे सगळं लक्षात घेता या पुस्तकाने घोर निराशा केली.
स्वत:च्या आयुष्यातल्या घटना
सांगताना उगाच सिद्धांत मांडत बसायची लेखकाची हौस काही काळाने कंटाळवाणी होत जाते.
उदाहरणार्थ गोडबोले दहा दिवस धुळ्याच्या तुरुंगात राहिले (आदिवासी चळवळीत गोडबोले
सक्रीय होते). आता शहरातला मध्यमवर्गीय मुलगा, आयआयटीचा पदवीधारक पहिल्यांदा
तुरुंगाचा अनुभव घेताना त्याची मन:स्थिती कशी असेल? (या अनुभवानंतर ते काम सोडून
मुंबईत परतले.) गोडबोले मात्र आपण जणू काही अध्ययनासाठी तुरुंगात गेलो होतो अशा
थाटात त्याबद्दल बावीस पानं मजकूर लिहितात. तिथं उगाच क्वालीन विल्सन, विजय
तेंडुलकर, जिअम जेन .. अशी नावं. माहितीचा भडीमार करण्याचा गोडबोलेंचा सोस
हास्यास्पद होऊन जातो.
याच ठिकाणी अनेक गुन्हेगारांना
भेटल्याची वर्णनं. तुरुंगात इतर कैद्यांशी बोलणं इतकं सोपं असतं का? आणि बोलायची
संधी मिळाली तरी कैदी लगेच आपली रामकहाणी सांगत बसतील काय? ते तुरुंगात असताना
एकाही कैद्याला फाशी झाली नव्हती – तरीही त्याचं वर्णन. एकंदर या माणसाने ख-या आणि
कल्पित गोष्टी सरमिसळ करून लिहिल्या आहेत की काय अशी मला शंका यायला लागली.
पुस्तकात फक्त स्वत:चे फोटो;
जवळच्या व्यक्तींपेक्षा जगभरातल्या थोर लोकांबद्दल जास्त लिहिणं, सारखा शहाद्याचा
उल्लेख करत स्वत:च्या संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणं... हा माणूस नेमका कसा आहे,
याची जीवनविषयक दृष्टी नेमकी कशी आहे, याची मूल्यं कोणती आहेत, याला ‘स्व’ सोडून
आणखी कुणाबद्दल प्रेम आहे – याचा काही पत्ता लागला नाही मला पूर्ण पुस्तक वाचूनही.
Interesting variety.
ReplyDelete