ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, March 21, 2014

१९३. निवडणूक २०१४ अनुभव: २. मुंबईत केजरीवाल (१)

‘रोड शो’ ही संकल्पना मला स्वत:ला फारशी आवडत नाही. शहरांत रस्त्यावर आधीच कितीतरी वाहनं असतात, प्रदूषण असतं, वेळ लागतो.  एखाद्या राजकीय नेत्याचा ‘रोड शो’ म्हटला की सामान्य प्रवाशांचे हाल वाढतात. काय ज्या यात्रा वगैरे करायच्या आहेत त्या चालत कराव्यात, अगदी फार फार तर सायकल वापरावी असं माझं मत. अर्थात माझ्या मताला कोण विचारतंय म्हणा!

तरीही ‘आप’चे श्री. अरविंद केजरीवाल यांचा मुंबईत ‘रोड शो’ आहे म्हटल्यावर मी १२ मार्चला मुंबईत जायचं ठरवलं. अरविंद केजरीवाल यांना पाहायचं किंवा ऐकायचं असा माझा हेतू नव्हता. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या आंदोलन काळात केजरीवाल यांना ‘जंतर मंतर’ आणि ‘रामलीला मैदान’ या दोन्ही ठिकाणी मी अनेकदा ऐकलं आणि पाहिलं होतं. ‘मेणबत्ती संप्रदाय’ अशी प्रसारमाध्यमांनी त्या आंदोलनाची कितीही हेटाळणी केली तरी त्या आंदोलनाच्या माझ्या आठवणी; विशेषत: त्यातल्या सामान्य लोकांच्या सहभागाच्या आठवणी प्रेरणादायी होत्या, आजही आहेत. ‘आप’ची स्थापना, दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधीही ‘आप’मध्ये होणा-या चर्चा अशा गोष्टींचा मागोवा घेत असले तरी ‘केजरीवाल करतात ते सगळं योग्य’ अशी (टोकाची) भूमिका मी कधी घेत नाही. सुदैवाने व्यक्तीपूजा (आणि म्हणून व्यक्तीद्वेष) मला जमत नाही.

केजरीवाल या व्यक्तीचं ‘दर्शन’ घ्यायला मी काही मुंबईला जात नव्हते. सामान्य माणसांच्या अपेक्षा काय आहेत, मतदारांचा कल काय आहे; त्यांचा ‘आप’ला प्रतिसाद कसा आहे. गेल्या चार महिन्यांतील घडामोडींचा सामान्य माणसांनी कसा अर्थ लावला आहे – हे मला जाणून घ्यायचं होतं. कुठल्याही माध्यमाच्या चष्म्याविना हे जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी होती.  शिवाय मेधाताई पाटकर ईशान्य मुंबईतल्या ‘आप’च्या उमेदवार आहेत; त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आहे हेही पाहायचं होतं.  

केजरीवाल (आता प्रत्येक वेळी श्रीयुत लिहित बसत नाही) यांचा मुंबईचा कार्यक्रम कळला. त्यानुसार सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर उतरणार होते. रिक्षाने अंधेरी स्थानकावर येऊन लोकलने चर्चगेटला येणार होते. मला त्यांचा हा बेत थोडा ‘नाटकी’ वाटला – तो जसा राहुल गांधी यांचा वाटला होता किंवा अन्य कोणत्याही नेत्याचा वाटेल तसा आणि तितपत नाटकी होता हा बेत. ‘बाकी इतके दिवस मुंबईत प्रवाशांचे हाल होतात; मग दोन तास आमच्यामुळे झाले तर काय बिघडलं?’ या प्रकारचा युक्तिवाद मला हास्यास्पद वाटतो. जो प्रश्न सर्वाना माहिती आहे, त्याचा आपण व्यक्तिश: अनुभव घ्यायची गरज नसते हे एक; आणि दुसरे म्हणजे एखादा प्रश्न आपण कमी करू शकत नसू, तर त्यात निदान आपल्यामुळे भर पडू नये याची आपण काळजी घेऊ शकतो; घ्यायला हवी. इतर  राजकीय पक्ष जो खेळ खेळतात तोच केजरीवाल यांनी खेळावा याचं मला वैषम्य वाटलं . पण असो.

दुपारी दोन वाजता ऑगस्ट क्रांती मैदानातून रॅलीची (रॅली आणि रोड शो हे शब्दप्रयोग पर्यायी म्हणून वापरले आहेत मी इथं!) सुरुवात होणार होती, त्यामुळे आम्ही (तीन मित्र होते सोबत) थेट मुंबई सेन्ट्रल स्थानकावर पोचलो. तिथं एका मैत्रिणीने ठरवलेली टॅक्सी होती, त्यात बसलो. चालकाला विचारलं, “केजरीवालांचा रोड शो सुरु झालाय का”? त्यावर त्याने सांगितलं की चर्चगेटला दंगल झालीय. मला ती बातमी चिंताजनक वाटली. पण खोलात गेल्यावर कळलं की चर्चगेट स्थानकावर गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथले सुरक्षा दरवाजे कोसळले. हेही पुरेसं चिंताजनक आहे मुंबईचा विचार करता. पण ते दरवाजे तसेही तकलादू आहेत. शिवाय मुंबई सेन्ट्रल स्थानकावर अनेकदा प्रवाशांना या सुरक्षा दरवाजांच्या बाजूने प्रवेश करताना (त्याच्या आतून नाही!) पाहिल्याने हे दरवाजे कोसळणं दंगलीच्या तुलनेत किरकोळ वाटलं. गर्दीच्या व्यवहाराचं हे समर्थन अर्थातच नाही. पण ‘आप’ समर्थकांनी मुद्दाम हे घडवून आणल्याचं प्रसारमाध्यमांनी रंगवलेलं चित्र काही पूर्ण खरं होतं अशातला भाग नाही.

दोन वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर केजरीवाल दहा मिनिटे प्रसारमाध्यमांशी आणि लोकाशी बोलणार असा कार्यक्रम होता. पण आम्ही दोन वाजून दहा मिनिटांच्या आसपास मैदानाजवळ पोचलो तोवर रॅली निघाली होती तिथून. त्यामुळे केजरीवाल प्रसारमाध्यमांशी काय बोलले, बोलले की नाही हे काही कळलं नाही. दुस-या दिवशी ते काही शोधायचा मी प्रयत्नही केला नाही.

नागपाडा जंक्शन ते खिलाफत हाऊस असा रॅलीचा मार्ग होता. आम्ही  सामान टॅक्सीत ठेवून, चालकाला खिलाफत हाऊसला यायला सांगून नाना चौकात उतरलो. जाम झालेल्या ट्रॅफिकवरुन रॅली कोणत्या दिशेने गेली असेल याचा अंदाज येत होताच; तरीही वाटेत लोकांना विचारत गेलो. थोड्या अंतरावर ‘आप’च्या टोप्या दिसायला लागल्या आणि साधारण पंधरा मिनिटांत आम्ही रॅलीत सामील झालो.दोन्ही बाजूंनी पोलीस दोरी धरून चालत होते आणि त्या दो-यांच्या मधून आप समर्थकांनी चालावं अशी अपेक्षा होती. गर्दी नियंत्रणाची पोलिसांची ही नेहमीची पद्धत आहे. पण थोडं वाकून दोरीखालून आत प्रवेश करणं आणि बाहेर जाणं शक्य होतं आणि अनेक लोक ते करत होते. हिरव्या रंगाच्या उघड्या जीपमध्ये केजरीवाल दिसत होते. 


त्यांच्या सोबत मेधा पाटकर, मीरा संन्याल आणि  मयंक गांधी हे मुंबईतले ‘आप’चे उमेदवार उभे होते. गाडीभोवती गर्दी होती. काही लोक केजरीवाल आणि उमेदवारांच्या हातात हात मिळवत होते, काही घोषणा देत होते तर काही कापडी फलक घेऊन चालत होते. मोटरसायकलवर अनेक समर्थक होते. इकडेतिकडे 'आप'च्या टोप्या घातलेले लोक थांबून चहापान करत होते, विश्रांती घेत होते आणि थोड्या वेळाने परत रॅलीत सामील होत होते. 

मुंबईत एरवी जेवढं उकडतं, तेवढा उकाडा आज नव्हता. रस्त्यावर अनेक लोक उभे होते. ‘आप’चे कार्यकर्ते त्याना पत्रकं वाटत होते. त्यातले बरेच लोक दुकानांतून बाहेर आले होते, तर काहीजण रस्ता ओलांडून जाता येत नाही म्हणून थांबले होते बहुधा. एक ‘आप’ कार्यकर्ता सगळ्यांना टोप्या पुरवत होता, त्याने मलाही एक दिली, पण मी काही ती घातली नाही. काहीजण हातात झाडू घेऊन चालत होते.

पोलीस बंदोबस्त तगडा होता. महिला पोलिसांची संख्याही लक्षणीय होती. मला अशा पद्धतीने पोलीस वेठीला धरले जातात याचा नेहमी राग येतो; पण इलाज नाही. मागच्या टोकापासून केजरीवाल यांच्या वाहनापर्यंत साधारण साडेतीनशे चारशे लोक असावेत. मला वाटलं की कदाचित त्यांच्या वाहनाच्या पुढेही तितकेच लोक असतील; म्हणून पुढे येऊन पाहिलं तर पुढे फक्त  निवेदन करणारं वाहन होतं. सगळा परिसर पाहता मुस्लीमबहुल परिसरातून मिरवणूक जात होती हे लक्षात आलं. हे नियोजन असेल तर मग हीदेखील इतर राजकीय पक्षांसारखीच (आणखी) एक खेळी झाली. तेच नियम पाळून, त्याच चौकटींना बळ देऊन कसा काय बदल घडवून आणणार आहे ‘आप’ – हा प्रश्न मनात येत राहिलाच दिवसभर.

घरांच्या बाल्कनीतून लोक पाहत होते. रॅलीतला एकजण मला म्हणाला, “मोदी को गुजरात जाकर, उनके घर जाकर ललकारा है अरविंदजीने, इसलिये मुस्लीम लोग सपोर्ट करेंगे ‘आप’को!” मी त्यावर हसले आणि पुढे गेले. लोक मयत पाहायला आणि लग्न पाहायला आणि गणपती पाहायला पण असेच उभे असतात, हे त्याला माहिती नसेल कदाचित, पण मला माहिती आहे. रस्त्यात वाहनं थांबवून ठेवली होती पोलिसांनी – त्यामुळे ते लोक वैतागलेले स्पष्ट दिसत होतं – स्वाभाविक आहे ते. मधेच लोक एकदम थांबले, मी तोवर पुढे आले होते. मग कोणीतरी म्हणालं, “केजरीवाल भाषण देताहेत मागे”. पण दुस-या दिवसेही वर्तमानपत्रात बातमी होती की कॉंग्रेस आणि आपच्या कार्यकर्ते यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. खरं काय ते मला माहिती नाही.

अर्ध्या तासात मला अंदाज आला.  समर्थक होते, जोशात होते!  पण बघेही भरपूर होते आणि त्यांना फक्त ‘कौन है ये बंदा’ असं कुतूहल होतं. त्यांच्या  तिथं असण्यावरून काही अंदाज बांधता येत नव्हता कारण अनेकांचे चेहरे काही बोलत नव्हते – म्हणजे मला ते कळत नव्हतं.


‘खिलाफत हाऊस’ला आम्ही आलो, तर बाहेर ही गर्दी आणि प्रवेशद्वार बंद. तिथं केजरीवाल लोकांशी बोलतील असा माझा समज होता (तो का होता, माहिती नाही). पण प्रत्यक्षात आत कुणाला सोडत नव्हते. फक्त वीस लोकांना आत सोडलंय अस कुणीतरी म्हणालं! चार किलोमीटर चालून लोक दमले होते – तिथं ‘आप’चे कार्यकर्ते पाण्याची व्यवस्था पाहत होते.


आपली लोकशाही किती जमीनदारी प्रवृत्तीची आहे हे  अशा रॅलीत भाग घेतला की कळतं. एक तर लोकांना नेत्यांना ‘पाहायचं’ असतं याची मला गंमत वाटते. दूरदर्शनच्या जमान्याआधी हे ठीक होतं – पण आता इतक्या वेळी ‘दर्शन’ होतं असतं लोकांचं, की कामधाम सोडून त्यांना पाहायला कोण येणार असा मला प्रश्न पडतो – तरी लोक येतातच म्हणा! दुसरं म्हणजे अशा प्रसंगी नेत्यांचा ना कार्यकर्त्यांशी संवाद होतो ना लोकांशी. पूर्वी  राजे महाराजे पालखीत बसून जायचे आणि लोक त्यांना पहायला जमायचे – त्याची ही  आधुनिक आवृत्ती म्हणायची – नेत्यांचीही आणि जनतेचीही! खरं तर ‘आप’ने अशी रॅली आयोजित करून नेमकं काय साधलं हे निदान मला तरी कळलं नाही.

इतस्तत: विखुरलेला आमचा गट इथं भेटला, टॅक्सीवालाही मागून येऊन भायखळा पोलीस ठाण्याच्या समोर थांबला होता. मग आम्ही निघालो ईशान्य मुंबईकडे – मेधा पाटकर यांच्या मतदारसंघात. साडेपाचपासून केजरीवाल तिकडे असणार होते. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या मतदारसंघात लोकांच्या प्रतिसादात काही फरक आहे का हे पाहायला मग आम्हीही तिकडे निघालो. 

क्रमश: 

5 comments:

 1. Very enjoyable and informative report.

  ReplyDelete
 2. तू शब्दचित्र छान रेखाटतेस. पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता आहे.
  सुनीती

  ReplyDelete
 3. मला लिहिता वगैरे येत असतं तर मी हेच आणि असंच लिहिलं असतं.

  Bipin

  ReplyDelete
 4. Very accurate . it should be stopped by all so called 'leaders' we can watch them on Ideat box . it is e world so norms and old types must be changed

  ReplyDelete
 5. Savita. Press meet never took place. It was cancelled deliberately.I have found out why. Will tell you sometime. Baki thikach ahe.
  I have written about same and will be out tomorrow in anubhav Unique features link andeanubhav.
  Do read -Milind

  ReplyDelete