ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, February 24, 2026

२८१. “बोशांको”ची भेट: भाग २: शांतिनिकेतन

(If you want to read this post in English, it is available here!

भाग १: बोलपूर

शांतिनिकेतन हे नाव ऐकलं की आपल्याला लगेच रवीन्द्रनाथ टागोर हे नाव आठवतं. भिंतींचं बंधन नसलेले खुले वर्ग, झाडाखाली बसलेली मुलं, गुरुदेव, विश्वभारती — असं एक चित्र डोळ्यांसमोर येतं. आपल्याल हे एक शैक्षणिक- सांस्कृतिक तीर्थक्षेत्र  म्हणून ओळखीचं आहे. जिथं शिक्षण म्हणजे परीक्षा नाही, तर अनुभव आहे; आणि कला म्हणजे चौकटीत बंदिस्त नसलेली गोष्ट आहे — अशी एक सुंदर (आणि काहीशी आदर्शवादीही) प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे. आज हे सगळं तसंच टिकून आहे का, की बदललं आहे – असंही एक कुतुहल मनात जागतं.

नुसतंच पर्यटक म्हणून जायचं तर शांतिनिकेतन पाहायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला एक दिवस पुरेसा आहे.  टागोरांचं घर, संग्रहालय, हस्तकला बाजार, आठवड्याच्या हाटमधून आठवण म्हणून घेतलेली एखादी वस्तू — आणि मग परत फिरायचं. शांत आणि सुंदर अशी या जागेची ओळख जितकी खरी आहे, तितकीच अपुरीही आहे. कारण शांतिनिकेतन केवळ एका भेटीत उरकून टाकण्याची जागा नाही. आजही ती एक प्रकारे अंतर्मुख करणारी जागा आहे.

शांतिनिकेतन म्हणजे केवळ टागोरांची आठवण नाही, तर टागोरांनी रुजवलेली एक दृष्टी, एक विचारधारा आहे. माणूस, निसर्ग, शिक्षण, कला आणि समाज यांच्यातली सीमारेषा पुसून टाकण्याचा टागोरांनी केलेला प्रयत्न अजूनही इथं दिसतो. मला सुदैवाने पर्यटकांसारखी पाहायची आणि निघायची घाई नव्हती. स्थानिक लोकांबरोबर राहायचं आणि त्यांच्या शिफारसीनुसार रोज एक निवडक गोष्ट करायची असं मला करत आलं. शांतिनिकेतन हळूहळू पाहताना मग त्याचे अनेक पैलू उलगडत गेले. अर्थात सगळं पाहून झालं नाही, आणि सगळं कळलेलंही नाही. पण शांतिनिकेतनच्या ओळखीची सुरूवात तर झाली.

इतिहास

१८६३ मध्ये रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेन्द्रनाथ टागोर यांनी बोलपूरजवळ या मोकळ्या, रुक्ष जमिनीत एक छोटंसं आश्रमस्थळ उभारलं. ‘शांतिनिकेतन’ — म्हणजे शांततेचं घर. सिन्हा नावाच्या जमिनदाराकडून देवेन्द्रनाथांनी वीस एकर जमीन विकत घेतली.  देवेन्द्रनाथांनी ध्यान, साधना, आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत जीवन अनुभवण्यासाठी आदर्श जागा म्हणून या जमिनीची निव़ड केली. या खरेदीचा उद्देश ब्राह्मो समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक शिक्षणाला पलीकडे घेऊन जाणं, निसर्गाशी संवाद साधणं, आणि भौतिक शिक्षणाच्या चौकटींपेक्षा बाहेरचा - “जीवनाचा अभ्यास” - सुरु करणं हा होता.

त्या काळात कोणीही कल्पना केली नसेल की हे शांत, थोडंसं एकाकी ठिकाण पुढे जागतिक विचारांचं केंद्र बनेल.

रवीन्द्रनाथ टागोरांनी या जागेला केवळ आश्रम म्हणून नव्हे, तर शिक्षणाच्या प्रयोगशाळा म्हणून पाहिलं. १९०१ मध्ये त्यांनी इथं ब्रह्मचर्य आश्रम शाळेची स्थापना केली. वर्ग भिंतींमध्ये बंद न ठेवता झाडांच्या सावलीत नेण्याचा निर्णय हा केवळ शैक्षणिक नव्हता, तर राजकीय आणि सांस्कृतिकही होता. वसाहतवादी शिक्षणपद्धतीला पर्याय देण्याचा, भारतीय परंपरा आणि जागतिक विचार यांचा संवाद घडवण्याचा तो प्रयत्न होता. इथं पाठांतरापेक्षा निरीक्षण, स्पर्धेपेक्षा सहअस्तित्व आणि परीक्षेपेक्षा समज याला महत्त्व दिलं गेलं.

१९२१ मध्ये विश्वभारतीची स्थापना झाली. ‘यत्र विश्वं भवत्येकनीडम्’ (जिथं संपूर्ण जग एक घर बनतं) हे विश्वभारतीचं केवळ घोषवाक्य नाही, तर इथल्या जगण्याची दिशा होती. देश-विदेशातील विद्यार्थी, कलाकार, विचारवंत इथं येऊ लागले. शांतिनिकेतन हे एका व्यक्तीचं स्वप्न राहिलं नाही, तर सामूहिक प्रयत्नातून उभं राहिलेलं बौद्धिक आणि सांस्कृतिक आंदोलन बनलं.

संपूर्ण जग एक घर मानणारा हा प्रयोग. त्यामुळेच इथं शिक्षण म्हणजे फक्त वर्गखोलीतलं ज्ञान नाही. इथं ऋतू, सण, कला, निसर्ग, आणि मानवी नातेसंबंध हे सगळं शिक्षणाचा भाग आहे. आज UNESCO ने शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, पण स्थानिक लोकांसाठी आणि इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शांतिनिकेतन अजूनही जगणं शिकवणारी जागा  आहे.

आज शांतिनिकेतन हा एक स्वतंत्र ‘परिसर’ म्हणून ओळखला जातो, जो विश्वभारती विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे.

                             

शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन हे दोन मुख्य भाग मिळून विश्वभारतीचा विस्तृत परिसर तयार होतो. शांतिनिकेतनमध्ये कला, संगीत, भाषा आणि मानवविद्येचे विभाग आहेत; तर श्रीनिकेतन ग्रामीण पुनर्रचना, शेती आणि समाजविकासाच्या प्रयोगांसाठी ओळखलं जातं. म्हणजेच शांतिनिकेतन ही केवळ भौगोलिक जागा नाही, तर एक जीवनदृष्टी आहे — आणि विश्वभारती ही त्या जीवनदृष्टीची औपचारिक, विद्यापीठीय अभिव्यक्ती.

हेरिटेज वॉक

शांतिनिकेतन आश्रम हेरिटेज वॉक फक्त रविवारी असतो. आम्ही बोलपूरला शनिवारी रात्री पोचल्याने हेरिटेज वॉक हाच आमचा पहिला उपक्रम होता. 

                               

माहितीपत्रकात छातिमतल, शांतिनिकेतन गृह, उपासना गृह, तालध्वज, नूतन बाडी, देहली, संतोषालय, घंटातल, पूर्व तोरण, पश्चिम तोरण, सिंह सदन, पाठ भवन, दिनांत्रिका, चीना भवन, आणि हिंदी भवन या जागांचा उल्लेख आहे. यातली एक-दोन ठिकाणं वगळता बाकी सगळी पाहिली.

अनासुआने पुढं जाऊन तिकिटं काढून ठेवली होती. बांग्ला, इंग्रजी, आणि हिंदी अशा तीन भाषांमधले गाईड्स (मार्गदर्शक) उपलब्ध होते. आम्ही आणखी एका गटाबरोबर हिंदी बोलणाऱ्या गाईडसोबत चालायला लागलो.

बंगाली भाषेत छातिम असं ज्याला नाव आहे, तो म्हणजे सप्तपर्णी वृक्ष. इथल्या दोन सप्तपर्णी वृक्षांखाली देवेन्द्रनाथ टागोर यांनी त्यांच्या पहिल्या भेटीत म्हणजे १८६२ मध्ये ध्यान केलं होतं – हे या जागेचं महत्त्व. कुंपणापलिकडून बऱ्याच अंतरावरून हे वृक्ष पाहावे लागले.  बहुतांश ठिकाणं अशी लांबूनच न्याहाळता आली. आपल्या समाजाला लागलेलं सेल्फीचं वेड आणि भिंतीवर आपलं नाव कोरण्याचा छंद लक्षात घेता पर्यटकांमध्ये आणि वास्तूंमध्ये हे अंतर आवश्यक आहे.

शांतिनिकेतन आश्रम परिसरात पहिलीपासूनचे वर्ग भरतात. 

ठिकठिकाणी वृक्षांच्या आजूबाजूला मोठं वर्तुळ दिसलं.वर्तुळ म्हणजे दगडी वर्तुळाकार कट्टा. इथं विद्यार्थी बसतात. वर्तुळाचा एक भाग इत भागापेक्षा थोडा उंच आहे, तिथं शिक्षक-शिक्षिका बसतात. अजूनही इथं आकाशाखालचे, बिनभितींचे वर्ग भरतात. 

१९१९ मध्ये बौद्ध शैलीत बांधलेला घंटाताल आजही रोजच्या वापरात आहे.

 हे आहे  पाठ-भवन कार्यालय. १९०१ मध्ये पाच विद्यार्थ्यांना घेऊन पाठ-भवनची सुरूवात झाली. इथं आजही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिलं जातं. ज्या बिनभिंतींच्या वर्गाचा मी आधी उल्लेख केला आहे – तो पाठ-भवनचा भाग आहे. आता या जुन्या इमारतीत कार्यालय आहे. मला या इमारतीचा रंग फार आवडला. इमारतीची रचना शैलीही मला भावली. शांतिनिकेतनमध्ये अनेक शैलींचं फ्युजन दिसतं – मग ती वास्तूकला असो की चित्रकला. एक प्रकारचा साधेपणा आणि तरीही विलक्षण सौंदर्य – असं शांतिनिकेतनमध्ये आजही जाणवतं. नव्याचा स्वीकार करताना जुन्यातलं चांगलं ते टिकवून ठेवायची कला शांतिनिकेतनला साधली आहे असं प्रथमदर्शनी वाटलं.

वडाचं एक जुनं झाड त्या परिसरात आहे. त्याच्या आसपास रेंगाळताना शांत वाटलं. एक-दोन लहान मुलं तिथं पारंब्यांवर झोके घेत होती. शेजारच्या एका कट्ट्यावर एकला चलो रे या गाण्यावर पाठ-भवनमधली मुलं-मुली नृत्याचा सराव करत होती. पर्यटक आपल्याकडं पाहताहेत का वगैरे गोष्टींकडं त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. ते त्यांच्या सरावात रममाण झाले होते.

नूतन बाडी (बांग्ला भाषेत नतुन बाडी) हे मृणालिनी देवी (रवीन्द्रनाथ यांच्या पत्नी) यांच्या मृत्यूनंतर १९०२ मध्ये बांधलेलं घर. महात्मा गांधी आणि कस्तुरबा या घरात काही काळ राहिले आहेत. शांतिनिकेतन गृह हे या परिसरातलं सर्वात जुनं घर. याही इमारतीत महात्मा गांधी राहिले आहेत. रवीन्द्रनाथांनी त्यांच्या पुढं प्रसिद्ध झालेल्या अनेक कविता याच घरात लिहिल्या आहेत. यातल्या नेमक्या कुठल्या ते आठवत नाही, पण एका इमारतीतील भिंतींवर आणि छतावर नंदलाल बोस यांची चित्रं पाहता आली. दिल खुष हो गया. इतकी ताजी आणि जिवंत चित्रं होती ती! ती चित्रं पाहून काय वाटलं याचं वर्णन मला शब्दांमध्ये करता येणार नाही.

परिसरात दोन तास भटकलो आणि बाहेर पडलो. बाहेर तूफान गर्दी होती. त्यात हे दोन वादक-गायक तल्लीन होऊन गात होते. ते ऐकतानाही प्रसन्न वाटलं. 

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम आणि चित्रप्रदर्शनं

२६ जानेवारीला सकाळी पुन्हा विश्व-भारती परिसरात गेलो ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी. आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला, त्यामुळे प्रमुख पाहुणे कोण होते ते नेमकं कळलं नाही. पण त्या पाहुण्यांनी राज्यघटना आणि ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन शब्द उच्चारलेही नाहीत. त्यामुळे मला ट्रेनमधल्या त्या तरूण वडिलांची (माझे सहप्रवासी) आठवण आली. (संदर्भ – आधीची पोस्ट). कार्यक्रमाला तशी फारशी गर्दीही नव्हती. होती त्यातही शाळकरी मुला-मुलींची संख्या जास्त वाटली.

तिथून परत येताना एका ठिकाणी आलू चाप खाल्ला आणि चहा घेतला. इथली मातीची चूल छान होती. 

या छोट्या चौकात तीन-चार चहाच्या टपऱ्या होत्या. एका बाजूला डॉ. आंबेडकरांचा पुतळा दिसला म्हणून कौतुकाने पाहायला गेले. नवी दिल्लीतल्या एका गृहस्थाने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा पुतळा भेट म्हणून दिला आहे. छान वाटलं ते पाहून. 

एक दिवस रबीन्द्र भवन पाहिलं. रवीन्द्रनाथांच्या मृत्यूनंतर १९४२ मध्ये हे उभारलं गेलं. टागोर संग्रहालय असं याचं दुसरं नाव आहे. इथल्या संग्रहालयाचं नाव आहे बिचित्र– म्हणजे आश्चर्यजनक, वैविध्यपूर्ण, सुंदर ... इत्यादी. १९६१ मध्ये (रवीन्द्रनाथ जन्मशताब्दी) हे संग्रहालय तयार केलं गेलं. इथं रवीन्द्रनाथांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे रवीन्द्रनाथांचा आइन्स्टाईन, महात्मा गांधी, रोमा रोलां (Romain Rolland)  अशा लोकांशी झालेला पत्रव्यवहार आहे. रवीन्द्रनाथांनी काढलेली पंधराशेपेक्षा जास्त चित्रं आहेत. इथं फोटो काढायला परवानगी नाही. या संग्रहालयात फिरताना जाणवलं की सर्व वर्गातली (गरीब-श्रीमंत-मध्यमवर्गीय) वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथं आस्थेने पहात होती, थबकून चर्चा करत होती. बंगालसाठी आजही रवीन्द्रनाथ हा अभिमानाचा, अस्मितेचा, आणि आस्थेचा बिंदू आहे हे वारंवार जाणवतं.

उत्तरायणमध्ये पाच वेगवेगळी घरं आहेत. कोणार्क, श्यामली, उदयन, पुनश्च, उदिची अशी छान नावं या घरांना आहेत. या पाचही घरांमध्ये रवीन्द्रनाथांनी वेगवेगळ्या काळात वास्तव्य केलं आहे. श्यामली हे मातीचं घर आहे.

या घरांच्या बांधणीत केलेले वेगवेगळे प्रयोग पाहून चकित झाले.

विक्रीकक्षात रवीन्द्रनाथांच्या चित्रांच्या छोट्या प्रतिकृती विकत मिळतात असं कळलं होतं, पण मला तर काहीच दिसलं नाही. इथं नेहमीचा सरकारी खाक्या दिसला. कर्मचारी लोकांकडं लक्ष देत नव्हते. त्यामुळे माझाही काही खरेदी करण्याचा उत्साह मावळला.

गणेश हलोई (Ganesh Haloi) यांच्या Ajanta Mural Tracing चं प्रदर्शन पाहायला गेलो.

तिथं आमच्याविना कुणीच नव्हतं. तिथली प्रकाशयोजना अशी होती की ट्रेसिंग नीट दिसतंच नव्हतं. तिथले सुरक्षा कर्मचारी मात्र उत्साही होते, बरीच माहिती सांगत होते. गणेश सर अजंठामध्ये सहा वर्ष काम करत होते. त्यांनी केलेली ट्रेसिंग सुंदर आहेत. कशी केली असतील हा प्रश्न पडला, पण त्याचं उत्तर काही शोधलं नाही. गणेश सरांचं या विषयवारचं पुस्तक प्रकाशित झालं आहे असं नंतर कळलं. कदाचित पुस्तकात सविस्तर माहिती असेल, किंवा इतर मार्गांनी ती शोधावी लागेल.

रवीन्द्रनाथांचं नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतं. पण शांतिनिकेतनमध्ये त्यांच्यासमवेत योगदान देणारे आणखी तीन चित्रकार महत्त्वाचे आहेत. नंदलाल बोस (Nandalal Bose), रामकिंकर बैज (Ram Kinker Baij) आणि बिनोद बिहारी मुखर्जी (Benode Behari Mukherjee)  बैज आणि मुखर्जी यांच्या चित्रांचं प्रदर्शन दुसऱ्या दालनात होतं. तीही चित्रं अप्रतिम होती. सगळीच चित्रं अतिशय जिवंत वाटत होती. बिनोद बिहारी एका डोळ्याने अंध होते तर दुसऱ्या डोळ्याने त्यांना दूरचे दिसत नसे – तरीही त्यांची चित्रं अतिशय वास्तवदर्शी आहेत. कसं काय चित्रं काढत असेल हा माणूस – असं वारंवार वाटत राहिलं. प्रदर्शनाची वेळ संपत आल्याने आम्हाला तिथून निघावं लागलं. पण केवळ चित्रं पाहण्यासाठी शांतिनिकेतनला पुन्हा यावं इतकी सगळी चित्रं सुरेख होती.  

आणखी एका सकाळी ऋत्विक घटक यांच्या जीवनकार्यावरचं फोटो प्रदर्शन पाहिलं. ते पाहताना आपण यांचे फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत हे जाणवलं. दुसऱ्या एका दालनात कृष्णा रेड्डी यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं. प्रिंटमेकर पेंटिंग असा एक नवा प्रकार इथं पाहायला मिळाला. शांतिनिकेतनच्या एका तरूण विद्यार्थ्याने (तोही तिथं प्रदर्शन पाहायला आला होता) मला सोप्या भाषेत ते समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण माझ्या ते सगळं डोक्यावरून गेलं. चित्रं अर्थातच छान होती.

शांतिनिकेतन-बोलपूरमधली ही सगळी प्रदर्शनं पाहताना आपल्याला चित्रकलेतलं काही कळत नाही याचं अपार दु:ख झालं. चित्रकला-निरक्षर असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हे एक पूर्ण नवं विश्व होतं. एकाचवेळी अद्भुत, सुखावणारं, आणि तरीही परक्यासारखं अंतर ठेवून वागणारं.

चित्रांची भाषा समजून घ्यायला हवी खरी. नुसती एक नवी लिपी नाही, तर नवा विचार, नवा संवाद ....यांच्या अगणित शक्यता त्यामुळे समोर येतील.

आपल्या जगण्यात साधेपणा आणि सौंदर्य दोन्ही आहे का? निसर्गाकडं पाहण्याची आपली दृष्टी खरोखर कशी आहे? कलाकारांना जे दिसतं ते आपल्याला दिसू शकतं का? कलेची साधना करण्याइतकी तिच्याशी आपली बांधिलकी आहे का? या जगात आपलं नातं नेमकं कुणाशी, कशाशी आहे हे आपल्याला पुरेसं समजलं आहे का? …. असे अनेक प्रश्न या भटकंतीत माझ्या मनात येत राहिले. शांतिनिकेतनने मला नक्की एक नवी दृष्टी दिली. तिचं गारूड माझ्यावर किती काळ राहील हे काळच सांगेल.  

*******

पुढच्या भागात जाऊ जुन्या कोलकात्यात. 

2 comments:

  1. खूप सुंदर , वास्तव चित्रण तुझ्या लिखाणातून कळतं आणि चित्रांची भाषा कळत नाही म्हणतेस.....- नीला

    ReplyDelete
  2. छान. शांतिनिकेतनचा "ऑखो देखा हाल" मिळाला. पुढच्या भागाची वाट पाहतो. - यशवंत. (तुम्ही फार वेळ घेता ब्वाॉ दोन लेखांमधे!!)

    ReplyDelete

पोस्टवरती प्रतिसाद नोंदवण्यात अडचण येत असल्याचे काही वाचकांनी कळवले आहे. तांत्रिक बाबी तपासून पहात आहे. प्रतिसाद येथे प्रकाशित होत नसल्यास मला इमेलवर (aativas@gmail.com) तो पाठवावा ही विनंती. धन्यवाद.