ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, December 3, 2011

१०२. रस्ते


परवा सहज लक्षात आलं की मागच्या वर्षभराचे फोटो तसेच पडून आहेत कॅमे-यात.
मग तो एक नादिष्टपणा झाला. वेळ मिळाला की फोटो उघड; तो ठेवायचा की नाही ते ठरव; त्याला नाव दे; त्याचा आकार कमी करून घे, तो योग्य त्या फोल्डरमध्ये टाक ....इत्यादी,
वर्षभरात किती नवे रस्ते मी पाहिले तेही लक्षात आलं.
राजस्थानच्या बाडमेरमधले वाळवंटी रस्ते, पानिपतच्या क्षेत्रातले इतिहासाशी नाळ जोडणारे रस्ते; कर्नाटकातल्या हरीसंद्रा गावातली कोणत्यातरी देवाची मिरवणूक दाखवणारे रस्ते; आंध्रातला गोळकोंडा किल्ल्यापर्यंत नेताना अचानक अरुंद होणारा रस्ता; बंगलोरच्या लालबागेतले हिरवेगार थंड रस्ते; त्रिपुरातले देशांच्या सीमा अधोरेखित करणारे रस्ते; मेघालयातले निळ्या डोंगरांच्या साथीने निवांत असणारे रस्ते; कारेकलमध्ये  त्सुनामीच्या आठवणी सांगणारे रस्ते; उत्तराखंडमधले वळणावळणांचे धुक्यात हरवलेले रस्ते; मार्थंडममधले झाडांनी सावली धरलेले रस्ते; छत्तीसगडमधले बाजार भरलेले रस्ते; पंजाबमधले आमच्यासाठी खास मोकळे केलेले रस्ते; कन्याकुमारीतले जुन्या आठवणी जागवणारे रस्ते; उत्तर प्रदेशातले उजाड रस्ते; रांचीतले पर्यायी रस्ते; समुद्राची जाण करून देणारा दमणमधला रस्ता; दुधनीचा मधुबनी धरणाच्या काठाने जाणारा रस्ता; त्रिवेंद्रमचे सौम्य रस्ते; गोहाटीकडून शिलॉंगकडे जाणारा स्वत:त रमलेला  रस्ता; चंदिगढमधले व्यवस्थित रस्ते, मुंबईतले पावसाने बुडवून टाकलेले रस्ते; नागपूरमधले कधीच माहिती नसलेले रस्ते.
दिल्लीतले खर तर नवे पण तरीही जुने वाटणारे रस्ते ...
पुण्यातले जुने आणि तरीही आता विस्मरणात गेलेले रस्ते ....
काही ओळख विसरून गेलेले रस्ते.....
आयुष्यात काही नव्यानेच आलेले रस्ते ...
काही जाणीवपूर्वक बंद केलेले रस्ते ...काही हरवून गेलेले रस्ते
काही सुटलेले रस्ते .. काही विस्कटलेले रस्ते ..
काही चुकलेले रस्ते .. काही योगायोगाने गवसलेले रस्ते ....
काही जमिनीवरचे रस्ते, काही मनातले रस्ते ...
काही दिसणारे रस्ते ... काही फक्त स्वप्नातले रस्ते ...
काही टिकणारे ... काही नामशेष होणारे ...असे हे असंख्य रस्ते ...
आणि त्यावरून तितक्याच नवलाईने, उत्साहाने चालणारी मी
चालते मी? की मी स्थिर असून रस्तेच चालत आहेत? -  असा भास निर्माण करणारे रस्ते ...

असा हा अविरत वाटणारा पण एक निश्चित शेवट असणारा प्रवास.
त्या शेवटापर्यंत नेणारे हे रस्ते ...

10 comments:

  1. मला पण आठवले बरेच रस्ते :-)

    ReplyDelete
  2. Khupach chan....ha lekh mala khupach awadla....xnat maze purn jeevan dolysamorun gele......karan watchtana rastyachya jagi me swata aslyach bhas hot hota....aprtim...

    ReplyDelete
  3. मस्त लिहलेय.. डोळ्यासमोर खूपशा रस्त्यांची आणि वळणांची जाळी उभी राहिली.. सुंदर!

    ReplyDelete
  4. Pandit, आभार तुमच्या प्रतिसादाबद्दल. असे बरेच रस्ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात सोबत.

    ReplyDelete
  5. योग, तुम्हालाही काही रस्ते आठवले हे वाचून बर वाटल.

    ReplyDelete
  6. जागा बदलल्या तरी तिथले रस्ते कसे आठवतात न???आणि साथीला फोटो असतील तर असतील तर त्या प्रवासाच्या आठवणीची गर्दी...

    मी मागे शिस्त लिहिलं होतं न तो सध्याचा रस्ता मी त्यात म्हटल तस कधी तरी माझ्या स्वप्नात येईल आणि असे बरेच रस्ते आज या पोस्टमुळे आठवले...

    ReplyDelete
  7. अपर्णा, स्वप्नातच नाही जागे असताना पण आठवतील बहुतेक :-) निदान मला तरी आठवतात!

    ReplyDelete
  8. सविता ताई तुझी लेखनशैली मला खूप आवडते.डोळ्यापुढे जिवंत चित्र उभे राहते...रस्त्यांचे इतके अप्रतीम वर्णन आणि ते पण मोजक्या शब्दात....खूप सुंदर !
    मला असाच सर्वात लक्षात राहिलेला रस्ता म्हणजे लहानपणी शाळेत चालत जायचो तो घर ते शाळा हा प्रवास लहानगा पण स्मरणात राहिलेला असा रस्ता....ह्या रस्त्यावर पायात काहीही न घालता गम्मत म्हणून आजूबाजूला असणाऱ्या चिंचेच्या झाडांवरच्या पडलेल्या चिंचा उचलत,गप्पा मारत जात असू...रोजचा ठरलेला रस्ता,आम्हाला नेहमीच हवाहवासा वाटणारा असा एक रस्ता पटकन आठवला..तुझ्या लेखाने तो रस्ता जिवंत केला ग..धन्यवाद!

    ReplyDelete
  9. श्रिया, तुझ रस्त्यांच वर्णन वाचल्यावर मलाही माझ्या लहानपणीचा एक दगडी रस्ता आठवला. तस पहायला गेल तर सगळे रस्ते मी तरी कुठे मांडलेत या लेखात? ... हे फक्त या वर्षभरातले रस्ते ...असे आणखी कितीतरी आहेत .. कधी लिहीन त्याबद्दलही.

    आणि हो, तुला माझी लेखनशैली आवडते हे आवर्जून सांगितलस ते वाचून बर वाटल. आता कधीतरी मेल लिहिते तुला.

    ReplyDelete