ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, December 8, 2011

१०३. . भायर वचपाची वाट

अलिकडे मला एक नवीनच जाणीव झाली आहे.  किंबहुना जाणीवेची जाणीव झाली आहे असं म्हणावं लागेल.
ती म्हणजे: शब्द, माणसं, रस्ते, प्रवास ... या सगळ्यात फार मोठ साम्य आहे.
म्हणजे कोण कधी भेटतील; कोण सोबत राहतील; कोण मागे पडतील; कोण लक्षात राहतील; कोण विसरले जातील; कोण सुखावतील आणि कोण दुखावतील; कोण ओळखीचे असून अनोळखी होतील; कोण अनोळखी असतानाही आपले वाटतील; कोण कधी परके होतील ....... कशाच काही गणित नाही. सगळच बेभरवशाचं!
नागपूर – अमरावती – मुंबई असा प्रवास करत करत – प्रत्येक ठिकाणी कामं करत -  मी त्या सकाळी गोव्यात डाबोलीम विमानतळावर उतरले तेव्हा खर तर मी ब-यापैकी दमलेली होते. पुढच्या चार दिवसांच काम समोर दिसत होत. बाहेर पडताना मला बोर्ड दिसला ‘भायर वचपाची वाट’ आणि मी एकदम स्तब्ध झाले.
कितीतरी रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर, कार्यालयांत ... ही सूचना वाचलेली. ‘बाहेर पडण्याचा मार्ग’ – त्यात नवं काहीच नाही – कोणत्याच अर्थाने. शब्द जुने, त्यांचा प्रचलित अर्थ जुना, त्यातून काय करायचे हेही स्पष्ट – कोठेच अनिश्चितता नाही. तरी मला एकदम ते शब्द काहीतरी सांगताहेत असं वाटल.
मग कितीतरी गोष्टी आठवल्या.
सिंहाच्या गुहेत आत जाताना दिसणारी पावलं पण बाहेर न पडणारे प्राणी ...
बाहेर पडायचं कस हे माहिती नसताना चक्रव्यूहात शिरणारा आणि प्राण गमावणारा अभिमन्यू ....
भूकंपात ढिगा-याखाली गाडले गेलेले लोक ....
पर्याय नसल्याने दु:खाची नाती निभावत राहणारे लोक ....
कांही प्रसंग निसर्गाने, नियतीने दिलेले ...काही ओढवून घेतलेले ...
प्रत्येक वेळी मी ‘भायर वचपाची वाट’ शोधताना माझी झालेली तगमग आठवली; त्यातली उत्सुकता आठवली; त्यातला साहसाचा भाव आठवला; त्यातला आनंद आठवला; त्यातलं नाविन्य आठवल; जे नवं होत ते जुनं होत जाताना झालेला भ्रमनिरास आठवला ...
खरं तर प्रत्येक गोष्टीतून ‘भायर वचपाची वाट’ असतेच .. पण कधी ती दिसत नाही, कधी ती सुरक्षित वाटत नाही, कधी अडकून राहण्यातच मनाला समाधान वाटत राहतं .. तर कधी नवे धोके पत्करायची आपली तयारी नसते ...कधी इच्छा असते पण शरीराची ताकद नसते .... कधी ‘असू दे असंच’ अशी मानसिकता असते.
पण ‘भायर वचपाची वाट’ आहेच ... ही जाणीवच बराच  दृष्टिकोन बदलून टाकते हे मी पुन्हपुन्हा अनुभवलं आहे हे मात्र खरंच!
‘भायर वचपाची वाट’ शोधत राहण्याचा हा एक चक्रव्यूह  आहे आणि त्यातून ‘भायर वचपाची वाट’ नाही असं तर नाही ना हे अखेर ? – अशी एक शंकाही  आत्ता हे लिहिताना माझ्या मनात डोकावली आहे .....

6 comments:

  1. We never know what will trigger what kind of thoughts ...interesting read.

    ReplyDelete
  2. सविता, `प्रवाह' पासूनच्या सगळ्या पोस्ट वाचते आहे. डोक्यात बरंच काही चाललंय, पण नेमकं शब्दात उतरवता येत नाहीये. खूप विचार करायला लावणार्या पोस्ट आहेत सगळ्याच.

    ReplyDelete
  3. वाह! भायर वचपाच्या वाटेचाच चक्रव्यूह!

    ReplyDelete
  4. प्रीति, अस होत कधीकधी :-)

    ReplyDelete