ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, August 29, 2010

४१. स्वप्न

माझे सामान्यज्ञान जेमतेम असल्याने स्वप्नं अनेक प्रकारची असतात इतकच मला माहिती आहे. त्यांच वर्गीकरण अथवा विश्लेषण कोणी मला करायला सांगितलं, तर आनंददायक, भीतिदायक, अजब असे काही प्रकार सांगून मला गप्प बसावं लागेल. मी आपली माझ्या स्वप्नांची विभागणी दोन साध्या प्रकारांत करते - पाहिलेली स्वप्नं आणि पडलेली स्वप्नं!

स्वप्न पाहणं हे काही अंशी आपल्या हातात असतं, पण आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव तरूण वयात नसली तरी हळूहळू वय वाढते तशी होत जाते. आणि स्वप्नं पाहण्यावर आपोआप मर्यादा यायला लागतात. स्वप्नं पडण्याला मात्र वास्तवाच काही बंधन नसतं.

मला स्वप्नं बरीच पडतात याच एक अगदी सरळ साध कारण म्हणजे मी भरपूर झोपते, मला नेहमीच भरपूर झोप येते. ’अलिकडे झोप लागत नाही हो फारशी’ अशी तक्रार असणा-या लोकांच मला नेहमीच आश्चर्य वाटतं, कारण मला स्वतःला ’अजून पाच मिनिट झोपायला मिळालं तर काय बहार येईल’ अस रोज सकाळी उठताना वाटत असत.

मला जवळजवळ रोजच रात्री स्वप्नं पडतात. सुट्टीच्या दिवशी दुपारी झोपले तर मला न चुकता दुपारीही स्वप्नं पडतात, एक नाही अनेक पडतात. आता माणसाला स्वप्नं का पडतात, त्या स्वप्नांचे अर्थ काय असू शकतात असल्या विवेचनात मी काही पडणार नाही कारण त्या विषयातले मला काहीही कळत नाही. मला एवढच कळतं की, स्वप्न पडलेली मला खूप आवडत असणार म्हणून मला इतक्या नियमितपणे अशी शेकडो, हजारो स्वप्न पडतात.

’मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या म्हणीला ओलांडून मला अनेक स्वप्ने पडतात. मला भीतिदायक स्वप्ने क्वचितच पडतात. माझी बहुतेक स्वप्ने विनोदी आणि मजेदार असतात. सगळ्यात गंमतीचा भाग म्हणजे स्वप्न पाहतानाही ’हे स्वप्न आहे’ अशी माझ्या मनात कोठेतरी जाणीव असते. म्हणून स्वप्नातही माझे प्रश्न, माझ्या शंका काही संपत नाहीत. स्वप्नातही ’छे! हे असे घडणे शक्य नाही, हे बहुतेक स्वप्न आहे’ हे मी मला अनेकदा सांगत असते. शंकराचार्यांना हे कळले, तर ते नक्कीच खूष होऊन मला आशीर्वाद देतील. पण मला ’माया’ आणि ब्रह्म समजले आहे असा दावा मी करणार नाही. मी स्वप्न ही संज्ञा डोळे उघडे नसताना जे जे दिसते त्या सगळ्यासाठी वापरते आहे.

आपण ढगांमधून तरंगत आहोत, किंवा पाण्यावरून चालत आहोत हे ’स्वप्न’ आहे हे समजणे तुलनेने फारच सोपे असते. स्वप्न पाहतानाही अनेकदा ’हे स्वप्न आहे’ हे स्वच्छ जाणीव माझ्या मनात असते हा त्यातल्या त्यात गमतीचा भाग आहे! उदाहरणार्थ, मी काही मित्र मैत्रिणींसमवेत पर्वतरांगा चढते आहे - प्रत्यक्ष आयुष्यात माझे जे मित्र-मैत्रिणी एकमेकांना ओळखत नाहीत (कारण ते माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या कालखंडांशी निगडित आहेत) ते येथे एकमेकांशी अत्यंत मैत्री असल्यागत वागत आहेत. यांची एकमेकांशी इतकी ओळख कशी आणि कधी झाली हा प्रश्न मला पडला, की आपण स्वप्न पाहत आहोत हे मला कळते. किंवा मी तामीळ अथवा तेलगु अशा भाषांत जेव्हा बिनधास्त सहजपणे बोलत असते - तेव्हा ते स्वप्न आहे हे मला स्वप्नातही कळते - कारण प्रत्यक्ष आयुष्यात मला या भाषा अजिबात बोलता येत नाहीत.

मला स्वप्ने मालिकेच्या थाटातही पडतात. म्हणजे पहाटेच्या झोपेत दारावरच्या अथवा दूरध्वनीच्या आवाजाने स्वप्न सोडून जागे व्हावे लागते अनेकदा. पण असे काम संपवून मी पुन्हा झोपू शकते आणि माझ्या मनाला ’चला, ते मघाचे अर्धवट राहिलेले स्वप्न पाहू पुढे’ असे सांगू शकते आणि ते माझे स्वप्न ब्रेकनंतर मालिका चालू व्हावी अशा थाटात पुढे चालू होते.

अर्थात कधीकधी स्वप्न कोणते आणि वस्तुस्थिती कोणती याबाबत मनात गोंधळ होतो हे खरे! स्वप्नात पूर्ण केलेले काम खरोखर झाले आहे अशा थाटात राहिल्याने काही वेळा मला अडचणी आलेल्या आहेत. म्हणून मधल्या काही वर्षांत मी सकाळी जाग आल्या आल्या स्वप्न लिहून ठेवत असे. अशी सुमारे दोनशे अडीचशे स्वप्ने लिहून झाल्यावर आता सरावाने मी स्वप्न कोणते आणि प्रत्यक्षातले कोणते हे बरोबर ओळखू शकते - म्हणजे असे निदान मला वाटते तरी!

जेंव्हा जेंव्हा माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर आली आहे - ती सगळयांवरच येते म्हणा - तेंव्हा तेंव्हा त्या काळात मला स्वप्नांमध्ये असंख्य अनोळखी माणसे दिसलेली आहेत. हे चेहरे ’आपल्याला पुढे भेटणा-या लोकांचे आहेत’ अशी मी स्वत:ची समजूत घालत असते. ’तुमच्यापैकी अनेकांना मी आधी स्वप्नात पाहिले होते’ असे मी माझ्या मित्र मैत्रिणींना म्हणते त्यात मजेचा भाग जास्त असतो - मनाच्या ताकदीबद्दल उगीच अवास्तव दावा करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे मनाची ताकद अनंत असेल, पण तिचा सर्वार्थाने आपल्याला काही अनुभव येत नाही, आपला अनुभव सीमित असतो. आणि खरे सांगायचे तर स्वप्नांतही आपण कल्पनेचे इमले रचायचे सोडत नाही; स्वप्नातही आपण आणखी काही स्वप्ने पाहत असतो हे मला मजेदार वाटते.

सगळीच स्वप्ने खरी होत नाहीत, त्यातली काही शेवटपर्यंत स्वप्नेच राहतात. म्हणून स्वप्न आणि सत्य यांची सरमिसळ न करण्यात, त्यांचे तुकडे वेगळे राखण्यात शहाणपण असते. सगळी स्वप्ने खरी होत नाहीत ही जशी दुर्दैवाची बाब आहे, तशीच ती कधीकधी सुदैवाचीही बाब असते!

आपल्याला कोणती स्वप्ने पडावीत हे आपल्या हातात नसते. पण कोणती स्वप्ने पाहावीत हे मात्र आपण नक्की ठरवू शकतो. तसेच पडलेल्या स्वप्नांचा उचित अर्थ लावून (त्यांना बरेचदा काही अर्थ नसतो हे समजून घेऊन) आपण पुढची वाटचाल करू शकतो. स्वप्नांना साध्य न मानता त्यांना साधन मानण्यातून हे संतुलन साधता येते.

पण कधीकधी स्वप्न आणि सत्य यांच्यात अगदी पुसटशी सीमारेषा असते! तेंव्हा हे सगळे शहाणपण विसरले जाते आणि व्हायचा तो गोंधळ होतोच. चालायचेच! लहानपणी कधीतरी एका माणसाची गोष्ट वाचली होती. त्याचे घर जळून खाक होते, तरी तो माणूस काही दु:ख करत नाही. त्यावर बघ्यांनी आश्चर्य व्यक्त केल्यावर तो माणूस म्हणतो, "अरे बाबा, आत्ताच माझे पूर्ण राज्य गेले, दु:ख त्याचे करू की या एका घराचे दु:ख करू?” आता हा माणूस अर्थातच राजा वगैरे नसतो, त्यामुळे कोणीतरी त्याची समजूत घालते की ’ते राज्य स्वप्नातले होते, पण घर मात्र प्रत्यक्षातले आहे". तोवर तो माणूस म्हणतो, “कशावरून हे घर आणि तुम्ही सगळे जमलेले लोक माझ्या स्वप्नातले नाही? काय पुरावा तुम्ही सत्य असल्याचा?” त्यावर सगळे निरुत्तर होतात.

जोवर स्वप्न कोणते आणि सत्य कोणते याबाबत आपल्याला निश्चित माहिती नाही, तोवर फार विचार करण्यात काहीच अर्थ नाही. दोन्ही मजेत उपभोगावे एवढेच खरे तर आपल्या हातात आहे.
**

4 comments:

 1. >>स्वप्नांना साध्य न मानता त्यांना साधन मानण्यातून हे संतुलन साधता येते.
  हे वाक्य फारच आवडलं.
  आणि ती माणसाची गोष्ट तर भारीच वाटली.
  बाकी, स्वप्न हा शब्द वाचल्याबरोबर माझ्या डोक्यात अकिरा कुरोसावाचा 'ड्रीम्स' हा सिनेमा येतो. कधी जमलं तर बघा...
  एकदम वेगळीच, चांगली पोस्ट झालीय!

  ReplyDelete
 2. पाहिला नाही मी कुरोसावाचा ’ड्रीम्स’. आता तुमची शिफारस आहे तर पाहीन नक्कीच.

  ReplyDelete
 3. मला कधीकधी खुप गंतागुंतीची स्वप्नं पडतात. त्यामानाने माझी दिनचर्या खुप साधी आहे. ही गंतागुंतीची स्वप्ने जेव्हा पडतात तेव्हा झोपेतून न उठता त्यातील गुंतागुंत सोडवावी असे वाटते. आणि तुम्ही म्हणता तसे जागे होऊन पुन्हा झोपल्यावर माझी स्वप्ने पुन्हा पुढे सुरु राहतात. यामूळे होते काय की न सुटलेला गुंतागुंत जागेपणी माझ्यावर परिणाम करते आणि दिवसभर मला कोणत्यातरी अनामीक हुरहुरीने ग्रासले जाते.

  ReplyDelete
 4. प्रदीपजी, काही दिवस लिहून काढा तुम्हाला पडणारी स्वप्न .. मजा येईल तुम्हाला .. मग अनामिक हुरहूर ग्रासणार नाही कदाचित!

  ReplyDelete