ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, August 13, 2010

३९. फसवणुकीचं दु:ख

हे संपूर्ण विश्व म्हणजे एक कोडं, एक गूढ आहे. हे गूढ केवळ चंद्र – सूर्य – तारे यांच्यामुळे नव्हे तर माणसांच्या वागण्यामुळेही जाणवतं! एखादा माणूस एखाद्या विशिष्ट प्रसंगी अमूक असा का वागला असावा - याच उत्तर त्याच्या /तिच्या मनाचा, परिस्थितीचा सहृदयतेने विचार करूनही अनेकदा मिळत नाही!

इतकी वर्षे उलटली तरी नानांनी आणि भाऊंनी मला गोंधळात टाकलेलं आहे. आता दोघेही काळाच्या पडद्याआड गेले, त्यामुळे भविष्यात कधीतरी उत्तर मिळेल ही आशाही संपलीच आहे. नाना सुप्रसिद्ध संगीतकार! उभा महाराष्ट्र गेली पन्नास वर्षे त्यांच्या संगीतावर लुब्ध आहे. आणि भाऊ ज्येष्ठ संस्कृततज्ञ! देश विदेशात त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. लोक त्यांना ’या शतकाचा कालिदास’ म्हणतात. डाळ तांदूळ महागले तरी हल्ली पदव्या अन पारितोषिके भलतीच स्वस्त झाली आहेत.

बरीच वर्षे झाली त्या घटनेला आता. नितीन नुकताच कन्याकुमारीला जाऊन आला होता आणि स्वाभाविकपणे विवेकानंदांच्या विचारांनी भारावून गेला होता. आपणही १२ जानेवारीला विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने मोठा युवक मेळावा घ्यायचा अशी त्याची कल्पना होती.

आमच्या ग्रुपमध्ये - मंथनमध्ये - यावर बरेच विचारमंथन झाले. सर्वानुमते मोठा कार्यक्रम करायचा ठरले आणि आम्ही सगळेजण झपाटून कामाला लागलो.

या युवक मेळाव्यासाठी नवीन गीत लिहिले जावे आणि तेही संस्कृतमध्ये अशी कल्पना सुनीताने मांडली. संस्कृत आम्हाला कोणालाच येत नव्हते, तरीही आम्ही ती कल्पना उचलून धरली. पण लिहिणार कोण? याला त्याला विचारल्यावर चंदूच्या काकांनी भाऊंचे नाव सुचवले. आम्ही बेधडक भाऊंकडे गेलो, त्यांच्याशी बोललो. पंचवीस तीस हेलपाटे घातल्यानंतर भाऊंकडून आम्हाला एक छान संस्कृत पद्य मिळाले. “कितीही संकटे आली तरी ध्येयमार्गावर पुढे पुढेच चालत राहिले पाहिजे" असा सुंदर आशय होता त्या गीताचा! आम्ही सर्वजण भलतेच खूष होऊन गेलो.

या गाण्याला चांगली चाल लावायला पाहिजे हे आमच्या आठवडाभराने लक्षात आले. पुन्हा धावपळ. अखेर भाऊंनीच नानांचे नाव सुचवले. नानांचे नाव ऐकून आम्ही दबकलो. पण भाऊंनी एक फोन करताच नानांची भेटीची वेळ मिळाली. नानांनी शांतपणे आमचे बोलणे ऐकून घेतले. ’तरूण मुले मुली विवेकानंदांच्या नावाने काही कार्यक्रम करताहेत हे मला मानधन मिळाल्यासारखेच आहे’ असे काहीबाही ते म्हणाले.

नानांनी दहा दिवसांत गाण्याची कॅसेट आमच्या हाती दिली तेव्हा आमच्या डोळयांत पाणी आले. ’मंथन’च्या कार्यालयात त्या गाण्याची अनंत पारायणे झाली. कार्यक्रमाच्या आठ दिवस आधीच आम्हा कार्यकर्त्यांच्या तोंडी ते गाणे बसले - अगदी अर्थासकट!

वेळ मिळाला तेव्हा मी धावतच जनुकाकांकडे गेले. हे गाणे ऐकवून मला त्यांना फक्त चकितच नाही तर सुखीही करायचे होते. माझ्या लगबगीने जनुकाका गोंधळले होते. मी कॅसेट चालू करून मोठया अपेक्षेने जनुकाकांकडे पाहत होते.

पण आश्चर्याचा धक्का जनुकाकांना नाही, तर मला बसायचा होता! कारण जनुकाका ते गाणे अगदी त्याच चालीत गुणगुणत होते. माझ्या आधीच ही कॅसेट त्यांना कोणीतरी ऐकवली होती तर! पण पुढचे वाक्य ऐकून मी चक्रावलेच! कारण काका म्हणाले, “ वा! मजा आली! पंचवीस वर्षांपूर्वीचे हे गाणे.. त्याचे शब्द, त्याची चाल आजही किती ताजी वाटतेय नाही! कोठे मिळाले तुला हे इतके जुने गाणे?”

मी गप्पच होते. काकांना माझी मनस्थिती आणि या गाण्याची परिस्थिती यातले काही माहिती नसल्याने ते सविस्तर बोलत होते. पंचवीस वर्षांपूर्वी भाऊंनीच हे गीत लिहिले होते. काकांनी त्यांच्या संग्रहातले पुस्तक काढून मला ते गाणे दाखवले. आणि पंचवीस वर्षांपूर्वी नानांनीच या गाण्याला चाल लावली होती!

धरणी पोटात घेईल तर बरं - असं त्या क्षणी मला वाटलं. जुनीच गोष्ट आपण नव्याने निर्माण करत आहोत असा आव भाऊंनी आणि नानांनी का आणला असेल? आमच्यासारख्या तरूणांशी ते दोघे असा खेळ का खेळले? त्यातून त्यांना नेमके काय समाधान लाभले असेल? एकजण एका वेळी कदाचित विसरू शकतो - पण दोघेही गाणे जुने असल्याचे विसरले - हा योगायोग नक्कीच असू शकत नाही. ते आम्हाला फसवण्याच्या भरात स्वत:लाही फसवत होते, हे त्यांना कळलेच नाही का? आपण कधीतरी, कोठेतरी उघडे पडू अशी त्यांना शंकाही आली नाही का?

आजही तो क्षण मला भयंकर अपमानास्पद वाटतो. आजही त्या आठवणीने माझे डोळे पाणावतात.
फसवणुकीच दु:ख कळत नकळत आयुष्य व्यापून टाकतं!!

8 comments:

  1. बाप रे.. विषण्ण.. असं होऊ शकतं? :(
    कोण हे भाऊ आणि नाना?

    ReplyDelete
  2. धन्यवाद हेरंब :-)) हं, अशा गोष्टी घडत राहतात...

    ReplyDelete
  3. ताई सर्वप्रथम..
    मी इतके दिवस तुमचा ब्लॉग का वाचत नव्हतो...हा प्रश्न मला पडलाय!
    आता सगळाच्या सगळा वाचतोय हळूहळू..तुमचे अनुभव खूप समृद्ध करणारे आहेत आणि तुमचं लेखनही सुंदर आहे!(अर्थात हे सर्टिफिकेट देणारा मी कुणीच नाही)
    आता पोस्टबद्दल!
    सुन्न झालो मी.. त्याक्षणी तुमच्या भावना काय असतील..त्याची कल्पनाही करता येणार नाही!

    ReplyDelete
  4. धन्यवाद THE PROFET आणि स्वागतही. तुम्हाला ब्लॉग आवडला हे वाचून बरं वाटलं :-)

    ReplyDelete
  5. मला वाटतं, एका विशिष्ट वयात, तारूण्याच्या काळात प्रत्येकच तरूण मुला मुलीत या सावित्रीचा अंश दडलेला असतो. काही त्याच्यासह पुढे जगतात, काही तो गाडून त्याच्या पायावर जगण्याची इमारत रचतात.
    I also feel like this.. very nicely quoted by you... after so many days i read good article...keep it up

    ReplyDelete
  6. संध्या, यानंतरच्या post साठीची प्रतिक्रिया चुकून इकडे पडलेली दिसतेय.. त्याने बिघडत काही नाही म्हणा... आपल ब-यांच बाबतीत एकमत होतय, ही चांगली गोष्ट आहे ..:-)

    ReplyDelete
  7. फसवणुक मग ती कुठलिही असो.. अतिशय त्रासदायक प्रकार... आणि हा अनुभव वाचून तर याला नुसतेच फसवणुक न म्हणता विश्वासघात म्हणावे असे वाटतेय....

    ReplyDelete
  8. तन्वी, तुमचा शब्द जास्त योग्य आहे या अनुभवासाठी. आभार.

    ReplyDelete