ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, August 19, 2010

४०. पाचवी सावित्री

सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात.
पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात.

एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.  

मृत्युशी गप्पागोष्टी करत स्वत:च्या हुषारीने सत्यवानाचे प्राण परत मिळवणारी सावित्री. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: करणारी, बाह्य गोष्टींपेक्षा स्वत:च्या सहचराचे आंतरिक गुण पाहणारी, यमाशी न घाबरता संवाद करणारी सावित्री. तिचे हे सगळेच गुण विलक्षण वाटत लहानपणी; आणि खरे तर अजूनही.

पण कधीकधी असेही वाटते की परिस्थितीपुढे एवढी शरणागती पत्करणे हे सावित्रीने का स्वीकारले असेल? तिच्या स्वत:त असामान्य क्षमता असतानाही? काहीही करून, तडजोड स्वीकारून लग्न केलेच पाहिजे या मानसिकतेतून तिला बाहेर का पडता आले नाही? कदाचित काळाच्या फार पुढे कोणालाच जाता येत नाही हेच तात्पर्य याही कथेतून द्यायचे असेल त्या काळच्या समाजधुरिणांना!

शिवाय यमाकडून सावित्री जे तीन वर मागते तेही जरासे मजेदार आहेत. पहिला वर सावित्री मागते तो सास-याची दृष्टी परत येऊन त्याचे राज्य त्याला परत मिळावे हा. दुस-या वरानुसार स्वत:च्या पित्याला शंभर मुलगे व्हावेत अशी ती मागणी करते. तिस-या वरानुसार सत्यवानापासून तिला स्वत:ला शंभर मुलगे व्हावेत असे ती मागते. यमासारख्याकडून हुषारीने स्वत:च्या मागण्या मान्य करून घेणे हे नि:संशय वादातीत कौशल्य आहे. पण यात सावित्री स्वत:च्या बाईपणाला कमी लेखते असे वाटत राहते नेहमीच मला ही गोष्ट वाचताना! मागून मागायचे, तर स्वत:सारखी एखादी तरी मुलगी तिने मागायला हवी होती अशी हळहळ मला लहान वयात वाटत असे. सावित्रीचा सगळा लढा वैयक्तिक स्वरूपाचा होता - जरी तो तेजोमय असला तरी व्यक्तिगत स्वरूपाचा होता हे जाणवते.

सावित्रीच्या गुणांची झलक परिस्थितीशी हसतमुखाने दोन हात करणा-या अनेक स्त्रियांकडे पाहताना आजही मिळते. स्वत:ला कमी लेखून कुटुंबाचे भले करण्यासाठी कितीतरी असंख्य स्त्रिया स्वत:ची हुषारी खर्च करत असतात. ते करत असताना त्या स्वत:ला कमी लेखण्यात त्यांची ताकद खर्च होते. महाभारतात वर्णन केलेली अशी सावित्री खरोखर होऊन गेली असेल, ती केवळ कविकल्पना नसावी असे भक्कमपणे वाटावे इतक्या स्त्रिया - समाजातल्या अनेक घटकांतील, वयोगटातील, आर्थिक परिस्थितीतल्या स्त्रिया मला पाहायला मिळाल्या.

दुसरी सावित्री म्हणजे जोतिबांच्या बरोबरीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी! हिचा लढा वेगळाच होता. ती यमाला इतर सर्व मर्त्य माणसांसारखीच सामोरी गेली. पण समाजाला सामोरी जाताना मात्र त्या आधीच्या सावित्रीचा तेजाचा वसा तिने चालवला. भारतातल्या स्त्रियांच्या पहिल्या शाळेची पहिली शिक्षिका, अस्पृश्य मुलींसाठी पहिली शाळा चालविणे, अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरची विहीर खुली करणे, विधवेचे मूल दत्तक घेणे असे कितीतरी ’पहिले’ प्रयत्न या स्त्रीने केले. त्यात तिला तिच्या पतीची जोतिबांची साथ होती, किंबहुना त्यांची प्रेरणाही होती हे आहे. पण त्या काळात एका स्त्रीने समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी इतका सक्रिय पुढाकार घेणे हे असामान्यपणाचे लक्षण होते यात शंकाच नाही. जे इतर कोणाला सुचू नये ते सुचणे, इतकेच नाही तर इतरांचा विरोध असताना ते काम आयुष्यभर सातत्याने आणि निष्ठेने करत राहणे हे विलक्षणच आहे. त्या काळात ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ चालवणे हा क्रांतीकारक कार्यक्रम होता. सामाजिक काम करत असताना तिने कविताही लिहिल्या. आधुनिक मराठी कवितेतला तिचा वाटा अगदी नगण्य मानता येणार नाही. १८४८ म्हणजे आता फार जुना काळ वाटतो, पण त्या काळच्या वर्तमानाचे चटके सावित्रीबाईंनी सोसले.

जोतिबांच्या निधनानंतर शेतकरी कामकरी वर्गाकरता विचारांचे आणि संधींचे नवे दालन उघडणा-या ’सत्यशोधक समाजाची’ धुरा सावित्रीने यशस्वीपणे सांभाळली. शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे काम करत असताना या सावित्रीची दृष्टी अधिक व्यापक होती, त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता असे जाणवते. ’स्व’ विस्तारला की काय होते याचे चित्र या सावित्रीच्या आयुष्यात दिसून येते. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची, काळाच्या पुढे जाऊन कृती करण्याची एक नवी परंपरा या सावित्रीने निर्माण केली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. सत्यवानाच्या सावित्रीइतकीच हीदेखील तेजस्वी आणि स्वयंपूर्ण होती - पण हिच्या तेजाचा अविष्कार दीनदुबळयांसाठी होत राहिला, स्वत:साठी नाही.

काही वर्षांपूर्वी तिसरी एक सावित्री भेटली. ती म्हणजे पु.शि. रेगे यांची सावित्री. त्यात पहिल्या वाचनात खरे तर सावित्रीपेक्षा ’मोर यावा’ म्हणून आजीजवळ हट्ट करणारी, ’मी येईन तेंव्हा आधी लच्छीनं नाचलं पाहिजे’ ही मोराची अट लक्षात ठेवून सदैव आनंदात राहणारी आणि त्या ओघात मोराचे भान न उरणारी लच्छी जास्त भावली होती. पुढे कधीतरी त्या कथेचा  ’म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपणच व्हायचं’ असा अर्थ लावणारी सावित्री वेगळीच आहे हे जाणवलं आणि तिच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली.

रेगेंची सावित्री आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मलाही तिच्यासारखी स्वगतात्मक पत्र लिहायला आवडतात. पूर्वी पत्र लिहायचे; आजकाल ई-मेल लिहिते मी, इतकाच काय तो फरक! शिवाय असा मनमोकळा संवाद साधायला समोरच्या माणसाची आणि आपली फार ओळख असायला पाहिजे असा माझा कधीच आग्रह नसायचा, आजही नसतो. किंबहुना जोवर ओळख कमी असते तोवरच मनमोकळा संवाद होतो, असा माझा अनुभव आहे .असो.  हा अतिशय वादाचा मुद्दा होऊ शकतो याची मला जाणीव आहे.

ही सावित्री म्हटले तर आत्ममग्न आहे, म्हटले तर स्वत:ला विसरून दुस-यासाठी काही करणारी आहे. तिला वीणा वाजवता येते, लेखन करता येते. स्वत:च्या मर्यांदांची तिला जाणीव आहे तशीच स्वत:च्या सामर्थ्याचीही. स्वत:च्या भावनांना ती निखळपणे सामोरी जाऊ शकते, पराभवाचे तिला दु:ख होते, पण त्या पराभवाला स्वीकारून तिला पुढेही जाता येते. ही सावित्रीही गूढच आहे, पण ती पुष्कळशी तुमच्या आमच्यासारखी वाटते. मला वाटतं, एका विशिष्ट वयात, तारूण्याच्या काळात प्रत्येकच तरूण मुला मुलीत या सावित्रीचा अंश दडलेला असतो. काही त्याच्यासह पुढे जगतात, काही तो गाडून त्याच्या पायावर जगण्याची इमारत रचतात.

आणखी काही काळाने पॉंडिचेरीच्या वास्तव्यात आणखी एक सावित्री भेटली, ती व्यक्ती म्हणून नाही तर एक असामान्य कल्पना म्हणून! योगी अरविंदांनी सत्यवान – सावित्री कथेचा आध्यात्मिक स्तरावरून एक वेगळाच अर्थ लावला आहे. त्यांच्या मते वैदिक ऋषींनी या कथेद्वारे शाश्वत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंदांच्या मते सत्यवान आंतरिक दैवी सत्य असलेल्या पण अंध:कारात आणि अज्ञानात अडकलेल्या मानवजातीचा प्रतिनिधी आहे. सत्यवानाचा पिता द्युमत्सेन (हा अंध आहे) हे अंध झालेले दैवी मन आहे. सावित्रीचा पिता अश्वपति तपस्येचे प्रतीक आहे. तर स्वत: सावित्री तपस्येतून उदय पावणारी आणि दैवी सत्याला अज्ञानातून मुक्त करणारी दैवॊ शक्ती आहे. सावित्री शाश्वततेचं, अनंतत्त्वाचं रूप आहे. योगी अरविंदांच्या मतानुसार सावित्री हा परिवर्तनाचा मंत्र आहे - आणि ते येथे कोणत्याही सामाजिक परिवर्तनाबाबत बोलत नाहीत तर मनुष्यत्वाकडून ईशत्वाकडे नेणा-या मार्गाबद्दल बोलत आहेत. मानव्याकडून महामानव्याकडे होणा-या प्रवासाबाबत बोलत आहेत.

अरविंदांची सावित्री मला जवळची वाटली, पण ती मला समजली नाही. तितकी प्रगल्भता माझ्यात बहुधा तेव्हा नव्हती - आणि कदाचित आजही नाही. अरविंद सांगतात त्या दृष्टीकोनातून सावित्रीची कथा वाचली, की वरती मी उल्लेख केला होता ते सारे प्रश्न गायब होतात. आजवर न दिसलेले, न भावलेले, न कळलेले काही नवे कळल्यासारखे वाटते - पण ते क्षणभरच! एक भव्य दिव्य स्वप्न डोळ्यांसमोर यावे पण क्षणार्धात नाहीसे होऊन आपले मोडके तोडके जगणे शिल्लक राहिले आहे अशी विषण्णता मला अरविंद वाचताना येते. म्हणून माझ्यापुरता मी एक नियम केला आहे - मी फक्त अरविंदांची पत्रे वाचते. त्यात एक वेगळेच अरविंद समोर येतात – मिस्किल, साधे, मानवी, दुस-यांच्या मर्यादा समजून घेणारे. ते मग जवळचे वाटतात – मित्रासारखे वाटतात.

या सगळ्या सावित्रींची आठवण मागचे काही दिवस सातत्याने माझ्यासोबत आहे.

त्याचं काय झालं, काही मित्रमैत्रिणींच्या प्रोत्साहनाने मी संगीत ऐकण्याकडे एकदम वळले. माझ्या नादिष्ट स्वभावानुसार मग दिवसातला (आणि रात्रीचाही) जमेल तितका काळ मी संगीत ऐकण्यात घालवायला लागले. कुमार गंधर्वांनी गायलेल्या कबीराच्या रचना ऐकताना मला अनेक गोष्टी आठवल्या. त्यात प्रकर्षाने आठवली ती पु. शि. रेगेंच्या ’सावित्री’मधली लच्छी. म्हणून प्रवासात असतानाही रात्री दहा वाजता एका मैत्रिणीला फोन करून मी तिच्याकडचं ’सावित्री’ माझ्यासाठी आणायला सांगितलं  आणि तिने ते आणलही.

तो दिवस चांगला गेला होता माझा. त्या आनंदात ’सावित्री’ वाचायला घेतली. लच्छीची गोष्ट संपली आणि मला एकदम बावचळल्यासारखचं झालं. कारण त्या ’सावित्री’शी माझा काही सूर जुळेचना. जेमतेम १२० पानांच पुस्तक आहे ते - त्यामुळे तासाभरात वाचून झाल. आणि ते झाल्यावर फार रिकामं वाटल मला - उदास नाही (ते चाललं असतं मला!) - रिकामं!

रात्रभर माझी चिडचिड झाली. एक दोन जणांना ई मेल लिहून उगाच माझा वैताग त्यांच्यावर ढकलायचा प्रयत्न केला. ’सावित्री मला कळलीच नाही’ अशी तक्रारही मी काही जणांकडे गेली. त्यावर सगळे फक्त हसले - समंजसपणे हसले - त्यामुळे मला जास्तच रिकामं वाटायला लागलं!

मला वाटतं मी ’सावित्री’ला बाहेरच्या जगात शोधायचा प्रयत्न करते ही आत्ताच्या घटकेला सगळ्यात मोठी अडचण आहे. खरी ’सावित्री’ बहुधा आपल्यातच असते. ज्या ज्या टप्प्यावर जी जी सावित्री समजण्याची माझी लायकी होती, ती ती सावित्री मला भेटली. बुद्धीची तलवार परजून मी विश्लेषण केल्याने त्यातल्या कोणत्याच सावित्रीचे काही बिघडले नाही - अर्थात माझेही काही बिघडले नाही म्हणा, उलट काही घडतच गेले. सावित्री वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येते, कारण त्या त्या वेळच्या माझ्या गरजा वेगळ्या असतात. मी बदलते म्हणून मला भावणारी ’सावित्री ’ बदलते. आता माझी गरज बदलल्याने जुनी ओळखीची सावित्री मला अनोळखी वाटण अगदी स्वाभाविक आहे. म्हणून जुनं नातं चुकीचं होतं, गैरवाजवी होतं, अवास्तव होतं .. असे कोणतेही निष्कर्ष घाईने काढायचीही गरज नाही. त्या सगळ्यांच ऋण घेऊनच आता पुढची वाटचाल करायला हवी. सावित्रीचा वसा घ्यायचा म्हणजे स्वत:च भानं राखून जगायचं...

सावित्री हवी, तर स्वत:च सावित्री व्हायला हवं............ते अद्याप जमेल की नाही हे माहिती नाही.
पण आता बहुतेक पाचवी सावित्री भेटण्याची वेळ आलेली दिसते आहे

10 comments:

  1. ताई,
    अतिशय छान लिहिलं आहे! इतका सुरेख आणि नैसर्गिक वैचारिक ऊहापोह मी कित्येक दिवसांत वाचला नव्हता!

    ReplyDelete
  2. The Prophet,
    Thanks for compliments.

    ReplyDelete
  3. खूप आवडलं.सहज,प्रवाही...सुंदर!

    ReplyDelete
  4. धन्यवाद राजेंद्रजी आणि स्वागत तुमच 'अब्द शब्द'वर!

    ReplyDelete
  5. मस्तच लिहिलंय तुम्ही, तुमची एक पोस्ट सापडली कुठेतरी आता आठवत नाही...पण त्यानंतर सगळेच पोस्ट वाचायचा धडाका लावलाय.

    पु. शि. रेगे यांची सावित्री वाचायलाच हवी आता, बरच ऐकतोय सध्या...

    ReplyDelete
  6. Atishay pravahi,jivanatle satya sangnara,ishvarakade gheun janara,Savitri cha shashvat satya- artha sangnara blog.jivanakade baghanyacha drushtikon badalala.savitri fakta ek shri nasun to ek vichar zala jo pratyek purushane suddha aamlat anava ass. Hya baddal dhannyawad na manta Apalya runatatlach. Rajendra Chaudhari.9423218321

    ReplyDelete
  7. विशालजी, आभार.
    पु. शि. रेगे यांची 'सावित्री' जरूर वाचा. आणि कळवा तुमचं मत मलाही.

    ReplyDelete
  8. राजेंद्र चौधरी, आपण लिहिलेल्या कौतुकाच्या शब्दांबद्दल आभारी आहे. 'सावित्री ही एक स्त्री नसून एक विचार आहे' हे तुमचं मत अगदी पटलं.

    ReplyDelete