ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, June 21, 2023

२६२. एक दिवस वारीचा

 वारी. पंढरीची वारी. आषाढी वारी. मराठी माणसाच्या भावविश्वातला एक महत्त्वाचा उत्सव.

पण भक्ती’ – म्हणजे ईश्वरावर, कोणा गुरूवर भक्ती - हा माझा प्रांत नाही. (भक्तीहीनत  या माझ्या एका जुन्या पोस्टमध्ये मी याबाबत सविस्तर लिहिलं आहे, तेच पुन्हा लिहित नाही.) मी एखाद्या भागात कामासाठी अथवा फिरायला गेले तर देवळात जाते. तिथं चार लोक हात जोडतात म्हणून मीही जोडते. पंढरपूरलाही एक-दोनदा जाऊन आले आहे. विठ्ठलाशी संतांच्या नात्यांच्या अभिव्यक्त झालेल्या लोककथा विलक्षण आहेत. मला वाटतं मला देवापेक्षा जास्त पाहायला आवडतं ते देवाचं आणि त्याच्या भक्तांचं नातं. जोवर त्यात शोषण नाही, तोवर मला त्याचा काही त्रास होत नाही.

कदाचित यामुळेच असेल पण पुण्यात अनेक वर्ष राहूनही मी कधी वारीत सहभागी झाले नव्हते. माझ्या तीन मैत्रिणी वारीत जाऊन आल्या. त्यांचे अनुभव ऐकूनही मला काही वारीत जाण्याची प्रेरणा मिळाली नाही. इतकं चालणं जमेल का (साधारणपणे साडेचारशे किलोमीटर) असा एक प्रश्न नेहमीच असायचा. चालणं एकवेळ जमेल, पण दिवसभर अभंग आणि हरिपाठ वगैरे जमणार नाही याची मला खातरी होती.

२०२२-२३ मध्ये राहुल गांधी (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांच्या भारत जोडो यात्रेत मी पंचेचाळीस दिवस चालले. (त्याबद्दल मी फेसबुकवर लिहिलं आहे, ब्लॉगवर मात्र अद्याप काही लिहिलेलं नाही.) त्यामुळे चालण्याच्या माझ्या क्षमतेबद्दल मला जबरदस्त आत्मविश्वास आला. दर दिवशी दहा तरी अनोळखी माणसांशी बोलायचं असं मी ठरवलं होतं आणि ते करताना मला फार चांगला अनुभव आला. चालण्याची तशीही मला आवड आहेच. चालताना नेहमीचं जग वेगळं दिसतं हेही आजवरच्या चालण्यातून ध्यानात आलं होतं. एरवी आपल्या जगात (म्हणजे आपल्या आसपास) नसणाऱ्या माणसांशी बोलायची एक उत्तम संधी चालताना मिळते. आणि म्हणून यावर्षी वारीच्या बातम्या जेव्हा प्रसारमाध्यमांत यायला लागल्या, तेव्हा आपण वारीत जाऊन बघूया असा एक विचार डोक्यात आला. पंधरा दिवसांसाठी त्यात एकदम उडी मारण्याऐवजी एखादा दिवस जाऊन बघूयात असा विचार केला.

तेवढ्यात माहिती मिळाली की पुण्यातल्या प्रागतिक विचारांच्या संस्था संघटना एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमाचे आयोजन करतात. (उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे.) तुकोबारायांच्या पालखीत एक दिवस चालणे – असा हा उपक्रम. हे चालणं नुसतं नाही तर संविधान समता दिंडीमध्ये सामील होऊन चालायचं असा हा उपक्रम. या दिंडीचं हे पाचवं वर्ष होतं. 



राज्यघटना आणि वारी, राज्यघटना आणि संतांची शिकवण यांचा एकमेकांशी संबंध जोडणं याविषयी मला कुतूहल वाटलं. रविवारी, १८ जून रोजी गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर असे दहा किलोमीटर चालायचं होतं. मी नाव नोंदवलं.

भारतीय राज्यघटना लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार करते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घटनेला अपेक्षित आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय विकास करण्याची सर्व नागरिकांना समान संधी असावी असं राज्यघटना सांगते.

माझा काही संत साहित्याचा गाढा अभ्यास नाही. परंतु संताच्या शिकवणुकीतून त्यांनीही सामाजिक न्यायावर आणि समतेवर भर दिल्याचं स्पष्ट दिसतं. देव आणि माणूस यांच्या नातेसंबंधातल्या पुरोहितांच्या दलालीला आव्हान देण्याचं काम संतानी केलं आहे (जरी पंढरपूरच्या विठठल मंदिरात आजही बडव्यांचं प्रस्थ असलं तरीही). एक दिवस तरी वारी अनुभवावी या फेसबुक पेजवर मग मला संत साहित्य आणि राज्यघटनेतील कलमे यांच्यातलं साम्य सांगणारी माहिती वाचायला मिळाली. वारीत एकूण ४५ वेगवेगळ्या संतांच्या पालख्या असतात, पालखीचा समावेश वारीत १८६५ मध्ये नारायणबाबांनी (संत तुकाराम यांचा धाकटा मुलगा) केली, दिंडी आणि वारी, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे हे ३३८वे वर्ष आहे, वारी एकूण २२ दिवस चालते, दिंड्यांची संख्या .... अशी माहिती मी वाचत राहिले.

१८ जूनला सकाळी साडेसहाला आम्ही पुण्यातून निघालो. मुंबई, ठाणे, पनवेल, खोपोली, सातारा, नाशिक, नागपूर ... अशा विविध ठिकांणाहून आलेले आणि विविध वयोगटातले सुमारे पावणेदोनशे लोक आले होते. तरूणांची संख्या लक्षणीय होती. गवळ्याची उंडवडी इथं बसमधून उतरून आम्ही २६१ क्रमांकाच्या दिंडीत सामील झालो. 


वारीची चालण्याची स्वत:ची गती असते, नव्या माणसाला ती लय पकडायला जरासा वेळ लागतो. वारकरी त्यांच्या त्यांच्या दिंडीत स्वयंशिस्तीने चालले होते. आमच्यासारखे नवखे लोक कोणत्याही दिंडीत सामील होत होते, पण त्याला कुणीही आक्षेप घेतला नाही. वारकऱ्यांच्या प्रथेप्रमाणे सगळेजण एकमेकांना माऊलीम्हणत होते. हे शेरातले नाजूक मावली लई आलेत आज, चालाया जमना त्यास्नी नी आपल्यालाबी पुडं जाऊदीनातअशी एक प्रेमळ तक्रार मला मागून ऐकून आल्यावर मी हसून बाजूला झाले. पण एवढ्या गर्दीत आणि इतक्या कमी पोलिसांच्या उपस्थितीत कुठंही धक्काबुक्की वगैरे नव्हती.

प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर्स जागोजागी ठेवले होते. वारी मार्गावर पालखीच्या मागून सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक गट दिसला – त्यामुळे वारी मार्गावर फारसा कचरा दिसत नव्हता. अनेक लोक नाश्ता-चहा-फळं-पाणी मोफत वाटत होते. मार्गावर अनेक ठिकाणी सरकारी वैद्यकीय पथकं (रुग्णवाहिकेसह) उपस्थित होती आणि वारकरी त्या सेवेचा लाभही घेताना दिसत होते. फिरत्या शौचालयांची व्यवस्था असल्याचं मी वाचलं होतं, पण वाटेत मला ती कुठं दिसली नाहीत. ती कदाचित फक्त वारीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी असतील – पण मधल्या मार्गावरही खरं तर शौचालयाची व्यवस्था पाहिजेच.

 



निदान मला तरी पायात चप्पल नसलेला वारकरी (पुरूष-स्त्रिया) दिसला नाही. स्त्रियांनी टोप्या आणि उन्हापासून रक्षणासाठी सनकोट घातलेले दिसले. अनेक स्त्रिया त्यांचं सामान डोक्यावर घेऊन चालताना दिसल्या. शेतकरी-कष्टकरी वर्गातून वारकरी येत असल्याने कुपोषित म्हणता येईल इतक्या तोळामासा प्रकृतीचे काही लोक दिसले. नवा महामार्ग तयार करताना झाडं तोडून टाकल्याने आता हा पालखी मार्ग म्हणजे नुसता रखरखीत आणि वैराण प्रदेश झाला आहे. दुपारच्या विश्रांतीच्या वेळात ऐन उन्हात वारकरी डांबरी रस्त्यावर झोपले होते – ते पाहून वाईट वाटलं.

 


कोणताही धार्मिक उत्सव हा एक बाजारदेखील असतो. वारीच्या बाजूला रस्त्यावर असंख्य दुकानं होती – चपला, कपडे, कुल्फी, सोडा वॉटर, पाणी, गोडीशेव-रेवडी-फरसाण असा कोरडा खाऊ, प्लास्टिकची खेळणी, मोबाईल दुरुस्ती, अगदी मोबाईलचा गोरिला ग्लासही तिथं विकायला होते, आणि वारकरी तिथं जाऊन खरेदीही करत होते. अनेक वारकऱ्यांच्या हातात साधे मोबाईल (स्मार्ट नसलेले) दिसले.

दिंडीतल्या अनेकांशी बोलणं झालं. ७४ वर्षांचे एक आजोबा गेली चाळीस वर्ष नियमित वारीत जातात. नियमित वारी करणाऱ्या अनेक स्त्रियांशीही थोडंस बोलता आलं. काहीजणी अनेक वर्ष वारीत येत आहेत. इठ्ठलाचं नाव घेत चलायचं, बाकी काई नाई बगा असं त्यांचं भक्तीचं सूत्र त्यांनी मला सांगितलं. सविस्तर बोलायचं तर जास्त वेळ वारीत सामील व्हायला पाहिजे हे जाणवलं.

वारकऱ्यांची एवढी मोठी संख्या असून कुठंही स्पीकर्सच्या भिंती नव्हत्या हे फार छान वाटलं. टाळ-मृदुंगाच्या साथीने प्रत्येक दिंडीत हरिपाठ-अभंग असं काहीतरी चालू होतं. एकजण पुढं सांगणार आणि उर्वरित दिंडी त्याच्यापाठीमागे गाणार असं त्याचं स्वरूप होतं. तालासुरात पक्के होते वारकरी. फक्त एकाच दिंडीत स्त्रिया गाताहेत आणि बाकी दिंडी त्यांच्यामागे गातेय असं दिसलं – बाकी सर्वत्र मुख्य गायकाचा मान पुरूषांनाच होता. तुळशीवृंदावन फक्त स्त्रियांच्या डोक्यावर दिसलं आणि वीणा फक्त पुरूषांच्या गळ्यात दिसली. स्त्रियांच्या डोक्यावर विठ्ठलाच्या मूर्ती, कलश हेही दिसले.  टाळ-मृदुंग वाजवणारेही फक्त पुरूष होते. पताका (भगवा ध्वज) मला फक्त एका स्त्रीच्या हातात दिसला. पण अर्थात दहा किलोमीटर वारीबरोबर चालताना मला सगळंच दिसलं असा माझा दावा नाही – मी फक्त मला काय दिसंल ते नोंदवते आहे. स्त्रियांच्या आणि पुरूषांच्या संख्येत मात्र फारसा फरक दिसला नाही. 



बुऱ्हाणपूरला आम्ही पालखीसोबत चालणं थांबवून भैरोबानाथ मंदिरात आलो. मंदिराच्या अंगणात प्राथमिक शाळा आहे, तिथं आमच्या जेवणाची व्यवस्था होती. वाटेत आमचा एक सहकारी मंदिराची दिशा विचारता झाला तर ते गृहस्थ आम्हाला त्यांच्याकडं जेवणाचा आग्रह करायला लागले. माऊली, आपल्याकडंही आहे भाजी-भाकरी, कशाला उन्हात तिथंवर जाताय हा त्यांचा आग्रह ऐकून मला तर त्यांच्याकडं जेवायचा मोह झाला होता. पण गटातल्या इतरांना चिंता नको म्हणून त्यांना नम्रपणे नकार देत मीही मंदिराकडं गेले.

पिठलं-भाकरी-ठेचा-भात-आमटी-बुंदी असं आग्रहाने वाढलेलं जेवण झाल्यानंतर सुस्ती येऊ लागली होती. पण तरूण कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण गीतांनी सगळ्यांना जागं केलं. ज्ञानेश्वर बंडगर महाराज, वर्षा देशपांडे. शामसुंदर सोन्नर महाराज, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील या सर्वांनी समता दिंडीमागची भूमिका, आणि तिची वाटचाल याविषयी आम्हाला सांगितलं.

एक दिवस तरी वारी अनुभवावी उपक्रमाचं आयोजन अतिशय नेटकं होतं. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आम्हा लोकांना कुठंही अडचण आली नाही. नेमक्या सूचना आणि चांगलं नियोजन या दोन्ही गोष्टींमुळेच हे शक्य झालं. या उपक्रमामागे अनेक कार्यकर्त्यांनी श्रम घेतले आहेत, त्या सर्वांचे आभार.

एक दिवसाचा वारीचा माझा अनुभव अतिशय चांगला होता. पण ....

पण तरीही अनेक प्रश्न पडले. वारीचं आता एखाद्या व्हॉट्सऍप ग्रुपसारखं झालंय. एका विशिष्ट उद्देशाने आपण ग्रुप करतो. पण त्या ग्रुपवर मोदींची अमेरिका वारी, पाऊस कसा मोजायचा, पुल देशपांडे यांचे व्हिडिओ, आदिपुरूष सिनेमा बघा (किंवा बघू नका), चीनमधला एखादा पूल, २१ जूनला सर्वात मोठा दिवस का असतो.... असे वाट्टेल ते निरोप येत राहतात. विठ्ठलाच्या नामाचा गजर करत चालणाऱ्या वारकऱ्यांवरही विविध क्षेत्रातले लोक येऊन माहितीचा भडिमार करत असतात. संविधान आणि वारी प्रथा यांच्यातलं साम्य शोधण्याचा प्रयत्न हा प्रयत्न म्हणून कौतुकास्पद असला तरी तो वारीत कितपत परिणामकारक होत असेल याविषयी मला शंका आहे. एका उद्देशाने जमलेली गर्दी दुसऱ्या प्रकारच्या संदेशांकडे दुर्लक्ष करत असते हा नेहमीचा अनुभव आहे.

व्यक्ती म्हणून एक दिवस वारीत सामील होणं हे मी समजू शकते. पण विचारांचा प्रसार करण्यासाठी समूहाने वारीत सामील होणं हे काही माझ्या तितकंस पचनी पडलं नाही. आपली विठ्ठलावर भक्ती नसताना उगीच लोकानुयय करण्यासाठी एक दुसऱ्यांना आपण माऊली म्हणणं किंवा नमस्कार ऐवजी रामकृष्णहरी म्हणणं हे काही माझ्याच्याने झालं नाही. आणि त्याबद्दल मला खंतही नाही.

धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याच्या नादात जसं छद्मविज्ञानाला (pseudoscience) बळ मिळालं तसाच काहीतरी प्रकार वारी आणि संविधान यांची सांगड घालण्यातून निर्माण तर होणार नाही ना अशी भीती वाटते. संतांचे निवडक अभंग निवडून त्यात संविधान शोधणं मी समजू शकते. अभ्यास म्हणून हे करण्याजोगं आहे. पण केवळ तेवढ्या आधारावर वारी परंपरा राज्यघटनेच्या मूल्यांना आविष्कृत करते असा निष्कर्ष काढणं घाईचं आहे. वारीत सामील होणारे लोक ज्या गावांतून येतात, त्या गावांतल्या परिस्थितीचा अभ्यास केल्यावरच काही नेमकं म्हणता येईल. अन्यथा धर्म आणि व्यवहार यांना पूर्ण वेगळं ठेवण्याचं कौशल्य आपला समाज (एकूणच मानवी समाज) नेहमीच दाखवत आला आहे.

राज्यघटना व्यक्तीचं धर्मस्वातंत्र्य मानते – पण ती कुठलाही धर्म मानत नाही. अशा परिस्थितीत एका धार्मिक – सांस्कृतिक उत्सवावर राज्यघटनेने दिलेल्या मूल्यांचं प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न अनेक क्रिया-प्रतिक्रियांना जन्म देण्याची शक्यता आहे.

या साऱ्या प्रयत्नांतून अधिकाधिक वारकरी संविधानाची मूल्ये मानायला लागलेत की उपक्रमात सामील होणारे लोक अधिकाधिक भक्तीमार्गाकडं वळायला लागलेत (किंवा भक्तीमार्गावर श्रद्धा असणारेच उपक्रमात अधिकाधिक सहभागी व्हायला लागलेत) या एका प्रश्नाचं उत्तर शोधलं तरी अशा प्रकारच्या उपक्रमांची प्रासंगिकता (relevance) लक्षात येईल असं वाटतं.

वारीत एक दिवस चालणं हा एकंदर विचारांना चालना देणारा अनुभव होता. 

Tuesday, June 13, 2023

२६१. ‘गांधी दर्शन शिबीर’

मागच्या महिन्यात कोथरूड (पुणे) इथल्या गांधी भवनमध्ये डॉ. इश्तियाक अहमद यांचं भाषण ऐकायला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर निघताना गांधी दर्शन शिबीर असं एक पत्रक हातात पडलं. ११ जूनला, रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळात हे शिबीर होतं. डॉ. राम पुनियानी, डॉ. कुमार सप्तर्षी, आणि श्री. युवराज मोहिते अशी वक्त्यांची नावं पाहून शिबिराला जायचं ठरवलं आणि नावनोंदणी केली. युवा कार्यकर्त्यांची व्यवस्थेची लगबग चालू होती. विक्रीसाठी पुस्तकांचे गठ्ठे बॅगांमधून बाहेर येत होते. चहा-पोहे-समोसा यांचा आग्रह होत होता. एकंदर वातावरणात उत्साह होता. 

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शिबिरार्थी आले होते असं कार्यक्रमाच्या आधी चहा घेताना गप्पांमध्ये लक्षात आलं. काही लोक दुसऱ्यांदा तर काही तिसऱ्यांदा या शिबिराला आले होते, त्यांचं मला कौतुक वाटलं. मी एक पूर्ण दिवस ऐकत बसू शकेन का याची मला खात्री नव्हती, म्हणून या लोकांचं जास्तच कौतुक वाटलं.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (एमजीएसएन) आणि युवक क्रांती दल यांनी एकत्रितपणे या शिबिरांची सुरूवात केली आहे. शिबीर मालिकेतलं हे तिसरं शिबीर होतं. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हे शिबीर घ्यायचं, आणि शक्य असेल तिथं पुण्याच्या बाहेरही अशी शिबिरं घ्यायची अशी या दोन्ही संस्था-संघटनांची योजना आहे.

कार्यक्रम वेळेत सुरू झाला (आणि नंतर संध्याकाळी वेळेत संपला) हे आवडलं. युवक क्रांती दलाचे (युक्रांद) श्री. संदीप बर्वे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिबिर घेण्यामागची भूमिका त्यांनी थोडक्यात सांगितली. एमजीएसएन आणि युक्रांद करत असलेली कामे त्यांनी सांगितली. सध्याच्या स्थितीत हिंसा घडत असणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन हिंसा थांबवण्याचा प्रयत्न करणे हे महात्मा गांधींचे काम पुढं चालू ठेवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गांधी ही भारताची भारताबाहेरची ओळख आहे आणि हा वारसा आपण जपला पाहिजे असं सांगितलं. गांधीजी जिवंत ठेवायचे म्हणजे भारतीयांचं सामुदायिक शहाणपण जिवंत ठेवायचं – हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलं. नीलम पंडित यांनी संविधान प्रास्ताविकाचं वाचन केलं. ते ऐकताना मला वाटलं की सर्वच कार्यक्रमात सर्व सामाजिक संघटनांनी संविधान प्रास्ताविकाचं वाचन केलं पाहिजे. आपलं ध्येय काय आहे आणि आपण सध्या नेमकं कुठं आहोत – याची जाणीव धारदार करण्यासाठीचा हा एक उत्तम उपाय आहे.

 (नोंद – वक्त्यांच्या मांडणीतून मला काय समजलं ते मी इथं सांगितलं आहे. सत्राच्या वक्त्यांना तेच अभिप्रेत होतं का नव्हतं याची मला खात्री नाही. थोडक्यात, एखादा मुद्दा तुम्हाला पटला नाही तर तुम्ही मत बनवण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची सार्वजनिक अभिव्यक्ती पाहावी ही विनंती.)

पहिल्या सत्रात गांधी और सांप्रदायिक सद्भावना या विषयावर डॉ. राम पुनियानी बोलले. ते हिंदी भाषेत बोलले. त्यांना मी आज पहिल्यांदाच ऐकत होते आणि त्यांचे लेख/पुस्तकं यांपैकी मी काहीही वाचलेलं नाही.  त्यांच्या नर्मविनोदी शैलीने आणि श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून सहभागी करून घेण्याच्या पद्धतीने पावणेदोन-दोन तास कसे गेले हे कळलंही नाही. अनेक वक्ते विनोद करण्याच्या नादात मुद्दे विसरतात, पण डॉ. पुनियांनी यांनी मात्र मुद्द्यांवरची पकड कधीही सुटू दिली नाही.

हिंद स्वराज या महात्मा गांधीच्या पुस्तकाचा आधार घेऊन डॉ. पुनियानी यांनी त्यांचे विचार मांडायला सुरूवात केली. हिंदू-मुस्लिम राजांमध्ये इतिहासात वेळोवेळी ज्या लढाया झाल्या त्या धर्मासाठी नव्हत्या तर सत्तेसाठी होत्या हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. सत्तेला धर्माचं नाव देणं हीच एक प्रकारची सांप्रदायिकता आहे असं ते म्हणाले. ब्रिटिश काळात रेल्वे, पोस्ट, प्रशासन आणि न्यायव्यवस्था (याला डॉ. पुनियानी गमतीने रेल-मेल-जेल असं म्हणाले), दलित आणि स्त्रियांसाठी शिक्षण खुलं होण असा आधुनिक भारताचा प्रवास झाला. हे करत असताना ब्रिटिशांनी भारताचं आर्थिक शोषण केलं – पैसा इथून भारताबाहेर पाठवला. भारतीय समाजातल्या वर्चस्व असणाऱ्या समुहांना या सुधारणांमुळे शोषित समुहाला प्रगती करण्याची संधी प्राप्त झाली हे आवडलं नव्हतं.

ब्रिटिश राजवटीला प्रतिसाद म्हणून दोन प्रकारच्या संस्था संघटना उभ्या राहिल्या. एका गटाचा आधार धर्म होता (मुस्लीम लीग, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तर दुसऱ्या गटाचा आधार सर्वसमावेशक भारतीयत्व आणि शोषितांचे सबलीकरण (हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल काँग्रेस) असा होता. ब्रिटिशांच्या राजवटीत हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाला सुरूवात झाली आणि ब्रिटिशांनी स्वत:च्या फायद्यासाठी या ध्रुवीकरणाला पद्धतशीरपणे खतपाणी घातले.

गांधीजी धार्मिक होते पण सांप्रदायिक नव्हते आणि महमदअली जिना धार्मिक नव्हते पण सांप्रदायिक होते अशांसारख्या उदाहरणांच्या माध्यमांतून पुनियानी यांनी धार्मिकता आणि सांप्रदायिकता यातील फरक स्पष्ट केला. सत्तेसाठी धर्म वापरण्याच्या प्रक्रियेचा इतिहास आणि त्याचा आजच्या वास्तवाशी असलेला संबंध याबाबत अधिक विचार करण्यासाठी डॉ. पुनियानी यांचं भाषण माझ्यासाठी उपयुक्त होतं.

दुसऱ्या सत्रामध्ये सत्याग्रहशास्त्रया विषयावर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी त्यांचे विचार मांडले. गांधीजींच्या आयुष्यात सत्याग्रह ही संकल्पना कशी आली आणि ती कसकशी विकसित होत गेली याबाबत त्यांनी आपल्याला माहिती असलेलाच इतिहास मांडला. पण सत्याग्रह हा त्या मांडणीचा केंद्रबिंदू असल्याने सत्याग्रहाची कल्पना ऐकणाऱ्यांनाही अधिक स्पष्ट होत गेली. डॉ. सप्तर्षी यांनी ते सहभागी असलेल्या आंदोलनांची आणि सत्याग्रहांची अनेक उदाहरणे सांगितली. त्यातून सत्याग्रहात काय करावं आणि काय करू नये हे समजलं.

सत्याग्रह हे अहिंसक शस्त्र आहे आणि त्याची स्वत:ची एक शिस्त आहे. निर्वैरता, निर्भयता, आणि सर्वसमावेशकता ही सत्याग्रहाची जणू त्रिसुत्री आहे. ज्यांच्या विरोधात आपण सत्याग्रह करत आहोत, त्यांच्याशी आपले व्यक्तिगत वैर असता कामा नये; सत्याग्रहाच्या अखेरीस ज्यांच्या विरोधात सत्याग्रह केला त्यांना सत्याची आपली बाजूही दिसून त्यांच्या-आपल्यात स्नेह (मैत्र) निर्माण व्हायला हवा; आपल्याशी संबंधित लोकांना आपले भय वाटता कामा नये (इतकी आपली वागणूक सर्वसमावेशक सन्मान देणारी हवी); तुरूंगात जाण्याचेही भय वाटता कामा नये – असे सत्याग्रहाचे पैलू डॉ. सप्तर्षी यांनी अतिशय सोप्या भाषेत मांडले.

लोकांची उदासीनता, लोकांकडून होणारा उपहास, लोकांकडून होणारी निंदा, सत्तेत असणाऱ्यांकडून (वर्चस्ववादी गटांकडून) होणारी दडपशाही आणि अखेरीस यश या कोणत्याही सत्याग्रहाच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. सत्याग्रहाची मागणी एकच असावी (खूप वेगवेगळ्या मागण्या करू नयेत, मग अनेक फाटे फुटत जातात) आणि सत्याग्रहामागचा नैतिक विचार स्पष्टपणे मांडा – म्हणजे यश नक्की मिळेल असेही त्यांनी सांगितले.

तिसऱ्या सत्रात गांधी-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि महत्त्व या विषयावर श्री. युवराज मोहिते यांनी त्यांचे विचार मांडले. गांधी आणि आंबेडकर या दोघांनीही जातिअंताचा लढा उभारला, पण गांधीजींच्या मते अस्पृश्यता पाळणे हे पाप होते तर आंबेडकरांच्या मते अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा होता.

गांधीजी आणि आंबेडकर या दोघांच्याही कार्याचा आढावा मोहिते यानी मांडला. या दोघांच्या संवादातून आणि कार्यातून अस्पृश्यता निवारण हा विषय गांधींजींच्या विषयपत्रिकेवर अधिकाधिक केंद्रस्थानी कसा येत गेला याचे एक चित्र मोहिते यांनी श्रोत्यांसमोर उभं केलं. पण गांधी आणि आंबेडकर या दोघांपैकी कुणावरही कसलीही टीका होऊ नये याची कसरत मोहिते यांना करावी लागत होती असं मला वाटत राहिलं. या सत्रात घटनाक्रम थोडा कमी करून गांधी आणि आंबेडकर या दोघांच्याही विचारप्रक्रियांवर अधिक भर देता आला असता तर मला जास्त आवडलं असतं.

तिन्ही सत्रांमध्ये वक्त्यांच्या मांडणीनंतर प्रश्नोत्तरे झाली. काही प्रश्न सत्रात मोलाची भर घालणारे होते. आपल्याकडे अनेकदा लोक प्रश्न विचारणं आणि मत मांडणं यात गल्लत करताना दिसतात, तसं काही वेळा इथंही झालं. पण मत मांडणं हीदेखील विचार समजून घेण्याच्या प्रक्रियेतली एक महत्त्वाची पायरी असते.

मला या शिबिरातला दर्शन हा शब्द फारसा आवडला नव्हता. या शब्दातून गांधींजींवर दैवतीकरण लादलं जातं आणि मग गांधींजींच्या विचारांची चिकित्सा करणं थांबून जातं. पण एका अर्थी हा दर्शन शब्द बरोबर आहे असंच म्हणावं लागेल. या शिबिरातून आपल्याला गांधीजी फक्त दिसताहेत – दुरून दिसताहेत, थोडी ओळख होतेय, इतकंच.

एकंदर दिवस चांगला गेला. बरेच नवे मुद्दे मिळाले. जास्त जाणून घ्यायचं असेल तर बरंच काही वाचावं लागेल, अभ्यासावं लागेल – याचं पुन्हा एकदा भान आलं.

२६०. परिवर्तनाच्या लढाईत अंधश्रद्धेचं अस्त्र

 (नोंद - हा लेख लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत ३ एप्रिल २०२१ रोजी प्रसिद्ध झाला होता.) 

१ फेब्रुवारी २०२१ या दिवशी म्यानमार लष्कराने पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेतली. गेल्या दोन महिन्यांत चारशेहून अधिक नि:शस्त्र लोकांना सैन्याने केलेल्या गोळीबारात प्राण गमवावे लागले आहेत. तर हजारो लोकांची धरपकड झाली आहे. लाखो नागरिक लष्कराच्या दहशतीला न जुमानता लोकशाहीची मागणी करत शांततापूर्ण रीतीने रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनातला स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्यानमारमधल्या एका मैत्रिणीने काही फोटो पाठवले, पाठोपाठ बातम्याही आल्या. एका फोटोत काही सैनिक रस्त्यावर वाळत घातलेले स्त्रियांचे कपडे खाली काढत आहेत आणि सैन्याची तुकडी त्यांचं काम पूर्ण होण्याची वाट पहात आहे असं दिसलं. मला ते दृष्य अतिशय क्रांतिकारी वाटलं. ‘स्त्रियांचे कपडे रस्त्यावर वाळत घालणं’ किंवा ‘सैनिकांनी लोकांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे काढून खाली टाकणं’ – यात काय क्रांती आहे हे कळण्यासाठी म्यानमारबदद्ल थोडं अधिक जाणून घ्यायला हवं.

लष्कर सत्तेवर असणं आणि मानवी अधिकारांचं सातत्याने उल्लंघन होणं ही स्थिती म्यानमारच्या नागरिकांसाठी नवीन नाही. १९४८ साली म्यानमारला स्वातंत्र्य मिळालं आणि संसदीय लोकशाहीचा मार्ग म्यानमारने स्वीकारला. (त्यावेळी हा देश बर्मा नावाने ओळखला जात असे. बर्माचं म्यानमार असं नामकरण लष्कराने पुढं १९८९ मध्ये केलं.) विविध गटांमधल्या आंतरिक सशस्त्र संघर्षाला तोंड देण्याच्या हेतूने १९६२ मध्ये म्यानमार लष्कराने पहिल्यांदा सत्ता ताब्यात घेतली. २०११ पर्यंत ही सत्ता टिकली. नोव्हेंबर २०१० मध्ये संसदीय निवडणुकीचा देखावा करत लष्कर पुरस्कृत युनियन सॉलिडरिटी डेवलेपमेंट पार्टी (युएसडीपी) सहज सत्तेवर आली.

लष्कर – ते कोणत्याही देशाचं असो – ही एक पितृसत्ताक संस्था आहे. पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांसंबंधीचे सर्व महत्त्वाचे निर्णय पुरूष घेतात. स्त्रियांच्या गरजा, त्यांच्या भावना, त्यांचे प्राधान्यक्रम आणि त्यांचा सहभाग यांचं स्थान नगण्य असतं. म्यानमारमध्यही लष्करी राजवटीत मानवी हक्कांची सातत्याने पायमल्ली झाली. स्त्रियांच्या हक्कांबाबत आंतरराष्ट्रीय दबावामुळे केवळ तोंडदेखले प्रयत्न झाले. २००८ च्या राज्यघटनेनुसार संसदीय रचनेत प्रत्येक सभागृहात लष्करासाठी २५ टक्के जागा राखीव आहेत. पण अर्थातच लष्करामध्ये स्त्रिया नसल्याने संसदेत स्त्रिया नेहमीच अल्पमतात राहतील. विविध समुहांच्या सशस्त्र संघटनांबरोबरच्या आंतरिक युद्धात म्यानमार लष्कराने हजारो स्त्रियांवर बलात्कार केले. स्त्रियांच्या निर्णयस्वातंत्र्यावर गदा आणणारे अनेक कायदे संमत केले.

म्यानमारमधली बहुसंख्य जनता थेरवाद बौद्ध धर्माची अनुयायी आहे. म्यानमारमध्ये सुमारे १३५ वेगवेगळे समुह आहेत – ज्यांची विभागणी सात मुख्य गटांमध्ये होते. या विविध गटांच्या आणि त्यांच्या उपगटांच्या परंपरा, रुढी आणि बुद्धाची शिकवण यांचा संगम म्यानमारमध्ये घडून आला आहे. या पारंपरिक बौद्ध धर्मातही स्त्रियांचं स्थान दुय्यम आहे. उदाहरणार्थ पुरूष भिक्षुंना जेवढा मान आणि प्रतिष्ठा आहे तेवढी भिक्षुणींना नाही. भिक्षुंना शिजवलेलं अन्न दान केलं जात तर भिक्षुणींना धान्य दिलं जातं. भिक्षुणींनी स्वयंपाक करणं अपेक्षित आहे तर भिक्षुंना स्वयंपाक करावा लागू नये अशी व्यवस्था आहे. दानफेरीसाठी भिक्षु आधी बाहेर पडतात तर भिक्षुणींचा नंबर त्यांच्यानंतर लागतो. पगोडामध्ये गाभाऱ्यातल्या बुदधमूर्तीजवळ जाण्यास स्त्रियांना मनाई आहे. बुध्दमूर्तीवर सोन्याचं पान (पातळ तुकडा) चढवून फार मोठं पुण्य मिळतं अशी कल्पना आहे – अर्थातच स्त्रियांना ते मिळवता येत नाही. एका कुटंबातल्या स्त्रियांचे आणि पुरूषांचे कपडे एकत्र धुवू नयेत; स्त्रियांच्या वाळत घातलेल्या कपड्यांखालून पुरूषांनी जाऊ नये कारण यामुळे पुरूषत्व कमी होतं असा समज आहे. स्त्रिया अपवित्र असतात, इतकंच नाही तर त्या पुरूषांचंही पावित्र्य कमी करतात अशी एक धारणा समाजात आहे – स्त्रियांमध्येही ही धारणा मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू स्त्रियांची परिस्थिती बौद्ध धर्मिय स्त्रियांपेक्षा फार काही वेगळी नाही – काही बाबतीत ती जास्त वाईट आहे असं म्हणता येईल. एकल स्त्रिया, विधवा स्त्रिया, नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रिया, ट्रान्सजेंडर व्यक्ती, women with disabilities यांचे प्रश्न अधिक तीव्र आहेत.

स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेकडे दुर्लक्ष केलं जातं. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर आरोपीने डुकराचं गावजेवणं देणं एवढ्या शिक्षेवर भागून जातं असं मी तिथल्या लोकांकडून ऐकलं तेव्हा हबकले होते. पुरूष आणि स्त्रिया यांनी कोणत्या प्रकारची लुंगी वापरावी यासंबंधी नियम आहेत – दोघेही एकमेकांची लुंगी वापरू शकत नाहीत. 

मागच्या संसदेत खासदार स्त्रिया केवळ दहा टक्के होत्या. १९२० पासून कॅबिनेट मिनिस्टर असणारी ऑंग सान सू ची ही चौथी स्त्री आहे – यावरून स्त्रियांच्या राजकीय सहभागाचा अंदाज यावा. २०१७ च्या आकडेवारीनुसार सुमारे वीस हजार वॉर्ड ऍडमिनिस्ट्रेटर (आपल्याकडचे ग्रामसेवक)पैक शंभर स्त्रिया असाव्यात. प्राथमिक शिक्षक, नर्स आणि सरकारी कार्यालयातील कनिष्ठ पदांवर मात्र अनेक स्त्रिया दिसतात.

थोडक्यात काय, तर राजसत्ता आणि धर्मसत्ता – आणि त्या अनुषंगाने कुटुंबव्यवस्था, आर्थिक रचना, शिक्षण, प्रशासन – अशा सर्वच क्षेत्रांत स्त्रियांचं स्थान दुय्यम आहे. सार्वजनिक क्षेत्रांत अनेक वर्ष स्त्रिया नव्हत्याच. चूल आणि मूल (आणि वृद्धांची आणि आजारी माणसांची सेवा) हेच स्त्रियांचं पारंपरिक कार्यक्षेत्र होतं – अपवादात्मक बदल घडत होते, ते सार्वत्रिक नव्हते.

२०१५ च्या निवडणुकीत एनएलडी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि अनेक पिढ्यांना पहिल्यांदाच लोकशाही अनुभवायला मिळाली. एनएलडीच्या कारकिर्दीत स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. स्त्री संघटनांमध्ये काम केलेल्या काही स्त्रिया एनएलडीच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. स्त्रियांचे प्रश्न सरकारी अजेंड्यावर प्राधान्याने राहण्यात या खासदारांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांना फार मोठं यश मिळालं नसलं तरी सुरूवात चांगली झाली होती. स्त्रियांच्या प्रश्नांवर सरकार प्रथमच स्त्री-संघटनांसोबत काम करू लागलं. (त्याधीच्या स्त्री संघटना-संस्था म्हणजे फक्त लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नी होत्या.) महिलांविषयक राष्ट्रीय धोरण, त्याच्या विविध समित्या, कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विचारविनिमय सातत्याने चालू होतं. आधी उल्लेख केलेलं धार्मिक वातावरण, त्रुटी असलेले कायदे आणि लोकशाहीतही लष्कराच्या हाती असलेलं सत्ताकेंद्र यामुळे ही वाटचाल सोपी नव्हती.

फेब्रुवारीत लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यावर या सर्व स्त्री संघटनांनी सरकारबरोबरचं काम जाहीररीत्या थांबवलं आणि लोकशाही पुनर्प्रस्थापनेच्या आंदोलनात त्या जोमाने उतरल्या. लष्करी सत्ता म्हणजे म्यानमार स्त्रियांच्या बाबतीत अनेक दशकं मागे जाईल याची जाणीव असल्याने स्त्रिया या आंदोलनात सक्रिय आहेत. नवनवीन तंत्रज्ञानही तरूण पिढीच्या मार्गदर्शनाखाली त्या शिकत आहेत. इंटरनेटच्या वापरावर बंदी घालण्याचे लष्करी सत्तेचे अनेक प्रयत्न फसले आहेत. सरकारने फेसबुक बंद केलं, तेव्हा या स्त्रिया व्हीपीएन बदलून फेसबुक कसं वापरायचं ते शिकल्या. माझ्या ओळखीच्या अनेकींनी नव्याने ट्वीटरवर खाती उघडली. विविध वयोगटांतल्या स्त्रिया सातत्याने बाहेरच्या जगाला माहिती देत असतात. “आत्ता आमच्या घरासमोर गोळीबार चालू आहे, मी आणि मुलगा बाथरूममध्ये लपलो आहोत”, “मला गोळीबाराची भीती वाटते आहे, पण तरीही मी आंदोलनात (रस्त्यावर) जाते आहे”, “पुढच्या चोवीस तासांत मी सोशल मीडियावर दिसले नाही तर एक तर मला अटक झाली आहे किंवा मी मारली गेली आहे असं समज” ....असे म्यानमार स्त्रियांचे निरोप मला येतात तेव्हा काय करावं ते सुचत नाही.म्यानमारच्या नागरिकांची लढाई किती अवघड आहे याचा मी फक्त अंदाज बाधू शकते.

मात्र जीवनमरणाच्या या लढ्यातही स्त्रियांना समतेच्या, हक्काच्या लढ्याचा विसर पडला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोकशाही आणि मानवी हक्क, स्त्रियांचे हक्क यांची सांगड घालत त्यांनी अभिनव उपक्रम राबवला. ‘स्त्रियांना संरक्षणाची गरज आहे आणि ही लष्कराची जबाबदारी आहे’ या पारंपरिक भूमिकेचा निषेध करत कया (Kayah) राज्यातल्या स्त्रिया अंतर्वस्त्रं आणि सॅनिटरी पॅड्स फडकवत लष्कराच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या. ‘’लष्कर आमचं संरक्षक नाही (ते तर भक्षक आहे), आमची वस्त्रं आणि पर्यायाने आमचं आम्हीच रक्षण करायला समर्थ आहोत” असा संदेश स्त्रिया या कृतीतून देत होत्या. स्त्रियांची अंतर्वस्त्रं ‘घाण’ असतात आणि म्हणून स्त्रिया अपवित्र ठरतात या संकल्पनेला जाहीर आव्हान देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दिलं गेलं असावं.

स्त्रियांच्या लुंगीखालून पुरूषांनी जाऊ नये याही पारंपरिक संकल्पनेला स्त्रियांनी विविध राज्यांत आव्हान दिलं. सैनिकांना आपल्या वस्तीत येणं सहजी शक्य होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी वाळूची पोती, गाड्याचे टायर्स, लोखंडी पाईप, लाकडं टाकून नागरिक अडथळे निर्माण करत आहेत. अनेक रस्त्यांवर सिनिअर जनरल मिन ऑंग लाय (लष्कराचे नेते) यांची पोस्टर्स चिकटवली होती. सैनिकांना वस्तीत यायचं तर नेत्याचं पोस्टर तुडवून यावं लागणार. सैनिक पोस्टर्स काढेपर्यंच नागरिकांना सगळ्यांना सावध करायला वेगळा वेळ मिळतो. (म्यानमारमध्ये नागरिकांनी आंदोलनाच्या वापरलेल्या विविध पद्धती हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) हेल्मेट घालून, लोखंडी ढाली आणि दुर्बिण हातात घेऊन तरूण मुलं आणि मुली चोवीस तास टेहळणी करत आहेत. या स्थानिक तटबंदीला ‘वाळत घातलेल्या स्त्रियांच्या लुंग्यांची’ जोड मिळाली आणि पंरपेवर विश्वास असणारे सशस्त्र सैनिक थबकले. अनेक ठिकाणी सैनिकांची तुकडी वस्तीत प्रवेश करण्यापूर्वी स्त्रियांच्या लुंग्या दोरीवरून उतरवण्यात मग्न झाल्याचे फोटो झळकले. लष्कराने या कृतीची इतकी दहशत घेतली की ‘रस्त्यावर स्त्रियांचे कपडे वाळत घालणं बेकायदेशीर आहे’ असा आदेश त्यांनी काढला. याच परंपरेवर विश्वास असणारे स्थानिक पुरूष मात्र स्त्रियांच्या कपड्यांखालून सहजतेने ये-जा करत होते. मग ८ मार्चला स्त्रियांची लुंगी हाच झेंडा फडकवण्याचा निर्णय देशातल्या स्त्री संघटनांनी घेतला. ‘Fuck the Coup’ असे जोरकस वाक्य लिहिलेले टी-शर्ट घालून आणि स्त्रियांच्या लुंगीचा झेंडा हाती घेऊन नागरिक लष्कराच्या विरोधात रस्त्यावर उतरले. काही तरूण मुलांनी स्त्रियांची लुंगी डोक्यावर बांधली तर काहींनी ती अंगावर गुंडाळली. हा झेंडा ‘हुकुमशाही आणि पुरूषसत्ताक व्यवस्था या दोन्हींवर विजय मिळवण्यांच प्रतीक आहे‘ अशी भावना अनेक स्त्रियांनी व्यक्त केली.

या अभिनव आंदोलनातून काही मुद्दे अधोरेखित झाले. एक म्हणजे एरवी स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या प्रथेचा उपयोग सैन्याची (पुरूषांची) अमानुष ताकद काही काळ तरी रोखू शकण्यासाठी झाला. सत्तासंबंधांचं अस्त्र सत्तेचा माज असणाऱ्या व्यवस्थेवर उलटू शकतं हे जगाला दिसलं. दुसरं म्हणजे अंधश्रध्दांचा उपयोग परिवर्तनाच्या लढाईतही होऊ शकतो हे मला नव्यानंच कळलं. याचा अर्थ असा नाही की सगळ्या अंधश्रद्धा कधीतरी आपोआप बदलतील म्हणून आपण स्वस्थ बसावं. प्रयत्नांना पर्याय नाही पण ते करत असताना विचार वेगळ्या पद्धतीनेही करणं आवश्यक आहे याची उजळणी झाली. तिसरं म्हणजे सामान्य स्त्री-पुरूषांच्या पिढ्यानपिढ्यांच्या धारणा आणि व्यवहार एका क्षणात बदलू शकतात हेही दिसून आलं. ‘इथं कधीच काही बदलणार नाही’ असं वाटणारा निराशेचा क्षण माझ्यासमोर येईल, तेव्हा मला म्यानमारचं हे उदाहरण हमखास आठवेल. चौथा मुद्दा आहे तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावाचा. ते किती यशस्वीपणे वापरता येऊ शकतं याचा म्यानमारच्या सध्याच्या आंदोलनाने एक वस्तुपाठ घालून दिला आहे. तंत्रज्ञान स्त्रियांना सहजी उपलब्ध होण्यात अनेक अडचणी असतात. त्या दूर झाल्या तर कल्पकतेत स्त्रियाही मागे नाहीत हे दिसून येईल.

सामाजिक बदलांसाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वांसाठी म्यानमारमधली ही घटना अत्यंत आशादायक आहे. स्त्रियांना नागरिक म्हणून समान हक्क मिळण्याच्या दिशेने म्यानमारने या जागतिक महिला दिनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. म्यानमारच्या नागरिकांची त्यांच्याच लष्कराशी चाललेली लढाई कधी संपेल माहिती नाही. ही लढाई फार जुनी आहे. लष्कराशी लढताना पितृसत्ताक व्यवस्थेशी चालू असलेल्या प्राचीन लढाईत एक विजय नक्की मिळाला आहे. हा विजय छोटा आहे की मोठा हे येणारा काळच ठरवेल.