ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, June 13, 2023

२६१. ‘गांधी दर्शन शिबीर’

मागच्या महिन्यात कोथरूड (पुणे) इथल्या गांधी भवनमध्ये डॉ. इश्तियाक अहमद यांचं भाषण ऐकायला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर निघताना गांधी दर्शन शिबीर असं एक पत्रक हातात पडलं. ११ जूनला, रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळात हे शिबीर होतं. डॉ. राम पुनियानी, डॉ. कुमार सप्तर्षी, आणि श्री. युवराज मोहिते अशी वक्त्यांची नावं पाहून शिबिराला जायचं ठरवलं आणि नावनोंदणी केली. युवा कार्यकर्त्यांची व्यवस्थेची लगबग चालू होती. विक्रीसाठी पुस्तकांचे गठ्ठे बॅगांमधून बाहेर येत होते. चहा-पोहे-समोसा यांचा आग्रह होत होता. एकंदर वातावरणात उत्साह होता. 

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शिबिरार्थी आले होते असं कार्यक्रमाच्या आधी चहा घेताना गप्पांमध्ये लक्षात आलं. काही लोक दुसऱ्यांदा तर काही तिसऱ्यांदा या शिबिराला आले होते, त्यांचं मला कौतुक वाटलं. मी एक पूर्ण दिवस ऐकत बसू शकेन का याची मला खात्री नव्हती, म्हणून या लोकांचं जास्तच कौतुक वाटलं.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (एमजीएसएन) आणि युवक क्रांती दल यांनी एकत्रितपणे या शिबिरांची सुरूवात केली आहे. शिबीर मालिकेतलं हे तिसरं शिबीर होतं. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हे शिबीर घ्यायचं, आणि शक्य असेल तिथं पुण्याच्या बाहेरही अशी शिबिरं घ्यायची अशी या दोन्ही संस्था-संघटनांची योजना आहे.

कार्यक्रम वेळेत सुरू झाला (आणि नंतर संध्याकाळी वेळेत संपला) हे आवडलं. युवक क्रांती दलाचे (युक्रांद) श्री. संदीप बर्वे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिबिर घेण्यामागची भूमिका त्यांनी थोडक्यात सांगितली. एमजीएसएन आणि युक्रांद करत असलेली कामे त्यांनी सांगितली. सध्याच्या स्थितीत हिंसा घडत असणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन हिंसा थांबवण्याचा प्रयत्न करणे हे महात्मा गांधींचे काम पुढं चालू ठेवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गांधी ही भारताची भारताबाहेरची ओळख आहे आणि हा वारसा आपण जपला पाहिजे असं सांगितलं. गांधीजी जिवंत ठेवायचे म्हणजे भारतीयांचं सामुदायिक शहाणपण जिवंत ठेवायचं – हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलं. नीलम पंडित यांनी संविधान प्रास्ताविकाचं वाचन केलं. ते ऐकताना मला वाटलं की सर्वच कार्यक्रमात सर्व सामाजिक संघटनांनी संविधान प्रास्ताविकाचं वाचन केलं पाहिजे. आपलं ध्येय काय आहे आणि आपण सध्या नेमकं कुठं आहोत – याची जाणीव धारदार करण्यासाठीचा हा एक उत्तम उपाय आहे.

 (नोंद – वक्त्यांच्या मांडणीतून मला काय समजलं ते मी इथं सांगितलं आहे. सत्राच्या वक्त्यांना तेच अभिप्रेत होतं का नव्हतं याची मला खात्री नाही. थोडक्यात, एखादा मुद्दा तुम्हाला पटला नाही तर तुम्ही मत बनवण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची सार्वजनिक अभिव्यक्ती पाहावी ही विनंती.)

पहिल्या सत्रात गांधी और सांप्रदायिक सद्भावना या विषयावर डॉ. राम पुनियानी बोलले. ते हिंदी भाषेत बोलले. त्यांना मी आज पहिल्यांदाच ऐकत होते आणि त्यांचे लेख/पुस्तकं यांपैकी मी काहीही वाचलेलं नाही.  त्यांच्या नर्मविनोदी शैलीने आणि श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून सहभागी करून घेण्याच्या पद्धतीने पावणेदोन-दोन तास कसे गेले हे कळलंही नाही. अनेक वक्ते विनोद करण्याच्या नादात मुद्दे विसरतात, पण डॉ. पुनियांनी यांनी मात्र मुद्द्यांवरची पकड कधीही सुटू दिली नाही.

हिंद स्वराज या महात्मा गांधीच्या पुस्तकाचा आधार घेऊन डॉ. पुनियानी यांनी त्यांचे विचार मांडायला सुरूवात केली. हिंदू-मुस्लिम राजांमध्ये इतिहासात वेळोवेळी ज्या लढाया झाल्या त्या धर्मासाठी नव्हत्या तर सत्तेसाठी होत्या हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. सत्तेला धर्माचं नाव देणं हीच एक प्रकारची सांप्रदायिकता आहे असं ते म्हणाले. ब्रिटिश काळात रेल्वे, पोस्ट, प्रशासन आणि न्यायव्यवस्था (याला डॉ. पुनियानी गमतीने रेल-मेल-जेल असं म्हणाले), दलित आणि स्त्रियांसाठी शिक्षण खुलं होण असा आधुनिक भारताचा प्रवास झाला. हे करत असताना ब्रिटिशांनी भारताचं आर्थिक शोषण केलं – पैसा इथून भारताबाहेर पाठवला. भारतीय समाजातल्या वर्चस्व असणाऱ्या समुहांना या सुधारणांमुळे शोषित समुहाला प्रगती करण्याची संधी प्राप्त झाली हे आवडलं नव्हतं.

ब्रिटिश राजवटीला प्रतिसाद म्हणून दोन प्रकारच्या संस्था संघटना उभ्या राहिल्या. एका गटाचा आधार धर्म होता (मुस्लीम लीग, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तर दुसऱ्या गटाचा आधार सर्वसमावेशक भारतीयत्व आणि शोषितांचे सबलीकरण (हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल काँग्रेस) असा होता. ब्रिटिशांच्या राजवटीत हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाला सुरूवात झाली आणि ब्रिटिशांनी स्वत:च्या फायद्यासाठी या ध्रुवीकरणाला पद्धतशीरपणे खतपाणी घातले.

गांधीजी धार्मिक होते पण सांप्रदायिक नव्हते आणि महमदअली जिना धार्मिक नव्हते पण सांप्रदायिक होते अशांसारख्या उदाहरणांच्या माध्यमांतून पुनियानी यांनी धार्मिकता आणि सांप्रदायिकता यातील फरक स्पष्ट केला. सत्तेसाठी धर्म वापरण्याच्या प्रक्रियेचा इतिहास आणि त्याचा आजच्या वास्तवाशी असलेला संबंध याबाबत अधिक विचार करण्यासाठी डॉ. पुनियानी यांचं भाषण माझ्यासाठी उपयुक्त होतं.

दुसऱ्या सत्रामध्ये सत्याग्रहशास्त्रया विषयावर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी त्यांचे विचार मांडले. गांधीजींच्या आयुष्यात सत्याग्रह ही संकल्पना कशी आली आणि ती कसकशी विकसित होत गेली याबाबत त्यांनी आपल्याला माहिती असलेलाच इतिहास मांडला. पण सत्याग्रह हा त्या मांडणीचा केंद्रबिंदू असल्याने सत्याग्रहाची कल्पना ऐकणाऱ्यांनाही अधिक स्पष्ट होत गेली. डॉ. सप्तर्षी यांनी ते सहभागी असलेल्या आंदोलनांची आणि सत्याग्रहांची अनेक उदाहरणे सांगितली. त्यातून सत्याग्रहात काय करावं आणि काय करू नये हे समजलं.

सत्याग्रह हे अहिंसक शस्त्र आहे आणि त्याची स्वत:ची एक शिस्त आहे. निर्वैरता, निर्भयता, आणि सर्वसमावेशकता ही सत्याग्रहाची जणू त्रिसुत्री आहे. ज्यांच्या विरोधात आपण सत्याग्रह करत आहोत, त्यांच्याशी आपले व्यक्तिगत वैर असता कामा नये; सत्याग्रहाच्या अखेरीस ज्यांच्या विरोधात सत्याग्रह केला त्यांना सत्याची आपली बाजूही दिसून त्यांच्या-आपल्यात स्नेह (मैत्र) निर्माण व्हायला हवा; आपल्याशी संबंधित लोकांना आपले भय वाटता कामा नये (इतकी आपली वागणूक सर्वसमावेशक सन्मान देणारी हवी); तुरूंगात जाण्याचेही भय वाटता कामा नये – असे सत्याग्रहाचे पैलू डॉ. सप्तर्षी यांनी अतिशय सोप्या भाषेत मांडले.

लोकांची उदासीनता, लोकांकडून होणारा उपहास, लोकांकडून होणारी निंदा, सत्तेत असणाऱ्यांकडून (वर्चस्ववादी गटांकडून) होणारी दडपशाही आणि अखेरीस यश या कोणत्याही सत्याग्रहाच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. सत्याग्रहाची मागणी एकच असावी (खूप वेगवेगळ्या मागण्या करू नयेत, मग अनेक फाटे फुटत जातात) आणि सत्याग्रहामागचा नैतिक विचार स्पष्टपणे मांडा – म्हणजे यश नक्की मिळेल असेही त्यांनी सांगितले.

तिसऱ्या सत्रात गांधी-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि महत्त्व या विषयावर श्री. युवराज मोहिते यांनी त्यांचे विचार मांडले. गांधी आणि आंबेडकर या दोघांनीही जातिअंताचा लढा उभारला, पण गांधीजींच्या मते अस्पृश्यता पाळणे हे पाप होते तर आंबेडकरांच्या मते अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा होता.

गांधीजी आणि आंबेडकर या दोघांच्याही कार्याचा आढावा मोहिते यानी मांडला. या दोघांच्या संवादातून आणि कार्यातून अस्पृश्यता निवारण हा विषय गांधींजींच्या विषयपत्रिकेवर अधिकाधिक केंद्रस्थानी कसा येत गेला याचे एक चित्र मोहिते यांनी श्रोत्यांसमोर उभं केलं. पण गांधी आणि आंबेडकर या दोघांपैकी कुणावरही कसलीही टीका होऊ नये याची कसरत मोहिते यांना करावी लागत होती असं मला वाटत राहिलं. या सत्रात घटनाक्रम थोडा कमी करून गांधी आणि आंबेडकर या दोघांच्याही विचारप्रक्रियांवर अधिक भर देता आला असता तर मला जास्त आवडलं असतं.

तिन्ही सत्रांमध्ये वक्त्यांच्या मांडणीनंतर प्रश्नोत्तरे झाली. काही प्रश्न सत्रात मोलाची भर घालणारे होते. आपल्याकडे अनेकदा लोक प्रश्न विचारणं आणि मत मांडणं यात गल्लत करताना दिसतात, तसं काही वेळा इथंही झालं. पण मत मांडणं हीदेखील विचार समजून घेण्याच्या प्रक्रियेतली एक महत्त्वाची पायरी असते.

मला या शिबिरातला दर्शन हा शब्द फारसा आवडला नव्हता. या शब्दातून गांधींजींवर दैवतीकरण लादलं जातं आणि मग गांधींजींच्या विचारांची चिकित्सा करणं थांबून जातं. पण एका अर्थी हा दर्शन शब्द बरोबर आहे असंच म्हणावं लागेल. या शिबिरातून आपल्याला गांधीजी फक्त दिसताहेत – दुरून दिसताहेत, थोडी ओळख होतेय, इतकंच.

एकंदर दिवस चांगला गेला. बरेच नवे मुद्दे मिळाले. जास्त जाणून घ्यायचं असेल तर बरंच काही वाचावं लागेल, अभ्यासावं लागेल – याचं पुन्हा एकदा भान आलं.

24 comments:

 1. "गांधीजी धार्मिक होते पण सांप्रदायिक नव्हते आणि महमदअली जिना धार्मिक नव्हते पण सांप्रदायिक होते अशांसारख्या उदाहरणांच्या माध्यमांतून पुनियांनी यांनी धार्मिकता आणि सांप्रदायिकता यातील फरक स्पष्ट केला."

  हे खूप आवडले! सध्या आपण असेच सांप्रदायिक राजकारणी बघतोय, जे धार्मिक असल्याचा आव आणतात.

  ReplyDelete
  Replies
  1. होय, ऋषिकेश. म्हणूनच 'आपल्यापुरता मानसिक शांतीसाठीचा धर्म' आणि 'सत्तेसाठी इतरांच्या जीवावर उठणारा धर्म' हा फरक आपण समजून घेणे आज गरजेचे आहे.

   Delete
 2. चांगले बौद्धिक झाले म्हणायचे!

  ReplyDelete
  Replies
  1. हाहा! 'तसे' बौद्धिक नाही झाले :-)

   Delete
 3. मुद्दे बरोबर नोंदले आहेस. चांगलं लिहिलं आहेस. त्या विचारसरणीचा तो मार्ग.

  ReplyDelete
  Replies
  1. म्हणजे सत्याग्रहाच्या विचारसरणीचा मार्ग अन्य बाबींना लागू पडत नाही असं म्हणायचं आहे का?

   Delete
  2. No. I don't mean that. Principles apply to others as well.

   Delete
  3. Thanks for the clarification. (I misunderstood your earlier comment, apologies!)

   Delete
 4. तुझ्या लिहिण्यातून सविस्तर कळलं शिबिरात काय काय झालं ते.

  ReplyDelete
 5. चांगलं झालेलं दिसतंय शिबिर.

  ReplyDelete
  Replies
  1. होय, क्षिप्रा. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी असेल असं नियोजन आहे त्यांचं.

   Delete
 6. खूप वर्षानी वाचते आहे तुझा ब्लॉग.

  ReplyDelete
  Replies
  1. होय, योगिता. मी बऱ्याचा वर्षांनी काही लिहिलंय.

   Delete
 7. खूप छान माहिती मिळाली. धर्मधारित राजकारण हे लोकांचे हित साधत नाही हे आज तशा प्रकारच्या सीरिया, अफगाणिस्तान आदी देशांच्या उदाहरणावरून कळतेच आहे. सर्वांना एकत्र घेऊन चालणारी आणि वंचितांनाही वर उचलून घेणारी गांधी नेहरू आंबेडकर यांची मूळ विचारधारा म्हणूनच मोलाची वाटते.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद, सविता दामले. माहिती असून, अनुभव असूनही लोक पुन्हपुन्हा त्याच खेळाला का बळी पडतात हे अनेकदा समजत नाही. सामुदायिक शहाणपण हा आता सामुदायिक शहाणपणा होऊ लागलाय -की नेहमीच असं होतं?

   Delete
 8. खूप चांगले मुद्दे मांडले गेले शिबिरात , असं दिसतं.

  ReplyDelete
 9. After a long time read your blog!!
  But the content is not of my choice and I do not support Gandhiji😊

  ReplyDelete
  Replies
  1. Sorry to know. I guess you should attend one of these shibirs and see whether your opinions change.

   Delete
 10. छान लिहिले आहेस. Thanks for sharing.मी हे शेअर करते आहे.

  ReplyDelete