ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, November 15, 2016

२४६. पाश्शेहजाराच्या गोष्टी: २. नोट


तशी थंडी अजून जोरदार पडत नसली तरी नोव्हेबरमध्ये सकाळी सहाची वेळ म्हणजे थंडीची वेळ. नाशिककडं जाणा-या एसटी बसमधले प्रवासी खिडक्या बंद करून बसले होते आणि बरेचसे झोपेत होते.

सोमवार सकाळची बस म्हणजे दोन दिवस पुण्यात येऊन परत जाणारे कॉलेजचे विद्यार्थी, काही बँकवाले आणि कंपनीत काम करणारे काही नोकरदार लोक, काही सरकारी कर्मचारी. त्यांच्या बसायच्या जागाही ठरलेल्या.

बसचे चालक-वाहक ठरलेले त्यामुळे तसे सगळे चेह-याने एकमेकांना ओळखतात, काही नावानिशीही ओळखतात हे ते आले बघा पाटील साहेब, चल आता असं वाहक चालकाला म्हणाला त्यावरून लक्षात आलं.

पाटलांच्या मागोमाग एक म्हातारी चढली. ती चढताना पाटलांनी तिची पिशवी हातात घेतली होती, म्हणून आधी कंडक्टरला वाटलं की पाटलांची आई-मावशी-चुलती कोणीतरी असलं ती.

पण तसं काही नव्हतं. जागेवर बसायच्या आधीच म्हातारी कडोसरीचे पैसे काढत म्हणाली, नाशकाला जाती ना रं बाबा ही यष्टी? आर्दं तिकिटं दे मला.

आज्जे, जरा दमानं घे. बस तिकडं जागेवर. आलोच मी पैसे घ्यायला, कंडक्टर जरा त्रासलेल्या आवाजात म्हणाला.

शिवाजीनगर स्थानकातून बस बाहेर पडली. चालक-वाहकाच्या गप्पा रंगात आल्या होत्या. नाशिक फाट्यावर आणखी एक दोन प्रवासी चढले. बस पुढं निघाली. मग कंडक्टर तिकिटं द्यायला आला. बहुतेक प्रवाशांनी तिकिटाचे नेमके पैसे आणले होते, त्यामुळे कंडक्टर खुषीत होता.

आज्जीबाईने एक नोट पुढं केली. कंडक्टरने घेतली आणि तो चमकला.

म्हातारे, पाश्शेची नोट चालत न्हाय आता. दुसरे पैसे काढ. कंडक्टर शांतपणे म्हणाला.

म्हातारी घाबरली.चांगली नवीकोरी नोट हाये की बाबा. येकबी डाग न्हाय. न चालाया काय झालं?” ती अवसान आणत म्हणाली. सुरकुत्यांनी वीणलेल्या तिच्या चेह-यात दोन आठ्यांची भर पडली.

कालपरवा टीवी बघितला न्हाय का? मोदी साहेबांनी सांगितलं की ही पाश्शेची नोट चालणार नाही आता म्हणून. सारखं सांगतायत की समदे लोकं. कंडक्टरने तिला समजावून सांगितलं.

अरं द्येवा, आता काय करू मी? बुडलं की माजं पैसं आता, आजीबाईने जोरदार हंबरडा फोडला. म्हातारीच्या आवाजाने एसटीतले सगळे टक्क जागे झाले.

आजीबाई, बुडले नाही पैसै. बँकेत नायतर पोस्टात जावा, बदलून मिळेल. आधार कार्ड आहे ना, ते घेऊन जावा सोबत, समदे मिळतील पन्नासच्या न्हायतर वीसच्या नोटांमध्ये. लगेच मिळणार, काळजी नको. एका प्रवाशाने आजीला धीर दिला. मग काही लोक आपापसात एटीएमच्या रांगांबद्दल तक्रारवजा सुरांत बोलायला लागले. तर आणखी काही लोक त्यांना देशप्रेमाचं महत्त्व पटवून द्यायला लागले. सरकारच्या धोरणांना विरोध म्हणजे देशद्रोह नाही असा एक सौम्य आवाज त्या गजबजाटात बहुधा कुणाच्याही कानी पडला नाही.

आजीच्या आजूबाजूचे प्रवासी मात्र तिला धीर देण्याचा प्रयत्नात मग्न होते. खातं आहे का बँकेत? तिकडं भरून टाका म्हणजे फार रांगेत उभारायची पण कटकट नाही. पैशे कुटं जात नाहीत तुमचे. या पाश्शेऐवजी शंभर-पन्नास-वीसच्या नोटा वापरायच्या आता काही दिवस. आणखी एकाने सल्ला दिला.

म्हातारी सावरली. असं म्हनतायसा? बुडणार न्हाय ना पैशे? बदलून देताना कट न्हाय ना द्यावा लागणार? झ्याक हाये की मंग. पर इतका कुटाना कशापायी करतोय म्हनायचा तो मोदीबाबा?” म्हातारीच्या या प्रश्नावर सहप्रवासी हसले. मग दोन-तीन लोकांनी म्हातारीला समजावून सांगायचा प्रयत्न केला. महागाई, भ्रष्टाचार, पाकिस्तान हे तीन शब्द म्हातारीला ओळखू आले. मग म्हातारीने लोकांचं बोलणं समजल्यागत मान डोलवली. पण बरेच शब्द म्हातारीच्या डोक्यावरून गेले. पैसा काळा कुटं असतुया व्हयं या म्हातारीच्या उस्फूर्त प्रतिक्रियेवर लोक पुन्हा हसले. सगळे हसताहेत हे पाहून म्हातारीही हसायला लागली. मोदीबाबाचं भलं होवो असा तिने तोंड भरून आशीर्वादही दिला.

कुणी तुम्हाला पाश्शेहजारच्या नोटा द्यायला लागलं तर घेऊ नका बरं आज्जी, एका कॉलेजकुमाराने प्रेमळ सल्ला दिला.

म्हातारी मनापासून हसली. अरं लेकरा, मला कोण द्यायला बसलंय पैशे? काडून घ्यायला बगतेत समदे. मालक मेले माजे तवापासून सरकार मला पैशे देती दर म्हैन्याचे म्हैन्याला. समद्यांची माज्या पेन्शनीवर नजर असतीय.  देवाला जायचं म्हणून हेच लपवून ठेवलेले. हरवायला नकोत म्हणून परवाच नातवानं एक नोट करून आणली बाबा पाश्शेची. त्यो न्हाय का फटफटीवर आलता मला सोडाया, तो नातू. घे रे मास्तरा, दे तिकिट. म्हातारी मूळ पदावर आली.

कंडक्टर म्हणाला, घ्या. सगळं रामायण झाल्यावर म्हातारी विचारतेय रामाची सीता कोण ते. प्रवासी हसले.

म्हातारे, ही नोट घरी घेऊन जायची. त्या साहेबांनी सांगितली तशी पोस्टात न्हायतर बँकेत जाऊन बदलून घ्यायची. आता ती नोट आत ठेव अन् दुस-या नोटा काढ. कार्ड हाये ना? शंभर न चाळीस रूपये दे. कंडक्टर म्हणाला.

दुसरी नोट न्हाय रे लेकरा. येवढीच हाये. म्हातारी काकुळतीने म्हणाली.

काय बोलावं ते कंडक्टरला सुचेना. आजूबाजूचे प्रवासीही चपापले.

आजी, असं करू नका. मास्तरला सरकारचा हुकूम आहे. न्हाय घेता येत तेस्नी पाश्शेची नोट. शोधा जरा, सापडंल एखादी शंभराची नोट, एका प्रवाशाने समजावलं.

म्हातारीकडं खरंच दुसरी नोट नव्हती. म्हातारी रडकुंडीला आली. प्रवासीही भांबावले. एकटी म्हातारी, तिच्यासोबत कुणी नाही. तिला न धड अक्षरओळख. ना पोराचा फोन नंबर तिला माहिती. काय करायचं आता?  कुणाला काही सुचेना. सगळे गोंधळले.

तोवर चालकालाही या गोंधळाचा अंदाज आला. त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि तोही चर्चेत सामील झाला.

लेट हर गेट डाऊन. आय वील बी लेट फ़ॉर .... म्हणणा-या एका भपकेबाज युवकाकडे सगळ्यांनीच वळून रागाने पाहिलं. तो गप्प बसला.

घ्या हो कंडक्टर तुम्ही ही नोट. तीस डिसेंबरपर्यंत आहे की वेळ. भरून टाका बँकेत. हाय काय आन नाय काय, एकाने सल्ला दिला.

तसं नाही करता येत मला, साहेब. ड्यूटी संपली की पैसे जमा करावे लागतात. तिकडं कॅशियर घेणार नाही पाश्शेची नोट. तुम्हीच कुणीतरी घ्या ती नोट आन द्या म्हातारीला शंभराच्या नोटा. कंडक्टरने आपलं संकट दुस-यांवर ढकललं.

सगळ्यांच्या नजरा पाटील आणि जोशींकडं वळल्या. दोघंही स्टेट बँकवाले.

शेजारी-पाजारी, नातलग, ओळखीचे लोक, बायकोच्या ऑफिसमधले सहकारी, पोरांच्या मित्रांचे पालक, बहिणीच्या सासरचे लोक ... या सगळ्यांच्या पाहिजे तितक्या नोटा बदलून मिळण्याच्या अपेक्षांचं ओझं घेऊन ते मागचे पाच दिवस जगत होते. तीस डिसेंबर फार दूर होतं अजून.

पाटील जोशींच्या कानात काहीतरी कुजबुजले. जोशींनी मुकाट्याने मान हलवली.

तेवढ्यात आपण सगळे थोडीथोडी वर्गणी काढू. आजींना तिकिट काढून देऊ. चालेल का?” असं म्हणत एका कॉलेज युवतीने वीसची नोट काढली. प्रश्न वीस-पन्नासचा नव्हता, नोटांचा होता. म्हणून तातडीने बरेच प्रवासी परत झोपी गेले. तरी बघताबघता काही नोटा जमा झाल्या. आजींना उतरवा असं म्हणणा-यानेही वीस रूपये दिले. बक्कळ साडेचारशे रूपये जमा झाले.

आजी हे घ्या तिकिट आणि हे बाकीचे पैसे ठेवा वरच्या खर्चाला. ते पाश्शे ठेवून द्या आता. पाटील म्हणाले.

देवा, नारायणा, तुजी किरपा रं समदी. या समद्यांना सुखी ठेव रं बाबा, आजींनी डोळे मिटून हात जोडले.

प्रवास पुढं सुरू झाला.

आजी, त्या पाश्शेच्या नोटेचं आता काय करायचं?” उजळणीसाठी एकानं विचारलं.

परत येयाला लागतीलच की पैशे. तवा त्या मास्तरला दीन नोट, न्हायतर मोडून घीन नाशकात. माजा पैसा काय काळा नव्हं, मी काय मोदीबाबाला ही नोट देणार नाय. आजीबाई विजयी स्वरांत, ठामपणे म्हणाल्या.

सहप्रवासी एकमेकांची नजर चुकवत आणि हसू लपवत फेसबुक- व्हॉट्सऍपवर किस्सा सांगायला मोबाईलकडं वळले.

Friday, November 11, 2016

२४५. पाश्शेहजारांच्या गोष्टी: १. बचत गट




आज रामा कशापायी आलाय तुझ्यासंगं गटाच्या मीटिंगला? आपलं ठरलंय न्हवं पुरूषमाणसांना नाय येऊ द्यायचं म्हणून?”  बचत गटाची अध्यक्ष असलेल्या कांताने जरा जोरातच विचारलं.
राम राम अध्यक्षीणबाई. दादांनी सांगितलं हिकडं यायला म्हणून आलो बगा. आता तुमी नगं म्हणत असालसा तर जातो की लगेच माघारी. आपलं काय काम नाय बा, दादांचं हाये, रामा बेरकीपणानं म्हणाला.
दादा म्हणजे प्रस्थ. केवळ गावातलं नाही तर पंचक्रोशीतलं. गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या आण्णांच्या रोजच्या बैठकीतले. दादांच्या सल्लामसलतीविना आण्णांचं पान हलत नाही म्हणे. म्हणजे निदान दादा आणि त्यांची माणसं तरी असचं सागंतात.
आता या कमळवाल्याला हितं काय करायचंय? केली की भर सगळी मागच्या विलेक्शनला, अजून दोन वरीसबी न्हाय झाली तर ... शेवंता कुजबुजली. पण ते ऐकून अलका फणफणली. बाया कलकल करायल्या लागल्या. कोण कॉंग्रेसची, तर कोण भाजपची तर कोणी सेनेची. गलका व्हायला लागला. ते पाहून कांता म्हणाली, उगा का भांडताय बायांनो? कधी ते हातवाले असतात तर कधी तेच कमळवाले असतात. आज येक आला, उद्या दुसरा यील.आपण कशाला बरबाद करायची आपली एकी?” बाया हसल्या. रामापण हसला.
काय निरोप आहे दादांचा?” कांताने विचारलं.
काय न्हाई. दादा म्हणले किती दिवस शंभराचीच बचत करणार बाया? हजार-दोन हजार टाका की म्हन्ले आता. दिपाळीतून वाचले असतील ते पुडं सक्रातीला मिळतील. रामा म्हणाला.
अरे बाबा, दादा मोठा माणूस हाये. आमी शंभरच कसंतरी करून वाचिवतोय, हजार कुठनं आणायचे बाबा? झाड नाही पैशाचं आमच्या दारात. सांग जा जाऊन तुझ्या दादास्नी. रखमाआजी फिस्कारली. रखमा दादांची लांबच्या नात्यातली चुलती होती. तिचं असलं बोलणं दादा मनावर न घेता हसण्यावारी नेतील हे आख्ख्या गावाला माहिती. त्यामुळे सगळे हसले.
मंग काय तर! सांगायला काय होतंय त्यास्नी. दादा देणारेत का पैसे?” आणखी एकीने धीर करून विचारलं.
तेच तर सांगाया आलतू. दादा म्हणले दोन दोन हजार देतील दादा प्रत्येक बाईला. रामा म्हणाला.
अन अट काय? परत कदी द्यायचे? व्याज किती?” प्रश्नांचा भडिमार झाला रामावर.
अट एकच. पयशे लगोलग गटाच्या खात्यात जमा करायचे. याज बीज काय नाय. जमलं तसं सा मैन्यांनी परत करायचे. कुणाला परत करायचे नसतील तरी बी चालंतंय. आपल्या गावच्या बायांची बचत वाढली पायजे असं दादांना लई दिसांपासून वाटतंय बगा. रामाने सांगितलं.
बायांची नजरानजर झाली. फुकट मिळतंय तर कशाला सोडा – असा विचार प्रत्येकीच्या मनात आला. तसंही दादा नेहमी ओरबाडून घेतो, आज देतोय म्हणजे काहीतरी भानगड असणार असाही विचार त्यांच्या मनात आला.
आम्ही काय लिखापढी करणार नाही बघ,” कांताने ठासून सांगितलं.
काय गरज नाही अध्यक्षीणबाई. दादांकडून भाऊबीज समजा, असं म्हणून रामाने पिशवीतून पाचशेच्या नोटांचा गड्डा बाहेर काढला.
रामाच्या वाटच्या ऐशी नोटा आज संपल्या. अजून एक महिना बाकी आहे.
आसपासच्या गावातल्या बचत गटांचा हिशोब रामाने मनातल्या मनात सुरू केला.


Thursday, November 3, 2016

२४४. तडिंजु

यंदा माझ्यासाठी दिवाळी जरा लवकरच आली. एक-दोन दिवस पुढेमागे नाही, चांगली पंधरा दिवस आधी आली. फटाक्यांचे आवाज, घरांसमोरच्या अंगणात मंद तेवणार्‍या पणत्या आणि मेणबत्त्या, घरांच्या खिडकीतून डोकावणारे आकाशकंदील. सुपरमार्केटमध्ये लागलेले जंगी सेल आणि मालाने भरलेली दुकानं. रस्त्यावर दिसणारी अगणित माणसं. खरेदीची लगबग आणि सगळीकडे ओसंडून वाहणारा उत्साह.

1
प्रकाशचित्र १ - रस्त्यावरून दिसणारं एक दुकान, बाहेर पानाच्या ठेल्यावर स्त्री विक्रेती आहे.

1
प्रकाशचित्र २ - जंक्शन स्क्वेअर सुपरमार्केटमधले आकाशकंदील

देश कोणताही असो, सांस्कृतिक उत्सव हे बाजारासाठी एक मोठी संधी असते. जंक्शन स्क्वेअर सुपरमार्केटमध्ये लटकलेले आकाशकंदील पाहताना या देशाच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची चुणूक मिळाली. केवळ बाजाराच्या स्पर्धेत इथल्या सण-उत्सवांची निरागसता किती काळ टिकून राहील, हा एक प्रश्नच आहे. ते असो.

हं! तर काय सागंत होते, की दिवाळीची तंतोतंत आठवण करून देणारं वातावरण, पण ही दिवाळी नव्हती. हा होता दिवाळीसारखाच महोत्सव, स्थानिक दीपोत्सव. या उत्सवाचं नाव आहे ‘तडिंजु’

ही कुठली भाषा? हा कुठला देश? ‘तडिंजु’ या शब्दाचा नेमका काय अर्थ? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आले असणार.

गेले काही महिने मी ‘म्यानमार’मध्ये आहे. मी राहते ‘यांगों’ शहरात. आपण ज्याला ‘रंगून’ म्हणतो, ते स्थानिक भाषेत आहे ‘यांगून’ (Yangon), त्याचा उच्चार करायचा ‘यांगों’ असा. इथे गो या अक्षरावर अनुस्वार आहे, तो विसरायचा नाही. ही भाषा आहे बर्मी उर्फ म्यानमार.

सगळ्यात आधी ‘Thadingyut’ या शब्दाचा उच्चार ‘तडिंजु’ असा करायचा, याची सवय पडायला काही दिवस गेले. जसजसा उत्सव जवळ येत चालला, तसं हा उत्सव पाहायला नेमकं कुठे जायचं याची चाचपणी सुरू झाली. म्यानमारमधले काही उत्सव हे एखाद्या विशिष्ट शहरातच साजरे होतात, पण ‘तडिंजु’ हा सण देशभरात साजरा करत असल्यामुळे शहराबाहेर जाण्याची गरज नव्हती.

‘तडिंजु’ म्हणजे काय, हे सांगायचं राहिलंच.

म्यानमारमधले बहुसंख्य लोक ‘थेरवाद बौद्ध’ धर्माचे अनुयायी आहेत. म्यानमारमध्ये सण-उत्सवांसाठी आपल्यासारखीच परंपरेने चालत आलेली चांद्रगणना आहे. या कालगणनेनुसार वर्षातल्या सातव्या महिन्याचं नाव आहे ‘तडिंजु’. या महिन्यातल्या पौर्णिमेला तीन दिवसांच्या दीपोत्सवाचा मधला दिवस असतो, म्हणून हा आहे ‘तडिंजु उत्सव’. यंदा १६ ऑक्टोबरला ‘तडिंजु’ पौर्णिमा होती. म्हणजे तडिंजु १५, १६ आणि १७ ऑक्टोबरला होता. पण उत्सवाचा मुख्य दिवस असतो तो पौर्णिमेचा.

साधारणपणे जुलै महिन्यात बर्मी ‘वासो’ (हा चांद्र) महिना येतो. आपल्याकडच्या चतुर्मासासारखा इकडे ‘त्रिमास’ चालू होतो. या काळात बौद्ध भिक्षूंना रात्री मठाबाहेर राहण्यास परवानगी नसते, त्यामुळे ते प्रवास करत नाहीत. तीन महिन्यांचा काळ ध्यान-मनन-चिंतन यात ते व्यतीत करतात. बरेच सामान्य लोकही या काळात दारू आणि मांसाहार टाळतात. या तीन महिन्यांत विवाह, नवीन घरात राहायला जाणं अशा चांगल्या गोष्टी शक्यतो केल्या जात नाहीत. इथल्या पावसाचं धुंवाधारपण लक्षात घेता, शेतीच्या सोयीने हे नियम आले असावेत असं म्हणता येईल.

तीन महिन्यांनी, ‘तडिंजु पौर्णिमे’ला त्रिमासाचं हे व्रत पूर्ण होतं. पावसाने तोवर माघार घेतलेली असते. आकाश निरभ्र असतं (पण तडिंजु पौर्णिमेला यांगोंमध्ये मात्र पाऊस हजेरी लावून गेला, हा भाग वेगळा.) हिवाळा जवळ आलेला असतो. हवेत होणार्‍या सुखद बदलाच्या मुहूर्तावर तीन दिवसांचा दीपोत्सव साजरा होतो – तोच हा तडिंजु दीपोत्सव.

या उत्सवामागे एक मुख्य धार्मिक संकल्पनाही आहे. आजही तीच या उत्सवाच्या केंद्रस्थानी आहे, ती थोडक्यात सांगते. बौद्ध धर्मातल्या विविध संकल्पना समजून घेण्यासाठी हा छोटा लेख पुरेसा नाही. त्याबद्दल नंतर कधीतरी लिहायचा प्रयत्न करीन.

तर अशी लोकमान्यता आहे की बुद्ध सदेह स्वर्गात (किंवा देवांच्या जगात – असे सहा वेगवेगळे स्वर्ग आहेत, त्यांपैकी एका जगात) गेला (बुद्धाचा एकेरी उल्लेख प्रेम आणि आदरातून आलेला आहे, याविषयी शंका नसावी.) आणि त्याने तिथं देवांना ‘अभिधम्म’ प्रवचनांद्वारा उपदेश दिला. ‘तडिंजु पौर्णिमे’ला ‘अभिधम्म दिवस’ असंही म्हटलं जातं. तिथल्या देवतांमध्ये बुद्धाची पूर्वजन्मातली माता ‘माया’ हीदेखील होती. बुद्धाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी मातेचं निधन झालं होतं. तिच्या पुढच्या जन्मात ती देवतारूपात या स्वर्गात निवास करत होती. मातेचं ऋण चुकतं करण्यासाठी, आपल्याला मिळालेलं ज्ञान तिलाही मिळावं, या उद्देशाने बुद्ध तीन महिने Tavatimsa या स्वर्गीय निवासात होता. ‘तडिंजु पौर्णिमे’च्या दिवशी तो पृथ्वीतलावर सदेह परतला. त्याचा परतीचा मार्ग देवांनी प्रकाशाने उजळला होता. त्या घटनेच्या स्मरणार्थ हा तीन दिवसांचा दीपोत्सव असतो.

या काळात घरातील ज्येष्ठ माणसांना वंदन करून त्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. पौर्णिमेच्या दिवशी काही लोक उपास करतात. मठातल्या भिक्षूंना अन्नदान आणि वस्त्रदान, तसंच पंखा, छत्री आदी उपयोगी वस्तू देण्याचंही खूप महत्त्व आहे.

हा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो तो ‘पय्या’ (अथवा पया)मध्ये. ‘पय्या’ म्हणजे पगोडा. घराघरातही रोषणाई असते; पण सामूहिक रोषणाई पाहायची, तर ‘पय्या’मध्ये जायला हवं. सगळ्यात पहिला पर्याय होता ‘श्वेडगों (Shwedagon) पय्या’. श्वे म्हणजे सुवर्ण आणि डगो म्हणजे डोंगर. डोंगरावर असलेला सुवर्णमयी पगोडा. केवळ यांगों शहराचीच नाही, तर म्यानमार देशाची शान असणारा हा पगोडा धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. (याबद्दलही नंतर कधीतरी) माझ्या कार्यालयातून, माझ्या घरातून ‘श्वेडगों पय्या’ सतत दिसतो. ही भव्य वास्तू जणू या शहरावर कृपादृष्टी ठेवून आहे असं वाटत राहतं. ‘श्वेडगों पय्या’च्या परिसरात गेले कित्येक महिने कितीतरी वेळा भटकंती केली आहे, ती केवळ ‘श्वेडगों’ला विविध वेळी आणि वेगवेगळ्या कोनांतून पाहण्यासाठी.

पण माझ्या स्थानिक सहकार्‍यांनी मला या बेतापासून तातडीने परावृत्त केलं. ‘तडिंजु’साठी श्वेडगोंमध्ये अपरंपार गर्दी असते, त्यामुळे तू तिथं जाऊ नकोस, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. अशा गर्दीत स्त्रियांना येणारे अनुभव त्रासदायक असतात, असं माझ्या स्त्री सहकार्‍यांनी सांगितलं. अनेक गोष्टींचे निर्णय मी स्थानिक सहकार्‍यांवर सोपवलेले असतात. आणि तशीही गर्दी मला आवडत नाहीच. म्हणून मग ‘श्वेडगों’चा बेत रद्द केला. दुसरा पर्याय होता ‘सुले (Sule) पय्या’. थोडा लांब, पण तरी आवाक्यातला. पण तिथेही गर्दी असणार म्हणून तोही बाद.

रिचर्ड हा माझा ब्रिटिश सहकारी ‘चायवाय (Kyaik Waing) पय्या’जवळ राहतो. (इथे पुन्हा शब्दांची पुनरावृत्ती आहे. मॉन या म्यानमारच्या एका भाषेत ‘चाय’ म्हणजे पगोडा, ‘चाय’ म्हणजेच ‘पय्या’.) हा पय्या यांगों शहराच्या उत्तर भागातील तमै (Thamaing) उपनगरात आहे. मग मोर्चा तिकडे वळवला. रिचर्ड, मी आणि इलेना ही आमची एक बेल्जियन मैत्रीण असे तिघं संध्याकाळी सहाच्या सुमारास तिकडे गेलो. या पगोडालाही मोठा इतिहास आहे. एका ‘नट’ने (Nat – powerful spirit) बुद्धाला लपाछपीचा खेळ खेळण्याचं आव्हान दिलं. शक्तिशाली जीव असूनही नट पैज हरला (तो लपल्यावर बुद्धाने त्याला क्षणार्धात शोधलं, नट मात्र बुद्धाला शोधू शकला नाही.) आणि तो बुद्धाचा शिष्य झाला, अशी कथा आहे. १८७२मध्ये हा पगोडा बांधण्यात आला आणि वेळोवेळी त्याचा विस्तार करण्यात आला आहे.

‘चायवाय’मधल्या ‘तडिंजु’ची ही काही क्षणचित्रं.
1
प्रकाशचित्र ३ - स्वखर्चाने पणत्या-मेणबत्त्यांची ‘पाय’मध्ये रोषणाई करणारे नागरिक
1
प्रकाशचित्र ४ - खास बनवलेल्या लोखंडी स्टँडवर पणत्या ठेवायची सोय
1
प्रकाशचित्र ५ - एका छोट्या मुलीची भावमुद्रा टिपणारी तिची आई
1प्रकाशचित्र ६ - युवकवर्गाचा सहभाग
1प्रकाशचित्र ७ - वार्‍याने विझलेल्या काही पणत्या
1
प्रकाशचित्र ८ - मात्र या विझलेल्या पणत्या लगेच दुसरं कोणीतरी पेटवत होतं.

‘श्वेडगों’ आणि ‘सुले’ पय्यामध्ये एरवीही परदेशी लोक मोठ्या संख्येने असतात. ‘चायवाय’मध्ये मात्र दोन तासांच्या वास्तव्यात आमच्याव्यतिरिक्त कोणीही परदेशी लोक दिसले नाहीत. असंख्य लोकांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना ‘मिंगलाबा’ (नमस्कार) म्हणून अभिवादन केलं. ‘डापौ यायलो यामला?’ (निदान मला तसं ऐकू आलं) – आम्ही तुमच्यासोबत एक फोटो घेऊ का? – असं एका मुलीने विचारलं. माझ्या बर्मी भाषेच्या मर्यादित ज्ञानात तोवर हे वाक्य मी शिकले होते. तिला होकार दिल्यावर मग काय, फोटोसेशन झाल्यासारखं अनेकांनी आमच्यासोबत फोटो काढले. शाळेत शिकणारी काही छोटी मुलं आमच्यासोबत इंग्लिश भाषेचा सराव करून गेली. कुणीतरी आम्हाला सरबत आणून दिलं. कुणी नुसते हसून अभिवादन करून पुढं गेले. कुणी ‘निकौला?’ (कसे आहात?), ‘असिम्पिला?’ (ठीक आहात ना तुम्ही?) असं विचारलं. एकंदर तिथे गर्दी असली, तरी ती अंगावर येणारी गर्दी नव्हती. लोकांनी आमच्याशी संवाद साधला आणि आमचं आम्हाला निवांत हिंडूही दिलं. दोन तास आम्ही तिथल्या प्रसन्न वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला.

‘चायवाय’च्या ‘विश्वस्त मंडळा’च्या सभासदांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि फोटो काढले. ‘चायवाय’संबंधीची बर्मी भाषेतली माहिती पुस्तिका त्यांनी आम्हाला दिली. विश्वस्त मंडळाशी मी मोडक्यातोडक्या का होईना, पण बर्मीमध्ये संवाद साधल्यामुळे सदस्य अत्यंत खूश झाले. अध्यक्ष मला म्हणाले, “त्या दोघांचं सोड, तू तर भारतीय आहेस, म्हणजे आमची शेजारी आहेस. तुला तर बर्मी शिकणं अवघड जाणार नाही, शिकून घे लवकरात लवकर आमची भाषा. मग तुला आमचा इतिहास, आमची संस्कृती जास्त चांगली समजेल.” खरं आहे त्यांचं म्हणणं.

रात्री दहाच्या सुमारास परत येताना ‘इन्या तलावा’च्या परिसरात शेकडो लोक दिसले. परिसर फटाक्यांच्या आवाजाने दुमदुमत होता. आकाशात रंगीबेरंगी अग्निकण दिसत होते.

दीपोत्सव आपण भारतीयांनी दक्षिण आशियाई देशांकडून स्वीकारला की त्यांनी तो भारतातून आयात केला, हे सांगणं मला तरी अवघड आहे. कुणी त्याबाबत संशोधन केलं असेल तर मला जाणून घ्यायला आवडेल. पण या विषयावर उगाच ‘ते आणि आपण’, ‘आपल्या संस्कृतीचा प्रसार’, ‘बर्मा मुळात भारताचा भाग आहे’ असली बिनापुराव्याची चर्चा करण्यात मला रस नाही. आपल्या पूर्वजांनी इतरांना जितकं दिलं, तितकंच सांस्कृतिक संचित इतरांकडूनही ते घेत आले असावेत असा माझ्या मते साधा हिशोब आहे.

तर यंदाची दिवाळी माझ्यासाठी नेहमीपेक्षा लवकर आली. मला काही नवं सांगून गेली. भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक भिंतींच्या पल्याड डोकावण्याची एक संधी माझ्यासाठी घेऊन आली.

त्याचं असं आहे की माणसं कोणत्याही भूमीतली असोत, कोणत्याही धर्माची (वा धर्म न मानणारी) असोत, कोणतीही भाषा बोलणारी असोत – माणसांना उत्सव साजरे करायला आवडतं. अंधाराचा नाश होऊन प्रकाशाने उजळणारं जग पाहायला माणसांना आवडतं. ‘दीपोत्सव’ ही जगातल्या माणसांची 'एक' भाषा आहे, अंधारातून प्रकाशाकडे नेणार्‍या मार्गाच्या आकांक्षेची ती एक जागतिक अभिव्यक्ती आहे. 'तमसो मा ज्योतिर्गमय' ही माणसांची स्वाभाविक प्रार्थना आहे. त्यालाच आपण ‘दीपावली’ म्हणतो, तर म्यानमारचे लोक म्हणतात ‘तडिंजु’.
_____________________________________
(या लेखातले बर्मी उच्चार इंग्रजी बोलणार्‍या स्थानिक सहकार्‍यांकडून तपासून घेतले आहेत. पण ‘दहा मैलांवर भाषा बदलते’ हे तत्त्व म्यानमारलाही लागू पडतं. त्यामुळे या लेखातील शब्दांचे वेगळे उच्चार आपल्यापैकी काहींनी कदाचित ऐकले असतील)

पूर्वप्रसिद्धी - मिसळपाव दिवाळी अंक २०१६

Friday, October 28, 2016

२४३. भय इथले ....

नमस्कार.
काबूलमधल्या माझ्या वास्तव्यावर आधारित 'भीतीच्या भिंती' ही लेखमालिका मी इथं प्रकाशित केली आहे.
अर्थात मालिका अर्धवट राहिल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असणार.

ही लेखमालिका आता तुम्हाला विस्तारित स्वरूपात वाचायला मिळेल - ती पुस्तकरूपात.
'राजहंस प्रकाशना'ने 'भय इथले .. तालिबानी सावट: प्रत्यक्ष अनुभव' हे पुस्तक जुलै २०१६ मध्ये प्रकाशित केले आहे.


'मिसळपाव' या संस्थळावर या पुस्तकाचा एस यांनी करून दिलेला परिचय  तुम्हाला इथं वाचता येईल.

तुमचा अभिप्रायही जरूर कळवा.

Monday, September 12, 2016

२४२. ‘धागे अरब जगाचे’: गुंतागुंतीच्या जगाची ओळख (पुस्तक परिचय)


मी अफगाणिस्तानमध्ये असताना शिया-सुन्नी, वहाबी-सलाफी, इराण-सौदी अरेबिया ही द्वन्दवं जगात आहेत याचा जाणीव ठळक झाली होती. त्यानंतर इस्लाम आणि अरब जगाबद्दल कुतूहल वाढलं होतं. बरेच प्रश्नही पडत होते. अरब जगाबद्दल मला दोनच गोष्टी माहिती होत्या – इथलं तेल आणि इथला कडवा इस्लाम.

अरब जगातल्या बहुसंख्य देशांनी अफगाणिस्तानमधल्या तालिबान राजवटीला मान्यता दिली नव्हती हे मला आश्चर्यजनक वाटलं होतं. यामागे नेमकं काय कारण असेल? शिया आणि सुन्नी हे दोन्ही इस्लामचे पंथ आहेत, मग त्यांच्यात भांडणाचा मुद्दा तरी काय आहे? इस्त्रायलला आपण (भारत) पाठिंबा देतो खरा, पण ते सारखे हल्ले का करतात पॅलेस्टाईन जनतेवर? अरब देशांचे आणि अमेरिकेचे संबंध कसे आहेत? त्यांचा नेमका काय इतिहास आहे? तेल सापडायच्या आधी कसं होतं जगणं अरब देशांचं? या देशांमध्ये राजेशाही कशी काय टिकली इतकी वर्ष? ट्युनिशियामध्ये, इजिप्तमध्ये क्रांतीनंतर इतक्या लवकर का भ्रमनिरास झाला तिथल्या जनतेचा?

अरब जगाबद्दल हे असे कितीतरी प्रश्न. या प्रश्नांची उत्तर शोधायची तर भरपूर वाचायला हवं. त्यासाठी मुळात आधी काय वाचायचं ते समजायला हवं. सगळी नुसती गुंतागुंत होती.

विशाखा पाटील यांनी लिहिलेलं धागे अरब जगाचे हे पुस्तक वाचलं आणि वरच्या ब-याचशा प्रश्नांची प्राथमिक उत्तरं मिळाली. काही नवे प्रश्नही पडले – हे त्या पुस्तकाचं यश म्हणता येईल. पुस्तक साध्या-सोप्या भाषेत आपल्याला माहिती देतं आणि पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे.

पुस्तकाचा प्रारंभ होतो २००८ मधल्या दमास्कस (सिरिया) इथल्या अरब संघाच्या बैठकीच्या वर्णनाने.  वेगवेगळे अरब देश; त्यांचे नेते; त्यांचे घडोघडी बदलणारे परस्परसंबंध; अमेरिका-ब्रिटन-रशिया-संयुक्त राष्ट्रसंघ आणि मुख्य म्हणजे इस्रायल – अशी अनेक वळणं घेत निवेदन पुढं जातं. विचारांचा गुंता वाढत जातो. सध्याची तिथली परिस्थिती समजते आहे असं वाटायला लागतं. सतरा अरब देश आणि त्यांचे आपापसात तितकेच गुंतागुंतीचे व्यवहार. एका क्षणी गळ्यात गळे घालणारे कधी एकमेकांचं तोंड पाहायचं नाकारतील, इतकंच नाही तर एकमेकांविरूद्ध उभे ठाकतील याचा भरवसा नाही. आणि पुन्हा कधी एकत्र येतील तेही सांगता येत नाही.

ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांचा इतिहास एकमेकांशी जोडलेला आहे. अब्राहम हा या तिघांचाही पुराणपुरूष. पण पुढं रस्ते बदलले. या बदलाचा फटका अरब जगाने आधी इतरांना दिला पण त्याची झळ त्यांनाही भोगावी लागली. ज्यू आणि इस्लाम धर्मांच्या इतिहासाची रंजक माहिती या पुस्तकात मला वाचायला मिळाली. त्यामुळे शिया-सुन्नी यांच्यातला संघर्ष, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष कळायला बरीच मदत झाली. इस्रायलच्या राष्ट्रवादाबद्दल एके काळी मला असलेला आदरयुक्त दरारा संपत आलाच होता. या पुस्तकामुळे इस्रायलची युद्धखोर बाजूही मला चांगलीच कळली (तो लेखिकेचा हेतू आहे असं मी म्हणणार नाही). ज्यू समाजाला जे भोगावं लागलं त्याबद्दल सहानुभूती नक्की आहे, पण इस्रायलच्या सर्व कृत्यांचं आंधळं समर्थन मात्र नाही. असो. हे विषयांतर झालं, त्यामुळे थांबते.

अरब देशांचं भौगोलिक स्थान आणि अर्थातचं तेलामुळे आलेलं महत्त्व यांचा सविस्तर ऊहापोह पुस्तकात आहे.

पुस्तकाचा पट इतका मोठा आहे की मला आणखी एकदा हे पुस्तक वाचावं लागणार हे नक्की.

पुस्तकात अनेकदा भूतकाळ- वर्तमानकाळ – भविष्यकाळ यांचा सांधा जोडला गेलाय, त्यामुळे माझा गोंधळ झाला. उदाहरणार्थ पान ३०-३१ वर इसवी सन ६८० मधल्या करबला लढाईचा इतिहास चालू असताना मध्येच पान ३१ वर एका परिच्छेदात १९७९ मध्ये इराणमध्ये क्रांती घडवून आणलेल्या अयातुल्ला खोमैनींचा उल्लेख मला नीटसा समजला नाही.

पुस्तकाच्या अखेरीस शब्दकोष दिला आहे तसाच नामकोष पण असता तर मदत झाली असती. पुस्तकात अनेक नावं असल्याने कुणाचा कोण, शत्रू की मित्र, ज्यू की मुस्लिम, शिया की सुन्नी हे चटकन लक्षात येत नाही. मला काही नावांसाठी मागची पानं पाहावी लागली. पुढच्या आवृत्तीत नावांचा कोष अल्प माहितीसह जरूर द्यावा.

अरब देशातल्या या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतावर काय झाला, होतो आणि होईल याविषयी या पुस्तकाने उत्सुकता जागी केली आहे. धागे अरब जगाचे हे पुस्तक एकदा तरी वाचावं आणि  संग्रही ठेवावं असं आहे इतकं नक्की.


धागे अरब जगाचे: विशाखा पाटील

राजहंस प्रकाशन

किंमत:  रूपये ४००/-



मुखपृष्ठ प्रकाशचित्र राजहंस प्रकाशनच्या संकेतस्थळावरून साभार


Wednesday, June 29, 2016

२४१. बँकॉक:धावती भेट ४: सुवर्णमयी वट

साधारण अर्ध्या तासाचा प्रवास झाल्यावर मी महाराज धक्क्यावर उतरले. इकडेतिकडे पाहतापाहता अचानक मुख्य रस्त्यावर आले. इथं प्रश्न आला – डावीकडे वळावं का उजवीकडेएका टूरिस्ट वाटणा-या गटाच्या मागे चालायला लागले. दहा मिनिटं चालल्यावर एका दुकानात मला ग्रॅन्ड पॅलेसला  जायचं आहे असं सांगितल्यावर एका थाई आजींनी माझ्या पाठीवर हात फिरवून, मला उलट्या दिशेला वळायला लावून बरोबर रस्ता दाखवला. दहा मिनिटं चालल्यावर मला ग्रॅन्ड पॅलेसचं पहिलं दर्शन झालं. 

सुरक्षा अधिका-यांनी तपासणी करून आत सोडलं. प्रवेश करताना दिसलेली दृश्यं 



मग एका ठिकाणी ५०० Baht  प्रवेशशुल्क दिलं आणि पुढं सरकले. 

हा राजवाडा १७८२ मध्ये बांधला गेला आणि सुमारे १५० वर्ष या जागेतून राज्यकारभार झाला. तिथं खरं तर टूर गाईडचीही सशुल्क सोय आहे. पण इंग्रजी गाईडसाठी मला दोनेक तास थांबावं लागलं असतं. म्हणून मग मी एकटीच भटकले. अशा ऐतिहासिक ठिकाणी काहीही माहिती नसताना भटकणं निरर्थक असतं हे पुन्हा एकदा लक्षात आलं. गौतम बुद्धाचं जीवन आणि तत्त्वज्ञान याविषयी थोडी माहिती आहे. पण बौद्ध धर्मातल्या लोककथांचा अभ्यास नसताना काहीही समजणं शक्य नव्हतं. मी फक्त अचंबित होऊन गोष्टी पहात राहिले. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधान काही होत नव्हतं.

इथली काही प्रकाशचित्रं. 











कंबोडियातल्या अंकोरवटया प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती इथं आहे.


ज्या अनामिक कलाकारांनी हे निर्माण केलं असेल, त्यांचं कौतुक करायला माझ्याकडं शब्द नाहीत. पण त्याचबरोबर सर्वसंगपरित्याग करणा-या गौतम बुद्धाला इथं इतकं सोन्याने झळाळून टाकलंय की काही विचारायची सोय नाही.  

बाहेर पडल्यावर मागे वळून पाहताना दिसलेलं हे दृश्य. 

            

मी प्रवेश केला होता तो मुख्य प्रवेशद्वारातून, पण बाहेर पडले ते दुस-याच प्रवेशद्वारातून. मग रस्ता चुकून अर्धा एक तास भटकत राहिले. इंग्रजी बोलणारा एक टुकटुक चालक भेटला आणि मग मी पोचले ती वट फो मध्ये. इथं आराम करणा-या, कुशीवर पहुडलेल्या बुद्धाची भव्य मूर्ती आहे. भव्य म्हणजे किती भव्य४६ मीटर लांबीची, सोन्याच्या मुलाम्याने झळकणारी बुद्धमूर्ती अतिशय देखणी आहे. प्रसन्न वाटलं ती पाहताना. 



बुद्धाचे कुरळे केस पाठीमागून असे दिसतात.



आपण मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालतो, त्याच पद्धतीने इथं लोक बुद्धमूर्तीला प्रदक्षिणा घालत होते. भिंतीलगत हारीने मांडलेली पात्रं होती.

काही लोक या प्रत्येक पात्रात नाणं टाकत होते. त्यामागेही काही श्रद्धा असतील, पण मला माहिती नाहीत.

या मंदिराच्या परिसरातली अन्य प्रकाशचित्रं.





या देशात पाहण्याजोगं इतकं काही आहे, की कदाचित एक महिनाही अपुरा ठरेल. मी फारशा गोष्टी पाहिल्या नाहीत, मोजून चार ठिकाणं पाहिली. पण त्यातून थाईलँडच्या समृद्ध इतिहासाची झलक दिसली. (शोषितांच्या इतिहासाची झलक कधीच राजरोसपणे समोर येत नाही, ती मुद्दाम शोधावी लागते - पण असो. हे विषयांतर झालं.)

आता मुख्य म्हणजे थाईलँंडबद्दल भरपूर वाचलं पाहिजे. कदाचित अशीच अचानक पुन्हा संधी मिळाली इकडं यायची, तर त्यावेळी थाईलँड समजून घेण्यासाठी मी अधिक लायक असेन याची मी तयारी करत राहिलं पाहिेजे अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे.

समाप्त