ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, November 23, 2010

५४. नवा निश्चय!

कोणे एके काळी आपण हाताने - म्हणजे अर्थातच पेन/ पेन्सिल आणि कागद - यांच्या साहाय्याने लिहित होतो हे जणू मी आता विसरुनच गेले आहे. भूर्जपत्रावर लिहिण्याच्या कलेइतकीच हाताने लिहिण्याची कला प्राचीन वाटू लागली आहे मला ..... हे चांगल की वाईट असा प्रश्नही मला पडत नाही.

खर तर संगणकाची आणि माझी ओळख तशी फार जुनी नाही. तसा कॉलेजमध्ये शिकत असताना 'संगणक' हा एक विषय होता आम्हाला. तेव्हा काही प्रोग्रामसुदधा लिहिले होते मी. आम्ही कागदावर लिहून तो कागद विद्यापीठात नेउन द्यायचो. तिथे एका मोठया खोलीत संगणक असायचा. विद्यापीठातल्या फक्त वरिष्ठ प्राध्यापकांना (आणि शिपायांना) त्या खोलीत जायची परवानगी होती. थोडं आत जायचं डेस्कपर्यंत तरी देवळात गेल्यासारख चपला बाहेर काढून जाव लागायच! एक गूढ़ वातावरण होत त्या संगणकाच्या भोवती! पण संगणकापेक्षा इतर गोष्टीतला रस वाढला आणि संगणक मागे पडला

मग काही वर्षांनी ओळखीच्या काही लोकांच्या घरी संगणक आला. तो कोणाकडून तरी - बहुतेक वेळा त्यांच्या मुला -मुलीकडून उघडून घ्यायचा आणि एखादा 'गेम' खेळायाचा इतकेही मला पुरेसे आव्हानात्मक वाटायचे - ते माझ्यासाठी तसे असायाचेही.

२००० मध्ये मी माझा इ-मेल अकाउंट उघडला. माझ्या एका मैत्रीणीच्या विद्यार्थ्याने पदवी मिळाल्यावर 'सायबर कॅफे ' उघडला होता. तिथे एकदा मैत्रीणीचे काम होते. ते होईपर्यंत नुसतीच बसून होते मी. तो विद्यार्थी म्हणाला, ' मैडम, तुम्हाला चेक करायची असेल मेल तर करा तोवर.' माझे इ-मेल अकाउंट नाही असे मी त्याला सांगितल्यावर त्याने मान डोलावली. त्याचा अर्थ काय होता कोणास ठाऊक! त्याने तत्परतेने मला अकाउंट उघडून दिले.

अकाउंट उघडल खर, पण मेल कोणाला पाठवायची? त्यावर तो बिचारा म्हणाला, "मला पाठवा." पहिली मेल मी माझ्या समोर बसून मला इन्टरनेटची शिकवणी देणाऱ्या मुलाला /माणसाला पाठवली. पुढे दोन तीन महिने नियमितपणे त्याच्याकडे जाउन मी इन्टरनेट शिकले! त्याला मजा यायची 'टीचर' च्या मैत्रीणीला शिकवताना!

पुढे २००० मध्ये मी एका सामाजिक संस्थेत नोकरी करायला लागले. संस्थेच कार्यालय भल मोठ असल तरी पाहिले काही महिने मला ना बसायला जागा होती ना संगणक होता! कोणी सहकारी कामानिमित्त प्रवासाला जाणार अस कळल, की मला आनंद व्हायचा. त्यांच्या जागेवर मला ते परत येइपर्यंत बसता यायचा आणि त्यांचा संगणक वापरता यायचा. संगणक वापरायची भीती वाटायची. काही बिघडले तर, असे सतत वाटत राहायचे. तेव्हा मला Microsoft ऑफिस वगैरे काही माहिती नव्हते.Word Document कसे लिहायचे, कसे save करायचे हा सगळा अनुभव माझ्यासाठी मजेदार होता. मग मी एक्स्सल शिकले, पॉवर पॉइंट शिकले. Laptop वर मीटिंग्सचा धावता अहवाल करण्यात मी वाकबगार झाले.

बघता बघता संगणक मला चांगला वापरता यायला लागला. मी इतरांना मदतही करायला लागले. मग सुरु झाले 'मेल' पर्व. मेल चेक करणे ही आवश्यक बाब न राहता ते जणू एक व्यसन झाले. कामाच्या दोन चार मेल रोज असायाच्याच. उरलेल्या काही आणीबाणीच्या मेल नसतात; आठ दिवस काय महिनाभर उत्तर नाही दिले तरी चालेल हे माहिती असायचे. तरीही संगणक दिसला कोठेही की 'इन्टरनेट कनेक्शन आहे का?' असे हमखास विचारले जायचे आणि मेल चेक केली जायची. ते एक प्रतिष्ठेचेही लक्षण होते असे आता मागे वळून पाहताना जाणवते.

माझे एक चांगले आहे. कोणतीही नवी गोष्ट मी अतिशय उत्साहाने करते - त्यात जीव ओतून करते, त्याच्या आरपार जाते. त्यात कितीही कष्ट पडले तरी मला त्याची तमा नसते. स्वत:ला झोकून देण्यात मला मजा वाटते. भान विसरुन मी नव्या नव्या गोष्टी करत राहते.

पण माझे एक वाईट आहे. कोणत्याही गोष्टीचा एकदा अंदाज आला की मला त्याचा कंटाळा येतो. मग मी नवे काहीतरी शोधते. त्याचा कंटाळा आला की आणखी नवे काही शोधते. काय शोधायचे आहे मला नेमके हे मी त्या नादात विसरूनही जाते.

इ-मेल च्या व्यसनाच्या नादात मधल्या काळात घरात संगणक आला होता. त्यामुले ऑफिस आणि घर यांच्यातल्या सीमारेषा पुसट होत गेल्या. रात्री एक वाजता एखाद्या Workshop चा रिपोर्ट पूर्ण करण ही माझ्यासाठी नित्याची बाब झाली.

कधीतरी असाच ब्लॉग विश्वाशी संबंध आला. मी उत्साहाने ब्लॉग सुरु केला. माझ्या ओळखीतल तेव्हा कोणीही ब्लॉग वाचतही नव्हत .. ब्लॉग लिहिण्याची तर गोष्ट लांबच! त्यामुळे मला एक नवे आव्हान मिळाले. त्यात अनेक चुका मी केल्या ... त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया आनंददायी राहिली. थोडा एकटेपणा वाटायचा ... कारण ब्लॉग या विषयावर बोलायला कोणीच नव्हत माझ्याभोवती. त्यातला आनंद, त्यातला ताण, त्यातले समाधान, त्यातले यश, त्यातली फजिती ... एकटीने उपभोगताना मजा आली. आधी माझा ब्लॉग फक्त आमंत्रितासाठी होता नियमित लिहिणे जमते आहे याचा अंदाज आल्यावर मी तो सर्वांसाठी खुला केला.

मग मी एका ब्लॉग नेटवर्कमध्ये सामील झाले. कोणतीही अडचण आली, की नेटवर्कवर प्रश्न टाकायचा. त्यातले अनुभवी लोक उत्तर द्यायचे. त्यातून खूप शिकायला तर मिळालेच आणि अनेक ओळखीही झाल्या. इ-मैत्री ही एक नवी गोष्ट माझ्या आयुष्यात आली  आणि तिचा पुरेपूर आनंद मी घेतला -- सध्याही घेते आहे.

माझा पहिला ब्लॉग इंग्रजी भाषेत होता. तो व्यवस्थित चालायला लागल्यावर मी मराठी ब्लॉग सुरु केला. मराठी टाइपिंग हे आव्हान मोठे होते - कारण त्यात फॉण्टनुसार की बोर्ड बदलायचा. मग बरहा, ओपन ऑफिस यांचा आधार घेत घेत लिहित राहिले. या अडचणींमुळे मराठी ब्लॉग लिहिण्यात नियमितपणा नव्हता, प्रयत्नपूर्वक लिहावे लागायचे.

दोन ब्लॉग , वाढते काम यामुळे घरातला संगणक अव्याहत चालू राहू लागला. कोणताही ब्लॉगर जातो त्या हिट्स, कमेंट्स या चक्रातून मी गेले, त्यातून बाहेरही पडले.

या काळात हाताने लिहिण्याची कला मी जवळ जवळ विसरून गेले आहे म्हणा ना! आता दिल्लीत मी येताना Laptop घ्यायचा नाही विकत सध्या तरी- अस ठरवल! संगणकाच्या व्यसनातून बाहेर पडायची वेळ झालेली आहे असे माझे मला जाणवले. इथे मी एक सोडून तीन ऑफिसमध्ये जाते - प्रत्येक ठिकाणी रजेवर असलेल्या कोणीतरी सहकारी असतोच - मग त्या जागेवर बसते, तिथला संगणक वापरते – माझ्या लिहिण्यावर अनेक भौतिक मर्यादा येत आहेत हे सतत जाणवते.

पण एका दृष्टीने हेही बरेच आहे. संगणकावर थेट लिहिण्याचे अनेक फायदे आहेत - पण तोटेही अनेक आहेत. मुख्य म्हणजे संगणकावर undo ची सोय आहे - जी प्रत्यक्ष आयुष्यात नसते. ती आहे असा एक भ्रम संगणकाच्या अति वापरामुळे निर्माण होतो - निदान माझ्या बाबतीत तरी तसे झाले. लेखन पाहिजे तसे कट, पेस्ट करता येते त्यामुले विचार विस्कळीत राहतात - काहीतरी कसेतरी करायचे आणि मग शेवटी करू एडिट असे वाटत राहते. delete ची तर फार मोठी सोय आहे! त्यामुळे लिहिताना विचारात जी स्पष्टता आवश्यक असते तिचा अभाव माझा मलाच जास्त जाणवायला लागला आहे. हाताने लिहिताना जे खरोखर सांगणे गरजेचे आहे तितकेच लिहिले जाते - संगणकावर अवास्तव लिहिले जाते. आणि अति लिहिले की त्यात गुणवत्ता राहण्याची शक्यता कमीच!

कामासाठी संगणक वापरावा लागणार - आणि तो मला आवडतोही वापरायला. पण जे व्यक्तिगत आनंदासाठी लिहायचे ते आधी हाताने लिहायचे असे मी ठरवते आहे. त्यातून लिहिण्याची गती स्वाभाविकच कमी होइल, पण त्याने बिघडणार काहीच नाही.

कदाचित एकदा हा अनुभव पुरेसा घेउन झाला की मी परत भारंभार लिहायला लागेन. माझी गाडी परत मूळ पदावर येईल..


मी हे तुम्हाला इतकं सविस्तर का सांगते आहे? कारण ही पोस्टही मी थेट संगणकावर लिहिते आहे! :-)

नव्या निश्चयाची सुरुवात अजून बाकी आहे. :-)

Thursday, November 18, 2010

५३. निमित्तमात्र दिल्ली भाग: २

आपण अनेक घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये, शहरांमध्ये, माणसांच्या आयुष्यांमध्ये निमित्तमात्र असतो. पण तशाच अनेक घटना, प्रसंग, माणसे, शहरे आपल्याही आयुष्यात निमित्तमात्रच असतात. माझ्या जगण्यातल्या निमित्तमात्र दिल्लीची ही झलक.....

भाग १ वाचायचा आहे? इथे आहे.

एखाद्या शहराची, गावाची आपली ओळख असते – म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न मला दिल्लीची ओळख होताना वारंवार पडला.

एक तर त्या ठिकाणी काही माणसं – पन्नास, शंभर, दोनशे अशी मर्यादितच – आपल्या ओळखीची असतात. या ओळखीचेही अनेक उपप्रकार असतात. नुसत्या चेह-याची ओळख – रोज रस्त्यावर दिसणारे सफाई कामगार, रिक्षावाले, बसमधले सहप्रवासी वगैरे. काही ओळखी रोजच्या कामानिमित्त होतात आणि त्यामुळे संभाषण नियमित घडत असले तरी त्यात औपचारिकता जास्त असते – जसे आपल्या कार्यातले सहकारी, भाजीवाले, इस्त्रीवाले वगैरे. तिसरे म्हणजे ज्यांच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलतो असे लोक. हे अर्थातच आपण राहतो त्या गावाबाहेरही असतात.

शहराच्या ओळखीचा दुसरा भाग म्हणजे त्या शहरातल्या वेगवेगळया जागा आपल्याला माहिती असतात. एका जागेपासून दुस-या जागेपर्यंत मार्गदर्शकाच्या मदतीविना आपण जायला लागलो, की शहर आपल्या ओळखीच झालं असं म्हणता येतं. कोणत्या प्रकारच्या खरेदीसाठी, करमणुकीसाठी, खाण्यासाठी नेमकं कुठं जायच हे आपल्याला माहिती होणं म्हणजे या ओळखीची परिसीमा!

तिसर म्हणजे कोणत्या परिस्थितीत या शहरातली माणसे कशी वागतील याचा ढोबळमानाने अंदाज बांधता येणं! म्हणजे दंगल, नैसर्गिक आपत्ती अशा वेळीच नाही, तर रोजच्या रस्त्यावरच्या गर्दीत, वाहतुकीचे नियम पाळण्याच्या बाबतीत, साध्या गप्पांच्या बाबतीत. आपणही त्या सामूहिक मानसिकतेचा भाग बनणं म्हणजे त्या शहराने आणि आपण एकमेकांना सामावून घेतल्याची खूण असते.

ही प्रक्रिया बराच काळ चालते. त्याला काही विशिष्ट क्रम असतो असं नाही. अनेक गोष्टी एकाच वेळी घडत राहतात.

दिल्लीत महिनाभरात माझ्या पंचवीस तीस ओळखी झाल्या असतील. पण ओळख वाढण्याची अजिबात शक्यता नसलेली काही माणसं चांगलीच लक्षात राहिली. बंगला साहिब गुरूद्वाराच्या परिसरातून अशोक मार्गावर जाताना एका सफाई कामगाराने मला रस्ता दाखवला. मग पुढचे पाच दिवस रोज सकाळी एकमेकांकडे पाहून हसता हसता आम्ही काही वाक्ये एकमेकांशी बोलायला लागलो. नंतर माझ राहण्याचं ठिकाण बदललं आणि आमच बोलणं थांबल. आमची ओळख झाली होती – ती टिकली नाही, वाढली नाही – ही दुर्देवाची गोष्ट आहे. आता त्या ठिकाणी सकाळी जायला मला वेळ नाही आणि संध्याकाळी कदाचित आमची भेट होणार नाही. एखाद्या सुट्टीच्या दिवशी सकाळी तेथे जाऊन मी ही ओळख टिकवण्याचा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही.

चाणक्यपुरीतून सफदरजंग एन्क्लेवला संध्याकाळी सरदारजींच्या टॅक्सीतून गेले. मला टॅक्सी, रिक्षा चालकांशी गप्पा मारायला आवडतात, एक वेगळा दृष्टिकोन मिळतो त्यातून. वाटेत भरपूर ’जाम’ असल्यामुळे आम्ही बराच वेळ एकमेकांशी बोललो. रस्त्यांवरची वाहनांची गर्दी, महागाई असे विषय बोलता बोलता अचानक आमच बोलणं ’धर्म’ या विषयाकडे वळ्लं. ’अयोध्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं?” अस सरदारजींनी मला अचानकच विचारलं. मग आम्ही त्या विषयावर सविस्तर बोललो. फाळणीचे दु:ख अजून किती लोकांच्या मनात जागं आहे, १९८३ च्या शीख हत्यांची जखम अजून कशी ठसठसते आहे ….. याच एक दर्शन मला या संभाषणातून झाल. माझी आणि या सरदारजींचीही ओळख झाली. चाणक्यपुरी परिसरातून कधी टॅक्सी करायची वेळ आली तर हे सरदारजी मला पुन्हा भेटण्याची शक्यता आहे, आमची ओळख वाढण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा टॅक्सी स्टॅन्ड मला माहिती आहे.

आणि रोजच्या व्यवहारातली असंख्य माणसं भेटली. काहींशी थोड्याच काळात संवादाचे सूर जुळले काहींच्या बाबतीत अजून एकमेकांचा अंदाज घेण्याची प्रक्रिया चालू आहे.

माणसांप्रमाणेच दिल्लीतल्या जागाही भेटल्या.

मला पाच दिवसांच्या आठवड्याची सवय नाही. आता एकदम शनिवार, रविवार असे दोन दिवस मोकळे मिळायला लागले. मी रहात होते गेस्ट हाऊसमध्ये – त्यामुळे घराच्या साफसफाईचे काम नव्हतं. कोणाच्या घरी भेटायला जाण्याइतपत ओळखी नव्हत्या – आणि जरी मी सारखी कोणाच्या ना कोणाच्या घरी जात असले तरी तसाही तो उत्साह मला कमीच असतो म्हणा. पुण्यातून येताना चार पुस्तकं सोबत आणली होती, ती चार दिवसांतच वाचून झाली. सोबत संगणक नाही त्यामुळे काही काम करण्याचा, लिहिण्याचा प्रश्न नव्हता.

मग मी काही संग्रहालयं पाहिली. राष्ट्रीय संग्रहालय, रेल्वे संग्रहालय, नेहरू तारामंडल (हा शब्द मला तारांगण शब्दापेक्षा आवडला), नेहरू संग्रहालय .. अशा ठिकाणी मी वेळ मिळेल तशी जात राहिले.

खर तर संग्रहालय पाहायला एक विशिष्ट प्रकारची मानसिकता लागते – जी माझ्याकडे अजिबातच नाही. म्हणजे माहितीचा भडिमार मला झेपत नाही. एखादी गोष्ट आवडली तरी ती खूप उपभोगणे मला जमत नाही. आनंद, सुख, आश्चर्य, समाधान यात थोडे आणि जास्त असा संख्यात्मक फरक नसतो, जास्त उपभोगामुळे जास्त आनंद मिळतो असे नाही; किंबहुना उलटेच घडते (Law of Diminishing Returns) हे मला अनुभवाने माहिती आहे. त्यामुळे काही आठवड्यांत सिंधु संस्कृतीच्या अवशेषांपासून आधुनिक काळापर्यंतचा प्रवास माझ्या क्षमतेच्या पल्याड होता. मी माझ्या गतीने, माझ्या आवडीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे समोर आलेल्यातल्या निवडक गोष्टी पाहिल्या. आजवर कोणतेच संग्रहालय मी पूर्णपणे पाहिलेले नाही, आणि कदाचित कधी पाहणारही नाही.

राष्ट्रीय संग्रहालयातल्या मूर्ती पाहताना प्रादेशिक इतिहास वेगळा आहे हे दिसते. म्हणजे सूर्याची म्रूर्ती राजस्थानमधली, कार्तिकेयाची तामिळनाडूमधली, यमुनेची मध्य प्रदेशातली वगैरे – जरी राज्यांची ही नावं अलिकडची असली तरी त्यांची वैशिष्ट्य मात्र जुनी दिसताहेत. समाज आज जसा आणि जितका विविधांगी आहे, तितकाच तो पूर्वीही असणार. पण मग तेव्हा कोणत्या प्रेरणेने हा समाज जोडला गेला असेल? ’आपले पूर्वज आपल्यापेक्षा (आजच्यापेक्षा) जास्त उदारमतवादी होते” असे ढोबळ विधान करण्यात काही अर्थ नाही; कारण समाजाच्या प्रत्येक कालखंडात युध्द होते, हिंसा होती, क्रूरता होती, धर्मांधता होती, विषमता होती. पण तरीही एक जोडणारा धागा निर्माण झाला, टिकला, रूजला असे म्हणता येते. त्या प्रक्रियेचे रहस्य आपल्याला कधी उलगडेल का?

संग्रहालयात काळाच्या पडद्याआड गेलेल्या लोकांची खेळणी दिसली; भांडी दिसली; शस्त्रास्त्रे दिसली; मूर्ती दिसल्या; चित्रे दिसली; नाणी दिसली. पुढच्या पिढ्यांना आपली अशी आठवण जपून ठेवावी वाटेल का हा एक प्रश्नच आहे. त्यांना कुतुहल, आश्चर्य, कौतुक वाटावे असे आपण काही मागे ठेवू का? का फक्त विध्वंसाच्याच खुणा राहतील मागे?

नाणी आणि लिपी या दोन्हीत मला जास्त रस असल्याने मी तो विभाग जरा आवर्जून पाहिला. कदाचित आता पुढची एक भेट त्याच्यासाठीचीच असेल. त्या विषयावरचे काही वाचून मग तेथे जावे असा विचार आहे. बघू कसे जमतेय ते.

रेल्वे संग्रहालयातला प्रदर्शन विभाग दुरूस्तीसाठी बंद होता म्हणून निराशा पदरी पडली. पण तिथेही साठ सत्तर इंजिने पाहताना मजा आली. ती कदाचित चालताना पाहणे जास्त आनंददायक झाले असते. तिथले सगळ्यात मजेदार दृश्य होते ते म्हणजे छोट्या रेल्वेतून प्रवास करणारे असंख्य बालप्रवासी. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. मजा आली मला ते पाहताना. काही दिवसांनी हीच मुले मुली ’यात काय विशेष?’ अशा ठराविक तरूणाईच्या प्रतिक्रियेपर्यंत पोचतील – तेव्हा त्यांना हे आजचे कुतुहल आणि आनंद कदचित आठवणारही नाही. तेही ठीकच म्हणा. मला तरी माझ्या लहानपणचे काय आठवते? तसे काही कोणाला आठवायला लागले की ’ते म्हातारपणाचे लक्षण आहे’ असे म्हणून मी आजही मोकळी होतेच की!

तीन मूर्ती परिसरात भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. या संग्रहालयात नेहरूंची तीन भाषणे ऐकण्याची आता सोय आहे. १५ ऑगस्ट १९४७ चे ’Tryst with Destiny’, गांधीहत्त्येच्या प्रसंगीचे ‘The Light has gone out of our lives…’ आणि “New thinking for the new world” हे Science and Technology बाबतचे त्यांचे विचार त्यांच्या आवाजात ऐकताना एकदम इतिहासाशी नाते जुळल्यासारखे वाटले.

या संग्रहालयात जरी केंद्रस्थानी जवाहरलाल नेहरू असले तरी त्या काळाचे अनेक पैलू तेथे आहेत तो सगळा इतिहास पाहताना अस्वस्थ वाटलं! या माणसांनी जी काही स्वप्नं पाहिली होती स्वतंत्र भारताची, ती पूर्ण झाली आहेत का – या प्रश्नाचे उत्तर उघड आहे. बदलत्या काळाचा आवाका कोणालाच येत नाही का? काळ संथ चालला आहे अस वाटत असलं तरी तो गतिमान असतो - असं संग्रहालय पाहताना नक्कीच जाणवत.

नव्या शहराची ओळख करून घेताना आणखीही एक घडत असतं. या नव्या शहराला आपण कसे सामोरे जातो – किती पूर्वग्रह, उत्साह, निरागसता, आत्मविश्वास, सहजता, भय, मौज… घेऊन आपण या नव्या परिस्थितीला सामोरे जातो - यातून आपली आपल्याला नव्याने ओळख होण्याची एक मजेदार प्रक्रियाही घडत असते! म्हणजे उदाहरणार्थ सर्व संग्रहालयांत हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती दिलेली असताना मी इंग्रजी भाषेतली माहिती वाचत होते. देवनागरीमुळे हिंदीबाबत जास्त आपुलकी असायला हवी खर तर – पण!! ते लक्षात आल्यावर मी हिंदीतली माहिती वाचायला सुरूवात केली. एखादा शब्द समजला नाही तर इंग्रजीतल्या माहितीफलकाच्या मदतीवरून मी पुढे जात राहिले.

काही खूप जुनी माणसं भेटली – अगदी कॅनडापासून कन्याकुमारीपर्यंतची. दिल्लीत आता कोणी येते तेव्हा मला भेटण्याचा त्यांचा एक अजेंडा असतो याचीही गंमत वाटते. मग गप्पा होतात. फोन येतात, केले जातात. मेल लिहिल्या वाचल्या जातात.
पुन्हा पुन्हा दिल्लीबद्दल बोलले जाते. दिल्लीबाबत लिहिले जाते.

पण माझ्या सवयीप्रमाणे त्यात मीही असतेच. किंबहुना ’मी’ जास्त असते आणि दिल्ली कमी असते.

हेही बदलते की तसेच राहते, ते पाहायला मला आवडेल.

Thursday, November 11, 2010

५२. तुळशीची माळ

एखादी गोष्ट आपण सहज म्हणून, अगदी निर्हेतुकपणे करायला जावी आणि त्यातून लोकांना मात्र चर्चेला खुसखुषीत विषय मिळावा, असं तुमच्याबाबतीत कधी झालय? मला वारंवार हा अनुभव आला आहे.

’तुळशीची माळ’ हा असाच एक विषय!

खरं तर तो एक साधा प्रसंग होता.

उत्तर प्रदेशात भटकायला गेले होते. एक मुक्काम अलाहाबादला (प्रयागला) आशाकडे होता. आशा दोन तीन वर्षांपासून तिथे राहत होती. ती एका संघटनेचे पूर्ण वेळ काम करत होती. त्यामुळे बघताबघता चार आठ दिवसांत माझ्याही तिकडे भरपूर ओळखी झाल्या. आशा कामात असली की तिच्या संघटनेचे कोणी ना कोणी कार्यकर्ते मंडळी मला वेळ देत – माझ्याशी गप्पा मारणे; मला आग्रहाने घरी नेऊन खायला घालणे, मला फिरायला नेणे असले उद्योग ते आस्थेने करत.

कल्पना त्यांच्यापैकी एक. नुकतीच नोकरीला लागलेली. जराशी लाजरी बुजरी. आशाने तिला माझ्याबद्दल नेमके काय सांगितले होते, कोण जाणे! पण पहिल्या क्षणापासून ती अत्यंत भक्तिभावाने माझ्याशी वागत होती. एक दिवस कल्पना मला जवळचे राम मंदिर पाहायला घेऊन गेली. तसे मला लोक अनोळखी असतात तोवर त्यांच्याशी गप्पा मारायला आवडते. ओळखीच्या लोकांशी आपण तेच तेच आणि मुखवटे सांभाळत बोलतो असे माझे उगाचच मत आहे! याच न्यायाने कल्पनाची आणि माझी फारशी ओळख नसल्याने मी तिच्याशी मनमोकळया गप्पा मारत होते. तीही मनापासून बोलत होती.

देवदर्शन करून बाहेर आलो. पत्येक मंदिराभोवती असतो, तसा इथेही बाहेर बाजार भरला होता. एकाएकी कल्पना मला म्हणाली, “दीदी, मला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे. काय हवे ते फक्त सांगा.” मी एकदम चमकून तिच्याकडे पाहिलं. तिला पुष्कळ सबबी सांगितल्या. देण्याघेण्याबद्दलचे माझे तिरकस तत्त्वज्ञानही मी तिला ऐकवले. पण ती तिच्या निश्चयावर ठाम होती. शिवाय हे उत्तरेतले लोक इतक्या अदबीने बोलतात, की आपले साधे बोलणे त्यांच्यासमोर रासवट आणि जंगली वाटायला लागते.

मी कल्पनापुढे हार पत्करली. समोरच्या दुकानाकडे नजर टाकली तेव्हा सर्वात आधी मला दिसली ती तुळशीची माळ! मागचा पुढचा विचार न करता मी म्हटले, “ कल्पना, मला ही तुळशीची माळ हवी आहे.” त्या माळेची किंमत फक्त दोन रुपये होती, त्यामुळे कल्पना अतिशय निराश झाली. पण तिने मला वस्तू निवडीची संधी आपण होऊन बहाल केली होती. त्यामुळे तिला जास्त काही बोलता आले नाही, गप्प बसावे लागले. घेणे थोडक्यात निभावले म्हणून मी खुषीत होते.

पण या तुळशीच्या माळेवरून लगेच वेगवेगळया प्रतिक्रिया आल्या. आशा म्हणाली, “तू अगदी खडूस आहेस. ती पोरगी एवढं प्रेमान म्हणत होती, तर घ्यायचसं काहीतरी छान. दुस-याचा अपमान करण्यात तुला काय गंमत वाटते?”

रंजन म्हणाला, “दीदी, पैसे कल्पना देणार होती ना? मग तू कशाला कंजूषपणा केलास? सारखे कसले पैसे वाचवतेस?”

तुळशीच्या माळेपेक्षा रूद्राक्षांची माळ कशी शक्तिशाली असते, हे ऐकवत अवस्थी काकांनी एक रूद्राक्षाची माळ माझ्या गळ्यात घातली. ’तुम्ही आध्यात्मिक आहात (!!) हे आम्हाला माहिती नव्हत हो आजवर" असं म्हणत एकीने तांब्याची अंगठी, एकाने गोरखपूर प्रेसची छोटी गीता दिली. आणखी एकाने आधी माझ्यासाठी प्रेमचंदांचे एक पुस्तक आणले होते, पण ते बदलून त्याने विवेकानंदांचे पुस्तक आणले ते केवळ तुळशीच्या माळेमुळे!

महाराष्ट्रात परत आल्यावर तर आणखी गमतीजमती झाल्या. काहींना वाटले, मी कोणत्यातरी मठाची दीक्षा घेऊन आले. एका जेमतेम ओळखीच्या माणसाने "अरे वा! म्हणजे मांसाहार सोडलात वाटतं आता" असे चारचौघात म्हटल्यावर मी भडकलेच त्याच्यावर - “तुम्हाला काय करायच्यात नुसत्या चौकशा" म्हणून. त्याने चाचरत तुळशीच्या माळेकडे बोट दाखवल्यावर मला मुकाट बसावे लागले. एस. टी. च्या प्रवासात माझ्या शेजारचा शेतकरी माझ्याशी एकदम ’पंढरीच्या वारी’बद्दल का बोलतो आहे हे समजायला मला वेळ लागला. ’माळकरी वारकरी असतात अशी माझ्या ज्ञानात त्यादिवशी भर पडली. माझा एक आयुर्वेदिक डॉक्टर मित्र तुळशीचे औषधी महत्त्व मला पटल्याचे पाहून भलताच खूष झाला.

रोज तुळशीच्या माळेवरून काही ना काही घडायला लागले. अखेर मी ती माळ अश्विनीच्या बाहुलीला देऊन टाकली. माझ्या गळयातली तुळशीची माळ का नाहीशी झाली असावी याबाबत अनेक तर्क वितर्क होत राहिले.

नुकतीच आळंदीला गेले होते. सुमनमावशींच्य सोबत गेले होते. त्या म्हणाल्या, “मला तुला तुळशीची माळ द्यावी वाटतेय. घालशील का पण तू ती?” मला जुन्या गोष्टी आठवल्या. मी घाईघाईने नकार देत त्यांच्याकडून चॉकलेटचा मोठ पॅक घेतला.

आता सुमनमावशींच्या वर्तुळात मी तुळशीची माळ घालायला नकार दिला यावर चर्चा होते. शिवाय स्वदेशी विदेशी वाद पण मी घेतलेल्या चॉकलेटमुळे. ’निदान सुमनमावशींचा मान तरी राखायचा’ असं काहीजण म्हणाले. ’हे काय लहान मुलांसारख वागणं चॉकलेट खायचं काय वय राहिलय का आता?” असं आणखी काही म्हणाले.

तुळशीच्या माळेच्या मोहाचा अनेक वर्षांपूर्वीचा तो एक क्षण! त्यात इतके प्रसंग, इतक्या प्रतिक्रिया निर्माण करण्याची सुप्त शक्ती..

अनाकलनीय आहे सगळं, नाही का?

Thursday, November 4, 2010

५१. आवड

उन्हात भटकून मुक्ताला प्रचंड वैताग आला होता. काहीतरी थंड पिण्याची गरज निर्माण झाली होती. नीरा विक्रीच्या एका स्टॉलसमोर गाडी थांबवत ती म्हणाली, “ महेशनं सांगितलय तुला नीरा खूप आवडते म्हणून.”

मला हसू आलं. खरचं, आपल्याबाबतच्या कित्येक गोष्टी आपल्यालाच माहिती नसतात. ध्यानीमनी नसताना आपण आपल्याला असे अचानक सापडलो की गंमत वाटते.

“तुमचं आवडत पेय कोणतं?” हा प्रश्न पहिल्यांदा मी एका व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ऐकला. ते सदगृहस्थ आम्हाला ’जो हॅरी’ खिडकी समजावून सांगत होते. मी जाणते - इतर जाणतात; मी जाणत नाही - इतर जाणतात; मी जाणते - इतर जाणत नाहीत ; आणि मी जाणत नाही - इतरही जाणत नाहीत – अशी ही चौपदरी खिडकी. तिचे स्पष्टीकरण देता देता अचानक त्यांनी हा प्रश्न विचारला होता.

मी जरा भांबावून गेले. चहा, कॉफी, दूध, सरबत आणि कैरीचे पन्हे या पाचांपलिकडे माझे विश्व तेव्हा गेलेले नव्हते (अजूनही माझे विश्व मर्यादितच आहे!). शिवाय हे शिबीर पावसाळी वातावरणात चालू होते. त्यामुळे त्यावेळी सरबत आणि पन्हे मला आठवलेच नाही.

आमचा एक मित्र जगाची विभागणी दोन गटांत करतो - चहाप्रेमी ते ’चहाबाज’ आणि ज्यांना चहा आवडत नाही ते ’चहाटळ’. मुळात मी चहाबाज नव्हते. आपद्धर्म म्हणून मी घेतलेल्या चहाची चव इतक्या वेगवेगळ्या प्रकारची होती, की चहाचा माझा संबंध आपद्धर्मापुरताच राहिला. स्वत:ला फार ’शहाणे’ समजणारे लोक कोफी घेतात असा माझ्या आणखी एका मित्राचा लाडका सिद्धान्त होता. त्यामुळे कॉफी आवडते असे आम्ही कोणी म्हणत नसू. एकदा वाटले की ’काहीच आवडत नाही’ असे सोपे उत्तर देवून मोकळे व्हावे. पण म्हटले ’आपण जाणत नसलो तरी इतर जाणत असतील’. मग मैत्रिणीचा सल्ला घेऊन ’माझे आवडते पेय – दूध’ असे मी लिहून टाकले.

मग पुढे आणखी वेगवेगळया पेयांचा जमाना आला. फळांचे रस, मिल्क शेक, लस्सी, पेप्सी, कोक, पीयूष, रसना, कोकम वगैरे वगैरे. ज्या पेयाची लाट असेल, त्याचा लोक मला आग्रह करायचे आणि ते मी प्यायचे. शिवाय चहात साखरेऐवजी मीठ घालण्यासारखे आचरट प्रयोगही आम्ही करायचो. या सगळया पेयांच्या हल्ल्यात मला माझे आवडते पेय कधी सापडलेच नाही. त्यातल्या त्यात मला एनर्जी आणि मॅंगोला चालून जायचे. पण आवडते पेय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही याची मी स्वत:शी खूणगाठ बांधली.

मग मला काय आवडते याबद्दल मला वेगवेगळी माहिती मिळायला लागली. कोणाच्या मते मला चहा आवडतो, तर कोणाच्या मते कोक! मी आपली समोरच्या माणसाची आवड पाहून त्यानुसार माझी आवड बदलू लागले.

अशी बरीच वर्षे गेली. दरम्यान लातूर भूकंपानंतर मी तेथे एका निवासी शाळेत मदतीसाठी जाऊन राहिले. जुलै ऑगस्टचे दिवस होते ते. खो खोच्या पावसाळी स्पर्धा चालू होत्या. आंतरशालेय स्पर्धांची पहिली फेरी पार पडली होती. जिल्ह्याचा संघ निवडायचा होता. त्याच्या चाचणीसाठी आमच्या शाळेतल्या काही मुलामुलींना घेऊन मी आणि आणखी खेळाचे शिक्षक मुरूडला गेलो होतो.

तिकडे पोचलो तर तूफान पाऊस कोसळत होता. चाचणी सामने घेण्यासारखी मैदानाची परिस्थिती नव्हती. वाटाघाटी करून संघ निवडण्याला पर्याय नव्हता. निवड समितीचा निर्णय होईपर्यंत थांबणे भाग होते. शाळेच्या एका वर्गात आम्ही वाट पाहत बसलो होतो. चारी बाजूंनी पाऊस कोसळत होता. वर्गाच्या दारातून पाण्याचा हौद दिसत होता. चिमुकली पोरं उगाच वेळ घालवण्यासाठी तिथवर येऊन एक घोट पाणी पिऊन जात होती. पाऊस मला आवडतो. त्यामुळे मी छान मजेत निवांत होते. मुलांच्या पाणी पिण्याची मला गंमत वाटत होती.

असा किती वेळ गेला कोणास ठावूक! पण त्या सा-या चित्रमयी चौकटीत बसल्याबसल्या मला साक्षात्कार झाला की, आपले सर्वात आवडते पेय आहे पाणी! त्याची शरीराला गरज असते म्हणून केवळ नाही. पाण्याला जी चव असते त्याची सर कशालाच येत नाही, पाण्यने जशी तहान भागते तशी दुस-या कशानेच भागत नाही.

माझ्या या ’शोधा’ला माझे मित्र मैत्रिणी भरपूर हसले. मी ’जो- हॅरी’ ना मनातल्या मनात म्हटले, बाबांनो, नुसते जाणण्याने काय होते? जगाचा मतलब तर ’आवडण्या’शी असतो. इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत राहणॆ, ते सांगत राहणे - ही स्वत:ला जाणण्यातली एक मोठी आणि अवघड पायरी आहे तर!