ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, November 4, 2010

५१. आवड

उन्हात भटकून मुक्ताला प्रचंड वैताग आला होता. काहीतरी थंड पिण्याची गरज निर्माण झाली होती. नीरा विक्रीच्या एका स्टॉलसमोर गाडी थांबवत ती म्हणाली, “ महेशनं सांगितलय तुला नीरा खूप आवडते म्हणून.”

मला हसू आलं. खरचं, आपल्याबाबतच्या कित्येक गोष्टी आपल्यालाच माहिती नसतात. ध्यानीमनी नसताना आपण आपल्याला असे अचानक सापडलो की गंमत वाटते.

“तुमचं आवडत पेय कोणतं?” हा प्रश्न पहिल्यांदा मी एका व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ऐकला. ते सदगृहस्थ आम्हाला ’जो हॅरी’ खिडकी समजावून सांगत होते. मी जाणते - इतर जाणतात; मी जाणत नाही - इतर जाणतात; मी जाणते - इतर जाणत नाहीत ; आणि मी जाणत नाही - इतरही जाणत नाहीत – अशी ही चौपदरी खिडकी. तिचे स्पष्टीकरण देता देता अचानक त्यांनी हा प्रश्न विचारला होता.

मी जरा भांबावून गेले. चहा, कॉफी, दूध, सरबत आणि कैरीचे पन्हे या पाचांपलिकडे माझे विश्व तेव्हा गेलेले नव्हते (अजूनही माझे विश्व मर्यादितच आहे!). शिवाय हे शिबीर पावसाळी वातावरणात चालू होते. त्यामुळे त्यावेळी सरबत आणि पन्हे मला आठवलेच नाही.

आमचा एक मित्र जगाची विभागणी दोन गटांत करतो - चहाप्रेमी ते ’चहाबाज’ आणि ज्यांना चहा आवडत नाही ते ’चहाटळ’. मुळात मी चहाबाज नव्हते. आपद्धर्म म्हणून मी घेतलेल्या चहाची चव इतक्या वेगवेगळ्या प्रकारची होती, की चहाचा माझा संबंध आपद्धर्मापुरताच राहिला. स्वत:ला फार ’शहाणे’ समजणारे लोक कोफी घेतात असा माझ्या आणखी एका मित्राचा लाडका सिद्धान्त होता. त्यामुळे कॉफी आवडते असे आम्ही कोणी म्हणत नसू. एकदा वाटले की ’काहीच आवडत नाही’ असे सोपे उत्तर देवून मोकळे व्हावे. पण म्हटले ’आपण जाणत नसलो तरी इतर जाणत असतील’. मग मैत्रिणीचा सल्ला घेऊन ’माझे आवडते पेय – दूध’ असे मी लिहून टाकले.

मग पुढे आणखी वेगवेगळया पेयांचा जमाना आला. फळांचे रस, मिल्क शेक, लस्सी, पेप्सी, कोक, पीयूष, रसना, कोकम वगैरे वगैरे. ज्या पेयाची लाट असेल, त्याचा लोक मला आग्रह करायचे आणि ते मी प्यायचे. शिवाय चहात साखरेऐवजी मीठ घालण्यासारखे आचरट प्रयोगही आम्ही करायचो. या सगळया पेयांच्या हल्ल्यात मला माझे आवडते पेय कधी सापडलेच नाही. त्यातल्या त्यात मला एनर्जी आणि मॅंगोला चालून जायचे. पण आवडते पेय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही याची मी स्वत:शी खूणगाठ बांधली.

मग मला काय आवडते याबद्दल मला वेगवेगळी माहिती मिळायला लागली. कोणाच्या मते मला चहा आवडतो, तर कोणाच्या मते कोक! मी आपली समोरच्या माणसाची आवड पाहून त्यानुसार माझी आवड बदलू लागले.

अशी बरीच वर्षे गेली. दरम्यान लातूर भूकंपानंतर मी तेथे एका निवासी शाळेत मदतीसाठी जाऊन राहिले. जुलै ऑगस्टचे दिवस होते ते. खो खोच्या पावसाळी स्पर्धा चालू होत्या. आंतरशालेय स्पर्धांची पहिली फेरी पार पडली होती. जिल्ह्याचा संघ निवडायचा होता. त्याच्या चाचणीसाठी आमच्या शाळेतल्या काही मुलामुलींना घेऊन मी आणि आणखी खेळाचे शिक्षक मुरूडला गेलो होतो.

तिकडे पोचलो तर तूफान पाऊस कोसळत होता. चाचणी सामने घेण्यासारखी मैदानाची परिस्थिती नव्हती. वाटाघाटी करून संघ निवडण्याला पर्याय नव्हता. निवड समितीचा निर्णय होईपर्यंत थांबणे भाग होते. शाळेच्या एका वर्गात आम्ही वाट पाहत बसलो होतो. चारी बाजूंनी पाऊस कोसळत होता. वर्गाच्या दारातून पाण्याचा हौद दिसत होता. चिमुकली पोरं उगाच वेळ घालवण्यासाठी तिथवर येऊन एक घोट पाणी पिऊन जात होती. पाऊस मला आवडतो. त्यामुळे मी छान मजेत निवांत होते. मुलांच्या पाणी पिण्याची मला गंमत वाटत होती.

असा किती वेळ गेला कोणास ठावूक! पण त्या सा-या चित्रमयी चौकटीत बसल्याबसल्या मला साक्षात्कार झाला की, आपले सर्वात आवडते पेय आहे पाणी! त्याची शरीराला गरज असते म्हणून केवळ नाही. पाण्याला जी चव असते त्याची सर कशालाच येत नाही, पाण्यने जशी तहान भागते तशी दुस-या कशानेच भागत नाही.

माझ्या या ’शोधा’ला माझे मित्र मैत्रिणी भरपूर हसले. मी ’जो- हॅरी’ ना मनातल्या मनात म्हटले, बाबांनो, नुसते जाणण्याने काय होते? जगाचा मतलब तर ’आवडण्या’शी असतो. इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत राहणॆ, ते सांगत राहणे - ही स्वत:ला जाणण्यातली एक मोठी आणि अवघड पायरी आहे तर!

13 comments:

 1. >> इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत राहणॆ, ते सांगत राहणे - ही स्वत:ला जाणण्यातली एक मोठी आणि अवघड पायरी आहे

  जब्बरदस्त !! .. मस्तच

  ReplyDelete
 2. मलाही असंच वाटतं की जाणणं आणि आवडणे या भिन्न गोष्टी आहेत.
  जाणून त्यानंतर आवडणे किंवा जाणिवपुर्वक आवडणे यालाच बहूदा अभिरुची असं म्हणत असावेत.
  वाचताना छान वाटलं.

  ReplyDelete
 3. अगदी साध्याशा घटनांवरून तुम्ही जे निष्कर्ष काढता ना, ते अगदी ऑब्व्हिअस असूनही आपल्या कधीच लक्षात न आलेले असे असतात. आणि तुम्ही संपूर्ण विचार करून ते मांडता आणि एकदम वीज चमकावी तसा मला साक्षात्कार होतो.. :)
  बाय द वे, माझी 'निवड' झाली आणि आता तुमची 'आवड' बघून गंमत वाटली!

  ReplyDelete
 4. पाणी खरोखर सगळ्यात उत्तम पेय असतं! तहान लागलेली असताना पाण्याशिवाय कशानेही संपूर्ण समाधान होत नाही हे अगदी खरं आहे! खूप तास काही न खाता फ़क्त पाणी प्यायलं तर पाण्याची खरी चव जिभेवर टिकून राहते... त्यासारखी दुसरी खरंच कुठली चव नाही हे लक्षात येतं!
  "आवडते पेय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही याची मी स्वत:शी खूणगाठ बांधली. मग मला काय आवडते याबद्दल मला वेगवेगळी माहिती मिळायला लागली."
  आवडलं!!!

  ReplyDelete
 5. इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत राहणॆ, ते सांगत राहणे - ही स्वत:ला जाणण्यातली एक मोठी आणि अवघड पायरी आहे तर...When started to read ………….I didn’t expect that I will receive such a precious message ……. Actually I was thinking that my comment will be negative ( kahipan lihile aahe) ………..but no .really it’s incredible

  ReplyDelete
 6. हेरम्ब, नाहीतरी आपल्या ब्लॉगवर आपण दुसर काय करतो?

  ReplyDelete
 7. प्रदीपजी , आभार लेख वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद नोंदवल्याबद्दल.

  हं! अभिरुची शब्दाचा नीट विचार केलेला नाही मी आजवर.

  ReplyDelete
 8. विद्याधर, आपल्या आयुष्यात साध्याच गोष्टी घडतात ... मग त्यावरच विचार सुचतात!!

  ReplyDelete
 9. अनु, तू माझा मराठी ब्लॉग पण वाचायला लागलीस तर!

  ReplyDelete
 10. अश्लेषा, 'काहीतरीच लिहिले आहे' ही प्रतिक्रियाही महत्त्वाची आहे ...

  ReplyDelete
 11. ह्म्म्म... आधी का वावत नव्हते हेही मला माहित नाही! पण मजा येते आहे वाचताना!!

  ReplyDelete
 12. >>>>इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत राहणॆ, ते सांगत राहणे - ही स्वत:ला जाणण्यातली एक मोठी आणि अवघड पायरी आहे.

  सहीच,खरच इथे तुम्ही खुप खोल तत्वज्ञान छोट्या छोट्या गोष्टीतुन छान मांडता.

  ReplyDelete