ती
माझ्यावर एकदम जोरात ओरडली.
आमच्या
संवादाची सुरुवात मोठी विचित्र झाली होती खरी.
कामाच्या निमित्ताने, आमच्या विकास कार्यक्रमांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी
सगळीकडे जात असते नेहमी मी – आज तशी नंदूरबार
भागात आले होते. आम्ही एका शेतात होतो. तिथल्या चांगल्या फळझाड लागवडीबाबत आम्ही बोलत
होतो. आंबा तर चांगला वाढलेला दिसतच होता आणि
सोबत भाजीपालाही दिसत हो्ता चांगला उगवलेला. म्हणून मी त्या शेताचा फोटो काढत होते. त्यावर एक
स्त्री माझ्यावर ओरडली, “मला न सांगता तू माझा
फोटू का घेतलास?” म्हणून.
माझी
आणि त्या स्त्रीची काही ओळख नव्हती; आमची पहिलीच भेट होती ती. ती तिच्या भाषेत म्हणजे
‘मावची’ भाषेत बोलत होती. ही भाषाही इतर अनेक भाषांप्रमाणे मला ‘अंदाजाने' समजते. त्यावेळी माझ्याभोवती आणखी सहा माणसं – सगळे पुरुष
- होती. त्या स्त्रीच ओरडणं ऐकून वातावरणात एकदम तणाव निर्माण झाल्याच मला जाणवलं.
एक पुरुष रागारागाने त्या स्त्रीशी बोलायला लागला. मी त्या सगळ्या पुरुषांना ‘काही
न बोलण्याची’ विनंती केली. त्या स्त्रीची माफी मागत मी तिला सांगितलं ,” अगं, शेत
फार छान दिसतय तुझ, म्हणून मी त्याचा फोटो काढत होते.”
माझ्या
शांत स्वरामुळे की काय पण तिचा राग थोडा निवळला.
ती मराठीत म्हणाली, “तुला काही आमची मावची कळत नसेल.
कळती का?”
“अगदी
थोडी,” मी हसून सांगितलं.
तीही
हसली. म्हणाली, “तुम्ही लोक शाळेत जाऊन शिकता एवढ आणि तरी तुम्हाला काही आमची भाषा
येत नाही. मी कधी शाळेत गेले नाही, पण मला बघ तुझी पण भाषा बोलता येते." तिच्या
या चमकदार प्रतिक्रियेच मला छान हसू आलं. आणि
बरोबरच होतं ती काय म्हणाली ते!
ती
पुढे आली. माझा हात पकडून तिने शेताच्या एका कोप-यात असलेल्या झोपडीकडे मला खेचून नेलं.
त्या झोपडीत बरच सामान होतं. त्याची उलथापालथ करून तिने एक हिरवागार कापडाचा तुकडा
शोधून काढला. तो स्वत:च्या डोक्यावर घेऊन,
त्यातला काही भाग खांद्यावर ओढून ती मला म्हणाली,
“हं , काढ आता माझा फोटो.”
मी
तिच्या हुकुमानुसार तिचा फोटो काढला. डिजीटल कॅमेरा असल्याने मी तिला तिचा फोटो लगेच दाखवू शकले.
“छान
आलाय ना फोटो?” मी तिला विचारलं.
ती
लहान मुलासारखं हसली. म्हणाली, “आता कसा बेश आलाय फोटू. आता तो छाप तू.”
“फोटो
छापायचा? कुठे? “– मी गोंधळले होते.
तिला
आता माझा गोंधळ पाहून मजा वाटत होती बहुतेक. “कुठे म्हणजे काय? छाप पेपरात. मला काय
माहिती? मला कशाला विचारतेस? ”
मला
माझी चूक लक्षात आली. तिचा आधीचा फोटो मी डिलीट करून टाकला तिच्यासमोर.
मी
तिला तिचा फोटो दाखवला आणि त्यापेक्षाही आधीचा
काढून टाकला म्हणून बहुतेक मसरबाई (हे त्या स्त्रीचं नाव) माझ्यावर एकदम खूष झाली आणि
माझ्याशी गप्पा मारायला लागली. साधारण ४०च्या आसपास वय असेल तिचं, तिला एक मुलगा आणि
एक मुलगी होती. त्या दोघांचही लग्न झालेलं
होत. एक दोन एकर जमीनीवर मसरबाई आणि तिचा नवरा राबत होते. मसरबाई कधीच शाळेत गेलेली
नव्ह्ती.
कां
कुणास ठावूक पण तिला मला ब-याच गोष्टी सांगाव्याशा वाटत होत्या. ती मावची आणि मराठी
अशा मिश्र भाषेत बोलत होती आणि मावची बोलली की ‘समजलं का तुला मी काय बोलले ते?’ असा प्रश्न विचारून खात्री करून घेत होती. मी
दोन तीन वेळा ‘हो, समजतय' अस म्हटलं तरी तिचा बहुतेक विश्वास नाही बसला. कारण ती म्हणाली,
“या लोकांना (सोबत असलेले पुरुष) माझ्यापेक्षा जास्त चांगली येते तुझी भाषा, त्यामुळे
काही समजलं नाही, तर त्यांना विचार. समजलं नाही तर तशीच गप्प नको बसू.” मला तिच्या
या हुकुमाची गंमत वाटली आणि मी आमच्या संवादात मनापासून रमले. तिची माझ्यावरची हुकुमत
मला खुपत नव्हती तर तिच्या आत्मविश्वासाचं
मला कौतुक वाटत होतं.
मसरबाईला
शेतावरचं काम सोडून जाता येत नव्हतं आणि झोपडीत तर मला देण्याजोगं काही नव्हतं. मग
ती माझ्या सहका-यांना (जे त्या गावात नियमित जात असतात), म्हणाली, “ताईला माझ्या घरी
घेऊन जा आणि चहा पाजा.” तिचं घर तिथून निदान दोन किलोमीटर अंतरावर होतं.
“तू आणि तुझा नवरा तर इकडेच आहेत, मग तुझ्या घरी मला कोण चहा पाजणार?” या माझ्या प्रश्नावर तिचे “पोरग्याची बायको असेल
की घरी” हे उत्तर तयार होतं. मग माझ्या सहका-याकडे
वळून ती म्हणाली, “आणि ती नसेल घरात, तर तू दे रे करून चहा ताईला." आम्ही सगळे हसलो. मग “पुढच्या वेळी नक्की तुझ्या
घरी चहा घेईन" अशी कशीबशी मी तिची समजूत घातली आणि चहाचा विषय संपला.
तिच्या
घराच्या आवक-जावकाची चर्चा मी चालू केली. घरात वर्षभरात
कुठून आणि किती पैसे येतात आणि कशा कशावर ते खर्च होतात, कर्ज घ्यावं
लागतं कां, ते कुठून मिळतं, व्याजाचा दर काय असतो – अशी चर्चा मी गावात गेले की करते साधारणपणे. गरीब कुटुंबांना नेमक्या कशा प्रकारच्या विकास कार्यक्रमाची
गरज आहे याचा अंदाज यायला अशा अनौपचारिक चर्चा मला नेहमीच मोलाच्या आणि मार्गदर्शक
ठरल्या आहेत. गप्पा चालू असताना स्थानिक पुरुषांपैकी एकजण हसून म्हणाला, “तुझे दारूवर
किती पैसे जातात ते पण सांग की ताईला."
मसरबाई
बोलायची एकदम थांबली. मलाही क्षणभर काय बोलावे ते सुचेना. मसरबाईने थेट माझ्या नजरेला
नजर भिडवून विचारलं, “तू नाही दारू पीत?’
“नाही,
मी नाही पीत दारू”, मी शांतपणे सांगितलं.
“का?’
तिचा पुढचा प्रश्न तयारच होता.
मला
तो प्रश्न त्या क्षणी एकदम अवघड वाटला कारण तिच्या दारू पिण्याबद्दल मला काही म्हणायचं
नव्हत, ते अयोग्य आहे असं म्हणून तिला शरमिंदा नव्हतं करायचं मला!
“आमच्या
समाजात नाही दारूची परंपरा , म्हणून नाही पीत मी ती” – तिला समजेल अशा भाषेत मी उत्तर
दिलं. आदिवासी समाजाच्या
प्रथांबाबत संवेदनशील असण्याचा माझ्या परीनं मी प्रयत्न करत होते.
“तू मटण खातेस का?” मसरबाईचा पुढचा प्रश्न. मी त्यावर
काही न बोलता नुसती हसले. हसून उत्तर टाळण्याचा माझा तो क्षीण प्रयत्न होता.
“मला
मटण आवडतं आणि कोंबडी तर फारच आवडते. तू कधी खाल्ली आहेस कोंबडी?” मसरबाई काही मला
तशी सोडणार नव्हती तर!
मसरबाईने
माझ्यावर असा प्रश्नांचा भडिमार सुरु केल्यावर माझे सहकारी आणि गावातले पुरुष रागावले.
त्यांच्या मते मी प्रश्न विचारायला तिथं आले होते. मसरबाईने मला प्रश्न – आणि तेही
दारू आणि मांसाहार याबद्दल – विचारणं बहुधा कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण मी जर मसरबाईला
खासगी स्वरूपाचे प्रश्न विचारू शकते, तर मसरबाईलाही तसे प्रश्न मला विचारण्याचा अधिकार
आहे अशी माझी सरळ साधी भूमिका होती. असे प्रश्न विचारून तिच्या जगण्यात आणि माझ्या
जगण्यात काही साम्य आहे का , कुठे नेमके आमचे नाते जुळू शकते याचा ती अंदाज घेत होती
असं मला वाटलं. तिच्या पद्धतीने ती मला अजमावत होती आणि त्यात माझ्या मते काही गैर
नव्हतं. माझ्यावर तिने का म्हणून विश्वास टाकावा
मी तिच्यावर तसाच विश्वास टाकून खासगी माहिती
तिला दिल्याविना?
मी
मसरबाईला म्हटलं, “नाही, मी मटण आणि कोंबडी दोन्ही खात नाही. पण तुला आवडते ना, मग
पुढच्या वेळी आले की तुझ्या घरी खाईन मी. “
तिने
मान हलवली आणि माझा समजूतदारपणा एकदम मोडीत काढला. “तुला एखादी गोष्ट पसंत नसेल, तर कशाला मी म्हणते ती दुस-यासाठी करायची? मला खूष
करायला तुला कशाला मटण आणि कोंबडी खायला पाहिजे मनाविरोधात? हे काही मला तुझं पटलं
नाही बघ ताई.”
मी
तिच्या विचारांच्या स्पष्टतेने चकित झाले होते.
मला काय उत्तर द्यायचे ते सुचले नाही. मी गप्प बसले.
दोन
मिनिटं मसरबाईही शांत होती. तिच्या मनात काहीतरी चाललं होत ते कळत होत त्यामुळे मीही बोलायची घाई केली नाही.
मग
निश्चय केल्याप्रमाणे मसरबाई म्हणाली, “बरं मी दारू सोडेन, पण मटण आणि कोंबडी मात्र
मी खाणारच.”
“
चालेल ना ताई?” तिने परत एकदा खात्री करून घेतली.
तिच्याच
तर्काने तिने माझ्यासाठी काही करायची गरज नव्ह्ती खर तर; पण “नाही तू दारू प्यालीस
तरी माझी काही हरकत नाही” असंही मी तिला म्हणू शकत नव्ह्ते!! शिवाय असल्या क्षणिक भावनेत
केलेला निश्चय ती खरच अंमलात आणेल की नाही हे काळच सांगेल.
पण
मला मसरबाईच्या व्यक्तिमत्त्वाच फार नवल वाटलं. खेड्यात
वाढलेली, शाळेत जाण्याची संधी कधीच न मिळालेली ही एक आदिवासी स्त्री. पण तिच्या विचारांत
एक प्रकारची स्पष्टता आणि सहजता होती. मी तिच्यासारखी नव्हते तरी तिने मला सहजतेने
स्वीकारले. तिच्या आवडीनिवडी एकदम स्पष्ट आहेत पण त्याचबरोबर दुस-या प्रकारच्या लोकांचा
आदर करण्याची भावनाही तिच्यात मला आढळली. स्वत:चच मत माझ्यावर लादण्याची कसलाही प्रयत्न तिने
केला नाही आणि माझ्यासमोर तिला कसलाही न्यूनगंड वाटत नव्हता हे विशेष होते. ती बदलायला
तयार आहे, स्वत: च्या सवयींना
मुरड घालायला तयार आहे.
कुठ
शिकली असेल मसरबाई हे सगळ?
त्या
अर्ध्या तासात मसरबाईला मी काहीच शिकवलं नाही खर तर, मी मात्र तिच्याकडून बरच काही
शिकले. माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडला तिच्याशी झालेल्या बोलण्यातून .
‘आपण
जसे आहोत तसे स्वत: ला
स्वीकारले पाहिजे’ याची जाण झाली मला परत एकदा!
**
मस्त! आपण आहोत तसे स्वतःला स्वीकारायला कुठल्या शाळेत शिकता येत नाही मला वाटतं ... अंगच्या शहाणपणातूनच ते येत असावं.
ReplyDeleteछान साकारले आहे व्यक्तिचित्र ! आत एक बाहेर दुसरं असं काही आडपडदा न ठेवता बोलणाऱ्या बर्याच कष्टकरी बायका ग्रामीण भागात आहेत !
ReplyDeleteमसरबाईंची विचारांतील सहजता आणि स्पष्टपणा भावला. आणि तो तुम्हीं टप्प्याटप्प्याने बारकाईने निरीक्षण करीत मांडला तेही सुंदर. अर्थात हा तुमचा गुण आता मला तुमचे लिखाण वाचून कळलाच आहे. :)
ReplyDeleteगौरी, हे अंगभूत शहाणपण काही लोकांकडे असत विपरीत परिस्थितीतही याची गम्मत वाटते मला नेहमीच.
ReplyDeleteImage, तुमच स्वागत आणि आभार. ग्रामीण भागात अशा आडपडदा न राखता बोलणा-या स्त्रिया भेटतात या तुमच्या निरीक्षणाशी मी पूर्णपणे सहमत आहे.
ReplyDeleteअनघा, सहजता आणि स्पष्टता हे दोन्ही एका ठिकाणी मिलण दुरापास्त झालं आहे आजकाल, नाही का?
ReplyDelete(आणि आता तू का परत नव्याने 'तुम्ही' वगैरे सुरुवात करते आहेस?)
अरे ! मला ना कळलंच नाही ! की मी तू म्हणू की तुम्ही ! :p आता नाही हा म्हणणार ! :)
ReplyDeleteव्यक्तीचित्रण करण्याची तुमची हातोटी वादातित आहे, हे परत एकदा दिसले. :) मसरबाईसारख्या ’निरक्षर’ पण 'well-educated’ स्त्रिया खेड्यापाड्यांत असतात. अनुभवाने आलेले शहाणपण म्हणता येईल.अर्थात सगळ्यांनाच येत नाही.
ReplyDeleteमसरबाईत निरागसपणा पण आहे, ती सुस्पष्ट आहे आणि परिपक्वसुद्धा आहे. तिला स्वत्वाची जाणीव आहे, जे कठीण असते.
’मावची’ या भाषेचे नाव पहिल्यांदाच ऐकतोय. माहिती काढावी लागेल. :)
सुंदर !!
ReplyDeleteअनघा +१
संकेत, मावची धुळे, नंदूरबार परिसरात सातपुड्यात बोलली जाते. ही भिलोरी भाषागटातली एक बोली आहे असे म्हणतात. ही भाषा बोलणारे आदिवसी स्वत:ला 'मावची'मानतात. हे नाव नेमके कसे पडले असेल हे मलाही शोधावे लागेल. तुला काही मिळाल्यास मला कळव.
ReplyDeleteहेरंब, आभार.
ReplyDeleteमसरबाईची मानसिकता अतिशय बारकाईने टिपली आहेस तू. आवडले.
ReplyDeleteबरेचदा आपण स्वत: आपल्यालाही जसे आहोत तसे न स्विकारता केवळ लोकांसाठी बदलायचा प्रयत्न करतो... :( यावर मात करायला हवी.
भाग्यश्री, पण हाही बदल केवळ मसरबाई म्हणते म्हणून नको व्हायला, नाही का? :-)
ReplyDelete'ऐसी अक्षरे' वरील प्रतिसाद - http://aisiakshare.com/node/571
ReplyDelete