ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, August 3, 2012

१३३. ऑन डयूटी

(सगळ्यात आधी या इंग्रजी शीर्षकाबद्दल माफी मागते. पण या अनुभवाला समर्पक मराठी शब्द मला सुचले नाहीत; कोणी ते सुचवल्यास त्याचा जरुर उपयोग करेन.)

त्यादिवशी मी आणखी एका प्रवासाला निघाले होते. गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावरुन सुटणार होती आणि त्यासाठी मी तिथं वेळेच्या बरीच आधी पोचले होते. खरं सांगायचं तर या गाडीने प्रवास करताना मी नेहमीच वेळेच्या आधी पोचते. पुण्यातून मुंबईला पोचणा-या रेल्वे गाडीच्या वेळात आणि या गाडीच्या वेळात तब्बल दोन एक तासांच अंतर आहे. डेक्कन क्वीन किंवा प्रगती एक्स्प्रेसने आलं की मी साधारण साडेअकराच्या सुमारास इथं पोचते. मग मी तिथं काहीतरी खाते, पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत बसते. हे काही करायचं नसलं तर स्थानकावरच्या असंख्य प्रवाशांकडे पहात बसते - त्यांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने! 

मला जी गाडी पकडायची होती ती होती कर्णावती एक्स्प्रेस. ती भल्या पहाटे अहमदाबादहून निघून इथंवर येते. इथं अर्धा तास थांबून परतीची वाट घेते. सगळा दिवस प्रवासात गेला तरी मला हीच गाडी सोयीची वाटते. माझे इतर सहकारी दुसरे काही प्रयोग करत असतात - म्हणजे पुणे-मुंबई बसचा प्रवास, किंवा पुणे-अहमदाबाद अहिंसा एक्स्प्रेस, किवा पुण्यातून सुरत अथवा वडोद-याला बसने जाणे वगैरे. पण मी मात्र डेक्कन/प्रगती - कर्णावती हेच सूत्र पकडून आहे. अगदी पर्यायच नसेल तेव्हाच मी लांबचा प्रवास बसने करते. 

कर्णावती एक्प्रेस फलाटावर आल्याची घोषणा झाली तरी अर्धा तास थांबून रहावं लागतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे ही सकाळी निघालेली गाडी असते आणि हा शेवटचा थांबा असतो - त्यामुळे गाडीत प्रचंड कचरा साठलेला असतो. लोक रेल्वेचे डबे किती घाण करतात हे पाहून नवल वाटतं. रेल्वेचे सफाई कर्मचारी गाडी आली की डब्यात चढतात आणि साफसफाई करायला लागतात. 

एकदा सफाई झाली, डब्यातला एसी सुरु झाला की मी आत चढते. आता दहा मिनिटांत कशाची अपेक्षा करायची ते मला अनुभवाने माहिती आहे - मग मी त्याची वाट पहायला लागते. बरोबर दहा मिनिटांत फिकट बदामी रंगाची मऊशार त्वचा असणारा एक सुंदर कुत्रा त्या डब्यात प्रवेश करतो. त्याच्या गळ्यातल्या साखळीची सूत्रं वरवर पाहता पोलिसाच्या हातात आहेत असं दिसतं. पण तो पोलिस आणि तो कुत्रा यांच्यात एकमेकांना त्रास न देण्याचा एक शब्दविरहित करार आहे असं मला त्यांच्याकडे पाहताना नेहमी जाणवतं. त्यांच्या नात्यात कसलाही ताण आणि कसलाही अभिनिवेश दिसत नाही. 

आता हे थोडंसं गंमतीदार आहे. रेल्वे पोलिसांबद्दल पूर्ण आदर राखूनही मला या प्रसंगात नेहमी हसू येतं. कर्णावती गाडीची तपासणी बॉम्ब ओळखता येणा-या कुत्र्याकडून केली जाणं - यात काय विनोदी आहे असा प्रश्न ज्यांनी त्या गाडीने नियमित प्रवास केला नाही त्यांना नक्कीच पडेल. पण मला तो पडतो. रोज घडयाळाच्या काटयाचे पालन करत या गाडीची तपासणी होते. कोण दहशतवादी इतके मूर्ख असतील की ते बॉम्ब सोबतच्या सामानात घेऊन या डब्यात कुत्रा येण्यापूर्वी चढतील? ते अर्थातच बोरिवली स्थानकात - जिथं अशी तपासणी होत नाही - या गाडीच चढू शकतात, ते वापी, वलसाड किंवा वडोदरा स्थानकात गाडीत चढू शकतात आणि घातपात घडवून आणू शकतात. अगदी मुंबई सेंट्रल स्थानकातही कुत्रा डब्यातून बाहेर पडल्यावर चांगली दहा मिनिटं असतात - तेव्हाही ते आरामात डब्यात चढू शकतात.  

त्यामुळे रेल्वेने तपासणीची जागा, वेळ, क्रम .. हे बदलतं ठेवायला हवं. पण आपल्याकडे शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम असतो - तो काटेकोरपणे पाळला जातो. अगदी यांत्रिकपणे पाळला जातो. 

मी दोन -तीन महिन्यातून किमान एकदा हा प्रवास करते. त्यामुळे या कुत्र्याला मी अनेकदा पाहिलं आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. माणसांनी बॉम्ब निर्माण करायचे आणि ते शोधून काढत कुत्र्यांनी माणसांचे प्राण माणसांपासून वाचवायचे - हा कसला न्याय आहे हे काही मला कळलेलं नाही आजवर! हा कुत्रा अतिशय शांतपणे आपलं काम करतो. तो अतिशय स्वच्छ दिसतो नेहमीच. हा कुत्रा माझ्याजवळून जातो तेव्हा त्याच्या पाठीवरुन मायेने हात फिरवावा अशी इच्छा माझ्या मनात येते - पण मी ते करत नाही. उगाच पोलिसाचं लक्ष मला माझ्याकडे वेधून घ्यायचं नाही आणि तो कुत्रा माझ्या वागण्यावर तितका प्रेमळ प्रतिसाद देईल याचीही मला खात्री नाही - अजिबातच नाही. 

जोपर्यंत कुत्रा डब्यात असतो, तोवर सगळे प्रवासी आपापले बोलणे थांबवून शांत बसतात. कुत्रा जसा पुढे जातो, तशी प्रवाशांची नजरही त्याच्याबरोबर फिरत जाते. वातावरणात 'आता इथं काही सापडेल कां?' असा एक प्रकारचा तणाव असतो. एकदा का तो कुत्रा डब्याच्या बाहेर पडला की सगळ्यांचे रोखून धरलेले श्वास पूर्ववत गतीने चालायला लागतात आणि माणसं निवांतपणे परत आपापल्या उद्योगांना लागतात. हेही सगळे नेहमीचे - अगदी अपेक्षित. 

त्यादिवशी मात्र एक अघटित घडलं. एक पांढ-या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगांची अगदी कडक इस्त्री केलेली पॅन्ट घातलेला एक माणूस एकदम त्या कुत्र्याशी बोलायला लागला. तो माणूस कोणालातरी गाडीत पोचवायला आला होता असं वाटलं कारण तो उभा राहून कोणाशीतरी बोलण्यात अगदी मग्न होता. जेव्हा तो कुत्रा त्यांच्या जवळून जायला लागला तेव्हा त्या माणसाचे लक्ष तिकडं गेलं. गप्पा थांबवून तो कुत्र्याशी बोलायला लागला - ते बोलणं जणू काही त्या दोघांची खास ओळख असावी अशा थाटाचं होतं. आश्चर्य म्हणजे तो पोलिसही थबकला आणि त्या माणसाने कुत्र्याशी बोलण्यावर त्याने काही आक्षेप घेतला नाही. 

लक्षात यावं न यावं इतक्या काळासाठी कुत्राही थबकला. तो जणू त्या माणसाचं बोलणं ऐकत होता - पण त्याने प्रतिसाद काहीच दिला नाही. कुत्र्याची ना शेपटी हलली, ना त्याने त्या माणसाकडे मान उचलून पाहिलं. त्या सफेद कपडे घातलेल्या माणसाचा हात कुत्र्याच्या पाठीकडे येताना मात्र कुत्र्याने नजर वर केली. त्या नजरेत काय होतं मला माहिती नाही पण त्या माणसाचा हात आपोआप मागे गेला. 

"टायगर माझी ओळख विसरला की काय पार?" त्या माणसाने पोलिसाला तक्रारवजा सुरात विचारलं.

पोलिसाचं नम्र उत्तर मला चकित करणारं होतं. पोलिस म्हणाला, "माफ करा साहेब. रागावू नका. पण टायगर डयूटीवर असताना कोणाला ओळख दाखवत नाही. त्याचं पहिल्यापासून असंच आहे. ..." पोलिसाच्या स्वरांत नकळत एक अभिमान डोकावून गेला यात शंका नाही. 

तो कुत्रा आणि तो पोलिस दोघेही जणू काही घडलंच नाही अशा थाटात पुढे गेले. 

तो पांढ-या कपडयांतला माणूस स्वतःशीच हसला. माझ्या प्रश्नार्थक नजरेचा त्याच्यावर ताण आला असणार. कारण मी काहीही विचारलं नाही तरी तो म्हणाला, "मॅडम, आजकाल कुत्रीसुद्धा हुशार झालीत बघा. मी या टायगरचा प्रशिक्षक होतो - मी त्याला अनेक गोष्टी शिकवल्यात आणि पठ्ठा मलाच ओळख दाखवत नाही. कां, तर म्हणे ऑन डयूटी आहे! काय माणसाची दशा झाली आहे पहा. डयूटीवरचा कुत्रासुद्धा तुमची काही ओळख ठेवत नाही, माझी लाजच काढली म्हणा की टायगरने!"

परत तो माणूस हसला - काहीसं स्वतःशी, काहीसं माझ्याकडं पाहून.   

टायगरच्या वर्तणुकीबद्दल त्याच्या प्रशिक्षकाला समाधान वाटलं की दु:ख - हे मात्र मला सांगता नाही येणार!! 
**

22 comments:

 1. अत्यंत सुंदर नोंद. कुत्र्याला तरी कामाची आणि कर्तव्याची जाण आहे, हे लक्षणीय.
  बाकी लेख वाचून ऑन ड्यूटी या शीर्षकासाठी कर्तव्यरत किंवा कर्तव्यनिष्ठा चालेल, असे वाटते. थोडेसे अवघड वाटले तरी हरकत नाही.

  ReplyDelete
 2. देविदासजी, आभार. कर्तव्यरत आणि कर्तव्यनिष्ठा हे दोन्ही शब्द चांगले आहेत. पण मला वाटतं की एका प्रसंगावरून इतका मोठा निष्कर्ष काढणं कदाचित अतिशयोक्तीचं उदाहरण होईल. कर्तव्यरत, कर्तव्यनिष्ठा हे शब्द कदाचित याहून अधिक नैतिक पेचाच्या प्रसंगात वापरावेत असं आपलं माझं मत!

  ReplyDelete
 3. कुत्रे खरोखर एकाच वेळी पोक्त अन निरागस वागू शकतात! या श्वान पथकाच्या पोलिसांचे अनुभव फार भारी असणार!

  ReplyDelete
 4. ऑन ड्युटी असल्याकारणाने कुत्र्याने प्रशिक्षकाला देखील ओळख दाखवली नाही ह्याचा त्या प्रशिक्षकाला खरं तर अभिमान वाटायला हवा...आपल्या शिष्याबद्दल. नाही का ? :)

  ReplyDelete
 5. आभार अमोल केळकर.

  ReplyDelete
 6. अनु, हो श्वान पथकाच्या एखाद्या पोलिसाशी गप्पा मारायची संधी मिळायला हवी, नाही का?

  ReplyDelete
 7. अनघा, कोणाचीही कर्तव्यनिष्ठा आपल्या वाट्याला आली की ते आपल्याला आवडतं नाही - आपण नियमांना अपवाद असावं असं प्रत्येकाला वाटतं!!

  ReplyDelete
 8. आपल्या देशातल्या नियमांबद्दल बोलावं तितकं कमी होईल. निष्काळजीपणा, (पूर्वी केलेल्या चुकांची) विस्मृती या गोष्टी आपल्या देशावर फारच प्रसन्न आहेत. काही दशकांच्या मेहनतीनंतर अगदी अलीकडे संवेदनहीनतादेखील मिळवली.

  लेख वाचत असताना असं वाटलं की यास "कर्तव्यतत्पर", "कर्तव्यदक्ष" असं काहीसं शीर्षक योग्य ठरलं असतं. पण लेख पूर्ण वाचल्यानंतर मात्र वाटलं की, या प्रसंगाला असं म्हणणे जरा जास्तच होईल. ही भावना वेगळीच असावी ...... काहीशी निरस...... एखाद्या चव नसलेल्या पदार्थासारखी...... चव चाखून कळूच नये की नक्की काय आहे ते.
  का त्याने असं केलं असावं? तो रूसला असावा का त्याच्या प्रशिक्षकावर? की खरोखरच तो त्याच्या कामाबाबत दक्ष आहे...... किँवा कदाचित माणसांचे माणसांपासून रक्षण करता करता त्यालाही माणसांसारखं गर्वाने ग्रासलं असावं का..... कदाचित..... देव जाणो.....!

  बाकी लेख..... छानच.....!

  ReplyDelete
 9. अभिषेक, टायगरने असं का केलं असावं हा प्रश्नच आहे मलाही पडलेला ...!!

  ReplyDelete
 10. कामावर असताना ?

  ReplyDelete
 11. रवींद्र देसाई, आभार. शब्दांची जोडगोळी चांगली आहे. पण 'कामावर असताना' हे शब्द माणसांच्या बाबतीत वापरले जातात. कुत्रा, बैल, बकरी, कोंबडी .. यांच्यासाठी काय शब्द वापरतो आपण?

  ReplyDelete
 12. स्वतःला प्रशिक्षक म्हणवणारा तुमच्याशी खोटे बोलला असा एकच अर्थ मला ह्यात दिसतो. कारण शिपायाने, प्रशिक्षक असल्याचा त्याचा हा दावा मान्य केला असे दिसत नाही आणि कुत्रा कधी खोटे बोलत नाही. विसरतही नाही. ऑन ड्युटी असणे त्याला कळतही नाही.

  "कामावर असतांना" असे प्राण्यांबाबत म्हणणे काही वावगे नाही. माझा भाऊ वनखात्यात आहे. जेव्हा त्याचे हाताखाली दोन हत्ती कामाला असत तेव्हा "कामावर असतांना" हे शब्द मी त्यांचेकरता अनेकदा ऐकलेले आहेत.

  पण आपल्या बारीक निरीक्षणाचे कौतुक करायला हवे! त्यामुळेच हा लेख सुरस झाला आहे. आवडला.

  ReplyDelete
 13. सविताताई, अतिशय मार्मिक निरिक्षण आणि प्रसंग आहे.

  तू लिहिलंयेस, "टायगरच्या वर्तणुकीबद्दल त्याच्या प्रशिक्षकाला समाधान वाटलं की दु:ख - हे मात्र मला सांगता नाही येणार!! "

  मला वाटतं यात प्रशिक्षकाच्या संमिश्र भावना असाव्यात.
  'ऑन ड्यूटी' असल्याने टायगरने जी शिस्त पाळली त्याचा अभिमान तर असेलच... पण थोडंसं असंही वाटलं की जशी माणसं (सगळीच नाही पण बरीचशी) पोलिसासारखा 'एलिव्हेटेड' हुद्दा मिळाल्यावर जुन्या ओळखी दाखवायला टाळतात तसंच कुत्र्यानेही केलं याचं त्याला दु:खही झालं असणार.

  ReplyDelete
 14. नरेंद्रजी, स्वत:ला प्रशिक्षक म्हणवणारा खोटं बोलला असेल कदाचित हेही शक्य आहे. पण पोलिस त्याच्याशी बोलला इतकं पुरेसं आहे माझ्या मते. आणि हत्तीही 'कामावर असतात' ही माहितीत भर आहे माझ्या नक्कीच!

  ReplyDelete
 15. स्मिता, प्रशिक्षकाच्या भावना संमिश्र असाव्यात या विचाराशी मी सहमत आहे.

  ReplyDelete
 16. छान लेख आहे.
  प्रशिक्षकाला समाधान तर वाटलेच असेल पण कुठेतरी दु:खही झालंच असणार.
  माणूस ऑन ड्युटी असला की ओळख जास्त लक्षात ठेवतो पण खरं काय असायला हवं हे टायगरने दाखवून दिलं
  "ऑन ड्युटी" शीर्षक मला समर्पक वाटलं कारण बोलताना प्रशिक्षकाने ज्या सहजतेने तो शब्द वापरला तोच लिखाणात आला तर काय बिघडतंय :)

  ReplyDelete
 17. आभार इंद्रधनू. टायगरकडून आपल्याला सगळ्यांनाच बरंच काही शिकण्याजोगं आहे यात शंका नाही :-)

  ReplyDelete
 18. मस्त निरीक्षण. टायगर इतक्या मनापासून सगळ्यांनी ड्यूटी केली तर!

  ReplyDelete
 19. गौरी, असणार अशी माणसं अनेक .. कधीकधी तीही भेटतात :-)

  ReplyDelete