ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, July 20, 2012

१३२. विचित्रपणा

कधी कधी आपण विचित्र वागतो. 
गोष्ट काही फार गंभीर नसते, किरकोळच असते - तरीही 'असं का वागलो त्यावेळी' हा प्रश्न काही पाठ सोडत नाही. 
त्याच उत्तर आता मिळून काही फरक पडणार नसला तरीही. 

ही गोष्ट दुस-या कुणालाच माहिती नाही मी सोडून. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी नाही - एका अर्थी तो स्वत:चा शोध आहे - न समजलेल्या स्वत:चा शोध! 

त्या दिवशी मी एका जिल्ह्याच्या शहरात होते. छोटसंच शहर आहे ते, फार मोठ नाही. तिथल्या एका स्वयंसेवी संस्थेनं एका कार्यक्रमासाठी मला बोलवलं होतं.  दगदगीचा दिवस होता तो.  कार्यक्रमात मला मुख्य वक्ता म्हणून काम होतं आणि त्याच्या पुढे मागे अनेक औपचारिक आणि अनौपचारिक भेटीगाठी आणि मीटिंग होत्या.  कार्यक्रमाला ब-यापैकी गर्दी होती आणि श्रोत्यांचा उत्साह मला काहीसा अनपेक्षित होता. त्यामुळे मुख्य कार्यक्रमानंतरही माझं बोलणं चालूच राहिलं. लोक अनेक गोष्टी सांगतात - त्यांचे विचार, त्यांचे अनुभव, त्यांची दु:खं, त्यांची स्वप्नं ....कोणत्याही व्यक्तीच 'एक' आयुष्य हे ब-यापैकी एकसारखं आणि म्हणून एकसुरी असल्याने मी अशा गप्पा ऐकायला नेहमीच उत्सुक असते. त्यातून मला इतरांच आयष्य कसं असेल याच एक दर्शन होतं! 

दिवस संपताना मी खूप दमले होते. पण हा थकवा अपयशातून येणारा नव्हता ( निरर्थक, वांझोटा दिवस कसा असतो तेही मला माहिती आहेच .. ). मी दिवसभर ब-यापैकी खाल्लं होतं - त्यामुळे ती दमणूक भुकेमुळे अथवा तहानेमुळेही नव्हती. कदाचित बोलण्याचा थकवा असावा तो. माझी ट्रेन रात्री साडेअकराला होती. हितचिंतकाच्या मागे लागून मी रात्री  साडेदहालाच स्टेशनवर सोडायला लावलं मला त्यांना. ते दोघे "थांबतो गाडी येईपर्यंत" म्हणत होते - पण त्यांची दोन लहान मुलं घरात होती म्हणून मी त्यांना लगेच परत घरी जायचा आग्रह करत होते. म्हणजे ते थांबायचा आग्रह करत होते आणि मी त्यांना परत पाठवायचा आग्रह करत होते. मला खरं तर सकाळपासून अजिबात निवांतपणा मिळाला नव्हता - रेल्वे स्थानकावर निदान अर्धा तस जरी माझा मला  मिळाला तरी ते मला पुरेसं होतं. 

अखेर हो ना करता अकरा वाजता ती मंडळी मला स्थानकावर सोडून नाराजीने घरी गेली. आता काय अर्ध्या तासात गाडी येईलच असं मी म्हणेतो 'गाडी अर्धा तास उशीराने धावत आहे' अशी उद्घोषणा झाली.  शहर लहान असल्याने फारशी गर्दी नव्हतीच स्थानकावर. मी एक स्वच्छ बाक शोधला, तिथं बैठक मारली, सकाळी वाचायचं राहून गेलेलं वर्तमानपत्र काढलं आणि वाचायला सुरुवात केली.  एखादी  गाडी येण्याची वेळ झाली की पाच दहा मिनिट गर्दी व्हायची आणि स्थानक पुन्हा शांत होऊन जायचं.  रात्री ब-याच गाड्या इथं थांबतात तर - असा एक विचार माझ्या मनात येऊन गेलाच. 

एक गाडी आली, काही प्रवासी त्यातून उतरले, काही त्यात चढले आणि गाडी निघून गेली. स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी आपापसात बोलत असताना त्यातला एक आवाज मला माझ्या मैत्रिणीचा वाटला. या शहरात माझ्या ओळखीचे काही लोक होते आणि त्यातल्या एक दोन घरांशी माझी जवळीक होती. पण भेटायला वेळ मिळणार नाही म्हणून मी त्यांना कोणालाच माझ्या शहर भेटीविषयी कळवले नव्हते. मी ज्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते, ती छोटी संस्था होती त्यामुळे माझ्या आजच्या भाषणाच्या कार्यक्रमाविषयी स्थानिक वृत्तपत्रांत काही बातमी येण्याची शक्यता नव्हती. या संस्थेशी माझ्या परिचितांचा काही संबंध नव्हता.  मला भास तर होत नव्हता परिचितांना न कळवण्याच्या अपराधी भावनेतून? 

मी नीट लक्ष देऊन पाहिलं. तो आवाज ओळखीचा आहे असा मला भास नव्हता झाला - तो माझ्या एका मैत्रिणीचा आवाज होता. तिच्या घरच्या इतर लोकांबरोबर ती होती.  त्यांच्या बरोबर असलेल्या सामानावरून ते सगळेजण कुठून तरी घरी परतत होते हे कळत होतं. 

आणि मग फारसा विचार न करताच मी हातातलं वर्तमानपत्र पुन्हा वाचायला लागले. 

छे! छे! आमचं काही भांडण वगैरे नाही झालेलं!  मैत्रिणीशी माझे चांगले संबंध आहेत. तिच्या घरच्यांशीही माझा घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्या घरी मी अनेकदा जाऊन राहिले आहे. माझ्या अडचणीच्या काळात त्यांचा  मला आधार असतो. त्यांना कुणालाच आज मी इथं आहे हे माहिती असण्याचं कारण नव्हत. ते जेव्हा उजेडात आले तेव्हा त्यांच्या चेह-यावरचा प्रवासाचा शीण मला स्पष्ट दिसला.  इतर वेळी फक्त त्यांना भेटण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून मी आले असते. पण त्या क्षणी मला त्यांना भेटावसं वाटत नव्हत हे मात्र खरं! काय कारण? काही नाही. 

त्या फलाटावरून माझी मैत्रीण आणि तिच्या घरची मंडळी दिसेनाशी होऊ लागली. अजूनही ते सगळे माझ्या हाकेच्या अंतरावर होते. मी एक हाक मारून त्यांना थांबवू शकले असते. त्यांच्या घरी मी जाऊ शकले नसते पण त्यांच्याशी बोलू शकले असते. पण मला त्यांच्याशी बोलायचं नव्हत त्या क्षणी. मी वर्तमानपत्रातल्या निरर्थक बातम्या वाचत बसले. 

मी त्या दिवशी अशी का वागले? मला माहिती नाही. अनेकदा मला एकट राहायला आवडतं आणि मी माणसांना टाळते हे आहेच. पण या मैत्रिणीची गोष्ट वेगळी होती. 'मला बोलायचा कंटाळा आलाय' असं मी तिला सहज सांगू शकले असते आणि तिला ते समजलं असतं. माझ्या इच्छेविरुद्ध काही वागायला तिने मला कधीच भाग पाडलेलं नाही आजवर ...

प्रत्येक नात्यात विश्वास असतो एक. तो जोवर असतो तोवर नात्याला कशाची झळ नाही पोचत. सगळ्या अडचणींना, परिस्थितींना हे नातं झेलू शकत ते विश्वासाच्या आधारेच. एकदा तो विश्वास गमावला कोणी एकाने की नातं संपत. 

मी त्यादिवशी रेल्वे स्थानकावर तिला टाळलं - हे माझ्या मैत्रिणीला माहिती नाही - पण मला माहिती आहे. मी तिचा एक प्रकारे विश्वासघात केला आहे माझ्या मते. मी जे करायला नको होतं ते केलं आहे अशी एक अपराधी भावना माझ्या मनात आहे. मी आजही तिला हे सांगितलं तर ती फक्त हसेल आणि 'विचित्र आहेसच तू' असं म्हणून मला माफ करेल हे मला माहिती आहे. तिने आणि तिच्या घरच्यांनी माझ्याकडून काही साध्या अपेक्षा ठेवणंही केव्हाच सोडून दिलंय! 

जे काही मी केलं ते आता 'अनडू' तर नाहीच करता येत. बिरबलाने म्हटलं होतं तसं 'बूंद सें गयी वह हौद सें नही आती' हेही मला माहिती आहे. आपल्या काही कृत्यांबरोबर आपल्याला जन्मभर राहावं लागतं - आपल्याला आवडो की न आवडो. 

माझ्या आयुष्यात विचित्रपणाचा हा एकच क्षण आहे असं मात्र नाही ... भरपूर आहेत ते .. त्यामुळे त्यांच मला काही अप्रूप वाटत नाही ...

(आता  ' हे नेमकं कोण होतं '- असा विचार करत बसू नका! खूप जुनी गोष्ट आहे ही! 
हे खरंच घडलं होतं की मला झालेला भास आहे - हेही मला सांगता नाही येणार इतकी जुनी गोष्ट :-) )
** 

19 comments:

  1. "जे काही मी केलं ते आता 'अनडू' तर नाहीच करता येत." पटलं आणि आवडलं. अनुभव असा आहे की अनडू केलं तरी प्रत्यक्षात ते कधीही होत नसते कारण तोपर्यंत काळ बदललेला असतो आणि त्याबरोबर त्याचे संदर्भही.

    ReplyDelete
  2. :) फार कमी वेळा माझ्याच आयुष्यातील माझे क्षण फक्त माझे म्हणून हाती लागतात. मग तर मी अजिबात कोणाला त्यात ओढून घेण्याच्या फंदात पडत नाही. आता मला अपराधी वाटायला हवंय की नाही कोण जाणे...सध्या तरी वाटत नाहीये हे नक्की ! :) :)

    ReplyDelete
  3. अगदी आवडली पोस्ट. कारण मीही खूप वेळा विचित्रच नाही तर विक्षिप्तपणे पण वागते. तशी बऱ्याचदा बसमध्ये माझ्या जागेवरून उठून कोणा मध्यमवयीन स्त्रियांना किंवा वृद्धांना जागा देणारी मी कधीकधी उठतच नाही जागेवरून... नंतर मलाच वाटतं असं का केलं मी... पण काहीच उत्तर नसतं :(

    ReplyDelete
  4. मला हा विचित्रपणाचा क्षण नॉर्मल वाटतोय...म्हणजे कधीतरी आपल्या मनाचा विचार करून काही (तात्पुरते कठीण वाटणारे) निर्णय घेतो नं तसं..जोवर त्याने नात्यांमध्ये अंतर येणार नसतं तोवर हेही ठीक म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे आपण कुणाला फ़ोन केला आणि त्याने आपण नंतर बोलुया का म्हणणं जसं लाइटली घेतलं जातं तसंच काहीसं....:)

    ReplyDelete
  5. प्रत्येक गोष्टीचं कारण शोधत न बसणं हेच श्रेयस्कर !

    ReplyDelete
  6. :)
    there is nothing worth undoing in life. is there?!

    The best thing about having a friend is that... they understand... and igonre!
    That moment, both of you were unable to do justice to your time together. I'm sure you did catch up later someday.

    who knows....Your friend would've been glad too!

    ReplyDelete
  7. सचिन, प्रत्यक्ष आयुष्यात गोष्टी 'अनडू' करता येत नाहीत या तुमच्या निरीक्षणाशी सहमत आहे मी.

    ReplyDelete
  8. अनघा, अपराधी न वाटणचं इष्ट आहे ..कारण वाटूनही तसा काही उपयोग नसतोच :-)

    ReplyDelete
  9. इंद्रधनू, उत्तर नसतं हेच खरं!!

    ReplyDelete
  10. हेरंब, कारण शोधून नये प्रत्येक गोष्टीच .. पण तरी मनाला उगीच एक चाळा लागतो कधीकधी!

    ReplyDelete
  11. अनू, अरेच्चा ..मैत्रिणीलाही बरचं वाटलं असेल कदाचित ही शक्यता आवडली मला .. आजवर ध्यानात नव्हती आली :-)

    ReplyDelete
  12. oh! take it lightly.i donot think anything vichitra about it.you were tired so you did not call. ok.this has happened no. of times to me.i never call any known person even he or she passes by me on the road.nice post. nutan.

    ReplyDelete
  13. नूतन, तू नेहमी असं करत असतेसं? तुला बहुतेक रोजच्या रोज तीच मंडळी भेटत/दिसत असावीत म्हणून कदाचित ते स्वाभाविक आहे.

    ReplyDelete
  14. विचित्रपणा आवडला, खरं सांगायचं तर दिलासा मिळाला ;)

    इतकं विचित्र वागणारे आपण एकटेच नाही याचा !

    ReplyDelete
  15. क्षिप्रा, कुणाला कशात 'दिलासा' मिळेल याचा काही भरवसा नाहीच तर या जगात!!

    ReplyDelete
  16. हा विचित्रपणा थोड्याफार प्रमाणात प्रत्येकातच असतो. ज्या गोष्टीमुळे कोणाचं नुकसान होत नसेल, कोणी दुखावलं जात नसेल तर ती चूक नसावी कदाचित.
    लेख आवडला.

    ReplyDelete
  17. अभिषेकजी, सहमत आहे मी तुमच्याशी. पण अनेकदा अशा गोष्टी फक्त आपण आपल्या दृष्टीकोनातून पाहतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काही वाटलं नसेल असं गृहित धरतो .. ते होत नाही ना इतकं वेळोवेळी तपासून मात्र पाहिलं पाहिजे, नाही का?

    ReplyDelete
  18. क्षिप्रा + १. आपल्यासारखाच विक्षिप्तपणा कुणीतरी केलेला बघून बरं वाटलं :)
    आपण तेंव्हा असं का वागलो याचं कोडं पडतं मला खूप वेळा.

    ReplyDelete
  19. गौरी, विचित्र माणसांना दुसरी कोणी 'विचित्र' माणसं दिसली की बरं वाटतं - नाही का? :-)

    ReplyDelete